सफाई सैनिकांचे स्थान आता तरी आपण बदलणार आहोत का?

फोटो सौजन्य: EPS Files

काल 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस जगभर साजरा केला गेला. कोरोना संकटामुळे जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन स्थिती असल्याने, कालचा दिवस  खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात अनेक अडचणी होत्या, परिणामी खूप जास्त कार्यक्रम उपक्रम पार पडले नाहीत. मात्र संस्था, संघटना व शासकीय स्तरांवर या दिवसाची आठवण या ना प्रकारे जागवली गेली, काही प्रमाणात चर्चाही झाली. त्यामुळे, निवळलेल्या वातावरणात हा लेख वाचायला हवा. स्वातंत्र्य मिळवत असताना आणि स्वराज्य आणण्याची भाषा बोलत असताना, महात्मा गांधी एक संदेश सातत्याने देत होते: तळाच्या घटकांची स्थिती व स्थान यांचा विचार करा, त्यासाठी कृती करा. एवढेच नाही तर, आपल्या सर्व लहान थोर अनुयायांच्या मनावर त्यांनी सफाई कामाचे महत्त्व व त्याची प्रतिष्ठा बिंबवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याही पुढे जाऊन, सफाई कामातही तळाचे स्थान असणाऱ्या एखाद्या भंग्याची मुलगी या देशाची राष्ट्रप्रमुख व्हावी असे स्वप्नही दाखवले...
- संपादक 

कोरोनाने केलेल्या हल्ल्यामुळे अचानकपणे सफाई कर्मचाऱ्यांविषयीची आपली समजूत बदलली आहे. ज्या लोकांनी यापूर्वी कधीही सफाई कर्मचाऱ्यांच्या देशभक्तीची कदर केली नव्हती, ते लोकही त्यांच्याकडे आता देशभक्त म्हणूनच पाहत आहेत. अभूतपूर्व अशा संकटात सापडलेले हे लोक आता डॉक्टर व परिचारिका यांच्यासोबतच - आजवर ज्यांना हीन लेखलं, आदराला व प्रतिष्ठेला पात्र मानलं नाही, त्या - सफाई कर्मचाऱ्यांनाही (मी त्यांना सफाई सैनिक म्हणतो) प्रशंसायोग्य मानू लागले आहेत. 

आधुनिक काळात डॉक्टर या व्यवसायाविषयी नेहमीच आदर व्यक्त केला गेला आहे. परिचारिका हे जरी मुळात स्त्रियांचे काम म्हणून पाहिले गेले असले तरी त्यांनाही प्रतिष्ठा पूर्वीपासूनच आहे. सफाई सैनिकांची दखल मात्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा घेतली गेली आहे. कोरोना महामारीचे हे योगदान आहे. प्राणघातक अशा कोरोना विषाणूचे आश्रयस्थान असलेले रस्ते दिवसरात्र साफ करणे, धुवून काढणे - आणि तेही डॉक्टर किंवा परिचारिका यांना मिळतात तशी सुरक्षा साधने फारशी नसताना - या त्यांच्या कामाचे मोल करताच येणार नाही!

आता देशाला हे माहीत झाले आहे की, त्यांचे काम हे सीमेवर लढणाऱ्या जवानाप्रमाणेच धाडसाचे व त्यागाचे आहे. पण रोजचे काम संपल्यानंतर, त्यांना जो किमान निवांतपणा हवा असतो तेव्हा त्यांच्या घरामधले त्यांचे जगणे कसे असते? जवान, राजकारणी, शिक्षक आणि संत यांना आपला राष्ट्रवाद देशाचे रक्षक मानतो, तसे या सैनिकांना मानतो का? त्यांना सुस्थितीत जगण्यासाठी सुविधा पुरवतो का? 

आपल्या सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय व आर्थिक जीवनातील लिखित साहित्यात त्यांचे स्थान काय आहे? कोणतेही धार्मिक साहित्य त्यांना प्रिस्ट, मुल्ला, बिशप आणि संन्यासी यांच्या किमान निम्म्या दर्जाची प्रतिष्ठा तरी देते का?

