1 मे 1922 ते 8 जानेवारी 1995 असे 72 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या मधु लिमये यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला, तुरुंगवास भोगला. भारतातील समाजवादी चळवळीतील पहिल्या पिढीचे प्रमुख नेते व विचारवंत अशी त्यांची ओळख राहिली आहे. त्यांनी 1994 मध्ये Janata Party Experiment या शीर्षकाखाली इंग्रजीत साडेबाराशे पानांचा द्विखंडात्मक ग्रंथ लिहिला होता. त्या बृहदग्रंथाचा मराठी अनुवाद 'जनता पक्षाचा प्रयोग' या नावाने चार खंडांत प्रथमच प्रकाशित होत आहे. केशव गोरे स्मारक ट्रस्ट व साधना प्रकाशन यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या या चार खंडांचे प्रकाशन व त्या निमित्ताने एक परिसंवाद एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे सभागृह, नवी पेठ, पुणे येथे शनिवार 3 जून 2023 रोजी, सायंकाळी 6 वाजता आयोजित केला आहे. परिसंवादाचा विषय आहे - आघाड्यांचे राजकारण : सद्यस्थिती व भवितव्य. विनय हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात सुहास पळशीकर आणि किशोर बेडकिहाळ हे दोन प्रमुख वक्ते आहेत.
साथी मधु लिमये यांची नुकतीच जन्मशताब्दी झाली. यानिमित्ताने देशभरातील समाजवादी साथी आणि त्यांच्या चाहत्यांनी 1 मे 2021 ते 1 मे 2023पर्यंत साथी मधु लिमये यांची जन्मशताब्दी वर्षे साजरी करण्याचे ठरवले. यानिमित्ताने अनेक ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत.
साथी मधु लिमये हे समाजवादी चळवळीतील नेते आणि प्रखर विचारवंत होते. त्यांची संसदीय कारकीर्दही असाधारण होती. कोणत्याही प्रश्नाचे किंवा मुद्द्याचे सम्यक आकलन करून घेऊनच ते आपली मते बनवत असत. तसेच नवीन माहिती किंवा तथ्ये किंवा तर्क उपलब्ध झाल्यास आपली मते आणि धोरणे बदलण्यास त्यांना कमीपणा वाटत नसे. संसदीय कारकिर्दीत आणि सर्वोच्च न्यायालयात स्वतः लढवलेल्या खटल्यांमध्ये त्यांचे प्रतिपादन सदोष असल्याचे कधीही सिद्ध झालेले नाही.
भारतीय राजकारणाच्या परंपरेत राजकीय कार्यात सक्रिय राहून ग्रंथ निर्मिती करण्याची परंपरा आहे. लोकमान्य टिळक, चक्रवर्ती राजगोपालचारी, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राममनोहर लोहिया यांच्यानंतर मधु लिमये यांचा उल्लेख करणे वावगे ठरणार नाही. मधु लिमये यांनी पक्ष कार्य करताना अनेक लेख, पुस्तिका, प्रचार पत्रके लिहिली. नियतकालिकांत व वर्तमानपत्रांत लेखन केले. सक्रिय राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर 12 वर्षांत त्यांनी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यांची एकंदर 38 इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध आहेत.
लिमये यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या निवडक ग्रंथांचा मराठी अनुवाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक चर्चांमधून (ज्यामध्ये जयंत धर्माधिकारी यांनी केशव गोरे स्मारक ट्रस्टचे प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला) प्रारंभी पाच पुस्तकांचा मराठीत अनुवाद करून घेऊन ती प्रकाशित करण्याचे ठरले. ‘रिलिजस बिगट्री : अ थ्रेट टू ऑर्डर्ड स्टेट’ (प्रकाशन : 1994) आणि लिमिट्स ऑफ ॲथॉरिटी (प्रकाशन : 1994) या दोन पुस्तकांतील निवडक लेखांतून ‘धर्मांधता : राज्यसंस्थेवरील घोर संकट’ हे मराठी पुस्तक निर्माण झाले आहे. ‘बर्थ ऑफ नॉन काँग्रेसिझम’ (प्रकाशन : 1988) या पुस्तकाचे मराठी रूपांतर ‘जन्म बिगर-काँग्रेसवादाचा’ या शीर्षकाखाली दोन भागांमध्ये प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ‘जनता पार्टी एक्सपरिमेंट खंड 1 आणि 2’ (प्रकाशन : 1994) या दोन खंडांचा मराठीत अनुवाद ‘जनता पक्षाचा प्रयोग’ चार भागात प्रकाशित करण्याचे ठरले. ही पुस्तके केशव गोरे स्मारक ट्रस्ट आणि साधना प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित होतील.
