अंगणवाडीऐवजी पालकांची पसंती 'प्ले-ग्रुप'लाच...

फोटो सौजन्य: pixabay.com

0 ते 6 या वयोगटातील मुलांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांना शाळापूर्व अनौपचारिक शिक्षण देण्यासाठी भारत सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाने 02 ऑक्टोबर 1975 रोजी 'एकात्मिक बाल विकास सेवा' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरु केला. 2011 च्या जणगणनेनुसार भारतात या वयोगटातील मुलांची संख्या 15.8 कोटी इतकी मोठी आहे. मात्र आज बहुतांश पालक अंगणवाडी ऐवजी खाजगी 'प्ले-ग्रुप'लाच  पसंती देताना दिसतात. याचाच आढावा घेणारा हा लेख. 

'एकात्मिक बाल विकास सेवा' हा भारत सरकारनं 1975 मध्ये सुरू केलेला एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम. सहा वर्षांखालील मुलं आणि त्यांच्या माता यांच्या सर्व प्रकारच्या गरजा लक्षात घेऊन अमलात आणला गेलेला हा जगातील सर्वांत मोठ्या उपक्रमांपैकी एक उप्रकम. या उपक्रमाद्वारे देशभरातील 13 लाख अंगणवाड्यांचे जाळे मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देते आणि त्याचवेळी शाळापूर्व वा अगदी लहानपणात आवश्यक असणारे शिक्षण हा त्याचा केंद्रबिंदू असतो.

शाळेत थेट प्रवेश करण्यापूर्वी अंगणवाड्यांमध्ये मिळणाऱ्या या शिक्षणामुळे मूल शाळेत जाण्यासाठी केवळ तयारच होतं असं नाही तर त्याला समूहात कसं वागावं आणि भावना कशा प्रगट कराव्यात याचंही शिक्षण मिळतं. त्याला तेथे पोषणयुक्त आहारही मिळतो आणि त्याचबरोबर भाषा व आकलन विकासाला चालना मिळेल असे क्रियाकल्पही तेथे घेतले जातात. 

घर वा परिसरात बोलल्या न जाणाऱ्या भाषेऐवजी तेथे बोलल्या जाणाऱ्या भाषेतून म्हणजेच मातृभाषेतून हे शिकणं आणि शिकवणं अंगणवाडीत होत असतं आणि त्यामुळेच त्याला या क्षमता सहज ग्रहण करता येतात. मुख्य म्हणजे या सर्व एकात्मिक सेवा मोफत उपलब्ध असूनही पालक या केंद्रांऐवजी इंग्रजी माध्यमाच्या खाजगी 'प्ले-ग्रुप'ची निवड करताना दिसतात.

“हे चित्र काही केवळ मेट्रो सिटीज वा टू-टीयर स्तरावरील शहरांपुरतं आता मर्यादित राहिलेलं नाही,” असं शलाका सावेनं सांगितलं. शलाका ही महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड ब्लॉकमधील वेसवी-नांदगाव इथं अंगणवाणी कार्यकर्ती म्हणून काम करते. हाच मुद्दा पुढे नेला तो आंबवणे खुर्द येथील गीता दिवेकर हिने. ती म्हणाली “अंगणवाडीमध्ये मुलं तीन-तीन वर्षे येत राहिली तरी ती एकाच वर्गात राहतात. त्याचवेळी खाजगी 'प्ले-ग्रूप'मध्ये बालवाडीच्या ज्युनिअर वर्गातून सिनिअरमध्ये जातात.” अंगणवाड्यांमध्ये असे वर्ग नसतात, ही पालकांची मुख्य तक्रार असल्याचं तिनं निदर्शनास आणून दिलं.

“आमच्या या अंगणवाडी केंद्रांमध्ये आम्ही मुलांना ज्ञानेंद्रियांचा वापर करत त्यांचा विकास साधायचा प्रयत्न करत असतो. आमची सारी गाणी आणि क्रियाकलापांमुळे बालकांच्या गती आणि मती यांना प्रेरणा मिळते. याबरोबरच त्यांना भाषा तसंच शारीरिक आणि अन्य संज्ञांची माहिती करून देतो. मराठीबरोबरच इंग्रजीतील बडबडगीतेही आम्ही शिकवतो. अक्षर आणि आकडे ओळख विविध खेळ आणि रंगीत चित्रांच्या माध्यमातून त्यांना करून दिली जाते. तरीही पालक आपल्या मुलांना ग्रेडेशन पद्धत असलेल्या खाजगी 'प्ले-ग्रूप'मध्येच घालणे पसंत करतात,” असं दिवेकर यांनी सांगितले. अंगणवाड्यांचं महत्त्वच नव्हे तर अस्तित्व कायम राखायचं असेल तर त्यासाठी ही पद्धत अमलात आणायला हवी, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

मंडणगड शहर तसंच परिसरात सध्या पायाभूत सेवा-सुविधांची काम सुरू आहेत आणि त्यामुळे तेथे अन्य राज्यांतील मजुरांची वस्ती वाढत आहे. त्यामुळेच आपल्या मातृभाषेपेक्षा वेगळ्या भाषेत शिक्षण घ्यावे लागणाऱ्या मुलांचं प्रमाणही वाढत आहे.

