अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस

कर्तव्य साधना

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला कालपासून उस्मानाबाद येथे सुरुवात झाली. 10, 11 व 12 जानेवारी अशा तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचा ‘आंखो देखा हाल’ कर्तव्यच्या वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश पोकळे यांचे संमेलनात दिवसभरात घडलेल्या आणि अनुभवलेल्या घटनांचा वेध घेणारे तीन लेख सलग तीन दिवस प्रसिद्ध केले जाणार आहेत. संमेलनाच्या आजच्या दिवसाचा आढावा घेणारा लेख.

हिवाळ्याचे दिवस असल्याने कुठे चार तर कुठं आठ दहा जणांच टोळकं शेकोटी करून शेकत असलेले चित्र सर्रास पाहायला मिळते. मात्र, या उस्मानाबाद नगरीत तसे वातावरण पाहायला मिळत नाहीये. बोचरी थंडी म्हणतात ती इथे जोरात आहे. साहित्य संमेलनाच्या दारावर काल काढलेल्या रांगोळी येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांची आणि माणसांनी अस्ताव्यस्त झाल्यात. त्या रांगोळी शाळेला जायला उशीर होईल म्हणून या बोचऱ्या थंडीत सकाळी ६ वाजता येऊन मुलींनी नव्याने रंगवल्यात.  तीच मुली-मुलं आता शाळेत निघालेत. तर ग्रामस्थ आपापल्या कामात दिसतायेत. कुणी शेतातून दूध घेऊन आलंय. कुणी गायागुरांना चारा घेऊन चाललंय तर कुणी मान्यवर या साहित्य उत्सवाला आनंदी चेहऱ्याने दुसऱ्या दिवशी दाखल झालाय. कुणी कवी आहे, कुणी साहित्यिक, कुणी नाटककार, कुणी संगीतकार तर कुणी फक्त रसिक आहे. आपल्या दरबारात साहित्य उत्सव होतोय या आनंदात तो इथं दाखल झालाय. 

पहिल्या दिवशी ग्रंथ दिंडीने शहर दुमदुमून गेलं होतं. सगळे नागरिक या ग्रंथदिंडीत सहभागी झाले नसले तरी कुणी आपल्या दारातून, गॅलरीतून, नाहीतर घरावर जाऊन ही ग्रंथदिंडी डोळे भरून पाहत होते आणि तो क्षण आपल्या कवेत घेण्यासाठी आपल्याकडील मोबाईलचा कॅमेरा चालू करून दिसेल तो आणि जमेल तसा फोटो काढत होते. मात्र, आज ते वातावरण नाही. आज शनिवार असल्याने शाळा कॉलेज महाविद्यालयांतील लहानांपासून कॉलेज तरुणांनी मोठी गर्दी केलीये. कुणी पुस्तकांच्या दुकानाकडे पाळतोय, कुणी भूक लागली म्हणून भेळ, वडापाव, या गाड्यांवर धाव घेतोय तर काही ग्रुप कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणी जाऊन कविसंमेलन, परिसंवाद, कथाकथन, चर्चासत्र, हे तितकं उमजत नसलं तरी आपल्याला समजत या आवेशात बसलेत या मंडपात एका रांगेत...

शहरातील व्यावसायिक आपल्या दुकानांवर आणि वाहनधारक जिथे तिथे आपल्या गाड्या घेऊन तटस उभे आहेत. जास्त करून आजूबाजूच्या हॉटेलवर, चहाच्या टपऱ्यांवर, फळांचे गाड्यांवर, गर्दी झालीये. एरवी बस स्थानकावर 'चला ताई, चला बाबा, कुठे जायचे आहे?' अशी विचारणा करणारे रिक्षावाले, जीपवले या साहित्यप्रेमींचीही विचारपूस करत आहेत. गेटवर माणसांची रेलचेल आहे. या साहित्य उत्सवाचा दुसरा दिवस असल्याने संमेलनात तो नवा जोश, नवा उत्साह दिसत नाहीये. मात्र पहिल्या दिवशीपेक्षा आज जास्त गर्दी दिसतीये. त्यामध्ये जिल्ह्यातून प्राथमिक शाळेपासून ते विद्यापीठ स्तरावरील सर्व विध्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, प्रोफेसर इथे दिसतायेत. लहान-लहान मुलांना पुस्तक, साहित्य, कथा, कादंबरी, यांची समज नसली तरी काहीतरी नवीन पाहायला, ऐकायला मिळतंय याचा आनंद त्यांच्या निरागस चेहऱ्यावर लपून राहत नाही. ही मुलं हाताला हात धरून जमेल तिथे, दिसेल तिथे आणि वाटेल तिथे जातायेत. वाटेल ते पुस्तक कुतूहलाने हातात घेतायेत आणि त्याच्यावरील चित्र पाहून ते पुन्हा आहे त्या ठिकाणी ठेऊन देतायेत. मात्र, काही खाऊचे दुकान दिसले की 'सर मला हे खायचंय' म्हणायला लाजत नाहीत आणि बुजतही नाहीत. कदाचित या लहानग्यांना या भेळीइतकी चटकदार चव या साहित्य विश्वाची लागली की सर मला हे खायचंय म्हणण्या अगोदार सर मला हे पुस्तक घ्यायचंय असं नक्की म्हणतील...

