देशातील विद्यापीठांच्या जीवशास्त्र अभ्यासक्रमामध्ये प्राण्यांची अंतर्गत रचना किंवा शरीरक्रिया प्रणाली शिकवण्याकरिता गांडूळ, कीटक, खेकडे, झिंगा, तारामासा, मासे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या सर्व प्राण्यांच्या विच्छेदनामुळे जैवविविधतेला धोका आहे तर मांसाहारामुळे नाही का? प्रत्येक विद्यार्थी एका शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त पाच प्राण्यांचे विच्छेदन करतो असे गृहीत धरले व एक मांसाहारी व्यक्ती प्रतिवर्षी फक्त दहा वेळा मासे खातो असे जरी गृहीत धरले तरी भारतात मांसाहारी व्यक्तींपेक्षा प्राणीशास्त्राचे विद्यार्थी नक्कीच कमी प्राणी मारत असतील. प्राण्यांचे विच्छेदन म्हणजे त्यांच्यावर अत्याचार असा होतो तर मग कोंबडी, बोकड, मेंढी व इतर प्राण्यांची यांची खुलेआम कत्तलखान्यात होणारी कत्तल अत्याचार होत नाही का?
वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे पुराव्याच्या आणि तर्काच्या आधारावर चिकित्सकपणे पाहण्याची पद्धत होय. मूलभूत व व्यावहारिक विज्ञानाच्या पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी, विविध संकल्पना शिकवण्यासाठी तसेच संशोधनाचा पाया रचण्यासाठी अभ्यासक्रमात तासिकांसोबत प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यात येतो. प्राणीशास्त्र व जीवशास्त्राच्या अनेक शाखांमध्ये प्राण्यांच्या बाह्य व अंतर्गत शरीररचना, शरीरक्रियाशास्त्र, ऊतीशास्त्र, विषविज्ञान इ. चा अभ्यास करण्यासाठी प्राणी विच्छेदनाची प्रात्यक्षिके ठेवली जातात. अनेक प्राण्यांचे वर्गीकरण करण्यासाठी त्यांचे विच्छेदन करावे लागते व संशोधकाला ती कला अवगत असावी लागते. प्राणीशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाचा प्राणी विच्छेदन कला हा आत्मा आहे. प्राणीशास्त्र विषयाचा अभ्यास हा पर्यावरण, वैद्यकीय, औषध निर्मिती, कृषी विज्ञान व इतर अनेक क्षेत्रात महत्त्वाचा आहे. देशाने केलेली औषध निर्मिती व कृषी क्षेत्रातील प्रगतीमध्ये प्राणी विज्ञानाचा खूप मोठा हातभार आहे. देशाला भविष्यातही इतर क्षेत्रातील तज्ञासोबत प्राणी शास्त्रज्ञांची गरज आहे. प्राणीशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याला वैज्ञानिक पद्धतीने प्राणी विच्छेदन करता येणे अत्यंत गरजेचे आहे.
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्राणी विच्छेदनाच्या प्रात्यक्षिकांमुळे देशातील जैवविविधतेला धोका आहे तसेच प्राण्यांचे विच्छेदन म्हणजे त्यांच्यावर अत्याचार असा होतो या दोन तर्कांचा आधार घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्राणी विच्छेदनावर बंदी घातली आहे. देशातील सर्व उच्च शैक्षणिक संस्थांनी तातडीने पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या अभ्यासक्रमात प्राणी विच्छेदनाचे प्रात्यक्षिके वगळली आहेत. यामुळे प्राणीशास्त्र विषयाच्या आजच्या पदवीधराला विच्छेदनाची कला अवगत नाही. त्यांना अपृष्ठवंशीय प्राण्यांची पृष्ठीय बाजूने तर पृष्ठवंशीय प्राण्यांची उदरस्थ बाजूने शस्त्रक्रिया किंवा विच्छेदन करावे लागते हे ज्ञानसुद्धा संशोधनाकरिता प्राणी वापरावे लागले तरच कळते. विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी प्राणी विच्छेदन न करता फक्त अॅनिमेशन किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून प्राण्यांची शरीररचणा शिकणे म्हणजे माहिती पुस्तिकेतील माहिती वाचून सरळ चारचाकी गाडी रस्त्यावर काढणे असा होतो.
