काही गोष्टी कालातीत असतात. पु.लं.ची 'नंदा प्रधान'सुद्धा त्यातलीच एक. अतिशय तरल पण त्यांच्या नेहमीच्या लिखाणाहून हटके लिहिलेली ही कथा चार-पाच पिढ्या लोकप्रिय आहे. पण एखादी गोष्ट वाचल्यावर त्यातील पात्रांचं पुढे काय झालं असेल ह्याची उत्सुकता कधी कधी आपल्याला सतावते. नंदा प्रधान व इंदू इनामदार ह्या अशाच व्यक्तिरेखा. कुठे तरी वाटतं की, या कथेत इंदू इनामदारवर जरा अन्याय झाला आहे. इतकी सुंदर, हुशार, कर्तृत्ववान स्त्री अशी उगाच विस्मृतीत का जाईल? तेव्हा, हीच कथा 'इंदू'च्या अंगाने पुढे नेण्याचा हा एक प्रयत्न होय. मूळ कथेस कुठे धक्का न लावता तो केला आहे. फक्त काही संदर्भ मूळ कथेतून घेतले आहेत. (पु.ल., सुनीताबाई, दिनेश ठाकूर, 'आयुका' व तमाम रसिकांची क्षमा मागून ...)
माझ्या कारकुनी आयुष्यात दोन परमोच्च आनंदाचे दिवस आले. ज्या दिवशी माझ्या लेकीचे लग्न झाले तो पहिला आणि आज जेव्हा मी जवळपास 40 वर्षांच्या कारकुनी सेवेतून निवृत्त होणार तो दुसरा. जुनिअर क्लार्क, क्लार्क आणि हेड क्लार्क अशी चढती भाजणी करून, सर्व प्रापंचिक जवाबदाऱ्या पूर्ण करून, तृप्त मनाने मी सेवानिवृत्त होतोय तो.
आमच्या ऑफिसात गेल्या 20-25 वर्षांत खूप बदल झाले. मीही धोतर, पायजामा ते विजार-कोट या बदलातून गेलो होतो. नवीन पिढीतील काही उत्साही मंडळींनी माझा सेन्ड-ऑफ आयोजित केला होता. साहेबांनीही मोठ्या मनाने त्यास परवानगी दिली होती. तेही दुपारी 3 वाजता.. कोणीतरी आधी फोन करून माझ्या सौभाग्यवतीसही बोलावले होते. साहेबांनी समारंभ संपल्यावर “उगाच थांबू नका. टेक युअर वाईफ फॉर डिनर” अशी मुभा दिली होती. मी मात्र ‘सौ’ना घेऊन संध्याकाळी बोरीबंदर ते डोंबिवली लोकल प्रवास कसा होईल याच चिंतेत जास्त होतो.
नव्या दमाच्या लोकांनी आमचे कोण कोडकौतुक केले! बुके, मला प्रेझेन्ट, बायकोला साडी तसेच ऑफिसचा एक मोमेंटो अशा बऱ्याच छोट्या-मोठ्या भेटी दिल्या. पण त्यामुळे इतक्या वर्षांमध्ये जी गोष्ट ठरवून करता आली नाही, ती आज होणार होती; ती म्हणजे फोर्ड ते बोरीबंदर स्टेशन हा प्रवास टॅक्सीने होणार होता..
सत्कार समारंभ आटोपून आम्ही जड अंतःकरणाने व हातातल्या जड सामानासकट खाली उतरलो. टॅक्सीला हात दाखवणार तोच शेजारून आवाज आला.
“काँग्रॅच्युलेशन्स! रिटायर्ड झालास..”
मी वळून बघितलं.
“नंदा? अरे, आज अचानक?” नंदाला बघताच मी काहीसा आश्चर्यचकित झालो.
तशी मला त्याची दर आठवड्यात भेटायची सवय काही वर्षं कायम होती. त्यात मग काही आठवड्यांचं व नंतर काही महिन्यांचं अंतर पडत गेलं. गेली वर्षं-दोन वर्षं तर तो भेटलाच नव्हता. कधी-मधी त्याचा फोन तेवढा येत असे. आज असा अचानक, तेही माझ्या रिटायर्ड होण्याच्या दिवसांची आठवण ठेवून तो येईल असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं.
“अगं, हा नंदा.” मी बायकोची ओळख करून दिली. बायकोने माझ्याकडून नंदाबद्दल बरंच ऐकलं होतं. पण प्रत्यक्ष भेटीचा योग कधी आला नव्हता. पण त्याला घरी बोलावण्याचा संकोच इतक्या वर्षांनंतरसुद्धा गेला नव्हता.