पुस्तकाच्या दुकानांवरच्या गर्दी पाहिली तर 'वाचन संस्कृती संपली' या धारणेला काहीच अर्थ नसल्याचे लक्षात येते. नवीन लिहिणारे, वाचणारे, साहित्यावर प्रेम करणारे, मराठी भाषेची आवड असणारे तरुण-तरुणी इथे मोठ्या संख्येने दिसतायेत. एक एक पुस्तकाचे दुकान बारकाईने नजरेखालून घालतायेत. ज्या विचाराबद्दल, ज्या माणसाबद्दल, ज्या कथेबद्दल, ज्या घटनेबद्दल आकर्षण आहे ती उकलून पाहण्याची इच्छा आहे असे पुस्तक खरेदी करतायेत. गावखेड्यात वाचनाची आवड असली तरी हवं ते पुस्तक मिळत नाही. परंतु पुस्तकांचा खजिनाच आपल्या दारात आल्याने आता पुन्हा कधी येईल की नाही याची शाश्वती नसल्याने ते मनसोक्त खरेदी करतायेत. याच दुकानांच्या आणि साहित्यप्रेमींच्या गर्दीत कवी, साहित्यिक, नाटककार, संगीतकार, पत्रकार, अचानक नजरेस पडतो आणि जो तो अचंबून मोठ्या आनंदी चेहऱ्याने 'मी अमुक -अमुक' म्हणून नाव सांगतोय. सर आपलं हे पुस्तक, वाचलंय, आपला हा कवितासंग्रह वाचलाय, आपल्याला या चायनलवर पाहिलंय, आपला या वर्तनमानपत्रात लेख वाचलाय अस ज्याच्या त्याच्या व्यवसायप्रमाणे सांगतोय. यातील काही अगदी मनमोकळं बोलतायेत, काही 'हो-हो छान' म्हणून पुढचा रस्ता धारतायेत, तर काही 'ओके' म्हणत लगेच पुढे सरकतायेत...

पलीकडे मुख्य व्यासपीठावर परिसंवाद रंगलाय. नामांकित कवी आणि लेखक प्रा. दासू वैद्य आणि सारंग दर्शन हे ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांची मुलाखत घेतायेत. समोर प्रेक्षक वर्ग भरगच्च नसला तरी फार कमीही नाही. मात्र, या फार कमी नसलेल्या गर्दीत स्थानिक प्रेक्षक फार कमी आहे. कुणी दुकानावर, कुणी शेतात, कुणी शाळेवर तर कुणी आपल्या-आपल्या कामाला गेलाय. आज शनिवार असल्याने दुपाची सुट्टी झाली. त्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी गर्दी केलीये. पुस्तकांच्या मागच्या व्यासपीठावर लावणीसह सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम सुरू झालेत. लावणीचा आवाज आला की इकडच्या परिसंवादाच्या, मुलाखतीच्या, कवितेच्या मंडपातल्या खुर्च्या रिकाम्या झाल्यात. शिट्ट्या, टाळ्या वाजवून या लावणीच्या प्रेक्षकांनी चालत आलेल्या परंपरेचा सन्मान केलाय.   

दुपारच्या तीन वाजून गेलेत. विद्यार्थ्यांचे, लेखकांचे, वाचकांचे, विक्रेत्यांचे, साहित्यिकांचे, रसिकांचे, ग्रुपच्या ग्रुप या व्यासपीठावर त्या व्यासपीठावर जमलेत. नाहीतर फिरताहेत पुस्तकांच्या दुकानांत इकडे तिकडे. बाकी ऊन उतरल्याने आता कुठे कविता वाचन सुरूये, कुठे परिसंवाद सुरुये तर कुठे आपल्यातली आपल्यात फार दिवसांनी एकमेकांना भेटल्याने मनमोकळ्या गप्पा सुरुयेत...  एकूणच साहित्य सोहळ्याचा दुसरा दिवस मावळतीकडे सरकलाय.... 

- गणेश पोकळे
(ganeshpokale95@gmail.com)

Tags: Ganesh Pokale Marathi अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य गणेश पोकळे Load More Tags

Add Comment