रशिया-युक्रेन युद्धात होरपळलेली चित्रकार

हेलन पनास्युक या युक्रेनियन चित्रकाराचा स्थलांतराचा अनुभव

हेलन आणि तिच्यासारख्या असंख्य युक्रेनियन स्त्रियांनी अतिशय धोकादायक परिस्थितीत आपल्या अर्ध्या कुटुंबाला मागे ठेवून देश सोडला आहे. त्यातल्या काहींना मानसिक धक्का बसला आहे तर काहींची मुले त्यांच्या देशात रशियन सैन्याशी लढत आहेत. अशावेळी परक्या मुलखात आपल्या बरोबरच्या लोकांची, लहान मुले आणि वृद्धांची काळजी घेत या स्त्रिया आपल्या देशाकडे डोळे लावून बसल्या आहेत.

हेलन पनास्युक ही मध्यम वयाची प्रसिद्ध युक्रेनियन चित्रकार. युरोपात आणि युरोपच्या बाहेरही तिच्या चित्रांची नेहमी प्रदर्शने भरत असतात. युक्रेनमधील सर्वात सुंदर शहरांपैकी एक असणाऱ्या ओडेसामध्ये ती एका संग्रहालयाची संचालक म्हणून काम करत होती. समुद्राकाठी असणाऱ्या तिच्या घरात 24 फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता रशियाने केलेल्या हल्ल्यात अनेक स्फोटांचे, कानाला दडे बसावेत इतके मोठे आवाज झाले. यानंतर तिने ताबडतोब बेडवरून उडी मारली आणि तिथून बाहेर पडायला लागणाऱ्या आवश्यक गोष्टी व कागदपत्रे गोळा करायला सुरवात केली. त्यानंतर तिने इंटरनेट चालू करुन तिचे कोणकोणते मित्र ऑनलाईन आहेत ते पाहिले. त्या प्रचंड मोठ्या अनपेक्षित हल्ल्यामुळे तिचे सर्व मित्र जागे होते. त्यांनी एकमेकांची चौकशी केली आणि एकमेकांची विचारपूस झाली. त्यातून असे लक्षात आले की, कीव, मारियुपोल, खारकिव्ह, लुहान्स्क आणि इतर शहरांमध्ये एकाचवेळी बॉम्बस्फोट झाले होते.

24 तारखेलाच माझा आणि हेलेनचा फोन झाला त्यावेळी ती प्रचंड तणावाखाली होती. ती म्हणाली, “मी कल्पनाही करू शकत नाही की परिस्थिती किती भयानक आहे! खरोखरच युद्ध सुरु झालं आहे. अलीकडच्या काळात असं काही होऊ शकेल यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. हे खूप भीतीदायक आहे! हिटलरप्रमाणे मध्यरात्री रशिया अचानक असा हल्ला करू शकेल यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. मला असंच वाटत आहे की, मी आता माझे डोळे बंद करेन आणि जेव्हा पुन्हा ते उघडेन तेव्हा जे काही झालंय ते सर्व निघून जाईल. आणि वाटेल की, हे फक्त एक वाईट स्वप्न होतं. अगदी काही तासांपूर्वी आम्ही किती सुखात होतो. पण नाही! ते आता खरं नाही” यानंतर हेलेनने ठरवले की, शक्य तितक्या लवकर जवळच्या मोल्दोवा सीमेवर जायचे. आणि तिने तिची मुलगी, बहीण, भाची, 78 वर्षांची वृद्ध आई यांना ताबडतोब गोळा केले. इतर सगळे नातेवाईक जमायला एक दिवस लागला.

यावेळी, युक्रेनच्या राष्ट्रपतींनी एक हुकूम जारी केला की, लष्करात भरती होऊ शकतील इतक्या वयाच्या कोणत्याही पुरुषाला युक्रेन सोडण्याचा अधिकार नाही. यामुळे हेलनच्या बहिणीने स्वतःच्या मुलाला एकट्याने मागे न सोडण्याचा निर्णय घेतला आणि ती तिच्या घरी राहिली. प्रवास करणाऱ्या तिच्या मित्रांनी त्यांच्या मांजरींना त्यांच्यापर्यंत आणले आणि तिच्याकडे आठ मांजरी आणि दोन कुत्री झाली होती. मोल्दोव्हाची सीमा फक्त दीड तासांच्या अंतरावर होती, परंतु ते सगळे वाटेत 18 तास कारच्या रांगेत अडकले. गाड्यांची ही रांग 24 किमी लांब लागलेली होती. या दरम्यान हेलनने फेसबुकवर लाईव्ह येऊन किती लोक युक्रेन सोडून चालले आहेत हे सगळ्यांना दाखवले.

