या घरकामाचे करायचे काय? (उत्तरार्ध)

स्त्री चळवळीची सामाजिक परिणामकारकता आणि युवा भान प्रकल्पावरील लेखमाला : 2/12

thelogicalindian.com | प्रातिनिधिक चित्र

बर्ट्रांड रसेल यांच्या 'The Conquest of Happiness' या पुस्तकाचा स्वैर मराठी अनुवाद करुणा गोखले यांनी पाव शतकापूर्वी 'सुखी माणसाचा सदरा' या नावाने केला, तो विशेष लोकप्रिय झाला. त्यानंतर सिमोन द बोव्हूआर यांच्या 'सेकंड सेक्स' या आणखी एका जगप्रसिद्ध पुस्तकाचा अनुवादही त्यांनी केला. त्यांच्या स्वतंत्र लेखनाचे 'बाई माणूस' हे पुस्तकही चांगलेच दखलपात्र ठरले आहे. आज त्यांची ओळख मराठी लेखिका, अनुवादक, संपादक व स्त्रीमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या / विश्वस्त अशी आहे..

त्यांनी 2021 या वर्षी 'स्त्री चळवळीची सामाजिक परिणामकारकता आणि युवा भान' या विषयावरील संशोधन प्रकल्प हाती घेतला होता.. त्यामध्ये 203 युवक युवतींच्या मुलाखती घेतल्या. त्या सर्वांना एकूण 62 प्रश्न विचारले गेले आणि प्रत्येक मुलाखत साधारणतः सव्वा तास चालली. त्या अभ्यासावर आधारित बारा भागांची लेखमाला 'कर्तव्य'वरून सलग 12 आठवडे (प्रत्येक रविवारी) प्रसिध्द करीत आहोत..

या लेखाच्या पूर्वार्धात आपण घरकामातील तथाकथित चॉइसविषयी चर्चा केली. आता “घरकाम व अर्थार्जन ही दुहेरी जबाबदारी पार पाडणे हा स्त्रीचा चॉइस असतो”, या वाक्यातील अर्थार्जनाविषयी बोलू या. 

आपल्या बहुसंख्य उत्तरदात्यांच्या कुटुंबातील आई, बहीण, बायको इत्यादी स्त्रिया उच्चशिक्षित आहेत. खुद्द सर्वेक्षणात सहभागी झालेल्या काही तरुणींना मूल होणार म्हणून, मुलांना बघायला घरात कुणी नाही म्हणून नोकरी सोडावी लागली आहे. त्यातील एक-दोघींचा अपवाद सोडल्यास त्या सर्वजणींना नोकरी सोडावी लागल्याचे खूप दु:ख आहे. आपल्या जोडीदाराने किंवा माहेर/सासरच्या कुणी तरी सहकार्य केले असते, तर आपला जॉब टिकला असता असे साश्रूनयनांनी त्यांनी मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीपुढे म्हटले आहे. याचाच अर्थ नोकरी करणे कष्टप्रद असले, तरी त्यात स्त्रीला अतीव समाधान मिळत असते. कदाचित अर्थार्जनाची तीव्र निकड नसेलही, परंतु स्त्रीचे अर्थार्जन फक्त पैसे कमवण्यासाठी राहिलेले नसून आता ती ते तिच्या अस्मितेशी, आत्मसन्मानाशी जोडत असते. नोकरी करताना ती पैशाबरोबरच बौध्दिक आनंद मिळवते, स्वत:च्या वैचारिक कक्षा रुंदावते, स्वत:चे सामाजिक वर्तुळ तयार करते, समवयीन, समविचारी स्नेहपरिवार गोळा करते आणि एखाद्या क्षेत्रात स्वत:चे सामाजिक स्थान निर्माण करते. आधुनिक स्त्री स्वत:च्या कामामधून हरप्रकारे व्यक्त होत असते. ते तिला ‘स्व’च्या व्यक्तीकरणासाठी नव्याने उपलब्ध झालेले व्यासपीठ आहे, असे तर आपलेच उत्तरदाते म्हणाले आहेत. 

