समारोप

स्त्री चळवळीची सामाजिक परिणामकारकता आणि युवा भान प्रकल्पावरील लेखमाला : 12/12

या पिढीला शांत, समाधानी आयुष्य जगायचे असेल, तर खूप वैचारिक गृहपाठ करणे आवश्यक आहे. कारण एक स्त्री म्हणून किंवा पुरुष म्हणून जगण्याचे जे पारंपरिक प्रारूप अगदी 30-40 वर्षांपूर्वी चालून जात होते, ते आता निकामी झाले आहे. मुलभूत मानवी हक्कांना सामाजिक जीवनात जे मध्यवर्ती स्थान प्राप्त झाले आहे, त्याने - स्त्री असो वा पुरुष - प्रत्येकास सर्वप्रथम स्वत:चा आणि दुसऱ्यांचा स्त्री किंवा पुरुष म्हणून नाही, तर माणूस म्हणून स्वीकार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पण तसे करण्यास आपल्या रूढी-परंपरांनी किंवा प्रचलित शिक्षण पद्धतीने शिकवलेले नाही. आतापर्यंत झालेले शिक्षण पुसून टाकून नव्याने मनोभूमी तयार करून नवीन विचारांचे बीज रुजवण्याचे मुलभूत काम या पिढीस अगत्याने करावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना कुठली ना कुठली समन्यायी विचारांनी चालणारी सामाजिक चळवळ उपयोगी पडू शकते.

मागील 11 लेखांमध्ये आपण स्त्री चळवळीचे युवा पिढीला काय परिणाम जाणवतात हे त्यांच्याच शब्दांत जाणून घेतले. त्यांनी मांडलेल्या विचारांवर स्त्रीवादाच्या दृष्टिकोनातून टिप्पणी केली. ते करताना त्यांच्या तक्रारी, आक्षेप, गाऱ्हाणी, संभ्रम यांची संवेदनशीलतेने दखल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या विचारांमध्ये काही विसंगती असेल, वास्तवाचे पुरेसे भान प्रतिबिंबित होत नसेल, परंपरेतून येणारी साचेबद्ध आणि अन्याय्य मूल्यव्यवस्था डोकावत असेल, तर त्याचीही चिकित्सा केली.

सदर अभ्यास प्रकल्प पूर्ण केल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे लिंग-विषमतेचे ऐतिहासिक, सांस्कृतिक, मानसिक आणि राजकीय दृष्टिकोनातून जे विश्लेषण स्त्रीवादाने वेळोवेळी केले, ते - तुरळक अपवाद वगळता - या पिढीस अजिबात ठाऊक नाही. जीवनाचा गुंता निर्माण होण्यामागे मोठ्या प्रमाणात लिंगाधारित सत्ताकारण असते, याची फारशी जाण तरुण-तरुणींना नाही. म्हणूनच हा गुंता सोडवण्यासाठी स्त्रीवाद उपयोगी पडू शकेल याचेही त्यांना भान नाही. असे असूनही स्त्रीवादी चळवळींमुळे आपले आयुष्य खूप बदलले आहे हे मात्र त्यांना उमजते आहे. त्यांना बोलते केल्यावर आपण स्त्री चळवळीचे लाभार्थी आहोत, हे ते मान्य करत आहेत. लिंग-विषमता व्यक्तिगत पातळीवर अनुभवास आल्यावर तिचे परिमार्जन व्यक्तिगत पातळीवर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु त्यासाठी व्यवस्थाबदल गरजेचा आहे, अशा बदलासाठी चळवळ करावी लागते व चळवळीस लोकाश्रय लागतो, याची जाणीव त्यांना नाही.