रोजगाराच्या संधींसाठी इंग्रजी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे, असा विश्वास अनेकांच्या मनात असतो आणि याच मुद्याचा आधार घेऊन शहरी भागातील काही शिक्षणसंस्था आपलं जाळं तेथे पसरू पाहत आहेत. इंग्रजीच्या आकर्षणापोटीच अशा पालकांच्या मुलांना आपल्याकडे खेचून घेण्यात या संस्था यशस्वी होत आहेत.

या शिक्षणसंस्थांनी कितीही मोठे दावे केले तरी अशा खाजगी संस्थांमधील शिक्षकांना काहीही प्रशिक्षण मिळालेलं नसतं. पैसे वाचवण्यासाठी या संस्था प्रशिक्षण नसलेल्या वा कमी शिक्षण असलेल्यांना आपल्या संस्थांमध्ये कंत्राटी पद्धतीवर कमी पगारात नेमत असतात. त्यामुळेच अशा खाजगी केंद्रांमधील शिक्षणाचा दर्जा तसंच शिकवण्याची पद्धत याबाबत अनेक तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे. 'इंग्रजी माध्यम' अशी पाटी लावली की लगेच तेथे होणाऱ्या गर्दीचा फायदा घेतला जातो, आणि मग दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या पालकांनाही या संस्था आकर्षित करत असतात.

“या खाजगी संस्था दरमहा पाचशे रुपयांपासून हजारापर्यंत कितीही फी आकारतात. मात्र, त्याचवेळी अंगणवाड्यांमध्ये हे शिक्षण मोफत असतं. खाजगी शाळांमध्ये एखाद्या छोट्याशा खोलीत मुलांना दाटीवाटीनं बसवलं जातं आणि तेथे शिकवल्या जाणाऱ्या इंग्रजी बालगीतांचा अर्थ अनेकदा त्या शिक्षकांनाही ठाऊक नसतो. शिवाय, या बालगीतांमधील प्रतिमांचा या मुलांच्या रोजच्या जीवनाशी काहीही संबंध नसतो. त्यांच्या रोजच्या जगण्यातील कोणतंही वातावरण नसलेल्या या गीतांचा काहीही अर्थ या मुलांना समजत नाही,” असं नरगोळी येथील अंगणवाडी कार्यकर्ती सुचित्रा काजळे यांनी सांगितलं. त्याशिवाय, अंगणवाड्यांमध्ये मिळतो, तसा कोणताही पोषणयुक्त आहारही या मुलांना दिला जात नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांमध्ये प्रगतीची आस असते आणि आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून त्यासाठी पैसे मोजायची त्यांची तयारी असते. दुर्दैवानं, या खाजगी संस्थांमध्ये त्यांच्या आशा-आकांक्षांची धुळधाण होते. पण कष्टकरी पालकांना याची जाणीव होत नाही कारण त्यांचा दिवस राबण्यातच जात असतो.

खाजगी बालवाड्यांमधील मुलांची रीतसर शाळांत जाण्यासाठी आवश्यक तयारी झालेली नसते. ही मुलं 'शाळायोग्य' झालेली नसतात. अध्यापनाचा गंभीर पातळीवर विचार केला, तर त्यांच्यासाठी ते सारंच तिरपागडं होऊन गेलेलं असतं.

"पहिल्या इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या वा पाच वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना एक ते वीस आकडे मोजता यावेत आणि सोपे, छोटे शब्द वाचता यायला हवे असतात. साध्या साध्या बेरजा-वजाबाक्याही करता याव्यात अशी अपेक्षा असते. मात्र या खाजगी बालवाड्यांमधून येणाऱ्या मुलांना त्यांना ना धड आकडे मोजता येतात, ना कोणत्याही शब्दाचं स्पेलिंग सांगता येतं," मंडणगड येथील एक सामाजिक कार्यकर्ते सुदेश विभूते यांनी खेद व्यक्त केला.

भारतात अत्यल्प उत्पन्न गटांतील कुटुंबाचा महिनाकाठी उत्पन्न जेमतेम नऊ ते वीस हजारांच्या घरात असतं आणि आपल्या या तुटपुंज्या उत्पन्नाचा बराच मोठा भाग ते आपल्या मुलांच्या या खाजगी बालवाड्यांवर खर्च करत असतात. त्यांच्या मते आपल्या मुलांना खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालणं, ही त्या मुलांच्या विकासासाठी केलेली मोठी गुंतवणूक असते.

रोजगाराच्या संधींसाठी इंग्रजी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे अशा समजुतीमुळे पालक आपल्या मुलांना अंगणवाड्यांऐवजी खाजगी 'प्ले-ग्रूप'मध्ये पाठवतात. आंगणवाडीत येणारी मुले ही तीन वर्षे एकाच वर्गात राहतात, तर खाजगी प्ले ग्रूपमध्ये त्यांची ज्युनिअरमधून सिनिअरमध्ये अशी बढती होत असते, हे ही त्याचं एक कारण दिसते.

