वास्तवतेच्या गर्भातलं सत्य : काळ्या निळ्या रेषा

लेखक, चित्रकार राजू बाविस्कर यांच्या आत्मचरित्राचा परिचय

हे आत्मकथन वाचताना यातली व्यक्तिचित्रणं, भाषासौंदर्य, वर्णनशैली, निसर्गवर्णन, नाटयमयता, मानवतावाद, वैचारिकता या साऱ्यांवर साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनाचा प्रभाव जाणवतो. त्यांचा वारसा पुढे नेण्याचं काम लेखकाने प्रभावीपणे केलं आहे असं म्हणावंसं वाटतं. यात विषयनाविन्य तर आहेच, शिवाय प्रसंग मांडणीला असणारी वाचनियता गतिमान होताना दिसते. कुठलंही प्रकरण रटाळ होत नाही. त्यातली वाङ्मयीन मूल्यं अद्भूत आहेत. 

शरीराच्या सर्व भागात आपलं गाव वसलेलं असतं आणि ते दिसत राहतं स्वतःला. जेव्हा शरीराच्या एक एक अवयवात तिथल्या चांगल्या-वाईट गोष्टीची पेरणी होत असते, तेव्हा तीच पेरणी उगवून येत असते. सुख-दुःखाचं झाड होऊन आपल्याच मातीला घट्ट धरून फक्त तिचा राखणकर्ता स्वतःला व्हावं लागतं. मग कधी ते नुकतंच सकाळचं कोवळं ऊन पडून गेलेल्या, हलकेसे हलणाऱ्या पिवळ्या-पिवळ्या, सोनेरी गवतासारखं दिसतं तर कधी हिरवंगार रान होऊन आतल्या आत वाढणारं असतं. कधी कधी आपण अंधार आणि उजेडही होतो त्या मातीचा. आज मी जेव्हा कधी अंधाराच्या पाठीवर बसून गावाकडे येतो, तेव्हा दु:ख चाटून पुसून खाणारी रात्र खोकलत असते झोपड्यांमधून (झडी, पृ. 111)

आम्ही लहान लहान हातांनी माती कोरली की कोणत्याही जागेवर झिरं फुटायचं. त्याने पहाडात जाणाऱ्या-येणाऱ्यांची तहान भागायची. हे गाव, त्या सातपुडा डोंगररांगा, तिथली माती वाहून आली आहे त्या पावसासोबत. त्या पावसाने जात, धर्म न पाहता थेट गरिबीशी युद्ध पुकारलं होतं. पाऊस सुरु झाला की ती झडी माझ्या आत वाढू लागते. आठवणींच्या अनेक झऱ्यांतून मी शोधत राहतो माझ्या गावाचा हात. त्यानं सावरले होते सर्वांच्या गरिबीला जीवघेण्या झडीतून. आज तो हातही दिसत नाही आणि ती झडीही नाही (झडी, पृ. 138)

हे उतारे वाचल्यावर तुम्ही बुचकळ्यात पडला असाल ना? मीही असाच बुचकळ्यात पडलो, ‘काळ्या निळ्या रेषा’ हे राजू बाविस्कर यांचं आत्मकथन वाचताना. मी क्षणभर थक्क झालो, कारण राजू बाविस्कर हे मांग जातीत जन्मलेले... नि मग हे आत्मकथन म्हणजे धर्माबद्दल, इतर जातींबद्दल नाहक घृणा, द्वेष, काहीसा मत्सर असलं काही असावं. कंठशोष होईपर्यंत उर बडवणं, जातिवादातून आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यात असणार वाटलं. पण ते वाटणं वाटणंच राहिलं, (आजवर प्रकाशित दलित आत्मकथनं वाचून तसं वाटणं स्वाभाविक आहे.) पण त्या परिघाबाहेरचं असं हे स्वकथन म्हणावं की ललितगद्य की व्यक्तिचित्रण अशी सारी संभ्रमावस्था हे पुस्तक वाचताना होते. मात्र या लेखनाचं बलस्थान आहे, लेखकाने जपलेलं वाङमयीन मूल्य, घटना-प्रसंगांची नेमकी समज, अवाजवी फापटपसाऱ्याची सावरलेली मोळी..

