जपानी भाषा आणि जपान

'जागतिक मातृभाषा दिना'निमित्त 

कर्तव्य साधना

21 फेब्रुवारी हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जपान, जर्मनी आणि फ्रान्स या तीन देशांतील  अनुक्रमे जपानी, जर्मन आणि फ्रेंच या भाषांचे त्या त्या देशातील स्थान या विषयी तीन लेख प्रसिद्ध करत आहोत. त्यापैकी  जपानी भाषा आणि संस्कृती यांची ओळख करून देणारा हा लेख.  

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी जपानी भाषा शिकायला नुकतीच सुरवात केली होती. दरम्यान काही कामानिमित्ताने जपानचे एक सद्गृहस्थ आमच्या घरी दोन दिवस राहायला येणार होते. जपानमध्ये एका प्रथितयश कंपनीत ते अधिकार पदावर काम करत होते. जपानी भाषेत कुठल्याही व्यक्तीच्या नावापुढे 'सान' असे आदरार्थी संबोधन लावले जाते. तर हे घरी येणारे 'सान' कसे असतील? त्यांच्याशी मला जपानी भाषेत बोलता येईल का? त्यांनी बोललेलं मला समजेल का? अशा अनेक उत्सुक प्रश्नांसह थोड्याशा तणावताच मी त्यांचं स्वागत केलं.

बहुतेक माझं जपानी भाषेतलं यथातथा ज्ञान बघून की काय त्यांनी इंग्रजी भाषेतच जास्त गप्पा केल्या. 'तुझ्या नवऱ्याला आणि मुलीला जपानी भाषा येत नाही ना? मग त्यांच्या समोर आपण जपानीमध्ये कसं  बोलणार?' अशी वर पुस्तीही जोडली. त्यामुळं जपानी लोकांना इंग्रजी भाषा चांगली बोलता येते अशी प्रथमदर्शनी तरी माझी समजूत झाली होती.

पण जसजशी मी जपानी भाषेच्या पायऱ्या चढू लागले आणि जपानी लोकांच्या संपर्कात येऊ लागले तसतशी जपानी लोकांचे त्यांच्या भाषेवरील प्रेम, त्यांना आपल्या भाषेविषयी वाटणारा अभिमान या गोष्टी पाहून भारावून गेले. जपानी माणूस आपल्या मातृभाषेकडे कशा दृष्टीने पाहत असेल असा प्रश्नही यानिमित्ताने मनात आला.

जपानमध्ये 6 ते 15 अशी एकूण 9 वर्षे प्राथमिक शिक्षण अनिवार्य आहे. इथली 3 ते 6 वर्षांपर्यंतची छोटी मुले आपल्याकडील बालवाडीप्रमाणे 'योचीएन'मध्ये जातात. शाळेत जाणाऱ्या मुलांचे प्रमाण संपूर्ण जगात जपानमध्ये सर्वाधिक म्हणजे 99.08 टक्के इतके आहे.

इथल्या शाळांमध्ये जपानी भाषा, गणित इत्यादी विषय प्राथमिक इयत्तांपासूनच शिकवले जातात. एप्रिल 2011 पासून त्यासोबतच इंग्रजी भाषेचे शिक्षणही अनिवार्य करण्यात आले आहे. दहाव्या वर्षापर्यंत इथे विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही. या काळात सर्वाधिक भर मूल्य आधारित शिक्षणावर दिला जातो. 'Manners before knowledge' हे मुलांवर प्राधान्याने बिंबवले जाते. निसर्गाविषयी; प्राणिमात्रांविषयी; मोठ्या माणसांविषयी आदर बाळगणे, नियम पाळणे, एकमेकांशी मैत्रीपूर्ण, सहानुभूतिपूर्वक वर्तन करणे अशा गोष्टी या मुलांना जाणीवपूर्वक शिकवल्या जातात.

शिक्षणाचे माध्यम जपानीच असल्यामुळे 'तुझा मुलगा/मुलगी कुठल्या माध्यमात आहेत' हा प्रश्न जपानमध्ये गैरलागू ठरतो. इथल्या विद्यापीठांत निवडक अभ्यासक्रम इंग्रजी भाषेतून शिकवले जात असले तरी medium of instruction मात्र पूर्णपणे इंग्रजी भाषेतून ठेवण्यात आलेले नाही.

इंग्रजांच्या आपल्यावरील प्रदीर्घ वर्चस्वामुळे असेल पण भारताला इंग्रजी भाषा नवीन नाही. आधुनिक तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतीयांनी मारलेली बाजी ही काही प्रमाणात इंग्रजी भाषा आत्मसात केल्यामुळे झाली आहे असेही म्हणता येऊ शकेल. पण गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमांच्या शाळा भारतात अतिशय लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. कधी अपरिहार्यता, तर कधी चांगले इंग्रजी न आल्यामुळे भविष्यात  मुलाचे नुकसान नको अशी भीती तर कधीकधी ट्रेंड म्हणूनही आपल्याकडे मुलांना इंग्रजी मेडीयम शाळेत घातले जाते. 