मधु लिमये 1939 ते 1982 पर्यंत पूर्ण वेळ सक्रिय राजकारणात होते. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्य आणि त्या वेळच्या राजकारणाला विटून त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. त्यानंतर जवळ जवळ 12 वर्षे म्हणजे 8 जानेवारी 1995 रोजी त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी विपुल लिखाण केले. सक्रिय राजकारणातील निवृत्तीनंतर देशासमोरील महत्त्वाच्या समस्यांवर आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर त्यांचे वाचन, मनन, चिंतन आणि लेखन चालूच होते. आपला देश प्रगत होण्यासाठी, नागरिकांना स्थैर्य, शांतता आणि सुबत्ता प्राप्त होण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत निर्माण झालेली मूल्ये, भारतीय संविधान आणि संसदीय लोकशाहीच्या पायावर उभी असलेली देशाची राज्यसंस्था संकटात येता कामा नये, अशी मधु लिमये यांची धारणा होती आणि त्याबाबत ते कायम जागरूक असत. निवृत्तीनंतरच्या काळात त्यांची बांधिलकी कुठल्याही राजकीय पक्षाशी न राहता केवळ त्यांच्या स्वतःच्या मूल्यांशी, तत्त्वांशी आणि स्वातंत्र्य चळवळीतून निर्माण झालेल्या ‘आयडिया ऑफ इंडिया’शी होती. भारतीय संविधानावर आधारित संसदीय लोकशाहीवर त्यांची दृढ श्रद्धा होती.
लिखाण आणि शैली
मधु लिमये यांचे 1948 ते 1982 या काळातील लिखाण हे सक्रिय राजकीय नेत्याचे लिखाण आहे. त्यामध्ये लेख, निबंध, पुस्तिका आणि कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी केलेली भाषणे आहेत. त्यामध्ये संकल्पनांचे स्पष्टीकरण, तर्क, तथ्ये आणि आकडेवारी यांचा समावेश असला, तरीही पक्षाची विचारसरणी आणि पक्षाची रणनीती आणि राजकारण डोकावते. या लेखनात आक्रमक राजकीय अभिनिवेश आणि प्रचारकी दृष्टीकोन आढळून येतो.
मात्र 1983 पासूनचे त्यांचे लिखाण वेगळे रूप धारण करते. निवृत्त ज्येष्ठ नेता, मूलगामी विचार करणारा तत्त्वज्ञ, अभ्यासक आणि चिंतक या रूपाने प्रश्नांकडे एका विशाल परिप्रेक्ष्यातून साक्षीभावाने बघत आहे, असे आपल्याला जाणवते. हे लिखाण जास्त तपशीलवार आहे. त्यात वाचकांच्या प्रबोधनाकरता संदर्भ ग्रंथांची आणि तळटीपांची रेलचेल आहे. इथे लिमये आपली मते, मूल्ये, निष्कर्ष वाचकांवर लादत नाहीत. ते ऐतिहासिक आणि तत्कालीन संदर्भांच्या मदतीने उदाहरणांसहित वाचकांच्या विचारशक्तीला आणि विवेकबुद्धीला चालना देण्याचे काम करतात.
वैचारिक लेखनात प्रतिपादनासाठी साधारणपणे दोन पद्धतींचा वापर केला जातो. पहिल्या पद्धतीत - तथ्ये, उदाहरणे, आकडेवारी, तर्क आणि युक्तीवादाचा वापर करून लेखक क्रमाक्रमाने वाचकाला आपल्या निष्कर्षाप्रत आणून सोडतो. दुसऱ्या पद्धतीत - लेखक प्रारंभीच आपला निष्कर्ष मांडतो आणि तो सिद्ध करण्यासाठी उदाहरणे, तथ्ये, तर्क आणि युक्तीवादाचा वापर करतो. लेखाचा समारोप करताना पुन्हा एकदा निष्कर्ष वाचकांपुढे मांडतो. मधु लिमये यांची पद्धत साधारणतः टप्प्याटप्प्याने वाचकाला आपल्या निष्कर्षाप्रत आणण्याची आहे. या पद्धतीत दोन फायदे असतात. एक - लेखक वाचकाला विचार करायला प्रवृत्त करून दिशा देतो आणि दुसरे - म्हणजे लेखनातील प्रतिपादन सशक्त असले, तर लेखकाचा निष्कर्ष वाचकाला मनापासून पटण्याची शक्यता वाढते.