जीवनाकडे सकारात्मकपणे नि डोळसपणे बघत संयत जीवनपट उलगडणारं हे पुस्तक त्या अर्थाने एका बँड कलावंताचं जीवन नि आंतरराष्ट्रीय दर्जा लाभलेल्या एका चित्रकाराचा जीवनपट आहे. त्यात संघर्ष जरूर आला आहे. वाचकांच्या विचारांची कक्षा रुंदावणारं, माणूसपणाची चौकट अधिक समृद्ध करणारं असं हे आत्मकथन प्रत्येक संवेदनशील माणसाने अवश्य वाचलं पाहिजे. आपल्या आयुष्याच्या जगण्यातल्या काळ्या-निळ्या रेषा यामुळं आणखी गडद होतील. सुबोध, अनलंकृत भाषा ही त्याची बलस्थानं तर आहेतच परंतु प्रत्येक प्रकरण वाचताना लेखकाच्या संवेदनेचा पोत ध्यानात येतो. आपण जे जगलो, त्या जगण्यात सांगीतिक लय नसावी. लय वाचकांना गुंगवते, रमवते याचं पुरतं भान ठेवत सजगपणे वास्तवाच्या अवधानाची वाढलेली केंद्रं अचूक टिपत आपल्या मनाचा किंवा संवेदनाचा तुकडा एकेका अवधानासाठी ते देऊ करतात. वास्तवाच्या गर्भात खोलवर दडलेलं सत्य शोधण्याचा चित्रकार म्हणून त्यांचा असणारा मूळ पिंड यात ठशीव ठसलेला दिसतो. यातली त्यांच्या भवताली असणारी त्यांच्या जीवन जगण्यात हातात हात घालून वावरलेली माणसं नि त्यांचं दुःख, वेदना, गरिबी, दारिद्र्य यास्तव त्यांच्या जगण्याची झालेली ससेहोलपट बुद्धिवादी, सेक्युलर म्हणवणाऱ्या लोकांचा मुखवटा टराटरा फाडते. पण त्यासाठी व्यक्तिगत दोषारोप न करता परिस्थितीचं भान जपत ते चित्रण सुरेख रेखाटलेलं आहे. 

लेखकाचा जीवनप्रवास नि त्या प्रवासातले साथी यांची सांधेजोड करताना वास्तव घटना, माणूस आणि त्याचं जगणं, त्या जगण्यातली आस्वादकता, नैतिकता, जीवनमूल्ये, समस्या, गरिबीची दाहकता, भूक शमवण्यासाठी करावी लागणारी धडपड, तिचं भयावह स्वरूप नि झगडा या साऱ्यांचे टीपकागदाने टिपलेले वेगवेगळे विषय, आशयातून सहजगत्या उलगडलेला सम्यक विचार... आणि तरीही 412 पानांचं हे पुस्तक उरावर धोंडा असल्यासारखं वाचकाला वाटू न देण्याचं सारं श्रेय लेखकाच्या फुलारलेल्या भाषाशैलीला, आशयाच्या मर्माला, विषयाविष्कार नि त्याच्यातल्या माणूसपणाच्या कप्प्याला जातं. 

वाद्यकाम करणं हा मांग जातीचा व्यवसाय, बँडमध्ये ट्रम्पेट वाजवणारा हा लहानगा ‘भुऱ्या’ (लेखकाचं टोपणनाव) त्यात पारंगत होतो. बँडमध्ये वाजवत वाजवत तो तमाशातही वाजवतो. अशी बालपण-तरुणपणातली व्यावसायिक गाथा यात आहे. बँड या विषयातच ते अधिक गुरफटलेलं आहे. आपण शिकून नाव, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा कमावली म्हणून प्रतारणा करणारी जातकुळी लेखकाची नाही. लेखकाने मध्यातच शिक्षण सोडल्यावर त्याला पुन्हा शाळेत जायला निमित्त ठरलेल्या जाडया रम्या या पात्राला उजाळा देऊन त्याच्या विषयी दाखवलेली भावना सॅल्यूट करण्यासारखीच आहे! प्रवासातला सहप्रवासी आपल्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण असल्याने नैतिकता म्हणून रम्याच्या मुलीच्या लग्नात लेखक जातो. दिखाऊपणा, बडेजाव याची हाव नसणारा लेखक कृतज्ञता म्हणून रम्याला साथ देतो. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडणारा रम्या, पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांनी मरण पावतो तेव्हा पाचशे किलोमीटरवरून त्याच्या अंत्यविधीला जाणारा लेखक, हे सर्व लेखकाची नीतिमत्ता, मानवतावाद दर्शवते.

