पिकासो नावाचं मिथक

25 ऑक्टोबर: पिकासोच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने..

चित्रकलेविषयी, चित्रांविषयी जुजबी माहिती असणाऱ्यांनाही पाब्लो पिकासो हे नाव परिचित असतं. जगभरातल्या कलाप्रकारांवर, कलावंतांवर त्याच्या चित्रविचारांचा प्रभाव आहे. 25 ऑक्टोबर हा पिकासोचा जन्मदिवस. 1881 ते 1973 असं प्रदीर्घ आयुष्य लाभलेल्या पिकासोने त्याच्या हयातीत आधुनिक कलेतील अनेक बदलते प्रवाह अनुभवले. त्यात स्वतःच्या निर्मितीने नवे मापदंड निर्माण केले. जगाला भुरळ घालणारं हे पिकासो नावाचं मिथक नक्की काय होतं? भारतीय चित्रकलेत पिकासोच्या शैलीचा प्रभाव नक्की कुठे दिसतो? यावर दृष्टिक्षेप टाकला आहे मंगेश नारायणराव काळे यांनी..

कला-साहित्य-संस्कृतीत ‘मिथकांची घडण’ ही एक महत्त्वाची घटना असते. या मिथकांची निर्मिती त्या त्या काळातील घटितांतून जशी होते, तशीच त्या कलेत काहीएक भर घालू पाहणाऱ्यांच्या चरित्रांतूनही ती होत असते. असेच एक गेल्या शतकातले मिथक-आख्यायिका म्हणजे स्पॅनिश चित्रकार पाब्लो पिकासो! दृश्यकलेच्या आधुनिक कालखंडात इतकी अफाट प्रसिद्धी, यश मिळवलेला दुसरा कोणताच चित्रकार सांगता येणार नाही, एवढी प्रसिद्धी त्याला मिळाली. मागच्या शतकातील 'कल्चरल हिरो' म्हणूनही पिकासोकडे पाहता येईल. 

काही कलावंत हे त्यांच्या पूर्वसुरींनी उभ्या केलेल्या परंपरेत समृद्ध होतात, स्वतःची ओळख निर्माण करतात, यश, प्रसिद्धी, सन्मानही मिळवतात; मात्र काही कलावंत पूर्वसुरींच्या परंपरांना नाकारून, स्वतःची एक परंपरा निर्माण करतात, स्वतःच ती मोडतात आणि अनेक नव्या धारणा जन्माला घालतात. त्यामुळे 'गेल्या शतकातला एक सर्वश्रेष्ठ चित्रकार' एवढयाच मर्यादेत पिकासोकडे पाहता येत नाही. तसंच, त्याने आणि त्याचा समकालीन ब्राकने ज्याचा पाया घातला त्या घनवादाने (cubism) आधुनिक कलेला एक महत्त्वाचं वळण दिलं, एवढ्यावरच त्याचं महत्त्व ठरत नाही. 

जिवंतपणीच एक आख्यायिका झालेला पिकासो, जसा त्याच्या चित्रकलेतल्या प्रयोगशीलतेमुळे, त्यातल्या अफाट यशामुळे ओळखला जातो, तसाच तो त्याच्या चारित्र्यामुळेही. त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया, त्याची लफडी, त्याला असलेलं वलय हे सगळं असूनही पिकासो लक्षात राहतो, तो एक द्रष्टा चित्रकार म्हणून! एक असा द्रष्टा चित्रकार- ज्याने आधुनिक कलेला आपल्यामागे फरफटत नेलं. केवळ समकालीनांनाच नव्हे तर येणाऱ्या पुढच्या अनेक कलाप्रवाहांना त्याने प्रेरणा पुरवली.

आधुनिक कलांमध्ये, दृश्यकलेच्या शंभर-सव्वाशे वर्षांतील द्रष्टे कलावंत म्हणून दोन नावं सांगता येतात. त्यातला पहिला पिकासो आणि दुसरा मार्सेल द्यूंशॉ. मार्सेल द्यूंशॉने कलेतलं ‘रचणं’च नाकारलं आणि ‘रेडिमेड’ वस्तूसुद्धा ‘कलारूप’ म्हणून पाहता येते, हे ठणकावून सांगितलं. पिकासोच्या द्रष्टेपणाचा प्रत्यय देणारी, वस्तू जशी ‘दिसते’ तशी ती रंगवण्यापेक्षा ती जशी ‘असते’ त्याचा वेध घेणारी घनवादी धारणा आधुनिक कलेचा प्रवास अनेकपदरी करणारी ठरली. घनवाद केवळ एक कलाप्रवाह, एक चळवळ नव्हती. वस्तूच्या अनेक मिती शोधण्याच्या कुतूहलातून अमूर्ताकडेही घेऊन जाणारी होती. ‘विरूपीकरण’ ही अतिवास्तववाद्यांना (surrialist) बळ पुरवणारी संकल्पनाही घनवादातूनच आली. पिकासो–ब्राकच्या घनवादाने त्या काळात जगभरातल्या चित्रकलेवरचे गारुड केलं, त्यातून ‘आकृती’चा विलय होत जाऊन अमूर्ताच्या शक्यता ठळक झाल्या. त्याच काळात मूळ धरू लागलेल्या कॅन्डीस्की, पॉलक्लीप्रणित अमूर्ताला (abstract) ही घटना सहाय्यकारी ठरली. असाच द्रष्टेपणा पिकासोच्या कोलाज निर्मितीमध्ये आणि रेडिमेड वस्तूंच्या वापरातून सिद्ध झालेल्या त्याच्या शिल्पामधूनही दिसतो. हजारो चित्रं-रेखाटनं, शिल्प, काष्ठशिल्प, क्युबीस्ट निर्मिती एवढचं नव्हे तर नाटकाचं नेपथ्य आणि कवितालेखन असा त्याचा प्रचंड आवाका होता.

