सांस्कृतिक समृद्धीसाठी सुरू असलेल्या ‘अंतर्नाद’ या मासिकाचं आणि त्या सोबतच स्वत: संपादक भानू काळे यांच्या प्रवासाचं अत्यंत प्रभावी दर्शन या पुस्तकात घडतं. मी स्वत: भानूंचा फॅन आहे. एक व्यक्ती म्हणूनही, संपादक म्हणूनही आणि लेखक म्हणूनही भानू हे एक विलक्षण रसायन आहे. पुस्तकातून आणि साधना साप्ताहिकाने घेतलेल्या दोन दीर्घ मुलाखतींतूनही त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचं मनोरम दर्शन घडतं. ‘साक्षेपी’ हा शब्द फार कमी लोकांविषयी वापरता येईल. भानूंचा विचार करताना आपल्याला या शब्दाचा कळालेला अर्थ योग्य आहे की नाही हे मी तपासून पाहिलं. ‘कार्य, अभ्यास आणि संशोधन यात सतत मग्न व्यक्ती’ असा अर्थ पाहिला आणि भानूंना ‘साक्षेपी’ हे विशेषण किती चपखलपणे लागू पडतं हे लक्षात आलं.
आजच्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य सदानंद मोरे सर, मुख्य पाहुणे, एम.के.सी.एलचे निर्माते व मार्गदर्शक विवेक सावंत आणि ज्यांच्या नावाची दुंदुभी गेले काही दिवस दिल्लीतही ऐकू येते आहे असे ‘अंतर्नाद: एका मासिकाचा उदयास्त’, लेखक भानू काळे, उपस्थित मंडळी आणि मित्रहो,
मी सुरुवातीच्या संबोधनातच पुस्तकाचा उल्लेख केला, कारण लेखकाइतकेच हे पुस्तकसुद्धा आजची सत्कारमूर्ती आहे. एखाद्या मासिकाच्या किंवा वृत्तपत्राच्या उदयास्तावर एखादा लेख किंवा पोस्ट वाचली असेल, पण मासिकाच्या उदयास्ताविषयीचं इतक्या साक्षेपी आशयाचं पुस्तक आजपर्यंत माझ्या तरी वाचनात आलेलं नाही. साक्षेपी अशा अर्थानं की, तन-मन-धन लावून वाढवलेलं अपत्यच होतं हे भानू काळे यांच्या दृष्टीनं. पण या संगोपनात त्याला लाडावून ठेवण्याऐवजी ते अपत्य आशयसंपन्न आणि निरोगी राहावं यासाठी त्यांनी जिवापाड मेहनत घेतली आणि ते अपत्य अंतर्धान पावल्यानंतर त्याच्याविषयी लिहिताना - एका पातळीवर ते पूर्ण गुंतलेले आणि भावुक झालेले असतानाही –समांतरपणे त्याची विवेकाधिष्ठित समीक्षा करायला व कठोर निरीक्षणे नोंदवायलाही ते विसरत नाहीत.
या कार्यक्रमाचं औचित्य अनेक प्रकारचं व अनेक पातळ्यांवरचं आहे. ‘मौज प्रकाशन, साधना चळवळ आणि अंतर्नाद’ असा त्रिवेणी संगम इथे झाला आहे. सकस, दर्जेदार साहित्य देऊन संपूर्ण महाराष्ट्राची अभिरुची संपन्न करण्याचं व्रत घेतलेलं मौज प्रकाशन, साने गुरुजींच्या पुढाकाराने समता आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनेचा मार्ग किंचितही विचलित न होता कित्येक दशकं चालत आलेली साधना चळवळ आणि अंतर्नाद ही सांस्कृतिक समृद्धीसाठी 25 वर्षं चाललेली चळवळ, या तीनही संस्था आणि समोरची ही गर्दी पाहून ‘कुठे नेऊन ठेवला रे माझा महाराष्ट्र’ अशा विचारानं त्रस्त झालेल्या मराठी मनाला अजूनही ‘आयुष्याच्या मशाली पेटवून’ नवा उष:काल घडू शकेल असा आशावाद वाटायला हरकत नाही.