बदलांचे भान नसले, तरी घडून आलेल्या बदलांचे परिणाम समाजावर होत असतातच. स्वत:च्या नकळत प्रत्येक व्यक्ती ते बदल शोषून घेत असते, आपापल्या परीने पचवत किंवा अव्हेरत असते. स्त्री चळवळीच्या परिणामी समाज लिंग-विषमतेबाबत संवेदनशील झाला आहे, हे नक्की. आपल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सर्व तरुण-तरुणींना लिंग-समानता तत्वत: मान्य आहे. पण ही समानता विचारपूर्वक आचरणात उतरवण्याची आस फार थोड्यांना दिसली. आपली वर्तणूक स्त्री-पुरुषांसाठी समन्यायी करायची तर शतकानुशतके लिंग-विषमतेवर जोपासलेली मूल्ये, योग्य-अयोग्य, नैतिक-अनैतिक यांच्या व आदर्शत्वाच्या कल्पना अडसर ठरतात याची जाणीव फार थोड्यांना आहे. ती करून देणे हेच तर चळवळीच्या वैचारिक नेतृत्वाचे काम असते. त्याच वेळी जुन्या मूल्यव्यवस्थेतील जे जे शाश्वत, न्याय्य; ते का जतन करायचे, वैयक्तिक जीवनात लिंग-समानता जोपासताना उद्भवणाऱ्या व्यावहारिक अडचणींना वळसा घालून कसे पुढे जायचे, हेपण समजून घ्यावे लागते. अन्यथा हाडीमांसी मुरलेल्या विषमतेवर केवळ पोशाखी समानतेचा वर्ख चढला, तरी हुरळून जायला होते. ते टाळायचे असेल, तर समानतेच्या आणि विषमतेच्या अनेकानेक पैलूंची चिकित्सा खोलात जाऊन करावी लागते. आजच्या युवा पिढीसाठी अशा चर्चा विविध माध्यमांवर उपलब्ध आहेत, परंतु त्या समजून घेण्याकडे युवकांचा कल दिसला नाही. तेवढा त्यांना वेळ नाही आणि तशी मानसिकताही तयार झालेली नाही. चित्रपट, लघुपट, युवा कलाकारांचे एकपात्री प्रयोग अशा माध्यमांद्वारेच हे विचार तरुणांपर्यंत पोचू शकतात. सुदैवाने ही माध्यमे प्रभावीपणे हाताळणाऱ्या युवकांची संख्या लक्षणीय आहे असे दिसते आहे.

सदर अभ्यास प्रकल्पातील एक महत्त्वाचा उद्देश होता, युवा पिढीच्या समस्या जाणून घेणे! कामाच्या जागी स्त्री-पुरुषांचा एकत्र वावर, पती-पत्नी नातेसंबंध, विवाह सोहळा, अपत्यप्राप्ती, बालसंगोपन या मुद्द्यांबाबत तरुण-तरुणींना कोणत्या समस्या भेडसावतात, हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. वैयक्तिक पातळीवर भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे मूळ सामाजिक व्यवस्थेत असते. आणि म्हणून व्यवस्थेत बदलाचा आग्रह धरणे आवश्यक ठरते हा त्यामागे विचार होता. आपल्या उत्तरदात्यांचा वयोगट 28 ते 38 वर्षे हा होता. साहजिकच मूल होऊ द्यायचे का? कधी होऊ द्यायचे? झाल्यावर बाळाला कोण सांभाळणार या विवंचना अनेक तरुण-तरुणींपुढे आ वासून उभ्या होत्या. मूल झाल्यावर आपल्याला नोकरी सोडावी लागणार या आशंकेने अनेक तरुणी धास्तावल्या होत्या. या साऱ्या जणी सुपातल्या; पण जात्यातल्या तरुणींची संख्यासुध्दा लक्षणीय होती! त्या मुलांसाठी नोकरी सोडून पूर्ण वेळ गृहिणी झाल्या होत्या आणि आपले अर्थार्जन थांबले, शिक्षणाचा उपयोग करता येत नाही, सामाजिक जीवन पूर्ण संपले म्हणून खंतावत होत्या. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर तर होतच आहे, पण त्यांच्या नातेसंबंधावरपण तो होताना दिसला. पत्नीला नोकरी सोडावी लागली, त्यातच मुलाचापण खर्च वाढला. सर्व आर्थिक जबाबदारी एकट्यावर पडल्याने ओढाताण होते, असे बोलणारे युवकही आढळले.

