दिवाळीनिमित्त कर्तव्य साधना वरून पाच विशेष मुलाखती घेऊन येत आहोत.
1. टीव्ही या माध्यमाचा सखोल अभ्यास असलेली अभिनेत्री-लेखिका मुग्धा गोडबोले
2. भाषांवर आणि अभिनयावर प्रेम करणारा अभिनेता-अभिवाचक नचिकेत देवस्थळी
3. 'जेन झी'साठी भूगोल, पर्यावरण, तत्त्वज्ञान असे जड विषय रंजक कथा-कादंबऱ्यांतून मांडणारी लेखिका मृणालिनी वनारसे
4. कथ्थकची परंपरा आणि आजच्या काळाला सुसंगत कथनं यांचा मेळ घालणारी नृत्यांगना मानसी गदो
5. नवोदित लेखक-कवी-नाटककार-दिग्दर्शक-बालसाहित्यिक मुक्ता बाम
या पाच विचारशील, प्रयोगशील कलाकारांना आजपासून सलग पाच दिवस त्यांच्या मुलाखतींतून आपण भेटणार आहोत.
त्यातील आजची ही दुसरी मुलाखत.
नचिकेत देवस्थळी. पुण्यातला एक नाटकवेडा तरुण. नाटक शिकतो काय, आणि पुढे जाऊन सतीश आळेकरांचं नाटक करतो काय, आणि प्रयोगशील नाटकाचा ध्यास घेतो काय! ऊर्दू शिकतो काय आणि पुढे जाऊन ‘सुखन’सारखी देश-विदेशातल्या रसिकांना गेलं दशकभर वेड लावणारी अद्वितीय मैफिल गाजवतो काय. त्याची गोष्टच वेगळी. तो वेगवेगळ्या माध्यमांत संचार करतो पण रंगभूमीला आपली मुख्य कर्मभूमी मानतो. त्याच्या कामाविषयी त्याच्याशी संवाद साधला.
नचिकेत तुझा व्यावसायिक कलाकार होण्याचा प्रवास कसा सुरू झाला?
लहानपणी सिनेमा बघून मला अभिनयाचं आकर्षण वाटायला लागलं. नंतर नाटकाची जादू कळली. मी आयुष्यात पहिल्यांदा नाटक पाहिलं ते प्रशांत दामले यांचं कौटुंबिक विनोदी नाटक होतं. त्यानंतर जे पाहिलं ते डॉ. श्रीराम लागू यांचं सूर्य पाहिलेला माणूस! दोन्हीमध्ये आशय – विषय – मांडणीचा इतका फरक होता, पण दोन्ही आपापल्या जागी कमाल होतं. सूर्य पाहिलेला माणूसची आठवण सांगतो, सॉक्रेटिस कोण, त्याचे विचार, त्याचा लढा हे काहीच मला त्या वयात कळत नव्हतं. पण भरत नाट्य मंदिरात त्या नाटकातली अर्ध्या-अर्ध्या तासाची दोन स्वगतं मी एका जागी खिळून जाऊन ऐकली. मीच काय, एकही प्रेक्षक चुळबुळही करत नव्हता. डॉ. लागूंनी लोकांना मंत्रमुग्ध केलेलं होतं. रंगभूमीच्या मर्यादित अवकाशात अभिनेता एकेका दृष्टिक्षेपातून, संवादफेकीतून काय अफलातून विश्व उभं करू शकतो हे दिसलं. आणि मला वाटायला लागलं की मला हेच करायचं आहे.
मग मी पुण्यात एस पी कॉलेजला ऍडमिशन घेतली तीच ‘पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत नाटक करता यावं’ म्हणून. पुरुषोत्तममध्ये पाचही वर्ष काम केलं. नाटक नाही तर दुसरं काय असा विचारही केला नाही. काहीतरी उपयोगी शिक्षण घेणं हेही शहाणपणाचं ठरलं असतं. पण ती अक्कल नंतर आली. कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत होतो पण कलाशाखेच्या मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, भाषा या विषयांचा आपल्याला नाटकासाठी अधिक उपयोग झाला असता, हेही उशिरा कळलं. म्हणून मग नंतर मी फिलॉसॉफीत एम ए करण्याचा प्रयत्न करूनही पाहिला.
त्या काळात एस पी कॉलेजची बरीच नाटकं पुरुषोत्तममध्ये गाजलेली होती. त्यातली तुझी कोणती होती?
