एका गुरुदक्षिणेची पंचविशी

मॉरी आणि मिचच्या या 14 मंगळवारच्या भेटींचं फलित म्हणजे, ‘ट्यूजडेज विथ मॉरी’ नावाचं नितांतसुंदर पुस्तक.

मॉरी श्वार्टझ आणि मिचेल अलबॉम | freep.com

मिचने आपला सगळ्या अनुभवाचा सारांश या छोटेखानी पुस्तकात मांडला आहे. खरं म्हणजे मॉरीलासुद्धा या भेटी, त्यातील चर्चा एक पुस्तकरूपात याव्यात अशी इच्छा होती. मिच अल्बोमनेसुद्धा या आठवणी मॉरी व त्याच्या बायकोला आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने प्रकाशित करायचं ठरवलं. पण अनेक प्रकाशकांनी ते पुस्तक सुरुवातीला नाकारलं. त्यातील गोष्ट ही त्यांना अतिशय डार्क म्हणजे दुःखद वाटायची. असं पुस्तक कोण वाचणार असा प्रश्न ते मिचला विचारत. शेवटी एका प्रकाशकाच्या दयेवर ह्या पुस्तकाची मर्यादित आवृत्ती निघाली. या पहिल्या आवृत्तीला सप्टेंबर महिन्यात 25 वर्षं पूर्ण झाली आहेत.

1970 च्या नवीन शैक्षणिक वर्षात मिचेल अलबॉम बॉस्टन जवळील ब्रँडिस युनिव्हर्सिटीत दाखल झाला. त्याने समाजशास्त्र हा विषय पदवीकरता निवडला होता. काहीसा अबोल, थोडा घुम्या व वयाने इतर मुलांपेक्षा कमी असलेला मिचेल उगाचच मोठे कपडे घालून, एक न पेटवलेली सिगरेट तोंडात ठेवून कॅम्पसमध्ये फिरत असे, उगाच कोणी आपल्याला लहान समजू नये याचा बालिश प्रयत्न करत. त्याला समाजशास्त्राचे अनेक विषय शिकवायला प्रोफेसर मॉरी श्वार्टझ हे शिक्षक होते.

पहिल्याच दिवशी मॉरीने हजेरी घेताना नाव घेतले.

“मिचेल?”

मिचेलने हात वर केला. त्याकडे रोखून बघत पण जरा मिश्किलपणे मॉरीने विचारलं, “तुला मिच म्हणून हाक मारली तर चालेल काय? की मिचेलच म्हणू?”

“मिच म्हणा. माझे सगळे मित्र मला मिच ह्याच नावाने बोलावतात.”

“ठीक आहे, मिच अशीच हाक मारेन मी तुला. आणि हो, आशा करतो की एक दिवस तू मलासुद्धा तुझ्या मित्राचा दर्जा देशील.” 

ह्या पहिल्याच भेटीला मॉरीने मिचेला आपलेसे केले. या प्रेमळ शिक्षकाची कीर्ती तशी कॉलेजभर होतीच. पण समाजशास्त्र शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थास आपण मॉरीच्या वर्गातूनच शिकावे असा वाटत असे.

मिचसुद्धा याला अपवाद नव्हता. त्याने मॉरी शिकवत असलेल्या सगळ्या क्लासेसना रजिस्टर केले. काहीच दिवसात मिचला मॉरीचा आवाका समजू लागला. त्याची शिकवण्याची हातोटी, खेळकरपणा, विषयाची खोल जाण तसेच वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याशी जोडलेली नाळ यामुळे मॉरीचा क्लास म्हणजे मिचला एक कार्यशाळा वाटत असे.

मॉरीची शिकवण्याची पद्धत निराळी असे. त्याला समाजशास्त्रातील सगळ्या खाणाखुणा मानवी स्वभावाशी कशा निगडीत असतात हे चांगले ठाऊक होते. एखादा विषय समजावून सांगतानासुद्धा त्याचा प्रयोग तो आधी मुलांवर करी.