‘घरकाम आणि नोकरी अशी दुहेरी जबाबदारी झेपत नसेल, तर सोडावी स्त्रीने नोकरी’, असे म्हणणे म्हणजे तिला वरील सर्व फायद्यांवर पाणी सोडण्यास भाग पाडणे झाले. तसेच, नोकरी करायची आहे ना, मग दुहेरी जबाबदारी उचलायची तयारी ठेवा असे त्यात गृहीतक दडले आहे. नोकरी, घरकाम आणि बालसंगोपन हे तिन्ही झेपत नाही म्हणून नोकरी सोडणे व अर्थार्जनासकट वरील सर्व फायद्यांपासून वंचित राहणे, हा तिच्यासाठी चॉइस नसून, बहुतांश वेळा नाईलाज असतो. ज्या पुरुषांची आमदनी उत्तम असते, ते अनेकदा बायकोला सुचवतात की, “तू अर्थार्जनाची काळजी करू नकोस, ती जबाबदारी मी घेतो, तू घर आणि मुलं यांकडे लक्ष दे.” वरकरणी हे कामाचे आणि जबाबदाऱ्यांचे न्याय्य विभाजन वाटले, तरी वास्तवात ते तसे नसते. अशा कामाच्या वाटणीत स्त्रीची क्षितिजे घराच्या चार भिंतीत कोंडतात. एवढेच नाही, तर तिचा समवयीन लोकांबरोबरचा वावरच संपुष्टात येतो. ती दिवसभर आधीच्या पिढीचे सासूसासरे आणि पुढील पिढीतील मुले यांबरोबर राहते. त्याचा तिला शीण आणि कंटाळा येतो. तिच्या शैक्षणिक, बौध्दिक क्षमतांचा उपयोग होईल आणि कस लागेल असे कुठलेच आव्हान घरकामात नसते. त्यात तिच्या संयमाची मात्र पदोपदी परीक्षा असते. ती दिल्याबद्दल तिला कुठलीही बढती किंवा इन्सेन्टिव्ह नाही. करीअरचा त्याग करून, खस्ता खाऊन वाढवलेली मुले सत्प्रवृत्त निपजतील, चांगलं शिकून स्वत:च्या पायावर उभी राहतील, आणि आपल्या कष्टांची जाण ठेवतील या भविष्य निर्वाह निधीवर डोळे लावून ती पूर्णवेळ गृहिणीपद निभवते. पण हा चॉइस ती फार काही राजीखुषीने स्वीकारत नसते. 

आपल्या दोन उत्तरदात्यांनी या समस्येवर नेमक्या टिप्पण्या केल्या आहेत. एक तरुण म्हणतो की, घरातली कामे, बालसंगोपन यांत मदत करण्याऐवजी पुरुष दुसरा, त्यांच्या दृष्टीने अधिक सोपा मार्ग निवडतात: ओव्हरटाईम करून जास्त पैसे कमावण्यास तयार होतात. कारण ते जास्त सोपे आहे, हे त्यांना मनोमन ठाऊक असते. पण हा ‘त्यांच्यासाठी’ सोपा असलेला पर्याय स्त्रीसाठी फार क्लेशकारक आहे, हे त्यांना जाणून घ्यायचे नसते. 

दुसरी एक उत्तरदात्री म्हणाली की, ‘शिक्षित, आधुनिक स्त्रीपुढे एक धोका नेहमीच आ वासून उभा असतो. तो म्हणजे ‘तू कमावले नाहीस तरी चालेल’ या वाक्याचे कवचकुंडल तिला फार सहजी उपलब्ध असते.’ 