“चला, तुमच्या स्पेशल दिवसाचं सेलेब्रेशन करायचंय.” माझ्या बायकोच्या हातातील पिशव्या त्याच्या कार ड्रायव्हरकडे देत तो म्हणाला. माझी बायको काहीशी गोंधळून, काहीशी मंत्रमुग्ध होऊन गाडीत बसू लागली.
आणि शेजारी बसलेला नंदा? वाढत्या वयाची काही लक्षणं सोडली तर अजूनही तेवढाच तरतरीत. उलट हे दोघं याही वयात पक्व आणि तरीही सुंदर दिसत होते. मला माझीच भयंकर लाज वाटायला लागली. सुटलेलं पोट आणि केसांचा कमी झालेला भार ह्यामुळे मीच त्या सगळ्यांच्यात खराखुरा ‘रिटायर्ड’ दिसत होतो.
“फोर टीज् अँड बिस्किट्स” नंदाने ऑर्डर दिली.
त्यानंतर नंदा, इंदू व मी 40 वर्षं मागे जाऊन कॉलेजचे मित्र झालो. इंग्लिश ऑनर्स, आमचा वर्ग, आमची सहल अशा कित्येक आठवणी विषय न काढता येत होत्या. 40 वर्षांआधी मोरेटोरमध्ये मी जसा बुजलेलो तसाच आणि ते दोघं तसेच खुललेले.
तासाभराने इंदू जायला निघाली,
“माधव आता एकटे असतील. आज पेशंट्स जरा जास्तच होते. हल्ली थकतात ते लवकर.” इंदू नंदाला सांगत होती.
नंदा तिच्या खांद्यावर हात ठेवून इंदूला म्हणाला, “माधवरावांना नमस्कार सांग. मी येईन पुढल्या आठवड्यात.”
माझं लक्ष तिकडे नसल्यासारखं करून मी दुसरीकडे बघत होतो.
म्हणजे हिच्या मिस्टरांना माहीत आहे, नंदा काय चीज आहे ती! मला उगाच गरगरल्यासारखं व्हायला लागलं. कॉलेजचे जुने दिवस आठवायला लागले. इंदू माझा व बायकोचा निरोप घेऊन निघाली.
काही विचारायच्या आत नंदाचं स्वगत सुरु झालं.
“मीच शोधून काढली तिला. काही चौकश्या केल्या. कळलं, ती इथेच राहते मुंबईत.. मी जाऊन भेटलो तिला.”
नंदा मग त्या नाटकाला पात्रांसारखा स्वतःशीच बोलत होता आणि त्याने 40 वर्षांपासूनचा सारीपाट उलगडून सांगितला.
त्या दिवशी “नंदा ss…” म्हणून किंचाळून इंदू जिन्यातून वर पळत गेली. गेली ती गेलीच. पुन्हा कधी नंदा तिला भेटू शकला नाही. इंदूच्या थेरड्याने इंदूचं लग्न एका बिजवराशी लावून देण्याचा घाट घातला होता. त्याला त्यासाठी पैसेही मिळाले होते म्हणे. ते लग्न करायला इंदू आपल्या दोन धाकट्या बहिणींसाठी तयार झाली. लग्नानंतर काहीच दिवसांत तिच्या लक्षात आलं की, तिचा नवरा व्यसनी व बाहेरख्याली होता. इंदूवर त्याच्याकडून रोज अत्याचार होत होते. स्वाभिमानी इंदू परत त्या थेरड्याकडे जाणाऱ्यातली नव्हती, पण मुकाटपणे सहन करणंही तिच्या स्वभावात नव्हतं. एक दिवस या सगळ्याचा कडेलोट झाला आणि इंदू आपलं राहतं घर मागे टाकत घराबाहेर पडली, थोड्या आप्तांच्या व ओळखीच्या लोकांच्या मदतीने तिने स्वतःच पायावर उभं राहायचं ठरवलं. इंग्लिश ऑनर्सच्या जोरावर तिने एका कॉलेजात नोकरी पत्करली.
इंदूचं नशीब इथंच थांबलं नाही. तिचा बाप काहीच दिवसांत तीन मुली व एक बायको मागे टाकून गेला. इंदूने तिच्या दोन बहिणी, तसंच सावत्र आई व बहीण ह्यांना घरी आणलं. त्यात तिच्या बापाच्या कुपोषित संसारात तिची सावत्र आई व बहीण क्षयासारख्या रोगाने पिडीत होत्या. इंदूने त्या दोघींची मनापासून सेवा केली. मात्र नंतरच्या दोन-तीन वर्षांत तिची सावत्र आई व बहीण ह्याच रोगाचं कारण होऊन वारल्या.
