संगीत हे वैश्विक आणि वैयक्तिकही !

सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवानिमित्त साप्ताहिक साधनाचा युवा कलाकार विशेषांक, 21 डिसेंबर 2024 

संगीत हा माझा अत्यंत आवडीचा विषय. जे जे मनात झिरपेल आणि आनंद देईल, ते ते संगीत मी ऐकत गेले. कधीच कोणत्याही एकाच किंवा ठरावीकच प्रकारचं संगीत ऐकण्याचं बंधन मी स्वतःवर घातलं नाही. माझं शास्त्रीय संगीताचं शिक्षण नाही, पण ऐकून ऐकून काहीसा कान तयार होणं म्हणतात ना, तसं झालं असावं. मी शाळेत असल्यापासून दादासोबत ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’ला पुण्यात यायचे ते आजतागायत दरवर्षी जाते. तेव्हापासून शास्त्रीय संगीतातल्या मास्टर्स असणाऱ्या अनेक मोठमोठ्या गायकांना, वादकांना मी समोर बसून ऐकलं आहे. पं.भीमसेन जोशी यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळाली नाही, पण त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी या महोत्सवातच एकदा मिळाली होती. त्यात पं.हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद अमजद अली खाँ, पं.शिवकुमार शर्मा, पं.जसराज, स्वरप्रभा प्रभा अत्रे, बेगम परवीन सुलताना, अभय सोपोरी, पं.अजय पोहनकर, पं.उल्हास कशाळकर, आरती अंकलीकर-टिकेकर, राहुल शर्मा, निलाद्री कुमार, कौशिकी चक्रवर्ती, अमान-अयान अली बंगश, तबला नवाज विजय घाटे, पं.सुरेश तळवलकर, उस्ताद शाहिद परवेज अशा अनेक दिग्गजांना प्रत्यक्षात ऐकण्याची आणि त्यांना कला सादर करताना प्रत्यक्ष बघण्याची संधी मिळाली, याचा मला खूप आनंद आहे.

तर या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’निमित्त साधना साप्ताहिकाचा संगीत विशेषांक 21 डिसेंबरला प्रसिद्ध होतो आहे. या अंकाच्या निमित्ताने संगीत क्षेत्रातील सहा कलाकारांच्या मुलाखती घेतल्या आहेत संगीत समीक्षक, लेखक आणि पत्रकार विनय हर्डीकर यांनी. ते कलाकार म्हणजे, उर्मिला धनगर (गायिका), सावनी तळवलकर (तबला वादक), जयदीप वैद्य (गायक, संगीतकार), देवेंद्र भोमे (संगीतकार), नकुल जोगदेव (पियानो वादक), सायली पानसे-शेल्लीकरी (गायिका). या सहा कलाकारांपैकी सायली पानसे या गायिकेची मुलाखत साधनाच्या दिवाळी अंकात आधीच प्रसिद्ध झालेली आहे.

या कलाकारांच्या मुलाखती सुरुवातीला साधनाच्या दिवाळी अंकात घेण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी दिवाळी अंकातील संगीतविषयक एक विभाग करण्याचेही योजले होते. पण अंकातील पानांची मर्यादा आणि वेळेची उपलब्धता लक्षात घेता, त्या मुलाखतींना दिवाळी अंकात योग्य न्याय देता आला नसता, त्यामुळे डिसेंबरमध्ये असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे निमित्त साधून त्या मुलाखतींचा संगीत विशेषांक करायचा, असं ठरलं. मग त्यानुसार सर्व कलाकारांच्या मुलाखतींचं नियोजन करण्यात आलं. सर्व कलाकार (उर्मिला धनगर वगळता) साधना कार्यालयात या मुलाखतींसाठी आले होते. जवळजवळ महिनाभर मुलाखती आणि त्यांचे शब्दांकनाचं काम सुरू होतं. ऋचा मुळे यांनी केलेल्या शब्दांकनांनंतर हर्डीकर सरांनी प्रत्येक मुलाखत त्यांच्यासोबत बसून वाचली. त्यामध्ये काही बदल सुचवले. असं करत एक-एक मुलाखती शब्दांकन होऊन तयार झाल्या. यात हर्डीकर सर आणि ऋचा ताईंचा वाटा खूप मोठा आहे. मी त्या मुद्रितशोधन आणि संपादन करण्याकरता वाचल्या. आणि शेवटी त्यावर झालेले संपादकांचे संस्कार, त्यामुळे त्या सर्वच मुलाखती ओघवत्या, वाचनीय आणि गोळीबंद झाल्या आहेत.    

