1975 ते 2021

‘द ग्रेट इंडियन किचन’ या सिनेमावरील लेख वाचून आलेली प्रतिक्रिया...

स्त्री-पुरुष असमानतेवर आणि पर्यायाने स्त्रीशोषणावर भाष्य करणाऱ्या ‘द ग्रेट इंडियन किचन’ या मल्याळी सिनेमाची ओळख करून देणारा लेख गेल्या आठवड्यात कर्तव्य साधनावर प्रसिद्ध झाला. या लेखावर प्रतिक्रिया म्हणून आलेला आणि सशक्त स्त्रीवादी व्यक्तिरेखा असलेल्या दोन सिनेमांविषयी आठवण  करून देणारा हा छोटेखानी लेख...   

कर्तव्यसाधनेत वाचून ‘द ग्रेट इंडियन किचन’ बघून झाला आणि दोन मस्त चित्रपटांची आठवण झाली. या संदर्भात लिहायचं ठरवल्यावर स्मृती थोडी ताजीतवानी व्हावी म्हणून इंटरनेटवर वाचन करायचं ठरवलं तेव्हा लक्षात आलं की, आपल्याला आवडणारे हे दोन्ही चित्रपट तर एकाच (1982) वर्षी प्रदर्शित झालेले आहेत! एक मराठीमध्ये तर दुसरा हिंदीत, (दोन्ही चित्रपटांमधली गाणीही अप्रतिम) दोन्ही चित्रपटांमधल्या प्रमुख नायिका जबरदस्त आणि त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा फेमिनिस्ट स्टडीज्‌मध्ये केस-स्टडी म्हणून अभ्यासाला असाव्यात अशा. (असतील तर मला माहीत नाही.) ...आणि होऽ हा अभ्यास फक्त महाराष्ट्रात किंवा भारतामध्येच नाही तर सर्व ठिकाणच्या फेमिनिस्ट स्टडीज्‌मध्ये असावा इतक्या प्रभावी अशा या व्यक्तिरेखा.

हे दोन चित्रपट म्हणजे - मराठीतला ‘उंबरठा’ आणि हिंदीतला ‘अर्थ’. खरंतर आता फक्त चित्रपटांशी संबंधित लिंक्स द्याव्यात आणि लिखाण थांबवावं त्यामुळे तुम्ही इतकंच वाचून ते चित्रपटच पाहायला सुरुवात केली तरी चालेल. (लेखाच्या शेवटी दोन्ही सिनेमांच्या युट्यूब लिंक्स देण्यात आल्या आहेत.)

मी या तिन्ही चित्रपटांची तुलना करणार नाही (खूप मोह होत आहे तरी). असाही विचार आला की, स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांच्याऐवजी दुसऱ्या कुणी कलाकार असत्या तर हे चित्रपट इतके प्रभावी झाले असते का? परंतु हा प्रश्न मी बाजूला सारला कारण माझं हे लेखन त्यांच्या अभिनयक्षमतेबद्दल नाही. मला त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा प्रचंड आवडतात.

‘द ग्रेट इंडियन किचन’ बघून कुणाला वाटू शकतं की, ‘हे काय... असं थोडच असतं? आता मुली किती शिकल्या आहेत, आपण किती टेक्नो-सॅव्ही झालो आहोत... काहीही दाखवतात...’ मलाही चित्रपट बघताना असं वाटायला लागलं परंतु मग समाजातल्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरांमधले काही प्रसंग आठवायला लागले. एका प्रसंगात मुलीच्या पोटातला सिस्ट पोटातच फुटून मुलीला त्रास होत असताना, त्यावर उपचार चालू असतानापण ‘दोन जिने चढून तीनचार बादल्या पाणी भर’ असं आजच्या पिढीतली तिची आईच सांगत होती. ‘मुलाला भरायला सांग’ असं सांगितल्यावर ‘तो झोपलाय’ हे सकाळी अकराला सांगत होती. आईला आणि मुलीला आपण जे करतोय त्यात काही चुकीचं वाटतच नव्हतं. 