हे आत्मकथन वाचताना यातली व्यक्तिचित्रणं, भाषासौंदर्य, वर्णनशैली, निसर्गवर्णन, नाटयमयता, मानवतावाद, वैचारिकता या साऱ्यांवर साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनाचा प्रभाव जाणवतो. त्यांचा वारसा पुढे नेण्याचं काम लेखकाने प्रभावीपणे केलं आहे असं म्हणावंसं वाटतं. यात विषयनाविन्य तर आहेच, शिवाय प्रसंग मांडणीला असणारी वाचनियता गतिमान होताना दिसते. कुठलंही प्रकरण रटाळ होत नाही. त्यातली वाङ्मयीन मूल्यं अद्भूत आहेत. 

गरीब श्रीमंत यावर मांडणी करताना लेखक ‘खंडया’ या प्रकरणात लिहितो, ‘गावात श्रीमंती जातीवर आणि वडिलोपार्जित आलेली असली तरी त्यातला चढउतार हा त्या श्रीमंत समाजात एक-दुसऱ्याचा तोल सांभाळून घेणारा असतो. पण गरिबीत तसं नाही. गरिबी ही कपड्यावरची धूळ झटकावी इतकी सोपी नाही; ती कायम स्वतःला दिसणारी, अंगावर खोलवर गेलेली एक जखम आहे. गरिबीच्या मुळाशी प्राण्यांची श्रीमंती हे नातं कायम जुळलेलं आहे. गरिबीतली श्रीमंती म्हणजे बकऱ्या, कोंबड्या आणि जास्तीत जास्त एखादी गाय. सर्वांचं रक्षण करणारा, एखाद्या कठीण प्रसंगी धावून जाणारा, खऱ्या प्रेमाने आपल्या मागे पुढे उभा राहणारा कुत्रा... हे सर्व ज्याच्याजवळ; तो त्या भिलाटीतला ‘गरिबीतला श्रीमंत माणूस’ (पृ. 139) हा उतारा वाचताना ‘माकडीचा माळ’ ही अण्णा भाऊ साठेंची कादंबरी डोळ्यांसमोरून अलगद सरकून गेली. स्त्रीचं शील, माणसाचा स्वाभिमान यावर अण्णा भाऊ साठे यांचं बरंच साहित्य बेतलेलं आहे. तसंच काहीसं स्वाभिमानाबद्दल ‘पोळा’ या प्रकरणात लेखक मांडतो, ‘दारिद्र्य आणि गरिबी ज्या घरात नांदतात, त्या घरातील माणसांना स्वाभिमान सोडून देऊन, लाचारीच्या कुबड्या घेऊन आपल्या झोपडीत जगण्याचा तोल सांभाळण्याची कसरत करावी लागते. कुणी कितीही उपदेश केला, तरीही स्वाभिमानी नसणे आणि लाचार होणे ही फारशी चांगली गोष्ट नाही. गरिबीच्या पाठीवर नेहमीच कष्टाचे ओझे असल्याने तत्त्वाचे भारूड तिच्या कानी पडत नाही. चिंता नावाच्या साथीबरोबर गरिबीची नेहमी मैत्री असते. दारिद्रय, गरिबी, चिंता या गोष्टी दूर करण्याचा रस्ता आधी पोटाला स्पर्श करूनच पुढे जातो. (पृ. 152) 

