माझा पिंड पोसला गेला तो पुस्तकांवरच...

पुस्तक उघडलं की ते आपल्याला वेगळ्या जगात घेऊन जातं ही भावना आजही तितकीच तीव्र आहे.

अभिनय -लेखन आणि दिग्दर्शन यातून सरस व सातत्यपूर्ण काम करणारी विभावरी देशपांडे  पुस्तकांच्या दुनियेत रमते.  'ती तिच्या पुस्तक प्रेमाबद्दल सांगता सांगता सहज म्हणते,  'ज्याला वाचायचं आहे त्याच्यासाठी ज्ञानाचं भांडार खुलं आहे.' 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने कर्तव्य साधना वर एकूण चार लेख प्रसिध्द होत आहेत, त्यातील  विभावरीचा  हा चौथा लेख.

‘वाचाल तर वाचाल, ग्रंथ हेच गुरु’ हे आपण लहानपणापासून वाचत आलोय. माझ्या आयुष्यात तर पुस्तकं वरणभात, तूप मीठ लिंबाइतकी सहज आली. माझ्या आजोबांनी ८२ वर्षांपूर्वी ‘इंटरनॅशनल बुक सर्व्हिस’ हे पुस्तकांचं दुकान सुरु केलं. पुढे माझ्या बाबांनी हा वारसा समर्थपणे जपला; तो अगदी पाच वर्षांपूर्वीपर्यंत. आता ही धुरा मंदार जोगळेकर यांच्या ‘बुकगंगा’ने समर्थपणे पेलली आहे. तर सांगायचा मुद्दा हा की, वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी किंवा तो छंद जोपासण्यासाठी माझ्या पालकांना कुठलेच प्रयत्न करावे लागले नाहीत. चिऊकाऊच्या गोष्टीसोबत पुस्तक माझ्या आयुष्यात आलं आणि जगण्याचा एक अविभाज्य घटक बनून गेलं. लहानपणी माझी आई मला म्हणायची, ‘किती खाशील पुस्तकं? आणू कुठून?’ तेव्हा नवीन आणलेली पुस्तकं पाहून मला मिठाईच्या दुकानात गेल्यावर होतो तसा आनंद व्हायचा.
मी मराठी माध्यमात शिकले. त्यामुळे लहानपणीच ‘वाचायचं असतं’ ते सगळं वाचून झालं. मराठी शाळेत शिकणाऱ्या मुलांना अनेकदा इंग्रजीचा न्यूनगंड निर्माण होतो. भाषा येत असली तरी शब्दसामग्री फारशी नसते. आणि आत्मविश्वासही नसतो. असं होऊ नये यासाठी मी हायस्कूलमध्ये गेल्यापासून झपाट्यानी इंग्रजी पुस्तकंही वाचू लागले. जॉन ग्रिशम, एरिक सेगल, जेफ्री आर्चर, रिचर्ड बाक, सिडनी शेल्डन अगदी एन. रँडही शाळेत असतानाच वाचली. फार सगळं कळायचं असं नाही पण वाचत जायचे. पुस्तक उघडलं की ते आपल्याला वेगळ्या जगात घेऊन जातं ही भावना आजही तितकीच तीव्र आहे.

आता कामाचा व्याप खूप वाढला आहे. सतत मुंबई-पुणे प्रवास असतो. शिवाय माझं बरचसं काम लिखाण वाचन याच प्रकारचं असतं. त्यामुळे लहानपणी वाचायचे तितकी पुस्तकं आता वाचली जात नाहीत. शिवाय नेटफ्लिक्स, वेब शोज, पॉडकास्टस् अशी इतरही प्रलोभनं आहेत. रिकामा वेळ तसा कमीच मिळतो. जगभरातले सिनेमे पाहण्याचंही व्यसन जडलं आहे. पण म्हणून वाचन संपलं मुळीच नाहीये. अजूनही दिवसाकाठी काही पानं वाचल्याशिवाय झोप लागत नाही. जेव्हा, जिथे, जशी संधी मिळेल तसं मी वाचते. बॅगेत हेयरब्रश असेल नसेल, पुस्तक नक्की असतं. पुस्तक सोबत असलं की कंटाळा येत नाही, एकटेपणा वाटत नाही. 12-14 तासांचे प्रवासही सहज पार पडतात. सुदैवाने, मला गाडी,बस, ट्रेन, विमान, बोट या कशातच ‘Motion Sickness’चा त्रास होत नाही. त्यामुळे प्रवास सुरू झाला की पुस्तक उघडलं जातं. 