मधु लिमये यांच्या इंग्रजी लेखनात अनेकदा संमिश्र आणि लांबलचक वाक्यरचना असते. या रचनेत दोन किंवा अधिक तथ्ये, संकल्पना आणि विचार जोडून वाचकांपुढे ते काही नवे, वेगळे प्रस्तुत करतात. यातील वेगळेपण समजून घेण्यासाठी या लेखनशैलीशी मैत्री करावी लागते. या पुस्तकांच्या अनुवादकांनी ही आव्हाने पेलली आणि या लेखनशैलीशी मैत्री करून मराठी वाचकांसाठी ती अधिकाधिक सुबोध होतील असा अनुवाद केला.
धर्मांधता : राज्यसंस्थेवरील घोर संकट
या पुस्तकामध्ये मधु लिमये यांचे पाच प्रदीर्घ लेख आणि एक परिशिष्ट यांचा समावेश आहे. पहिला लेख ‘भारतातील वाढत्या धार्मिक कट्टरतेचा लेखाजोखा’. हा 1991 मध्ये लिहिला होता आणि त्याचे पुनर्लेखन 1993 मध्ये केले. बाबरी मशीद तोडल्यानंतर 1992च्या दंगलीपर्यंत येऊन हा लेख थांबतो. या लेखात फाळणीपूर्व काळापासून हिंदू-मुस्लिम संबंधांचा अनेक अंगांनी आढावा घेतला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील मुसलमानांचे नोकऱ्यांतील प्रमाण, फाळणीनंतर झालेला बदल, त्यांच्यामधील प्रागतिक नेतृत्वाची वानवा आणि राष्ट्रीय पातळीवरील मुसलमानांच्या बदलत्या भूमिका तर दुसरीकडे हिंदू कोडबिलाला झालेला विरोध, हिंदूंचे उघड झालेले सनातनत्व, विश्व हिंदू परिषदेचे कार्य, अयोध्या-बाबरी मशीद विवाद अशा विविध बाबींचा यात समावेश आहे. यातील प्रत्येक घटनेतील काँग्रेस आणि विरोधी पक्षांची भूमिका, कार्यक्रम आणि धोरणानुसार निवडणुकीतील पक्षांच्या आकडेवारीत झालेला बदल या सर्वांचा सविस्तर आढावा घेत लिमये यांनी बदलत्या समाज परिस्थितीचा वेध घेऊन सांप्रदायिक कट्टरतेचे देशाला असलेले धोके आणि विद्ध्वंसक धार्मिक तणाव दूर करायचा झाल्यास काय करावे लागेल, याची सखोल चर्चा केली आहे.
‘विविध संस्कृतींमधील संघर्ष आणि भारत’ या लेखात जगातील ख्रिश्चन - मुस्लिम संस्कृतीतील संघर्षाचा आढावा घेत, त्यातील अमेरिका आणि रशिया यांच्या परस्पर विरोधी भूमिका त्यांनी विशद केल्या आहेत. जगातील या घटनांचा आपल्या देशावर परिणाम होऊ न देता सहिष्णुता, समन्वय आणि सलोखा टिकवण्यासाठी आपण काय करायला हवे, याचे स्पष्ट मार्गदर्शन ते करतात.
मधु लिमये यांनी 1939मध्ये पूर्ण वेळ राजकीय कार्य सुरू केले, तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा यांसारख्या हिंदुत्ववादी संघटनांबद्दल आणि त्यांच्या राजकारणाबाबत लिमये यांच्या विचारांत आणि भूमिकेत स्पष्टता होती. या पुस्तकातील ‘संघ परिवार आणि गोळवळकर गुरुजींची विचारसरणी’ हा लेख गोळवळकर गुरुजींच्या विचारांच्या आधारे संघ परिवाराचे खरे स्वरूप उघड करतो. संघ परिवाराची राजकीय भूमिका विशद करून सांगतो, ज्यामुळे संघ परिवाराने भारतीय संविधानाची मूलतत्त्वे कधीही प्रामाणिकपणे आणि मनापासून मानली नाहीत, हे लिमये दाखवून देतात. लेखाच्या शेवटी मधु लिमये म्हणतात, ‘ज्या दिवशी संघ परिवार आपल्या अंतिम उद्दिष्टापर्यंत पोहोचेल, तोवर देश आणि संविधानावर आधारलेल्या देशातील सुसंघटित राज्यसंस्थेचे नामोनिशाण राहणार नाही.’
