'केंद्रात – राज्यात आमचे सरकार व आमच्या गावातही आमचेच सरकार' या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी भारतीय संविधान वाचवणे गरजेचे 

मिलिंद बोकील लिखित ‘मेळघाट : शोध स्वराज्याचा’ या पुस्तकाचे प्रकाशन

सकस म्हणावे असे ललित व वैचारिक या दोन्ही प्रकारचे लेखन मागील दोन अडीच दशके सातत्याने करीत आलेल्या मराठी लेखकांमध्ये मिलिंद बोकील हे नाव अग्रभागी घ्यावे लागते. त्यांच्या सर्व प्रकारच्या लेखनामध्ये अभ्यास व संशोधन तर असतेच, पण त्यांनी निवडलेले बहुतांश विषय आणि त्यातील आशय 'किती जवळ तरीही किती दूर' अशी जाणीव वाचकांच्या मनात उत्पन्न करणारे असतात. मग ते 'जनाचे अनुभव पुसतां' असेल किंवा 'समुद्रापारचे समाज' असेल. गेल्या पाच सात वर्षांत त्यांनी केलेले दोन अभ्यास विशेष उल्लेखनीय व अधिक उपयुक्त म्हणावे लागतील. 'गोष्ट मेंढा गावाची' आणि 'कहाणी पाचगावची'. याच साखळीतील तिसरा अभ्यास म्हणता येईल असे त्यांचे लेखन म्हणजे 'मेळघाट : शोध स्वराज्याचा'. हा अभ्यासही त्यांनी कमालीच्या वाचनीय पद्धतीनेच लिहिला आणि तो कर्तव्यसाधनेवरून लेखमालेच्या रूपाने प्रसिद्ध झाला. 31 भागांची ही लेखमाला कर्तव्य साधनावरून 31 ऑक्टोबर 2020 ते 07 फेब्रुवारी 2021 या कालावधीत प्रत्येक शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होत राहिली. या लेखमालेमुळे वाचकांना एक महत्त्वाचे दालन खुले झाले. ही लेखमाला पुस्तकरूपाने साधना प्रकाशानाकडून आली. या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचा हा वृत्तांत...

महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला मेळघाटची ओळख आहे ती तिथल्या कुपोषणामुळे. बहुतांश वेळा वर्तमानपत्रांमध्ये मेळघाटमधल्या गरिबीच्या, बालमृत्यूंच्या आणि हंगामी स्थलांतराच्या बातम्या कायम येत असतात. मेळघाटमध्ये अनेक स्वयंसेवी संस्था काम करत आहेत. तरी महाराष्ट्राच्या इतर आदिवासी भागांमधल्या सुधारणांचा वेग मेळघाटमध्ये कमी आहे. ठाणे-पालघर जिल्ह्यांमध्ये वारली समाजात किंवा धुळे-नंदुरबार जिल्ह्यांमध्ये भिल्ल समाजात ज्या तऱ्हेच्या चळवळी झाल्या, तशा मेळघाटमध्ये झाल्या नाहीत. तिथे लोकजागृतीचे काम अपुरेच राहिले आहे. 

हे निराशाजनक चित्र 2006च्या वनाधिकार कायद्यामुळे बदलायची शक्यता निर्माण झाली आणि 'खोज'सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांतून तिला चांगला वेग आला. 2018पर्यंत मेळघाटमधल्या दीडशेहून अधिक गावांना वनहक्क मिळाले. या हक्कांमुळे मेळघाटमध्ये जे परिवर्तन झाले त्याचा लेखाजोखा लेखक-अभ्यासक मिलिंद बोकील यांनी 'मेळघाट : शोध स्वराज्याचा' या पुस्तकात मांडला आहे. 

साधना प्रकाशनाकडून आलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन नागपूरच्या विनोबा विचार केंद्र इथे नुकतेच झाले. या वेळी स्वातंत्र्यसेनानी लिलाताई चितळे, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, 'खोज'चे बंडू साने, पूर्णिमा उपाध्याय, रंजीत घोडेस्वार उपस्थित होते.

या वेळी चितळे यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, ‘खोज’ने केलेले कार्य या पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. तुम्ही स्वयंसेवी संस्था म्हणून प्रयत्नरत  असला तरी निर्णय घेण्यास स्वतंत्र नाहीत. तुमच्या प्रयत्नांना अनेक शुभेच्छा देते. खरे तर देश स्वतंत्र झाला. पण नागरिक स्वतंत्र आहेत काय? 'केंद्रात – राज्यात आमचे सरकार व आमच्या गावतही आमचेच सरकार' या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी आधी भारतीय संविधान वाचवणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. 

