राजकीय पत्रकारितेचा मोठा अनुभव असलेल्या एझ्रा क्लाईन ह्यांचे हे पुस्तक वाचल्यावर ध्रुवीकरणाबाबत बऱ्याच संकल्पना स्पष्ट होतात आणि ही काही तात्पुरती किंवा समाजमाध्यमांपुरती गोष्ट नाही, हे लक्षात येते. पुस्तक अमेरिकेवरच आहे. पण त्यानिमित्ताने जगातल्या इतर काही राष्ट्रांमधल्या ध्रुवीकरणाचाही थोडाफार धांडोळा घेतला असता तर अजून आवडले असते. पुस्तक वाचताना ह्यातले मुद्दे भारताला कसे आणि कुठे लागू पडतात अशी मनातल्या मनात तुलना होत राहते आणि आपल्या देशातल्या राजकारणाची संगती लावायला मदत होते.
अमेरिकन पत्रकार आणि संपादक एझ्रा क्लाईन ह्यांनी अमेरिकेत वाढत चाललेल्या राजकीय ध्रुवीकरणावर Why We’re Polarized - आपले ध्रुवीकरण का झाले आहे - असे पुस्तक लिहिलेले आहे. हे पुस्तक अमेरिकन समाज आणि राजकारण ह्याबद्दल असले तरी ध्रुवीकरण जगात बऱ्याच ठिकाणी आणि आपल्याकडेही वाढलेले आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचून अमेरिकेच्या संदर्भातले विवेचन समजून घेण्याची उत्सुकता होती.
अमेरिकेत मुख्यतः दोन राजकीय पक्ष आहेत - डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन. 1960 पूर्वी वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक गटांमधले लोक दोन्ही पक्षांमध्ये साधारण सारखेच विभागलेले होते आणि त्यामुळे कुठल्याच पक्षावर एखाद्या गटाची पकड नव्हती. दोन्ही पक्ष कुठल्याही विशिष्ट गटांना टोकाचा विरोध किंवा टोकाचे समर्थन देत नव्हते. पण डेमोक्रॅटिक पक्षाने नागरी हक्क कायदा संमत करून वर्ण, लिंग आणि धर्माच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही अशी योजना केल्यापासून ध्रुवीकरणाला हळूहळू सुरुवात झाली. सध्याच्या काळात तर मतदानाचा कल वर्ण, वंश आणि धर्मावरून लक्षात येतो. दोन्ही पक्षांचा दृष्टिकोन नुसता वेगवेगळाच नाही तर एकमेकांना प्रखर विरोध करणारा, कट्टर आणि टोकाचा होतो आहे. लोकांच्या अस्मितांचे रूपांतर राजकीय कट्टरतेमध्ये झालेले आहे.
अमेरिकेचे रंग-रूप बदलते आहे. 2013 पासून असा बदल झाला आहे, की अमेरिकेत जन्म घेणारी बहुसंख्य बाळे गोरी नसतात, म्हणजेच गोऱ्या सोडून इतर वंशांच्या बाळांची संख्या गोऱ्या बाळांपेक्षा जास्त असते. 2030 मध्ये अमेरिकेच्या लोकसंख्यावाढीचे मुख्य कारण बाहेरून येणारे लोक हे असेल. त्यांची संख्या अमेरिकेत जन्मणाऱ्या लोकांपेक्षा जास्त असेल. एवढेच नाही, तर 2045 मध्ये अमेरिकेत गोऱ्या वंशाच्या लोकांपेक्षा इतर सर्व वंशांच्या लोकांची एकत्र संख्या जास्त असेल म्हणजेच सध्याचे अल्पसंख्याक समुदाय एकत्रितपणे बहुसंख्य ठरतील. वंशांनुसार लोकसंख्या बघितली, तर भविष्यात फक्त गोऱ्या लोकांची संख्या घटत जाणार आहे आणि इतर सर्व वंशांची संख्या वाढत जाणार आहे. स्वतःला निधर्मी म्हणवणारे म्हणजेच ‘आम्ही कोणत्याच धर्माचे नाही’ असे म्हणणाऱ्यांची संख्याही लक्षणीयरित्या वाढते आहे. अशा आणि एवढ्या प्रमाणात होणाऱ्या बदलांचा अर्थातच मानसिकतेवर आणि निवडणुकांवरही परिणाम होतो. काही गटांना भीती, दडपण आणि धोका वाटतो. तर काहींना आशा आणि समाधान वाटते. त्यातूनच ध्रुवीकरणाला गती मिळते.