तिचं नशीब थोर म्हणून तिच्या धाकट्या दोन्ही बहिणी छान शिकल्या व आपल्या पायावर उभ्या राहिल्या. इंदू त्या दोघींचा आधार होती.
“मग तिनं परत लग्न..?” मी चाचरतच विचारलं.
“हो. माधव कुलकर्णी, व्यवसायाने डॉक्टर आहेत ते.”
इंदू स्वतःच्या अफाट हुशारीने त्याच कॉलेजात इंग्लिशची प्राध्यापिका झाली. गिरगावात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉ. कुलकर्णींशी तिची ओळख अगदी योगायोगानेच झाली. त्यांची पेशंट म्हणून. डॉक्टरसुद्धा एका दुःखाने होरपळून निघाले होते. काही वर्षांपूर्वी त्यांची बायको त्यांना सोडून गेली होती. व्यवसायात मग्न डॉक्टरांना तो फार मोठा धक्का होता. इंदू व त्यांनी खूप विचार करून लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण कुठे तरी त्या दोघांच्या मनात त्या लग्नाबद्दल खूप वर्षं साशंकता होती. पण उशिरा का होईना इंदूला एका शांत व समंजस असा जोडीदार लाभला.
“तू भेटलास त्यांना?” माझे प्रश्न.
“हो. माझी ओळख इंदूनेच करून दिली.”
इंदूने माधवरावांना नंदा नावाची सगळी हकीकत सांगितली होती. माझ्या पांढरपेशा स्वभावाला हे सगळं सहन होण्यापलीकडे होतं.
“अरे, हे सगळं त्यांना सांगायची काय रे गरज होती?” नंदाची काळजी वाटून मी विचारलं.
“अरे त्यांचा संसार हाच मुळी एका कॉम्प्रोमाईसने सुरु झाला होता ना? त्यात सगळी पारदर्शकता असणं चांगलं असं त्या दोघांनाही वाटत होतं.”
माझ्या बायकोच्या डोळ्यांचा खळ थांबायला तयार नव्हता. नंदाने शांतपणे जेवायची ऑर्डर दिली.
त्या भेटीनंतर नंदा दर एक-दोन आठवड्यांत इंदूकडे भेटायला जात असे. एखादे शनिवारी ते दोघंच चहा-कॉफीच्या निमित्ताने बाहेर भेटत. माधवरावसुद्धा बऱ्याचदा त्यांना जॉईन होत असल्याचं कळलं. काहीच महिन्यांपूर्वी इंदू ‘हेड ऑफ द डिपार्टमेंट’ होऊन रिटायर्ड झाली होती. कथा-कादंबऱ्यातून वाचलेलं ‘प्लॅटॉनिक रेलेशन’ मी आज प्रथमच प्रत्यक्षात अनुभवत होतो, कदाचित नंदा नावाच्या यक्षाला मिळालेल्या अनेक शापांवर हा एक उ:शाप असावा.
जेवणानंतर नको नको म्हणत असतानासुद्धा नंदाने ड्रायव्हरना आम्हाला अगदी डोंबिवलीपर्यंत सोडायला सांगितले. माझ्या बायकोने आजवर नंदा नावाची दंतकथा नुसतीच ऐकली होती. आज तिने ती अनुभवलीसुद्धा होती.
“भावोजी, आम्हाला परकं समजू नका. अधनंमधनं घरी येत चला.” बायको भरल्या कंठाने म्हणाली.
“भावोजी?” नंदा काहीसं खिन्न हसला. त्या बिचाऱ्याला नंदा ह्या नावाशिवाय कधी कोणी बोलवलं नव्हतं.
“मग, आता उद्यापासून तू इकडे येणार नाहीस की काय? कसं भेटायचं रे तुला आता?” नंदा गमतीने मला म्हणाला. मी उसनं अवसान आणून हसलो उगाच.
गाडी चाळीच्या दाराशी थांबेपर्यंत माझा डोंबिवली ते बोरीबंदर रेल्वे पास सुरूच ठेवण्याचा निर्णय पक्का झाला होता. फोर्टातलं बँक अकाउंटसुद्धा पेन्शनसाठी सुरु ठेवायचं ठरलं. हो, फोर्डात सारखं जायला कारण हवं होतं मला.
चाळीच्या जिन्यात कोणाचा तरी रेडिओ सुरु होता.. ‘ए मुहब्बत तेरे अंजाम पे रोना आया आज क्यो, तेरे नाम पे रोना आया’
- सलील जोशी, बोस्टन
salilsudhirjoshi@gmail.com
Read Also :
Tags: साधना डिजिटल मराठी कथा साहित्य पु. ल. देशपांडे नंदा प्रधान व्यक्ती आणि वल्ली इंदू वेलणकर Load More Tags
Add Comment