आज विचार केला तर असं लक्षात येईल की, स्पर्शानं लिहिल्या-वाचल्या जाणाऱ्या या लिपीचा उपयोग फक्त दृष्टिहीन व्यक्तींपुरताच मर्यादित नाही... तर वृद्धापकाळामुळे हळूहळू दृष्टी गमावणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठीही ही लिपी संजीवनीचं काम करू शकते. ब्रेल दिनानिमित्त या लिपीची ही जन्मकथा...
शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे... पण दृष्टिहीन व्यक्तींना मात्र त्यासाठी ‘न भुतो न भविष्यती’ असा संघर्ष करावा लागला आहे. अंध व्यक्तींनी खूप पूर्वीच स्वीकारलेली तरीही शोध लागल्यानंतर शंभर वर्षांनी मान्यता मिळालेली 'सहा टिंबांची लिपी' अर्थात ब्रेल लिपी कशी जन्माला आली हे जागतिक ब्रेल दिनानिमित्त (4 जानेवारी) समजून घेणं आवश्यक आहे.
आज विचार केला तर असं लक्षात येईल की, स्पर्शानं लिहिल्या-वाचल्या जाणाऱ्या या लिपीचा उपयोग फक्त दृष्टिहीन व्यक्तींपुरताच मर्यादित नाही... तर वृद्धापकाळामुळे हळूहळू दृष्टी गमावणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठीही ही लिपी संजीवनीचं काम करू शकते. ब्रेल दिनानिमित्त या लिपीची ही जन्मकथा...
4 जानेवारी 1809 रोजी फ्रान्समध्ये पॅरीसपासून 20 मैलावर असणाऱ्या कुप्रे या छोट्याशा गावी ब्रेल कुटुंबात लुईचा जन्म झाला. चर्मकार असलेल्या वडलांसोबत लहानगा लुई नेहमी कारखान्यात जात असे. तीन वर्षांचा लुई दाभणाशी खेळत असताना दाभण हातातून सटकला आणि त्याच्या डोळ्यात घुसला. त्याच्या डोळ्यावर आधी काही स्थानिक उपचार करण्यात आले आणि नंतर जवळच्या खेड्यातल्या एका नेत्रतज्ज्ञानं त्याच्यावर उपचार केले. काही वेळानं लुईला आराम पडला... पण त्याच्या डोळ्याला संसर्ग झाला होता. एका डोळ्याला झालेला संसर्ग वाढत दुसर्या डोळ्यापर्यंत गेला आणि एका वर्षात लुईचे दोन्ही डोळे पूर्णपणे खराब झाले, लुईची दृष्टी कायमची हरवली.
वयाच्या पाचव्या वर्षी लुई आपल्या भावंडांसोबत सामान्य मुलांच्या शाळेत जायला लागला. अभ्यासात लुई हुशार होता. दिसत नसलं तरी तो ऐकून जितकं समजेल तितकं ज्ञान आत्मसात करायचा... पण आपली क्षमता असूनही आपल्याला फारसा अभ्यास करता येत नाही ही खंत त्याला असायची. या शाळेत लुई दोन वर्षं शिकला आणि त्यामुळं लुईला अनेक विषयांत आवड निर्माण झाली. लुईच्या गावातलेच पाद्री ॲबे जाक पॅलुय यांनी अनेक प्रयत्न करून पॅरीस येथील अंध मुलांच्या (इन्स्टिट्युशन रॉयल्स देस जून्स ॲव्युग्लेस) शाळेत लुईला प्रवेश मिळवून दिला. त्या वेळी त्याचं वय अवघं 10 वर्षं होतं.
या शाळेत शिकवली जाणारी लिपी शाळेचे संस्थापक वालेनटाइन हुवे यांनी तयार केली होती. ते स्वतः मात्र अंध नव्हते. या लिपीमध्ये सामान्य व्यक्तींची लिपी कागदावर दोऱ्याच्या साहाय्यानं उमटवून शिकवली जात होती. या लिपीचा उपयोग वाचनासाठी झाला तरी लिखाणासाठी होत नव्हता. सामान्यतः स्वतःचे पेपर्स स्वतः लिहिणं किंवा आवश्यक वाटलं म्हणून काही नोट्स घेणं त्या वेळच्या दृष्टिहीन व्यक्तींना अशक्य होतं.
त्याच काळात 1821मध्ये फ्रान्स सैन्यातले सेनाधिकारी चार्ल्स बार्बिअर यांनी लुई ब्रेलच्या शाळेला भेट दिली. त्यांनी सैन्यात गुप्त संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी वापरली जाणारी 14 टिंबांची एक सांकेतिक लिपी मुलांना दाखवली. ती अंधारातही सैनिकांना वाचता यायची. ही स्पर्शलिपी असल्यानं अंधांसाठी अधिक फायदेशीर ठरू शकते असा लुईचा कयास होता. दोऱ्याच्या साहाय्यानं तयार केलेली ही लिपी वाचण्यासाठी एकापेक्षा जास्त बोटांचा उपयोग अंध व्यक्तींना करायला लागायचा... शिवाय या लिपीत साहित्य रुपांतरित करणं ही अत्यंत जिकिरीची प्रक्रिया होती...
