गाढवांचा भार

तत्वनिष्ठ राजकारणी बी. जे. खताळ पाटील यांचे आज (16 सप्टेंबर 2019 रोजी) निधन झाले. त्यांनी वयाच्या शंभरीत लिहिलेल्या 'वाळ्याची शाळा' या पुस्तकातील लेख

visitnsw.com

तत्वनिष्ठ राजकारणी हे विशेषण गांभीर्याने लावता येईल अशा बी. जे. खताळ पाटील यांचे आज ( 16 सप्टेंबर 2019 रोजी ) निधन झाले.  26 मार्च 2018 रोजी त्यांनी वयाची 100 वर्षे पूर्ण केली होती, तेव्हा त्यांनी लिहिलेले माझे शिक्षक(साधना प्रकाशन) हे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यानंतर त्यांनी वाळ्याची शाळा हे पुस्तक लिहायला घेतले होते. ते पुस्तक गेल्या आठवड्यात ( दादा ज्यांना मानसपुत्र म्हणायचे त्या ) संतोष खेडलेकर यांनी प्रकाशित केले आहे.  त्या पुस्तकाची  कल्पना अशी आहे की, गेली तीन दशके खताळदादांची सेवा करायला - त्यांची साथसंगत करायला रामनाथ वाळे नावाचे गृहस्थ रोज सकाळी येतात. त्यांना राजकारणातील बदलांविषयी कमालीचा रस असतो, त्यामुळे ते दादांशी गप्पा मारताना, त्यांची निरीक्षणे सांगतात आणि दादांना काही मूलभूत म्हणावे असे प्रश्न विचारतात. तेव्हा 70 वर्षांचे वाळे  हे शिक्षक तर 100 वर्षांचे खताळ हे विद्यार्थी असे चित्र आकाराला येते. त्यातून आठ लेख तयार झाले, ते म्हणजे विंचवाचे बिऱ्हाड, उंदरांचा सुळसुळाट, घोड्यांचा बाजार, गाढवांचा भार, मेंढ्यांचा कळप, हत्तीचा चित्कार, कुत्र्याच्या निष्ठा, रंग बदलणारा सरडा.  त्यातील दोन लेख  प्रसिद्ध करीत आहोत. एक- घोड्यांचा बाजार आणि दुसरा- गाढवांचा भार.

गाढवांचा भार
   

गाढवाला गर्दभ किंवा रासभ असेही म्हणतात. घोडा आणि गाढव एकाच वंशावळीतले असावेतकारण त्यांच्या संकरातून 'खेचरनावाचा तिसरा प्राणी जन्माला येतो. वंश एक असला तरी घोडा आणि गाढव यांच्या प्रकृतीत व प्रवृत्तीत बराच फरक आहे. घोडा कधी अवखळ व बंडखोर तर कधी नाठाळासारखा वागतो. अन्याय-अत्याचाराविरुद्ध प्रतिकार नोंदवितो. गाढवाचे मात्र तसे नाही. गाढव हा अतिसहनशील प्राणी आहे. गाढव  सामान्यतः ‘ठेविले अनंते तैसेची रहावेया मनोवृत्तीचे असते. गाढवाच्या असल्या अनमोल गुणाला काही जनसमूह तुच्छ मानतात. त्याची हेटाळणी करतात. मात्र जगात सर्वत्र तसे नाही. काही ठिकाणी या गुणांची कदर केली जाते. अमेरिकेतील डेमोक्रेटिक या बलिष्ठ राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह 'गाढवआहे.   

जीवनोपयोगी वस्तूंची ने-आण करण्यासाठी गाढवाचा उपयोग केला जातो. तसेच वाळूमाती वा अन्य वस्तूंचा भारही मालक गाढवावर लादतो. ठराविक ठिकाणाहून तो भार उचलायचा आणि निश्चित ठिकाणी पोहोचवायचा हे गाढवाचे काम. या कामासाठी त्याला हेलपाटे मारावे लागतात. थकव्यापोटी गाढवाची हालचाल थोडी जरी मंदावली तरी मालक त्याला चाबकाने फटकावतोमारतो. नाईलाजाने गाढव पुन्हा आपली सर्व शक्‍ती एकवटून कामाला लागते. तेही विनातक्रारकोणत्याही प्रतिकाराशिवाय. हा असतो दिवसामागून दिवसांचा गाढवाचा दैनंदिन कार्यक्रम.   

रोज सायंकाळी मालक गाढवाला मोकळा करतोपरंतु त्याच्या खाण्यापिण्याची सोय मात्र करीत नाही. ती गाढवाला स्वतः होऊन करावी लागते. मग गाढव जवळची नदीनाला शोधते आणि आपली तहान भागवते. शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतातील पिकावर भूक भागवण्याचा प्रयत्न करते. मात्र स्वमालकाच्या पिकाला तोंड लावीत नाही. मालकाची ही बेपर्वाई वेठबिगारीसारखी असते. गाढव ती सहन करते. गाढवाने आपल्या पिकाला तोंड लावले ही गोष्ट शेजारच्या शेतमालकाच्या लक्षात आली तर तो त्याला मारझोड करतो. गाढव तीदेखील सहन करते. अशी आहे गाढवाची स्वामिभक्ती!   

असाच एक मोठा वर्ग मानव जमातीत आहे. तो काबाडकष्ट करतोपोटाला टाच देऊन काम करतो. कधी-कधी तर अर्धपोटी राहूनही काम करतो. राहण्याची नीट सोय नाही अशा गलिच्छ वस्तीत राहून तो मालकाची सेवा करतो. आज नाही तर उद्याउद्या नाही तर परवा - कधीतरी मालक आपल्या परिस्थितीचा विचार करील व आपल्या परिस्थितीत फरक पडेल या आशेवर तो जगत असतो.   