कोरोना नावाचा हा सैतान (ख्रिश्चनांच्या व मुस्लिमांच्या भाषेत) किंवा राक्षस (हिंदूंच्या भाषेत) जेव्हा गरीब- श्रीमंत असा भेद न करता अतिशय निर्दयपणे त्यांचे प्राण घेतो आहे, तेव्हा अशा किती दैवी व्यक्ती देशवासीयांचे प्राण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. ईश्वर, प्रभू, अल्ला, सध्या कुठे वास्तव्याला आहेत? इतर सामान्य माणसांप्रमाणेच साधू संतही घरी बसून आहेत. आणि मंदिरे, मशिदी, चर्च, विहार इत्यादी ठिकाणेही लॉकडाऊन आहेत. ईश्वर, प्रभू , अल्ला हे जणू त्या सफाई सैनिकांच्या रूपाने कार्यरत आहेत. आता ही जाणीव जगामध्ये व आपल्या देशामध्ये असणार आहे का?

कोरोनानंतर लगेच काही धर्म नष्ट होणार नाही, मात्र रस्त्यावरच्या कामगाराकडे प्रिस्ट, बिशप, मुल्ला किंवा साधु यांच्यापेक्षा अधिक देवत्वाच्या भावनेने पाहिले गेले, तर ते परिवर्तन एखाद्या चमत्कारासारखेच असेल.

हे सफाई कर्मचारी स्वच्छता राखणारे व नेटकेपणाने राहणारे (विशेषतः भारतीय) आहेत, त्यामुळे  कोरोना त्यांना घाबरून आहे. म्हणून कोरोना नंतरच्या जगात त्यांचा सर्वाधिक आदर केला जायला हवा, त्यातील बहुसंख्य लोकांना तर अस्पृश्यतेची पार्श्वभूमी आहे. 

या सामाजिक विलगीकरणाच्या काळात, स्वतःच्या बायकामुलांपासूनही अंतर राखून वावरावे लागण्याच्या काळात हे सफाई सैनिक इतरांना वाचवण्यासाठी का व कसे काम करत आहेत? हे लक्षात घेतले तर, राष्ट्रवादावर श्रद्धा असलेल्या आपल्या देशामध्ये, कोरोनानंतर त्यांना काय किंमत देऊ केली पाहिजे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या लॉकडाऊनसोबतच अशी एक घोषणा केली होती की, सर्व उच्चपदस्थांचे पगार (स्वतः पंतप्रधानांसह) 30 टक्क्यांनी कमी केले जातील. राज्य सरकारांनीही पगारकपातीबाबत  घोषणा केल्या आहेत. पण या सफाई सैनिकांच्या  पगारात 30 टक्क्यांनी वाढ केली तर ते राष्ट्रवादी पाऊल ठरणार नाही का? पंतप्रधान मोदी याप्रकारच्या सकारात्मक राष्ट्रवादी कृतीचा विचार का करत नाहीत?

देशातील सफाई कामगारांची स्थिती व जीवन बदलण्यासाठी बेजवडा विल्सन हे गेली अनेक वर्षे  लढा देत होते. काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी कुंभमेळ्यातील चारपाच सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुण्याची प्रतिकात्मक कृती केली. पण त्यांच्या वास्तव जीवनाची स्थिती बदलण्याचा विचार मात्र केला नाही.

खरी राष्ट्रवादी कल्पना ही आहे की, प्राथमिक पातळीवरच्या कर्मचाऱ्यांना इतपत पगार दिले गेले पाहिजेत की, त्यांची मुलेही मोठे राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर व विद्यापीठातील प्राध्यापक यांच्या मुलांसोबत शिकू शकतील आणि आपला व्यवसाय सहजगत्या बदलू शकतील. दुसऱ्या बाजूला, आपल्या मुलांनी भविष्यात सफाई सैनिकाची पवित्र नोकरी करावी यासाठी देशातील श्रीमंतांनीही स्वतःची मानसिक तयारी करायला नको का?