‘धर्माच्या दुरुपयोगाविरुद्ध कायदे कानून करणे किती उपयुक्त आहे?’ हा लेख 1993 मध्ये लिहिलेला आहे. संसदीय लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांच्या बदलत्या भूमिका, त्यातून निर्माण होणारे धर्मासंबंधीचे कायदे कानून, त्यांचा देशाच्या जनतेवर होणारा परिणाम यांची चर्चा या लेखात आहे. लिमये यांनी विषयाची मांडणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून नेत्यांच्या धर्मविषयक भूमिका मांडून केली आहे. जगातील धर्म आणि राज्यसंस्थांच्या संबंधांचा आढावा घेतला आहे. भारतीय विविधतेची सहिष्णू परंपरा त्यांनी मांडली आहे. तत्कालीन घटना दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा केली असून कुचकामी कायदे करू नये, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.
या पुस्तकातील शेवटचा प्रदीर्घ लेख ‘तथाकथित पवित्र धर्मयुद्धे’ हा आहे. जगभरात विविध धर्मांत आणि पंथांमध्ये एकमेकांविरुद्ध युद्ध करण्याची परंपरा आहे. ख्रिस्ती धर्मियांनी मुस्लिमांच्या विरुद्धच्या युद्धास ‘क्रुसेड्स’ हे नाव दिले, तर मुसलमानांनी धार्मिक युद्धांसाठी ‘जिहाद’ हा शब्द वापरला. हिंदू-बौद्ध धर्मीयांमध्ये युद्धे झाली. जैन आणि वैष्णवांच्या विरोधात हिंसाचार झाला. सर्वांनी एकमेकांच्या धर्मस्थळांची नासधूस केली. या सर्व जागतिक धार्मिक संघर्षांचा तपशीलवार ऐतिहासिक आढावा मधु लिमये यांनी घेतला आहे. या संघर्षांमागची कारणे, संघर्षांनंतर निर्माण झालेली स्थिती, त्यांचे समाजावर होणारे परिणाम यांची सविस्तर चर्चा लेखांमध्ये केली आहे. यातील कोणत्याही संघर्षातून शांतता निर्माण झाली नाही, उलट द्वेषच वाढत गेला. कट्टरता वाढत गेली. जनतेला विद्ध्वंसाला सामोरे जावे लागले. भारताच्या संदर्भात अशाच विद्ध्वंसक कट्टरतावादाची परंपरा मुस्लिम सांप्रदायिक चळवळी आणि संघ परिवार चालवत असून त्यांच्याबद्दल सावध राहण्याचा इशारा देऊन लिमये सर्व सहिष्णुतावादी आणि उदारमतवादी शक्तींना एकत्र येण्याचे आवाहन करतात. या लेखाचा आवाका आणि दिलेले संदर्भ वाचकाला थक्क करतात.
या पुस्तकाच्या शेवटी एक परिशिष्ट जोडले आहे. शीर्षक आहे ‘गर्व से कहो’. ज्या हिंदू आणि मुसलमान धर्मियांना आपल्या धर्माबद्दल अवास्तव ‘गर्व’ असेल, अशा प्रत्येकाला विचार करायला लावणारे प्रश्न इथे विचारले आहेत.
मधु लिमये लिखित 'धर्मांधता : राज्यसंस्थेवरील घोर संकट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
जन्म बिगर-काँग्रेसवादाचा
हे दोन भागांतील पुस्तक 1947 ते 1975 मधील भारतीय राजकारणाचा आढावा घेते. या कालखंडातील राजकारणावर काँग्रेस पक्षाच्या बाजूने जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा सर्वांत जास्त प्रभाव पडला आहे, तर विरोधी पक्षांच्या बाजूने डॉक्टर राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांचा प्रभाव आहे. समाजवादी चळवळीची 1950च्या दशकातच पडझड सुरू होऊनही, संख्याबळाने कमी असलेल्या समाजवादी चळवळीच्या या दोन नेत्यांचा त्यांचे विचार आणि कृतिशीलता यामुळे राजकारणावर मोठी छाप पडणे; ही मोठी लक्षणीय बाब होती, याकडे लिमये वाचकांचे लक्ष वेधतात. 1947 आधीचे क्रांतिकारक जवाहरलाल नेहरू आणि स्वातंत्र्य चळवळीतून सुसंघटीत आणि प्रबळ झालेली काँग्रेस, सत्तेवर आल्यानंतर, हळूहळू नेहरू आणि काँग्रेस यथास्थितीवादी होत गेले. त्यांच्या हातून काही नवे, काही आर्थिक-सामाजिक परिवर्तन घडेल अशा आशा मावळल्या. 1962 मध्ये चीनशी युद्ध हरल्यानंतर जवाहरलाल नेहरूंबद्दल संपूर्ण भ्रमनिरास झाला. आपल्या एकेकाळच्या आवडत्या नेत्याने देशावर नामुष्की ओढवली, म्हणून डॉक्टर लोहिया संतापाने नेहरू आणि काँग्रेसवर तुटून पडले.