आपल्या मातृभाषेचा आदर म्हणजे दुसऱ्या भाषेचा निरादर नव्हे. सर्व व्यवहार माझ्याच भाषेतून झाले पाहिजेत हा दुराग्रह बाळगणेही नव्हे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे, त्या भाषेत संवाद साधता येणे या गोष्टीला जपानमध्येही महत्व दिले जाते. अनेक विद्यापीठे, कंपन्या आपल्या विद्यार्थी व कर्मचारी वर्गाला इंग्रजी भाषा प्रशिक्षणासाठी परदेशी पाठवतात.

जपान हा देश भौगोलिकदृष्टया इतर जगापासून तसा लांबच. काही अपवाद सोडले तर परकीय राजसत्ता/आक्रमणंदेखील इथं फारशी झाली नाहीत. त्यामुळे भाषेच्या दृष्टीने जपानची बाकी जगाशी देवाणघेवाण तशी अल्पच राहिली. दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग या क्षेत्रात जपानने जोमाने भरारी घेतली. अनेक क्षेत्रांतील आपल्या कौशल्याच्या बळावर जपानने स्वतःला जगातील आर्थिक महासत्तांच्या रांगेत नेऊन बसवले. पण हे सर्व करत असताना जपानी माणूस आपल्या भाषेपासून मात्र कधीच लांब गेला नाही.

जपानी भाषा अनेकांना थोडीशी अवघड वाटते ती त्यातील तीन लिप्यांमुळे (scripts). त्यापैकी चायनीज चित्रलिपी असलेली 'कांजी' ही तशी अवघड लिपी. सुरवातीला 'हिरा गाना' या लिपीने शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी मुले अतिशय पद्धतशीरपणे टप्प्याटप्प्याने कांजीचे शिक्षण घेतात. परकीय शब्द लिहिण्यासाठी 'काता काना' ही तिसरी लिपी वापरली जाते.

मराठी भाषेत जशा अनेक बोलीभाषा आहे आणि दर बारा मैलांवर ती बदलते तशीच काहीशी परिस्थिती जपानी भाषेचीही आहे. राजधानी टोकिओमध्ये बोलली जाणारी जपानी भाषा प्रमाण भाषा समजली जाते आणि बातम्या, वृत्तपत्रं, शाळा-महाविद्यालयात तीच ग्राह्य धरली जाते. परदेशात जपानी भाषा शिकवतानाही टोकिओचीच जपानी वापरली जाते. भौगोलिक रचनेनुसार जपानी बोलीभाषेचे अनेक प्रकार ऐकायला मिळतात. ओसाका बेन, क्योतो बेन, नागोया बेन या त्यांपैकी काही बोलीभाषा आहेत.

'ऍनिमेशन इंडस्ट्री' साठीही जपान जगभर प्रसिद्ध आहे. शिनचान, डोरेमॉन यांसारख्या पात्रांनी जगभरातील लहान मुलांच्या मनात घर केले आहे. अशा अनेक ऍनिमेशनपटातही वेगवेगळी जपानी बोलीभाषा ऐकायला मिळते. बोलीभाषेत येणारे वेगवेगळे शब्द आणि व्याकरण यांमुळे मूळ भाषा अधिकाधिक समृद्ध होत असते. जपानी भाषा याला अपवाद नाही.

गणित, शास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र या शाखांतील अवघड व किचकट शब्द जपानी भाषेत उपलब्ध आहेत, हे खरंय. पण जागतिकीकरणामुळे उपलब्ध होणाऱ्या संधी, जगभर आपल्या कंपनीचा विस्तार करणाऱ्या जपानी कंपन्या आणि जपानमध्ये येणाऱ्या परदेशी कंपन्या यांमुळे इंग्रजी भाषा शिकण्याला पर्याय नाही ही गोष्ट चाणाक्ष जपान्यांना जाणवलेली आहे.

पुण्यातील एका जपानी कंपनीमध्ये मनुष्यबळ विकास विभागात (Human Resources Department) प्रत्यक्ष काम करण्याची संधी मला मिळाली. त्यानिमित्ताने पुण्यातील इतर जपानी कंपन्यांमध्ये जाण्याचा योग आला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली. या कंपन्यातील उच्च अधिकारी मुळचे जपानी असूनही इंग्रजी भाषाही तितक्याच सहजपणे बोलतात. जपानमध्ये तरुण वर्ग इंग्रजी भाषेचे महत्व जाणतो आहे, ती चांगली बोलता यावी म्हणून प्रयत्न करतो आहे, इंग्रजी भाषेच्या स्पर्धा परीक्षा देतो आहे. एखाद्याची हुशारी आपण त्याच्या सफाईदार इंग्रजी बोलण्याशी जोडतो. कुठल्याही गोष्टीचे ज्ञान कुठल्या भाषेतून घेतो यापेक्षा ते आत्मसात किती करतो हे महत्वाचे ना? 10-12 वर्षांपूर्वीपर्यंत जपानमध्ये गेलेल्या पर्यटकालाही भाषेमुळे थोड्या अडचणींना तोंड द्यावे लागत होते. परंतु आता मात्र रेल्वे स्टेशन, मोठी दुकाने, मोठी शहरे, रेस्टॉरंट अशा ठिकाणी जपानी भाषेबरोबरच इंग्रजी भाषेतील फलकही लावण्यात आले आहेत.

