कोरोना विषाणूमुळे, स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आपण सर्वजण घरात अडकून पडलो आहोत. अशा परिस्थितीत काय करायचं असतं हे आपल्याला ठाऊक नाही. 'लॉकडाउन'च्या परिस्थितीत घरी वेळ कसा घालवावा; आणि तो स्वतःच्या व समाजाच्या भल्याकरता कसा कारणी लावावा हे भारतातील आणि इतर काही देशांतील लोकांना माहीतच नाही. प्रसिद्ध अमेरिकन अंतराळवीर स्कॉट केली हा एक वर्ष अवकाशात होता. अंतराळ स्थानकावरील अंतराळयानातील एक वर्षाचा वेळ सर्जकतेने कसा व्यतीत केला याविषयीचे अनुभव त्याने नोंदवून ठेवले आहेत. याउलट, आपलं घर किंवा आपल्या सदनिका या एखाद्या अंतराळयानापेक्षा किंवा अंतराळस्थानकापेक्षा कितीतरी मोकळ्या आहेत; आणि निसर्गाच्या कितीतरी जवळ आहेत, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे.
स्कॉट केली म्हणतो, "घरामध्ये अडकून पडणं आव्हानात्मक असतं. मी जवळपास वर्षभर आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकात राहिलो, हे सोपं नव्हतं. झोपायला जाण्यापूर्वी मी कामात असायचो आणि झोपेतून उठल्यानंतरही मी कामातच असायचो. अंतराळात तरंगत राहणं हे कदाचित एकमेव काम असेल, जे तुम्ही अजिबातच थांबवू शकत नाही! पण माझ्या त्या तिथल्या वास्तव्यात काही गोष्टी मी शिकलो, ज्या मला सांगायला आवडतील. कोरोना विषाणूचा प्रसार रोखायला मदत व्हावी यासाठी आपण सगळ्यांनी स्वतःला घरात बंद करून घेतलं आहे, त्यामुळे त्या पुन्हा उपयोगी पडणार आहेत."
एखाद्या सामान्य युरोपीय किंवा अमेरिकन व्यक्तीच्या तुलनेने आपण भारतीय फारच कमी सर्जनशील आहोत. आपली विज्ञानातील सर्जनशीलता आणि निर्मितीक्षमता अतिशय कमी असण्याचंही हेच कारण आहे. विज्ञान किंवा वैज्ञानिक दृष्टीकोन हा काही एकट्या-दुकट्याच्या परिश्रमातून, कल्पनाशक्तीतून किंवा सर्जनशीलतेतून विकसित होऊ शकत नाही. विज्ञान आणि निसर्ग यांच्यावरच आपण कसे सर्वस्वी अवलंबून आहोत हे कोरोनाने आपल्याला दाखवून दिलं आहे.
अध्यात्म केवळ मानसिक आधार देऊ शकतं, भौतिक जीवन वाचवण्यासाठी ते मदत करू शकत नाही. त्यामुळे ज्यांनी आपल्यापेक्षा पुष्कळ अधिक गोष्टी साध्य केल्या आहेत, अशांकडून भारतीयांनी वैज्ञानिक दृष्टीकोन शिकून घ्यायला हवा. नव्या गोष्टी शिकायला आपण तेव्हाच सुरुवात करतो जेव्हा 'एखादी गोष्ट आपल्याला ठाऊक नाही' हे आपण आधी मान्य करतो. 'आपल्याला सगळंच ठाऊक आहे' असा विचार करणारी व्यक्ती नवं काहीच शिकू शकत नाही. आणि मानवी जीवनाचं रक्षण करण्यासाठी हा दृष्टिकोन अजिबात उपयोगाचा नाही! आपल्याला जे ठाऊक नाही ते शिकून घेण्यासाठी आपण नेहमी जिज्ञासू असायला हवं.
केवळ समाजमाध्यमांवरील (Social Media) संदेश वाचणं किंवा टीव्ही पाहणं नव्हे, तर मानवी जीवनाला ऐतिहासिक कलाटणी देणारी पुस्तकं वाचणं ही शिकण्याची गुरुकिल्ली आहे. मुळात एक समाज म्हणून भारतीयांना पुस्तकं वाचण्याची सवय नाही. मात्र आता या कोरोना लॉकडाऊनमध्ये हा उपक्रम भारतीयांनी देशपातळीवर सुरू करायला हरकत नाही.
