कोरोनाचे संक्रमण आणि लॉकडाऊन यांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी शिक्षण आणि अध्यापन या क्षेत्रांना नवतंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालय, पुणे यांनी आयोजित केलेल्या 'कोरोनोत्तर मराठी विषयाच्या उच्चशिक्षणात नवतंत्रज्ञानाचा वापर' या राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारमध्ये डॉ. मनोहर जाधव यांनी केलेले बीजभाषण
या राष्ट्रीय वेबिनारसाठी उपस्थित मान्यवर आणि भारतातील वेगवेगळ्या विद्यापीठातील आणि महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनींनो, उच्चशिक्षणामध्ये मराठी भाषेच्या अध्यापनाच्या बाबतीत हा वेबिनार आयोजित करण्यात आलेला आहे. आणि आज चर्चेला आलेले सर्व मुद्दे हे शिक्षणक्षेत्राच्या संदर्भातील मूलभूत मुद्दे आहेत. प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल वा उच्च शिक्षण असेल, यांत आधीच गुंतागुंत झालेली होती आणि त्यात आपल्यासमोर आलेलं कोरोनासारखं आव्हान. या सर्वांतून तातडीने मार्ग कसा काढावा याविषयी आज संभ्रमाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, आणि ती स्वाभाविक आहे.
शिक्षणाचं क्षेत्रं हे मूलभूत क्षेत्रं आहे. या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी भविष्याचा विचार करतात. शिक्षणक्षेत्रात तुम्ही केलेली गुंतवणूक ही दीर्घकालीन असते. पाच-दहा वर्षांत त्याचा परतावा तुम्हाला मिळलेच असं नाही. त्यासाठी त्याची वाट पाहावी लागते. मात्र शेवटी जे मिळेल ते भक्कम असायला हवे, यासाठीच आपण प्रयत्नशील असतो.
उच्च शिक्षणाच्या संदर्भात तंत्रज्ञानाचा वापर अनेक विद्याशाखांमध्ये सुरू झालेला आहे. काही विद्याशाखांमध्ये तर तो वापर अपरिहार्यच आहे. तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय काही विद्याशाखांमध्ये अध्यापनच होऊ शकत नाही. काही विद्याशाखा पारंपरिक स्वरूपाच्या आहेत, त्यामुळे त्या पूर्णपणे तंत्रज्ञानावर विसंबून राहू शकत नाहीत. तुम्हाला तंत्रज्ञानाचा आधार हा काही प्रमाणात घ्यावाच लागतो, मात्र त्यावर पूर्णपणे विसंबून राहता येत नाही.
मात्र बदलणाऱ्या काळासोबतच नवीन आयुधे, नवीन सामग्री, नवीन तंत्रज्ञान यांचा आधार आपल्याला घ्यावाच लागतो. ते अपरिहार्यच आहे. तुम्हाला त्या काळाच्या बरोबर जावं लागतं. आणि काळाच्या बरोबर जाताना तुम्हाला ते तंत्रज्ञान आत्मसात लागतं.
आधुनिक तंत्रज्ञान नसताना समाजजीवन कसं होतं, शिक्षणक्षेत्रं कसं होतं हे माझ्या पिढीने पाहिलं आहे. सोबतच आज काय-काय बदल होताहेत तेही आम्ही अनुभवतो आहे. या तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा याचा विचार माझ्यासारख्या शिक्षकाला करावाच लागेल. ‘ते मला येत नाही म्हणून मी पारंपरिक पद्धतीने शिकवतो’, असं म्हणून चालणार नाही. ते समजून घेणं आणि त्याआधारे त्यातील ‘टुल्स’चा वापर करत काळाच्या बरोबर जाणं ही अपरिहार्य अशी गोष्ट आहे. तुम्हाला तुमचं कौशल्य वापरावं लागेल. तुमचं मनुष्यबळ वापरावं लागेल. त्याचबरोबर तुमच्या इच्छाशक्तीचा वापर करून काही गोष्टी तुम्हाला आत्मसात कराव्याच लागतील.