त्याच्या एका कृतीचा उल्लेख या संदर्भात महत्त्वाचा आहे, ती कृती म्हणजे त्यांने केलेलं ‘ग्वेर्निका’ (Guernica) हे अवाढव्य पेंटिंग. कलारूप म्हणून या चित्राचं अतोनात महत्त्व आहेच, पण ही कलाकृती म्हणजे, एका कलावंताने तत्कालीन व्यवस्थेला विचारलेला प्रश्न-प्रतिरोध आहे. युद्धाच्या हेकेखोरपणातून ‘मानव्य’ बेचिराख करू पाहणाऱ्या सत्तेला या कलाकृतीने नुसता प्रश्नच विचारला नाही, तर ‘कोणतीही कला केवळ एक कलारूपच असत नाही; ते प्रतिरोधाचं एक साधनही असतं’ हा मापदंडही निर्माण केला. 

वेगवेगळ्या आदिम संस्कृतीतून आलेली कलारूपं (folk art), हजार वर्षांपूर्वीची आदिमानवाची गुहाचित्रं, पाषाणचित्रं यांची प्रेरणा आजही अनेक कलाकृतींमागे असते. पिकासोची एकूण कलानिर्मिती पाहिली म्हणजे एक लक्षात येतं की, त्याने मानवी संस्कृतीतील या आदिमतेचा सातत्याने पुरस्कार केला. ‘पिकासो आणि भारतीय चित्रकला’ हा व्यूहही या अनुषंगाने पाहता येऊ शकेल. जगभरातल्या अनेक कलावंतांप्रमाणे भारतीय आधुनिक कला व कलावंत यांच्यातही पिकासोच्या कलेचा, त्याच्या वृत्तीचा प्रभाव पाहता येतो. त्यादृष्टीने दोन भारतीय चित्रकारांचा आवर्जून उल्लेख करता येतो, एम एफ हुसेन आणि एफ. एन. सूझा. पिकासोच्या कामाचा आवाका प्रचंड होता. अतिशय वेगवान पद्धतीने, झपाटून काम करण्याची त्याची पद्धत सूझा आणि हुसैनमध्येही पाहता येते. बोल्ड रेषा किंवा ठळक रंग वापरण्याकडे असलेला हुसैनचा कल त्याच्यावरचा ‘पिकासो इफेक्ट’ दर्शवणारा आहे. एका विशिष्ट वर्तुळातपर्यंतच मर्यादित असलेली भारतीय आधुनिक चित्रकला त्याने फ्रंटवर आणली. कलाबाजारातलं तिचं महत्त्व वाढवलं. कधीकाळी सिनेमाची पोस्टर्स, साईन बोर्डस् रंगवणारा हुसैनसुद्धा त्याच्या जिवंतपणी एक आख्यायिका बनूनच वावरला. त्याचं अनवाणी राहणं, त्याची वादग्रस्तता, पेज थ्री कल्चरमध्ये असलेला वावर, सिनेमा माध्यमातली लुडबुड, शेवटच्या काळात स्थलांतरित होणं, हे सगळं ‘पिकासो कल्ट’ दर्शवणारं होतं. कदाचित यामुळेच हुसैनला ‘भारताचा पिकासो’ म्हटलं गेलं.

पिकासोच्या प्रभावाखाली असणारा दुसरा भारतीय चित्रकार म्हणजे, एस. एन. सूझा. अतिशय उघडी-वाघडी अभिव्यक्ती, स्त्रीची- प्रसंगी भीती वाटावी अशी – उन्नत, आक्रमक आणि विरूपित रूपं हे त्याचं वैशिष्ट्यं. तो हुसैनचा समकालीनच होता. हुसैनप्रमाणे त्याचं चरित्रही बरंचसं वादळी होतं. या काळात भारतीय आधुनिक कलेत विरूपित जग सूझाने जितकं रंगवलं, तेवढं क्वचितच दुसऱ्या भारतीय चित्रकाराने रंगवलं आहे. विरूपतेचा प्रभाव घनवादी कालखंडातील पिकासोच्या अनेक चित्रांतून जगभर पसरला होता. पण सूझाने तो केवळ शारीर पातळीवर न ठेवता, मानवी मन आणि त्याच्यातली कुरुपता या टोकावर नेऊन उभा केला. असं म्हणता येईल की, पिकासोला हाडा-मांसाच्या जिवंत व्यक्तीला अनेक कोनांतून रंगवायचं होतं, तर सूझाला मानवी मनातील कुरुपतेला! जगात जे जे सुंदर आहे, त्याच्या दुसर्‍या टोकाला असणाऱ्या कुरूपतेचं सौंदर्यशास्त्र त्याला रचायचं होतं आणि त्याने ते पुरेपूर रचलंही. 

भारतीय आधुनिक कलेत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या या दोन मोठ्या कलावंताच्या चित्रांमध्ये, जगण्यामध्ये असणारा ‘पिकासो इफेक्ट’ पिकासोच्या दृष्टीची व्यापकता दाखवणारा आहे. ‘पिकासो नावाचं मिथक’ ठळक करणारा आहे.

- मंगेश नारायणराव काळे
mangeshnarayanrao@gmail.com

(मंगेश नारायणराव काळे हे कवी, चित्रकार आणि 'खेळ' या नियतकालिकाचे संपादक आहेत.)

 

Tags: चित्रकला painting Mangesh Kale मंगेश काळे पिकासो Load More Tags

Add Comment