माणूस काय किंवा गाढव कायत्यांच्या स्वामिभक्तीलाही किंमत असते. मात्र ती पशू जमातीतील गाढवाला मोजावी लागते. जगप्रसिद्ध नाटककार शेक्सपियरने 'अॅज यू लाईक इटया नाटकात तिचे मोठे छान वर्णन केले आहे. नाटकातील नोकर अँडम मालकाला सांगतो, 'मालकतुम्हाला माहीत नाही; काही लोकांचे सद्गुण हेच त्यांचे शत्रू असतात’.   

पशुंमध्ये जशी गाढवं असतात, तसे दोन पायांच्या मनुष्य प्राण्यांतही असतात. मालक सांगतील ते काम बिनचूक आणि बिनबोभाट करण्याचा प्रयत्न ते करतात. कारण ते दिल्या भाकरीला जागतात. आपले विचार बाजूला ठेवून मालकाच्या विचाराप्रमाणे आचरण करतात. कामाचे श्रेय चांगले असेल तर ते मालकाचे आणि वाईट असेल तर ते त्या मानव गाढवाचे! हे त्या गाढवाला समजते, पण ते त्याविरुद्ध बोलत नाही. प्रतिकार करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. असल्यांना कोणी हेलकरी म्हणतात. त्यांनाच श्रद्धाळूदेखील म्हणता येईल.   

तथापि, मनुष्यप्राण्यातील गाढवांची आणखीही एक जमात आहे. तिचे पाऊल बरेच पुढचे असते. ती जमात श्रद्धाळूपेक्षा अधिक अंधश्रद्धाळू असते. ती ज्याला मानते त्याच्या इशाऱ्याप्रमाणे वाटेल तेवाटेल तितकेवाटेल तसे काम कर्तव्य समजून विनातक्रार करण्यास तयार असते. साधी शिवीगाळ वा हाणामारी इथपासून ते अगदी खूनखराबा करेपर्यंत! अशांना बगलबच्चे म्हणतात. बगलबच्चा म्हणजे सर्वस्वी दुसर्‍याच्या तंत्राने चालणारा, एखाद्याच्या हाताखालचा आज्ञांकित मनुष्य. असल्या बगलबच्च्यांनीच अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे प्रणेते डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे आदींच्या हत्या केल्या आहेत. हे सर्व माहीत असूनही, सध्याचे सत्ताधीश त्याकडे कानाडोळा करतात. गुन्हेगाराविरुद्ध कारवाई करण्यास कानकूच करतात. काय म्हणावे या कृतीला!   

सत्ताधीशांच्या कृपाछत्राखाली वावरणारे हे दोन पायाचे गर्दभच ना! राष्ट्रदेशसंस्कारसंस्कृतीन्याय-अन्याय असल्या विचारांशी यांना काही देणे-घेणे नसते. ते एखाद्याला टोपी काढ म्हणतील, ‘जय श्रीराम’ म्हणायला सांगतील. 'नाहीतर आमच्याशी गाठ आहे’ असे म्हणतील. कोणी म्हणणार, “गाडी थांबवगाडीत काय आहे ते दाखव.” 'गोमांसनसले तरी ते त्याला गोमांसच म्हणणार. कोणी लोकसभेत भाषण करणार आणि म्हणणार- “प्रत्येक स्त्रीने चार मुलांना जन्म दिला पाहिजे.”  

अशातच एक दिवस निवडणुका येतात. नेते, पुढारी, कार्यकर्ते यांची धावपळ सुरू होते. ते वरील वर्गापर्यंत पोहोचतात. मग भाषणेआश्वासने सुरू होतात. मतांची याचना केली जाते. थोडीबहुत पैशांचीही देवाण-घेवाण होते. असे करणाऱ्यांना सत्ताधीश आमदार-खासदार करतात. वेळ पडल्यास सत्तेच्या खुर्चीवरही बसवतात. यालाच लोकशाही राजवट म्हणायचंखरंतर ही हुकुमशाहीच आहे. निवडणुका संपल्या कीजनतेची परिस्थिती जशीच्या तशी रहाते.   

जनता हे सर्व ‘गाढवाचा भार’ समजून सहन करते. कार्यकर्तेपुढारीनेते यांची चंगळ होते. स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे होऊन गेलीत. भारतात बरेच काही चांगले घडले आहे. परंतु सामान्यांच्या आर्थिकसामाजिक व शैक्षणिक जीवनात फारसा बदल झालेला दिसत नाही. आता तर सगळे चित्रच बदलले आहे. हा भार कमी होण्याची वाट किती दिवस पाहायची असा सवाल आहे.   

आमचा वाळे म्हणतो- “अशांच्या हाती दीर्घकाळ देशाची सत्ता राहिल्यास काय होईल या देशाचेदादा, होईल का हो गाढवाचा भार कमी?”   

प्रश्न खरंच रास्त आहे... पण मी तरी वाळेला काय उत्तर देऊ

बी. जे. खताळ पाटील यांनी 99 व्या वर्षात पदार्पण केले तेव्हा साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झालेली त्यांची मुलाखत
बी. जे. खताळ पाटील यांनी 101 व्या वर्षात पदार्पण केले तेव्हा साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झालेला संपादकीय लेख.  

Tags: Donkey Valyachi Shala बी जे खताळ पाटील लेख अनुभव वाळ्याची शाळा गाढवांचा भार Load More Tags

Add Comment