एकंदरीत बाल सांभाळ केंद्रे ही आपल्या समाजात अत्यंत कळीची पण तेवढीच दुर्लक्षित गरज आहे, हे पुनश्च एकदा समोर आले. ही गरज भागवणे ही जेवढी पालकांची जबाबदारी आहे, तेवढीच शासनाचीसुध्दा आहे, हा विचार तर आपल्या देशात अस्तित्वातही नाही. स्त्री चळवळीने पाळणाघरांच्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्याचे वारंवार प्रयत्न केले, पण त्याला अजिबात यश आले नाही. महाराष्ट्र सरकार या क्षणी राज्याचे महिला धोरण नव्याने नक्की करत आहे. त्यातसुध्दा शासनपुरस्कृत पाळणाघरांची योजना असावी, तसे अभ्यासक्रम शिक्षण संस्थांनी सुरु करावेत अशी मागणी केली आहे. पण जोपर्यंत लोकइच्छेचा रेटा वाढत नाही, तोपर्यंत शासन ही मागणी गांभीर्याने घेणार नाही, हे नक्की. म्हणूनच युवा पिढीने या बाबतीत अधिक सजग राहून स्त्री चळवळीचे हात बळकट करणे गरजेचे आहे. बाल सांभाळ सुविधेच्या अभावाचा थेट संबंध रोजगार प्रक्रियेतून स्त्रिया बाहेर फेकल्या जाण्याशी, स्त्रियांच्या दरिद्रीकरणाशी, बालकांच्या आहार व आरोग्याची हेळसांड होण्याशी असतो. म्हणूनच कमावती स्त्री कोणत्याही स्तरातील असो, प्रत्येक स्तरातील मातेसाठी सुलभ बाल सांभाळ केंद्र उपलब्ध करून देणे ही शासनाचीच जबाबदारी आहे. शासन ती उचलत नसल्याने शिकून अर्थार्जन करणारी स्त्री पुनश्च राष्ट्रीय उत्पादन प्रक्रियेबाहेर फेकली जाऊन चुलीपुढे अडकते आहे.

समुपदेशन सेवा (काउन्सिलिंग) सहजी, विशेष करून ऑनलाईन उपलब्ध व्हावी हीसुध्दा युवकांनी व्यक्त केलेली मागणी आहे. अशी सेवा काही संस्था देत आहेतच. ती वाढवणे अवघड नाही. पण व्यावसायिक काउन्सिलरकडे जाऊन समुपदेशन घेण्याविषयी तरुणांमध्ये जो मानसिक अडसर दिसून येतो, त्यावर प्रबोधन करणे वाटते तेवढे सोपे नाही. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सहा तरुणींनी खंत व्यक्त केली की, अनेकवार सांगूनही त्यांचा जोडीदार काउन्सिलरकडे येण्यास तयार झाला नाही. अखेरीस त्या एकट्याच समुपदेशकाकडे गेल्या. एका तरुणाने मत व्यक्त केले की, समुपदेशक नेहमी स्त्रियांचीच बाजू घेताना दिसतात त्यामुळे समस्या गंभीर असूनही तो समुपदेशकाकडे गेला नाही. त्याच्या या वक्तव्यावर त्रयस्थ व्यक्ती काही भाष्य करू शकत नाही. कारण त्याच्याच वर्तणुकीतून पुरुषश्रेष्ठत्व ओथंबत होते की त्याची जोडीदार वा पालक समंजस/असमंजस होते की समुपदेशकाची वृत्ती पूर्वग्रहदूषित होती हे आपणास कसे कळणार? या उलट दुसरा एक तरुण म्हणाला की, तो खूप स्वावलंबी आहे, त्याला स्वत:च्या अडचणी कुणाबरोबर शेअर करायला आवडत नाही. यावरून ‘स्वावलंबन’ या संकल्पनेविषयी काही सुशिक्षित तरुणांमध्ये किती गैरसमज आहेत, हे लक्षात येते.