अकरावीला मी संजय पवारांची 'फ्लाईंग क्वीन्स' नावाची एकांकिका केली होती. तिला तिसरं बक्षीस होतं. त्यानंतर प्रमोद काळेंचं 'शोकपर्व', त्यात मी फक्त विंगेतून आवाज दिला. तिसऱ्या वर्षी संजय पवारांचं 'मान्यतेच्या झग्याखाली' नावाचं नाटक होतं, त्या वेळी बक्षीस नाही मिळालं पण प्रसिद्धी खूप मिळाली. त्या वर्षी नेहमी नंबरात असणारी सर्व कॉलेजेस (एस पी, बीएमसीसी, फर्ग्युसन इत्यादी) प्राथमिक फेरीत बाद झाली. विद्यार्थ्यांनी त्याविरोधात निदर्शनं वगैरे केली होती. पुढच्या वर्षी वैभव आबनावेचं ‘मॅच्युअर इनफ’ आणि शेवटच्या वर्षी ‘एक होता कुतुबुद्दीन’ नावाचं नाटक अशी पाच वर्षांत पाच नाटकं केली. मी कलामंडळामध्येच राहायचो. अभ्यासाकडे पास होण्यापलीकडे लक्ष नसायचं.
कॉलेजमध्ये असताना नाट्यस्पर्धांच्या निमित्ताने प्रत्यक्ष रंगभूमीचा अनुभव तू घेत होतास, सातत्याने चांगल्या भूमिका करत होतास. त्यापलीकडे जाऊन नाटक आणि अभिनय यांचं प्रशिक्षणही घ्यावं असं कधी वाटलं? त्याला काही विशेष निमित्त घडलं का?
आधी नाटक-सिनेमातलं पाहून त्यातल्या अभिनेत्यांसारखं काम करायचा प्रयत्न करायचो. पण हळूहळू जाणवलं की आपल्या प्रयत्नांना योग्य दिशा देणारं कोणीतरी आवश्यक आहे. अभिनय शिकायला हवा. नाटक उभं करण्याची प्रक्रिया समजायला हवी. अभिनयासोबत नाटकाची म्हणून जी भाषा असते शिकायला हवी. म्हणून कॉलेजमध्ये असतानाच ‘चतुरंग प्रतिष्ठान’च्या तीन वर्षांच्या नाट्यप्रशिक्षणवर्गात प्रवेश घेतला. योगेश सोमण आमचे प्रशिक्षक होते. आता मी जे अभिवाचन आणि अभिनय करू शकतो, त्याची मुळं त्या तीन वर्षांतली आहेत. त्या वर्गात खूप मोकळेपणा होता. स्वतः प्रयोग करून बघून आपलं काम शिकता येत होतं. थोडा theoryचा अभ्यास होता, पाठांतर, उच्चार, बोलीभाषेच्या शैली, वेगवेगळ्या अभिनयाच्या शैली, आवाज लावणं, त्यासाठी करण्याचे व्यायाम, रंगमंचावर वावर सहज व्हावा, शरीराला पात्राप्रमाणे देहबोली बदलता यावी यासाठी मेहनत, आपल्या नाटकाच्या टीमशी नातं जुळावं म्हणून खेळ आणि गप्पा, एकत्र नाटकं बघणं, त्यावर चर्चा करणं, वेगवेगळी नाटकं आपणच बसवणं, त्यातूनही शिकणं, असं वर्गाचं स्वरूप होतं. आमची मोठी टीम होती, त्यामुळे खूप नाटकं केली. वेगवेगळ्या स्पर्धांना उतरलो. कॉलेजच्या स्पर्धांव्यतिरिक्त पुण्यात आणि पुण्याबाहेरही अनेक स्पर्धांना जायचो. एका बाजूला कॉलेजचं कलामंडळ आणि दुसऱ्या बाजूला प्रशिक्षणवर्ग असं दोन्ही चालू होतं. शिवाय सिनेमाची गोडी होतीच. म्हणून फिल्म मेकिंगचे छोटे कोर्सेस केले. आमच्या मित्रांच्या गटाने काही शॉर्ट फिल्म्स बनवल्या. एक मोठी फिल्म बनवण्याचाही प्रयत्न केला पण तो काही जमला नाही. आणखी खोलातून शिक्षण घेण्यासाठी म्हणून राष्ट्रीय नाट्य विद्यालयाची (NSD) प्रवेश परीक्षाही मी दिली होती. पण अगदी शेवटच्या फेरीत त्या शर्यतीतून बाहेर पडलो. माझं नाटक मात्र सुरूच राहिलं. मग हळूहळू मी व्यावसायिक नाटकांकडे वळलो.