या तंत्रज्ञानाच्या स्वीकृतीमध्ये एक संक्रमणकाळ असतो. आणि तो जरा समजून घेतला पाहिजे. संक्रमणकाळामध्ये ज्या नवीन गोष्टी आलेल्या असतात, विशेषतः नवीन तंत्रज्ञान आलेलं असतं, त्यासंबंधी एक नकाराचा सूर असतो. त्याबाबत लवकर स्वीकारशीलवृत्ती तयार होत नाही. जुन्या गोष्टी आहेत त्या लवकर सोडवत नाही. नवीन गोष्टी किती अडचणीच्या आहेत, किती खर्चिक आहेत, किती गुंतागुंतीच्या आहेत हे सांगण्यावरच भर असतो.
याचं एक उदाहरण मला आठवतं. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये लक्ष घातलं. भारतात संगणकाचे आगमन झाले. सॅम पित्रोदा वगैरे मंडळी या क्षेत्रात काम करत होती. तेव्हा मुंबई विद्यापीठातल्या एक प्राध्यापकांनी शंका उपस्थित करत मला विचारले होते की, ‘एवढे कॉम्प्युटर आले तर किती लोक बेकार होतील? बेकारी मोठ्या प्रमाणात वाढेल. एक कॉम्प्युटर जर पन्नास लोकांचं काम करत असेल तर इतक्या लोकांनी करायचे काय?’
संक्रमणकाळामध्ये काही प्रश्न उपस्थित केले जातात. पण नंतर आपल्या लक्षात येतं की, काळाच्या बरोबर जाण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. म्हणजे जेव्हा संगणक नव्हते तेव्हा रेल्वेचं रिझर्वेशन करण्यासाठी आपल्याला रेल्वे स्टेशनवर जायला लागायचं. पुणे-दिल्ली प्रवास करायचा असेल तर पुणे स्टेशनवर जाऊन तिकीट काढावं लागायचं. नंतर दिल्ली-पुणे तिकीट काढण्यासाठी दिल्लीला उतरल्यावर तिकीट काढावं लागायचं. आता अशी परिस्थिती नाही. आज एकाच वेळी तुम्ही अनेक मार्गाचे तिकीट काढू शकता. नियोजन करू शकता. म्हणजे पूर्वी जे तंत्रज्ञान अडचणीचे वाटत होते ते नंतरच्या काळात समाजजीवनाला उपकारक ठरलेले आहे. पण ते संक्रमणकाळात लवकर लक्षात येत नाही.
आताही मध्यमवयीन शिक्षकांची एक पिढी मधल्या काळात आलेल्या तंत्रज्ञानाच्या संदर्भात जरा नाराजच होती. अजूनही काही प्रमाणात आहे . ‘पीपीटी कसं करायचं? ऑडिओ-व्हिज्युअल कसं करायचं? डीटीपी कसं करायचं?’ असे प्रश्न त्यांना पडलेले आहेत. या सर्व गोष्टी अटळ असतील तर त्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा आपण ते शिकलेलं बरं. त्यामुळे नुकसान नाही तर फायदाच होईल.
मात्र एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणेही आवश्यक आहे. महाराष्ट्रातील काही भाग दुर्गम तर काही आदिवासी आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाबाबत केवळ शहरापुरता विचार करून चालणार नाही. तर तुम्हाला सर्वंकष विचार करावा लागेल. आणि जर तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्यच असेल तर परिसर दुर्गम असो, आदिवासी असो, शहरी असो, तुम्हाला ही सुविधा सर्वत्र उपलब्ध करून द्यावी लागेल. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि आपण मिळून हे काम केलं पाहिजे. कारण ही काळाची गरज आहे.
काळाबरोबर जायचं असेल तर शेवटचा माणूस, शेवटचा विद्यार्थी जिथे आहे तिथे त्याला या तंत्रज्ञानाचा लाभ मिळाला पाहिजे. यामध्ये पुन्हा गुंतागुंत आहेच. हे वाटतं तेवढं सोपं नाही. कारण त्याच्यामध्ये अनेक आर्थिक स्तर आहेत. सांस्कृतिक स्तर आहेत. या सगळ्या भौगोलिक प्रदेशातल्या वेगवेगळ्या स्तरांचा विचार करून हे प्रश्न सोडवावे लागतील.