एकदा वर्गात तासाला आल्यावर त्याने शांतपणे पुस्तकं टेबलावर ठेवली व मुकाट बसून वर्गातील खिडकीबाहेर बघत राहिला. विद्यार्थ्यांमध्ये प्रथम थोडी चेष्टा, मग कुजबूज आणि शेवटी असह्य चिडचिड पसरू लागली. पण हा पठ्ठ्या एक शब्द बोलायला तयार नव्हता. हा खेळ चांगला 15 मिनिटं चालला. शेवटी मॉरीनेच या शांततेचा भंग केला. नेहमीच्या संथ स्वरात त्याने या विषयाची उकल करायला सुरुवात केली.

“का शांततेचा असा त्रास होतो आपल्याला? का भंग करावीशी वाटते ही शांतता? गोंधळात असे काय आहे, जे आपल्याला हवेहवेसे वाटते? आपण सगळे एकमेकांशी बोलतो ते खरंच आपल्या मनातलं बोलतो काय? आणि जर आपण एकमेकांशी उगाच समोरासमोर आहोत म्हणून बोलत असू तर मग त्या बोलण्याला काय अर्थ आहे?”

या सगळ्याच प्रश्नांनी सगळ्या वर्गाला अंतर्मुख केले. मग मात्र मॉरीने आपल्या खेळकर स्वभावानुसार वातावरण हलके करत वर्गात ‘संभाषणाचे महत्त्व’ यावर एक परिसंवादच घडवून आणला.

वर्ग संपल्यावर मात्र त्याने मिचला थांबवून विचारले, “मिच, तू फार काही बोलला नाहीस. काय वाटतं तुला या विषयावर?”

मिचच्या सगळ्या प्रश्नांना, जे तो कदाचित उघडपणे बोलायला घाबरत असावा, मॉरीने शांतपणे उत्तरं दिली. त्या दिवसापासून मॉरी व मिच यात एक अनोखं नातं तयार झालं. मिचने दुसऱ्या वर्षालासुद्धा मॉरीचे सगळे विषय घेतले. त्यांची मैत्री आता वर्गापुरती मर्यादित न राहता कॅम्पसमध्ये चर्चा करत लांब फेरफटका मारणे, बास्केटबॉलच्या मॅचेसना जाणे इथपर्यंत वाढत होती.


Read Also : Misuse of Social Media: Buck Stops at us - Salil Joshi


मॉरीची शिकवणी नुसती समाजशास्त्रापुरतीच न राहता जीवनविषयक मूल्यांच्या खऱ्या शिक्षणापर्यंत असे. असेच एकदा मॉरीने मिचला कॉलेजनंतरच्या जीवनाविषयी विचारायला सुरुवात केली. मिचची वयानुरूप भौतिक सुखाकडे असलेली ओढ बघून त्याने मिचला फक्त पैसा हाच कसा जीवनाची इतिकर्तव्यता नाही हे समजावून सांगितले. ते सांगत असताना तरुणांनी कसे भोवतालच्या समाजाशी स्वतःशी वेगवेळ्या पातळीवर जोडलेले असणे आवश्यक आहे हे समजावून सांगितले. माणसाला माणसाशी असलेली सहानुभूती हीच त्यांना जोडणारी खरी शक्ती असते हे मिचला त्याने पटवून दिले.

मॉरीला हे ज्ञान उपजत आलेले नव्हते. त्याने त्याच्या उमेदवारीच्या काळात मानसिक आरोग्यावर खूप अभ्यास केला होता. साठच्या दशकात ब्रँडिसमधील वातावरण सांस्कृतिक चळवळींना पोषक तसेच प्रोग्रेसिव्ह होते. वंशभेद, व्हिएतनाम युद्धाचा विरोध अशा अनेक चळवळी तिथे चालल्या असायच्या. ऍबी हॉफमनसारखे अनेक लोक त्यावेळी त्या युनिव्हर्सिटीत विद्यार्थी म्हणून होते. (पुढे जाऊन ऍबी हॉफमनने शिकागो शहरात डेमोक्रॅटिक पक्षाच्या संमेलनावर मोर्चा नेला होता. त्यावरील ‘The Trial of The Chicago seven’ हा चित्रपट आवर्जून बघावा.) अशी अनेक रॅडिकल मंडळी त्यावेळी मॉरीच्या वर्गातसुद्धा असायची. (डॉक्युमेंट्रीज् बनवणारे आपले आनंद पटवर्धनसुद्धा ब्रँडिसलाच शिकायला होते, असे वाचनात आले.) तेथील प्रोफेसर मंडळी नुसतेच शिकवण्यापेक्षा अशा विद्यार्थ्यांची बाजूही समजून घेत असत. व्हिएतनाम युद्धाच्या दरम्यान जेव्हा या प्रोफेसर मंडळींना कळलं की, वर्गातील कमी गुणसंख्या असणाऱ्या मुलांना युद्धासाठी सैन्यात भरती केलं जाणार आहे (draft), तेव्हा मॉरीसहित सगळ्याच प्रोफेसरांनी अशा विद्यार्थ्यांचं ग्रेडिंग केलं नाही. जेव्हा युनिव्हर्सिटीने त्यांना सांगितलं की, मार्क्स न मिळालेल्यांना नापास समजले जाऊ शकते; तेव्हा मॉरीने त्यावर तोडगा काढून सगळ्यांना ‘A’ ग्रेड देण्याची सूचना केली. आणि मुख्य म्हणजे ती या युनिव्हर्सिटीने मान्य केली. मॉरीच्या वर्गात व्याख्यानापेक्षा चर्चेवर व थेअरीपेक्षा अनुभवावर जोर दिला जात असे.