अगदी उमेदवारीच्या काळात ‘गणपती बाप्पा मोरया’ हे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बाजारीकरणावर, त्यातल्या गैरप्रकारांवर भाष्य करणारं नाटक केलं. त्यातून अर्थार्जन कमी झालं, पण खूप ठिकाणी प्रयोग केले, 2003 मध्ये एक प्रयोग दिल्लीत झाला. त्या प्रयोगाला मनोहर जोशी आले होते. ते दहा मिनिटेच नाटकाला बसले आणि बाहेर निघून गेले. मध्ये नेमकं काय घडलं माहिती नाही पण मध्यांतरात काही लोक आले आणि नाटक बंद करा म्हणाले. त्यांच्याशी बोलणं होऊन तिथे दुसरा अंक झाला कसा बसा, पण त्यात खूप वेळ गेला. आलेले बरेच प्रेक्षक अर्धवट नाटक पाहून निघून गेले. त्यानंतर ते नाटक बंदच पडलं.
मुंबईच्या अष्टविनायक संस्थेकडून ‘चार चौघांच्या साक्षीने’ हे नाटक केलं. एका मॅरेज कौन्सिलरचा घटस्फोट होण्याची शक्यता निर्माण होते, आणि मग ती ज्या पद्धतीने ती परिस्थिती हाताळते, त्यावर आधारित ते नाटक होतं. त्या काळातले वैवाहिक प्रश्न, काउन्सेलिंग, घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया, भावनिक गुंतागुंत असं सगळं असलेलं गंभीर नाटक होतं ते. या नाटकाचे मी शंभर प्रयोग केले.
मग हळूहळू काही मालिकांतून लहानमोठ्या भूमिका केल्या. असंभव नावाच्या एक लोकप्रिय मालिकेत छोटीशी पण महत्त्वाची भूमिका केली. आसक्त रंगमंच, समन्वय, जागर अशा वेगवेगळ्या प्रायोगिक नाट्यसंस्थांमध्ये काम केलं. तेव्हा पैसे नसायचे पण नाटक मात्र पॅशनेटली करायचो. ‘आपण चहा पिऊन नाटक करू’ अशी एक आमची "उदात्त" भावना होती.
त्याच काळात मी ऑडिओ बुक्ससाठी अभिवाचन करायला सुरुवात केली. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची काही पुस्तकं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं ‘बुद्ध अँड हिज धम्म’ अशी अनेक सामाजिक – वैचारिक पुस्तकं वाचली. त्या पुस्तकांनी माणसांची, समाजाची एक वेगळीच जाण दिली. ते सुरू असताना नाटक थोडं कमी झालं. पण नाटकाची ओढ स्वस्थ बसू देईना. पुन्हा नाटकच करायचं म्हणून संधीच्या शोधत होतो. तेव्हा निखिल गाडगीळ म्हणून माझा मित्र आहे त्याने मला सांगितलं, की माधव वझे हॅम्लेट करणार आहेत आणि हॅम्लेटच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेत आहेत. मी त्यांना विचारलं. तोवर त्यांचं कास्टिंग झालं होतं आणि ते एका अभिनेत्यावर काम करत होते पण तरी त्यांनी मला बोलावलं. मी व्यवस्थित तयारी करून गेलो, ऑडिशन दिली. त्यांनी निश्चित निर्णय दिला नाही लगेच, पण मला आणखी पाठांतर करायला सांगितलं आणि तालमींना येत जा म्हणून सांगितलं. दोन तीन दिवसांनी त्यांनी हॅम्लेटची भूमिका मला दिली. त्या नाटकाचे आम्ही काही प्रयोग केले. ते नाटक बसवताना जड भाषा, पल्लेदार वाक्यं, वेगळे सांस्कृतिक संदर्भ, थक्क करणाऱ्या भावना या विषयांची समज थोडी वाढली. एकचांगला अनुभव घेतला.
