१४ जानेवारी. दिवंगत शायर मुनव्वर राना यांना आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण झालं. राना आपल्यात नाहीत, ही जाणीवच अस्वस्थ करते. ‘आई’ चा विषय निघाला की त्यांनी या विषयावर लिहिलेले शेर आठवतात. अगदी अलीकडे पुण्याच्या पुस्तक मेळ्यात ओळीनं ठेवलेली त्यांची मां, बगैर नक्शे का मकां, सुखन सराय, सफेद जंगली कबुतर आदी पुस्तकं दिसली. त्यांच्या चाहत्यांची गर्दी दिसली. त्यावेळीही राना यांची प्रकर्षानं आठवण आली.
- - - - -
नागपूरचे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह. वर्ष १९९८. राज्य उर्दू अकादमीने 'जश्ने ग़ालिब' चे आयोजन केले होते. देशभरातील साहित्यिक, शायर सहभागी झाले होते. नागपूरचे शायर जहीर आलम (तुम तो ठहरे परदेसी...) यांनी माझा परिचय करून दिला. मुनव्वरभाई, इनसे मिलिए. ये है संजय मेश्राम. मराठी के सहाफी (पत्रकार). उर्दू का शौक रखते हैं. और संजयभाई, ये हैं मुनव्वर राना साहब!
मुनव्वर राना यांच्याशी ही माझी पहिली प्रत्यक्ष भेट. त्यांना त्यांची स्वाक्षरी मागितली. त्यांनी उभ्या-उभ्याच माझ्या छोट्याशा डायरीत त्यांच्या प्रसिद्ध ओळी लिहिल्या,
सो जातें हैं फुटपाथ पर, अखबार बिछाकर
मजदूर कभी नींद की गोली नहीं खातें...
खाली स्वाक्षरी केली,
- मुनव्वर राना.
- - - - -
राना यांना जाऊन एक वर्ष झालं. ती बातमी पचवणं फारच अवघड गेलं होतं. क्षणभर वाटलं, आपलीच धडधड थांबली, आपलाच श्वास थांबला.
राना यांना प्रत्यक्ष मुशाऱ्यामध्ये ऐकण्याची अनेकदा संधी मिळाली. प्रत्यक्ष मुलाखत घेण्याचीही तीन -चारदा संधी मिळाली. फोनवरही रात्री उशिरापर्यंत बातचित व्हायची. पुण्यातही एकदा त्यांना भेटता आलं, त्यालाही बरीच वर्षे झाली. मध्यंतरी काही काळ संवादात मोठा खंड पडला. मग फोन करून 'आदाब' करीत सहज विचारलं, सर पहचाना?
त्यावर ते गमतीनं म्हणाले, तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुम को...
(त्यांना म्हणायचं होतं, मेरी बात और है, मैने तो मुहब्बत की है...)
म्हणजे एकवेळ तुम्ही विसराल, पण मी नाही विसरणार.
त्यांच्या निधनाच्या दोन महिन्यांपूर्वी तब्येतीची विचारपूस करावी म्हणून त्यांना फोन केला होता. कुटुंबातील कुणी तरी बोललं. म्हणाले, ते आजारी आहेत. बोलू शकणार नाहीत. त्यांना सांगतो की तुमचा फोन येऊन गेला.
नंतर बोलायचं राहूनच गेलं ते कायमचंच…
- - - - -
उर्दू साहित्यात राना यांचं योगदान फार मोठं आहे. हुस्न -इश्कपर्यंतच मर्यादित असलेल्या गझलेत त्यांनी माँ, बेटी, बहन यांच्याविषयी आदर व्यक्त केला. विशेषतः माँ म्हणजे आईला मोठा सन्मान दिला. या एकाच विषयावर त्यांचा 'माँ' हा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे. ते म्हणायचे, लोग अपनी महबूब पर ग़ज़ल लिखते हैं. मेरी माँ मेरी महबूबा है, मैंने माँ पर ग़ज़ल लिखी... नेकियां गिनने की नौबत नहीं आएगी, मैंने जो मां पर लिखा, वहीं काफी होगा''.
माँ विषयी हे त्यांचे काही शेर बघा-
मैंने रोते हुए पोंछे थे किसी दिन आंसू
मुद्दतो धोया नहीं माँ ने दुपट्टा अपना...
'मुनव्वर' माँ के आगे कभी खुल कर मत रोना
जहां बुनियाद हो, इतनी नमी अच्छी नहीं लगती...
आणि त्या प्रसिद्ध ओळी,
किसी को घर मिला हिस्से में, या या कोई दुकां आई
मैं घर मे सब से छोटा था, मेरे हिस्से में माँ आई...
ये चिड़िया भी मेरी बेटी से कितनी मिलती जुलती हैं
जहां भी शाखे गुल देखी, झूला डाल देती है...