भानूंच्या व्यक्तिमत्त्वाविषयी थोडं सांगणं आवश्यक आहे. साम्यवादी विचारसरणीचे वडील आणि शिक्षक आई यांच्या संस्कारात त्यांची वैचारिकतेची, वाचनाची, चळवळींविषयीच्या समजाची बैठक तयार झाली. कॉम्रेड डांगेंपासून सेना संस्थापक बाळासाहेब ठाकरेंच्या सभांना त्यांनी अनेकवार उपस्थिती लावली. या सर्व गोष्टींमुळे राजकारणाविषयी आकर्षण वाटत असतानाच त्यांचा भ्रमनिरासही होत राहिला. विशेषत: आणीबाणीनंतर आलेल्या जनता सरकारच्या अपयशी कार्यकालानंतर राजकारणाविषयीची त्यांची उदासीनता वाढत गेली. राजकारण्यांचे हितसंबंध, कट्टर शत्रूंना मिठी मारण्याची रीत यांबाबत जसजशी त्यांची जाण वाढली, तसतसे ते त्यापासून अलिप्त झाले. शरद जोशींसारख्या, चळवळीचं राजकारण करणाऱ्या व्यक्तित्त्वाविषयी त्यांनी लिहिलं ते चळवळीच्या दिशेनं अधिक आणि राजकारणाविषयी कमी, असं आहे. एकंदरीतच त्यांची प्रवृत्ती विचारवंताची आहे, कार्यकर्त्याची नाही. सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयांवर चिंतन करतात पण ते स्वत: मोर्चात सामील होत नाहीत, घोषणा देत नाही, हातात फलक घेत नाहीत किंवा भाषणंही देत नाहीत. ते कोणत्याही ‘इझम’च्या छायेखाली न येता स्वत:ची साहित्यिक चळवळ उभी करू शकले. त्यांच्या बंडखोरीचं स्वरूप त्यांच्या अंतर्मनातून आलेल्या विचारमंथनात शोधता येतं. त्यांची बंडखोरी त्यांच्या निरीक्षणांमुळे, सतत प्रवास, वाचन, चिंतन या सर्वांमुळे अतिशय प्रभावी ठरली आहे.
सांस्कृतिक समृद्धीसाठी सुरू असलेल्या ‘अंतर्नाद’ या मासिकाचं आणि त्या सोबतच स्वत: संपादक भानू काळे यांच्या प्रवासाचं अत्यंत प्रभावी दर्शन या पुस्तकात घडतं. मी स्वत: भानूंचा फॅन आहे. एक व्यक्ती म्हणूनही, संपादक म्हणूनही आणि लेखक म्हणूनही भानू हे एक विलक्षण रसायन आहे. पुस्तकातून आणि साधना साप्ताहिकाने घेतलेल्या दोन दीर्घ मुलाखतींतूनही त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचं मनोरम दर्शन घडतं. ‘साक्षेपी’ हा शब्द फार कमी लोकांविषयी वापरता येईल. भानूंचा विचार करताना आपल्याला या शब्दाचा कळालेला अर्थ योग्य आहे की नाही हे मी तपासून पाहिलं. ‘कार्य, अभ्यास आणि संशोधन यात सतत मग्न व्यक्ती’ असा अर्थ पाहिला आणि भानूंना ‘साक्षेपी’ हे विशेषण किती चपखलपणे लागू पडतं हे लक्षात आलं.