दुर्गम भागात वाड्या-वस्त्या आहेत, पाडे आहेत, तिथे शाळा आहेत. त्या शाळांमध्ये कधी दहा मुलं कधी बारा मुलं कधी पंधरा मुलं असतात. परवा मी एक बातमी वाचली की, ‘जर विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल तर त्या वाड्या-वस्त्यांवरील शाळा बंद केल्या पाहिजे. असं शासनाला वाटतं.’ या संदर्भात थोडा विचार केला पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाचा पाठपुरावा करत असताना या सुविधांच्या अभावामुळे आपल्या समाजातले दुर्बल घटक, दुर्गम भागातले विद्यार्थी वंचित राहू नयेत.
या आदिवासी भागातील महाविद्यालयांचे प्रश्न पुन्हा वेगळे आहेत. तेथील विद्यार्थ्यांचे सामाजिक, सांस्कृतिक स्तर पाहता शहरी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे निकष या विद्यार्थ्यांना लावता येणार नाहीत. शिक्षक म्हणून माझ्या असं निदर्शनास आलं आहे की, आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषादेखील अपरिचित वाटते. आणि त्यांना त्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात. आपल्याकडे त्या-त्या प्रदेशातल्या समूहाच्या बोलीभाषेतून आपण शिक्षण देत नाही. कुठल्यातरी एका प्रमाणभाषेतून आपण शिक्षण देतो आणि ती भाषा त्या विद्यार्थ्यांना अपरिचित असते. यामुळे त्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यापेक्षा त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड तयार होतो.
शिक्षण हे आत्मविश्वास वाढवण्यासाठी असतं. न्यूनगंड निर्माण करण्यासाठी नव्हे. आणि जर तसं होत असेल तर या सगळ्या गोष्टींचा विचार फार नीटपणे आणि शास्त्रीय पद्धतीने करावा लागतो. आता ही सगळी गुंतागुंत पाहून एक मात्र नक्की आहे की, आपल्याला त्यातून मार्ग काढत पुढं जावं लागेल.
तुम्हाला राष्ट्र म्हणून, देश म्हणून पुढं जायचं असेल तर या छोट्या-छोट्या गोष्टीदेखील विचारात घ्याव्या लागतील. म्हणून आदिवासी भाग असेल, दुर्गम भाग असेल, डोंगरी भाग असेल, नीमशहरी भाग असेल या सगळ्या परिसरामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी संभाव्य प्रश्न आधीच सोडवावे लागतील. त्याच्यासाठी शैक्षणिक आणि राजकीय इच्छाशक्ती लागेल. त्याच्याशिवाय आपण तिच्यावर मात करू शकणार नाही. या सगळ्या तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि अपरिहार्यता यांची सांगड आपल्याला घालावी लागेल.
बदलत्या काळामध्ये तुम्हाला या नवतंत्रज्ञानाचा वापर हा करावाच लागणार आहे. करता येत नसेल तर तो कसा करायचा हे शिकावं लागणार आहे. ‘आम्ही कोणतेही तंत्रज्ञान वापरात आणणार नाही, आम्ही आमच्या पारंपरिक पद्धतीने अभ्यास करू’, असं म्हणता येणार नाही. असं आपण म्हणायला लागलो तर आपले विद्यार्थी मागे पडतील. कोणत्याही स्पर्धेत आपले विद्यार्थी टिकणार नाहीत. हे असं मागं पडणं आपल्याला परवडण्यासारखं नाही.
काही बारीकसारीक गोष्टी, शिक्षकांच्या, संस्थाचालकांच्या पटकन लक्षात येत नाहीत. विद्यार्थीही त्या लक्षात आणून देत नाहीत. त्याच्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर खुला संवाद असला पाहिजे. संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक हा समन्वय असायला हवा. हा समन्वय करतानादेखील आपल्याकडे असे खूप घटक आहेत की, ज्यांना याची जाणीव नाही. आणि इच्छा असूनही ते काही करू शकत नाही.
