मुस्लीम धर्मियांच्या दोन महत्त्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे ईद उल अजहा उर्फ बकरी ईद. या सणानंतर मक्केतील हजयात्रा संपन्न होते. हजयात्रेसाठी जगभरातील लाखो मुस्लीम मक्केत एकत्र येतात. (यावेळी कोरोनामुळे परदेशी भाविकांसाठी ही यात्रा स्थगित करण्यात आली होती.) धर्माचरण करणारा प्रत्येक मुस्लीम या प्रवासाला जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतो. हेच स्वप्न उराशी बाळगलेल्या अबू आणि आयसू या जोडप्याचे भावविश्व रेखाटणाऱ्या 'अदामिंते माकन अबू' या मल्याळी चित्रपटाला चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते व तो भारताकडून ऑस्कर पुरस्कारासाठीही पाठवण्यात आला होता. या चित्रपटाविषयीचा हा लेख ईदनिमित्त...
- संपादक
ईदचा सण जवळ आला की मला 2011 मध्ये प्रदर्शित झालेला 'अदामिंते माकन अबू' (अबू , सन ऑफ आदम) हा मल्याळी भाषेतील चित्रपट नेहमी आठवतो आणि त्या सिनेमाबद्दल सांगावेसे, बोलावेसे वाटते. या चित्रपटाची साधी सरळ कथा अध्यात्मिक वळणाची आहे. संघर्षरहित असली तरी खिळवून ठेवणारी आहे. विशिष्ट धर्माशी संबंधित असली तरी प्रेक्षकांना सहिष्णुतेची प्रचिती करून देणारी आहे.
केरळमधील एका निसर्गरम्य, छोट्या खेड्यात अबू आणि आयसू हे वृद्ध दाम्पत्य राहत असते. अबू अत्तरे व धार्मिक पुस्तके विकून संसाराचा गाडा ओढत असतो. तर त्याची पत्नी आयसू गाईचे दूध विकून व इतर छोटी मोठी कामे करून संसाराला हातभार लावत असते. त्यांचा एकुलता एक मुलगा सत्तार दुबईत स्थयिक झालेला असतो आणि या म्हाताऱ्या आईबापांना साफ विसरून गेलेला असतो. या गोष्टीचे शल्य दोघाना जरूर आहे पण ती जखम त्यांनी चिघळत ठेवलेली नाही. ती गोष्ट मनाआड करून ते शांतपणे जीवन जगत असतात.
अबू सत्प्रवृत्त, धार्मिक गृहस्थ आहे. गावातील सगळ्यांशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध असतात. भोळ्याभाबड्या नेक अबूचे आयुष्याच्या मावळतीकडे झुकताना एकच स्वप्न उरले आहे ते म्हणजे पत्नीसह हज यात्रा करण्याचे. त्यासाठी त्याने पै-पै साठवून काही रक्कम जमा केली आहे. तब्बेतीच्या तक्रारी आताशा जास्त जाणवू लागल्याने लवकरात लवकर हजयात्रा करण्याचे तो ठरवतो आणि त्या दृष्टीने चौकशी करू लागतो.
जवळच्या शहरात अकबर ट्रॅव्हल्स ही कंपनी हजयात्रेसाठी प्रसिद्ध असते. तिथे जाऊन तो नाव नोंदवतो. मग तिथे मिळालेल्या सूचनांनुसार यात्रेची तयारी सुरु होते. आधी पासपोर्ट, आगाऊ रक्कम भरणे, गरजेच्या वस्तूंची खरेदी, उरलेल्या मोठ्या रकमेची जुळवाजुळव अशी भौतिक तयारी तर असतेच पण हजयात्रेचे काही आध्यात्मिक नियमही असतात. त्याचेही पालन अबूला करायचे असते. म्हणजे कर्जफेड, कळत नकळत दुखावले गेलेल्यांची माफी मागणे, शेजाऱ्यांचा निरोप घेणे, पापाच्या व उधारीच्या पैशाने हजयात्रा न करणे इत्यादी.
अर्थात अबूला अनेक आघाड्यांवर लढायचे आहे. खरंतर लढायचे हा शब्द अबुच्या बाबतीत विसंगत आहे. कारण तो अतिशय शांत आणि संयमी गृहस्थ आहे. अल्लावर त्याची पूर्ण श्रद्धा आहे. त्या श्रद्धेच्या बळावर येतील त्या अडचणींना तोंड द्यायची त्याची तयारी आहे.