हिरा सिनकरबद्दल लिहिताना लेखक म्हणतो, ‘गरिबीच्या घरात जन्माला आलेली सुंदरता नेहमीच घातक ठरते. निसर्ग काही वेळेस दारिद्रयातही सौंदर्य देऊन मोकळा होतो. पण हीच गोष्ट पोटाच्या भुकेसाठी आयुष्यात शाप ठरते. अशाच सुंदर स्त्रीचं चित्रण यात आहे. रावसाहेब या श्रीमंत माणसाच्या आधाराने जगणाऱ्या हिरा व तिच्या आईचं वास्तव जगणं यात आलं आहे. त्यात हिराला टीबी असल्याचं कळल्यावर रावसाहेब व त्याची माणसंही दूर जातात. लेखक इथं एक छान वाक्य लिहून जातो. ‘गावात एखाद्याला आलेली गरीबी असो की महारोग, त्यांना जगण्यासाठी सोबतीला माणसं लागतात’ हे भाष्य त्यांच्या वैचारिक परिपक्वतेचा नमुना आहे.


हेही वाचा : बहुसंख्य वाचकांपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही प्रकाशक कमी पडतो! - सदानंद बोरसे


लेखकाच्या वडिलांच्या वाटयाला गाव वतन होतं. गावात भाकरी मागणे हा प्रकार यात जसा चित्रित झालाय ते अजोड आहे. वतनाचं गाव गहाण ठेवणं ही फँटसी आहे. पण त्यामधलं गरिबीवरचं भाष्य वाचताना मेंदूत वीज सळसळल्यासारखं होतं. ‘गरिबीत इमानदारी आणि विश्वास या दोन पायांवर पिढी पुढचा प्रवास करत राहते.’ (पृ. 213) या सूत्रांवर लेखक या प्रकरणाची पकड इतकी घट्ट करतो की ती सहसा सैल होत नाही, पण काळजाला सल मात्र देते. 

शब्दाची किंमत सांगताना लेखक लिहितो, ‘हा जिभेच्या कागदावर झालेला व्यवहार शब्दांनी मात्र मनात खूप खोलवर उमटत असायचा. म्हणून आई म्हणायची, “जो सबदले जागीन, तोच जगीन... हे गरिबीच्या मागे मागे फिरणारं तत्त्वज्ञान सर्व मांगांमध्ये, झोपड्यांमध्ये मी कायम जिवंत बघितलं. शब्द दिला तो दिला.” (पृ. 213) गाव गहाण ठेवून बँड विकत घेण्याची गोष्ट लेखकाला एखादी कंपनी विकत घेतल्याचा आनंद देऊन जाते, हे असं सारं अजब गजब वेगळंच काहीतरी यात अनुभवायला मिळतं. तेव्हा वाचकही त्या भोवती घुटमळतो. दारिद्रयात जगणाऱ्यांचं जगणं कैकांना अतिशयोक्ती वाटते. पण हे सारं ज्यांना गरिबीची, दारिद्रयाची झळ लागली आहे त्यांना क्लेशदायक वाटल्याशिवाय राहत नाही. जिद्द नि ध्यासाचे पंख घेऊन भरारी घेणाऱ्यांसाठी हे जीवनानुभव नक्कीच प्रेरणादायी ठरतील. इमानदारीमुळं कशी प्रगती होऊ शकते हे पटवून देताना बँडच्या व्यवसायात कालानुरूप बदल करायला पाहिजे म्हणून स्पीकरचा बँड घेणारं हे कुटुंब तत्त्वाला किती महत्त्व देते हे मांडताना लेखक ‘स्पीकरचा बँड आणि डिग्या’ यात लिहितो, ‘कष्टाला इमानदारी चिकटलेली असेल, तर ती यशाच्या दिशेने तुमच्या प्रगतीच्या पावलांना बळ देते. याच इमानदारीचं बळ बापाला मिळालं होतं. ते हळूहळू आमच्या पावलातही आलं’ (पृ. 266) 