कष्टकरी, शेतमजूर, दुर्बल घटक यांतील पालकांना आपली मुलं नेमकं काय शिकताहेत हे आजही लक्षात येत नाही. यात त्यांचा दोष नाही. ही मंडळी पालकसभेला पण येत नाहीत. का तर ते त्यांच्या प्राधान्यक्रमात नाही. त्यांचे जगण्याचे प्रश्न वेगळे आहेत. आणि त्या जगण्याच्या प्रश्नांमध्ये प्राधान्यक्रम ठरलेला आहे. आणि त्या प्राधान्यक्रमामध्ये न येणाऱ्या काही गोष्टी आपल्या दृष्टीने मात्र महत्त्वाच्या असतात.
ही सगळी पार्श्वभूमी तुम्हाला लक्षात घ्यावी लागते. आणि तरीही आपल्याला हे मान्य करावं लागतं की, तंत्रज्ञानाचा आधार आपल्याला घ्यावाच लागणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील एखादा तज्ज्ञ डॉक्टर अमेरिकेत आहे आणि दुसरा भारतामध्ये शस्त्रक्रिया करतोय. अमेरिकेतला डॉक्टर भारतातल्या डॉक्टरला ऐनवेळी काही सल्ले देऊ शकतो. तंत्रज्ञानाचा वापर करताना हे शक्य आहे. हा तंत्रज्ञानाचा फायदा आहे.
बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातले आमचे एक मित्र आहेत डॉ. संजय करंदीकर. ते लॉकडाऊनच्या काळात घरी काही काम करीत असताना ओझं उचलल्यामुळे त्यांच्या मणक्यामध्ये गॅप पडला. त्यामुळे त्यांना उठता येईना आणि बसतापण येईना. तीन-चार डॉक्टरांशी त्यांनी चर्चा केली. ते म्हणाले, लॉकडाऊन मिटल्याशिवाय काहीच करता येणार नाही. नंतर त्यांनी पुण्यातल्या काही डॉक्टरांशी संपर्क केला. त्यातले ऑर्थोपेडीक सर्जन असलेले डॉ. हिमांशू वझे त्यांना म्हणाले, ‘‘मी ऑनलाईन तुम्हाला पाहतो. तुमचा बेड मला दिसेल अशी व्यवस्था करा. तुम्हाला काय त्रास होतोय मला कळलं पाहिजे.’’ त्यानंतर संध्याकाळी एक्कावन्न मिनिटं कॅमेऱ्यामार्फत ऑनलाईन त्यांनी तपासणी केली. डॉक्टरांनी काही सजेशन दिले, काही व्यायाम सांगितले. त्यानंतर आठवड्याभरात करंदीकरांना बरं वाटलं. हा तंत्रज्ञानाचा फायदा आहे, आणि शिक्षणासाठी आपण त्याचा उपयोग करून घ्यायला हवा.
शिक्षक म्हणून मला प्रश्न पडतो की, भारतामध्ये हे आधुनिक तंत्रज्ञान आलं, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वापर सुरू झाला. मग मोबाईल आले. आता तर ॲन्ड्रॉइड मोबाईलमध्ये सर्वच सुविधा आहेत. पण हे तंत्रज्ञान कशासाठी याबद्दलची एक स्पष्टता असणं फार आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाचा आपल्याला नेमका काय फायदा करून घ्यायचाय हा विचार करायलाही वेळ जातो. याबाबत आपण किती संवेदनशील आहोत याविषयी माझ्या मनात शंका आहे. केवळ भारतच नव्हे तर जगासमोरील हा मोठा प्रश्न आहे.
‘तंत्रज्ञान आवश्यक, योग्य वेळी तातडीने वापरणं, तरीदेखील त्याच्या आहारी न जाणं’ या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तंत्रज्ञान तुमच्या जीवनशैलीचा भाग झालं पाहिजे. आणि जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या जीवनशैलीचा भाग होते तेव्हा मात्र आपण ती गोष्ट तारतम्याने हाताळू शकतो.