युरोप आणि अमेरिकेचं तर सोडून द्या, चीनच्या तुलनेतही भारतीय सुशिक्षितांना - अगदी पदवी, पदव्युत्तर, पी.एच.डी. असणाऱ्यांनाही - घरामध्ये अवांतर वाचनाची सवय नसते. प्रत्येक सुशिक्षित असलेल्या व्यक्तीने इतिहासविषयक पुस्तकं, आत्मचरित्रं, कादंबऱ्या आणि इतरही विषयांवरची पुस्तकं वाचण्याची चांगली सवय लावून घेतली पाहिजे. विशेषतः आता पालक आणि शाळेत जाणारी मुलं बराच वेळ घरात एकत्र असणार आहेत, तेव्हा आपण विज्ञानावरची भरपूर पुस्तकं वाचूया. स्कॉट केली जसा त्याच्या लहानश्या अंतराळ स्थानकात पुस्तकं वाचत होता, त्याप्रमाणे पालक त्यांच्या मुलांनाही पुस्तकं वाचायला लावू शकतात.
स्कॉट म्हणतो, "मी अंतराळात स्वतःसोबत पुस्तकं नेली होती हे ऐकून काही लोक आश्चर्यचकित झाले. शांतता आणि व्यग्रता तुम्ही केवळ पुस्तकातूनच अनुभवू शकता. पुुस्तक वाचताना कुणी तुम्हाला नोटिफिकेशन्स पाठवून 'पिंग' करत नाही किंवा नवीन टॅब उघडण्याच्या मोहात पाडत नाही; ही बाब खरंच अमूल्य आहे. सध्या अनेक पुस्तक व्यावसायिक तुमच्या परिसरात किंवा थेट घरपोच पुस्तकंं आणून देण्याची सुविधा पुरवत आहेत. याद्वारे तुम्ही स्थानिक व्यवसायालाही हातभार लावू शकता आणि हा अत्यावश्यक असणारा 'अनप्लग्ड' वेळ सत्कारणीही लावू शकता."
घरी असताना आपण घरातल्या ग्रंथालयातून कोणतंही एखादं पुस्तक काढून ते स्वतःसाठी किंवा सगळ्या कुटुंबासाठी वाचत बसू शकतो. पण भारतात घरातलं खासगी ग्रंथालय ही फारच दुर्मिळ गोष्ट आहे. पुष्कळ शिकलेल्या, अगदी विद्यापीठात प्राध्यापक असणाऱ्यांनाही अवांतर वाचनाची सवय एक छंद म्हणूनही नसते, आणि त्यामुळे घरी ग्रंथसंग्रहही नसतो.
क्लबमध्ये जाऊन मद्य घेणं किंवा पत्ते खेळणं या गोष्टींइतकी वाचनाची हौस नसते. या कोरोनाला नष्ट करण्यासाठी पुस्तकं वाचण्याचा नवा छंद आता कोरोनानेच आपल्याला शिकवायला हवा. आपल्या मुलांना आपण अधिकाधिक विज्ञानविषयक पुस्तकं (आणि विज्ञानकथादेखील) वाचायला सांगितली पाहिजेत.
विज्ञान, औषधं आणि चांगल्या दर्जाची स्वच्छता यांनीच कोरोनासारखा साथीचा आजार नष्ट होऊ शकतो. पण पर्यावरण बदलासारख्या परिस्थितीमुळे हा आजार पुन्हा पुन्हा उद्भवणार नाही, याविषयी आपल्याला काहीच खात्री नाही.
युरोपीयन, अमेरिकन किंवा चायनीज शाळांप्रमाणे भारतीय शाळा मुलांना पुस्तकं वाचण्याची सवय लावत नाहीत. निसर्गात गुंतून राहणं, नेहमीच्या दैनंदिन आयुष्यात काहीतरी नवीन गोष्टी करत राहणं, आणि भरपूर विज्ञानविषयक पुस्तकं वाचणं यातूनच नव्या वैज्ञानिक कल्पना सुचतात. सध्याच्या या वेळेत सुशिक्षित पालक आणि मुलं यांना एकत्र वाचन करता येऊ शकतं, किंवा पुस्तकांनी सुचवलेल्या कल्पनांवर चर्चा करता येऊ शकते.