हजयात्रेचे आध्यात्मिक नियम अबूसाठी प्रश्न नसतात. त्याचे जीवन त्याच नियमांचे पालन करून सुरू असते. तरी काही उरतेच... पूर्वायुष्यात एका शेजाऱ्याबरोबर त्याचे जमिनीच्या बांधावरून भांडण झालेले असते. अबू त्या गृहस्थाची माफी मागायला त्याच्या गावी जातो. पहातो तर ती व्यक्ती विकलांग अवस्थेत अंथरुणाला खिळलेली असते. अबूला पाहताच तो पाश्चातापाने घळाघळा रडू लागतो. एका अपघाताने त्याचे आयुष्य होत्याचे नव्हते झालेले असते. 'तुला माझी माफी मागता यावी आणि हजयात्रेला किंतु न राहता जाता यावे म्हणूनच अल्लाने मला जिवंत ठेवले असावे...' हे त्याचे उद्गार ऐकून अबू सद्गदित होतो. भावपूर्ण अंतःकरणाने त्याचा निरोप घेतो. परत येऊ की नाही याची खात्री नसल्याप्रमाणे गावातल्या शेजाऱ्यांचाही निरोप घेतो.
सगळ्यात कठीण गोष्ट असते ती हज यात्रेसाठी पैशाच्या जुळवाजुळवीची. साठवलेली रक्कम पुरेशी नसते, त्यामुळे उरलेली रक्कम उभी करण्यासाठी दागिने, गाय वासरू व अंगणातले फणसाचे झाड विकण्याचे ते ठरवतात. फणसाचे झाड जॉन्सन वखारवल्याला विकून चांगली रक्कम मिळणार असते. पैसे देण्यापूर्वी वखारवाला झाड तोडतो तर ते पोकळ निघतं. तरी तो ठरल्याप्रमाणे पैसे द्यायला तयार असतो. पण प्रामाणिक अबू हा सौदा रद्द करतो. 'पोकळ झाडाचे पैसे घेणे ही लबाडी अल्लाला चालणार नाही' असे म्हणत तो ते पैसे नाकारतो आणि त्याचे हजयात्रेचे स्वप्न विरून जाते. हे कळताच अबूचे स्वप्न पूर्ण करायला अनेकजण पुढे येतात. हिंदू शेजारी उधार पैसे स्वीकारण्याचा आग्रह करतात ,बायको मुलाकडे पैसे मागण्याचे सुचवते. (रक्ताच्या नात्याकडून घेतलेली मदत नियमात बसणारी असते), ट्रॅव्हलवाला तर तर स्वतःचे आईवडील समजून या दोघांना यात्रेला पाठवायला तयार होतो ,शेवटी बायको त्याला एकट्याला जायचा आग्रह करते. अबू मात्र या सगळ्यांच्या सहृदय पण ऋणात अडकवणाऱ्या भावना नम्रपणे धुडकावून लावतो. प्रत्येक मदत नाकारताना सार्थ युक्तिवाद करतो. अल्लाने सांगितलेले नियम धुडकावून त्याच्याकडे जाण्यात अर्थ नाही, त्याच्या प्रवेशपरीक्षेत पास होऊनच त्याच्याकडे जायचे ही त्याची निष्ठा अभंग राहते. आयसू मात्र खंतावते. इतकं नेकीने वागून अल्ला आपल्याशी असं का वागला असा प्रश्न तिला पडतो. अबू तिला समजावतो, 'अल्लाला बोल लावू नको. आपलेच काहीतरी चुकले असेल. त्याचे नियम आपण अजाणता मोडले असतील. आपण आपल्या स्वार्थाकरिता अंगणातले फणसाचे झाड तोडलेले कदाचित त्याला आवडले नसेल. शेवटी झाडातसुद्धा जीव आहेच ना. यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी प्रयत्न करू. नाहीतरी त्याने बोलावल्याशिवाय कुठे घडत असते हजयात्रा...' अशी बायकोची व स्वतःची समजूत घालत अबू झोपी जातो. दुसऱ्या दिवशी ईद असते. पहाटे लवकर उठून शुचिर्भूत होऊन तो परसात एक फणसाचे झाड लावतो आणि मशिदीच्या दिशेने चालू लागतो.