सुभाषितवजा प्रेरणा देणारी अशी यशस्वी वाक्यं लेखकाने यात अनेक पेरलेली असल्यामुळे - आपल्याला ठाऊक असणाराच पण सूचकपणे पेरलेला - विचार “वा ss” म्हणत तोंडाचा आकार वाचताना कधी आपसूकच बदलतो हेच कळत नाही. गावात एखाद्या घराची चांगली प्रगती होत नसेल, तर ब्राह्मण त्यांना सांगायचे, “मांगाचं जोडपं जेवू घाला. त्यांना नवे कपडे, नव्या वस्तू द्या म्हणजे तुमचं चांगलं होईल. त्यांच्याकडे जेवण केल्याने त्यांचं चांगलं होत असतं. पण आमच्या गरिबीचं कधी चांगलं होईल.” हा विवेकवादी विचार आंबेडकर विचारप्रणालीचा विचार म्हणून जोरकसपणे यात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेची धार यात आहे. शिक्षणामुळं कुटुंबात झालेला बदलही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे अशी प्रांजळ कबुली लेखक देतो. चित्रकार म्हणून त्याने व्यवस्थेला दिलेला छेद, त्यावरही बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. ‘बाई’ व तिच्या बाईपणाला विस्तवाची उपमा देऊन तिचं कुटुंबातलं महत्त्व अधोरेखित करताना ‘मधू आप्पा’ या प्रकरणात लेखक म्हणतो, ‘खरं तर बाई नावातच एक विस्तव असतो. कष्टाने तावून सुलाखून निघणारी आणि घराला सतत उजेड देणारी बाई नावाची जातच अशी आहे. कष्टाने सजलेल्या बाया मला नेहमीच घरभर आनंद वाटताना दिसल्यात’ (पृ. 295) 

‘जन्मजात सुख-दु:खाची शरीरभर पेरणी करत आलेल्या बाया मला जमिनीसारख्याच वाटायच्या. माणसांपेक्षा बायांचं शेतातल्या मातीशी जास्त जवळचं नातं होतं. या मावल्यांनी धान्यांची मूठ पाभरावर ठेवली की, जमीन त्यांना एक एक दाणा सोडायचं अंतर सांगते असंच वाटत राहायचं. जमीन आणि बाई, माती नि बाई मला पेरणी करताना सारख्याच वाटल्या. देव नावाची गोष्ट तीळ पेरणाऱ्या बायांमध्येच सापडायची. तीळ पेरणं म्हणजे निराकार देवाच्या हाताचा आकार होणं. एक एक तीळ मुठीतून मातीपर्यंत घेऊन जाणारा तो अद्भूत हात बघून देव त्यांच्यातच सापडल्यासारखा वाटायचा. शेतकऱ्यांपेक्षा या बायांनाच जमिनीचं शरीर जास्त माहीत आहे असं वाटत राहायचं’ (पृ. 386) 

लेखकाचं बालपण खानदेशात, जळगावात गेल्यामुळे सारा परिसर यात ओघाने आला असला तरी अहिराणी भाषेचा लेखकाने केलेला उचित वापर लालित्य वाढवतो. मूळाचं भान नि कुळाची जाण असणारा हा लेखक आपला खानदेशी बाणा सोडत नाही. असं जरी असलं तरीही हे आत्मकथन सार्वत्रिक आहे. त्यात वापरलेली प्रमाणभाषा हे ठळक वैशिष्ट्य आहे. नबी ही लेखकाची बहीण आहे. तिच्या सासरकडून तिचा छळ होतो. तेव्हा लेखकाची आई लक्ष्मी मामीला नबीच्या सासरकडच्यांबद्दल सांगते. तेव्हा या मातीतला भाषेचा अवीट गोडवा वाचकांच्या मस्तकाला आगळी चव चाखवतो. तिचा मोहक गंध अधिकच भुरळ पाडतो.

‘लक्ष्मी मामीला आई डालक्या विणत नबीच्या सासरची गोष्ट सांगत होती. “लक्ष्म्ये, लई खराब लोकं हे बाई नबीकडचे,” आई रडत होती आणि लुगडयाच्या पदराने डोळे पुसत होती. “अनाबाई, रडू नका व शेवटी खऱ्याचा देव राहातो. मानवीले वाटतं आपण अन्यतिनं वागलं, तरी कोनी पहात नी आपले. पन या पिरथमिच्या आरशात ती समदं पहाते, तिचा हिसाब त ती घेतेच शेवटले.” (पृ. 50) 

असला वैश्विक तत्त्वज्ञानाचा बाज या अडाणी बायकांत येतो कुठून? तत्त्वज्ञानाचं मूळ या अडाणी गरिबीतच अधिक गवसतं, त्यांचं दारिद्र्य हे विद्यापीठ असतं तर कष्ट त्यांची पदवी असते. त्यातून हे सारं उगवतं. लेखकाने जसा अहिराणी बाज जपला आहे. तसेच ‘डूख’, ‘जतवून जतवून सांगत होते’, ‘शाळेत जायचे ही किर्रघानी मी बापाच्या मागे सारखी लावली’ असे बरेच बोलीभाषेतले ठेवणीतले शब्दप्रयोग वापरून वाचनियतेला तडका दिला आहे.  