स्वतःचं वय कितीही असलं आणि आपण पुरुष किंवा स्त्री कुणीही असलो तरी स्वयंपाकघरात वेळ घालवणं, स्वयंपाक करणं, भांडी घासणं, कपडे धुणं, घर स्वच्छ करणं अशा घरातील सगळ्या कामांमध्ये आपल्यासह मुलांना सहभागी करून घेतलं पाहिजे. कारण स्वयंपाकघर ही सर्जनशील आणि मशागत करणारी जागा आहे. लिंगनिरपेक्ष दृष्टिकोन बाळगून तिथे वडिलांनीही आईसोबत काम केलं पाहिजे. कृतिशील असण्यानेच भीती आणि अस्वस्थता नष्ट होते. कृतीहीन, रिकामं बसून राहण्याने सर्जनशीलता व माणुसकीदेखील नष्ट होते.
भारत हा असा देश आहे जिथे आपल्या कुटुंबाचा इतिहास लिहून ठेवण्याची पद्धत नाही. पश्चिमेकडील देशांमध्ये कौटुंबिक इतिहास हा त्या कुटुंबाच्या पिढीजात ज्ञानवृक्षाचा महत्त्वाचा स्रोत असतो. असा कुटुंबाचा इतिहास लिहिण्यासाठी एखाद्याने लेखकच असण्याची आवश्यकता नसते. शक्य तितक्या पिढ्यांतील सर्व व्यक्तींची नावं नोंदवून ठेवणंही पुरेसं असतं. त्यातील काहीजणांकडे असणारी कौशल्यं असामान्य किंवा अतिसामान्यही असू शकतात.
एखादा समाज, आणि त्यातील निरनिराळ्या पिढ्यांनी टिकून राहण्यासाठी व विकासासाठी वापरलेलं ज्ञान, तंत्र, व्यवसाय, कौशल्यं याविषयीच्या नोंदी इतिहासातील महत्त्वाचं साधन ठरतात. या उपलब्ध वेळात लोकांनी मांडी ठोकून, आपल्या कुटुंबाचा इतिहास लिहून ठेवला पाहिजे. स्कॉट केली तर अंतराळातही स्वतःची रोजनिशी लिहीत असे, आपणही ते केलं पाहिजे.
लोक गाणी म्हणतात, संगीत ऐकतात, आणि घरात खेळण्याजोगे खेळ खेळतात. पण या नेहमीच्या गोष्टी आहेत, ते सगळेच करतात. कोरोना विषाणू आणि भविष्यातील संकटं यांपासून मानवजातीचे रक्षण करण्यासाठी अनेक महान व्यक्तींची गरज भासणार आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाच्या सर्जनशील कृती - विशेषकरून लिखाण आणि वाचन - या ज्ञानसंचयात भरच घालेल. घरात राहून कोरोना विषाणूशी सामना करत असताना हे एवढं आपण नक्की करूया...
( अनुवाद : सुहास पाटील )
- कांचा इलैया शेफर्ड, हैदराबाद
(लेखक राज्यशास्त्राचे अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते असून, तेलुगू व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये ते लेखन करतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली असून, अलीकडेच त्यांचे आत्मकथनात्मक पुस्तक From Shepherd Boy to an Intellectual या नावाने प्रकाशित झाले आहे. हा लेख मूळ इंग्रजीत countercurrents.org वर प्रसिद्ध झाला आहे, त्यांच्या पूर्वपरवानगीने अनुवाद करून येथे प्रसिद्ध केला आहे.)
Tags: कांचा इलैया शेफर्ड कोरोना पुस्तक वाचन वेळ स्कॉट केली देशभक्ती देशकार्य Kancha Ilaiah Shephered Kancha Ilaiah Books Reading Hobby Nation Corona Lockdown Load More Tags
Add Comment