एकदा काही कृष्णवर्णीय मुलांनी एका बिल्डिंगचा कब्जा केला. त्याला माल्कम एक्स यांचं नाव दिलं. याच बिल्डिंगमध्ये एक रसायनशास्त्राची प्रयोगशाळा होती. युनिव्हर्सिटीतील प्रशासनाला वाटू लागलं की, ही मुलं आता या प्रयोगशाळेत बॉम्ब बनवणार आहेत. पण मॉरी या मुलांचं अंतरंग जाणून होता. त्याला चांगलंच ठाऊक होतं की, त्या मुलांना फक्त त्यांची स्वतःची ओळख हवी होती. एक आठवडा हा गोंधळ सुरु होता. एक दिवस त्या बिल्डिंग शेजारून जात असताना, आतून कोणी तरी आपल्या लाडक्या प्रोफेसर मॉरीला बघितलं. एका खिडकीतून आत येतोस काय विचारलं व मॉरी आत गेला व अर्ध्या-एक तासात त्या मुलांच्या मागण्या एका कागदावर लिहून घेऊन आला. युनिव्हर्सिटीच्या अधिकाऱ्यांना दाखवून त्याने त्या मंजूर करून घेतल्या.

या सगळ्या साठच्या दशकात घडलेल्या घटनांनी मॉरीची वैचारिक बैठक कायमची पक्की केली होती. मिचच्या काळात म्हणजे सत्तरीच्या दशकात तर मॉरीने अशा अनुभवांवरून शिकवण्याची एक पद्धतीच तयार केली होती. मिचच्या तिसऱ्या वर्षाला एका युनिव्हर्सिटीच्या बास्केटबॉल मॅचमध्ये त्यांची टीम जिंकायला आली होती. आता काही हूड मुलांनी एकच गलका सुरु केला. “नंबर वन नंबर वन! ब्रँडिस युनिव्हर्सिटी नंबर वन” मॉरी लगेच उठून उभा राहिला व त्याने मुलांना विचारलं, “काय रे? दुसऱ्या नंबरमध्ये काय वाईट असतं? काय हरकत आहे ती टीम दुसरी आली तर?” ती हुल्लडबाजी करणारी मुलं खजील झाली.

वर्गात एक दिवस त्याने एक अनोखाच प्रयोग केला. वर्गातील मुलांना त्यांच्याच मित्रासमोर पाठमोरं उभं राहायला सांगितलं. पाठमोऱ्या व्यक्तीने मागे न बघता स्वतःला झोकून द्यायचं, या विश्वासावर की आपला मित्र आपल्याला खाली पडू देणार नाही. वर्गातील कोणीही हा प्रयोग पूर्ण करू शकलं नाही. शेवटी एका मुलीने डोळे बंद केले व स्वतःला झोकून दिलं आणि आश्चर्य असं की, तिला मागे असलेल्या मुलाने अलगद झेललं. मॉरीने यावर एकमेकांवरील विश्वास कसा असावा हे मुलांना पटवून सांगितलं. मॉरी म्हणाला की, ह्या मुलीत व इतरांत हा फरक होता की, या मुलीने डोळे बंद केले. कधी-कधी विश्वासाचं नातं हे अनुभवावं लागतं. नुसतं डोळ्यांनी बघून त्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं. विश्वासाचं नातं हे टिकवून ठेवावं लागतं अगदी अंधारात आणि पडत्या काळातसुद्धा.

