मुस्लीम मराठी साहित्याच्या दालनातील नव्या अभिव्यक्तीची कविता

जावेद शेख यांच्या ‘अम्मी आणि अब्बूच्या कविता’ या कवितासंग्रहाचा परिचय..

वडिलांच्या विडी पिण्याच्या सवयीवर कवी राग व्यक्त करत नाही. अब्बू बिडीच्या धुराच्या भौमितीक आकृत्या काढायचा तर तो हीरो आणि जादूगार वाटायचा असे या अनुभवाचे चित्रण कवितेत येते. कवी आईला समजून घेण्याची धडपड व्यक्त करतो, मग तो जन्माच्या वेळची नाळ शोधतो, आईच्या मासिक पाळीचा अनुभव बघतो, मिस्री खाऊन तिने मारलेल्या पिचकारीकडे वेगळ्या भूमिकेतून बघतो, तिच्या दगडासारख्या हातांकडे लक्ष वेधतो, आईच्या व अब्बूच्या डोळ्यांत तरळणाच्या अश्रूंची आठवण कवीला सातत्याने होते. कवीने हे सर्व खूप कलात्मक पद्धतीने मांडले आहे असे नाही; येथे कलात्मक मांडणीच्या न्यूनतेची जागा नवीन अनुभवाच्या जाणिवेने भरून काढलेली आहे, हे कविता वाचताना जाणवत राहते.

'अम्मी अब्बूच्या कविता' हा जावेद शेख यांचा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. एका अर्थाने हे जावेदचे आत्मकथन आहे. कोणत्याही विषयाचा अभ्यास करायचा असेल तर त्या विषयाचे वर्गीकरण करणे हा अभ्यासकाच्या आवडीचा भाग असतो. कवितांचा आणि साहित्याचा अभ्यासदेखील वर्गीकरणापासून सुटलेला नाही. दलित साहित्य, ग्रामीण साहित्य अशी प्रचलित स्वरूपाची करणे आहे. दलित म्हणून आलेल्या अनुभवाचे प्रतिनिधीत्व दलित साहित्य करते तर ग्रामीण संस्कृतीचा भाग असताना आलेल्या अनुभवाचे प्रतिनिधित्व ग्रामीण साहित्य करते. त्या त्या लेखकाने आपल्या अभिव्यक्तीच्या जोरावर निर्माण केलेली ही साहित्याची दालने आहेत. यात अजून अनेक दालनांची भर पडत राहील. जावेदने अशाच मराठी मुस्लीम साहित्याच्या दालनामध्ये नवी भर या कवितासंग्रहाच्या माध्यमातून टाकली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दलित आत्मकथने प्रकाशित झाली, तशीच मोठ्या संख्येने मुस्लीम आत्मकथने प्रकाशित व्हावीत इतका वेदनेचा अनुभव मुस्लीम समाजानेदेखील घेतलेला आहे हे आपणास आजूबाजूला दिसतेच. शिक्षण हा असा वज्राघात आहे की, त्याने अज्ञानाचे पाश गळून पडतात आणि अभिव्यक्तीला मोकळी वाट मिळते.

जावेद हा एक सुशिक्षित मुस्लीम तरुण आहे. त्याने शिक्षणाच्या आधारेच आपली उपजीविका मिळविली त्यामुळे त्याच्या ज्ञानचक्षूंनी अनुभवांची जाणिव व जाणिवेचा अनुभव नेमका शोधला आहे व तोच ‘अम्मी अब्बूच्या कविता’ या संग्रहात मांडला आहे.

