वडार समाजातील अनिष्ट प्रथेवर प्रकाश टाकणारी कादंबरी- चोळी

कर्तव्य साधना

वडार समाजातल्या काही स्त्रिया पूर्वी चोळी घालत नसत, त्यामागे रुढी परंपरा सांगितली जात असे.  पन्नासेक वर्षांपूर्वी अशाच एका वडार स्त्रीला तिच्या मुलाने हट्टाने चोळी आणली आणि घालायला लावली. या सत्य घटनेवर आधारित ‘चोळी’ ही कादंबरी 25 डिसेंबर 2019 रोजी प्रकाशित झाली. त्याकाळी त्या मुलाने आपल्या आईला चोळी घालायला भाग पाडले ही किती महत्वाची घटना आहे हे त्या बाईंच्या नातीची आत्ताची भरारी पाहून लक्षात येते. या कादंबरीमधले संवाद बऱ्याच अंशी वडारी भाषेत आहेत. त्यातील शब्दार्थही पुस्तकाच्या शेवटी दिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर लेखक सुरेश कृष्णाजी पाटोळे यांची घेतलेली ही मुलाखत..

प्रश्न: तुम्ही कधीपासून लिहू लागला? 
-मी शाळेत असल्यापासून लिहायला लागलो. लेखनाची खरी सुरवात झाली ‘पाढ’ नावाच्या कथेपासून. ती कथा लमाण समाजावर होती. ‘पाढ’ तरुण भारत बेळगावमध्ये छापून आली. त्यानंतर आपला महाराष्ट्र, कालनिर्णय, तरुण भारत, दैनिक संचार, अक्षर वैदर्भी, संस्कृती, भूमिका अशा वर्तमानपत्रांतून, नियतकालिकांतून मी सातत्यानं लिहीत राहिलो. 

प्रश्न: आणि या आधी कोणकोणत्या विषयांवर लिहिलंय?
-औद्योगिक क्रांतीमुळं भारतीय समाजातल्या दलित, पिडीत, वंचित समाजाची दुरावस्था झाली असं मला वाटतं. त्यातून त्यांच्या वाट्याला आलेले अनुभव, त्यांची परंपरा, त्यांचा इतिहास हे सगळं साहित्यकृतीत यावं असं माझ्या मनात होतं. मी प्रामुख्यानं वंचित आणि भटक्या लोकांवर लिहीत राहिलो.

 

दरम्यान 1990 मध्ये मी  'हेलपाटं' नावाची एक कादंबरीही लिहीली. तिच्यासाठी मला खरंच खूप हेलपाटे घालावे लागले. 'माझ्या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया' या विषयावर लिहिताना मी तो अनुभव मांडला आहे. "तुमचा विषय महत्त्वाचा आहे, तुमची ग्रामीण शैलीही चांगली आहे." असं अनेक प्रकाशकांनी सांगितलं. पण माझी कादंबरी छापायला मात्र कोणी लवकर तयार होत नव्हतं. कुठलाही नवीन लेखक उतावीळ असतो, तसाच मीही होतो. पण काही घडत मात्र नव्हतं.

जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्याकडं जवळजवळ 22 वर्षे मी साहाय्यक म्हणून काम करत होतो. तेव्हा सिनेमा क्षेत्रांतील अनेक दिग्गजांसोबत मला काम करता आलं. एकूण सात सिनेमे माझ्या नावावर आहेत. सहा सिरियल्सदेखील आहेत. त्यामध्ये एड्स या विषयावर आधारित मी दिग्दर्शित केलेला  'मला जगायचंय' या नावाचा सिनेमाही आहे. महाराष्ट्रात बऱ्याच शाळा, कॉलेजेस आणि थिएटर्समध्ये तो दाखवण्यात आला.

मी सिनेमांमध्ये गुरफटलेला होतो. रमेश नावाडकर नावाचा माझा एक चित्रकार मित्र आहे. एक दिवस त्याने संस्कृती प्रकाशनच्या सुनीताराजे पवार यांच्याशी गाठ घालून दिली. त्यांनी 'हेलपाटा' छापली. छापून आलेली ही माझी पहिलीच कादंबरी. ती कर्नाटक विद्यापीठात एम ए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी लावण्यात आली. त्यातून मिळालेल्या उर्जेतून मी पुन्हा लिहीत राहिलो.

प्रश्न: विशिष्ट समाजावर लिहिताना तुम्ही त्या समाजाची भाषा वापरली आहे. जसं ‘पाढ’ मध्ये लमाणांची, ‘चोळी’ मध्ये वडार लोकांची भाषा. त्याविषयी सांगा.  
- ज्यांची कथा त्यांच्या भाषेत यायला हवी असं मला वाटतं. दोन व्यक्तींना मी गुरु मानतो. सिनेमात राजदत्त आणि साहित्यात अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊंच्या वाङमयातून मला साहित्याचं अंग गवसलं. कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा स्वभाव असणाऱ्या राजदत्तांच्या छत्राखाली मी वाढलो. मुळाशी गेलं नाही तर पुढचं सगळं काम अळणी होतं.