'तंत्रज्ञान आणि मानवी संवेदना' हा सुद्धा प्रश्न आहेच. मानवी संवेदनाच नसणारी तंत्रकुशलता काय कामाची? आपली उगवती पिढी-आपल्या घरातली बारकी-बारकी पोरं, पहिली-दुसरी, चौथीतली मुलं- फार सराईतपणे गॅझेट हाताळतात मग ते मोबाईल असो, कॉम्प्युटर असो की आणखी काही. ते फार टेक्नोसेव्ही होत चालले आहेत. पण मला काळजी अशी वाटते की, हे सगळे यांत्रिक तर होणार नाही ना? त्यांच्या मनाची ठेवण ज्या संवेदनशीलतेने व्हायला हवी तशा प्रकारची झाली नाही तर मानवी नातेसंबंध, समाज, कुटुंब या गोष्टी त्यांना कशा कळतील?
तांत्रिक गोष्टी तर कळायलाच हव्यात. व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून, कुटुंबाचा सदस्य म्हणून जीवन जगताना तुमच्याजवळ हा सगळा आऊटलूक असणं अतिशय गरजेचं असतं. पण ही मुलं दिवसेंदिवस यांत्रिक होत चालली आहेत.
‘अमूकला काही एक मदत केली पाहिजे किंवा माझ्याजवळ इतक्या गोष्टी आहे पण अमूकजवळ नाही तर त्याला यातील थोडं दिलं पाहिजे. माझ्या डब्यात आज दोन पदार्थ आहेत तर माझ्या मित्राला त्यातील काही थोडे मी दिले पाहिजे. माझ्या मित्राची आई शाळेच्या गेटवर भेटली तर तिच्याकडे बघून हसलं पाहिजे. तिला अभिवादन केलं पाहिजे.’ अशा संवेदना हळूहळू नाहीशा होऊ लागल्या आहेत. कारण आपल्या कुटुंबातूनच त्या हळूहळू कमी होत चालल्या आहे. आणि याकडे आपला पाहण्याचा दृष्टीकोन कसा तर ‘माझी मुलगी, माझा नातू हा किती स्मार्ट आहे.’
स्मार्टपणे तो मोबाईल हाताळतोय, मान्य आहे. त्यासाठी त्याचं कौतुकपण करू. त्याचबरोबर ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या देखील त्याला आल्या पाहिजेत हे पण बघू. माणूस म्हणून उभं राहण्यासाठी हे फार गरजेचं आहे. माझ्या मनात असा प्रश्न येतो की, हा मुलगा उद्या शिक्षक झाला. हायस्कूलमध्ये टिचर झाला किंवा कॉलेजमध्ये प्राध्यापक झाला तर हा कसा असेल?
तो शुष्क असता कामा नये. मला असं वाटतं की, तो जर इतका शुष्क असेल, एक शिक्षक म्हणून गरजेची असणारी मानवीयता त्याच्याजवळ नसेल तर तो फार चांगलं काम करू शकणार नाही. तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहेच आहे. काही गोष्टींकरता ते अपरिहार्यच आहे. पण शिक्षक म्हणून संवेदनशीलताही महत्त्वाची आहे.
तंत्रज्ञानामुळे गुगलमार्फत सगळी माहिती मिळते. पण त्या माहितीचं वर्गीकरण कसं करायचं? त्या माहितीचं विश्लेषण कसं करायचं आणि ते केल्यानंतर मी कशा प्रकारचे निष्कर्ष काढायचे? हे निष्कर्ष समाजजीवनाला, कौटुंबिक जीवनाला कसे फायदेशीर आहेत हे तुम्हाला शिक्षकच सांगू शकतो.
आपल्याकडे वेगवेगळी कौशल्ये सांगितलेली आहेत. जसे लिहिण्याचं कौशल्य, ऐकण्याचं कौशल्य बोलण्याचं कौशल्य. तंत्रज्ञानाचा वापर करत असताना, तुम्ही समाजजीवनात वावरत असताना तुम्हाला तुमच्या समाजजीवनाशी, भावनेशी, संवेदनेशी हे जोडून घ्यावं लागेल. ते जर आपल्याला जोडता आलं नाही तर कौशल्यामुळे आपल्याला माहिती मिळेल, भावनेचा ओलावा मिळणार नाही. तो ओलावा शिक्षकच देऊ शकतो.