म्हणूनच चार्ल्स बार्बिअर यांची 14 टिंबांची लिपी या प्रकारापेक्षा अधिक सुकर होती असं म्हणता येईल. सात टिंबांच्या उभ्या दोन ओळी या लिपीत होत्या... परंतु ही रचनासुद्धा एका बोटानं चटकन वाचणं शक्य नव्हतं... शिवाय बरीच अक्षरं, विशेषतः स्वर या लिपीत अंतर्भूत नव्हते.
लुई ब्रेल जेव्हा या लिपीच्या संपर्कात आले तेव्हा ते अवघे 12 वर्षांचे होते. 14 टिंबांची ही लिपी त्यांना आवडली पण तिच्यातल्या उणिवा दूर होऊ शकतात का यावर ते विचार करायला लागले. दिवसभर शाळेचा अभ्यास असल्यानं ते रात्री उशिरापर्यंत जागून या लिपीत बदल करायचे. सुचलेले बदल दुसऱ्या दिवशी आपल्या मित्रांना समजावून द्यायचे आणि ते त्यांना योग्य वाटतात का ते पाहायचे. मित्रांनी सुचवलेल्या सुधारणा ते पुन्हा विचारात घेऊन लुई पुन्हा या टिंबांच्या संरचनेत हरवून जायचे.
अशा या अथक प्रयत्नांतून त्यांनी सहा टिंबांची, एका बोटाच्या अग्राखाली मावेल अशी फ्रेंचमधली सर्व अक्षरं तयार केली. आपण केलेले हे बदल त्यांनी चार्ल्स बार्बिअर यांना कळवले... मात्र त्यांनी लुईंच्या लहान वयामुळं त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं. लुईंच्या मित्रांनी मात्र त्यांनी तयार केलेली ही लिपी 14 टिंबांच्या लिपीपेक्षा अधिक सुकर असल्याचं शालेय प्रशासनाला पटवून दिलं. त्या लिपीचं महत्त्व त्या वेळच्या मुख्याध्यापकांना वालेनटाइन यांना पटलं आणि त्यांनी सहा टिंबांच्या लिपीत मुलांना शिकवायला सुरुवात केली.
काही वर्षांनी शालेय प्रशासन बदललं आणि मुख्याध्यापक बदलले. त्यांनी या लिपीचा वापर थांबवला. लुई ब्रेल थांबले नाहीत. आपण निर्मिलेल्या लिपीत संगीत आणि गणित कसं बसवता येईल याचं संशोधन त्यांनी सुरू केलं होतं. वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी त्यांना या दोन्ही प्रयत्नांत यश आलं.
त्यांच्या मित्रांनी ही लिपी सुरुवातीपासूनच स्वीकारली असल्यानं ते या लिपीचा उपयोग करत होतेच... शिवाय लुई आपल्याच शाळेत अध्यापनाचं कार्य करत असल्यानं आपल्या विद्यार्थ्यांनाही ते ही लिपी शिकवत होते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी या लिपीत काहीतरी करावं असं लुईंनी मनावर घेतलं. त्यांनी ‘फ्रान्सचा संक्षिप्त इतिहास’ हे पुस्तक आपल्या सहा टिंबांच्या लिपीत लिहून काढलं. सहा टिंबांच्या लिपीतलं अर्थात ब्रेल लिपीतलं हे पहिलं पुस्तक आहे.
ही लिपी तेव्हा 'ब्रेल लिपी' म्हणून ओळखली जात नव्हती आणि म्हणूनच मी इथपर्यंत या लिपीचा उल्लेख फक्त सहा टिंबांची लिपी असाच केला आहे. या लिपीला 'ब्रेल लिपी' म्हणवून घ्यायला पुढं 100 वर्षं वाट पाहावी लागली.
लुई ब्रेल यांच्या अथक प्रयत्नांना प्रशासकीय पाठिंबा मिळत नव्हता... तरी त्यांच्या मित्रांनी आणि विद्यार्थ्यांनी ही लिपी वापरात आणली. आपण नेमकं काय करून ठेवलंय याचा पुसटसाही अंदाज लुईंना मात्र त्या वेळी नव्हता. हे संशोधन जरी चालू राहिलं तरी त्याचा प्रचार मात्र त्यांना करता आला नाही. कालांतरानं लुई यांना क्षयरोगानं जखडलं. वयाच्या त्रेचाळिसाव्या वर्षी 6 जानेवरी 1852 रोजी त्यांचा मृत्यू झाला... पण या लिपीचा प्रसार व्हावा तितका तोपर्यंत झाला नव्हता.