देशातील विद्यापीठांच्या जीवशास्त्र अभ्यासक्रमामध्ये प्राण्यांची अंतर्गत रचना किंवा शरीरक्रिया प्रणाली शिकवण्याकरिता गांडूळ, कीटक, खेकडे, झिंगा, तारामासा, मासे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या सर्व प्राण्यांच्या विच्छेदनामुळे जैवविविधतेला धोका आहे तर मांसाहारामुळे नाही का? प्रत्येक विद्यार्थी एका शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त पाच प्राण्यांचे विच्छेदन करतो असे गृहीत धरले व एक मांसाहारी व्यक्ती प्रतिवर्षी फक्त दहा वेळा मासे खातो असे जरी गृहीत धरले तरी भारतात मांसाहारी व्यक्तींपेक्षा प्राणीशास्त्राचे विद्यार्थी नक्कीच कमी प्राणी मारत असतील. प्राण्यांचे विच्छेदन म्हणजे त्यांच्यावर अत्याचार असा होतो तर मग कोंबडी, बोकड, मेंढी व इतर प्राण्यांची यांची खुलेआम कत्तलखान्यात होणारी कत्तल अत्याचार होत नाही का? प्राण्यांना मारून त्यांचा वापर अन्न म्हणून करताना किंवा त्यांच्यापासून मिळणाऱ्या घटकांचा वापर करून औषधे व इतर चैनीच्या वस्तू बनवून नफा कमावताना प्राण्यांवरील अत्याचार व नैतिकता कुठे जातो? शेतीमध्ये व फळबागांमध्ये कीटकनाशकांच्या अंदाधुंद वापराने एका बाजूने किडीचा बंदोबस्त होतो पण त्या परिसंस्थेतील इतर उपयोगी कीटके व अन्न साखळीतील अनेक प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येते.
सदर कीटकनाशके शेतातून नंतर जल परिसंस्थेत शिरकाव करून अन्न साखळीद्वारे मानवापर्यंत पोहचतात. कीटकनाशकांच्या फवारणीने जैवविविधतेला धोका आहे की, कीड प्रकारातील प्राण्यांच्या वापर विद्यार्थ्यांना विच्छेदन कला शिकवण्यासाठी वापरल्यामुळे? सॉफ्टवेअर किंवा ॲनिमेशनच्या मदतीने जर प्राण्यांची अंतर्गत रचना शिकवावी हे जरी पटत असेल तरी अनुभूतिचे काय? ॲनिमेशनमुळे माहिती मिळू शकते परंतु अनुभूति, प्राणी हाताळण्याचे प्रशिक्षण, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ज्ञान, कुतुहलाचे समाधान व सहअध्यायन प्रत्यक्ष कृतीतूनच येते.
बेडकाच्या शरीराचे विच्छेदन - ॲनिमेशन व्हिडिओ
घराघरांत वापरले जाणारे प्रतिकर्षी पदार्थ (repellents) मुळे जैवविविधतेला धोका नाही आहे का? प्राण्यांवर अत्याचार करू नयेत ही बाब योग्यच आहे परंतु मग फक्त ती अभ्यासक्रमातील विच्छेदनामुळेच होते का? ज्या प्रकारे विच्छेदनावर बंदी घातली त्याच प्रकारे कत्तलखाने, कीटकनाशकांची कारखाने, प्रतिकर्षी उत्पादन कंपन्या, मासेमारी, रेशीम उद्योग, कातडी कमावण्याचे उद्योग, सौंदर्य प्रसाधने कारखाने, औषध कंपन्या प्राण्यांवर अत्याचार होतो म्हणून बंदी का घालू नये? रेशीम उद्योगात तर रेशीम मिळवण्यासाठी रेशीम किड्याचे कोश गरम पाण्यात उकळून मारतात.