एखादं आत्मचरित्र तुम्ही शिकवलं किंवा एखादी कविता तुम्ही शिकवली. ऑनलाईन शिकवली. विद्यार्थ्यांना त्याचा भावार्थ कळला. तुम्ही रसग्रहण केलं. विद्यार्थ्यांना ते कळलं. त्याच्यानंतर जर तुम्ही त्या कवीशी बोललं किंवा आत्मचरित्र लिहिणाऱ्या लेखकाशी बोललात तर तुम्हाला ती कविता किंवा आत्मचरित्र अधिक चांगल्या रीतीने कळू शकेल. व्हर्च्युअल क्लासरूममध्ये सगळे विद्यार्थी बसलेले आहेत आणि लेखकाला प्रश्न विचारताहेत आणि म्हणून ते अधिक चांगल्या पद्धतीनं कळतंय. हे पुरक अध्ययन असतं.
पण माझ्या दृष्टीनं एवढंच पुरेसं नाहीये. तर त्या शिक्षकाने त्या व्हर्च्युअल क्लासरूमच्या बाहेर जाऊन त्या लेखकासोबत आणि कवीसोबत त्याच्या विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणला पाहिजे. हेच विद्यार्थी जर त्या लेखकासोबत दोन तास राहिले किंवा दिवसभर राहिले तर त्या विद्यार्थ्यांना एक वेगळा संस्कार मिळतो. एक वेगळा दृष्टिकोण मिळतो. इतका मोठा लेखक पण तो कसा बोलतो, किती संयमानं उत्तरं देतो, उच्चार किती चांगले आहेत. आपल्याशी चर्चा करत असताना त्या लेखकाचा एक मित्र आला तर त्याला त्यांनी सांगितलं की, दहा मिनिट तू बैस मी या विद्यार्थ्यांशी बोलतोय. मग मुलांना असं वाटतं की, यांनी आपल्याला प्राधान्य दिलंय, मित्राला नाही. हे सगळं वर्गाबाहेरच होऊ शकतं. नवीन तंत्रज्ञानात तुम्हाला माहिती मिळते. अनेक गोष्टी कळतात. पण त्या अधिक सखोलपणे समजून घेण्यासाठी तुम्हाला शिक्षक आणि विद्यार्थी संवाद घडवावाच लागतो.
गणित किंवा सांख्यिकी यांसारख्या काही विद्याशाखा अशा आहेत जिथे विद्यार्थी शिक्षकांच्या सानिध्यात गेले नाही तरी चालतं. पण भाषा इतकी कोरडी नसते. भाषेचं एक सौंदर्य असतं. भाषेत एक ओलावा असतो. भाषा ही भावना आणि विचार प्रकट करण्याचं माध्यम आहे. हे ऑनलाईन नाही मिळत. तुम्हाला त्याच्यासाठी एक वेगळं वेळापत्रक करावं लागेल. म्हणजे ऑनलाईन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन काही गोष्टी करणं आणि त्याच्या बरोबरीनं काही वेगळं वेळापत्रक आखून शिक्षक आणि विद्यार्थी संवाद घडवणं गरजेचं आहे. ‘मानवी संबंध आणि संवाद’ हे साहित्याच्या आणि भाषेच्या अभ्यासात अतिशय महत्त्वाचं आहे. मी केवळ मराठी साहित्याबद्दल बोलत नाही. म्हणजे कोणतंही साहित्य असो संवाद होणं फार महत्त्वाचं आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पूर्वी बहिःस्थ विद्यार्थी म्हणून नोंदणी व्हायची. मुलं एम. ए. ला ॲडमिशन घ्यायची, एम. ए. मराठी फर्स्टक्लासमध्ये पास व्हायची. वर्गाचा आणि विद्यार्थ्यांचा संबंध नसायचा. बाहेरून पुस्तकं विकत घ्यायची, नोटस् घ्यायच्या, अभ्यास करायचा आणि प्रश्नांची उत्तरं लिहायची. त्या विद्यार्थ्यांना साहित्यामध्ये फार गती नसायची. त्यांना काही कळायचंही नाही.