मिचची चार वर्ष कशी भुर्रकन उडून गेली. ह्या चार वर्षांत त्याने समाजशास्त्राव्यतिरिक मानसशास्त्र, मानसिक आजार व त्यामागील अवस्था, ग्रुप प्रोसेस अशा अनेक विषयांवर मॉरीकडून भरपूर शिकून घेतले. या सगळ्याचा बाहेरील जीवनात कुठेही उपयोग असतो यावर तो जरा साशंकच होता.

चार वर्षांच्या शेवटी मिचला कॉलेज सोडताना जीवावर येत होते, त्याचवेळी त्याचा हा 2-3 पिढ्यांनी मोठा असलेला मित्रसुद्धा तेवढाच गलबलून गेला होता. मिचने मॉरीला वचन दिले की, महिन्यात एकदा तरी तो मॉरीला इ-मेल तसेच फोन करेल.

कॉलेजमधील मित्रांना दिलेली आश्वासने ही मुळी विसरण्यासाठीच असतात. मिचने एक पियानोवादक होण्याचं मनावर घेतलं होतं. ते स्वप्न पूर्ण करण्याचा खटाटोप, त्यात आलेलं अपयश व त्यानंतर पत्रकारितेत घेतलेली उडी व नंतर स्पर्धात्मक जगातील धावपळ या सगळ्यात मॉरीला एक साधा फोन करण्याचे कष्ट घेऊ शकला नाही. मिचने आयुष्यामागे धावायला सुरु केल्यापासून त्याचा स्वतःशीच एक विसंवाद सुरु झाला होता. घर, गाडी, पैसा मिळवण्यासाठी व टिकवण्यासाठीची धडपड, स्पोर्ट्स जर्नालिझममधील सततची फिरती नोकरी, न सुरु होऊ शकणारा संसार व या सगळ्यातील एक फोलपणाची भावना त्याला कुठे तरी कुरतडत असे..

अशाच एका संध्याकाळी कुठल्यातरी हॉटेलमध्ये दिवसभराचा थकून मिचने टी.व्ही. लावला. नाईटलाईन नावाच्या कार्यक्रमात एक पत्रकार मॉरीची मुलाखत घेताना त्याने बघितलं. मॉरी आता वयानंही बराच थकला होता व का कोण जाणे काहीसा अशक्त दिसत होता. त्या मुलाखतीत मॉरीने सांगितलं की, तो ALS नावाच्या एका दुर्धर रोगाशी सामना करतोय. मिचला भयंकर धक्का बसला तसेच आपण आपले वचन पाळले नाही याची प्रचंड रुखरुख त्याला लागून राहिली.

त्यानंतरचा सगळा पट ही ह्या गुरुशिष्यांमधील अपूर्व प्रेमाची व एकमेकांप्रती असलेल्या आदराची कहाणी होय. काहीच दिवसात मिच काहीशा अपराधी भावनेनं मॉरीकडे गेला. मॉरी व त्याच्या बायकोने त्यांचं मनापासून स्वागत केलं. “मित्रा, शेवटी तू आलास.”  मॉरी अत्यानंदाने उद्गारला. पण ही भेट ही फारशी सुखकर नव्हती. मॉरी हा Amyotrophic Lateral Sclerosis (ALS) या असाध्य रोगाने खंगत चालला होता. ALS रोग मेंदू व पाठीच्या कण्यावर परिणाम करून रोग्याचे स्नायूंवरचे नियंत्रण हळूहळू कमी करतो. पण अशा परिस्थितीतसुद्धा मॉरीची जिद्द, विनोदबुद्धी, जगण्याकडे बघण्याची सकारात्मता मात्र टिकून होती. इतक्या वर्षानंतरच्या पहिल्याच भेटीतसुद्धा मॉरीनं पुन्हा मिचला परत एकदा जिंकून घेतलं. मिचलाही लक्षात आलं की, मॉरीकडे देण्यासारखं अजून बरंच काही शिल्लक होतं. आजही मॉरीकडे सहानुभूतीने येणाऱ्या लोकांना परत जाताना मॉरीनेच त्यांच्या काही समस्या सोडवल्या आहेत असं दिसत असे.