पहिल्या तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये (1951-52, 1957 आणि 1962 मध्ये) देशात केवळ 44% ते 48% दरम्यान मते मिळवूनसुद्धा दर वेळी काँग्रेस पक्षाला लोकसभेत दोन तृतीयांश पेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्याच वेळी कोणत्याही एका विरोधी पक्षाला 11% सुद्धा मते मिळाली नाही. त्या वेळच्या सुसंघटीत प्रबळ काँग्रेस पक्षाला कुठलाही राजकीय पक्ष एकट्याने कधीच शह देऊ शकत नाही, हे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे राजकीय आकांक्षा असलेल्या नेत्या-कार्यकर्त्यांचा सत्ताधारी काँग्रेसकडे ओघ सुरूच होता. दीर्घ काळपर्यंत (15 वर्षांपेक्षा अधिक काळ - 1947 ते 1962 आणि नंतरही) एका बलाढ्य आणि सुसंघटित पक्षाकडे केंद्रात सत्तेची मक्तेदारी असणे हे लोहियांच्या मते देशाला, जनतेला आणि लोकशाहीला अतिशय मारक होते. ती मक्तेदारी मोडून काढायला मतांचे विभाजन टाळणे आवश्यक आहे, हे करण्याचा मार्ग बिगर-काँग्रेसवाद होता. सुरुवातीला लिमये यांचा बिगर-काँग्रेसवादाला तीव्र विरोध होता. परंतु एकदा डॉ. लोहियांच्या नेतृत्वाखाली बिगर-काँग्रेसवादाच्या रणनीतीचा आणि धोरणाचा स्वीकार केल्यावर, राजकीय परिस्थितीमुळे लिमयांना त्यांच्या सक्रिय राजकीय कारकिर्दीच्या अखेरपर्यंत बिगर-काँग्रेसवाद राबवावा लागला.
1963 ते 1967 मध्ये बिगर-काँग्रेसवादाची फळी उभारण्याचे काम सुरू झाले. 1967च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला शह देऊन बिगर-काँग्रेस पक्षांची म्हणजे संयुक्त विधायक दलाची सरकारे काही राज्यांमध्ये सत्तेवर आली. विरोधी युतीला संसदेतही आधीपेक्षा बऱ्याच जास्त जागा मिळाल्या आणि काँग्रेसचे बहुमत कमी झाले. बिगर-काँग्रेसवादाचे कोणते दूरगामी राजकीय परिणाम झाले? सत्ताधारी काँग्रेस पक्षावर कोणते परिणाम झाले? त्यातील ताणतणावातून काँग्रेस पक्षाने कोणते निर्णय घेतले? याची सविस्तर आणि सांगोपांग चर्चा मधु लिमये यांनी या दोन खंडात केली आहे. हे पुस्तक 1988 मध्ये प्रकाशित झाले होते. वर उल्लेखल्यानुसार बिगर-काँग्रेसवादाच्या संपूर्ण प्रक्रियेत मधु लिमये यांचा सक्रिय सहभाग होता. मात्र घडून गेलेल्या घटनांचे अतिशय तटस्थपणे आणि परखड विश्लेषण लिमये करतात. वेळप्रसंगी अगदी स्वतःच्या भूमिकेचीसुद्धा झाडाझडती घेतात.