इंग्रजीसोबत जुळवून घेताना जपानी लोकांनी जपानी भाषा, संस्कृती यांच्याशी असलेली आपली नाळ तुटू दिलेली नाही. त्यामुळेच की काय 'श्योदो' (जपानी कॅलिग्राफी), 'सादो' (tea ceremony), 'हायकू'  (जपानी काव्यप्रकार) इत्यादी जपानी कलांचे वर्ग इथे चालतात व त्यांना तरुण गर्दीही करतात. जपानी भाषेची तुलना मला मराठी भाषेशी करण्याचा मोह मला आवरत नाही. व्याकरणाच्या बाबतीत जपानी आणि मराठी भाषेत खूप साम्य आहे. त्यामुळेच कदाचित मराठी माणसे जपानी भाषा लवकर आत्मसात करत असावेत.

जपानी भाषा शिकताना आणि शिकवताना मला भावलेली गोष्ट म्हणजे जपानींच्या ठायी असलेला 'आदरभाव'. कोणतीही नवी गोष्ट शिकताना त्या संबंधातील सर्व गोष्टी, माणसे, इतिहास, संस्कृती याबद्दल जपानी माणसाला वाटणारी कृतज्ञता जपानेतर लोकांना क्वचितच वाटत असेल. कोणतीही भाषा दुय्यम न समजता त्या भाषेचा निखळ आनंद घेत, तिची गोडी चाखत ती शिकली जाते तेव्हा ती अगदी मातृभाषेसारखी नाही पण आपल्या मावशी भाषेसारखी तरी नक्की वाटेल आणि आवडेल हे त्यांचं सूत्र.

परदेशात एकमेकांना भेटल्यावर जपानी लोक कटाक्षाने जपानी भाषेत संवाद साधतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर जपानी भाषेचा प्रसार करण्यासाठी जपानी सरकार कायमच प्रयत्नशील राहिलेले आहे. त्यासाठी अनेक शिष्यवृत्या दिल्या जातात. वक्तृत्व स्पर्धाही घेतल्या जातात. जगभरात एकाच वेळी घेतली जाणारी Japanese Language Proficiency Test (JLPT), विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणारे टीचर्स ट्रेनिंग प्रोग्रॅम यांसारखे अनेक उपक्रम त्यांच्याद्वारे राबवले जातात. जागतिकीकरणाच्या लाटेत सर्वांत मोठी लाट बनून आलेल्या इंग्रजी भाषेसोबतच जपानी भाषादेखील जगभर लोकप्रिय करण्यासाठीचे सर्व प्रयत्न जपानी सरकार, जपानी भाषा फाउंडेशन, जपानी दूतावास यांच्याकडून केले जातात. मातृभाषेवरील निखळ प्रेमाचंच हे प्रतीक आहे.
 
ही लेखरूपी भेट आता फार लांबवत नाही. दीर्घकाळाने होणाऱ्या भेटींच्या वेळीच उच्चारल्या जाणाऱ्या 'सायोनारा' या शब्दाने तुमचा निरोप न घेता म्हणते 'देवा माता'... अर्थात लवकरच पुन्हा भेटू!

-स्मिता बर्वे- घाटगे

(लेखिका MBA (HR) असून त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून जपानी भाषेचा अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा पूर्ण केला आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्या जपानी भाषेचे वर्ग घेतात.)  

Tags: जपानी भाषा स्मिता बर्वे जपान Mother tongue Day Japanese Smita Barve Load More Tags

Comments: Show All Comments

बि. लक्ष्मण

छान,कमी, शब्दात छान मांडणी.

विलास इंगळे

मातृभाषेतून उपयुक्त शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे अत्यावशयक झाले असून सदयास्थितित शासन व प्रशासन अप्रामाणिक असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक शिक्षणात अलीकडे अचानक नोटा बदलाव्या तसे शिकण्याचे आणि शिकविण्याचे माध्यम बदलून सेमी इंग्रजी / इंग्रजी माध्यम / प्रथम भाषा इंग्रजी लादली गेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात त्याकरिता लढा देत आहे. संपर्क व्हावा ९३७०१८३०४६

विलास इंगळे

आपला प्रस्तुतचा लेख मार्गदर्शक असून प्रेरणा देणारा आहे.

Anjali Parvate

Khupch sopya bhashet chan mahiti dili aahe

Anjali Natu

Khup chhan lekh

Trupti

Khup chaan lekh!

Kshipra

, नविन मिळाली माहिती ,लेखन छान

Add Comment