साधारण 37 कवितांचा हा 112 पानी काव्यसंग्रह मनामध्ये भावनांची व डोळ्यांमध्ये अश्रूंची त्सुनामी आणल्याशिवाय राहत नाही! जावेदचे काव्य याला कारणीभूत आहे असे नाही तर जावेदच्या अनुभवांचे वेगळेपण याला कारणीभूत आहे. गावात मुस्लीम धर्माची काही घरे असतातच. काही गावांत त्यांची संख्या जास्त असते. धार्मिक ओळखीने येणारे अनुभव कदाचित गावामध्ये तेवढे कटू नसतात. पण गरिबी व अज्ञान यांमुळे येणारे अनुभव नक्कीच कटू असतात. कविता ही वीजेसारखी असते. ती क्षणार्धात सत्याचा कडकडाट करते, आणि असत्याच्या वृक्षावर पडते. त्यामुळे अज्ञान जळून खाक झाल्याचा अनुभव येतो. जावेदच्या मुस्लीम घराच्या चार भिंतींमध्ये अस्तित्वात असलेले अनुभवविश्व कविता जाणिवेच्या पातळीवर आणते तेव्हा, ती वाचकावर कोसळते. मराठी साहित्याने मुस्लीमांचे अनुभवविश्व अजून पाहायचे बाकी आहे याची जाणीव जावेदची कविता करून देते. मुस्लीम घरातील संघर्ष माणूस म्हणून सारखाच वाटत असला तरी, त्याला ‘मुस्लीम’ कडा दिसते. गावगाड्याच्या संरचनेमध्ये आजच्या तुलनेत सर्वच भरडले जात होते हे आता सर्वमान्य होत आहे. परंतु, मुस्लीम समाज हा गावगाड्याचा सदस्यच नाही. गावगाडयाने ग्रामीण समाजातील व्यक्तीचा दर्जा व त्याची उपजीविका यांची दखल घेतलेली होती. पण मुस्लीमांचा दर्जा व उपजीविका यांची दखल गावगाडयात नाही. तसेच शेतीचा आधार या समाजाला नसल्याने त्याला उपजीविकेचे साधन उर्वरित कामांमध्ये शोधावे लागत असे. डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले त्याप्रमाणे, आपल्याकडे कामाला दर्जा दिला गेला आणि त्यावरून कारागिरीचा दर्जा ठरला. कामांच्या दर्जाची उतरंड गावगाडयातच संपते. त्यामुळे दर्जाचा दावादेखील केला जाऊ शकत नाही, अशा कामांना पर्यायाने -  सर्वच नाही पण - अनेक मुस्लीम कुटुंबांना उपजीविकेचे साधन बनवावे लागले. जावेद या कवीचे अम्मी आणि अब्बू असेच छोटेखानी व्यवसाय करून उपजीवीका करतात, हे मनोगतामध्ये जावेदने स्पष्ट केले आहे. जसे की - रेल्वे फलाटावर पेप्सी, वेफर्स, वडापाव विकणे, भाजी मार्केटमध्ये मिरच्या, कोथींबीर विकणे इत्यादी कामे अम्मी अब्बू यांनीच नव्हे तर स्वतः कवीनेदेखील केलेली असल्याने प्रत्यक्षानुभव कवीकडे आहे. या अनुभवाची जाणीव होते तेव्हा त्याच्या अभिव्यक्तीला पाय फुटतात.