मराठी अनुवाद करताना, वाचकांच्या सोयीसाठी या पुस्तकाचे दोन भाग केले आहेत. पहिल्या भागात बिगर-काँग्रेसवादाचा 1968 पर्यंतचा पहिला टप्पा आहे, ज्यामध्ये बिगर-काँग्रेसवादाच्या नाट्याचे नायक डॉक्टर राममनोहर लोहिया आहेत. या पहिल्या भागात डॉक्टर राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांचा राजकीय वैचारिक प्रवास, दोघांचे गुणविशेष आणि परस्परांतील नाते यांचा समाजवादी चळवळ आणि देशाच्या राजकारणावर झालेला परिणाम यांचे सुरेख विश्लेषण मधु लिमये यांनी केले आहे.
जयप्रकाश नारायण, त्यांच्या पत्नी प्रभावती, यूसुफ मेहरअली आणि डॉ.राममनोहर लोहिया
दुसरा भाग 1968-69 पासून सुरू होतो. काँग्रेसच्या अंतर्गत दुफळीच्या वेळी अस्थिर झालेले इंदिरा गांधींचे सरकार विरोधकांतील काही पक्षांच्या पाठिंब्यावर टिकून राहिले. त्या काळात इंदिराजींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थानिकांचे तनखे बंद करणे असे प्रागतिक निर्णय घेतले. या निर्णयांना पुरोगामी पक्षांचा पाठिंबा हे एक कारण असले, तरी सर्व श्रेय इंदिराजींना मिळाले. त्याचबरोबर 1971च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिराजींनी ‘गरिबी हटाव’ची घोषणा केली. काही विरोधी पक्षांनी ‘बडी आघाडी’ स्थापन करूनही त्यांचा दारुण पराभव झाला. बांगलादेशाच्या मुक्ती युद्धानंतर इंदिराजींची लोकप्रियता शिगेला पोचली.
मात्र त्यानंतर देशातील भडकलेल्या प्रश्नांना तोंड द्यायला काँग्रेस पक्ष अयशस्वी होत गेला. या काळात इंदिरा गांधींनी काँग्रेस संघटनेला आणि नेतृत्वाला खच्ची केले. बळाचा वापर करून रेल्वे संप मोडून काढला. लोकांच्या हलाखीत वाढ होत गेली. गुजरात आणि बिहार आंदोलनाचा उदय झाला. या आंदोलनांमध्ये पक्षीय राजकारणापासून दूर गेलेल्या जयप्रकाश नारायण यांनी प्रवेश केला. इंदिरा गांधी यांच्याविरुद्ध अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय पूर्णतः बाद न ठरवल्याने आपली सत्ता टिकवण्याकरता त्यांनी आणीबाणी जाहीर केली. इथे दुसऱ्या खंडाचा समारोप होतो.
जनता पक्षाचा प्रयोग
इंग्रजीतील Janata Party Experiment या दोन खंडांचे मराठी वाचकांच्या सोयीसाठी चार खंडांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय आम्ही घेतला. जन्म बिगर-काँग्रेसवादाचा हे दोन भागांतील पुस्तक 1947 ते 1975 मधील भारतीय राजकारणाचा आढावा घेते. त्या पुस्तकाचा कालखंड जिथे संपतो, तिथून ‘जनता पक्षाचा प्रयोग’ या पुस्तकाचा काळ सुरू होतो. आणीबाणी जाहीर करण्यापूर्वीच इंदिरा गांधींना विरोध करायला विरोधी पक्षांनी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. आणीबाणी जाहीर होते आणि विरोधी पक्षातील नेते व कार्यकर्त्यांची जेलमध्ये रवानगी होते. लोकसभेची मुदत दुसऱ्यांदा वाढवूनही 1977 मध्ये इंदिरा गांधी निवडणुका जाहीर करतात आणि पुन्हा एकदा विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुका लढवण्याच्या हालचाली सुरू होतात.
यावेळी या नाट्याचे प्रारंभीचे नायक आहेत जयप्रकाश नारायण. त्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्ष स्थापन होतो. 1977च्या लोकसभेच्या निवडणुकीत जनता पक्षाला बहुमत प्राप्त होते. इंदिरा गांधींसारख्या बलाढ्य व्यक्तिमत्त्वाला निवडणुकीत हार पत्करावी लागते. आजपर्यंत विरोधी पक्षात असलेले नेते संसदेतील सत्ताधारी पक्षाच्या आसनावर बसतात. अटलबिहारी वाजपेयी, चौधरी चरण सिंग, बाबू जगजीवन राम, मधु लिमये आणि चौधरी देवी लाल.