स्त्रिया खूप वैयक्तिक बोलतात, घरच्या कटकटी सांगत बसतात त्याचा कंटाळा येतो अशी तरुणांची तक्रार दिसली; तर पुरुष कितीही मोठा सल मनात असला तरी तो शेअर करत नाहीत, अशी तरुणींनी खंत व्यक्त केली. यावरूनही आपण मुलांना सहजीवनासाठी भावनिकदृष्ट्या तयार करत नाही, हे दिसून येते. हाच नेमका युवा पिढीसमोर मोठा प्रश्न आहे. कारण स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने शिकून अर्थार्जन करू लागल्या, त्यांच्याबरोबर प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा करू लागल्या त्यामुळे स्त्री-पुरुषांमधील भावनिक नाते अधिक गुंतागुंतीचे झाले आहे असे 80% उत्तरदात्यांचे मत पडले. एकीकडे हेच उत्तरदाते म्हणाले की, स्त्री शिक्षण, स्त्री चळवळ यांमुळे स्त्री-पुरुष संबंधात मोकळेपणा आला आहे. त्यांच्यामध्ये सहसंमतीने होणाऱ्या विवाहपूर्व लैंगिक संबंधात वाढ झाली आहे. त्याच वेळी 50 टक्के तरुण-तरुणीच्या मते एकमेकांच्या सहवासात पोलिटिकली करेक्ट वागण्या-बोलण्याचा ताणही त्यांना जाणवतो आहे. याचा अर्थ एकच. स्त्री-पुरुषांमधील वैयक्तिक आणि व्यावसायिक नात्याला अनेक नवनवे आयाम निर्माण झाले आहेत व त्या सर्वांचे भान ठेवून स्वत:ची वागणूक ठरवण्याचा ताण तरुण पिढीला जाणवतो आहे. यावर ताबडतोबीचा काहीही उपाय उपलब्ध नाही. जो आहे, तो दीर्घ मुदतीचा आहे. यापुढे स्त्री-पुरुषांचा एकत्र वावर (मग तो घरात असो, वा घराबाहेर) सौहार्दपूर्ण किंवा किमान संघर्षविहीन हवा असेल, तर पालकांना आपल्या पाल्यांच्या भावनिक बुद्ध्यांकाकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. थोडक्यात स्त्री-पुरुष समानतेची चळवळ ही सुजाण पालकत्वाची चळवळ व्हायला हवी.

आजची तिशीतील पिढी ही जागतिकीकरणाच्या वातावरणात लहानाची मोठी झालेली पिढी आहे. तिची आवड-निवड, आहार-विहाराच्या सवयी, चूक-बरोबरच्या, मौजमजा-काम-आरामाच्या कल्पनांवर जगभरच्या विचारांचा प्रभाव आहे. या उलट त्यांच्या पालकांची पिढी ही पारंपरिकता आणि आधुनिकता अशा कैचीत अडकलेली आहे. परिणामी या पिढीचे आई-वडिलांबरोबर होणारे वैचारिक मतभेद फार तीव्र आहेत. जोडीदाराची जात/धर्म, लग्न करणे/न करणे, विवाह सोहळ्याचे स्वरूप व त्यावरील खर्च, घरकामाच्या जबाबदाऱ्या, मूल होऊ देणे/न होऊ देणे याविषयीची तरूण पिढीची मते पालकांच्या पचनी पडणे अवघड जात आहे. त्यामुळे सांधेबदलाचा हा काळ युवक आणि त्यांचे आईवडील या दोघांसाठीही भावनिकदृष्ट्या खूप कसरतीचा ठरत आहे असे जाणवले.

युवा आणि त्यांचे पालक यांबाबतीत प्रकर्षाने जाणवलेली आणखी एक बाब म्हणजे वयाची साठी गाठलेल्या शहरी पालकांमध्येसुध्दा काही प्रमाणात व्यक्तिवाद, स्वतंत्र जीवनशैली रुजलेली दिसून येत आहे. याचे फायदे आहेत तसे तोटेदेखील आहेत. असे पालक युवा पिढीच्या वैयक्तिक निर्णयांत ढवळाढवळ करत नाहीत. पण त्याच वेळी स्वत:च्या आयुष्याची घडी विस्कटून तरुण पिढीच्या मदतीला वाहूनही घेत नाही. परिणामी अनेक तरुण जोडप्यांना कुटुंबातून आधार मिळेनासा झाला आहे. त्याची अधिक किंमत तरुणींना मोजावी लागत आहे, कारण बालसंगोपनाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर पडल्याने त्यांचे अर्थार्जन धोक्यात येत आहे. म्हणूनच समाजाची बदलती मानसिकता लक्षात घेऊन बाल सांभाळ केंद्रे व्यापक यंत्रणेतच समाविष्ट करणे ही काळाची गरज झाली आहे. ‘मी-माझे’ ही वृत्ती युवा पिढीत वाढली आहे, असे आपल्या खूपशा उत्तरदात्यांचेच मत आहे. त्यामुळे; व आयुष्याला वेग आल्यामुळे दुसऱ्यासाठी फार काही करणे या पिढीला शक्य नाही. पण म्हणूनच खात्रीच्या आधार यंत्रणा निर्माण करण्यासाठी त्यांना अधिक सजग राहून पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्याकरिता व्यवस्थेत बदल आणि व्यवस्थेतील बदलासाठी जनमताचा रेटा हेच कामी येते. परंतु तशी जाणीव त्यांमध्ये आढळली नाही.