दुसऱ्या एका प्रसंगात गावाकडच्या मुलीचं तिच्या आईवडलांनी शहरातल्या मुलाशी लग्न लावून दिलेलं होतं. मुलगा बँकेत नोकरी करणारा परंतु त्याला दारूचं व्यसन. लग्न झाल्यावर मुलगा सुधारेल म्हणून मुलाचे आईवडीलपण निवांत. लग्नानंतर ‘बायको सुधारू शकली नाही’ असा जगावेगळा (की जगन्मान्य?) निकाल लावून सुनेला आणि मुलाला घराबाहेर काढलेलं. या प्रचंड कर्मठ, धार्मिक घरातल्या धार्मिक कार्यक्रमांना मात्र सुनेनं येऊन राबायचं आणि संपल्यावर परत दारुड्या नवऱ्याकडे जायचं हेही एकीकडे चालू असतं. यामध्ये कुणालाच काही विसंगती वाटत नाही. अशा अनेक घटना आपण वरचेवर पाहत असतो.

भारतीय समाजात स्त्रीला - पुरुषांनी आणि स्वतः स्त्रीनंही - दुय्यम स्थान दिल्याची अशी असंख्य उदाहरणं तर वेळोवेळी दिसतातच, परंतु याबाबतीत पुढारलेले म्हणवणाऱ्या देशांमध्येही स्त्रीला वेळोवेळी दुय्यम स्थान दिलं जातं हेही तितकंच खरं आणि पुढारलेपणाच्या त्यांच्या तोऱ्यामुळे कदाचित अधिक धक्कादायक. नुकत्याच पाहिलेल्या ‘द क्राऊन’ या मालिकेतल्या काही प्रसंगांमधून हेच जाणवत राहिलं. इंग्लंडच्या राजघराण्याशी आणि प्रामुख्यानं गेली सुमारे 70 वर्षं राजपदावर आरुढ असलेल्या दुसऱ्या एलिझाबेथ राणीशी संबंधित ही मालिका सत्य घटनांवर आधारित आहे. अगदी इंग्लंडच्या राणीलासुद्धा वेळप्रसंगी तिची बाजू बरोबर असताना आणि नवरा चुकलेला असताना नवऱ्यापुढे नमतं घ्यावं लागलं हे दाखवणारे काही प्रसंग त्यामध्ये आहेत. पुढील काळात तिचा मुलगा चार्ल्ससुद्धा त्याच्या बायकोवर - डायनावर - अधिकार गाजवतोच. 

इंग्लंडच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर - ज्या त्यांच्या देशाला स्वतःची गमावलेली ओळख परत मिळवून देण्यासाठी नावाजल्या जातात त्या या आयर्न लेडीसुद्धा - कौटुंबिक पातळीवर मुलाला झुकतं माप देऊन (झुकतं नव्हे, सर्व माप मुलालाच देऊन) मुलीला कस्पटासमान वागणूक देताना दिसतात. तुडुंब लोकप्रसिद्धी मिळवलेले अमेरिकेचे प्रेसिडेंट जॉन केनेडी (जेएफके), स्वतःच्या बायकोचा - जॅकी केनेडीचा - राजकीय फायद्यासाठी तिच्या मनाविरुद्ध वापर करताना दिसतात. स्त्रियांच्याही बाबतीत अतिप्रगत म्हणवल्या गेलेल्या या देशांमधल्या सर्वोच्च पदांवर असलेल्या या कणखर पोलादी स्त्रियांच्या बाबतीतले काही मोजकेच आणि अभावाने दिसणारे का असेना परंतु हे असे प्रसंगही हेच दर्शवतात की - समाज तथाकथित अतिप्रगत असो की अप्रगत... स्त्रियांच्या संदर्भातली पुरुषांची - आणि हो खुद्द स्त्रियांचीही - मानसिकता बहुतांश विशिष्ट पद्धतीचीच.