सत्तेत आल्यानंतर या नेत्यांना झालेला आनंद त्यांना वास्तवापासून दूर नेतो का? ते सूडभावनेने वागू लागतात का? सत्तेत आल्याबरोबर जनता पक्षांतील नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांना आणि आंतरिक हेव्यादाव्यांना ऊत आला का? या सगळ्यांचे परिणाम काय झाले? मुळात वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र येऊन- त्यातही जनसंघ आणि संघ परिवार - ज्यांचा इतिहास आणि विचारसरणी इतरांपेक्षा अगदी वेगळी होती - त्यांचे खरोखरच संघटनात्मक ऐक्य आणि मनोमिलन झाले होते का? या सत्तेच्या राजकारणात कोणकोणत्या वैचारिक, वर्गीय आणि जातीय जाणिवा प्रखर झाल्या होत्या? जनता पक्षाच्या अडीच वर्षांच्या काळात त्या सरकारने कोणते लक्षणीय जनहिताचे आणि लोकशाही टिकवण्याचे निर्णय घेतले? या आणि अशा अनेक मुद्द्यांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण मधु लिमये यांनी केले आहे.
जनता पक्षाच्या अडीच वर्षांच्या प्रयोगात मधु लिमये उच्च पातळीवर सहभागी होते हे सर्वश्रुत आहे. या खंडांचे लिखाण 1990 ते 1992 मधील आहे. या पुस्तकांच्या लिखाणाच्या वेळी वृत्तपत्रे, नियतकालिके किंवा उपलब्ध दस्तावेज आणि मुख्य म्हणजे इतर कोणालाही उपलब्ध न झालेल्या कागदपत्रांचा-दस्तावेजांचा त्यांनी आधार घेतला आहे, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. या पुस्तकांतील तळटीपा अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यांचे सिंहावलोकन करताना लिमये यांनी विवेचनाबरोबर आपली मते आणि निष्कर्षही मांडले आहेत.
जनता पक्षाची निर्मिती आणि अखेर हे सर्वच एका रोमांचकारी सिनेमाच्या पटकथेसारखे आहे. मधु लिमये यांनी या नाटकातील रोमांचकता टिकवून ठेवत, त्याचबरोबर अतिशय परखड आणि मूलगामी विश्लेषण केले आहे. आणीबाणीच्या दबावामुळे वेगवेगळ्या विचारसरणींचे पक्ष आपापसांतील वैचारिक मतभेद दूर न करता एक पक्ष म्हणून एकत्र आले, हे खरंच गरजेचे किंवा सुज्ञपणाचे होते का? या प्रश्नाची सविस्तर चर्चा करत स्वातंत्र्योत्तर राजकारणाचे फलित मधु लिमये शेवटच्या प्रकरणात मांडतात.
प्रासंगिकता
मधु लिमये यांच्या एकंदर अडतीस इंग्रजी पुस्तकांपैकी हीच पाच पुस्तके आम्ही मराठी अनुवादासाठी प्रथमतः का निवडली? असा प्रश्न वाचकांच्या मनात उपस्थित होणे नैसर्गिक असल्याने, याबाबत आमची भूमिका मांडणे गरजेचे आहे.
भारताची स्वातंत्र्य चळवळ ही संपूर्ण जगातील एक वेगळी घटना आहे. जनतेने शांततामय मार्गाने संघर्ष करून देशाला स्वातंत्र्य मिळवले. जनता जेव्हा शांततामय मार्गाने प्रतिकार करते, त्या वेळी जनता सर्वसमावेशक आणि सहिष्णू बनत जाते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेला राष्ट्रवाद हा सहिष्णू, सर्वसमावेशक आणि विविधतेचा आदर करणारा आहे. कोणाशीही शत्रूत्व न करणे, हे स्वातंत्र्य चळवळीतून निर्माण झालेल्या राष्ट्रवादाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय संविधानाला हा वारसा प्राप्त झाला आहे आणि त्यामुळेच विविध भाषा, वंश, जाती-धर्मांनी नटलेला हा देश अनेक संकटांमध्ये टिकून राहिला आहे. या मूल्यांना धक्का लागल्यास देशाचे अस्तित्व धोक्यात येईल, ही मधु लिमये यांची धारणा होती.