ही पिढी ऐकती-बघती आहे, पण फारशी वाचती नाही. तिच्यापर्यंत महत्त्वाचा विचार पोचवायचा असेल, तर दृश्य माध्यमास पर्याय नाही. वृतपत्र पुरवण्या आणि अगणित पुस्तके लिंग-समानतेच्या विचारांची सातत्याने मांडणी करत असूनही एखाद-दुसरा अपवाद वगळता आपल्या उत्तरदात्यांना स्त्री चळवळीविषयी प्राथमिक माहितीसुध्दा नव्हती. चळवळीचे जे काही विचार त्यांच्यापर्यंत पोचले आहेत, ते मुख्यत्वे चित्रपट, लघुपट, प्रसिध्द व्यक्तींच्या मुलाखती अशा दृक्श्राव्य माध्यमांमधून पोचले आहेत. याचा अर्थ सर्वच सामाजिक चळवळींनी हे बदलते वास्तव लक्षात घेऊन स्वत:च्या कार्यपद्धतीत बदल करणे गरजेचे आहे.

या पिढीला शांत, समाधानी आयुष्य जगायचे असेल, तर खूप वैचारिक गृहपाठ करणे आवश्यक आहे. कारण एक स्त्री म्हणून किंवा पुरुष म्हणून जगण्याचे जे पारंपरिक प्रारूप अगदी 30-40 वर्षांपूर्वी चालून जात होते, ते आता निकामी झाले आहे. मुलभूत मानवी हक्कांना सामाजिक जीवनात जे मध्यवर्ती स्थान प्राप्त झाले आहे, त्याने - स्त्री असो वा पुरुष - प्रत्येकास सर्वप्रथम स्वत:चा आणि दुसऱ्यांचा स्त्री किंवा पुरुष म्हणून नाही, तर माणूस म्हणून स्वीकार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पण तसे करण्यास आपल्या रूढी-परंपरांनी किंवा प्रचलित शिक्षण पद्धतीने शिकवलेले नाही. आतापर्यंत झालेले शिक्षण पुसून टाकून नव्याने मनोभूमी तयार करून नवीन विचारांचे बीज रुजवण्याचे मुलभूत काम या पिढीस अगत्याने करावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना कुठली ना कुठली समन्यायी विचारांनी चालणारी सामाजिक चळवळ उपयोगी पडू शकते. ज्यांना हे कळले आहे आणि वळतेपण आहे, ते बदलत्या वास्तवाचा अन्वय यशस्वीपणे लावू शकत आहेत, असे दिसून आले. या उलट जे फक्त वैयक्तिक विकासासाठी सर्व वेळ आणि शक्ती घालवत आहेत, त्यांच्या पदरी निराशा येण्याची दाट शक्यता आहे. याचे कारण आपल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींच्या समस्या भौतिक कमी आणि भावनिक जास्त आहेत. त्यावर सकारात्मक भावनांचा विकास करून अधिकाधिक समाजोन्मुख होणे हा एक चांगला उपाय ठरू शकतो.

