उत्सव 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा...

साहित्य महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा आढावा 

कर्तव्य साधना

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून उस्मानाबाद येथे सुरुवात झाली. 10, 11 व 12 जानेवारी अशा तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचा ‘आंखो देखा हाल’ कर्तव्यच्या वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश पोकळे यांचे संमेलनात दिवसभरात घडलेल्या आणि अनुभवलेल्या घटनांचा वेध घेणारे तीन लेख आजपासून सलग तीन दिवस प्रसिद्ध केले जाणार आहेत. त्यातील हा पहिला लेख.

रोज सकाळी विठ्ठल मंदिरातल्या काकड्याने, मशिदीतल्या नमाजने, आणि दारातल्या ‘काय खंडोबा रामराम, काय चाललंय’ या वाक्याने दिवसाची सुरुवात करणारी उस्मानाबाद नगरी आणि पंचक्रोशीतील गावखेडी आज,

“ही दीप माळ शब्दांची हा उजेड आनंदाचा,
अंगणात तुळजाईच्या उत्सव अक्षररत्नांचा.
जयघोष करीत सृजनाचा ही दिंडी आली,
आली साहित्याची वारी गोरोबांच्या दारी!

लाभला वारसा आम्हा गोरोबांच्या शब्दांचा,
मातीला सुगंध येतो त्या अभंग अन ओव्यांचा.
आली साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी!” या अभंगाने दुमदुमून निघालीत.

दिवाळीच्या सणाला पहिल्या स्नानाची जी लगबग असते तशाच लगबगीत शहरातल्या बायका दिसताहेत. कुणी आपल्या दारासमोर तर कुणी गावच्या प्रवेशद्वारावर रांगोळी काढतायेत. मुले-मुली 26 जानेवारीप्रमाणेच आजही लवकर आवरून घराबाहेर पडलीत. नाकात नथ, कपाळावर बिंदी, अंगावर काठापदराची साडी अशा खास मराठमोळ्या पोशाखातील मुली दिसतायेत. शहरातील नागरिकही मोठ्या आनंदी चेहऱ्याने बाहेर पडलेत, बाहेरून आलेल्या पाहुण्यांना चहा, नाष्टा विचारत दुपारी जेवायला आपल्याकडे या म्हणून आवर्जून सांगताहेत. या उत्सवी वातावरणाला निमित्त आहे उस्मानाबादेत आजपासून सुरु झालेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे.


‘आमच्या शहरात आई तुळजा भवानी मातेचा मोठा उत्सव होतो, तसाच आम्हाला आता आनंद होतोय’ असे सांगत रोज सकाळी उठून रानात जाणाऱ्या माय माऊल्या, शेतकरी यांच्यासह व्यावसायिक, नोकरदार, तरुण-तरुणी आदि ग्रंथदिंडीत मोठ्या संख्येने सहभागी झालेत. शहरातील क्रीडासंकुलापासून निघालेल्या ग्रंथदिंडीची सांगता साहित्य संमेलनाच्या मंडपात झाली. दिंडीत जिल्हा परिषद कन्या प्रशाळेसह रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, लोकसेवा हायस्कुल व इतर अनेक शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषेत दिसतायेत. कुणी गोरोबा काकांचा वेष परिधान केलाय, कुणी संत गाडगेबाबा झालेत, तर कुणी संत तुकाराम. त्याबरोबरच कुणी आपली गाडी काही साहित्याची प्रतीक लावून सजवली, सोबतच बँड पथक, लेझीम, ढोलकी, ताशा, यांनीही ग्रंथदिंडीच्या पालखीसमोर चांगलाच ठेका धरलाय.


लहान-लहान गोजिरवाणे लेकरं कृष्णा-राधा झालीत, काही दांडिया घेऊन पालखीत रंग भरतायेत, समोरच्या रांगेत बाल वारकरी आहेत. कुणी तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, गोरोबा, तर कुणी मुक्ताई, रुखमाईच्या वेशभूषेत आहेत. सोबतच प्रभू रामचंद्राच्या इतिहासातील वनवासाला गेलेली वानर सेना सज्ज झालीये. कुणी वानर झालाय, कुणी राम, लक्ष्मण तर कुणी सीता. लोप पावत चाललेल्या आदिवासी कला सादर करणारे काही विद्यार्थी आदिवासी वेशभूषेत या ग्रंथदिंडीत सामील झालेत. पुढे सैन्याच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी मोठी रांग केलीये. सर्वांत पुढे सजलेल्या घोड्यांचा चंदेरी रथ आहे. त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत एक तरुण बसलाय, तर हातात ‘कृषी मूलम ही जीवनम’ असा फलक घेऊन मुली रथापुढे उभ्या आहेत. शिवाजी महाराजांसह जिजामाता, तान्हाजी मालुसरे यांच्या वेशभूषेतला ग्रुप दिंडीचे आकर्षण ठरतोय. 

मोठीच्या मोठी रांग करून वारकरी शिक्षण संस्थेतले छोटे वारकरी दोथर, कुर्ता, डोक्यावर पांढरी टोपी घालून हातात टाळ, मृदंग, वारकरी पताका घेऊन ज्ञानोबा माऊली तुकाराम या ठेक्यावर तल्लीन झालेत. पालखीच्या रथात एक गुबगुबीत बालक गोरोबांच्या वेशात मांडी घालून बसलाय. याच पालखीबरोबर कित्येक तरुण तरुणी आजूबाजूने गर्दी करून उभे आहेत. तिथेच अबाल वृद्धही मोठ्या संख्येने दिसतायेत. हातात टाळ, विना घेऊन तुकाराम महाराजांचे अभंग गुणगुणत तेही आनंदी चेहऱ्याने दिंडीत सामील झाले आहेत.टेम्पोवर गोरोबा काकांचा मोठा मातीचा पुतळा उभा केला गेलाय.  शहरातल्या मुख्य रस्ते रांगोळीने सजलेत, चौका-चौकात पालखीवर फुलांचा वर्षाव होतोय. ‘आम्ही वारकरी’, ‘93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ असे लाल अक्षरात लिहलेल्या पांढऱ्या टोप्या पुरुषांसह महिलांनीही परिधान केल्यात.