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे

वर्णनशैली हे एक रत्न यात गवसतं. ‘आलमगीरची आर्ट गॅलरी’ या प्रकरणातलं बाजारपट्टयांचं वर्णन हे सुरेख आहे. ‘ये-जा करण्याच्या शेवटच्या कोपऱ्याला आलमगीरची पानटपरी, टपरीपासून दहा-बारा फुटांवर बाजारासाठी मुतारी. मुख्य गावातून कोणताही माणूस घराच्या बाहेर पडला आणि बाजारात आला की, पहिल्यांदा त्याला आलमगीरची टपरी लागणार. याची टपरी म्हणजे गावाच्या लोकांचं खास आकर्षण. मंदिराच्या प्रवेशव्दारासारखी त्याच्या टपरीच्या समोरची प्लायवुडची महिरप. त्यावर रंगीत सनमाईका लावलेला. वेगवेगळ्या काचेच्या बरण्या. त्यात पानामध्ये टाकायला खूप वेगवेगळ्या वस्तू, त्याला पानटपरीत घुसायाला कोंबडीचं खुराड्यासारखं छोटं दार. ते बंद केलं की, हा त्या टपरीत सहा पितळी वाट्यांमध्ये बडीशेप, सुपारी, तंबाखू अशा गोष्टी टाकणार. टपरीत आजूबाजूला लहान लहान कप्पे आणि मध्यभागी आरसा. या आरशात लोक आपला भांग, टोपी नीट आहे की नाही असं बघणार. या काचेमुळे त्याच्या टपरीतलं साहित्य डबल दिसायचं’ (पृ. 317-318) डोळ्यांच्या कॅमेऱ्याने एकेक वस्तू पटकथेच्या अंगाने टिपल्यासारखी लेखकाची वर्णनशैली आहे! हे वाचल्यावर अण्णा भाऊ साठेंच्या वर्णनशैलीचा संस्कार जाणवल्याशिवाय राहणार नाही!

लेखक मांग जातसमुहातील असल्याने त्या जातीची ‘पारोशी’ ही सांकेतिक भाषा चपखलपणे प्रसंगानुरूप पेरलेली आहे. ‘शिवा भगत’ यात लेखक म्हणतो, “मालक, बाजारात चहापाण्याला गेला होता. मला लक्ष ठेवायला शिवाळ्यापाशी उभं केलं.” “वायचा वरवला की मला बुरका” अशी मामी बोलली. (पृ. 105) ही प्रसंगानुरूप आलेली भाषा सहज उमगते. त्याचा संकेत वाचकांना मिळतो. “ज्याच्या खळयात हे कामासाठी जाणार होते त्याच्या विषयी ते बोलत होते.” “माय हा वायचा काही नान थालत नी वायचीकडेच मिळखतो” मामी बोलल्यावर आई म्हटली, “आपून आपलं काम करवां  कश्याले मिळखवा अस्या घाड्याकडे” (पृ. 182) ‘ईवऱ्या’मधला हा प्रसंग, “बँडमधील चिल्लरपार्टी त्याला बघून हसत होती. मध्येच मी त्याला म्हटलं, “एखाद्या वायच्यानं तुला मिडकलं, तर हिकाडतीन रे” आणि थोडया वेळात तसंच झालं (पृ. 281) “का रे वो गंधी गांडच्या हो, वाज्याले आले की तमाश्या कऱ्याले आले आठी? बरे झाले मी लवकर वरवलो आठी, नई तर तुम्हले हिकाडलंच असतं त्या वायच्यानं” (पृ. 282) अशी ही वापरलेली भाषा सूचकपणे मांडून रंग भरले आहे, त्यात भरीव नि कोरीव कामगिरी प्रत्येक प्रकरणाला लेखकानेच रेखाटलेली समर्पक रेखाटनं करतात. रेखाटनांनी ऑक्सिजनची भूमिका वठवल्यामुळं त्यातला जिवंतपणा डवरला आहे. असं वैविध्यपूर्णतेनं सजलेलं आत्मकथन जरी असलं, तरी लेखकावर त्याच्यातला आत असणारा कलावंत नि चित्रकार वरचढ होताना कैक ठिकाणी दिसतं, कलेची भाषा नि चित्राच्या रेषांसोबत रंगाच्या छटा अधिक डोकावताना दिसतात. 

