हॅरी पॉटर इतकेच खिळवून ठेवणारे 'त्रिकोणी साहस'

डॉ. प्रगती पाटील यांची  624 पानी कादंबरी...

पुस्तकासमवेत लेखिका

पांढऱ्या रंगाचा वापर करताना लेखिकेने पांढऱ्या रंगासाठी इतर भाषांमध्ये असलेले समानार्थी शब्द वापरले आहेत - श्वेतालिया, शुभ्रपूर, धवलपूर, बिलीपूर, ब्लॉन्श, बियांका, शिरोई इत्यादी. नीर म्हणजे पाणी. तिने पाण्याचा रंग आणि पाण्याच्या इतर भाषांमधील समानार्थी शब्दांनी नीर लोकांना आणि त्यांच्या प्रदेशांना नावे दिली आहेत. कारण नीर लोक हे नदी आणि समुद्रकिनाऱ्यावर राहतात. तसेच ज्वाल लोक पर्वत-दऱ्या, शिखरे यांच्यामध्ये राहत असल्याने त्यांची नावे त्यावरून आणि मरूत लोक जंगलात राहत असल्याने त्यांची नावे विविध देशांतील जंगलांच्या नावांवरून ठेवली आहेत. 

काही अपवाद सोडता मी क्वचितच कादंबरी या साहित्यप्रकाराकडे वाचनासाठी वळते. पण ही कादंबरी वाचायला सुरुवात केली आणि रहस्य, आश्चर्य, शोध, आनंद, भीती, उत्कंठा, निराशा अशा अनेक भावना क्षणोक्षणी आणि पानोपानी सतत माझ्या मनात येत होत्या. आणि या सगळ्यांसोबत त्यातून व्यक्त झालेला वेगळा आणि महत्त्वाचा विचारही जाणवला - तो म्हणजे माणसांमाणसांमधील एकी किंवा त्यांनी एकत्र यावे यासाठी केलेला एक निरागस आणि मनोरंजक प्रयत्न.

या कादंबरीच्या लेखिका डॉ. प्रगती पाटील यांनी भारतीय लष्करात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांना वेगवेगळ्या भाषा आणि लिपी शिकण्याचा छंद आहे. त्याआधारे त्यांनी ‘त्रिकोणी साहस’ या त्यांच्या सव्वासहाशे पानी पहिल्याच पुस्तकात शब्दांच्या आश्चर्यचकित करणाऱ्या अनेक करामती केल्या आहेत. मी हे पुस्तक संपादन आणि मुद्रितशोधन करण्यासाठी वाचायला सुरुवात केली आणि त्यातल्या जगात पूर्णत: हरवूनच गेले. हे या कादंबरीचे परीक्षण नाही, तर ती वाचल्यावर माझ्या मनात जे काही आले ते व्यक्त करावे असे वाटल्याने मी लिहायचे ठरवले. वाचत असताना सतत ‘पुढे काय होणार’ किंवा ‘हे कसं काय सुचलं’ असे प्रश्न मी प्रगती ताईला - लेखिकेला - विचारायचे आणि ती माझी उत्सुकता अजिबात न शमवता अजूनच वाढवायची. रोज मी त्यातले एक-एक प्रकरण वाचत गेले आणि पुस्तक वाचून संपले तेव्हा मलाच चुकल्या चुकल्यासारखे वाटत होते. पण आता मात्र मी याच्या पुढच्या भागाची वाट पाहत आहे. हे पुस्तक वाचायला सुरुवात केलेली व्यक्ती ते पूर्ण न वाचता खाली ठेवू शकणार नाही, इतकी त्याची ताकद नक्कीच आहे.

पृथ्वीसारख्याच एका वेगळ्या ग्रहावर – ‘श्वेतालिया’ - ही कहाणी घडते; पण ती तिथेच संपत मात्र नाही. साहस हा या कादंबरीचा नायक आहे. त्याच्या बाराव्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला एक अनामिक आणि गूढ संदेश मिळतो. त्यामुळे तो अस्वस्थ होतो, पण त्याला काही त्याचा उलगडा होत नाही. आणि मग सुरू होतो एक रहस्यमयी, उत्कंठावर्धक, कधी श्वास रोखून धरणारा आणि कधी सुटकेचा नि:श्वास घ्यायला लावणारा असा प्रवास. या प्रवासात त्याला अनेक हुशार, जिवाला जीव देणारे मित्र-मैत्रिणी भेटतात. या सगळ्यांच्या साथीने आणि प्रयत्नांनी हा प्रवास पुढे सरकतो, तसे आपल्यालाही आपण यातलाच एक भाग आहोत, असे जाणवायला लागते. या कादंबरीचा शेवट हा खरं तर लेखिकेलाही अजून माहीत नाही, कारण हा तर या प्रवासातला एक मोठा टप्पा आहे.