हेही वाचा : सुरेश भटांनंतर मराठी गझल मोठी करणारा इलाही! - अविनाश सांगोलेकर


कवी कवितेमध्ये प्रामुख्याने आपल्या आई-वडिलांच्या अगतिकतेच्या वेदनेच्या अनुभवांना व्यक्त करतो. कवी व्यष्टी चित्रण करण्यावर भर देतो. एका अंगाने पाहिल्यास त्याला समष्टीचे काही-घेणे नाही. पण समष्टीच्या पोकळीत वेदनेचे ध्वनी गुंजत राहून समष्टीला व्यष्टींचे वेगळेपण ते मान्य करायला लावतात. गरीब जीवन जगण्याची धडपड ही सर्वांचीच समान असते असे मानून चालणाऱ्या समष्टी स्वरूपाच्या भूमिकेला मुस्लीम म्हणून व्यक्तीचे स्वतंत्र स्वरूप कवी दाखवू पाहतो. तो स्वतः जन्माला येण्याआधीपासूनच्या अम्मीच्या वेदनेचा वेध घेण्याचा प्रयत्न कवी करतो. कवीला विठाई नावाच्या दायीने त्याच्या आईशी जन्मतःच तोडलेली नाळ हवी आहे. त्याला त्याच्या आईच्या वेदनेची ही नाळ वाटते. आईची वेदना त्याला स्वत:कडे घ्यायची आहे. पावसाच्या प्रसंगांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेसाठीची होत असलेली आईची घालमेल कवितेमध्ये वारंवार येते. आईने चमकणाऱ्या विजांच्या प्रतिबंधासाठी दारात मुसळे ठेवणे, ताप आल्यावर मीठ उतरवणे इत्यादी ग्रामीण संस्कृतीत असणाऱ्या पारंपरिक उपचारांच्या प्रकारांना कवी विरोध करत नाही. त्यामध्ये तो जगण्यासाठीचा असलेला लढा शोधतो. आईची ही एक प्रकारची मुसळी मायाच आहे असे वाटते. कुटुंबाच्या संकटांवर मायेच्या मुसळाने एक प्रकारे ती प्रतिबंधच करते असे कवी सांगतो. वडिलांच्या विडी पिण्याच्या सवयीवर कवी राग व्यक्त करत नाही. अब्बू बिडीच्या धुराच्या भौमितीक आकृत्या काढायचा तर तो हीरो आणि जादूगार वाटायचा असे या अनुभवाचे चित्रण कवितेत येते. कवी आईला समजून घेण्याची धडपड व्यक्त करतो, मग तो जन्माच्या वेळची नाळ शोधतो, आईच्या मासिक पाळीचा अनुभव बघतो, मिस्री खाऊन तिने मारलेल्या पिचकारीकडे वेगळ्या भूमिकेतून बघतो, तिच्या दगडासारख्या हातांकडे लक्ष वेधतो, आईच्या व अब्बूच्या डोळ्यांत तरळणाच्या अश्रूंची आठवण कवीला सातत्याने होते. कवीने हे सर्व खूप कलात्मक पद्धतीने मांडले आहे असे नाही; येथे कलात्मक मांडणीच्या न्यूनतेची जागा नवीन अनुभवाच्या जाणिवेने भरून काढलेली आहे, हे कविता वाचताना जाणवत राहते. 

ही कविता केवळ आत्मकथनच मांडत नाही तर गरिबी-श्रीमंती, ज्ञान-अज्ञान, श्रद्धा-अंधश्रद्धा, वस्ती-सोसायटी, श्रद्धा-विज्ञान, धर्म-भेदभाव या द्वंद्वांचा अनुभव उभा करते. परंतु, या सर्व द्वंद्वांकडे पाहण्याची कवीची स्थिर वृत्तीही समोर येत राहते.

कवीच्या मनावर घरातील मुस्लीम धर्माचे संस्कार तर आहेतच पण तथागत बुद्धांचे, तुकोबांचे, शिवाजीराजांचे, कबीरांचे देखील संस्कार असल्याचे जाणवते. बुद्धाच्या ‘भवतु सब्ब मंगल’चा संदेश कवितेत जाणवत राहतो. काव्यसंग्रहातील कवितांच्या विषयाची सुरूवात दुःखाने होते, नंतर बालपण, कर्तुत्वाचा बहर देणारे तारूण्य, वार्धक्य या अवस्था न कळत कवितेत ठराविक टप्प्यांवर येत राहतात. तोडण्यात असणारी सहजता पण जोडण्यात असणारे काठीण्य याचा वेध कविता घेण्याचा प्रयत्न करते. कविता विद्रोहाची भाषा बोलत नाही. नैतिकतेच्या अनुशासनावर कवीचा भर आहे. लिंगभेदाच्या समस्येबाबत कविता जागरुक आहे, वैज्ञानिक प्रबोधनाची जाणीव कवितेमध्ये दिसते, गरीब असला तरी त्याला आदर दाखवला पाहिजे या नैतिक गरजेबदद्ल ती आग्रही आहे. कवीने श्रद्धा आणि जाणिवांची सामायिकता दाखवून मुस्लीम धर्माच्या अंगाने येणाऱ्या अंतर्गत आणि बाह्य द्वंद्वांवर मात करायचा नवा मार्ग दाखवला आहे. भूतकाळातील दारिद्रयाच्या वेदनांमध्ये सामाजिक बंधुतेचा आधार होता पण वर्तमानातील समृद्धतेत भेदभावाचा भस्मासूर सर्वांना भयभीत करतो हे सत्य कविता पुढे आणते.