अनेक वर्ष किंडलबद्दल माझ्या मनात अढी होती. म्हणजे पुस्तकं हातात घेऊन वाचल्याशिवाय वाचल्यासारखं वाटत नाही. त्या कागदाचा वास यावा लागतो असं बरंच काही वाटायचं.  पण मग मला किंडल (ई-बुकरीडर) गिफ्ट मिळालं आणि मग त्यातली सोय कळली. सतत प्रवासात असल्याने अनेकदा पुस्तकं खराब होतात, फाटतात. किंडलमध्ये तो धोका नसतो. शिवाय पुस्तकं स्वस्त मिळतात. बाबांचं दुकान असलं तरी कमावती झाल्यापासून मी कायम पुस्तकं विकत घेत आले आहे, अर्थात सवलतीच्या दरात. शिवाय मनात आलं की लगेच पुस्तक मिळतं. 
 
अनेकदा एखादं पुस्तक वाचायचं असलं की ते हाती पडेपर्यंत माझा पेशन्स टिकत नाही. किंडलवर एका क्लिकवर पुस्तक मिळतं. अंधारात इतरांना त्रास न देता पुस्तक वाचता येतं. शिवाय डिक्शनरीसारखी फीचर्स पण मिळतात. तर मुद्दा असा आहे, की जमेल तेव्हा जमेल तसं वाचन मी करते. मी सहसा एका वेळी दोन पुस्तकं आलटून पालटून वाचते आणि बहुतेक वेळा ती अत्यंत भिन्न प्रकारची असतात.

आज ज्ञान मिळवण्याची, वृद्धिंगत करण्याची अनेक माध्यमं आहेत. पॉडकास्टस्, व्हिडिओज्, ऑडिओबुक्स अशी कितीतरी. त्याचे अनेक फायदेही आहेत.  पण तरीही पुस्तक हे माध्यम मला सगळ्यात जास्त आकर्षित करतं. मला वाटतं पुस्तकं  आपल्या visualization ला, कल्पनाशक्तीला आणि interpretation ला सगळ्यात जास्त वाव देतात. उदाहरण देऊन सांगते. माझ्या लहानपणी मी सिंड्रेलाची गोष्ट वाचली होती. माझ्याकडे फक्त शब्द हे माध्यम होतं. बाकी ती दिसते कशी, तिचा आवाज कसा आहे, तिचा ड्रेस, तिची बग्गी, राजपुत्र या सगळ्यांना मी माझ्या कल्पनाशक्तीतून एक मूर्त रूप दिलं. त्यातून माझी visualization ची कुवत वाढली. माझ्या मुलीने तिच्या अगदी लहानपणीच सिंड्रेला कथेचा व्हिडीओ पहिला. व्हिडीओतील सिंड्रेला फारच सुंदर होती. तिच्या मनात त्या सिंड्रेलाचा चेहरा, आवाज, कपडे सगळं ठरूनच गेलं. आता प्रयत्न करूनही ती वेगळा चेहरा डोळ्यासमोर आणू शकणार नाही. पुस्तकाची ही ताकद आहे असं मला वाटतं. कदाचित हे थोडंसं ओल्ड स्कूल, प्रतिगामी असेलही. पण माझा पिंड पोसला गेला आहे तो पुस्तकांवरच.

मी विविध पद्धतीची पुस्तकं वाचते. पूर्वी फिक्शनकडे माझा कल जास्त होता. कथा, कादंबरी मला आकर्षित करायच्या. पण आता नॉन फिक्शन जास्त वाचते. मराठीत पुलं, जीए, व्यंकटेश माडगूळकर, कुसुमाग्रज, मर्ढेकर, पेंडसे, नेमाडे हे सगळं वाचलं आहेच. त्यावर नितांत प्रेमही आहे. पण प्रकाश नारायण संतांवर विशेष जीव आहे. वनवास, शारदा संगीत, पंखा, झुंबर ही अतिशय आवडती पुस्तकं आहेत. विजया राजाध्यक्ष, गौरी देशपांडे, सानिया, मेघना पेठे आणि माझी आई- मनीषा दीक्षित या आवडत्या लेखिका आहेत. 