वांशिक किंवा धार्मिक बहुसंख्याकांची धारदार होत जाणारी अस्मिता ही अल्पसंख्याकांना भयग्रस्त बनवते, हा जगाचा इतिहास आहे. बहुसंख्याकांतील संप्रदायवादी आपल्या आक्रमकतेचे प्रदर्शन करून सत्ता स्थान काबीज करण्यात यशस्वी होतात, ही सर्वसमावेशक आणि सहिष्णु भारतीय संस्कृतीसाठी धोक्याची घंटा आहे. आज भारतातील अल्पसंख्याक निर्भयपणे आणि मुक्तपणे जगू शकतील का? या देशात सलोख्याचे वातावरण कायम राहील का? अशी शंका उपस्थित होत आहे. मधु लिमये यांनी हाच धोका या पाचही पुस्तकांतून व्यक्त केला आहे.
ही पुस्तके जरी वेगवेगळ्या विषयांची वाटत असली, तरीही त्यातील समान सूत्र हे आजच्या काळात निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीला भिडणारे आहे. ‘भारत हे एक राष्ट्र म्हणून कसे हवे’ यासंबंधी मूलभूत मतभेद असल्याने धर्मांधता वाढीस लागली, तसेच बिगर-काँग्रेसवाद फसला. जरी 1963-1970, 1977-1980 आणि 1988-1990 या तीन कालखंडात भारतीय राजकारणावर चांगले दूरगामी परिणाम करण्यात बिगर-काँग्रेसवाद फसला असला, तरी बलाढ्य काँग्रेस पक्षाची केंद्र सरकारवरची मक्तेदारी दूर करायला विरोधकांना पुनः पुन्हा त्याची गरज भासली आणि ते एक उद्दिष्ट तीनदा बिगर-काँग्रेसवादाने साध्य केले, ही गोष्ट नजरेआड करून चालणार नाही. एवढेच काय 1967 पासून भारताच्या राजकारणात विशेषतः निवडणुकांच्या आखाड्यात ‘युतीचे राजकारण’ हे एक कायमचे सूत्र झालेले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्टांनी दीर्घ काळपर्यंत बंगालमध्ये बिगर-काँग्रेसवाद आणि युती सरकार कसे सफलतापूर्ण चालवले आणि त्यातून इतरांनी काय धडे घ्यायला हवेत, हेही लिमये विशद करतात.
बिगर-काँग्रेसवादाने पक्षांच्या तत्त्वांना आणि ध्येयधोरणांना मुरड घातल्याचे परिणाम म्हणजे व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेकरिता तत्त्वहीन रणनीती अवलंबणे, हे राजकारणाचे सूत्र बनले. सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता लोप पावत चालल्याने मतभेद मान्य करूनही एकत्र काम करण्याची वृत्ती राहिली नाही. पर्यायाने व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आणि हेवेदावे राजकीय क्षेत्रांत प्रबळ झाले. विरोधकांचा द्वेष करण्याची परंपरा रूढ झाली. स्थानिक पातळीवर होणाऱ्या धार्मिक दंगली याच द्वेषातून सुरू होतात आणि हाच द्वेष ‘आयडिया ऑफ इंडिया’ या संकल्पनेच्या गळ्याला नख लावतो, ही खंत मधु लिमये वारंवार व्यक्त करतात. या देशात ‘आयडिया ऑफ इंडिया’ रुजून शांतता, सहिष्णुता आणि सहजीवन प्रस्थापित करायचे असेल, तर सत्तेमध्ये सर्व जाती-धर्मांचा सहभाग घडवून आणून सर्वांच्यात लोकशाही मूल्ये कशी रुजविता येतील, याची चर्चा मधु लिमये या पुस्तकांतून करतात.
गेली 8 वर्षे भारताच्या राजकारणात एक पक्ष बलाढ्य झाला आहे आणि कोणतेही राजकीय विधिनिषेध न पाळता, कोणत्याही मार्गाने विरोधकांचा निःपात करण्याचे राजकारण आणि आपल्या संविधानाने निर्मिलेल्या राज्यसंस्थेत मूलभूत बदल करण्याचे कार्य तो अविरत करत आहे. त्याचा पाडाव करायचा असेल, तर ‘जन्म बिगर-काँग्रेसवादाचा’ आणि ‘जनता पक्षाचा प्रयोग’ या पुस्तकांतून बरेच काही शिकण्यासारखे आहे, असे आम्हाला वाटते.
- अमरेंद्र धनेश्वर, अनिरुद्ध लिमये
amardhan@gmail.com
aniruddha.m.limaye@gmail.com
Tags: मधु लिमये मराठी जनता पक्ष राजकीय इतिहास साधना प्रकाशन समाजवाद इंदिरा गांधी आणीबाणी राजकारण Load More Tags
Add Comment