'ते धैर्याने आणि निष्ठेने थोर राष्ट्रभक्तीचे काम करत आहेत' अशी या सफाई सैनिकांची केवळ प्रशंसा करणे पुरेसे नाही. आणि स्वतःला या राक्षसी विषाणूमुळे मृत्यूच्या भीतीने ग्रासलेले असताना, श्रीमंतांनी 10 रुपयांचा हार घालून त्यांचा सत्कार करणे नैतिकतेला धरून नाही. देशभरातील श्रीमंतांपैकी कितीजण असे म्हणायला तयार आहेत की,'आमचे पगार कमी करा, आम्हाला जास्तीचा कर लावा आणि त्यांना अधिक चांगला पगार द्या'? म्हणजे, मानवी जीवितावर ओढवलेल्या सर्वांत मोठ्या या संकटामध्ये,  मातृभूमीला आयुष्य देऊ केलेल्या सैनिकांना साधू संतांइतकाच सन्मान देण्यासाठी या मातृभूमीचे भक्त कुठे आहेत?

संपूर्ण देश आणि स्वतःला राष्ट्रवादी म्हणवून घेणारे लोक हे जाणतात की, या सफाई सैनिकांचे पगार नेहमीच अत्यल्प राहिले आहे. त्यांची मिळकत इतकी कमी असते की, त्यांना आवश्यक तेवढे अन्न व  निवारा यासाठी ती पुरेशी नसते. शिवाय वाडवडिलांपासून चालत आलेला हा त्यांचा व्यवसाय (सामान्य परिस्थितीत ज्याच्याबद्दल अनादर असतो व त्याला वाईट वागणूक दिली जाते) बदलण्यासाठी व स्वतःच्या मुलांना शिक्षण देण्यासाठीही ती पुरेशी नसते.

श्रीमंतांना आणि उद्धटांना नम्र बनण्यासाठी हा नवा वैश्विक विषाणू यावा लागला. COVID-19 ने हे दाखवून दिले की, जितका अधिक विमानप्रवास तुम्ही कराल तितके अधिक तुम्ही या सैतानाच्या हल्ल्याला बळी पडाल. आणि जगभरातील उत्तमोत्तम रुग्णालयेही तुम्हाला बरे करू शकणार नाहीत. विमानतळावर काम करणारे सफाई कर्मचारी मात्र तिथल्या विमानांतून प्रवास करण्याचा विचारही करू शकत नाहीत. तर, आता या 'कोरोना राक्षसी'मुळे श्रीमंतदेखील विमानांविषयी भीती बाळगून आहेत.

हे सफाई सैनिक या महामारीला फारसे का घाबरलेले नाहीत? याचे कारण ते मातीत जन्मले आहेत, मातीवरच ते जगतात. श्रीमंत ज्याला तुच्छ लेखतात असं अन्न ते खातात (गोमांसदेखील) आणि तरीही रस्त्यावर उतरून (आणि मास्क नसतानादेखील)  या सैतानाचा सामना करत आहेत, हे कसे घडते?