त्यानंतर ‘आषाढातील एक दिवस’ हे अतुल पेठे यांचं नाटक मी केलं. आनंद इंगळे यांच्याबरोबर ‘अ फेअर डील’ नावाचं विवेक बेळे यांचं व्यावसायिक नाटक केलं. त्याचबरोबर ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सुरू झाली. त्यातली माझी भूमिका लोकांना खूप आवडली. भरपूर लोकप्रियतेचा पहिला अनुभव तेव्हा घेतला. त्यानंतर मग मी पुन्हा मुंबईत राहायला लागलो आणि हिंदी नाटकांकडे वळलो. तिथे सुनील शानबाग सरांची ‘तमाशा थिएटर’ नावाची संस्था आहे. त्यात मी 'मॅरेजोलॉजी', 'वर्ड्स हॅव बीन अटर्ड', अशी समाजिक नाटकं केली.
नाटक करत करत तू हिंदी भाषेवर चांगली पकड मिळवलीस, ऊर्दूही शिकलास. हिंदी आणि ऊर्दूत थोडं लेखनही केलंस. हे ऊर्दूचं प्रेम कसं निर्माण झालं? तुझ्या ऊर्दू लेखनाचं नेमकं काय स्वरूप आहे?
सुरुवातीला 'आपल्याला हिंदी चित्रपटांत काम करायचं आहे' अशी महत्त्वाकांक्षा होती. त्यामुळे हिंदी चांगलं बोलता आलं पाहिजे याची जाणीव झाली होती. मुंबईत राहण्यामुळे, हिंदी नाटकं केल्यामुळे भाषेचा सराव होत होता. नसीरुद्दीन शाह यांचं ‘इस्मत आपा के नाम’ हे नाटक पाहून त्यांच्यासारखं शैलीदार उर्दू बोलता यायला पाहिजे अशी इच्छाही निर्माण झाली होती. पण उर्दूचं प्रेम मात्र एका मराठी नाटकाच्या दौऱ्यात निर्माण झालं. आसक्तच्या एका नाटकाचा दिल्लीत प्रयोग होता. तेव्हा वरुण नार्वेकर या आमच्या मित्राने मिर्झा गालिब यांच्या रचनांचं पुस्तक घेतलं - दिवान ए गालिब. मीही ते कुतूहलाने वाचायला घेतलं. त्यात एक शेर होता ‘तेरे वादे पर जिए हम तो ये जान झूट जाना, के खुशी से मर न जाते गर ऐतबार होता’ तो शेर कळला नाही, पण त्याचं आणि गालिबचं खूप आकर्षण वाटलं. मग मी नियमितपणे गालिबची कविता वाचत राहिलो. मला गोडी लागली, मी शिकत गेलो. गुलजार यांची मिर्झा गालिब ही मालिका पाहिली. मग एकेक शेर समजून घेत घेत भाषा आणि शायरी शिकलो.
एखादी भाषा शिकली की ती आपल्याला किती वेगवेगळ्या अंगांनी समृद्ध करते हे मी अनुभवलं. ऊर्दू भाषेशी जोडलेली इतिहास-संस्कृती समजून घेतली. ऊर्दू म्हणजे लष्कर. वायव्येकडून जे लोक भारतावर चालून आले, त्यांच्या अनेक भाषा होत्या – पर्शियन, अफगाणी, तुर्की इत्यादी. शिवाय इकडच्या स्थानिक लोकांची भाषा वेगळी होती. सगळ्यांचा समन्वय साधत त्या लष्कराची जी एक मिश्रभाषा तयार झाली तिला ऊर्दू म्हणतात. या भाषेचा जन्म भारतातला आहे. ती फक्त मुस्लिमांची भाषा नाही तर इथल्या लोकांची भाषा आहे. भाषेला धर्माच्या साच्यात अडकवणं चुकीचं आहे पण दुर्दैवाने ते होतं. ऊर्दू भाषा शिकताना हा इतिहास समजला आणि त्यामुळे त्या भाषेचं समावेशक सौंदर्यदेखील मला दिसलं.
दुसरं एक असं जाणवलं की, मातृभाषेच्या बाबतीत तुम्ही सजग नसता; कारण लहानपणापासून तुम्ही ती सहजपणे बोलत असता. पण जेव्हा तुम्ही दुसरी भाषा शिकता, तेव्हा तुमची मातृभाषासुद्धा तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने कळायला लागते. तिच्यावरचं प्रेम वाढतं. मी आधी कुसुमाग्रजांच्या व्यतिरिक्त कुठलाही मराठी कवी वाचलेला नव्हता, पण ऊर्दू शायरी वाचल्यावर मी बोरकर, मर्ढेकर, गडकरी, शांता शेळके, विंदा, ग्रेस वगैरे वाचले. आता अनेक नवे कवीही वाचतो. कविता वाचायला मला आता आवडतं.