श्वेतालिया हा ग्रह पृथ्वीपासून लाखो प्रकाशवर्षे दूर आहे. त्याला चार सूर्य लाभले आहेत. या ग्रहावर श्वेत, नीर, ज्वाल आणि मरूत असे चार वेगवेगळ्या धर्मांचे लोक राहतात; पण एकत्र नाही, तर एकमेकांपासून अगदी दूर – भूभागाने आणि मनानेही. या चारही धर्मीयांना मधल्या दुर्गम वाळवंटाने विभागलेले आहे. एकमेकांच्या तंत्रज्ञानाचा वापर करून श्वेत आणि नीर लोकांनी आपापसात शांततेचे आणि सौहार्दाचे संबंध निर्माण केलेले आहेत. पण ज्वाल आणि मरूत लोकांशी मात्र त्यांचे तसे शांततेचे संबंध नाहीत. श्वेतांची शहरीकरणाची आणि मरूतांची नैसर्गिक जीवनशैली स्थापण्याची महत्त्वाकांक्षा या दोन्हीमुळे संपूर्ण श्वेतालिया काबीज करण्यासाठी त्यांच्यात नेहमीच संघर्ष, हल्ले, रक्तपात होत असत. आणि श्वेतधर्मीय लोक स्वत:ला इतरांपेक्षा सगळ्याच बाबतीत श्रेष्ठ समजत. त्यांचे विचारही संकुचित आणि अगदी ठाम असे होते. समाजात वागण्याचे-बोलण्याचे, वावरण्याचे त्यांनी ठरवलेले असे विशेष नियम होते. त्यात झालेले बदल त्यांना अजिबात आवडत नसत आणि त्यासाठी ते पूर्ण लक्षही ठेवत. बाकी धर्मीयांचेही आपापल्या संदर्भात काही नियम किंवा काही परंपरा होत्याच; पण त्या श्वेत धर्मीयांइतक्या कठोर आणि नीरस नव्हत्या हे नक्की!

‘साहस’ या कादंबरीचा नायक, त्याच्या आजूबाजूच्या एकरंगी जीवनाला आणि लोकांच्या संकुचित वृत्तीला कंटाळला आहे. ‘निसर्गाने आपल्यासाठी अनेक रंगांची उधळण केलेली असताना आपण का असे एकाच रंगात आयुष्य जगायचे, का इतर रंग नाकारायचे’ असे प्रश्न त्याला सतत पडतात. वाढदिवसाच्या दिवशी त्याला मिळालेल्या गूढ, अनामिक संदेशामुळे एक रहस्यमयी प्रवास सुरू होतो. त्या प्रवासात त्याला अनेक नीर लोकांबरोबरच, कधीही न पाहिलेले ज्वाल आणि मरूत धर्मीय लोक भेटतात. ‘हॅना’ या समविचारी, समंजस आणि हुशार नीर मुलीशी त्याची मैत्री होते. तसेच अनेक नीर, ज्वाल आणि मरूत मित्र-मैत्रिणी त्याला या प्रवासात भेटत जातात. ते सर्व जण मिळून एक टीम बनवतात - टीम शॉक. आणि मग सुरू होते ती रहस्य, भीती, आश्चर्य, आनंद, चिंता, साहस यांनी भरलेली सफर. या सफरीत पुढे त्यांना कळते की सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणारी आपल्यासारखीच अजून एक टीम आधी होती (त्यातल्या ‘निर्मिक’ - टीम प्रमुख - बद्दल तर शेवटपर्यंत आपली उत्सुकता फारच ताणली जाते). त्या टीमबद्दलची आणि एकूणच सगळी रहस्ये शोधण्यातही त्यांना अनेक अनपेक्षित आणि अवघड संकटांचा सामना करावा लागतो. बौद्धिक कोडी सोडवून, वेगवेगळे साहसी प्रकार करून ते पुढच्या पायऱ्या पार करतात. त्यांना अनेक मित्र मिळतात, तसेच शत्रूही समोर येतात. आजूबाजूच्या लोकांच्या पक्क्या आणि ठाम विचारसरणीमुळे असलेले आणि त्यांनी निर्माण केलेले अनेक अडथळेही पार करावे लागतात. आणि मग हळूहळू सगळ्या धर्मीयांनी एकत्र यावे आणि एकरंगी आयुष्य नाकारून ते इंद्रधनुषी करावे हेच त्यांचे उद्दिष्ट पक्के होत जाते. त्यासाठी ते जिवावर उदार होऊन प्रयत्नही करतात. या प्रवासात त्यांना अशी काही रहस्ये समजतात, जी त्यांचे पुढील आयुष्य बदलणारी ठरतात. काय असतील ती रहस्ये? कोण असेल ती आधीची ‘टीम’? या सफरीचा शेवट श्वेतालियातच होईल की आणखी काही नवीन पुढे येईल? त्या गूढ संदेशाचा मागोवा साहसला कुठे घेऊन जाणार? हे आणि असे अनेक प्रश्न वाचताना पडणारच आणि त्यांची उत्तरे शोधत आपण कधी कादंबरीच्या (सफरीच्या नव्हे!) शेवटाला पोहोचू कळणारही नाही. पण शेवटीही आपली उत्कंठा न संपवता ती अजूनच जास्त वाढवून, लेखिका ‘आता टीम शॉक काय करणार?’ हा प्रश्न आपल्यासमोर ठेवून आपल्याला पुढच्या भागाची वाट पाहायला निश्चितच भाग पाडते.