अन्न शिजवणे, घराची स्वच्छता, बालसंगोपन, वृध्द व आजारी व्यक्तींची सुश्रुषा या माणसाच्या दैहिक अस्तित्वाच्या अपरिहार्य गरजा आहेत. आतापर्यंत त्या पूर्ण करण्याचे संपूर्ण कंत्राट स्त्रीला दिलेले होते. खरे तर या गरजा स्वत:च्या स्वत: पूर्ण करण्याची क्षमता निसर्गत: स्त्री आणि पुरुष दोघांतही आहेतच. बाळ जन्माला घालून त्याला स्तन्य देणे या दोनच क्षमता पुरुषात नाहीत; तेवढया सोडल्यास मानवी देहाच्या इतर सर्व तात्कालिक गरजा तो स्त्रीइतक्याच क्षमतेने पूर्ण करू शकतो. पण इतकी शतके त्या त्याने स्त्रीवर सोपवल्या व स्वत:स अधिक नाविन्यपूर्ण, आव्हानात्मक, उत्तेजनादायक कामे करण्यास मोकळे ठेवले. हे अन्याय्य आहे, याची जाणीव स्त्रीला तर झाली आहेच, पण ती पुरुषाला करून द्यायला हवी, हेपण आता तिला कळले आहे. आणि म्हणून स्त्री-पुरुष नात्यांमध्ये ताण आहेत. 

स्त्रीने अर्थार्जन आणि घरकाम ही दुहेरी जबाबदारी उचलणे हा तिचा चॉइस असतो हेपण आता वास्तवास धरून राहिलेले नाही. हा चॉइस नवरा आणि बायको या दोघांनाही नाही. दोघांनी कमावले, तरच शहरात निभाव लागेल, छोटे का होईना, घर घेता येईल, मूल होऊ देता येईल, येऊ घातलेल्या बाळाला शिक्षण देता येईल. काही कारणाने ज्यांच्या बायकोला नोकरी करता येत नाहीय, अशा तरुणांनी ही विवंचना बोलून दाखवली आहे. ‘माझी बायको शिक्षित आणि खूप हरहुन्नरी, चुणचुणीत आहे, पण तिच्या आईवडीलांनी तिला अर्थार्जनासाठी इक्विप केलेले नाही, त्यामुळे तिला रोजगार मिळवणे अवघड जात आहे, हीच आमच्या संसारातील मुख्य अडचण आहे’, असे बोलून दाखवणारे तरुण याच सर्वेक्षणामध्ये भेटले आहेत. परंतु अडचण फक्त ही एकच नाही. कुटुंबांतील स्त्रीने अर्थार्जन सुरु केल्यावर तिच्या घरगुती जबाबदाऱ्या वाटून घेण्यास आपण मुलग्यांना पुरेसे इक्विप करत नाही हीपण तेवढीच मोठी अडचण आहे. 

“दुर्दैवाने स्त्रिया घरकाम अंगावर ओढवून घेतात. घरात काम नाही केलं, तर त्यांना गिल्टी वाटतं.” हे एका तरुणीने केलेले विधान आहे. त्यालासुध्दा अनेक सांस्कृतिक पैलू आहेत. वर केलेल्या चर्चेत आपण अशा काही स्त्रियांचा उल्लेख केला आहेच. त्यांना इतरांनी केलेले काम पसंत पडत नाही. त्यामुळे भांडी-झाडू-पोछा-स्वयंपाक यातले एकही काम त्या मोलाने करून घेत नाहीत, आणि शिवाय पूर्ण वेळ नोकरी करतात. स्वच्छतेचे आणि काटेकोरपणाचे अती वेड त्यामागे असते. अशा स्त्रियांचे कुटुंबीय त्यांच्या हटवादीपणापायी त्रासून कामामधून अंग काढून घेतात. पण तरीसुध्दा एक प्रश्न उरतोच की, त्यांचे श्रम त्या घरासाठीच वेचत असतात. त्यांना मोलाने केलेले काम आवडत नाही तर मग घरच्या सदस्यांनी त्या स्त्रीला रुचेल इतपत दर्जेदार काम करून तिचा भार हलका करता येणार नाही का? येईल, पण तिचा काटेकोरपणा ही सबब वापरून सगळ्यातून अंग काढून घेणे हेच कुटुंबीयांना सोयीस्कर असते, व तेच ते करतात. (इथे आर्थिक चणचणीपायी ही सर्व कामे स्वत: करणे भागच असणारा कनिष्ठ मध्यमवर्ग आपण जमेस धरत नाही आहोत.) शिवाय वर उल्लेख केलेल्या चार कामांव्यतिरिक्त अनेक कामे घरात असतात. ती तर मोलाने करायला देता येत नाही. ती अंगावर ओढून घेतली असे आपण म्हणू शकत नाही. स्त्रियांना घरकाम केले नाही, तर गिल्टी वाटते हासुध्दा सांस्कृतिक जडणघडणीचा भाग आहे. कारण घरकाम ही स्त्रीची जबाबदारी मानली जात असल्याने ती पूर्ण केली नाही, तर तिलाच दोषी धरले जाते. आणि कुणाला सतत दोषारोप ऐकून घ्यायला आवडेल? ज्या नोकरदार स्त्रियांकडे स्वयंपाकाला बाई असते, तिला ऑफिसमध्ये मस्करीत का होईना कसे चिडवले जाते, याची उदाहरणे तर याच अभ्यासादरम्यान तरुणींनी दिली आहेत. ‘कधी तरी नवऱ्याला स्वत: करून खायला घाल’, ‘तुला लग्नात आईनी अन्नपूर्णेच्या मूर्तीऐवजी स्वयंपाकिणीचा फोटो दिला असणार ना?’ वगैरे विनोद तिच्यावर झडतात. माझ्याच ऑफिसमध्ये जास्तीचे 3 तास ओव्हरटाईम काम करून घरी निघालेल्या एका तरुण कर्मचारीला तिचा सहकारी छद्मीपणे म्हणाला होता, “आता काय मग, बाहेरून पिझ्झा मागवणार असशील!” हे ऐकून दुखावलेली ती शांतपणे म्हणाली, “असा ओव्हर टाईम करून मी दमले बाबा. तू नाही दमलास? घरी जाऊन स्वयंपाक करायला एनर्जी उरलीय तुझ्यात?”