मला येत असलेल्या कोणत्याच भाषेत मला कविता सुचत नाही, पण हिंदी आणि ऊर्दूत मी काही लघुकथा लिहिल्या आहेत. 'पतंगबाज’, ‘परदा’ अशा माझ्या काही लघुकथा आहेत. साहिर लुधियानवी यांच्यावर आधारित एका कार्यक्रमाची संहिता मी लिहिली आहे, त्याचे प्रयोग भारतात आणि भारताबाहेरही केले आहेत. शॉर्ट फिल्मसाठी कथा-पटकथा, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या संहिता, निवेदनं, असं लेखन गरजेप्रमाणे मी करतो, यापुढेही करेन, पण माझा मूळ पिंड लेखकाचा नाही; तर अभिनेत्याचा, सादरकर्त्याचा आहे. कुणीतरी लिहून ठेवलेलं आणि मला भावलेलं लोकांपर्यंत पोहोचवण्याची ओढ मला जितकी सहजपणे लागते, तितकी लेखनाची ऊर्मी सहजपणे येत नाही.
अभिनेता-कवी ओम भुतकर आणि तू यांनी एकत्र येऊन सुखन ही ऊर्दू आणि हिंदी, कवितांची मैफिल आकाराला आणली. आज सुखनने अभूतपूर्व लोकप्रियता कमावली आहे. पण त्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली?
मी मुंबईत नाटक करत होतो तेव्हा THESPOच्या स्पर्धेसाठी ओम भुतकर ‘मी गालिब’ नावाचं नाटक लिहीत होता. त्याला मदत हवी होती. त्यासाठी त्याला कोणीतरी माझं नाव सुचवलं. तेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो, आणि त्या निमित्ताने भेटत राहिलो. ऊर्दू आणि शायरी हाच आम्हाला एकत्र बांधून ठेवणारा धागा होता. आम्ही त्या विषयांत रामयचो, वाचायचो, बोलायचो. हळूहळू आमची चांगली मैत्री झाली. आम्ही फिलॉसॉफीमध्ये एम ए करण्याचा तोकडा प्रयत्नही एकत्रच केला होता.
आमचं ऊर्दूवर प्रेम होतं. खूप प्रभुत्व नव्हतं, पण जे येतंय ते तरी लोकांपर्यंत पोहोचवावं असं वाटायला लागलं. गणेश विसपुतेंच्या घरी आम्ही पहिल्यांदा कविता वाचल्या. घरगुती मैफिल होती. ‘सुखन’ असं नावही तिला नव्हतं. त्या मैफलीला प्रतिसाद मस्त मिळाला. मग आशुतोष पोतदारांच्या घरी कार्यक्रम केला. पुढे अशा अनेक घरगुती मैफिली मिळत गेल्या. जेव्हा सिनेमा दिग्दर्शक उमेश कुलकर्णींच्या घरी शो झाला, तेव्हा मोठ्या स्तरावर जाहीर मैफिल करायचं ठरलं. सुदर्शन रंगमंचावर आसक्त संस्थेच्या रिंगण महोत्सवात सुखनचा पहिला जाहीर प्रयोग झाला. अफलातून प्रतिसाद मिळाला, आणि मग आम्ही मागे वळून बघितलंच नाही. कार्यक्रमाचा आवाका, वेळ, लोकप्रियता वाढतच गेली, आज दहा वर्षं होत आली, तरी ती वाढतेच आहे.
सुखनमध्ये ऊर्दू आणि हिंदीतल्या उत्तमोत्तम रचनांचं अभिवाचन आणि गायन आम्ही करतो. गझल, कव्वाली, पारंपरिक गाणी, त्या पठडीतली फिल्मी गाणी, अनेक जुन्या-नव्या, प्रथितयश आणि अनवट अशा दोन्ही प्रकारच्या, भारतीय आणि पाकिस्तानी कवींच्या कविता, आमच्या कविता अशा स्वरूपाची आमची मैफिल असते. पण हा फक्त कवितेचा किंवा गाण्याचा कार्यक्रम नाहीये, त्याच्यामध्ये नाट्य आहे. एका जागी बसून आम्ही वाचत-गात असलो तरी त्या सादरीकरणात, त्या वातावरणात नाट्य आहे. आणि त्या नाट्याचं गारुड बसतं लोकांच्या मनावर.