या श्वेतालिया ग्रहावरील चारही धर्मीय लोकांनी आपापल्या जगण्यासाठी एक-एक रंग निवडलेला होता. श्वेत लोकांनी पांढरा रंग निवडलेला होता. त्यानुसार त्यांचे पोशाख, त्यांच्या जेवणातील सर्व पदार्थ, त्यांची घरे, त्यातील सगळ्या वस्तू, इतकेच नव्हे तर त्यांच्या डोळ्यांची बुबुळेही पांढऱ्याच रंगाची होती. नीर लोक समुद्रकिनारी राहत, त्यामुळे त्यांनी आपल्यासाठी निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा निवडल्या होत्या. तसेच ज्वाल लोकांनी पिवळा तर मरूतांनी काळा आणि राखाडी रंग निवडला होता. श्वेतांप्रमाणेच नीर, ज्वाल आणि मरूत या तिन्ही धर्मीय लोकांची घरे, वस्तू, खाद्यपदार्थ, पोशाख आणि डोळे त्या-त्या रंगात आहेत.

पांढऱ्या रंगाचा वापर करताना लेखिकेने पांढऱ्या रंगासाठी इतर भाषांमध्ये असलेले समानार्थी शब्द वापरले आहेत - श्वेतालिया, शुभ्रपूर, धवलपूर, बिलीपूर, ब्लॉन्श, बियांका, शिरोई इत्यादी. नीर म्हणजे पाणी. तिने पाण्याचा रंग आणि पाण्याच्या इतर भाषांमधील समानार्थी शब्दांनी नीर लोकांना आणि त्यांच्या प्रदेशांना नावे दिली आहेत. कारण नीर लोक हे नदी आणि समुद्रकिनाऱ्यावर राहतात. तसेच ज्वाल लोक पर्वत-दऱ्या, शिखरे यांच्यामध्ये राहत असल्याने त्यांची नावे त्यावरून आणि मरूत लोक जंगलात राहत असल्याने त्यांची नावे विविध देशांतील जंगलांच्या नावांवरून ठेवली आहेत. यातील काही नावे आपल्या ओळखीचीच आहेत, तर काही खरंचंच जगाच्या कुठल्या भागात वापरात आहेत हे शोधताना आपल्याला मजा येते; आणि आपल्या ज्ञानात निश्चितच भर पडते.

