पुरुषत्व आणि पालकत्व...

घरगुती कामात सहभागी न होण्याच्या पुरुषी मानसिकतेमुळे बहुसंख्य महिलांची प्रचंड शारीरिक आणि मानसिक ओढाताण होते

फोटो सौजन्य : ar.casact.org

जागतिक पातळीवर झालेल्या अनेक अभ्यासांतून असे लक्षात आलेले आहे की, वडलांनी पहिल्या तीन वर्षांत मुलांच्या संगोपनात जास्त सहभाग घेतल्यामुळे मुलांच्या भावनिक आणि बौद्धिक क्षमतेवर सकारात्मक परिणाम होतात. त्याबरोबरच वडलांच्या मानसिक स्वास्थ्यावरही चांगले परिणाम होतात!  

ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवून गेल्या आठवड्यात मायदेशी परतलेल्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचं इतक्या जल्लोशात स्वागत झालं की त्याआधी विराट कोहलीचं प्रचंड ट्रोलिंग झालं होतं... हे आपण विसरूनही गेलो. 

एखाद्या प्रसिद्ध तरुण पुरुषाने घरगुती कारणासाठी व्यावसायिक काम बाजूला सारणे ही घटना भारतात तरी दुर्मीळ म्हणावी अशीच आहे! विराट कोहलीनं पहिल्या बाळाच्या आगमनासाठी बायकोसोबत राहायचं ठरवलं तेव्हा त्यानं तरुण पालकांच्या समोर एक आदर्श उभा केला म्हणून खरंतर त्याचं कौतुक व्हायला हवं होतं. निदान क्रिकेटशौकिनांनी तरी आपल्या आवडत्या खेळाडूच्या निर्णयाचा आदर करायला हवा होता... पण ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातली पहिली मॅच आटोपल्यावर पितृत्वरजेसाठी मायदेशी परतणाऱ्या कोहलीवर मात्र टीकेचा भडिमार झाला. 

खरं म्हणजे त्याची ही रजा निवड समितीने दौरा सुरू होण्यापूर्वी नोव्हेंबरमध्येच मंजूर केलेली होती. तेव्हा तशी बातमीही काही वृत्तपत्रांत आली होती... पण त्या वेळी त्या बातमीची कुणी फारशी दखल घेतली नव्हती... मात्र दौऱ्यातली पहिली मॅच हरल्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पितृत्वरजेवरून अशी काही खळबळ माजली की, जणू काही त्यानं हा निर्णय अचानक घेतला होता. एवढंच नाही तर त्याची रजा रद्द करावी अशी मागणी केली जात होती. 

पाच वर्षांपूर्वी अशाच परिस्थितीत वर्ल्डकप सामन्यांच्या वेळी महेंद्र धोनीनं कुटुंबापेक्षा खेळाला महत्त्व दिलं होतं. ते उदाहरण देऊन विराटनंही राष्ट्रकर्तव्य बजावण्याला महत्त्व द्यायला पाहिजे अशी अपेक्षा दिलीप दोशींसारख्या अनुभवी व्यक्तींपासून सामान्य प्रेक्षकांपर्यंत सगळे जण बोलून दाखवत होते. त्यामानानं फार कमी लोकांनी विराटच्या पितृत्वरजेला पाठिंबा दिला. 

भारताच्या टीमचा कॅप्टन म्हणून क्रिकेट खेळणं आणि देशाच्या सीमेवर जाऊन लढाई करणं यांत काही फरक आहे असं आपल्याला वाटत नाही का? की आपल्या बाळाचा जन्म होत असताना बापानं तिथे उपस्थित राहण्याचं महत्त्व आपल्याला समजत नाही? की बालसंगोपन, सुजाण पालकत्व अशा बाबी फक्त बायकांच्या अखत्यारीत येतात... असंच आपल्याला अजूनही वाटतं? 