या नंतर पुन्हा तिच्याशी संपर्क झाला तो थेट चार दिवसांनी.. त्यावेळी ती थकलेल्या अवस्थेत म्हणाली, “परवाच्या प्रवासात खूप ताण आला. मी एक दिवसही झोपू शकले नाही. प्रवासात पूर्ण वेळ माझ्या डोळ्यांसमोर एक कार होती, जिच्या मागोमाग मी कधीकधी फक्त 50 सेंमी प्रतितास या वेगाने जाऊ शकत होते.”

या युद्धाविषयी तिला काय वाटते, असे विचारल्यावर ती म्हणाली, “12 फेब्रुवारीपासून युद्धाच्या शक्यतेवर सतत बोलणं सुरु होतं. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी आणि इस्रायली गुप्तचरांनी आम्हाला चेतावणी दिली होती की, पुतिन युक्रेनशी युद्ध करण्याची योजना आखत आहेत. पण त्यावर सामान्य नागरिकांपैकी कोणीही विश्वास ठेवला नाही. शेवटी रशिया आणि युक्रेन एकमेकांची भावंडंच आहेत अशी आमची भावना होती.

यूएसएसआरच्या इतिहासात आम्हीच एकत्रपणे जर्मन फॅसिस्टांचा पराभव केला होता. त्यावेळी विशेषतः युक्रेनच्या भूभागावरील युद्ध रक्तरंजित होतं. युद्धाची घोषणा न करता रशिया हिटलरप्रमाणे अचानक युक्रेनवर हल्ला करू शकतो यावर कोणाचाही विश्वास नव्हता. पण ते घडलं आणि आता रशियाच्या इतिहासातील ही एक लाजिरवाणी वस्तुस्थिती झाली आहे. विशेष म्हणजे पुतीन यांनीही हिटलरप्रमाणे युद्ध छेडलं. हा एक विचित्र योगायोग आहे.”

या नंतर काही दिवस हेलेनने मोल्दोव्हा, रोमानिया, हंगेरी, स्लोव्हाकिया असा प्रवास करत पोलंडमध्ये प्रवेश केला. हेलन पोलंडला पोचेपर्यंत पुन्हा तिच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नाही. पोलंडला पोचल्यावर मात्र तिने संपर्क केला. त्या वेळी ती म्हणाली, “या सर्व देशांनी अविश्वसनीयरित्या आमचं आदरातिथ्य केलं आहे आणि पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी माझी राहण्याची मोफत सोय केली. ते मानवतावादी असल्यामुळे मदत करू शकले. अन्न, डिटर्जंट, टॉवेल, कपडे, चार्जर, ब्लँकेट इ. भरघोस मदत दिल्याबद्दल पोलंड सरकारचे खूप खूप आभार. त्यांनी त्यांच्या देशात सर्वाधिक निर्वासित स्वीकारले आहेत. गेल्या काही दिवसांत या देशात दोन लक्ष पन्नास हजार निर्वासित आले आहेत. एकूण दहा लाखांपेक्षा जास्त लोकांनी युक्रेन सोडलं आहे. हे युद्ध खरंतर सगळ्या मानवजातीवर आलेली आपत्ती आहे.”

मागे राहिलेल्या तिच्या नातेवाईकांशी आणि शहरातील मित्रांशी तिचा काही संपर्क होतो का, तिथे काय परिस्थिती आहे याविषयी विचारले असता हेलन म्हणाली, “काही दिवसांपूर्वी माझ्या शहरात युक्रेनच्या लष्करी तुकडीवर हल्ला झाला. त्यात मुख्य प्रशासकीय इमारत कोसळली आहे. हल्ला झाला त्यावेळी ती इमारत पहिल्यांदाच मोकळी झाली होती. त्यामुळे तिथे हल्ला झाला त्यावेळी कोणाचाही मृत्यू झाला नाही. हा खरंच चमत्कार म्हटला पाहिजे. देव युक्रेनला अशीच मदत करो! मागे राहिलेली माझी बहीण रोज रात्री तळघरात झोपते. ती जिथे राहते त्या भागात दररोज हवाई हल्ले करणाऱ्या विमानांची ये-जा सुरु आहे. तिथे आमचं हवाई दल क्षेपणास्त्रांनी रशियन विमानं पाडत आहे. या सगळ्याचा मला धक्का बसला आहे. सुरुवातीला, जे घडत होतं त्यावर माझा विश्वास बसत नव्हता. पण मग मी शत्रूचे अत्याचार आणि त्यांचा धिंगाणा पाहिला.”