प्रत्येक प्रयोगात प्रेक्षकांना त्यांच्या ओळखीचं आणि आवडीचं काहीतरी, शिवाय काहीतरी वेगळं, नवं ऐकवण्याचा आमचा प्रयत्न असतो. मुख्य म्हणजे प्रयोग करूयात असं आतून वाटल्यावरच आम्ही प्रयोग करतो. कधी सलग प्रयोग होतात, कधी दोन प्रयोगांच्या मध्ये थोडा वेळ जातो.
सुखन खूप लोकप्रिय आहे, सर्व शो हाऊसफुल होतात, काही मिनिटांत ऑनलाइन तिकिटं संपतात. त्याचा फायदा करून घ्यायचं ठरवलं, आणि आम्ही प्रयोग वाढवले तर प्रेक्षकांना ते नक्कीच आवडेल. पण मग प्रत्येक मैफिलीत ताजेपणा राखणं कदाचित अवघड होईल. प्रेक्षक आमच्या प्रयोगांची ज्या ओढीने वाट पाहतात, ती कदाचित कमी होईल. 'पुन्हा कधी' याची वाट बघण्याची, तयारी करण्याची जी वेगळीच मजा आहे, ती आम्हालाही घेता येणार नाही आणि प्रेक्षकांनाही. त्यामुळे केवळ पैसे मिळवण्यासाठी आम्ही त्याचे भारंभार प्रयोग करत नाही.
तुझ्या डोक्यात सिनेमाचं वेड होतं. तू अगदी मोजक्या भूमिकांतून चित्रपटात दिसला आहेस. त्या भूमिकांचा अनुभव सांग.
नाटक सुरू होतं, त्यामुळे सिनेमात काम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न मी केले नाहीत, आणि समोरून मला आवडतील अशा फार भूमिका मला मिळाल्याही नाहीत. त्यामुळे मी चित्रपटांत अजून स्थिरवलो नाही, पण काही मोजक्याच चांगल्या भूमिका मिळल्याही. मागच्या वर्षी एक 35 मिनिटांची फिल्म केली. तो एक मानसशास्त्रीय प्रयोग होता. कोविड काळात एक माणूस एकटाच एका केस कापण्याच्या दुकानात अनेक दिवस अडकून पडतो आणि त्या ट्रॉमामध्ये त्याचं मन स्वतःच्याच दोन आभासी प्रतिमा निर्माण करतं. तो स्वतः आणि त्याच्या त्या अगदी वेगवेगळ्या आभासी प्रतिमा अशी तिहेरी भूमिका मला करायची होती. आव्हानात्मक काम होतं. त्याबद्दल सखोल विचार, चर्चा आणि मेहनत केली. मजा आली ते करताना. काम केल्याचं समाधान मिळालं. त्याशिवाय चित्तरंजन गिरी यांनी दिग्दर्शित केलेली अवकाश नावाची एक फिल्म केली आहे. अश्विनी गिरी, लक्ष्मी बिराजदार आणि मी - तीनच पात्रांची intense फिल्म आहे. चित्तरंजन यांच्याबरोबर काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे.
सतीश आळेकरांचं महानिर्वाण नाटक नव्या संचात रंगभूमीवर आलं, त्यात भाऊराव ही नायकाची भूमिका तू करतो आहेस. ही भूमिका तुला कशी मिळाली? भाऊराव साकारण्यासाठी तुझी काय प्रक्रिया होती?