जो आपल्याला माहीत आहे आणि ज्याच्यावर आपण प्रेम करत आलो आहोत, तो देश अभूतपूर्व बदलून जातो आहे, त्याचा कायापालट होतो आहे असे जाणवू लागले, की असुरक्षित वाटू लागते, चिंता वाटू लागते. पूर्वी महत्त्वाच्या नसलेल्या अस्मिता टोकदार होऊ लागतात. ह्याचा फायदा कुठला ना कुठला पक्ष किंवा राजकीय नेता घेणारच आहे - हा नाही तर दुसरा.
एझ्रा क्लाईन ह्यांनी वेगवेगळे अभ्यास आणि संशोधनांची माहिती देऊन ध्रुवीकरणाचा मानसशास्त्राशी असलेला संबंध स्पष्ट केलेला आहे. टोळीचा सदस्य असणे, दुसऱ्या टोळीला विरोध करणे, त्यांचा द्वेष करणे आणि त्यांना हरवण्याची इच्छा असणे ह्या सगळ्या मनुष्याच्या उपजत वृत्ती आहेत. बऱ्याचदा लोकांना वाटते, की आपण ध्येय-धोरणे समजावून घेऊन विचारपूर्वक बाजू निवडतो. पण खरे म्हणजे बऱ्याचवेळा आपण जो पक्ष निवडतो त्याचा आपल्या स्वभावाशी, आवडी-निवडींशी संबंध असतो. काही लोकांना बदल आवडतो, तर काहींना परंपरा जपायच्या असतात. काहींना नियम आणि शिस्त आवडते तर काही लोकांचा सैल, सोप्या गोष्टींकडे कल असतो. काहींवर जगातल्या भयानक, क्रूर गोष्टींचा खूप परिणाम होतो तर इतरांवर तेवढा होत नाही. ह्यातल्या काही आवडीनिवडी नैसर्गिक असतात तर काही संस्कारांमुळे घडतात. अर्थात, ह्यातले कुठलेच स्वभावविशेष चांगले किंवा वाईट असतात असे नाही. समाज म्हणून आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनांची आणि स्वभावांची गरज असते. वैविध्यामुळे आपण टिकून आहोत. सध्याच्या काळात मनुष्यस्वभाव आणि मानसशास्त्र बदललेले नाही, तर त्याची राजकारणाशी जी सांगड घातली जाते आहे, ती नवीन आहे. पूर्वी राजकारण हा मुख्यतः व्यवहार होता, आता ती लोकांची ओळख, त्यांच्या टोळीची ओळख आणि अस्मिता झाली आहे.
पण माणसाची ओळख ही फक्त राजकीय भूमिकांइतकीच असते का? आपली अनेक अंगे असतात. आपण एखाद्या राजकीय पक्षाचे असतो. त्याखेरीज एखाद्या खेळाचे चाहते असतो, त्याचवेळी आपण पालकही असतो, एखाद्या क्षेत्रात काम करणारे असतो, एखाद्या शाळेचे माजी विद्यार्थी असतो. आपल्या ह्या इतर अस्मिता राजकीय अस्मितांसारख्या कट्टर नाहीत. त्या अस्मिता आपण राजकारणात वापरल्या तर ध्रुवीकरण सौम्य होईल. उदा. एक पालक म्हणून, एक निसर्गप्रेमी म्हणून, त्या दृष्टीने मतदान करता येऊ शकेल. पण प्रत्यक्षात उलट घडत आहे. राजकीय अस्मिता इतर सर्व अंगांवर कुरघोडी करत आहेत. आपल्या राजकीय भूमिकांचा आपल्या इतर अंगांवर आणि मैत्रीवर परिणाम होऊ लागला आहे. राजकीय अस्मितेमुळे वाटणारी जवळीक ही इतर ध्येय-धोरणांपेक्षा महत्त्वाची ठरू लागली आहे. एका प्रयोगात असे दिसून आले की, विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देताना त्यांच्या गुणांऐवजी ते कोणत्या पक्षाचे काम करतात ह्याला महत्त्व दिले गेले. वंशभेद आणि लिंगभेदापेक्षाही राजकीय मतभेदावर आधारित भेदभाव तीव्र झाला आहे. आपण एकमेकांशी कसे वागतो एवढेच फक्त राजकीय अस्मिता ठरवत नाहीत, तर आपल्या एकूणच जीवनदृष्टीवर त्यांचा परिणाम होतो आहे.
