एका चित्रात त्यांनी नेहमीपेक्षा जास्त मोकळी जागा ठेवली. म्हणजे तीन चतुर्थांश भागात आकाश दाखवलं. खालच्या भागात एक गाव दाखवलं होतं. चित्रही इतर चित्रांपेक्षा मोठं होतं. खरं तर भिंतीवरील चित्रांत तेच मोठं होतं. त्यांची नजर त्या चित्रावर स्थिरावली. ते अर्धवट होतं. ते त्यांना नंतर पूर्ण करायचं होतं. ते चित्राकडं बघू लागले. त्यांच्या हाताला जणू रंग लागले आहेत. बोटं खडबडीत वाटत होती. त्या आकाशाला खोली होती. काही पक्षी विहार करीत होते. जवळ असणारा मोठा पक्षी, दूर गेलेला छोटा पक्षी. आपलंच चित्र. आपल्याच छटा. आपलंच आकाश.
छोटंसं टुमदार घर. त्यावर दुरूनच चकाकणारं ‘कौसल्या’ हे सोनेरी रंगातील नाव. खोलीचं दार उघडं आहे. पडदा मात्र वाऱ्यानं अधूनमधून हलतो, उडतो. हवेची एखादी झुळूक येते. बाजूच्या घरातून छोट्या मुलांचा खेळण्याचा थोडा आवाज येतोय. लांबून जाणाऱ्या एखाद्या फेरीवाल्याची हाकही हवेत विरून जाते. अंगणातल्या पिंपळाच्या पानांची सळसळ. क्वचित एखादी चिवचिव.
खोलीत सगळीकडं चित्रं लावली आहेत. काही चित्रं भिंतीला टेकून ठेवली आहेत. चित्रकार अरुण मोरघडे यांची ही दुनिया. आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याच चित्रांकडं कौतुकानं बघत आहेत. जुनाट लाकडी आरामखुर्चीत टेकून बसले आहेत. मध्येच चष्म्याची काच शुभ्र रुमालानं पुसतात. चष्मा पुन्हा डोळ्यांवर ठेवतात. चित्रं निरखू लागतात. ही केवळ चित्रं नव्हेत; आयुष्यभराची मिळकत आहे. ही माझी आहेत; मी साकारली आहेत... या भावनेनं त्यांच्या सुरकुत्यांमध्ये समाधानाची किंचित हसरी हालचाल होते.
भिंतीवर लावलेल्या या सर्व चित्रांमध्ये बस्तर आहे. तिथल्या आदिवासी लोकांचं जीवन त्यात उमटलं आहे. चित्रांत दिसणारी साधीभोळी माणसं त्यांचे सगेसोयरे आहेत.
मोरघडे यांना आठवतं, बालपणी ते नागपूरच्या अजब बंगल्यात गेले होते. तिथं आदिवासी जीवनावरील काही चित्रं पाहिली होती. ती त्यांना फारच आवडली. ती वारंवार बघावीशी वाटायची. यातूनच त्यांना आदिवासींचं जीवन जवळून जाणून घेण्याची इच्छा झाली. पुढं काही वर्षांनी त्यांनी मोटरसायकलनं मध्यप्रदेशात अनेक वाऱ्या केल्या. बस्तरच्या आदिवासींसोबत त्यांची मैत्री झाली. ते त्यांच्यातच मिसळले. या चित्रांकडं बघून ते त्या काळात हरवून जातात. साऱ्या गोष्टी अगदी लख्ख आठवतात.
...