तीन वर्षांपूर्वी मुंबईतल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलनं पालकांचं सर्वेक्षण केलं होतं. त्यात 4800 वडिलांनी सहभाग घेतला होता. त्यांतल्या निष्कर्षांमधून असं दिसून आलं की, 65 टक्के वडील मुलांसोबत रोज किमान दोन तास तरी वेळ घालवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. आपलं मूल कुठल्या इयत्तेत आहे, त्याचे छंद कोणते इत्यादींविषयी आजकालच्या बाबांना माहिती असते... म्हणजे एक प्रकारे मागच्या पिढीपेक्षा आजच्या पिढीतल्या पुरुष पालकांनी प्रगतीच केली आहे. 

...तरीही संगोपनातील रोजच्या कामात मुलांच्या बाबांचा सहभाग फारच कमी असतो अशीच बहुसंख्य महिला पालकांची तक्रार आहे... कारण फक्त 33 टक्के वडील घरगुती कामात किंवा मुलांना गोष्टी वाचून दाखवणं, त्यांच्याशी खेळणं अशा गोष्टींत मदत करतात. 88 टक्के बाबा मंडळींना आईशिवाय मुलांना बाहेर घेऊन जाण्याचा आत्मविश्वास नसतो. याचा अर्थ आजही बालसंगोपनाचा बराचसा भार आईवरच पडतो. 

जागतिक पातळीवर झालेल्या अनेक अभ्यासांतून असे लक्षात आलेले आहे की, वडलांनी पहिल्या तीन वर्षांत मुलांच्या संगोपनात जास्त सहभाग घेतल्यामुळे मुलांच्या भावनिक आणि बौद्धिक क्षमतेवर सकारात्मक परिणाम होतात. त्याबरोबरच वडलांच्या मानसिक स्वास्थ्यावरही चांगले परिणाम होतात!  

...पण एका अमेरिकन कंपनीनं नुकत्याच केलेल्या जागतिक सर्वेक्षणामध्ये भारतातल्या 80 टक्के पुरुषांनी असं सांगितलं आहे की, मुलांची दुपटी बदलणं, त्यांना अंघोळ घालणं आणि मुलांना भरवणं ही सगळी बायकांची कामं आहेत! पुरुषानं पैसे कमवयाचे आणि बायकांनी चूल-मूल सांभाळायचं ही आपली पारंपरिक कल्पना आहे. 

कदाचित पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ही विभागणी चालून जात असेल... पण गेल्या कित्येक वर्षांपासून शहरातच नव्हे तर निमशहरी भागातसुद्धा विभक्त कुटुंब अस्तित्वात आहेत. अशा वेळी घरगुती कामात सहभागी न होण्याच्या पुरुषी मानसिकतेमुळे बहुसंख्य महिलांची प्रचंड शारीरिक आणि मानसिक ओढाताण होते. विशेषतः नोकरी करणाऱ्या महिलांना तर याचा खूपच त्रास होतो. 

राष्ट्रीय सर्वेक्षणात 35 टक्के महिलांनी सांगितलेलं आहे की, त्यांना घराबाहेर पडून पैसे मिळवण्याची इच्छा आहे. तरीही गेल्या काही वर्षांपासून महिलांनी नोकऱ्या सोडण्याचं प्रमाण वाढायला लागलं आहे. 

मातृत्वरजा द्यावी लागेल या भीतीपोटी अनेकदा स्त्रियांना नोकरीच दिली जात नाही. सहा महिन्यांची मातृत्वरजा संपल्यावर अनेक महिला नोकरीच्या आणि आईपणाच्या दुहेरी जबाबदाऱ्यांनी त्रासून जातात. अनेक जणींना घरकामाच्या ओझ्यामुळे किंवा मुलांची काळजी घ्यायला पुरेशा सोयी नाहीत म्हणून नोकरी सोडावी लागल्याचं सर्वेक्षणातून दिसून आलं आहे. 

थोडक्यात पितृसत्ताक समाजानं महिलांवर टाकलेल्या दडपणामुळे देशाच्या श्रमशक्तीमधला स्त्रियांचा सहभाग आक्रसला आहे. जर स्त्रियांचा सहभाग पुरुषांइतका वाढला तर देशाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न तब्बल 60 टक्क्यांनी वाढेल असं मॅकिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूट या आंतरराष्ट्रीय पाहणी संस्थेचं मत आहे... मात्र यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. 