ये लड़की चाहती है, अपनी माँ को और कुछ दिन खुश रखना
ये कपड़ों की मदद से अपनी लंबाई छुपाती है...
राना यांचं हे योगदान सर्वांनाच मान्य करावं लागेल. त्यांनी सामाजिक विषयांवर पोटतिडकीने लिहिलं. सामान्यांच्या, कामगारांच्या व्यथा- वेदनांना शायरीतून संवेदनशीलतेने व्यक्त केलं.
शर्म आती है मजदूरी बताते हुए हम को
इतने में तो बच्चों का गुब्बारा नहीं आता...
आणि
मुझे इस शहर की सब लड़कियां आदाब करती हैं
मैं बच्चों की कलाई के लिए राखी बनाता हूं...
- - - - -
राना नागपूरला आले की त्यांच्याशी गप्पा ठरलेल्याच असायच्या. आयोजक त्यांची व्यवस्था रामदासपेठसारख्या भागातील उच्च दर्जाच्या हॉटेलमध्ये करीत असत. तिथं त्यांचं मन रमत नसे. दुसऱ्या सकाळी ते आपल्या बॅगा घेऊन सरळ मोमीनपुराचा रस्ता पकडायचे. तिथल्या हॉटेलमध्ये निवांत राहायचे. तिथलं गावासारखं, मोहल्ल्यासारखं वातावरण, तिथला चहा, आवडीचं जेवण, तिथले पान... बस्स! पॉश हॉटेलातील चकाचक ‘खामोशी’पेक्षा इथल्या कोलाहलातील ‘चहलपहल’ त्यांना आवडायची. तिथं त्यांना रस्त्यावर घोळक्यात उभे राहून बोलताना अनेकांनी बघितलं आहे. इथे त्यांचे अझीझ, दोस्त आणि चाहते भेटायचे. एका भेटीत त्यांनी त्यांची तीन उर्दू पुस्तकं भेट दिली. त्यावर उर्दूत लिहिलं, 'छोटे भाई संजय मेश्राम के लिए...'
त्यांना पुन्हा त्यांचा एखादा शेर त्यांच्या हस्ताक्षरात लिहून देण्याची विनंती केली. ते मांडी घालून बसले. त्यांच्या संग्रहातील स्वतःचे एक छायाचित्र स्वाक्षरी करून भेट दिलं. त्यांच्याच जवळील एक मोठा कागद घेतला आणि संपूर्ण गझल म्हणजे नऊ शेर भराभर लिहून दिले. ती गझल होती,
मैं दहशतगर्द था मरने पे बेटा बोल सकता है
हुकूमत के इशारे पर तो मुर्दा बोल सकता है।
मुशायऱ्यात त्यांनी गझल सादर करायला सुरुवात केली की सभागृहात ते हुकूमत गाजवीत असत. त्यांच्या आवाजात भावनेचा ओलावा असायचा. त्यांचं ते विशिष्ट शैलीत उभं राहणं, ती नजर, ते हातवारे... भारदस्त व्यक्तिमत्व. सारंच प्रभावित करणारं. टाळ्यांचा पाऊस आणि पुन्हा तीच गझल म्हणण्यासाठीचा आग्रह असायचा. लोक त्यांना माईक सोडू देत नसत. विदेशातही ते तेवढेच मशहूर होते.
- - - - -
राना यांना 'शहदाबा' या गझल संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. मात्र देशातील परिस्थिती, अवतीभवतीचं वातावरण बघून व्यथित होऊन त्यांनी एका दूरचित्रवाहिनीचे थेट प्रक्षेपण सुरू असतानाच हा पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. त्याच दरम्यान त्यांची मुलाखत घेण्याची मला संधी मिळाली. ते म्हणाले होते, माझे अश्रू केवळ अखलाकसाठी नाहीत. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यासाठीही आहेत. हम इन्सानियत के शायर हैं, मुसलमानों के नहीं. (ही मुलाखत लोकमत समाचार ला प्रसिद्ध झाली होती.)
मोठमोठ्या नेत्यांचा मुलाहिजा न बाळगता आपल्या तत्वांसाठी ते विविध घटनांवर निर्भीड भाष्य करायचे. यामुळे अनेकदा वादही निर्माण होत. मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम असत. हा देश दंगलमुक्त झाला तर इथं स्वर्ग निर्माण होईल, अशी त्यांना भाबडी आशा होती. भारत- पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सलोखा निर्माण झाला तर दोन्ही देशांचा संरक्षणावरील खर्च कमी होईल, तो पैसा सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याच्या कामात येईल, असं त्यांचं स्वप्न होतं.
- - - - -
इथल्या मातीवर त्यांनी खूप प्रेम केलं. ते म्हणायचे,
ऐ ग़रीबी देख रस्ते में हमें मत छोड़ना
ऐ अमीरी दूर रह नापाक हो जाएँगे हम...
जिस्म पर मिट्टी मलेंगे पाक हो जाएँगे हम
ऐ ज़मीं इक दिन तेरी ख़ूराक हो जाएँगे हम...