हे एक चित्र. मोरघडे एकसारखं बघत आहेत. सभोवताली हिरवळ. झाडं, वेली, नागमोडी वळणाची पायवाट. ही एक स्त्री कसल्या तरी शेंगा, भाजी विकायला बसली आहे. तिथल्या संस्कृतीनुसार जेमतेम अंग झाकलं जाईल, एवढेच कपडे. हातावर, पायावर भरपूर गोंदलेलं आहे. हातात-पायात धातूंची कडी घातली आहेत. डोक्याला फडकं बांधलेला पुरुष तिला काही तरी विचारतो आहे. मोरघडे तिच्याकडं बघतात. ती आपल्याच विचारात मग्न. हे आदिवासी आठवड्यातून एकदा हाटसाठी एकत्र येतात. हाट म्हणजे बाजार. त्यांच्या दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंची तिथं खरेदी-विक्री करतात. ते मुंग्यांची चटणी खातात, या विषयी केवळ ऐकलं होतं. एक आजीबाई पळसाच्या पानाच्या द्रोणामध्ये टोपलीतून काढून ही चटणी द्यायची. या चटणीत कोथिंबीर, मिरची टाकलेली असते. बाजारात कोवळ्या बांबूचे तुकडे आहेत. त्यांना वास्ते म्हणतात. त्यांची भाजी चविष्ट असते. दात घासण्यासाठी दातून आहेत. मासे आहेत, मासे पकडण्यासाठी बांबूपासून बनवलेल्या गोलाकार जाळ्या आहेत. हातानं बनवलेल्या दोऱ्या आहेत. बटाटे, वांगी, आलं, मिरच्या आहेत. मात्र हे साहित्य विकण्यासाठी तराजू नाही. त्यांचे छोटे छोटे वाटे, ढीग करून ठेवले आहेत.
मोरघडे त्या पायवाटेनं फेरफटका मारतात. खांद्यावर शबनम बॅग, सोबत पेन्सिल, रंग. अनवाणी धावत येणाऱ्या एका बालकाचा त्यांना धक्का लागला. सभोवताल हिरवी झाडं आणि वर आकाशाचं निळं छत याशिवाय आदिवासींना बाहेरचं विश्व ठाऊक नाही.
मोरघडे पुढं चालत गेले. मोहफुलं, मडकी, गाडगी आदि विविध वस्तूही विकायला आहेत. त्यांनी बांबूपासून बनवलेली एक छोटीशी टोपली हातात घेऊन बघितली. आकर्षक होती. मोरघडे थोडं लांब जाऊन एक लाकडी ओंडका बघून त्यावर बसले. पायाजवळ फुलपाखरू भिरभिरतंय. बॅगेतून वही, पेन्सिल काढून भराभर रेखाचित्र काढू लागले. उभं राहण्याची, बसण्याची पद्धत, शरीराचा राकटपणा, स्त्रियांचा शृंगार, त्यांच्या झोपड्यांचे आकार-प्रकार... सगळे बारकावे कागदावर उमटत होते. सर्वच वयोगटातील लोकांची गर्दी आहे. आईचं बोट धरून उभं असलेलं मूल खाऊ मागतंय. तिच्या कडेवरही एक लेकरू आहे. काही स्त्रिया डोक्यावरील सामानाचं संतुलन सांभाळीत घराकडं जायला निघाल्या आहेत. इतर वस्तूंसह खड्यांचं मीठ अनेकांनी घेतलंय. मोरघडे आपल्याच तंद्रीत. वळणदार रेषांनी चित्रं काढत आहेत. झाडाचं गळालेलं एक शुष्क पान गिरक्या घेत त्यांच्या वहीवर येऊन पडलं. त्यांनी ते तसंच वहीत ठेवून दिलं.
एक जण टेंभरं विकत बसला आहे. हे पिवळ्या रंगाचं फळ असतं. मोरघडे यांनी विचारलं, हे काय आहे? याला काय म्हणतात, हे कसं खायचं? त्याला हिंदीसुद्धा नीट कळत नव्हतं. बराचसा संवाद हातवारे आणि खाणाखुणा करूनच व्हायचा. त्यानं ते फळ फोडून दाखवलं. वरचं टरफल काढून आणि बिया काढून ते खायचं असतं. मोरघडेंनी एक खाऊन बघितलं. छान वाटली चव. मनात विचार आला, गावी परतताना ही काही फळं घेऊन जावी. कलाश्रीला आवडतील. बाजाराच्या या कोलाहलात त्यांच्या कानावर हाक पडली...