25 वर्षांत ‘अंतर्नाद’चा एकही अंक, एक दिवसही उशिराने प्रकाशित झाला नाही, या एकाच कारणासाठीसुद्धा त्यांच्या नावाचा समावेश ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये सामील करता येईल. पण त्यांचं वैचारिक व संपादकीय अनुशासन हे सारखंच आहे. त्यांचं नियोजन वाखाणण्यासारखं असतं. हे फक्त संपादन, प्रकाशनातील समयबद्धतेविषयी नाही, तर त्यांच्या संपूर्ण जीवनालाच एक अनुशासन, नियोजन आणि सुव्यवस्था आहे. याचं कारण काय असावं याचा विचार करताना लक्षात येतं, या माणसाच्या व्यक्तित्वात विरोधाभास नाहीत. जगण्यात, विचारसरणीत, लेखनात, लोकव्यवहारात एकसंधपणा आहे. कुठेही, कसलाही अंतर्विरोध नाही. व्यक्तित्वात कोणताही अंतर्विरोध नसणारी माणसं आपोआप पारदर्शी होतात. त्यांच्याकडे लपवावं असं काही नसतं. आपल्याला काय आवडतं - आवडत नाही, जमतं – जमत नाही, परवडतं – परवडत नाही याबाबत त्यांच्याकडे स्पष्टता आहे. पण अशा व्यक्तित्वाच्या व्यक्ती एकसुरी, कंटाळवाणं जीवन जगण्याची शक्यता असते. भानू काळेंचं वैशिष्ट्य म्हणजे अशा एकसंध पारदर्शी व्यक्तित्वासह आजूबाजूच्या कटुतेच्या, दर्जाहीनतेच्या, दिशाहीनतेच्या वातावरणातही ते बहुआयामी जगले. स्वत:ची एक बाग त्यांनी निर्माण केली आणि त्यात ते रमले. त्या बागेत येऊ पाहणाऱ्या प्रत्येकाचं हसतमुखानं स्वागत केलं. त्यांनाही तिथल्या फुलांचा सुगंध आणि फळांचं माधुर्य चाखायला दिलं, पण ते सर्व कोणत्याही अट्टहासाशिवाय.
‘सांस्कृतिक समृद्धीसाठी’ हे अंतर्नादचं घोषवाक्य. स्वत: भानूंच्या मनातून अंकुरित झालेलं, आज या दोन शब्दांचा अर्थ शोधण्याची आवश्यकता आहे. खरं तर सांस्कृतिक हा शब्द अतिशय कार्यवाही आणि विशाल आहे. वाचन संस्कृती वाढली पाहिजे असे आपण म्हणतो, तेव्हा संस्कृती शब्दाचा अर्थ आणि भारतीय संस्कृती, हडप्पा व मोहोंजोदडो येथील संस्कृती असे शब्दप्रयोग यांत अंतर आहे. अंतर्नादच्या वाटचालीच्या संदर्भात मासिकाला भाषिक मर्यादा असल्याने आपल्याला महाराष्ट्राची संस्कृती किंवा मराठी संस्कृती आणि तीही आजच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, ग्रामीण, शहरी, परिघातील असा अर्थ घेणं अपरिहार्य होतं. अर्थातच, मराठी समाज बृहन्महाराष्ट्र व बृहद्भारतात पसरल्यानं या परिघानं आलेल्या सीमा कधी कधी अंधुक होतात पण त्यामुळे मर्यादा कमी होत नाहीत.
दुसरा शब्द आहे, ‘समृद्धीसाठी’. आज समृद्धी हा महामार्ग झाला आहे आणि तिथे होणाऱ्या अपघातांची चर्चा दररोज होते आहे. मला हा महामार्ग फार प्रतीकात्मक वाटतो. सांस्कृतिक समृद्धीच्या महामार्गावर आज अनेक अपघात होत आहेत. मुळात ही कोणती समृद्धी समाजाला आणि देशाला हवी आहे? आणि तिचं आजच्या वैश्विक अवकाशातील स्थान कोणतं? राष्ट्रीय, प्रादेशिक यांव्यतिरिक्त अनेक उपघटकांच्या सांस्कृतिक समृद्धीचं काय? त्या सांस्कृतिक समृद्धीचं रूप एकसंध व एकमत असलेलं असू शकेल का?