आजवर मांग जातसमुहातील काही ठळक आत्मकथनं आली. त्यात ‘राघववेळ’ नामदेव कांबळे, ‘काटयावरची पोटं’ उत्तम बंडू तुपे, ‘होरपळ’ ल.सि. जाधव, ‘दे दान सुटे गिऱ्हाण’ आर.के त्रिभुवन, ‘अंबुज’ डॉ. बाबूराव गायकवाड, ‘झुंज’, ‘बोंब दवंडी’ रामराव झुंजारे, ‘दोरखंड’ प्रदीप साने, ‘हिरापुत्र’ धनाजी घोडजकर, ‘असा होतो आता घडलो’ जी. पी. वाघमारे, ‘अनुभवाची शिदोरी’ जे.एस.तोटरे, ‘जग बदल घालूनी घाव’ एकनाथ आवाड, ‘चऱ्हाट’ दादासाहेब तांदळे, ‘मी एक शिल्पकार’ आनंद गायकवाड, ‘पोतराजाचं पोर’ प्राचार्य डॉ. माधव गादेकर, ‘जीवन संघर्ष’ वसंतराव पाटोळे. सारी एका पठडीतली आत्मकथनं असली तरी ‘कारकोदवा’ मारुती दाढेल या शिल्पकार कलाकाराचं कलाजीवन चित्रित करणारं प्रेरक आत्मकथन जसं आहे, तद्वत ‘काळ्या निळ्या रेषा’ हे बँड कलावंत नि चित्रकाराचं आत्मकथन आपलं वेगळेपण सिद्ध करतं, त्यामुळं ते उल्लेखनीय व दखलपात्र आहे.

‘काळ्या निळ्या रेषा’
लेखक : राजू बाविस्कर 
प्रकाशक : राजहंस प्रकाशन 
पृष्ठे : 412  मूल्य : 550 रुपये.

Tags: दलित साहित्य आत्मचरित्र राजू बाविस्कर चित्रकला राजहंस प्रकाशन साहित्य नवे पुस्तक पुस्तक परिचय काळ्या निळ्या रेषा व्यक्तिचित्रण Load More Tags

Comments:

Chhaya Bele

लेखकांने जगण्याचा संघर्ष जेवढ्या संयमाने मांडला आहे तेवढ्याच तोलामोलाचे , अतिशय सुंदर.. पुस्तकाचं तसेच लेखकाचं अंतरंग उलगडून दाखवणारे व साहित्यकृतीला योग्य न्याय मिळवून देणारे रसाळ समीक्षण . लेखक आणि समीक्षक दोघांचेही हार्दिक अभिनंदन !!

Prof. Bhatu

काळ्या निळया रेषा या आत्मकथनाचं सखोल आणि वास्तवदर्शी समिक्षण. प्रसंग, व्यक्तिरेखा, भाषाशैली आणि लेखकाचं अंतरंग आपण नेमक्या शब्दात उलगडलं आहे. एका संयत विद्रोहाचं देखणं रुप म्हणजे ही आत्मकथा आहे. अभावातही जगणं किती सुंदर करता येतं याचं आदर्श उदाहरण आहे. मायनं शिकवलेलं.... "जो सबदले जागीन, तोच जगीन.!" हे तत्वज्ञान तर त्रिकालाबाधित सत्य आहे. जे जगण्याची निष्ठा आणि शब्दांची प्रतिष्ठा पटवून देते. दोघांचं अभिनंदन.! © प्रा.बी.एन.चौधरी. देवरुप, धरणगाव.

Add Comment

संबंधित लेख