जे आजूबाजूचे लोक काडीचीही मदत करायला पुढे येत नाहीत, ते स्त्रीच्या घरकामाबद्दल शेरेबाजी करण्यात मात्र पुढे असतात. त्यामुळे तिच्या मनात अपराधी भावना निर्माण होते. अशी शेरेबाजी करण्यात स्त्रियासुध्दा मागे नसतात, कारण त्यांची जडणघडण पितृकेंद्री कुटुंबांमधून झालेली असल्याने त्यासुध्दा पुरुषाच्याच नजरेतून इतर स्त्रियांना जोखत असतात. एक उत्तरदाती म्हणालीच की, ‘पुरुषाने मुलांना वाढवण्यात मदत करावी, पण किचनमध्ये त्यांचा रोल पटत नाही’. अशा विचारांच्या स्त्रियापण वेगळा विचार करणाऱ्या स्त्रियांमध्ये अपराधीपण रुजवत असतात. 

किमान काही घरकाम रोज करावेच लागते. ते न झाल्यास गिल्टी वाटले पाहिजे; पण कुणाला? जे ही कामे सदैव दुसऱ्यावर ढकलतात, त्यांना; मग ते स्त्री असोत, वा पुरुष!

आज साठीच्या घरात असणाऱ्या स्त्री-पुरुषांपैकी किमान काहींनी तरी आपल्या मुलग्यांवर थोडेफार घरकामाचे संस्कार केलेले दिसतात. त्यामुळे त्यांच्या तिशी-बत्तीशीतील लेकी-सुनांवरचे घरकामाचे ओझे काहीसे सौम्य झालेले बघायला मिळते. परंतु याच वर्गात दुसरे एक घटीतही बघायला मिळते व त्याविषयी जाणवण्याएवढी नाराजीसुध्दा दिसते. ते म्हणजे मनात लोकशाही रुजवलेल्या व त्यानुसार स्वत:च्या लेकीसुनांना वागवणाऱ्या या पिढीच्या उदार वृत्तीचा तरुण पिढी गैरफायदा घेते. गैरफायदा घेणाऱ्यांत लेकी-सुना, मुले, जावई असे कुणीही असू शकते. आई किंवा सासूने भरून ठेवलेला डबा घेण्यापुरते स्वयंपाकघरात यायचे, बाकी घरातले व्यवस्थापन, छोटया-मोठ्या दुरुस्त्या, दैनंदिन किंवा जास्तीची स्वच्छता यांकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे, वेळी-अवेळी मुलांना वडीलधाऱ्यांकडे सोपवायचे, पण त्यांना विरंगुळा मिळेल यासाठी काहीही तजवीज करायची नाही, बुजूर्ग पिढीसोबत एकत्र तर राहायचे, परंतु कुटुंबाबरोबर येणारी इतर नाती, सण-समारंभ यांत काडीचाही रस दाखवायचा नाही, आणि त्यासाठी काही कष्टही उचलायचे नाहीत हेपण चित्र शहरी, शिक्षित वर्गांत दिसते हे नाकारून चालणार नाही. आधीच्या पिढीचा गैरफायदा घेणारे असे तरूण-तरुणी हे समतावादी, लोकशाहीवादी चळवळींचे लाभार्थी आहेत. ते शिक्षित आहेत, अर्थार्जन करत आहेत, स्त्रीच्या अर्थार्जनामुळे त्यांचे जीवनमान सुधारले आहे. स्त्रीच्या इच्छा, मते, विचार, गरजा यांचा आदर झाला पाहिजे एवढी