अबूच्या या न घडलेल्या हजयात्रेची कहाणी आपल्याला मात्र एका आध्यात्मिक यात्रेचा पवित्र अनुभव देऊन जाते. धर्म आणि धार्मिक कर्मकांडे यांच्यावर रूढी-परंपरांची,असहिष्णुतेची अनेक पुटे शतकानुशतकांच्या कालप्रवाहात चढत जातात. कोणताच धर्म त्याला अपवाद नाही. पण ही पुटे व जळमटे खरवडून काढली तर प्रत्येक धर्माचे अंतरंग व मूळ ढाचा सारखाच असतो. हे आपणा सगळ्यांना नेणीवेच्या पातळीवर जाणवत असतं पण आपण ते जाणीवेत येऊ देत नाही आणि आपापल्या धर्माच्या कोशात आंधळेपणाने जगत राहतो.
प्रस्तुत चित्रपट आपल्या नेणीवेचे उदात्त जाणीवेत रूपांतर करतो. मोठेमोठे प्रबोधनपर लेख, वैचारिक पुस्तके वाचून, ऐकून जे साधणार नाही ते हा साधा सोपा सिनेमा सहज साध्य करून जातो. एकमेकांच्या धर्मांना जाणून घ्या, त्यांचा आदर करा ही गोष्ट कोणताही तात्त्विक किंवा सेक्युलर आव न आणता हा सिनेमा गळी उतरवतो.
स्वतःचा धर्म मुळातून समजून घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न अबूप्रमाणे प्रत्येकाने केला तर सर्व जग निश्चितच सुखी व समाधानी होईल. वेगाने बदलणाऱ्या या जगात जुनी माणसे, तत्त्वे, मूल्ये अडगळीत पडत चालली आहेत. प्रलोभनांना अंत नाही, निष्ठांना किंमत नाही. धार्मिक श्रद्धांचा केव्हाच बाजार झाला आहे. अशा भ्रष्ट, अशाश्वत काळात अबूसारखी खेडवळ, साधी माणसं मात्र शाश्वत मूल्यांची जपणूक कोणताही आव न आणता, त्रागा न करता करत आहेत, करत असतात असा सकारात्मक संदेश हा चित्रपट देतो.
अबूची गोष्ट छानच आहे आणि ती सांगण्याची दिग्दर्शकाची पद्धतही छान आहे. दिग्दर्शक सलीम अहमद यांनी कथा-पटकथा, संवाद या इतर जबाबदाऱ्या देखील पेलल्या आहेत. या चतुरस्त्र कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या चित्रपटात 'उस्ताद' या गूढ व्यक्तिरेखेची योजना केली आहे ती सूचक आहे. भारतीय संस्कृतीच्या छायेखाली नांदणारे सगळे धर्म कसे गुरू-शिष्य, साधना, ज्ञान, अनुभूती अशा आध्यात्मिक परंपरा जोपासतात हे त्यातून अधोरेखित होते. चित्रपटातले संवाद अर्थपूर्ण व प्रगल्भ आहेत तरी ते कुठेही बोजड वाटत नाहीत.
सलीमकुमार (अबू) व झरीना वहाब (आयसू) यांनी आपापल्या भूमिका उत्तम केल्या आहेत. खरा इस्लाम कसा आहे किंवा कसा नाही हे सांगण्याचे प्रयत्न काही चित्रपटातून झाले आहेत (उदा. खुदा के लिये) पण या चित्रपटातला नायक अबू खरा इस्लाम प्रत्यक्ष जगूनच दाखवतो. साध्या भोळ्या अबूचे जीवन पाहून दृष्टी विशाल आणि मन नत होते. कलेच्या माध्यमातून अवघड गोष्ट सोपी करून सांगण्याचा खूप सुंदर प्रयत्न आहे हा...
- राजश्री बिराजदार, दौंड, जि. पुणे.
rajshrib17@gmail.com
Tags: सिनेमा अदामिंते माकन अबू राजश्री बिराजदार मल्याळी सिनेमा मुस्लीम हजयात्रा बकरी ईद Cinema Adaminte Makan Abu Rajashri Birajdar Malayalam Cinema Muslim Hajj Bakri Eid Load More Tags
Add Comment