असं आठवायला गेलं तर अगणित पुस्तकं आहेत. इंग्रजीही वाचते. सध्या हारुकी मुराकामी हा जपानी लेखक विशेष आवडता आहे. ओरहान पामुकही खूप आवडतो. 
याखेरीज चरित्र किंवा आत्मचरित्र हा माझा अत्यंत आवडता साहित्यप्रकार आहे. एखाद्या लेखकाचं, कलाकाराचं, खेळाडूचं, शास्त्रज्ञाचं आयुष्य कसं होतं. इथवरचा त्याचा प्रवास कसा होता हे जाणून घेणं मला फार प्रेरणादायी वाटतं. इतक्यात मी मेरिल स्ट्रीप, नासिरुद्दीन शाह, अमृता शेरगील, स्टिव्ह जॉब्स, रवींद्रनाथ टागोर अशी काही चरित्रं वाचली  आहेत.

मी नुकतंच माझ्या मैत्रिणीचं, मधुरा वेलणकरचं ‘मधुरव’ हे पुस्तक वाचलं. रोजच्या जगण्यातल्या साध्या घटनांचं अत्यंत संवेदनशील निरीक्षण आणि चित्रण तिने या पुस्तकात केलं आहे. भाषाही अतिशय साधी आणि ओघवती आहे. ते झाल्यावर मी हारुकी मुराकामीचं ‘Men without women’ हे पुस्तक वाचते आहे. काही ना काही कारणांनी आयुष्यातली स्त्री निघून गेलेल्या किंवा मरण पावलेल्या पुरुषांबद्दलच्या कथा यात आहेत. ह्या लेखकाची शैली फारच निराळी, काहीशी गूढ आणि खोल आहे. त्याचबरोबर भालचंद्र नेमाडे यांचं ‘हिंदू’ हे बहुचर्चित पुस्तकही वाचते आहे. यापूर्वी मी एकदा सुरुवात केली होती पण काही कारणांनी ते राहून गेलं. त्याचा पुढचा भाग येण्याआधी मला ते संपवायचं आहे. 

मी अधाशासारखी पुस्तकं घेते. एक संपलं की मग दुसरं घेऊ हा समंजसपणा माझ्यात नाही. त्यामुळे वाचायची राहून गेलेली अनेक पुस्तकंही घरी आहेत. एकेक करत ती पण संपवायची आहेत. किंडलवर Goodreads नावाचं एक अ‍ॅप आहे. त्यात तुम्हाला रस असलेले विषय एकदा निवडले की त्या आसपासच्या पुस्तकांची recommendations येतात. त्यावरून अनेकदा पुस्तक घेतलं जातं. सोशल नेटवर्कवरही कुणीतरी एखादं पुस्तक recommend करतं. मित्र-मैत्रिणी सुचवतात. अनेकदा चालू असलेल्या लिखाणासाठी अभ्यास म्हणून एखादं पुस्तक वाचलं जातं. एखादी भूमिका करायची असेल तर त्यासाठी पुस्तक वाचलं जातं. ज्याला वाचायचं आहे त्याच्यासाठी ज्ञानाचं भांडार खुलं आहे. 
‘आहेत ती पुस्तकं वाचल्याशिवाय नवीन घ्यायचं नाही!’ असं मी पुन्हा ठरवलं आहे. बघूया.. हा निश्चय किती काळ टिकतो ते.

- विभावरी देशपांडे
vibhavari.deshpande@gmail.com

(विभावरी देशपांडे या अभिनेत्री, लेखक आणि दिग्दर्शक आहेत.)

हेही वाचा : वाचन प्रेरणा दिवस विशेष 

रिकाम्या मुठीतली भुईकमळं – कल्पना दुधाळ

द अल्केमिस्ट: स्वप्नांवर विश्वास ठेवायला लावणारं पुस्तक – सानिया भालेराव

पुढचं पुस्तक वाचण्याआधी... – गणेश मतकरी

Tags: विभावरी देशपांडे वाचन प्रेरणा दिवस एपीजे अब्दुल कलाम Load More Tags

Comments:

Shubhangi kale

मस्त

Add Comment