मी मोठ्या जातीय गराड्यात राहतो. ज्या ज्या समाजावर मी लिहिलं आहे, त्या सर्वच समाजांत माझे लहानपणीचे मित्र आहेत. मी राहतो तिथे, माझ्या पश्चिमेला 500 उंबऱ्याचा लमाण व वडार समाज आहे. तिथे त्यांचं राहणीमान, त्यांची भाषा मी टिपत गेलो. वेगवेगळ्या भटक्या समूहांच्या 22 भाषा मला समजतात. या आधी मला ज्या कादंबरीसाठी राज्यपुरस्कार मिळाला त्या कादंबरीचं नाव आहे ‘पुळका’. आणि ती लिहिली कांकर जातीवर. भारतीय समाजातल्या बहुतांश लोकांना या जातीविषयी माहितही नाही.

प्रश्न: ‘चोळी’ या कादंबरीचा विषय कसा सुचला?
-वडार समाजाला मोठा इतिहास आहे, परंपरा आहे. जगातल्या पहिल्या काही शिल्पकार समाजांमध्ये वडार समाजाची गणना केली जाते. पण या समाजातील बायका चोळी का घालत नाहीत हा प्रश्न मला कायम भेडसवायचा.

जगन बापू गुंजाळ हा वडारवाडीतला माझा मित्र. गेली 35 वर्षं आमची मैत्री आहे. तो फार चिकित्सक, हुशार. एकदम पैलवान गडी. त्याच्या तरुणपणी त्यानं घरात, वस्तीत सगळ्यांना सतत प्रश्न विचारून भंडावून सोडलं होतं. ‘वडार समाजातल्याच बायका चोळी का घालत नाहीत?’ या त्याच्या प्रश्नाचं कोणीच समाधानकारक उत्तर देऊ शकत नव्हतं. ‘पुराणात सीतामाईनं हरणाच्या चोळीसाठी हट्ट केला. तो शाप वडार स्त्रीला लागला. म्हणून वडार समाजातल्या बायका चोळी घालत नाहीत’ असलं काहीतरी मोघम उत्तर त्याला मिळायचं. हे उत्तर त्याच्या विवेकी बुद्धीला काही पटेना. 1960-70च्या काळात त्यानं हट्टानं आपल्या आईला चोळी शिवून आणली आणि ती घालायला लावली. घरातून, वस्तीतून विरोध झाला. पण आईनं देखील लेकाचं ऐकलं आणि चोळी घातली.

ही क्रांतीकारी घटना होती. त्याविषयी मी कॉलेजात असतानाच ऐकलेलं होतं. याच विषयावर 80च्या दशकात मी एक कविताही लिहिली. ती या कादंबरीमध्ये आहेच. जगननं आईला चोळी घातल्यानंतर त्याच्यावर काय काय ओढवलं असेल याची मी कल्पना केली. चोळी न घालू शकणाऱ्या बायांच्या नशिबी काय काय भोग येत असतील याचाही विचार केला. 

दरम्यान तीसेक वर्षांचा काळ गेला. एक दिवस जगननं मला सांगितलं की त्याची नात एअर होस्टेस झाली. आणि त्याची पुतणी पायलट झाली. ‘जगननं त्याच्या आईला चोळी घातली नसती तर त्याची नात शिकली असती का? शिकली नसती तर एअर होस्टेस म्हणून मुलाखतीला जाऊ शकली असती का? विमानात बसू शकली असती का?’ असे प्रश्न मला पडले. हा वडार समाजातला बदलांचा ग्राफ आहे. आजही त्या समाजातल्या 90 टक्के स्त्रियांना आपण चोळी का घालत नव्हतो हे माहित नाही. जगनला त्यानं केलेल्या बंडखोरीचे काय परिणाम भोगावे लागले, कोणकोणत्या प्रश्नांना त्याला सामोरं जावं लागलं याचं काही अंशी काल्पनिक आणि काही वास्तव असं चित्र या कादंबरीत गुंफलं आहे.
 
बदल हे सहज होत नाहीत. त्यासाठी झगडावं लागतं. अपमान, आघात सोसावे लागतात. आजही आपल्याकडे अशा अनेक अनिष्ट चालीरीती आहेत. त्याविरोधात लढणारे जगनसारखे अनेक लोक आहेत. त्या सगळ्यांना प्रोत्साहन मिळावं, उर्जा मिळावी आणि बाकी सामान्य लोकांना त्यांची कथा समजावी म्हणून मी ‘चोळी’ लिहिली.  

प्रश्न: या विषयासाठी कादंबरीचा फॉर्म निवडावा असं का वाटलं?
-या विषयाचा आवाका पाहता त्यातलं नाट्य, त्यातली आर्त किंकाळी मांडण्यासाठी कादंबरी हा फॉर्म मला सोपा वाटला. कादंबरीतून समाजाचं वास्तव खुलेआम मांडता आलं. वेगवेगळ्या जागा तुम्हाला कादंबरीत विस्ताराने वापरता येतात.