या सगळ्यात रशियाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरु होता की, युक्रेनचे लोक हे मुळात रशियनच आहेत त्यामुळे रशिया आणि युक्रेनियनांनी एकत्र यायला हवे. रशिया आणि युक्रेन यांच्यात खरेच साम्य आहे का याबाबत हेलनला विचारल्यावर ती म्हणाली, “रशियन्स हे विवेक नसलेले लोक आहेत. रशियन सैन्याचे हात स्वतःच्याच निरपराध नागरिकांच्या रक्ताने माखलेले आहेत आणि ते फॅसिस्टांसारखे वागत आहेत. आम्हा युक्रेनच्या लोकांना स्वतःची भाषा आहे, जी रशियन लोकांना समजत नाही. रशियनांनी नेहमीच युक्रेनियनांना खालच्या दर्जाने वागवलं आहे. ते स्वत:ला हुशार आणि  अधिक विकसित समजत होते. परंतु अनेक रशियन शास्त्रज्ञ, लेखक, कलाकार अशा नामांकित लोकांची मुळं युक्रेनियन आहेत. युक्रेनियन अधिक सुसंस्कृत आहेत. आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचं घर आणि कुटुंब. आम्ही खूप मेहनती आणि नम्र आहोत.”

दरम्यानच्या काळात रशियन सैन्य युक्रेनच्या अगदी आतपर्यंत मुसंडी मारत होते आणि युक्रेनचे लहानसे सैन्य त्या मुकाबल्यात कमी पडताना दिसत होते. या युद्धाला आता नागरी युद्धाचे रूप आले आहे. या बाबत हेलन म्हणते, “माझी मातृभूमी आणि माझ्या लोकांना आता किती त्रास होत आहे हे पाहणं माझ्यासाठी खूप कठीण जात आहे. आम्ही धैर्याने शत्रूशी लढत आहोत, परंतु आमची मनं खूप दुखावली आहेत. शेवटी, प्रत्येकाचं जीवन अमूल्य आहे. आम्ही या युद्धात यापूर्वी कधीही नव्हतो असे एकत्र आलो आहोत. आम्हाला अभिमान आहे की, आम्ही युक्रेनियन आहोत. आम्ही स्वातंत्र्याला महत्त्व देतो आणि आमची जमीन आम्ही कोणालाही देणार नाही. आपल्या सगळ्यांमध्येच एक जीव, एक हृदय आणि एक आत्मा आहे. म्हणूनच हे सध्या खूप वेदनादायक आणि कठीण आहे. पण मला विश्वास आहे की, आम्ही लवकरच विजय साजरा करु.”

हेलन आणि तिच्यासारख्या असंख्य युक्रेनियन स्त्रियांनी अतिशय धोकादायक परिस्थितीत आपल्या अर्ध्या कुटुंबाला मागे ठेवून देश सोडला आहे. त्यातल्या काहींना मानसिक धक्का बसला आहे तर काहींची मुले त्यांच्या देशात रशियन सैन्याशी लढत आहेत. अशावेळी परक्या मुलखात आपल्या बरोबरच्या लोकांची, लहान मुले आणि वृद्धांची काळजी घेत या स्त्रिया आपल्या देशाकडे डोळे लावून बसल्या आहेत.

- प्रणव पाटील
Pranavpatil26495@gmail.com 


हेही वाचा : डॉनबास : देशभक्ती, माणुसकी आणि युद्ध - मीना कर्णिक

Tags: युद्ध युक्रेन रशिया स्थलांतर अनुभव राजकारण आंतरराष्ट्रीय राजकारण Load More Tags

Add Comment