आधी महानिर्वाण नाटकाविषयी सांगतो. साधारण 60-70 वर्षांपूर्वीच्या काळातली कथा आहे. भाऊराव नावाचे एक मध्यमवयीन गृहस्थ मरतात आणि शरीराबाहेर त्यांचा जीव स्वतःच्या अंत्यविधीची तयारी पाहत असतो. कुटुंब, नातेवाईक, शेजारी, यांचे स्वतःविषयीचे, मरणाविषयीचे, उत्तरकार्याविषयीचे बोलणे ऐकत असतो, त्यावर भाष्य करत असतो. त्या प्रसंगातून मृत्यूशी संबंधित धार्मिक कर्मकांड, दांभिकता, मानवी भावना यांवर विनोदातून सडेतोड भाष्य करणारं हे नाटक आहे. जुन्या संचात मी अनेकदा पाहिलं होतं. प्रयोग लागला की चुकवूच नये असं वाटायचं. चंद्रकांत काळे भाऊराव करायचे. तसं काम कोणी करूच शकत नाही. त्यांचं भाषेवर, शब्दफेकीवर कमालीचं प्रभुत्व होतं. असं नाटक करायला मिळावं हे सर्व नटांचं स्वप्न असतं. NSD च्या प्रवेश परीक्षेच्या एका फेरीत मी भाऊरावांचा एक प्रवेश करून दाखवला होता आणि त्या बळावर पुढच्या फेरीतही गेलो होतो. आणि पुढे जाऊन मला खरोखरच भाऊराव करायची संधी मिळाली याचा मला खूप अभिमान वाटतो.
ती संधी मिळाली कशी, तर मधल्या काळात मी नाटक कंपनी या संस्थेतून आशुतोष पोतदार यांचं ‘सिंधू सुधाकर रमणीकर’ हे नाटक केलं होतं. त्याच्या एका प्रयोगाला आळेकर सर आले होते. त्यांना आमचं नाटक आवडलं आणि त्यांनी नाटक कंपनीमधून महानिर्वाण करूया असं आम्हाला सांगितलं. ऑडिशन्समधून मला त्यांनी निवडलं. निवड झाल्यानंतर काम सुरू झालं तेव्हा मला ते किती मोठं वैचारिक आव्हान आहे याची जाणीव झाली.
आळेकर सर आम्हाला म्हणाले होते की, “हे एक ऐतिहासिक नाटक आहे असंच डोक्यात ठेवा, कारण तिरडी बांधणे, सगळे लोक जमणे, चाळ, इरसाल चाळकरी, तेव्हाच्या पुण्यातल्या पेठेतल्या भाषेचा लहेजा, त्यातले संदर्भ आपल्यातून गेलेले आहेत.” पण काही नाटकं क्लासिक असतात. घटनांचे तपशील कितीही जुने झाले तरी त्यातला आशय आणि मानवी भावना किंवा प्रवृत्ती जुन्या होत नसतात. महानिर्वाण हे तसं ‘क्लासिक’ नाटक आहे. उदाहरणार्थ, आज तशी मराठी सापडणार नाही पण आत्ताच्या भाषेत तसे इरसाल विचार मांडणारे नक्की असतील. परंपरेच्या उदात्तीकरणाच्या नादात पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात, दुराग्रहाने, कर्मकांडाचं पालन करणारा एक मोठा समूह आहे. त्या समूहाची आणि त्याला आव्हान देणाऱ्या विरोधी समूहाची अशा दोन्ही मानसिकता आज सापडतील. अशा क्लासिक नाटकात नायकाची भूमिका मिळाली - एक नट म्हणून आणखी काय हवं?
शिवाय त्या नाटकात माझ्या तोंडी गाणी आहेत. मी गाणं शिकलेलो नाही पण थोडं गाऊ शकतो. ऑर्गनवादक राजीव परांजपे यांच्याकडे सुमारे तीन महिने गाण्याची तालीम झाली, मग ते नाटक बसलं. 2018 ला विनोद दोशी फेस्टिवल मध्ये ते पहिल्यांदा झालं आणि तेव्हापासून ते अजून चालू आहे.
नाटक असो की फिल्म, भूमिकेसाठी गांभीर्याने मेहनत घेण्यात मजा आहे. काही लोक म्हणतात, खूप तालमी करू नयेत, ताजेपणा उरत नाही. पण मला वाटतं तालमीत काय करायचं, त्यात काय आनंद आहे हे कळलं तर त्या प्रक्रियेचं महत्त्व आणि मजा हे दोन्ही स्पष्ट जाणवतं. लोकांपुढे आपण काय दर्जाचं काम ठेवणार आहोत आणि ते किती काळ लोकांच्या मनामध्ये रेंगाळेल, त्याचा नेमका अंदाज येतो. तो अंदाज घेत तालमी करणं, हीच माझी प्रक्रिया
भविष्यात आणखी काय काम करायची इच्छा आहे? काही ‘dream role’ आहे तुझा?