“बाबाऽऽऽ औषध घ्यायचं आहे ना!”
त्यांची तंद्री भंग पावली. ते भानावर आले. औषध आणि पाण्याचा ग्लास घेऊन कलाश्री समोरच उभी होती. त्यांनी औषध घेतलं. काही वेळ डोळे मिटून पडून राहिले.
...
आदिवासींच्या वस्त्या मुख्य रस्त्यापासून खूपच आत आहेत. नारायणपूर आणि ओरछा ही गावं म्हणजे आदिवासी प्रदेशाचं प्रवेशद्वार. जगदलपूरपासून 100 कि. मी. अंतरावर. तिथं दंतेश्वरी देवीची यात्रा भरते. इतरही अनेक उत्सव असतात. असे उत्सव म्हणजे तरुण-तरूणींसाठी एक पर्वणीच असते. त्यांचं नृत्य हे अनेक उत्सवांचं प्रमुख आकर्षण असतं. अशा नृत्य करणाऱ्या लोकांचं भिंतीवरील चित्र बघण्यात मोरघडे मग्न झाले. त्यांच्या कानात स्त्रियांच्या पायातील घुंगरांचा आवाज घुमू लागला. समुहानं गायल्या जाणारी गाणी स्पष्ट ऐकू येऊ लागली. त्यांच्या चित्रांमधील आकृत्या जिवंत होऊन फेर धरायला लागल्या. मोरघडे त्या गर्दीतील एक होऊन सारं जवळून बघू लागले. स्त्रिया समूहानं नाचत आहेत. त्यांच्या गळ्यातील कवड्यांच्या, लाल- पिवळ्या मण्यांच्या माळा एकमेकांना आदळतात. त्यांचा तालबद्ध विशिष्ट आवाज येतोय. नाचताना एका पुरुषाच्या डोक्याला लावलेलं मोरपीस मोरघडे यांच्या पायाजवळ येऊन अलगद पडलं. त्यांनी ते उचलून त्याच्या डोक्याला खोचून दिलं. त्यानं नाचता-नाचताच थोडं हसून मान झुकवून खुणेनंच आभार मानले. भाषेचं काही बंधनच नाही. हृदयाची भाषा जगभरात सारखीच. एकसारख्या वेशभूषेमुळं कुणी ओळखू येत नाही. सर्व सारखेच दिसत आहेत. लाकडी लांब वाद्यांच्या तालावर सर्व गोलाकार नाचत आहेत. तो नाद मोरघडे यांच्या मनातही घुमतोय. गर्दीतील एक छोटीशी मुलगी हट्ट करत आहे. तिला उचलून घ्यावं, म्हणून दोन्ही हात वडिलांकडं उंचावत आहे... कलाश्री बालपणी असाच हट्ट करायची. चित्र काढताना मांडीवर येऊन बसायची.
“बाबा... झोप लागली का जी बसल्याबसून? चहा हवा का? आणि ती द्राक्षं किती वेळची तशीच आहेत अजून...”
कलाश्रीच्या आवाजानं त्यांचं लक्ष वेधलं. बस्तरच्या जंगलातून त्यांचं मन थेट नागपुरात परतलं. जागनाथ ‘बुधवारी’तील त्यांच्या घरी. त्यांना मोठी गंमत वाटली. स्टुलावर रंगांनी माखलेले छोटे-मोठे ब्रश, रंगाच्या दबलेल्या पिचलेल्या अस्वच्छ ट्यूब, पॅलेटवर तसेच सुकून गेलेले उरलेले रंग. सिमेंटच्या भिंतीच्या आडही त्यांना बिनाभिंतीचं, मोकळं मोकळं बस्तर दिसत होतं. ते डोळे चोळू लागले. डोळ्यांसमोरून हिरवी वनराई काही जात नव्हती.