कहीं भी छोड़ के अपनी ज़मीं, हम नहीं जाते
हमें बुलाती हैं दुनिया हमीं नहीं जाते...
राना किमान पंधरा वर्षे विविध आजारांशी लढा देत होते. त्यांच्या गुडघ्यावरही तीन- चारदा शस्त्रक्रिया झाल्या. ते म्हणायचे, डॉक्टरसाहब क्यूँ ना मेरे पैर में एक चेन बैठा देते? आपको बार बार खोलना पडता है, काम आसान हो जायेगा...
- - - - -
एक छान आठवण आहे.
वर्ष २००९. राना यांची नात की कुणीतरी कुटुंबातीलच पाचवी- सहावीतील मुलगी शाळेच्या सहलीला जाणार होती. हैदराबादला जाताना रस्त्यात पुणे लागणारच. राना म्हणाले, माझं एक नवं पुस्तक आलं आहे, मुहाजिरनामा. सलग पाचशे शेर आहेत. (५०४ शेर असलेली दीर्घ गझल) तुमच्यासाठी पाठवतो मुलीसोबत.
माझ्यासाठी ही आनंदाची पर्वणी होती.
‘मुहाजिरनामा’ मध्ये भारत- पाक विभाजन आणि निर्वासितांची स्थिती याचे वर्णन आहे. आपली जमीन, आपले लोक, आपलं घर, सोडण्याचं काय दु:ख असतं, याचं चित्रण मोठ्या आर्ततेनं यात केलं आहे.
राना यांनी मुलीचं नाव सांगितलं, शिक्षिकेचं नाव आणि मोबाइल नंबर दिला. रेल्वे पुण्यात किती वाजता येईल, ते सांगितलं. तेव्हा मी पुण्यात नवीनच होतो. रस्ते, वाटा यांची नीट ओळख झाली नव्हती. लवकर तयारी करून धावपळ करीत स्टेशनवर पोहचलो. एक- दोनदा शिक्षिकेला फोन करून वेळेचा अंदाज घेत होतो. रेल्वे नियोजित वेळेवर पोहचली. मला आश्चर्य याचं वाटलं, ती मुलगी किंवा ती शिक्षिका कुणीच मला शोधत नाहीत. फोन केल्यावर नकाबपोश तरुण शिक्षिका दारात आली. तिला म्हटलं, त्या मुलीला बोलवा. ती छोटी बच्ची दारात आली. पांढरा-निळा शाळेचा पोशाख, ओढणी नीट घेतलेली. वेण्या आणि रिबीनची शु्भ्र फुले. तिनं आदाब केला. तिला माझा परिचय दिला. आठवण करून दिली की रानासाहब तुझ्याकडे माझ्यासाठी एक पुस्तक पाठवणार होते...
ती मोठ्या आश्चर्यानं अन निरागसपणे म्हणाली, अरे हां! उन्होने कहां तो था, लेकीन मैं किताब लाना तो भूल गई. सॉरी अंकल!
हसावं की रडावं!
मी क्षणभर तिच्या मासूम चेहऱ्याकडं मायूस होऊन बघतच राहिलो. लगेच राना यांना फोन लावला. तिचंही बोलणं करून दिलं. 'कैसी बच्ची हैं!’ म्हणत ते तिला थोडं रागावले. रेल्वेची शिटी वाजली. तिला खाऊसाठी पैसे दिले, बाय केलं, घरी आलो.
- - - - -
सोबत घेतलेल्या चहाची मिठास
कितीतरी आठवणी आहेत. पाकिस्तानात अजाननंतरही सुरू राहिलेल्या मुशायऱ्याचे किस्से आहेत. राना म्हणाले होते, हमारे यहां अजान के बाद नमाज़ होती है, मुशायरा नहीं होता... तिथल्या पत्रकारांशी झालेल्या सवाल-जवाबाचे काही किस्से आहेत.
राना यांनी बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं. वेगळीच गोडी, वेगळाच आनंद. मोमीनपुराच्या हॉटेल फरहीनमध्ये गप्पा करीत सोबत घेतलेल्या चहाची मिठास आजही जिभेवर रेंगाळते.
ते क्षण आता पुन्हा कधी येणार?
- - - - -
मुनव्वर म्हणजे प्रकाशित. मुनव्वर राना हे उर्दू सहित्याच्या आसमंतातील एका तेजस्वी ताऱ्याचे नाव आहे. त्याची रोशनी कायम आपली सोबत करणार आहे.
बहुत याद आते हो रानासाहब!
- संजय मेश्राम, पुणे
sanjaymeshram1@gmail.com
9922444996
(मलाला युसूफझाई हिच्या कामाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या 'सलाम मलाला' या पुस्तकाचे लेखक)
Tags: मुनव्वर राना शायर आठवणी Load More Tags
Add Comment