भानू काळेंच्या वैयक्तिक संघर्षाचा या बाहेरच्या समग्र कोलाहलाशी असलेला संबंध हा एका अर्थानं वैयक्तिक आदर्शवादाचा समष्टीनं स्वत:ला नकळत पण आनंदानं स्वीकारलेल्या दिशाहिनतेतील संघर्ष आहे असं मला वाटतं. सांस्कृतिक समृद्धीचा वैचारिक समृद्धीशी अतूट, अविभाज्य संबंध असतो. पण जर समकालीन सामाजिक, राजकीय व आर्थिक समृद्धीच्या संकल्पनांशी सशक्त नातेसंबंध ठेवू शकली, तरच ती टिकू शकते. नाहीतर समाजात फक्त टोकाची सांस्कृतिक दिवाळखोरी उसळ्या खाते. इतकंच नव्हे तर तीच भौतिक आणि पारमार्थिक किंवा आध्यात्मिक अधिसत्ता बनते. त्यामुळेच अंतर्नादच्या अंतर्धान पावण्याला सामाजिकदृष्ट्या व वैचारिकदृष्ट्या फार मोठी शोकांतिक किनार आहे.
समृद्धीचा महामार्ग आर्थिक प्रगतीचा दर, इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा विस्तार, गणेशोत्सवातील डी.जे.चा शंखध्वनी, राजकीय भाषणांमधले शिव्याशाप, नष्ट होत चाललेल्या नद्या, तलाव, हरीत क्षेत्रं, जंगलं, टेकड्या, इतकंच काय पर्वत आणि समुद्रांचा अटळ किनारा अशा थांब्यांवरून जात असतो. मग वेगमर्यादा 120 असो की बुलेट ट्रेन असो. अशा प्रतिकूल वातावरणात अंतर्नादचा अस्त ही अपरिहार्यता होती की काय असं वाटल्याखेरीज राहत नाही. त्यामुळे सांस्कृतिक समृद्धीचा नेमका मार्ग कोणता हा प्रश्न अधिकच जटिल होतो. पण त्याचं उत्तर शोधण्यासाठीचा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे.
खरं तर अंतर्नादचा प्रवास, त्यावरचं हे पुस्तक आणि भानूंच्या मुलाखती या सर्वांमुळे आपल्या समाजातील अनेक दुभंगरेषा प्रकाशात आल्या आहेत. समकालीन समाजव्यवस्थेवरही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यात व्यक्तीच्या जीवनातील आदर्शवादाचं स्थान, चळवळींचं स्वरूप व ऱ्हास, आर्थिक प्रगती विरुद्ध सांस्कृतिक समृद्धी, वैश्वीकरण आणि प्रादेशिक व स्थानिक भाषा, प्रकाशन व्यवसाय व माध्यमे, वाचन संस्कृतीतील आव्हानं, राष्ट्राची प्रगती व राजकारण यांचा परस्परसंबंध या संबंधींचे हे प्रश्न असून खरं तर यावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद होऊ शकते.
पण या संदर्भातील एकच मुद्दा घेतो, तो आहे नेतृत्वाचा. राष्ट्राची असो किंवा राज्याची, सामाजिक क्षेत्राची असो वा शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्राची, व्यक्तीची व समूहाची प्रगती होण्यासाठी सजग प्रबुद्ध नागरिकांची आवश्यकता असते, तितकीच ती प्रबुद्ध नेतृत्वाची असते. आधुनिकतेसह पुरोगामी, संतुलित विज्ञाननिष्ठ किंवा विवेकनिष्ठ नेतृत्वाची आज संपूर्ण जगाला आवश्यकता आहे. असं नेतृत्व मात्र अपवादानेच दिसतं आहे. नेतृत्वाला - विशेषत: गुणवत्तापूर्ण नेतृत्वाला - जगभरात उतार लागला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रंप, ज्यांनी 2020 च्या निवडणुकींच्या निकालालाच हाणून पाडण्याचा प्रयत्न करून बंडखोर तत्त्वांना कॅपिटॉलवरती हल्ला करायला प्रोत्साहित केले. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी संविधानाच्या मर्यादा ओलांडून 2020 ला संविधानात सुधारणा करून 2036 पर्यंत राष्ट्राध्यक्ष पदावर राहण्याचा स्वत:चा मार्ग सुकर केला आहे. चीनच्या अध्यक्षांनी संविधानातील दोन कार्यकालांची मर्यादा काढून टाकत आयुष्यभर स्वतः राष्ट्राध्यक्ष म्हणून राहण्याची व्यवस्था केली आहे. ट्रंप अजूनही राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत रिपब्लिक पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. या तीनही देशांच्या प्रमुखांकडे संपूर्ण जग, जगात शांती आणि सुबत्ता नांदवण्याची जबाबदारी असणाऱ्या व्यक्तींच्या रूपात पाहतं. पण तशा प्रकारची अपेक्षा करणं चुकीचं आहे हे सगळ्यांना कळून चुकलं आहे.