हे चित्र बदलायचं असेल तर त्यासाठी अर्थातच पुरुषप्रधान मानसिकता बदलावी लागेल आणि शिवाय कामाच्या ठिकाणीही पूरक बदल करावे लागतील. ज्याप्रमाणे कामाच्या ठिकाणी पाळणाघराची सोय उपलब्ध होणं गरजेचं आहे... त्याचप्रमाणे पुरुषांना पालकत्वासाठी रजा मिळण्यासारखे धोरणात्मक बदलसुद्धा महत्त्वाचे आहेत... त्यामुळे पुरुषांचा घरकामातला सहभाग वाढायला चालना मिळेल आणि महिलांवरचं ओझं काही प्रमाणात कमी होऊ शकेल.

स्वीडन आणि फिनलंड यांसारख्या काही देशांमध्ये तर जोडप्याला एकत्रितपणे पालकत्व रजा देण्यात येते. त्या दोघांनी आपापल्या सोयीनं ही रजा आपापसांत वाटून घ्यावी अशी त्यामागची कल्पना असते. या दोन्ही देशांनी स्त्री-पुरुष समता बऱ्याच प्रमाणात प्रत्यक्षात आणलेली आहे. सध्या भारतात फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांनाच 15 दिवसांची पितृत्वरजा मिळू शकते... मात्र अशी रजा देण्याचं कुठलंच बंधन खासगी कंपन्यांवर नाही. 

मायक्रोसॉफ्ट, झोमॅटो, आईकिआ अशा काही कंपन्या भारतातही पितृत्वरजा देऊ करत आहेत... मात्र अनेक पुरुष त्या रजेचा लाभ घेत नाहीत असं दिसतं. कदाचित कामाच्या ठिकाणी असलेल्या स्पर्धेत मागे पडण्याची भीती त्यांना वाटत असेल किंवा समाजातून होणाऱ्या टीकेची काळजी वाटत असेल... पण विराट कोहलीनं स्वतःवर टीका होण्याची शक्यता असूनही पितृत्वरजा घेतली. एक प्रकारे अनेक पालकांच्या समोर आदर्शच निर्माण करून त्यानं देशकार्यच केलेलं आहे... त्यामुळे आता ऑस्ट्रेलियातल्या विजयानंतर तरी विराट कोहलीचं कौतुक करू या...!  

- वंदना खरे
vandanakhare2014@gmail.com

(वंदना खरे या स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या आणि लेखिका आहेत.)

Tags: लेख वंदना खरे पितृत्वरजा मातृत्वरजा विराट कोहली पालकत्व पुरुषत्व Vandana Khare Paternal Leave Virat Kohli Load More Tags

Comments:

Dr.Ram Chatte

मुलांचे संगोपणात आई आणि वडिल दोघांचीही भूमिका महत्त्वाची आहे. आजच्या विभक्त कुटुंबपद्धती मध्ये आणि दोघे ही नोकरी करतात अस्या परिस्थिती मध्ये तर याचे महत्व आणखीनच वाढते..

Sarikaubale

स्वीडन आणि फिनलँडसारख्या देशाचं कौतुक आणि अनुकरण व्हायला हवं.

राजश्री साळगे

समाजातील पुरुष व स्त्री या दोघांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. विराट कोहली सारख्या प्रथितयश तरुणांची कृती स्वागतार्ह अशीच आहे. फक्त त्याकडे पाहण्याची दृष्टी असायला हवी.

दिलीप कांतीलाल खिवसरा

फारच चांगले विचार आपण मांडले, सगळ्याच पालकांनी आत्म परीक्षण या विषयावर करणे गरजेचे आहे, महिला सशक्तिकरण यामुळे होऊन भावी पिढी निरोगी, आनंदी असेल यात शंका नाही

Add Comment