...
मोरघडे एकदा मुंबईला गेले होते फिरायला. चित्रकाराच्या नजरेला कोळी लोकांच्या वेशभूषेचं आकर्षण वाटलं. तेव्हा त्यांचं वय असेल 22 वर्षे. ते मासोळ्यांच्या बाजारातील एका युवतीचं लांबूनच रेखाचित्र काढू लागले. दिसायला सुंदर होती. केसांमध्ये गजरा माळलेला होता. मोरघडे तिच्या हालचाली टिपत, कागदावर उतरवत. तिला वेगळीच शंका आली. तिला वाटलं यांनी आपला फोटो काढला. थोड्याच वेळात ती कुटुंबातील दोन-चार आडदांड लोकांसह येऊन धडकली. हाच तो माणूस म्हणत मोरघडेंकडं बोट दाखवू लागली. नेमकं काय झालं हे मोरघडेंच्याही लक्षात येत नव्हतं. मुंबईतील त्यांच्या मित्राची पत्नी पुढं झाली. तिनं त्या लोकांना त्यांचं स्केचबुक दाखवलं. ते चित्रकार आहेत, चित्रांचा सराव करीत आहेत, असं समजावून दिलं. युवतीचा गैरसमज दूर झाला. तिनं माफी मागितली. तिच्याशी मग छान ओळख झाली. पारंपरिक वेशभूषेतील तिची अनेक चित्रं मोरघडेंनी काढली. पुढं कित्येक वर्षे ओळख टिकली. मोरघडे कधी मुंबईला गेले की तिच्या घरी अवश्य भेट देत असत. तिचं नाव त्यांना आठवतं - कमल!
मुंबईच्या समुद्रापेक्षा बस्तरचं जंगल आणि तिथले लोक त्यांना फार जवळचे वाटत. या लोकांच्या स्वभावात त्यांना एक निरागस गोडवा जाणवायचा. आधुनिकतेच्या स्पर्शापासून कोसो दूर. नदीसारखं निर्झर. ते समोरचं चित्र असंच. भिंतीच्या उजव्या कोपऱ्याच्या अलीकडंचं दुसरं. यात तीन स्त्रिया आहेत. झोपडीच्या अगदी समोर. दोघी बसलेल्या आहेत. एक उभी. पाठमोरी. बाजूला झाडाला बांधलेल्या झोक्यावर एक युवती आनंदात झोके घेत आहे. अंगणात दोन कोंबड्या. पाच-सात पिल्लं दाणे टिपत आहेत. मोरघडे त्यांच्याकडं बघत आहेत. तेवढ्यात दूर तलावातून खांद्यावर कावड घेऊन एक जण आला. झपाझप पावलं टाकत निघून गेला. एक स्त्री आणि दोन पुरुष चालत निघाले आहेत. तिच्या हातात विळी आहे. एकाच्या हातात कुदळ तर एकाच्या हातात फावडं आहे. समोरच्या फांदीवर कधी न बघितलेला, लांब शेपटी असलेला शुभ्र पक्षी येऊन बसला. कुणी तरी सांगत होतं, इथं मोरही येत असतात. कुणाला दिसतात, कुणाला नाही. लांबून येणार त्यांचा आवाज मोरघडेंनी अनेकदा ऐकला. निसर्गातील या सहजीवनाचं मोरघडे यांना मोठं कुतूहल वाटतं. ते सर्व काही स्मृतीच्या कप्प्यात साठवून ठेवतात.
डावीकडील स्त्री झाडाला टेकून बसली आहे. तिच्या छातीशी तिचं लेकरू बिलगलेलं आहे. दुसरी गुडघ्यावर हाताची घडी करून बसली आहे. पाठमोरी दिसणारी स्त्री कंबरेवर हात ठेवून गप्पांमध्ये सहभागी झाली आहे. दोघींनी केसांच्या जुड्यात लाल फूल माळलेलं आहे. एकीनं केस मोकळे सोडले आहेत. कंबरेपर्यंत लांब. बाजूला सुकलेले दुधी भोपळे आहेत. त्यांना पकडायला दोरी बांधली आहे. त्यांचा वापर भांड्यांप्रमाणं होतो.