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात कीड प्रवर्गातील झुरळे, गोगलगाय, नाकतोडे इ. तसेच अन्न प्रकारातील खेकडे, झिंगे, मासे इ. प्राण्यांचे विच्छेदन ठेवता येईल. गांडुळ, शिंपले, रेशीमकिडे, झिंगे किंवा कोळंबी, विविध मासे, उंदीर या सारख्या प्राण्यांचे मोठ्या प्रमाणावर पुनरुत्पादन करता येते या प्राण्यांचे विच्छेदन विद्यार्थ्यांना करू देण्यास कोणाचीच हरकत नसावी. डॉगफिश, तारामासा व इतर खूप प्रकारचे प्राणी सागरी मासेमारीत जाळ्यात अडकतात. हे प्राणी निरूपयोगी म्हणून वेगळे करून तसेच फेकून दिले जातात. या प्राण्यांचे विच्छेदन अभ्यासक्रमात ठेवता येईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या पाच वर्षांत विच्छेदनासाठी वर नमूद केलेले प्राणी वापरले तर जैवविविधतेला कोणताही धोका निर्माण होणार नाही तसेच विद्यार्थ्यांना प्राणी हाताळण्याची कला, त्यांची अंतर्गत रचना, शरीरक्रिया शास्त्र, तसेच त्यांच्या विविध अवयवाच्या कार्यासंबंधी विविध प्रयोग करता येतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील संशोधनाची दिशा ठरवता येईल.
विच्छेदनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांचे पुनरुत्पादन प्रकल्प स्थापन करून रोजगार निर्मिती करता येईल. सागरी मासेमारी दरम्यान जाळ्यात अडकणारी व अन्न किंवा कुठेही न वापरली जाणारी प्राणी फेकून न देता उच्च शिक्षण संस्थाना विकली तर मासेमारीला जोडधंदा सुरु होईल. यूजीसीने राष्ट्रीय पातळीवर विचार विनिमय करून विच्छेदनासाठी वापरायच्या प्राण्यांची यादी व प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांसाठी प्राणी हाताळणी, प्राण्यांविषयी नैतिकता याबाबत सविस्तर माहितीपुस्तक तयार करावे व विद्यापीठांच्या अभ्यास मंडळांना त्या यादीतील प्राणी व एका प्राण्यांवर किती प्रात्यक्षिके पूर्ण करावयाची याची संहिता तयार करून महाविद्यालयांना देण्याची सूचना केली तर प्राणी विच्छेदन प्रात्यक्षिके सुरु ठेवता येतील. उदा. एक रोहू मासा विच्छेदनासाठी घेतला तर तो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हातळता येईल, त्याच्या अवयव संस्था शिकवता येतील, अवयवाचा उपयोग ऊतीशास्त्राची सर्व प्रात्यक्षिके शिकवण्यासाठी करता येईल, जीवरसायनशास्त्राच्या अनेक प्रात्यक्षिकांसाठी अवयव मिळतील.
वरील सर्व तर्कांचा विचार करून अभ्यासक्रमातील प्राणी विच्छेदन प्रात्यक्षिके सुरु ठेवली तर विद्यार्थांना प्राणीशास्त्र विषयात रुची निर्माण होईल व भविष्यात संशोधनात मदत होईल व सगळ्यात महत्त्वाचे प्राणीशास्त्र विषय खऱ्या अर्थाने पुन्हा जिवंत होईल.
- डॉ. आनंता ज्ञानोबा हारकळ
harkalananta@gmail.com
(लेखक न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथे प्राध्यापक आहेत.)
Tags: zoology animal dissection प्राणिशास्त्र प्राणी विच्छेदन संशोधन यूजीसी अभ्यासक्रमात प्राणी विच्छेदन ugc साधना डिजिटल Load More Tags
Add Comment