कवी शिक्षण घेऊन नोकरीला लागून दारिद्रयाच्या खाईत असणाऱ्या कुटुंबाला दारिद्रयमुक्त करतो. यामधील प्रवास त्याला आठवतो. तत्संबंधीच्या आठवणी हाच कवितेचा विषय आहे. अम्मी अब्बूचा संघर्ष थांबला आहे. नव्या सोसायटीमध्ये आता कुटुंब राहते. भाजी विकून अम्मी हिशेब लावत कुटुंब सांभाळायची. ती आता चांगल्या घरामध्ये राहते. त्या घरात कामाला बाई आहे.. आता अम्मी कामवाल्या बाईच्या खाड्यांचा हिशोब लावते आहे. या दोन हिशेबांतील प्रवास तुलनेने जलद पूर्ण झाला आहे. हे केवळ शिक्षणाने शक्य झाले आहे. या परिस्थितीवर शिक्षणाने मात करता येते हे कवी यशस्वीरित्या दाखवतो.

अब्बूला आता घरात आराम करता येतो पण अब्बू अस्वथ होऊन अबोल झाला आहे. तो स्थिर होऊन खिडकीतून विमनस्क अवस्थेत बाहेर पाहतो आहे. अब्बूला धर्मांधतेच्या व जातीयतेच्या विषाचा वास येतो आहे. त्याला पुढच्या पिढीच्या शांततेची चिंता लागली आहे. अशा रीतीने कवी स्वतःच्या जीवन संघर्षात शांतीचा संदेश शोधतो आहे. इथे त्याला विद्रोहाची, विद्वेषाची गरज भासत नाही. कवी अत्यंत हळूवारपणे केवळ स्वतःच्या अनुभवांना जाणिवेच्या पातळीवर शोधत ती जाणीव इतरांच्या अनुभवांना देत, शांतीचे व समाधानाचे सुत्र मांडू पाहतो आहे. कवीची धार्मिक ओळख अधोरेखित करून कवितेचा आस्वाद व संदेश पूर्वग्रहाने युक्त होईल असे कोणी म्हणेल, पण गॅडमर या जर्मन तत्त्वज्ञाच्या मते पूर्वग्रह सत्याची पार्श्वभूमी निर्माण करतो. सत्य हे संदर्भांनी युक्त असते. सत्याला संदर्भहीन करण्याने सत्य निसटून जाते. म्हणून मुस्लीम साहित्याचे दालन पुढे समृद्ध होत गेले तर मराठी मुस्लीम समाजाच्या अनुभवाची अभिव्यक्ती मराठी साहित्याचा नवीन पाठ गिरवू शकते. पारंपरिकतेमुळे मागासलेल्या जीवनामध्ये शिक्षणाच्या साहाय्याने क्रांती घडवून आणता येते. याच्या प्रथमपुरुषी अनुभवाचे चित्रण अम्मी-अब्बूची कविता करते. जीवनसंघर्षामध्ये शिक्षण मुक्ती मिळवून देते, या फुले-आंबेडकरप्रणित संदेशाचा अनुभव सदर कवितासंग्रह मांडतो. कवितासंग्रह आगामी धोक्याची सूचनादेखील करतो. या अर्थानेही ‘अम्मी आणि अब्बूच्या कविता’ या जावेद शेख कवीच्या कवितासंग्रहाचे महत्त्व आहे.

- डॉ. हरिश नवले
harishnavale9@gmail.com 
(लेखक , सा.फु. पुणे विद्यापीठ येथे तत्त्वज्ञान विभागात सहयोगी प्राध्यापक आहेत.)


हेही पाहा : 'साधना'कडून प्रकाशित झालेली मोहिब कादरी यांची आत्मपर लेखनाची दोन पुस्तके

 

 

Tags: मुस्लीम मराठी साहित्य नवे पुस्तक साहित्य संस्कृती मुसलमान समाज समीक्षा मुस्लीम साहित्य हमीद दलवाई Load More Tags

Add Comment

संबंधित लेख