त्यांची भाषा कळत नाही. मात्र हावभावारून काही गोष्टी कळतात. त्यांच्या आवाजातील संवाद ऐकायला गोड वाटतो. स्त्रियांच्या हातातील लाल- पिवळ्या बांगड्यांची किणकिण ऐकू येत आहे. मधल्या स्त्रीच्या हातात पांढऱ्या रंगाचं कडं आहे. विस्तीर्ण पार्श्वभूमीला झाडांच्या मधून निळं स्वच्छ आकाश दिसत आहे. मोरघडे भराभर रेखाचित्र काढतात. त्या स्त्रियांना त्याचं काही नाही. कुणी त्यांना नाव, गाव विचारलं नाही. काही जण त्यांना ‘आर्टिस्ट साहब’ म्हणून ओळखायला लागले. पायवाटेनं चालत पुढं जातात. चालताना ते एकटेच गाणी गुणगुणतात. त्यांच्या जमान्यातली. कधी सुरय्याचं, तू मेरा चांद मै तेरी चांदनी, नहीं दिल का लगाना, कोई दिल्लगी कोई दिल्लगी... कधी सदाबहार देव आनंदचं ‘हम बेखुदी में तुमको पुकारे चले गये...’ कधी ते दुसरं, ‘जो खो गया मैं उसको भुलाता चला गया...’
चालता चालता मोरघडेंना वडाचं झाड दिसलं. पारंब्या बघून त्यांचं बालपण आठवलं. त्यांनी आपली शबनम बॅग बाजूला ठेवली. पारंब्यांना झोके घेऊ लागले. किती तरी वर्षांनी ते हा आनंद घेत होते. खरं तर हाच त्यांचा मूळ स्वभाव. हा स्वभावच त्यांच्या जगण्याचा आधार होता. घरी गेल्यावर या सगळ्या गोष्टी, ही नवलाई घरच्यांना, शेजाऱ्यांना, मित्रांना सांगू, असा विचार त्यांच्या मनात आला. एवढ्यात-
एवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. मोरघडे खुर्चीत डोळे मिटून बसले होते. वेगळ्याच दुनियेत हरवले होते. मग कलाश्रीनं फोन घेतला. कुणी तरी सहज फोन केला होता. तीच थोडा वेळ बोलली. कुणाचा फोन होता, ते तिनं बाबांना सांगितलं.
...
मागील काही दिवसांपासून दम्याचा त्रास वाढलाय. पूर्वी पहाटे चार वाजता उठून बागेत फिरायला जात. आता जमत नाही. बागेत भेटणारे त्यांचे सवंगडी घरी येऊन भेटून जातात. शरीर साथ देत नाही. 97 व्या वर्षात आणखी किती त्रास देणार शरीराला! मागच्या वर्षीपर्यंत ते दुचाकी चालवायचे. आता चालतानाही आधार लागतो. दोन पायऱ्या चढताना धाप लागते. कधी झुकले नाहीत. पाठीचा कणा ताठ ठेवला.
एकदा कलाश्री घरी नव्हती. त्यांना बरं वाटत नव्हतं. मग स्वतः चहा केला. या वयात. फार दिवस नाही झाले. 15 दिवसांपूर्वीचीच तर गोष्ट आहे. मागील महिनाभरात चित्र काढलं नाही. थोडं बरं वाटलं की, मग चित्र काढायचं. प्रदर्शनाची तयारी करायची आहे. कुणी जवळ असलं की, छान वाटतं. कुणी नसलं की, एकटं एकटं वाटतं. करमत नाही. आधी याच जागी झोपडी होती. ती पाडून हे छानसं घर बांधलं. पत्नीला या घराचा आनंद घेता आला नाही. वास्तुपूजन झालं, त्या रात्रीच तिनं निरोप घेतला. तिचंच नाव दिलंय घराला. त्यालाही जवळपास 15 वर्षांचा काळ लोटला. ते गतकाळाच्या आठवणींमध्ये हरवून जात.