साधना साप्ताहिकात संपादन करताना अनेक विषयांना वाहिलेले अंक वाचायला मिळतात. पण हा संगीत विशेषांक माझ्या संगीताच्या आवडीमुळे विशेष भावला. यातील सर्व कलाकारांच्या कामाशी माझा जास्त परिचय नव्हता. त्यामुळे लेखांचं संपादन करताना, ते वाचताना सगळ्यांची नव्यानं ओळख झाली. त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचे स्पष्ट विचार, त्यांचं संगीताबद्दलचं प्रेम मनात घर करून गेलं. सगळ्याच कलाकारांना वाटणारं रियाजाचं महत्त्व आणि कष्ट करण्याची तयारी वाखाणण्यासारखी आहे. या विशेषांकाचं संपादन करताना मला आलेला अनुभव मी व्यक्त करावा, असं संपादकांनी सुचवलं. त्यामुळे त्या अंकाची, त्यातील कलाकारांची काहीशी ओळख करून देण्याचा हा माझा प्रयत्न. 

या संगीत विशेषांकातील सर्वच कलाकार युवा आहेत. प्रत्येकाचा बाज वेगळा, पण कामातील प्रामाणिकपणा मात्र एकच. सगळ्यांचं संगीताविषयीचं प्रेम, त्यांना पटलेलं रियाजाचं महत्त्व, त्यांच्या गुरूंबद्दलचा आदर, नवीन वाटा शोधण्याची त्यांची प्रवृत्ती, सतत नवं शिकण्याची ऊर्मी, एकाच प्रकारच्या संगीताला न स्वीकारता सगळ्या जॉनरच्या संगीताबद्दल त्यांना असलेलं कुतूहल आणि ते शिकण्याचा उत्साह, हे सगळंच आपल्याला भारावून टाकतं.  

घरात संगीताची पार्श्वभूमी नसणाऱ्या उर्मिला धनगर या गायिकेचा ‘सा रे ग म प’ पासून ते दमदार आवाजाची लोकगीत, लावणी गायिका होण्यापर्यंतचा प्रवास वाचताना, मिळालेल्या संधीचं सोनं करणं म्हणजे काय हे कळतं. तिचा प्रामाणिकपणा तिच्या गाण्यातून व्यक्त होतो. गुरूंमुळे तिला तिचा ‘सा’ सापडला आणि त्यांनीच तिला अनुकरणातून अनुसरणाकडे जायला शिकवलं. ‘सा रे ग म प’ मधील स्पर्धेत स्वत:ला सतत प्रेरित करण्यासाठी तिचा एक मंत्र होता, जो ती नेहमी उच्चारत असे – ‘सगळ्यांचं गाणं छान व्हावं, पण माझं विशेष छान व्हावं.’ कलाकारांना संधीची वाट पाहावीच लागते. पण आपलं नाणं खणखणीत असेल, तर काम मिळतंच, असं ती म्हणते.

सावनी तळवलकर ही उत्तम तबला वादक आहे. लहानपणापासून बाबांकडून (तालयोगी पं.सुरेश तळवलकर) मिळालेला वारसा ती कष्टाने आणि ध्यासाने पुढे चालवत आहे. नियमित रियाजातूनच तुमची शैली, तुम्हाला मांडायचा असलेला विचार, नव्या कल्पना, या गोष्टी गवसत जातात, असा तिचा अनुभव आहे. तिला आयुष्यात छंद म्हणून नव्हे तर फक्त संगीतच करायचं होतं. तबला या वाद्याला वैश्विक पातळीवर नेल्याबद्दल ती काही दिग्गज तबलावादकांचे आभार मानते, कारण त्याचा फायदा या युवा पिढीला नक्कीच होत आहे.

नृत्य, वाद्य आणि गायन या तिन्ही कलांची जाण असणारा जयदीप वैद्य हा नव्या पिढीतील एक कलाकार. तो गायक, वादक, कथक नर्तक, गीतकार आणि संगीतकारही आहे. त्याची संगीताची आवड ही ‘आवडणे’ या गोष्टीवर अवलंबून आहे. त्याला कोणत्याही संगीताचे बंधन नाही, मग ते लोकसंगीत असो की शास्त्रीय संगीत. त्याला त्यात उच्च-नीच असं करताच येत नाही. त्याची आवड वैयक्तिक आहे, त्यामुळे आपण संगीत समीक्षक होऊ शकणार नाही, असं त्याचं मत आहे. 

त्या-त्या काळाला साजेसं लोकप्रिय संगीत देऊन स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा देवेंद्र भोमे हा एक प्रयोगशील संगीतकार. त्याचं उर्दू काव्यावर – कव्वाली, गझल - विशेष प्रेम आहे. संगीतासाठी कुठल्याही भाषेत अडकण्यात अर्थ नाही. संगीताची मेलडी तुम्हाला भाषेच्या पलीकडे घेऊन जाते, असं त्याला वाटतं. वेगवेगळ्या काळात आपल्यावर असलेला वेगवेगळ्या लोकांचा प्रभाव तो व्यक्त करतो. त्याने ‘मराठी चित्रपट संगीताची पहिली पन्नास वर्षं’ या विषयाची एक यू-ट्यूब सिरीज केली. आज उपलब्ध असलेला वाद्यसंच आणि टेक्नॉलॉजी त्या काळात असती, तर त्या संगीतकारांनी ती गाणी कशी केली असती, हा विचार करून त्याने ती गाणी रिक्रिएट केली आहेत. शास्त्रीय संगीत आणि भावसंगीताविषयी त्याचं मत सांगताना तो म्हणतो, माणूस स्वत:च्या कम्फर्ट झोनमध्ये जे गातो ते त्याला सोपं वाटतं. आणि त्यापेक्षा वेगळं असलेलं अवघड वाटतं. त्याच्या मते संगीत लोकप्रिय होण्याचा फॉर्म्युला म्हणजे, संगीताचा प्रकार कोणताही असला तरी त्यातल्या तांत्रिक बाबींपेक्षा तुम्ही तुम्हाला जे म्हणायचंय त्याची गोष्ट सांगू शकलात की नाही, एवढाच.

पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पुण्यातील मोजक्या कलाकारांमध्ये स्वत:चं स्थान निर्माण करणारा पियानोवादक कलाकार म्हणजे नकुल जोगदेव. पियानो हे एक मल्टिटास्किंग इन्स्ट्रुमेंट आहे, एकच माणूस एकाच वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यावर वाजवू शकतो. या मुलाखतीत त्याने पाश्चात्त्य संगीताच्या वेगळ्याच विश्वाचा परिचय करून दिला आहे. भारतीय शास्त्रीय संगीताची जाण नसलेला श्रोताही ते ऐकून त्यातून आनंद मिळवू शकतो, पण पाश्चात्त्य संगीताच्या कॉन्सर्टमध्ये काय ऐकायचं आहे हे श्रोत्यांना माहीत असणं अपेक्षित असतं. त्याच्या मते, इंडियन क्लासिकल म्युझिकचा प्रवास रॉक कॉन्सर्टच्या दिशेने झाला आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हे हजार प्रेक्षकांसमोर बसून गाण्यासाठी नव्हतं, पण माइक आल्यापासून आवाज वाढवून तसं करता येणं शक्य झालं आणि म्हणून मैफलींचा आवाका वाढला.

सायली पानसे-शेल्लीकरी ही शास्त्रीय आणि सुगम संगीत गायिका म्हणून प्रसिद्ध आहे. नुकतंच तिच्या ‘गंधार: मैत्री संगीताशी’ या पुस्तकाचं ब्रेल रूपांतर प्रसिद्ध झालं आहे. ‘सा रे ग म प’, सुगम संगीत गायिका, ‘सकाळ’ची शास्त्रीय संगीताची लेखमाला - ‘गंधार’ ते ‘अनटोल्ड स्टोरीज’ हा यू-ट्यूबवरील कार्यक्रम, इथपर्यंतचा तिचा हा प्रवास वाचनीयच आहे. 

विनय हर्डीकर सर हे संगीत अभ्यासक आहेत. संगीत हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्यापेक्षा लहान असलेली पिढी संगीताचा काय विचार करते, त्याकडे कसे पाहते, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी या मुलाखती घेतल्या आहेत. या निमित्ताने ते समाजाच्या बदलत जाणाऱ्या अभिरूचीबद्दल सांगतात. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज हवं ते संगीत एका क्लिकवर ऐकता येतं आणि त्याबद्दल मतही बनवता येतं. ही संधी खूप महत्त्वाची आहे. आधीच्या काळात असं होत नव्हतं, त्यामुळे ज्या व्यक्तींकडून माहिती मिळत असे, त्यावर त्या-त्या व्यक्तीच्या मताचा प्रभाव पडतच असणार. परिणामी, आमच्या अभिरूचीवरही त्याचा परिणाम होत असणार, हा महत्त्वाचा मुद्दा ते आपल्या संपादकीयात मांडतात. आताची पिढी सगळंच संगीत मोकळेपणाने आणि कोणत्याही भावनिक गुंतवणुकीशिवाय ऐकू शकतात, हे महत्त्वाचं निरीक्षणही ते नोंदवतात. 

साधनाचा हा संगीत विशेषांक संगीत मनापासून आवडणाऱ्यांना, विशिष्ट प्रकारचं संगीत आवडणाऱ्यांना, आणि संगीताकडे मोकळेपणाने बघणाऱ्यांना आवडेलच, याची खात्री आहे. या अंकातील सगळ्याच कलाकारांचा संगीताकडे बघण्याचा दृष्टीकोन, त्यांचे संगीतविषयक विचार बदलत्या काळाचे सूचक आहेत. संगीत हे वैश्विक आहे तसेच वैयक्तिकही आहे. त्यामुळे कधी कधी आपली आवड सोडून इतरही चांगलं काही ऐकलं की संगीत तर समृद्ध होतंच, पण आपणही समृद्ध होतो. या अनुभवासाठी हा संगीत विशेषांक आवर्जून वाचाच. 

- आरती सुमित
(8888218537)
संपादकीय विभाग
साधना साप्ताहिक, पुणे.

 

Tags: संगीत विशेषांक सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव संगीत युवा कलाकार Load More Tags

Add Comment