‘वृक्षांनी सजवूया संपूर्ण नगरी, योग्य प्रमाणात होईल पर्जन्यवृष्टी’, ‘वृक्षच वृक्ष वाढवूया, प्राणवायूचे प्रमाण वाढवूया’ आणि ‘करूया वृक्षसंवर्धनाचा ध्यास, तरच थांबेल निसर्गाचा ऱ्हास’ अशा संदेशाची फलक हातात घेत शहरातील महिला दिंडीत सहभागी झाल्यात. पालखीतले रिक्षा, छोटे टेम्पो, यावर लावलेल्या पाट्या मराठी साहित्यातील ओळींनी सजल्यात.


‘ताशांचा आवाज तारारारा झाला’ म्हणतात तरुणांसह वृद्धांनीही ठेका धरला. शहरातली बाजारपेठ सणासुदीला सजते तशी सजलीये. नारळ, पाणी, नाष्टा, चहा, अशी खाण्याची पिण्याची दुकान लागलीत, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत मोठी रेलचेल पाहायला मिळतीये. पुढे जिल्हा परिषद शाळेच्या भिंती गोरोबा काकांसह त्यांच्या आईवडिलांच्या चित्रांनी रंगवल्यात. गोरोबा काकांचा जन्म, त्यांचे बालपण, त्यांचा विवाह सोहळा या आणि अशा अनेक प्रसंग सांगणाऱ्या चित्रांनी भिंती रंगवल्यात. या भिंती येणाऱ्या जाणाऱ्यांची लक्ष वेधून घेतायत. झाडाचे चित्र काढून ‘माझी दया तुला येऊ दे, कुऱ्हाडीच्या दांड्याला पालवी फुटू दे’ असे भावनिक आवाहनही येथे करण्यात आलेय. 


साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर नोटेने तोंड बंद केलेली महिला चितारलेली असून त्यासोबत ‘नका बंद करू आवाज नोटांसाठी, मतदान करा सुखी भविष्यासाठी’ असा लोकशाही जागृतीचा संदेश लिहलाय. तर उजव्या भिंतीवर मोरपिसाने कोऱ्या कागदावर लिहीत असलेल्या हाताचे चित्र काढण्यात आले असून त्याखाली लिहलेला ‘आधुनिक तंत्रज्ञानाचे युग सुरू पण साहित्य हेच माझे गुरू’ असा साहित्याचा पुरस्कार करणारा संदेशही मोठा लक्ष वेधून घेतोय.

ग्रंथदिंडी प्रवेशव्दारावरून सरळ मुख्य व्यासपीठाकडे गेली. कुणी गाण्यावर ठेका धरला तर कुणी आपापले जेवणाचे डब्बे काडून विठोबा झाला आता आपल्या पोटोबाचे पाहू या अविर्भावात जेवणावर ताव मारला. दीड एकरमध्ये भव्यदिव्य मंडप उभा केला गेलाय. लाल रंगाचा सुमारे सहा हजार खुर्च्या एक रांगेत मांडल्यात. समोरच्या बाजूला माहाराष्ट्रातल्या नामांकित पुस्तक प्रकाशनांसह नवख्या व्यवसायिकांनीही आपापले पुस्तक विक्रीला मांडलीत. शहरासह पंचक्रोशीतील आणि महाराष्ट्रभरातून आलेल्या साहित्यप्रेमींनी पुस्तके पाहायला गर्दी केलीये. ठिकठिकाणी नाष्ट्याची, जेवणाची दुकाने उभी आहेत. या अनोख्या साहित्य सोहळ्यात येणारे तरुण- तरुणी काही मान्यवरांसोबत सेल्फी काढण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी करतायेत. कुणी भेटले की आमचा एक फोटो घ्या म्हणत एरवी मोबाईलला हातही न लावू देणारी मंडळी सहजपणे मोबाईलची देवाणघेवाण करताहेत.

साहित्याच्या या अनोख्या सोहळ्याने उस्मानाबाद नगरीतील साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात उत्साह वाढवणारी ठरलीये. संमेलनाचे आणखी दोन दिवस बाकी आहेत, हे क्षण आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळाले नसले तरी फोटोंच्या आणि शब्दांच्या माध्यमातून आम्ही ही क्षणचित्रे आपल्यासमोर मांडूच...

- गणेश पोकळे
(ganeshpokale95@gmail.com)

Tags: Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan Ganesh Pokale Marathi अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य गणेश पोकळे Load More Tags

Comments:

Ganesh Madhur Thete

हे क्षण प्रत्यक्ष पाहायला मिळाले नसले तरी फोटोंच्या आणि शब्दांच्या माध्यमातून आपण तिथेच असल्याची अनुभूती मिळाली,सुंदर शब्दांकन.

Daniel Mascarenhas

सुंदर प्रासंगिक वर्णन

अनंत देशमुख

उस्मानाबाद सारखे महाराष्ट्रातील मागासलेले शहर व दुष्काळी जिल्हा असूनही साहित्य विश्वाचा हा सोहळा त्यांनी किती उत्साहात मांडला आहे हेच कौतुकास्पद आहे.

Dadasaheb karbhari mengade

उत्तम माहिती गणेश

भारत कांबळे

उत्तम माहिती ...

Add Comment