या लिपीतूनच शिकवावं यासाठी 1854मध्ये मात्र त्यांच्या मित्रांनी आग्रह धरला. ही लिपी अंधांसाठी फक्त वाचण्यापुरतीच मर्यादित नसून लिहिण्यासाठीसुद्धा तितकीच उपयोगी असल्याचं त्यांनी शालेय प्रशासनाला पटवून दिलं. असं असलं तरी लुई ब्रेल यांच्या मृत्यूला तब्बल 100 वर्षं उलटल्यावर म्हणजे 1952मध्ये सहा टिंबांच्या या स्पर्शलिपीला 'ब्रेल लिपी' म्हणून मान्यता मिळाली.
या ब्रेल लिपीचा उद्गाता लुई ब्रेल हा आपला सुपुत्र असल्याची जाणीव फ्रान्सला झाली आणि कुप्रे गावी असलेल्या त्यांच्या कबरीचं उत्खनन फ्रान्स सरकारनं केलं. कुप्रेच्या त्यांच्या स्मारकात ब्रेल लिपी निर्मिणारे त्यांचे हात दफन केलेले आहेत तर बाकी शरीराचे अवशेष पॅरिसच्या पॅंथिअन इथे थोर पुरुषांच्या कबरींच्या मध्यभागी पुरले आहेत. लुई ब्रेल हे दोन स्मारक असलेली एकमेव महान व्यक्ती आहेत. त्यांनी निर्मिलेली ब्रेल लिपी हेच खरंतर त्यांचं अजरामर स्मारक आहे.
आज सहज उपलब्ध असणारी ही लिपी किती खडतर प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचली आहे हे समजण्यासाठी हा इतिहास सांगणं खूप आवश्यक आहे. ही वैश्विक लिपी म्हणून ओळखली जाते. जगातल्या सर्वच्या सर्व भाषा अगदी संगीतसुद्धा या सहा टिंबांमध्ये सामावलेलं आहे.
आज तांत्रिक प्रगतीमुळे आम्हा अंध व्यक्तींसाठी समाजमाध्यमं हाताळणं, वाचन-लेखन, शॉपिंग अशा अनेक गोष्टी सुकर झाल्या आहेत... पण इथं वाचन म्हणजे तांत्रिक आवाजानं वाचून दाखवलेला मजकूरच असतो. थोडक्यात आम्ही तेसुद्धा ऐकतच असतो... पण वाचनाचा पुरेपूर आनंद फक्त ब्रेल लिपीतूनच मिळू शकतो.
तंत्रज्ञानामुळे ब्रेलचा वापर तितक्याशा प्रमाणात होत नाही असं हल्लीचं चित्र दिसतं. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB), ऑल इंडिया कॉन्फेडरेशन फॉर ब्लाइंड (AICB) यांसारख्या संस्था ब्रेल लिपीसाठी खूप काम करत आहेत...
शिवाय आजच्या आणि येत्या पिढीनं ब्रेल लिपीचा जास्तीत जास्त वापर करावा म्हणून अनेक व्यक्ती विविध उपक्रम राबवतात. दृष्टिहीन व्यक्तींना वाचायला मिळावं म्हणून स्वागत थोरात ब्रेल लिपीतलं ‘स्पर्शज्ञान’ हे पहिलं पाक्षिक प्रकाशित करतात.
ब्रेल लिपी हल्ली डिजिटल स्वरूपातही लिहिली-वाचली जाते. आपण ब्रेलमधून टाईप केल्यावर ब्रेल आणि इंक अशा दोन्ही प्रकारे मजकूर प्रिंट करू शकतो... शिवाय असे छोटे कॉम्प्युटर आहेत ज्यांचा डिस्प्ले ब्रेल आहे... म्हणजे असं की, आपण जे काही लिहू किंवा फंक्शन्स ओपन करू ते सारं पडद्यावर इंकप्रिंटमध्ये न येता ब्रेलमध्ये येतं. हातानं वाचून आपण लिखाण, वाचन स्वतंत्रपणे करू शकतो. यांमुळं शाळेत आणि महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी आपल्या परीक्षासुद्धा लेखनिकाच्या मदतीशिवाय देऊ शकताहेत.
शिक्षण ही मूलभूत गरज अंधांपर्यंत एवढ्या सक्षमतेनं पोहोचवणारी लिपी म्हणजे ही ब्रेल लिपी. लुई यांनी लिपीबाबत एवढा सखोल विचार केला नसता तर आज आम्ही वाचन-शिक्षणातून एवढी ठाम वैचारिक भूमिका कधी घेऊच शकलो नसतो...!
- अनुजा संखे-घोडके
anujasankhe@gmail.com
(लेखिका स्वतः दृष्टिहीन असून त्या कॅनरा बँकेच्या विरार येथील शाखेत अधिकारी आहेत. दृष्टिहीनांसाठी त्या विविध सामाजिक उपक्रम राबवतात.)
Tags: मराठी अनुजा संखे-घोडके ब्रेल लिपी लुई ब्रेल दृष्टिहीन अंध अंधत्व जागतिक ब्रेल दिन Anuja Sankhe Ghodke Braille Script Louis Braille Blinds Blindness International Braille Day Load More Tags
Add Comment