भारताच्या ग्रामीण भागात खाजगी संस्थांनी पूर्व-प्राथमिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकल्यामुळे झालेल्या नुकसानीला अनेक पदर आहेत. या तथाकथित पूर्व प्राथमिक शाळांतील मुलांना पोषणयुक्त आहारापासून वंचित राहावे लागते आणि त्यामुळे त्यांच्या बौद्धिक तसेच शारीरिक विकासावर मोठाच परिणाम होतो. मंडणगड येथील एकात्मिक बाल विकास सेवा उपक्रमाच्या पर्यवेक्षिका लीना मराठे सांगतात "पालकांना वाटतं की आपलं मूल आता प्रगती करणार. पण प्रत्यक्षात या खाजगी बालवाडयांमुळे फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होतंय."

या गरीब तसेच सामाजिक स्तरावरील उपेक्षित कुटुंबांच्या मुलांना प्राथमिक शाळांत प्रवेश घेताना, त्यांची आवश्यक ती पूर्वतयारी झालेली नसते आणि त्यामुळे पुढील शिक्षण घेताना त्यांना मोठा फटका बसतो. खाजगी बालवाड्यांनी अंगणवाड्यांच्या अस्तित्वावरच मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या खाजगी हस्तक्षेपामुळे सरकारच्या एका विचारपूर्वक उभ्या केलेल्या उपक्रमावर काही नकारात्माक परिणाम तर होत नाही ना, याचा आता देशाच्या धोरणकर्त्यांनीच गंभीरपणे विचार करायची वेळ आली आहे. त्यासाठी स्थानिक आणि अन्य राज्यातून आलेल्या मजूर कुटुंबांचा विश्वास संपादन करून त्यांना अंगणवाड्यांचं महत्त्व पटवून द्यायला हवं.

खाजगी शाळांमध्ये पैशांची उधळपट्टी करण्याऐवजी या अंगणवाड्यांमध्ये आपल्या मुलांना घातल्यानं त्यांचा सर्वांगिण विकास कसा होतो, हेही त्यांना आवर्जून पटवून देण्याची नितांत गरज आहे. तसं करण्यात यश आलं, तरच अंगणवाडी हा उपक्रम यापुढे आपलं अस्तित्व टिकवू शकेल.

- अलका गाडगीळ, मंडणगड, रत्नागिरी.
alkagadgil@gmail.com

(हा लेख मूळ इंग्रजीमध्ये en.gaonconnection.com वर प्रसिद्ध झाला आहे.)

Tags: अंगणवाडी अलका गाडगीळ प्ले ग्रुप मराठी शाळा इंग्रजी शाळा भाषा विकास Alka Gadgil Anganwadi Education School Children Load More Tags

Comments:

किशोर जगताप

मी मुंबई ठाणे पालघर मधील जवळपास तीस वस्त्यांमध्ये काम करतो तसेच अनेक मध्यमवर्गीय कुटुंबाचा बालक सल्लागार म्हणून काम करतो अलका ने जे मांडलेय ते एकदम बरोबर आहे तिने वास्तवीक परीस्थीत मांडलीय इंग्रजी बालवाडीत शिकणाऱ्या मुलांचे बहाल होताहेत अजून इंग्रजी बाववाड्यांच्या निमीत्ताने बावचळलेत वेडे झालेत आणि आपले पैसे उधळून सुद्धा मुलांचे खूप नुकसान करताहेत तेंव्हा पालकांचे खूप वाईट वाटते अजून काही काळ या मृगजळामागे धावण्यात पालकांचा जाईल पण एक दिवस ते इंग्रजी शाळेला निश्चीत लाथाडतील व मातृभाषेतूनच वादातील या दिवसांचं औचित्य म्हणून आपण सर्वांनी संकल्प करण्याची गरज आहे आपल्या व आपल्या जवळची मुलांना मराठी बालवाडीत टाकण्याचा निर्धार आपण केलाच पाहिजे ,पण........

Prakash

काय खरं आणि काय खोटं अस.हे प्रकरण आहे. अंगणवाडी ही खरतर त्यावस्त्या मध्ये असतात त्या आणि तेथिल वातावरण कसे असायला हवे तसे नसते शिक्षक आणि सेविका यांच वागण बोलणं हे त्याहून अपेक्षित नसतं वस्त्या मधिल लोकल बोली भाषेत ते शिकवत असतील तर उपयोग काय !, आणि शिक्षक फक्त मानधनासाठी व खाऊसाठी येतात . मुलांना पोटतिडकिने शिकवण नाही तेच ते प्लेग्रुपवालंच किरकोळ कोर्स केलेले शिक्षक आणि भरमसाठ फि . निराशा तर दोंनही कडूनच आहे कोनव्हेंट मध्ये घालण्याची ऐपत नसते अंगणवाड्या सामाजिक कार्यकर्ते यांना सरकारला लुटण्याचे ठिकाण. तर प्लेग्रुप म्हणजे आई जेवायला आणि बाप... अशी हि गत्.

Add Comment