मला सिनेमामध्येही चांगली भूमिका करायची, लेखन करायची इच्छा आहे. भाषांवर प्रभुत्व कमवायचं आहे. पण मुख्यतः मला अभिनय ही गोष्ट कायम करत राहायची आहे. माझ्या क्षमता वाढवायला वाव देणाऱ्या आव्हानात्मक भूमिका करायच्या आहेत. कोणताही संदेश देण्याचा आटापिटा न करताही लोक आपापल्या बुद्धीने आपापला संदेश घेऊन जातील असं नाटक मला करायला आवडेल.
गॅलिलिओ नावाचं नाटक आहे त्यात गॅलिलिओची भूमिका करायची इच्छा आहे. काळ हा कायम अवघडच असतो पण त्यामध्येसुद्धा निष्ठेने काम करणारे लोक असतात आणि त्या कामाचं पुढे चीज होतंच. गॅलिलिओ तसा होता. त्याची ठाम विज्ञान निष्ठा, संघर्ष, काळाच्या पुढचा विचार हे मला खूप आवडतं. ते दाखवता यावं असं वाटतं.
खूप मोठ्या नाट्यगृहात शेकडो प्रेक्षकांसमोर करण्याचं जे नाटक असतं, त्याच्यापेक्षा 80 प्रेक्षकांच्या समीप रंगमंचावर प्रेक्षकांना अगदी जवळून भिडत ‘उच्छाद’सारखं एखादं नाटक करणं मला व्यक्तिशः जास्त भावतं. नुसते पैसे कमावण्याच्या हेतूने शेकडो प्रयोग करण्यापेक्षा मोजके पण पुन्हा पाहवेसे वाटतील असे प्रयोग करणं याकडे माझा कल जास्त आहे. अशी नाटकं करण्यासाठी मला स्वतःची नाट्यसंस्था सुरू करायची आहे, जी सकस संहितांवर वेगवेगळे प्रयोग करेल.
तू थोडंफार लिहितोस, शॉर्टफिल्म मेकिंगच्या निमित्ताने दिग्दर्शनाचाही अनुभव घेतला आहेस, तू अभिवाचक आहेस, आणि अभिनेताही. पुढे जाऊन तुला लोकांनी काय म्हणून ओळखावं असं तुला वाटतं?
कथा, कविता, कादंबरी हे प्रामुख्याने लेखकाचं माध्यम आहे. ते सादर केलं तर अभिवाचक, सादरकर्ते, दिग्दर्शक हे त्यावर काम करतात, पण लेखकाच्या शब्दाला, त्यातून व्यक्त होणाऱ्या आशयाला तिथे सर्वाधिक महत्त्व असतं, त्या दृष्टीने हे लेखकाचं माध्यम आहे.
सिनेमा ही अनेक कला आणि अनेक तंत्रं यांना एकत्र गुंफून घडवण्याची कला आहे. त्यामुळे त्यात सूत्रधाराला म्हणजे दिग्दर्शकाला महत्त्व जास्त. सिनेमालाही लेखक असतो, अभिनेते असतात, तंत्रज्ञ असतात, पण त्या कलाकृतीवर ठसा दिग्दर्शकाचा असतो. त्यामुळे सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे.
नाटक हे नटाचं माध्यम आहे. नाटकालाही लेखक असतो, दिग्दर्शक असतो, पण प्रेक्षक प्रत्यक्ष अभिनेत्याला बघत असतो. त्याला ऐकत असतो. रंगमंचावर जे प्रत्यक्ष घडत असतं, ते नट घडवत असतो, आणि प्रत्येक प्रयोगाच्या वेळी ते नव्याने घडवतो. त्यामुळे नाटक हे नटाचं माध्यम आहे असं मला वाटतं.
मी नट आहे. सर्व माध्यमांत माझा वावर असावा, त्यांत नाटक प्रमुख असावं आणि नट म्हणूनच माझी ओळख राहावी.
धन्यवाद नचिकेत. तुझ्याशी बोलताना तुझा अभिनयाविषयीचा आदर, अभिमान, भाषेवरचं प्रेम, आणि सतत शिकत राहण्याची वृत्ती जाणवली. तू जे काम करतो आहेस त्यातून तुला आणि आम्हा प्रेक्षकांनाही अधिकाधिक आनंद मिळत राहो ही सदिच्छा!
संवाद आणि शब्दांकन - ऋचा मुळे
kartavyasadhana@gmail.com
Tags: sukhan nachiket devsthali actor urdu mahanirvan satish alekar Load More Tags
Add Comment