याचे उत्तर तुम्ही जितके जमिनीवर असाल, तुमचे हात जितके जास्त मातीत मिसळलेले असतील तितके अधिक धैर्य, आत्मविश्वास व प्रतिकारक्षमता (या महामारीशी लढण्यासाठी) तुमच्यापाशी असेल. भव्य बंगल्यांमध्ये नव्हे तर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या या दरिद्री, झिडकारलेल्या समूहांकडे हे धैर्य, आत्मविश्वास व प्रतिकारक्षमता कुठून येते? या गरिबांना सामान्यज्ञानाने हे कळत की, ते मातीतूनच आले आहेत आणि या महामारीने त्यांच्यावर हल्ला केला तर त्या मातीतच ते मिसळून जाणार आहेत. त्यांना हेही ठाऊक आहे की, ही महामारी त्यांना सगळ्यांना संपवू शकणार नाही. अशा कित्येक महामारींतून पूर्वी ते तगले आहेत. पूर्वीच्या महामारींनी वातानुकूलित विमाने, ट्रेन किंवा बस यांमधून प्रवास करणाऱ्या आणि वातानुकूलित घरांत राहणाऱ्या श्रीमंतांना स्पर्श केला नव्हता. कोरोनाने मात्र या श्रीमंतांना दाखवून दिले की, असे असमानतेचे आयुष्य ते जगतील तर कमी सुरक्षित असतील. आणि कोरोनाने त्यांना हेही दाखवले की, त्यांनी ज्यांचा द्वेष केला ते गरीबच त्यांना वाचवू शकतील; रुग्णालये नाही.

सारांश, सफाई सैनिकदेखील सीमेवरच्या जवानांइतक्याच निष्ठेने काम करत आहेत. त्यामुळे अशी कल्पना करा की, या कोरोना संकटाच्या काळात सफाई सैनिक जर (चांगला पगार मिळावा व माणूस म्हणून समान वागणूक मिळावी यासाठी) एका दिवसासाठी संपावर गेले, तर..? सभोवताली सर्वत्र कोरोना आहे, या भीतीपोटी आपण सर्वच मृत्युमुखी पडू. त्यामुळे, आपण जर खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी असू तर असा निश्चय करायला हवा की, देशभरात, रस्तोरस्ती या जीवघेण्या विषाणूपासून आपले रक्षण करणाऱ्या सफाई सैनिकांच्या स्थितीत व त्यांच्या स्थानात सुधारणा करून, समाजातील असमानता कमी करायला प्रारंभ करू या!

(अनुवाद : सुहास पाटील)

- कांचा इलैया शेफर्ड, हैदराबाद

(लेखक राज्यशास्त्राचे अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते असून, तेलुगू व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये ते लेखन करतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली असून, अलीकडेच त्यांचे आत्मकथनात्मक पुस्तक From Shepherd Boy to an Intellectual या नावाने प्रकाशित झाले आहे. हा लेख मूळ इंग्रजीत countercurrents.org वर प्रसिद्ध झाला आहे, त्यांच्या पूर्वपरवानगीने अनुवाद करून येथे प्रसिद्ध केला आहे.)

Tags:Load More Tags

Comments:

Tushar Kalburgi

लेखकाचा सफाई कर्मचाऱ्यांविषयी असलेला कळवळा प्रामाणिक आहे हे सांगून लेखामधल्या एक मुद्दा खटकण्यासारखा आहे असे वाटते. सफाई कामाला कोरोनाच्या निमित्ताने लेखक प्रतिष्ठा देऊ पहातायत. हे मला चूक वाटते. कोरोनाच्या काळात सफाई सैनिकांविषयी वाटणारा श्रीमंत वर्गाला आणि उच्च जातीतल्या लोकांना वाटणारा कळवळा, सहानुभूती, प्रेम हा बुडबुडा असू शकतो. कोरोना गेल्यानंतर सफाई काम इज् इक्वल टू दलित जाती हे समीकरण काही पुसलं जाणार नाही. किंवा उच्च जातीतले लोक बुडाला आग लागल्याशिवाय सफाई कामाबद्दल आपल्या मुला-मुलींना प्रोत्साहन देणार नाहीत. कोरोनाच्या काळात तथाकथित वरच्या लोकांना सफाई कर्मचाऱ्यांविषयी व कामाविषयी कितीही आदर वगैरे वाटला तरी सफाई कामापासून दलितांना वेगळं करण्यासाठीच प्रयत्न करावेत. त्यांना परावृत्तच करावं. दुसरा मुद्दा

Govardhan Garad

Best ,I want to do activity for such people in my villege .

Add Comment