प्रश्न: कादंबरी कुणापर्यंत पोचावी असं तुम्हाला वाटतं? त्यातून काय साध्य व्हावं?
-वडार समाजाचा इतिहास वडार समाजानेच वाचलेला नाही. याचा खेद आहे. तो इतिहास यात मी मांडला आहे. तो वाचून वाचक अचंबित होतील. या समाजातील अनेक साहित्यिकांसोबतच इतरही साहित्यिकांनी वडार समाजावर पुस्तकं लिहिली आहेत. परंतु चोळीच्या शापावर कोणी फार लिहिलेले नाही. या अस्पर्श्य विषयाला कादंबरीच्या रूपातून स्पर्श करण्याचा हा माझा प्रयत्न आहे. ती माझ्या आईचीच व्यथा आहे असं समजून ती मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. मात्र या समाजात त्याविषयी अनभिज्ञता आहे. वडार समाजातल्या या अनिष्ट प्रथेविषयी माहिती या कादंबरीमुळेच मिळाल्याचं अनेकांनी सांगितलं. कादंबरीनं त्यांना विचार करायला लावला हेच ते हाशील आहे. कादंबरीचं शीर्षक आणि मुखपृष्ठ ठरवतानाही आम्ही हा आम्ही विचार केला आहे. बहुतांश वडार बायकांना त्या चोळी का घालत नव्हत्या हे माहिती नसेल तर इतरांना त्यामागची पार्श्वभूमी, त्यामागचं नाट्य समजणं कसं शक्य आहे? माझी ही गोष्ट कुठल्याही विशिष्ट जातीसाठी नाही. मी जरी काही विशिष्ट जातींवर लिहीत असलो; तरी ते त्या जातीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी लिहिलेलं नाही. माझी कोणतीही कादंबरी प्रचारकी ठरू नये हे मी कटाक्षाने पाळतो. कादंबरी वाचायला घेतलेल्या माणसाने ती संपवूनच खाली ठेवावी म्हणजे झालं. प्रत्येक वाचकाला ती कादंबरी (तो स्वतः त्या जातीचा नसला तरी) त्याची वाटावी म्हणून मी लिहितो. थोड्याफार फरकाने आपल्या जातीतही अशा अनिष्ट प्रथा आहेत याचे भान वाचकाला येऊ शकेल. भारतीय समाजात असणाऱ्या जातीच्या उतरंडीतील बऱ्याच गोष्टींविषयी अनेक मंडळी अनभिज्ञ असतात. त्या गोष्टी कादंबरीच्या स्वरूपात समाजापुढे याव्यात असं मला वाटतं. मी सर्वसामान्य वाचकांसाठी लिहिलेलं आहे. कुठल्याही विशिष्ट कंपूसाठी माझं लेखन नाही.

(मुलाखत: मृदगंधा दीक्षित)

चोळी
लेखक : सुरेश कृष्णाजी पाटोळे
प्रकाशक: यशोदीप पब्लिकेशन्स
पृष्ठे: 280
किंमत: 300/-

 

Tags: Mrudgandha Dixit Choli Novel Vadar Community Novel Book Interview सुरेश पाटोळे मृदगंधा दीक्षित चोळी कादंबरी कादंबरी पुस्तक वडार समाज मुलाखत Load More Tags

Comments: Show All Comments

Avinash jadhav

मला हि कद्स्म्बरि हवी आहे. कुठे भेटेल

Suryakant Rajguru

मा.सुरेशजी पाटोळे एक उत्कृष्ट लेखक सर्वसामान्य तळागाळातील लोकांच्या जुन्या प्रथा काही उच्चभ्रू वर्गातील लोकांकडून मनावर बिंबवले गेलेल्या अनिष्ट प्रथा यावर प्रकाश टाकण्याचा लेखकाचा उत्कृष्ट प्रयत्न. अंगात चोळी न घालण्या पासून सुरू झालेला प्रवास ते एअर होस्टेस, पायलट पर्यंत पोहचतो तेव्हा कथेतील नायका सोबत वाचकांचे ही समाधान होते. पुस्तकामध्ये वडार, कानडी भाषेचा चांगला वापर. पुस्तक हातात आल्यावर संपेपर्यंत हातातून खाली ठेवल जात नाही. वाचकांस खिळवून ठेवण्यास लेखक शंभर टक्के यशस्वी. मा.सुरेश पाटोळे यांच्या पुढील लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा.

Vijayalaxmi

मलाहि कादंबरी अभ्यासासाठी हवी आहे. कुठे संपर्क करावा? प्रकाशकांचा फोन नंबर मीळेल का?

सुरेश नावडकर

हटके विषयावरची अप्रतिम कादंबरी! ही देशातील-परदेशातील वाचकांपर्यंत पोहोचायला हवी.

Bhalerao sanjay kishanrao

अप्रतिम कादंबरी

सुर्यकांत राजगुरू

अप्रतिम ! विषय हटके असला तरी अनिष्ट प्रथा ,रूढी, परंपरा यांच्यावर घाव घालण्याचे काम लेखक सुरेशजी पाटोळे आपल्या प्रत्येक कथा , कादंबरी तून करत असतात. !! अभिनंदन !! आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

Add Comment