रात्री बॉबी, कलाश्री या दोन्ही मुलींसोबत थोडं बोलले. कलाश्रीला म्हणाले, माझी सर्व चित्रं नीट सांभाळशील बरं. तिनं सहज विचारलं, “बाबा सेंच्युरी माराल का?”
मोरघडे म्हणाले, “हो. मारीन ना! का नाही?”
दुर्दम्य आशावाद आयुष्याबद्दल.
सकाळी सवयीप्रमाणं त्यांना लवकर जाग आली. डोळे बंद करून गादीवर पडून असत. कलाश्रीला जाग आली तेव्हा त्यांना उठून बसायला मदत केली. त्यांना खुर्चीवर बसवलं. चहा घेता का म्हणून विचारलं, तर मानेनंच नको म्हणाले. बोलले काहीच नाही.
एका चित्रात त्यांनी नेहमीपेक्षा जास्त मोकळी जागा ठेवली. म्हणजे तीन चतुर्थांश भागात आकाश दाखवलं. खालच्या भागात एक गाव दाखवलं होतं. चित्रही इतर चित्रांपेक्षा मोठं होतं. खरं तर भिंतीवरील चित्रांत तेच मोठं होतं. त्यांची नजर त्या चित्रावर स्थिरावली. ते अर्धवट होतं. ते त्यांना नंतर पूर्ण करायचं होतं. ते चित्राकडं बघू लागले. त्यांच्या हाताला जणू रंग लागले आहेत. बोटं खडबडीत वाटत होती. त्या आकाशाला खोली होती. काही पक्षी विहार करीत होते. जवळ असणारा मोठा पक्षी, दूर गेलेला छोटा पक्षी. आपलंच चित्र. आपल्याच छटा. आपलंच आकाश.
मोरघडे यांचं मन त्या पक्षांसोबत हवेच्या लहरींवर तरंगू लागलं. अगदी हलकं हलकं वाटू लागलं. काही पक्षी त्यांच्या अगदी जवळून उडत आहेत. वरून खाली बघितलं तर अगदी छोटी छोटी घरं दिसत आहेत. ढगांमधून उडण्याचा हा वेगळाच अनुभव. आपल्याला काही वजनच नाही जणू. आपण आकारानंही छोटे होत आहोत. आता जणू बिंदू झालो आहोत. नाही. आता तर आपल्याला आकारही नाही. काय होतंय आपल्याला! बालपणी अशी स्वप्नं पडायची. हे तर स्वप्नही नाही. आपण उडत आहोत. नाही. तरंगत आहोत. आपोआपच उंच उंच जात आहोत, अवकाशाच्या विस्तीर्ण पोकळीत. आता तर पृथ्वी, घर दार, जंगल काही काही दिसत नाही. ढगांपेक्षाही किती तरी उंच. कुठं जात आहोत आपण. कुठं... कुठं...काही अंतच नाही...
...
कलाश्रीनं विचारलं, “बाबा झोपता का?”
डोळे तर बंदच होते. “हं...”
अस्पष्ट आवाजात त्यांनी होकारार्थी प्रतिसाद दिला.
तिनं त्यांना हळुवार गादीवर झोपवलं. डोकं टेकवलं, तशीच मान डावीकडं कलंडली.
“बाबाऽऽऽ”
तिनं एकच हंबरडा फोडला. सारं संपलं होतं. वाराही मंदावला. अलगद निघून गेला. पिंपळाच्या पानांची काहीही हालचाल नाही. झाड स्तब्ध. निःशब्द. निर्विकार. जणू सांगत आहे, सब्बम अनित्यम!
- संजय मेश्राम, पुणे
sanjaymeshram1@gmail.com
Add Comment