हे झाले नावांच्या बाबतीत, पण या कादंबरीत लेखिकेने शब्दांचेही अनेकानेक खेळ केले आहेत. इंग्रजी-मराठी शब्द, वापरलेले विविध अलंकार आणि नव्याने तयार केलेले काही अलंकार, इंग्रजी शब्दांना नव्याने तयार केलेले प्रतिशब्द (जे मराठीत रूढ व्हावेतच, असा लेखिकेचा अजिबात आग्रह नाही!), यमक, अनेक शब्दांची आणि संख्यांची अ‍ॅक्रॉस्टिक आणि गणिती कोडी (जी सोडवताना अर्थातच आपलीही टीम ‘शॉक’ इतकीच दमछाक होते आणि सुटल्यावर तितकाच आनंद), शब्दांच्या सारख्या स्पेलिंगमुळे तयार होणारे पॅलिनड्रोम शब्द (म्हणजे नाव सुरुवातीपासून किंवा शेवटून लिहिले तरी स्पेलिंग तेच), विविध भौमितिक आकार (त्यातही विशेषत: त्रिकोण) आणि विज्ञानातील काही संकल्पनांचा आधार घेऊन तयार केलेला पॅराडॉक्स आणि एक सिंड्रोम अशा अनेक नवीन संकल्पना तयार करून तिने त्यांचा मुक्त वापर करून या सफरीमध्ये धमाल आणली आहे. लेखिकेला असणारी विविध क्रीडा प्रकारांची आवडही कादंबरीत आलेल्या अनेक क्रीडा प्रकारांवरून दिसते. एक-दोनदा त्या क्रीडा प्रसंगांचे वर्णन काहीसे लांबल्यासारखे वाटते, त्यामुळे कथानकात पुढे जाताना काहीसा अडथळा जाणवतो; पण पुढे घडणाऱ्या घटनांमुळे आपण तो विसरूनही जातो. तसेच यात काही वेगळे, काल्पनिक प्राणी-पक्षीही आहेत. या कादंबरीतील अनेक खाद्यपदार्थ हे जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी खाल्ले जातात. त्या पदार्थांच्या रंगांनुसार त्यांचा खुबीने वापर केलेला आहे. तसेच काही काल्पनिक पदार्थही लेखिकेने आपल्यासमोर आणले आहेत, ‘ते खरंचच असते तर’ असं आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही!   

ही कादंबरी वाचत असताना माझ्या मनात कुठेतरी सतत जे.के.रोलिंग या लेखिकेने ताकदीने उभा केलेला ‘हॅरी पॉटर’ येत होता. तसे म्हटले तर त्याच्यासारखीच अनोखी, पण त्यापेक्षाही नक्कीच वेगळी अशी ही रहस्यकथा आहे. काही प्रसंग, काही चित्रणं-वर्णनं वाचताना मनात हॅरी आणि त्यातील अनेक गोष्टी आल्याशिवाय राहत नाही, हे खरे! मी हॅरी पॉटरच्या काळातली - काळातली म्हणजे लहानपणी कधी पुढचा भाग येईल, याची आम्ही अगदी वाट पाहायचो. (आत्ता ते सगळे भाग वाचायला आणि पाहायलाही एका क्लिकवर सलग उपलब्ध आहेत, पण त्या वेळी त्यांची वाट पाहण्याचा आनंद काही औरच असायचा!)


हेही वाचा : मृणालचं पत्र - डॉ. प्रगती पाटील


‘हॅरी पॉटर’नंतर तितकेच खिळवून ठेवणारे, रहस्यमयी, भाषेचे आणि शब्दांचे खेळ करणारे असे ‘त्रिकोणी साहस’ हे पुस्तक मी वाचले. मला हॅरीची आठवण होण्याचे मूळ कारण म्हणजे अजिंक्यवनातील (श्वेतालियातील शाळा) शाळेचे चार भाग - अल्फा, गॅमा, बीटा आणि डेल्टा - त्यावरून मला पॉटर सिरीजमधले हॉगवर्ट्समधील चार विभाग आठवले. लेखिकेने ज्या पद्धतीने आणि ज्या ताकदीने आपल्यासमोर ‘श्वेतालिया’ उभे केले आहे, त्यात प्रवेश केल्यावर प्रत्येकालाच एका अद्भुत अशा सफरीवर आल्याचा आनंद नक्कीच मिळणार आहे.

आजच्या काळातही माणसामाणसांमध्ये आणि समूहांमध्ये निर्माण झालेल्या दऱ्या आपण बघत आहोतच. श्वेतालियामध्ये तर ‘टीम शॉक’ने सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेतच; पण आपणही तसे प्रयत्न करावे असे तर ती आपल्याला सुचवू पाहत नाही ना? असे वाटते. 

- आरती सुमित जैन
aratisumit818@gmail.com 


हे पुस्तक खरेदी करण्यासाठी साधना प्रकाशनाच्या वेबसाईटला भेट द्या.. 

 

Tags: sadhana prakashan child literature trikoni sahas pragati patil Load More Tags

Add Comment