अशाच प्रकारे आर्थिक क्षेत्रातील नेतृत्वाला - मग ते बिल गेट्स असोत किंवा अंबानी - आर्थिक विषमता, महागाई, बेरोजगारी अशा ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीत त्यांना अजिबात रस नाही. मानव समाजाच्या प्रगतीला आवश्यक असणाऱ्या सांस्कृतिक उत्थानाच्या क्षेत्रातही परिवर्तनवादी दूरदृष्टीच्या नेतृत्वाची संपूर्ण वानवा आहे.
या निमित्ताने चळवळींच्या ऱ्हासाचा मला समजणारा ऊहापोह करतो. मुळात प्रत्येक समाजाला आणि समाजातील उपसमूहांना स्वत:च्या विकासाची व्याख्या करता आली पाहिजे, तसं स्वातंत्र्य असलं पाहिजे. दुर्दैवाने पाश्चात्त्य वसाहतवादाच्या प्रभावानं आज संपूर्ण जगानं विकासाचं म्हणजे केवळ आर्थिक विकासाचं प्रारूप स्वीकारलं आहे. त्याच पाश्चात्त्यांनी स्वातंत्र्य, समता व न्याय या संकल्पनांचा विचारही संपूर्ण जगापुढे ठळकपणे मांडला. फ्रेंच क्रांती, भारतीय स्वातंत्र्यचळवळ आणि नेल्सन मंडेलांसारख्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी या संकल्पना रुजवल्या. भारतात म्हणूनच आपण लोकशाही स्वीकारली कारण हीच एक व्यवस्था सर्वसमावेशक आहे, सर्जनशील आहे आणि समताधिष्ठित आहे. 19 व्या शतकापासून भारतात सुरू झालेल्या चळवळींच्या समोर मूलभूत असं काम होतं, ते सर्वांना साधार करण्याचं, समतेचा विचार रुजवण्याचं आणि बहुजन स्त्रिया, मागास, आदिवासी या सर्वांना मुख्य प्रवाहात आणण्याचं. फुले, आगरकर, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी झपाटलेली पिढी आदर्शवादानं किंवा ध्येयवादानं झपाटली होती. त्यात साम्यवाद, समाजवाद या विचारप्रवाहांना मानवतावादी मानून झपाटून गेलेले; तसेच गांधी, सुभाषचंद्र बोस, नेहरू यांच्या प्रभावाखाली काम करणारेही अगणित लोक होते. अगदी माझ्या पिढीपर्यंत, आदर्शवाद आणि ध्येयवाद म्हणजे परिवर्तनाच्या चळवळीचा पुरस्कार, आणि समतेच्या माध्यमातून सामाजिक प्रगती असाच होता.