यावेळी मात्र मिचने मॉरीला निराश केलं नाही. त्याने आठवड्याच्या दर मंगळवारी भेटायचं वचन दिलं. मिचला कल्पना होतीच की, त्याच्याकडे कदाचित फारसे मंगळवार शिल्लक उरलेले नाहीत. तरी मिचने त्या दोघांच्या शेवटच्या थिसीसचं काम सुरु केलं, मॉरीला शब्दबद्ध करण्याच्या त्याच्या अनुभवातून परत एकदा स्वतःच्या छोट्या-छोट्या प्रॉब्लेम्सची उकल करण्याच्या.

मिचचा हा वर्ग 14 मंगळवार चालला. ह्याला वर्गाला कुठलेही सिलॅबस नव्हते, पुस्तकं नव्हती, परीक्षा नव्हती. हो! कधीकधी तोंडी परीक्षा द्यावी लागत असे. मार्क्स नव्हते आणि विषयाला बंधन असं नव्हतं. घरात थोडंबहुत काम करावं लागे, जसं की, मॉरीची उशी नीट करणे, त्यावर पांघरूण घालून देणे. रोजचा क्लास संपला, की घरी जाताना मिठी मारली तर एखादा बोनस मिळत असे. मिचला एवढं मात्र नक्की ठाऊक होतं की, या वर्गाचा पदवीदान समारोह म्हणजे मॉरीचा अंत्यसंस्कार असणार होता.

14 मंगळवार मिच व मॉरी आजचा समाज, प्रेम, पैशामागे अकारण धावण्याची तरुणाची वृत्ती, वृद्धत्व, आयुष्यातील कुटुंबाचे स्थान, क्षमाशीलता आणि शेवटी मृत्यू या विषयांवर बोलत राहिले. मिचच्या आयुष्यातील छोटे-छोटे प्रश्न जे या सगळ्या मुद्द्यांशी निगडीत होते, त्यावर मॉरी त्याला उपाय सांगत राहिला. मिचच्या या 14 मंगळवारच्या भेटींचं फलित म्हणजे, ‘ट्यूजडेज विथ मॉरी’ नावाचं नितांतसुंदर पुस्तक होय. मिचने लिहिलेला त्याच्या 14 मंगळवारच्या भेटींचा, त्याचा मॉरीसोबत झालेल्या अनेक छोट्या-छोट्या चर्चांचा व एकूणच मॉरीसोबत घालवलेल्या त्या दिवसांचा भावपूर्ण अनुभव म्हणजेच हे पुस्तक होय.

मिचने आपला सगळ्या अनुभवाचा सारांश या छोटेखानी पुस्तकात मांडला आहे. खरं म्हणजे मॉरीलासुद्धा या भेटी, त्यातील चर्चा एक पुस्तकरूपात याव्यात अशी इच्छा होती. मिच अल्बोमनेसुद्धा या आठवणी मॉरी व त्याच्या बायकोला आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने प्रकाशित करायचं ठरवलं. पण अनेक प्रकाशकांनी ते पुस्तक सुरुवातीला नाकारलं. त्यातील गोष्ट ही त्यांना अतिशय डार्क म्हणजे दुःखद वाटायची. असं पुस्तक कोण वाचणार असा प्रश्न ते मिचला विचारत. शेवटी एका प्रकाशकाच्या दयेवर ह्या पुस्तकाची मर्यादित आवृत्ती निघाली. या पहिल्या आवृत्तीला सप्टेंबर महिन्यात 25 वर्षं पूर्ण झाली आहेत.

पुढे निव्वळ वाचकांच्या तोंडी प्रचाराने या पुस्तकाची कीर्ती वाढत जाऊन आज त्याच्या 25 आवृत्या निघालेल्या आहेत. या पुस्तकाचे 48 भाषांत भाषांतर झाले असून त्याचे रूपांतर ब्रॉडवेवरील नाटकातसुद्धा झाले आहे. सुमारे आठ-दहा वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर सुद्धा विजय केंकरे दिग्दर्शित, दिलीप प्रभावळकर व अतुल परचुरे अभिनित ‘वा गुरु!’ या नाटकाद्वारे ‘ट्यूस्डेस विथ मॉरी’ आलं होतं.