खरे तर परराष्ट्र धोरण, शैक्षणिक धोरणापासून ते अणुऊर्जेपर्यंत वेगवेगळ्या अतिशय गुंतागुंतीच्या आणि सखोल अभ्यास लागणाऱ्या विषयांवर सामान्य नागरिकाला निर्णय घेता येईल इतके काही माहीत नसते (आपल्याला हे सगळे कळते असे आपल्याला वाटत असले तरी). त्यामुळे आपल्या कळत-नकळत आपण योग्य निर्णय घेण्याचे काम आपल्या आवडत्या पक्षावर सोडलेले असते आणि आपली मूल्ये, तत्त्वे ह्यावरून आपण आपला पक्ष निवडलेला असतो. ही मूल्ये अर्थातच आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमीमुळे आपल्याला महत्त्वाची वाटत असतात. पण राजकीय पक्ष मात्र त्यांचे निर्णय सत्तेसाठी घेत असतात. मग हुशार आणि अभ्यासू नागरिकांचे काय? तर प्रयोगांमध्ये असे दिसून आले की, हे लोक त्यांची हुशारी योग्य निर्णयासाठी वापरण्याऐवजी त्यांच्या पक्षाच्या समर्थनासाठी वापरतात. अस्मिता जेव्हा पणाला लागलेल्या असतात, तेव्हा आपली तर्कबुद्धी गहाण पडते.
ध्रुवीकरण ही होऊन गेलेली प्रक्रिया नसून ती अजूनही सुरू आहे आणि ते दिवसेंदिवस वाढतच आहे. माहितीयुगात इंटरनेटवर नुसतीच खूप माहिती मिळते असे नाही तर माहितीची निवडही करता येते. त्यामुळे बातम्या देणारी वृत्तपत्रे आणि वाहिन्याही त्याच्याशी स्पर्धा करतात. पत्रकारांना कारकीर्द घडवायची असते आणि वाहिन्यांना उत्पन्न मिळवायचे असते. लोकांचे लक्ष वेधून घेताना, जास्तीत जास्त प्रेक्षक मिळवताना माध्यमे सनसनाटीला महत्त्व देतात. त्यातूनच माध्यमे अस्मिता पेटवतात, भावना भडकवतात आणि लोकांच्या मनात संशय, असुरक्षितता निर्माण करतात. माध्यमांचे ध्रुवीकरण होतेच, शिवाय ते लोकांच्या ध्रुवीकरणात भर घालतात. राजकीय नेतेही सनसनाटी विधाने करून माध्यमांना वापरून घेतात, स्वत:चे बातमीमूल्य वाढवतात आणि त्यातून ध्रुवीकरण वाढवतात.
हेही वाचा : पुढचं पुस्तक वाचण्याआधी... - गणेश मतकरी
समाजमाध्यमे तुम्हांला आवडणाऱ्या बातम्या दाखवतात हे जरी खरे असले तरी विरुद्ध बाजूच्या बातम्या वाचल्या-पाहिल्यावर काय होते? त्यातून वेगळा विचार किंवा भूमिका सौम्य होण्याऐवजी लोकांना राग येतो आणि ते लगेच त्या मुद्द्यांचे खंडन सुरू करतात. प्रयोगांमधून हे सिद्ध झाले आहे. कुंपणावरचे मतदार आता कमी होत चालले आहेत. इतकेच नाही, तर राजकीय पक्षांचे महत्त्वही कमी होत जाऊन आपापल्या विचारसरणीचा कट्टरपणा वाढत चालला आहे. राजकीय पक्षांना ज्या देणग्या मिळतात, त्यातही जे छोटे, सामान्य देणगीदार असतात ते ध्रुवीकरणामुळे देणग्या देतात आणि अर्थातच जे मोठमोठे, श्रीमंत देणगीदार असतात ते त्यांच्या व्यवसायासाठी, कामासाठी (म्हणजेच एक प्रकारे लाच म्हणून) देणग्या देतात. कुणी अस्मितेत गुंतवणूक करतात तर कुणी व्यवसायात. ध्रुवीकरणाच्या आगीत तेल ओतणाऱ्या नेत्यांना मोठया प्रमाणात निधी उभा करता येतो. नेता आवडला नाही, तरी ‘विरुद्ध बाजू नको’ म्हणून लोक त्याला मत देतात. राजकीय नेते आता त्यांच्या गुणांमुळे निवडले जात नाहीत, तर विरोधी पक्षाबद्दलच्या द्वेषामुळे निवडले जातात. त्यामुळे आपल्याला पाठिंबा मिळवण्यापेक्षा दुसऱ्याबद्दल संताप निर्माण करणे हे ध्येय झाले आहे. अशा परिस्थितीत परस्परविरोधी पक्षांनी चर्चा करून, समजुतीने काही चांगली धोरणे ठरविणे, काही तडजोडी करून सगळ्यांची सहमती मिळविणे ह्या गोष्टी दुरापास्त होत चाललेल्या आहेत. अमेरिकेत अध्यक्ष एका पक्षाचा आणि संसदेत बहुमत दुसऱ्या पक्षाचे असे असू शकते आणि अशावेळी सहमती, तडजोडी करून मार्ग काढणे अपेक्षित असते.