याच काळात मोठ्या प्रमाणात समाजसेवी व्यक्ती व संस्थाही तयार झाल्या. आणीबाणीनंतरच्या काळातही टिकून राहिलेल्या या चळवळीत 1992 हे वर्ष अधिक अपायकारक ठरलं. प्रगतीच्या पाश्चिमात्त्य प्रारूपाचा म्हणजेच आर्थिक उदारीकरणाचा स्वीकार भारतानं केला आणि झपाट्याने भारताचा आर्थिक प्रगतीचा दर प्रतिवर्षी वाढत गेला. उदारीकरणाचाच एक भाग म्हणून ‘लालसेचं उदारीकरण’ झालं आणि भारतीय समाजाने पहिल्यांदा ‘पैसाकेंद्रित’ विचार करायला सुरुवात केली. पदराला खार लावून काम करणाऱ्या संस्था मागे पडल्या. मोठ्या भांडवलदारांनी स्वत:ची फाउंडेशन उघडून त्यामार्फत प्रस्तावावर आधारित समाजसेवेचं - दिखाऊ का असेना - काम सुरू केलं. दुसरीकडे आर्थिक संपन्नता वाढल्यानं प्रशासनानं स्त्रियांसाठी शिक्षण, मागासवर्गीयांना शिष्यवृत्त्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्य विकासाची केंद्रं, मोजता येणार नाहीत इतक्या प्रकारची अनुदानं सुरू केली. त्यातच माहिती तंत्रज्ञानाचा जोर वाढताच सार्वजनिक कामांत हिरीरीने विधायक कामासाठी पुढे येणारी पिढी सॉफ्टवेअर क्षेत्रातील संधी शोधत अमेरिकेकडे आकर्षित झाली. राहिलेले युवक युपीएससी, एमपीएससीच्या प्रयत्नात घुसले आणि बाकीचे युवक स्थानिक व राज्य पातळीवरच्या राजकीय पुढाऱ्यांच्या मागं पळत सुटले. कुठलं सेवा दल, कुठली समाजसेवा आणि कसला आदर्शवाद?
हेही पाहा :
हे सर्व कमी की काय म्हणून 1985 पासून इंटरनेट वणव्यासारखं पसरलं आणि माणसाच्या ‘दृश्य’ कक्षा वाढल्या. पण मनोविकास खुरटला. आता या क्षणी जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या प्रयोगाकडे म्हणजे सार्वत्रिक निवडणुकीकडे बारकाईने पाहिलं, तर उरल्यासुरल्या आदर्शवादाचं आणि चळवळींचं नेमकं काय होतं आहे, हे लक्षात येईल.
अशा पर्यावरणात 25 वर्षं सातत्यानं भानू काळे लिहीत राहिले, मासिक काढत राहिले आणि एकांड्या शिलेदारासारखे लढले यातच त्यांच्या कार्याचं मोठेपण आहे. महायुद्ध जिंकण्याचं त्यांचं स्वप्नही नव्हतं, पण त्यांच्यापुरते ते यशस्वी झाले आहेत आणि म्हणूनच ते सत्काराला आणि अभिनंदनालाही पात्र आहेत. सुदैवाने याच घटनाक्रमांचा भाग म्हणून की काय अंतर्नादले डिजिटल विश्वात प्रवेश केला आहे.
साहित्यिक क्षेत्रात डिजिटलचा वापर करणाऱ्यांत दिनकर गांगल यांचं पायाभूत कार्य आहे. नव्या पिढीत अर्चना मिरजकरांची पुस्तक परिचयाची शृंखला आणि आशुतोष जावडेकरांचा ‘बुक ब्रो’ ही पुस्तकांवरची डिजिटल प्रस्तुती मला वाखाणण्यासारखी वाटते. मनोविकास, मेहता प्रकाशन वगैरे अनेक प्रकाशनांनी नियमितपणे डिजिटल स्वरूपात पुस्तक परिचय सुरू केले आहेत. स्पृहा जोशीसारख्या काही प्रसिद्ध व्यक्ती नियमित प्रसिद्ध-अप्रसिद्ध कविता सादर करताहेत. साधना साप्ताहिकाचं डिजिटलायजेशन आणि त्यातलं सातत्य अतुलनीय आहे. हे नवे अंकुर साहित्यिक चळवळीला आणि सांस्कृतिक समृद्धी बळकट करतील अशी आशा वाटते.
शेवटी पुन्हा एकदा भानू काळे यांचं अभिनंदन. वर्षाताईंच्या योगदानाचीही तितकीच नोंद घेतली पाहिजे, जितकी भानूंची. त्यांचंही या सहप्रवासावरचं लेखन आलं तर किती छान होईल असं वाटतं. धन्यवाद.
- ज्ञानेश्वर मुळे, दिल्ली
dmulay58@gmail.com
प्रकाशन समारंभ :
(रविवार, 28 एप्रिल 2024, एस एम जोशी फाउंडेशनचे सभागृह, पुणे)
Tags: antarnaad bhanu kale dnyaneshwar mulay sadhana prakashan mauj prakashan Load More Tags
Add Comment