जागरूकता त्यांच्यामध्ये आली आहे. पण हीच जागरूकता घरातील इतर स्त्री-पुरुषांप्रती दाखवावी एवढी सहसंवेदना त्यांच्यामध्ये नाही. लोकशाही विचारप्रणालीमध्ये काही प्रमाणात व्यक्तिवाद अनुस्यूत असतो. परंतु या व्यक्तिवादास परस्पर सहकार्याची जोड नसेल, तर अशा लोकसमुहातून लोकशाही गायब होते, आणि उरते ते फक्त स्वार्थातून उगम पावणारे शोषण. आज अनेक घरांत असे चित्र दिसते की,  जो समंजस आहे, त्याचे घरकामाच्या बाबतीत शोषण होते.  ते कधी पुरुषाचे होते, तर कधी स्त्रीचे. आणि शोषणकर्तेसुध्दा कधी तरुण पुरुष असतात, तर कधी तरुणी. 

परिवर्तनवादी चळवळी समन्यायाचा आग्रह धरतात, अन्यायाविरुध्द लढणाऱ्याचे हात बळकट करतात. त्याचा फायदा घेऊन अन्यायग्रस्त व्यक्ती स्वत:च्या समस्यांचे परिमार्जन करता करता इतरांवर तोच अन्याय करू लागते तेव्हा एक जुनी म्हण आठवते : कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ! लाकडापासून बनवलेली कुऱ्हाड लाकडावरच घाव घालते. तद्वत, समन्यायवादी चळवळीचे फायदे घेऊन स्थिरावलेली व्यक्ती इतरांवर अन्याय करू लागते. पण हे केवळ स्त्री चळवळीचे भागधेय नसून सर्वच सामाजिक चळवळींना त्याचा सामना करावा लागतो. याचे कारण चळवळ समष्टीच्या पातळीवर काम करते. ती सामाजिक व्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्नशील असते. पण चळवळीच्या परिणामी नव्याने मिळालेल्या उपलब्धतेचा फायदा लोक व्यक्तिगत आयुष्यात कसा करतात, त्यावर चळवळ नियंत्रण ठेवू शकत नाही. तिच्या हातात एकच असते : चळवळीची मांडणी करतानाच त्याचा दुरुपयोग होणार नाही, त्यास वाकडे वळण लागणार नाही यादृष्टीने समाजास सावधान करायचे. म्हणूनच जेव्हा चळवळीचा दुरुपयोग होतो, तेव्हा त्यासाठी समष्टीच्या पातळीवर काम करणाऱ्या संपूर्ण चळवळीस मोडीस न काढता, व्यक्तिगत पातळीवर त्यास विरोध करावा लागतो. एखाद्या अत्यंत परिणामकारक औषधाची एखाद्या व्यक्तीस जीवघेणी अ‍ॅलर्जी येते, तेव्हा त्या औषधावर सरसकट बंदी न आणता औषधाच्या बाटलीवर अ‍ॅलर्जीविषयीची सावधगिरीची सूचना लिहिण्यात येते, आणि अ‍ॅलर्जीचा त्रास झालेल्या व्यक्तीवर वैयक्तिक पातळीवर उपचार केले जातात. तेच पथ्य परिवर्तनवादी चळवळी आणि त्यांना वाकडे वळण लावणाऱ्या व्यक्ती यांबाबतीत पाळावे लागते. मग ती स्त्रीमुक्ती चळवळ असो, दलित चळवळ असो, वा ‘मी टू’ चळवळ!