मॉरी करियरला लागणारं कमी व आयुष्याला हवं असलेलं जास्ती शिकवायचा. आजकालच्या वकील, डॉक्टर व इंजिनियर मुलांना कदाचित त्याच्या शिकवण्याचं महत्त्व वाटणार नाही. पण जर असं असतं तर त्याच्या शेवटच्या दिवसांत शेकडो वकील, इंजिनियर, डॉक्टर्स झालेले त्याचेच विद्यार्थी, जगाच्या कानाकोपऱ्यातून त्याला शेवटचं भेटायला आले नसते. सगळ्यांच्या भावना एकाच होत्या त्या म्हणजे, ‘असा शिक्षक पुन्हा होणे नाही!’

मिचलासुद्धा मॉरीने देण्याचं महत्त्व शिकवलं. आज मिचेल अलबॉम एक प्रथितयश लेखक, रेडिओ वक्ता, प्रोड्युसर आहे. तसेच तो डेट्रॉईट शहरात स्वतःची चॅरिटी संस्था चालवतो. ह्या संस्थेद्वारे अनेक अनाथ मुलांकरिता तो काम करत आहे.

शेवटच्या मंगळवारी मॉरीने मिचला दर आठवड्यात त्याच्या थडग्यावर गप्पा मारायला बोलावलं.  “मी तुझ्या थडग्याजवळ काय एकटाच वेड्यासारखा बोलत बसू?” मिचने गमतीने विचारलं. “हो, असंच, जसे आपण आत्ता गप्पा मारतोय.”

“अरे, पण तू कुठे बोलू शकणार आहेस तेव्हा? मिचने विचारले. त्यावर हसतच मॉरीने उत्तर दिलं, “चल, एक ठरवू या आपण. मी गेल्यावर, तू बोल आणि मी फक्त ऐकेन.”

त्या दिवसापासून मॉरी फक्त ऐकतो व मिच बोलत असतो... पण मॉरीची शिकवणी चिरंतर सुरु आहे...

- सलील जोशी, बोस्टन
salilsudhirjoshi@gmail.com

Tags: Tuesdays with Morrie Bestseller English Books Boston Education पुस्तक नवे पुस्तक साहित्य शिक्षण Load More Tags

Comments: Show All Comments

सौदामिनी जोशी

आम्हीपण दहा वर्षापूर्वी या पुस्तकाचे भाषांतर केले आहे. पण त्यापूर्वीच श्रीमती सुनंदा अमरापूरकर यांनी केलेले भाषांतर प्रकाशित झाल्यानें आमचे हस्तलिखित फाईल मध्येच राहून गेले तरीपण या पुस्तकावर लेख लिहून आणि मित्रमंडळी त त्यासंबंधी बोलून आम्ही त्यांना वाचन प्रवृत्त केले आहे. हा लेखही समर्पक झाला आहे सुरेश सौदामिनी

विष्णू दाते

फारच सुंदर पुस्तक परिचय, वाचायची उत्सुकता वाढवणारा......!

Aruna VITKAR

खूपच सुंदर परिचय ! पुस्तक वाचायची उत्सुकता वाढली आहे परिचय इतका सुरेख तर पुस्तक त्याहून सुरेख व वाचनीय असेल ह्यात शंका नाही

सुधीर कुलकर्णी

ह्या पुस्तकाच् भाषांतर श्रीमती सुनंदा अमरापुरकर यांनी केलेले आहे . बहुतेक नांव ट्युजेडज् विथ मॅारीज या नांवाने !

श्रीश राशिनकर

वा!, सुंदर लेख. ज्या पुस्तकाचा परिचयच इतका खिळवून टाकणारा असेल तर ते पुस्तक नक्कीच सुंदर असणार.

Tanaji S. Bhosale

पुस्तक वाचायला उत्सुक आहे. ओघवत्या शैलीत परिचय. छान.

AK Farakate

एका अतिशय जीवनाभिमुख पुस्तकाची अप्रतिम ओळख. धन्यवाद सर. या पुस्तकाचे मराठीत भाषांतर झाले आहे का? -अनिल फराकटे, गारगोटी

Add Comment

संबंधित लेख