मी विद्यार्थ्यांना नेहमी असं म्हणतो की, ‘तुम्ही जेव्हा वर्गात येता आणि एम. ए. साठी दोन वर्षे खर्ची टाकता तेव्हा ती तुमची गुंतवणूक आहे. तुम्ही विद्यापीठातून बाहेर पडल्यावर तुमच्या लक्षात येईल की, वर्गामध्ये तुम्ही काय शिकलेला आहात?’
कुठल्यातरी एखाद्या कवितेच्या निमित्ताने, एखाद्या कथेच्या निमित्ताने जेव्हा शिकवणारा शिक्षक तुम्हाला सबंध समाजवास्तवाचं आकलन करून देतो. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीचं परिप्रेक्ष्य सांगतो. त्या सगळ्या घटकांचा कसा विचार करायचा याचा दृष्टीकोन देतो तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक प्रकारची खोली हळूहळू प्राप्त होत असते.
विद्यार्थ्यांनी विचार कसा करायचा? कशा पद्धतीने करायचा? आणि ज्याला मी फ्रेश थिंकिंग म्हणतो, अगदी ताजा विचार, जो दुसरा कोणी करू शकत नाही, तो माझ्या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. हे तुम्हाला संवादातून करता येतं. आणि ते एका दिवसात किंवा एका महिन्यात होत नाही. त्याला वर्ष दोन वर्ष जावी लागतात. म्हणून वर्गातला संस्कार, वर्गाबाहेरचा संस्कार याचं एक वेळापत्रक करावं लागेल. त्याच्याबरोबर आधुनिक नवीन तंत्रज्ञान आहेच. त्याचा वापर करावा लागेल. त्याचं स्वतंत्र वेळापत्रक करावं लागेल. म्हणजे बदलत्या काळामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी अगदी काळजीपूर्वक विचारात घेऊन साहित्याच्या किंवा भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा अधिक व्यापक बोलायचे झाले तर मानवविद्या शाखा- ज्याला आपण ह्युमॅनिटीज ब्रँच म्हणतो- त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला हे करावं लागेल. मग त्याच्यामध्ये समाजशास्त्र आलं. मानवशास्त्र आलं. इतिहास आलं. अर्थशास्त्र आलं. सगळ्या भाषा आल्या. म्हणजे एका बाजूला आधुनिक तंत्रज्ञान आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थी-शिक्षक संवाद. या पद्धतीनं तुम्हाला जावं लागेल.
याआधी आपण फक्त पारंपरिक पद्धतीने वर्गात शिकवत होतो. तर त्या अध्यापनाला आपल्याला या नवीन तंत्रज्ञानाची जोड देताना तो विद्यार्थी शुष्क न होता तो सेन्सेबल झाला पाहिजे याची काळजी घ्यावी लागेल. अशा पद्धतीनं आपल्याला पुढं जावं लागेल.
प्रत्यक्ष तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हे मी नाही सांगितलेलं. कारण ते आपल्याला करता येईल. ते शिकता येईल. माझा मुद्दा असा होता की, तंत्रज्ञानाचा वापर करत असताना काय गुंतागुंत निर्माण होऊ शकते आणि त्याचा विचार आपण कसा केला पाहिजे.
शिक्षणव्यवस्थेमधून बाहेर पडणारा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक असतो. तो देशाचा आधारस्तंभ असतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वंकष विकास झाला पाहिजे. त्याचा विकास एकारलेला असता नये. केवळ तंत्रज्ञानावर आधारित विकास होऊ नये. तर त्याच्या बरोबरीने सामाजिक व कौटुंबिक विकासही झाला पाहिजे. मला वाटतं अशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे.
(शब्दांकनः ज्योत्स्ना खंडागळे, भिकचंद लांडे)
- डॉ. मनोहर जाधव
manohar2013@gmail.com
(वक्ते, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे मराठीचे वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)
या बीजभाषणाचा व्हिडिओ येथे पाहता येईल.
Tags: शिक्षण मनोहर जाधव वेबीनार उच्चशिक्षण Speech Manohar Jadhav Webinar Education Corona Load More Tags
Add Comment