ध्रुवीकरणाबद्दल सगळे स्पष्टीकरण दिल्यावर लेखकाने डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षातला फरकही स्पष्ट केलेला आहे. ध्रुवीकरण दोघांचेही झाले असले तरी डेमोक्रॅटिक पक्षाला फ्लू झाला असेल तर रिपब्लिकन पक्षाला न्यूमोनिया झाल्याचे मत लेखकाने मांडले आहे. वेगवेगळ्या वंशांचे, धर्मांचे लोक डेमोक्रॅटिक पक्षात एकत्र आल्याने ते जास्त वैविध्यपूर्ण झाले तर एकाच वंशाचे लोक रिपब्लिकन पक्षात एकत्र आल्याने ते जास्त एकजिनसी आणि जहाल झाले.
पुस्तकातले सगळ्यात शेवटचे प्रकरण हे ध्रुवीकरणाला कसे सामोरे जायचे ह्यावर लिहिलेले आहे. ध्रुवीकरण हे दरवेळी वाईटच असते असे नाही, असे लेखकाला वाटते. ध्रुवीकरणापूर्वीच्या अमेरिकेत नागरी हक्क कायदा नव्हता, आजच्यापेक्षा बराच जास्त अन्याय आणि उपेक्षा होती. ध्रुवीकरणाच्या विरुद्ध गोष्ट सहमतीच असते असे नाही, तर बऱ्याचदा ते खच्चीकरण असते. ध्रुवीकरणातून राजकीय मतभिन्नता व्यक्त होते आहे. अर्थात, ह्याचा अर्थ असा नाही की ध्रुवीकरणाच्या आव्हानांकडे दुर्लक्ष करावे. पण पुस्तकात विशद केल्याप्रमाणे राजकीय, तांत्रिक, सामाजिक, मानसिक अशा बऱ्याच गोष्टींमुळे ध्रुवीकरण राहणारच आहे. अशा परिस्थितीत राजकीय व्यवस्था कशा चालवायच्या ह्याचा विचार करणे भाग आहे. लेखकाने त्यासाठी अमेरिकेच्या निवडणूक पद्धतीत आणि अर्थसंकल्प संमत करण्याबाबत काही बदल सुचवले आहेत. अमेरिकेची घटना लिहिली गेली तेव्हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्पर्धा होती आणि त्यांत समतोल साधण्याचा प्रयत्न केला होता. आता नव्या काळासाठी नवा समतोल शोधावा लागेल, असे लेखकाला वाटते. त्याखेरीज, राजकारणात आपला वापर तर होत नाही ना, ह्याबाबत नागरिकांना सजग राहायला सुचवले आहे. माणसाला अस्मिता असणारच आहेत. आपल्या राजकीय सोडून ज्या इतर अस्मिता असतात उदा. खेळाडू, शाकाहारी, विद्यार्थी ह्यासारख्या अस्मितांना महत्त्व दिले पाहिजे. राजकारण आणि राजकीय बातम्या, चर्चा ह्यावरचा वेळ मर्यादित ठेवला पाहिजे. राजकारणाखेरीज अनेक महत्त्वाच्या, रचनात्मक गोष्टी आयुष्यात असतात.
राजकीय पत्रकारितेचा मोठा अनुभव असलेल्या एझ्रा क्लाईन ह्यांचे हे पुस्तक वाचल्यावर ध्रुवीकरणाबाबत बऱ्याच संकल्पना स्पष्ट होतात आणि ही काही तात्पुरती किंवा समाजमाध्यमांपुरती गोष्ट नाही, हे लक्षात येते. पुस्तक अमेरिकेवरच आहे. पण त्यानिमित्ताने जगातल्या इतर काही राष्ट्रांमधल्या ध्रुवीकरणाचाही थोडाफार धांडोळा घेतला असता तर अजून आवडले असते. पुस्तक वाचताना ह्यातले मुद्दे भारताला कसे आणि कुठे लागू पडतात अशी मनातल्या मनात तुलना होत राहते आणि आपल्या देशातल्या राजकारणाची संगती लावायला मदत होते.
- प्राजक्ता महाजन, पुणे
mahajan.prajakta@gmail.com
Tags: इंग्रजी पुस्तक साहित्य राजकारण आंतरराष्ट्रीय राजकारण नवी पुस्तके पत्रकारिता Load More Tags
Add Comment