अखेरीस एक बाब आवर्जून नमूद करावी असे वाटते. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या युवक-युवतींनी लंब्याचौड्या प्रश्नावलीला न कंटाळता मनापासून उत्तरे दिली. मुख्य म्हणजे विचारलेले प्रश्न गांभीर्याने घेतले. चळवळीविषयी ज्या आशंका किंवा तक्रारी होत्या, त्या न संकोचता व्यक्त केल्या. संशोधनाकडे त्यांनी गांभीर्याने पाहिले. चळवळीवर टीका जरूर केली, पण तिची कुचेष्टा करून तिचे नगण्यीकरण केले नाही. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या अनेकांनी त्यांना स्त्री चळवळीवर बोलते केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते करणाऱ्यांत युवती होत्या, तसेच युवकही होते. स्त्री चळवळीमुळे शिक्षित, कमावती, जागरूक आई मिळाली व त्याने आमचे आयुष्य खूप सुलभ झाले हे त्यांनी आवर्जून सांगितले. या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे आमची आई, आजी, बहीण शिक्षित असत्या तर आमचे आयुष्य खूप सुकर झाले असते अशी खंतही ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या अनेक तरुणांनी बोलून दाखवली. यावरून संपूर्ण समाजाने एक धडा घ्यायला हवा. स्त्री शिक्षण आणि अर्थार्जन यांचा फायदा स्त्रियांना तर होतोच पण तेवढाच तिच्या पुढील पिढीला होतो. व म्हणूनच स्त्रीच्या शिक्षणाला अडसर ठरेल त्या मुद्द्यांना विरोध करायला हवा. स्त्रीच्या अर्थार्जनात आडकाठी ठरणाऱ्या कारणांचे अगत्याने परिमार्जन करायला हवे. ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ ही केवळ शासकीय घोषणा नाही. ते वास्तव आहे, हे आपल्या उत्तरदात्यांनी सप्रमाण सिध्द केले आहे.

आजच्या समारोपाच्या लेखात मी माझ्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सर्व उत्तरदात्यांचे, त्यांच्या मुलाखती घेणाऱ्या सहा डेटा कलेक्टर्सचे, सर्वेक्षणात वापरलेली प्रश्नावली तयार करताना मोलाचे सल्ले देणाऱ्या, ‘गोखले इन्स्टिट्यूट’च्या प्राध्यापिका डॉ. अंजली राडकर आणि डेटा कलेक्टर्सचे प्रशिक्षण करणाऱ्या डॉ. चारुता गोखले यांचे मनःपूर्वक आभार मानते. लेखमाला सुरु झाल्यानंतर काही वाचकांनी त्यावर आवर्जून लेखी कमेंट्स लिहिल्या. काहींनी इमेल आणि फोनवर संपर्क साधून त्यांच्या प्रतिक्रिया कळवल्या. त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवरून अशा संशोधनाचे काय मोल आहे, हे समजले. स्त्री चळवळीला अभिप्रेत असे समतावादी विचार अनेकांना पटत आहेत हे कळल्याने संतोष वाटला. गेली अनेक वर्षे, अनेक ठिकाणी, अनेक व्यक्ती परिवर्तनवादी चळवळींना यथाशक्ती हातभार लावत आहेत. त्यांचे श्रम वाया जात नाहीत, हा दिलासा हाती घेतलेल्या अभ्यास प्रकल्पातून आणि त्यावर लिहिलेल्या लेखमालेतून मिळाला. त्याबद्दल माझ्या वाचकांची मी ऋणी आहे.

साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, 'कर्तव्य साधना'चे  उपसंपादक समीर शेख यांनी माझ्या अभ्यास प्रकल्पांत प्रथमपासून रस दाखवला आणि त्यावरील निरीक्षणांवर लेख लिहिण्यास तत्काळ संमती दिली याबद्दल त्यांचे मन:पूर्वक धन्यवाद. कालांतराने ‘कर्तव्य साधना’चा उपसंपादक सुहास पाटील याने दर आठवड्याला लेख लावण्याची, मी सांगितलेल्या सूचनांनुसार लेखांमध्ये थोडेफार बदल करण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडली. त्याचेही आभार.

सर्वात शेवटी एकच सूचना करावीशी वाटते. या लेखमालेवर आलेल्या सर्व प्रतिक्रिया अनुमोदनाच्या आणि कौतुकाच्या होत्या. त्या बरोबरीने काही टीकात्मक प्रतिक्रिया आल्या असत्या, तर माझ्या नजरेतून सुटून गेलेले काही पैलू निदर्शनास आले असते. चळवळ अधिकाधिक सर्वंकष, प्रगल्भ होण्यासाठी अशा टीकेची गरज असते. 

- करुणा गोखले 
karunagokhale@gmail.com 
(मराठी लेखिका, अनुवादक, संपादक व स्त्रीमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या / विश्वस्त)


स्त्री चळवळीची सामाजिक परिणामकारकता आणि युवा भान प्रकल्पावरील लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Tags: स्त्री मुक्ती लेखमाला स्त्री स्वातंत्र्य करुणा गोखले स्त्री विषयक चिंतन युवा Load More Tags

Add Comment