आदिवासी बांधव समाजाला दाखवत असलेला मार्ग अंगीकारण्याची गरज आहे. मात्र आता मेळघाटची परिस्थिती बदलत आहे, हे सांगण्यासाठी पुस्तक लिहिल्याचे लेखक मिलिंद बोकील  यांनी सांगितले. 'केंद्र – राज्यात आमचे सरकार व आमच्या गावात आमचेच सरकार' याबरोबरच 'आमच्या सरकारवर आमचा अधिकार' अशी स्वराज्याची संकल्पना मेळघाटमध्ये ‘खोज’द्वारे राबवण्यात येत असल्याची माहिती मिळाली. राजे शिवाजी छत्रपती, लोकमान्य टिळक इत्यादींनी स्वराज्याची संकल्पना मांडली. मात्र महात्मा गांधींनी गावे स्वयंपूर्ण होण्यासाठी मांडलेली ग्रामस्वराज्याची संकल्पना या पुस्तकात आहे. 

अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी पुस्तकाविषयी सांगितले की, या पुस्तकात साधी-सरळं कथने आहेत. त्यामुळे वाचकांना पुस्तकातले विचार समजण्यास अवघड जाणार नाही. 'खोज'च्या बंडू साने, पूर्णिमा उपाध्याय, रंजीत घोडेस्वार आणि इतर सहकाऱ्यांनी मेळघाटात केलेले कार्य या पुस्तकात वाचायला मिळेल.’ असे ते म्हणाले.

‘ग्रामस्वराज्याची संकल्पना समजून घेणे व प्रयोग राबविणे यांत फरक आहे. विकासातील अडचणी छोट्या वाटतात पण त्या सोडवण्यासाठी मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. त्याची कहाणी या पुस्तकामधून दिसून येते. पुस्तकात शहरे, खेडी वा आदिवासी भागाची तुलना करून दाखवून दिले की शहरी लोकांनी मागास भागाविषयी संवेदनशील असणे आवश्यक आहे. त्याशिवाय शहरांना 'आम्ही पुरोगामी' असल्याचे म्हणता येणार नाही. जनहिताच्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आठवण करून द्यावी लागते यापेक्षा दुसरी शोकांतिका काय असेल? असा सवाल त्यांनी केला. 

डॉ. बी. डी. शर्मा यांनी 73व्या घटनादुरुस्तीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देताना सांगितले की, आदिवासी समुदायाचा विकास होणे अद्यापही बाकी आहे. 'खोज'चे 'लाइफटाइम' परिश्रम, त्याग आणि प्रयत्न, शिवाय डॉ. मिलिंद बोकील यांनी पुस्तकाच्या माध्यमातून सामाजिक तत्त्वज्ञान व विचार पोहोचवण्याचे केलेले कार्य दखलपात्र आहे.

जोपर्यंत समाज स्वत:चे राज्य निर्माण करत नाहीत तोपर्यंत विकासात अडथळे आणले जातीलच. मुबंई-पुण्यासारखी महानगरे विकासाचे आदर्श नसून मेंढा–लेखा, पाचगाव व मेळघाटातील काही गावेही विकेंद्रित विकासाची खरी प्रारूपे आहेत. मात्र अजूनही त्यांनी आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान यांसाठी अमरावती–नागपूर शहरांकडे यावे असे अपेक्षित असते. देशाची अर्थविषयक धोरणे चुकीची आहेत. कारण त्यांत आदिवासींच्या प्रश्नांचा विचार नाही.

रोमच्या एका खेड्यातील प्रयोगाचा उल्लेख करून शर्मा म्हणाले की, जागतिकीकरणाच्या धोरणात समान संधी मिळेलच असे नाही. कारण त्यात महात्मा गांधी, बुद्ध, मार्क्स यांचे समानतेचे तत्त्व दिसत नाही. 'खोज'सोबत मेळघाटच्या ग्रामसभेने केलेला प्रयोग लेखकाने आपल्या पुस्तकात सूत्रबद्ध पध्दतीने व सोप्या भाषेत मांडलेले आहे. त्यामुळे हे प्रयोग लोकांपर्यंत पोहोचतील असा विश्वास व्यक्त केला. 

या वेळी पायाविहीर ता. अचलपूर या गावातील लक्ष्मी जगदेव यांनी त्यांचे अनुभव व्यक्त केले. त्यात त्यांनी वनहक्क प्राप्तीनंतर गावात रोजगारांची साधने निर्माण झाली. जल संधारणांच्या कामांमधून परिसरात जे परिवर्तन झाले, स्थानिक वनांच्या संरक्षकासोबतच ग्रामवासीयांच्या शिक्षण, आरोग्य आणि उपजीविकेमध्ये कसे आमूलाग्र बदल घडले याचेही अनुभव कथन केले. 

या वेळी मेळघाटमध्ये साथी रंजीतभाई यांचा आयोजन समितीतर्फे सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व भूमिका ॲड. पूर्णिमा उपाध्याय, संचालन प्रा. माधुरी झाडे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन डॉ. वैशाली जावळेकर यांनी केले.


'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे साधना प्रकाशाचे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.


'मेळघाट : शोध स्वराज्याचा' ही लेखमाला वाचण्यासाठी क्लिक करा.

Tags: पुस्तक मेळघाट : शोध स्वराज्याचा मिलिंद बोकील पुस्तक प्रकाशन साधना प्रकाशन वृत्तांत Melghat : Shodh Swarajyacha Milind Bokil Book Publication Report Load More Tags

Add Comment