या सगळ्या परिस्थितीमध्ये उंबरठामधली सुलभा महाजन (स्मिता) आणि अर्थमधली पूजा (शबाना) उठून दिसतात. त्यांचे सुरुवातीचे निर्णय / आयुष्यं चारचौघींप्रमाणेच आहेत – म्हणजे लग्न, मूलबाळ, स्वतःचं घर, आपल्यावर प्रेम करणारा नवरा, वगैरे... परंतु आयुष्यात वेळ पडल्यावर आपलं ‘स्व’त्व ओळखून निर्णय घेणाऱ्या, त्यासाठी परत कुणाचा आधार न शोधणाऱ्या अशा या व्यक्तिरेखा. स्मिताची (हो एकेरी – त्या व्यक्तिरेखेमुळे ती माझी मैत्रीणच आहे) तरी उंबरठामधली व्यक्तिरेखा सुरुवातीपासून धडाडीची आहे परंतु अर्थ पाहताना सुरुवातीला, मध्यापर्यंत, इतकंच काय... अगदी शेवटी-शेवटीपण मला असंच वाटत होतं की, शबानाची (परत एकेरी – कारण व्यक्तिरेखा मैत्रीणच) व्यक्तिरेखा ‘ही त्या नवऱ्याला माफ करणार’ अशी आहे... परंतु नवऱ्याला तर ती नाही म्हणतेच शिवाय चांगल्या मित्रालापण नकार देते. मित्राच्या भूमिकेमध्ये चांगला वाटणारा पुरुष नवरा म्हणून चांगला असेलच असं नाही. त्यापेक्षा नवरा मित्र होऊ शकला तर ते कधीही चांगलं. या विषयाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन गायिका ग्लोरिया गेनरच्या ‘आय विल सर्व्हाईव्ह’ या गाण्याचे बोल आठवतात. 

जाता-जाता आणखी एका कलाकृतीचा उल्लेख करण्याचा मोह मात्र अनावर होतो आहे. गुलज़ारजींच्या खुशबूमध्ये (1975) हेमामालिनीनं समर्थपणे रंगवलेली, काही मोजक्या प्रसंगांमधून स्वाभिमानाची चुणूक दाखवणारी, स्वाभिमानाला घट्ट पकडून राहणारी ‘कुसुम’ अशीच लक्षात राहते. अजूनही हा लेख वाचत असाल आणि हे चित्रपट पाहिले नसतील तर नक्की पाहा. पाहिले असतील तर परत पाहा सांगण्याची गरजच नाही. ‘स्व’त्व गहाण टाकून यश, समाधान मिळत नसतं, पुढे जाता येत नसतं हेच उंबरठा, अर्थ यांसारखे चित्रपट शिकवतात.

बिल क्लिंटन - मोनिका प्रकरणात, हिलरी भविष्यातल्या राजकीय फायद्यासाठी गप्प राहिली आणि तिथेच हरली - प्रेसिडेंटशीपची निवडणूकही आणि पार्टनरशीपही.

- उज्ज्वला देशपांडे (पुणे)    
ujjwala.de@gmail.com                         

उमेश देशपांडे (सिडनी, ऑस्ट्रेलिया)
umesh_deshpande@yahoo.com


हेही वाचा : सुलभा महाजन सोबत प्रवास करा - जब्बार पटेल (साधना, दिवाळी 2022) 


उंबरठा सिनेमा 

 


अर्थ सिनेमा 

 

Tags: सिनेमा स्त्रीवाद स्मिता पाटील शबाना आजमी उंबरठा अर्थ द ग्रेट इंडियन किचन Feminism Smita Patil Shabana Azmi Umbartha Arth The Great Indian Kitchen Load More Tags

Comments:

Vinayak Gopal Phadke

Absolutely right!

Add Comment