घरकाम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांबाबतीत समस्या अशी झाली आहे की, शिक्षित समाज आज आपल्या मुलामुलींना अर्थार्जनासाठी सक्षम करत आहे, पण स्वत:ची कामे स्वत: करण्याचे महत्त्व शिकवायला विसरला आहे. त्यामुळे तरुण-तरुणी या दोघांचेही सक्षमीकरण एकांगी होऊ लागले आहे. त्यांना सहजीवनासाठी तर अजिबातच तालीम दिली जात नाही. त्यामुळे परस्परावलंबन, अडचणीच्या वेळी कुणाकडे मदत मागणे आणि अडचणीत असणाऱ्या व्यक्तीस प्रसंगी स्वत:ची गैरसोय करून मदत करणे ही देव-घेव तरुण पिढीला जमेनाशी झाली आहे. सहजीवन विवाहांतर्गत असो, वा विनाविवाह, त्यासाठी मुलामुलींची भावनिक बुद्धिमत्ता वाढवणे, त्यांच्यामध्ये परस्पर सहकार्याची भावना रुजवणे आवश्यक आहे. परंतु ते भान न पालकांना आहे, न औपचारिक शिक्षण व्यवस्थेला. म्हणूनच कर्तव्याच्या जाणिवेविना आलेले हक्कांचे भान, जबाबदारीशिवाय स्वातंत्र्य उपभोगण्याकडे कल, साहचर्यासाठी आवश्यक असणाऱ्या सामोपचाराचा अभाव, ‘निर्भीडपणे व्यक्त होणे’ आणि ‘उर्मटपणे बोलणे’ यांत होणारी गल्लत असे दुर्गुण उफाळून आले की समतावादी चळवळींना अपेक्षित नव्हते असे वर्तनप्रघात दिसू लागतात. ते मुख्यत्वे चळवळीच्या जाणकारांमध्ये नाही, तर लाभार्थींमध्ये दिसतात. त्यांबद्दल जाब मात्र चळवळीच्या कार्यकर्त्यांना विचारला जातो. 

- करुणा गोखले
karunagokhale@gmail.com 

Tags: करुणा गोखले स्त्री पुरुष समता युवा भान स्त्रीवाद घरकाम गृहिणी Load More Tags

Comments:

Anuradhakale

लेख विषय वास्तवाला सामोरे जाणारा परिवर्तन निसर्ग नियम मानवी जीवनात आपण परिवर्तन घडवतो पण ते घडत असताना जे स्वीकारतो ते त्याचा सर्वांगिण अभ्यास करून परिणामांचा विचार करून करत नाही ह्या घरकामाचे पण तेच झाले आहे जर विवाह संतती संसार हौसमौज घरात फक्त हम दो हवे असेल तरच फारसे घरकाम पडणार नाही कामाला बाई लावणे कमवत असल्याने परवडेल पण एकजरी मूल झाले की त्याची जबाबदारी एक आई म्हणून पडतेच घरातली वडिलमंडळी नको असतात मग पाळणाघर मुलाला पोचवणे आणणे ज्याची जशी कामाची वेळ तसेच ठरवावे लागते तेव्हा आपण स्त्री म्हणून काय पाहिजे निवड करायची पूर्वीचा काळ नाही की किमान ८/१०मुले बाळंतपण रांधा वाढा उष्टी काढा सासुरवास स्त्री शिक्षण स्वातंत्र्य ह्याचा कौशल्यपूर्ण उपयोग करून जोडीदाराला जबाबदारी त्यांनी सहभागी करून घेणे प्रत्येकाने स्वयंपाकच केला भांडी घासली असा अट्टाहास करून प्रश्न सुटणार नाही बदल होत आहेत त्याची जाण ठेवून मार्ग काढणे कौशल्य

Ashwini Funde

लेख अतीशय आवडला. शेवट अप्रतिम.

Add Comment