पुढचं पुस्तक वाचण्याआधी...

पुस्तकं वाचायची तर प्रिन्टमध्येच, असं काही मला वाटत नाही. डीजिटल माध्यम, ऑडिओ बुक्स हे मार्गही आज उपलब्ध आहेत आणि ते वापरले, तर फायद्याचेच आहेत.

गणेश मतकरी यांचे बुकशेल्फ

सातत्यानं पुस्तकं वाचणाऱ्या माणसांविषयी आपल्याला कायम उत्सुकता असते, ही माणसं त्यांच्या वाचनाच्या लिस्टमधलं पुढचं पुस्तक कसं बरं निवडत असतील? काय क्रायटेरिया ठरवत असतील, विशेष म्हणजे त्यांना अशी वेगवेगळी पुस्तकं माहित कुठून होतात? हेच कुतूहल घेऊन कथाकार आणि पट्टीचे वाचक असलेल्या गणेश मतकरींनाच विचारलं, एखादं पुस्तक हातात घेण्याआधी काय काय सुरु असतं मनात...! 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने कर्तव्य साधना वर एकूण चार लेख प्रसिध्द होत आहेत, त्यातील या तिसऱ्या लेखात मतकरी सांगताहेत हातात पुस्तक असतना आणि नवं हाती घेताना होणाऱ्या विचार मंथनाविषयी..

मी वाचण्यासाठी पुढलं पुस्तक कोणतं निवडणार याचा मला बऱ्याचदा आधीचं पुस्तक संपेपर्यंत पत्ता नसतो.  मी बरेच मेटिक्युलस लोक पाहिले आहेत. त्यांना आपण वाचनासाठी किती वेळ देऊ शकतो (आणि किती वेळ द्यायला हवा) हे अचूक माहीत असतं, त्या हिशेबानेच ते पुस्तकं विकत तरी घेतात. किंवा वाचनालयांमधून मिळवतात. भाराभर पुस्तकं गोळा करण्यात अर्थ नाही, कारण ती सगळी आपण वाचू शकत नाही; नुसती घरी जमा होतात आणि जागा अडवतात. ही त्यांची खात्री असते. त्या हिशेबानेच त्यांची निवड काटेकोरपणे चालते. या प्रकारच्या, आपल्याला निश्चित काय हवंय हे माहीत असलेल्या लोकांबद्दल मला विशेष आदर आहे; पण त्यांच्यात सामील होणं मात्र मला कठीण वाटतं. 

मला एका वेळी वीसेक पुस्तकं तरी वाचण्याची इच्छा असते. त्यामागे विशेष कारण असतं असं नाही. ती माझ्या अभ्यासाच्या किंवा खास इंटरेस्टच्या विषयाचीच असतात, असं काही नाही. मला काहीही वाचायला आवडतं आणि जे आपल्याला वाचायला आवडेल, ते मी सारखा शोधत असतो. आता अमुक गोष्ट आपल्याला वाचायला आवडेल, हे ती प्रत्यक्षात हातात आल्याशिवाय कसं कळणार? तर, त्याचे माझे काही ठोकताळे आहेत. सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे लेखकांवर लक्ष ठेवणं. असे अनेक लेखक असतात, ज्यांचे तुम्ही नियमित वाचक असता. हे लेखक लिहितात आणि तुम्ही ते वाचत जाता. पुस्तकाचा दर्जा थोडाफार वर-खाली झाला तरी तुमची हरकत नसते. हे तुम्हाला कोणी तरी काम नेमून दिल्यासारखंच असतं. 

माझ्यासाठी असे अनेक लेखक आहेत. स्टीव्हन किंग हा त्यातला पहिला. वर्षाला किंगची साधारण दोन पुस्तकं येतात आणि ती मी घेत जातो आणि बहुतेकदा लगेच वाचतोही. (याच आठवड्यात मी त्याचं नुकतंच बाहेर आलेलं ‘द इन्स्टिट्यूट’ संपवलं, हातात पडल्यानंतर आठवड्याभराच्या काळात.) या प्रकारचे लेखक वाचनाचं शेड्यूल बिघडवण्यात एक्स्पर्ट असतात. कारण त्यांची पुस्तकं आली की, हातातलं वाचन बाजूला ठेवून ती वाचली जातात आणि तुमचा चालू बॅकलॉग वाढत जातो. त्यात या प्रकारचे सर्वच लेखक सतत चांगलं काम करतात, असं नाही. किंग सर्वसाधारणत: अपेक्षाभंग करत नाही. हारुकी मुराकामीही नाही. चक पालानकसारखा लेखकही बराच कन्सिस्टन्ट लिहितो. ग्राफिक नॉव्हेल्समध्ये ॲलन मूर आहे, एड्रिअन टोमिने आहे, क्रिस वेअर आहे. डॅन ब्राऊन आता पाट्या टाकतो, असं वाटायला लागलंय. एके काळी मी जॉन ग्रिशमचं येईल ते पुस्तक घ्यायचो. आता त्याचा कंटाळा यायला लागला. मायकेल क्रायटनचा एके काळी डाय हार्ड फॅन असतानाही मी पुढे-पुढे त्याच्या पुस्तकांचं वाचन सोडलं होतं. 

मराठीत मी कविता महाजनांचं लिखाण नेमाने घ्यायचो. हृषीकेश गुप्ते, प्रणव सखदेव, अवधूत डोंगरे असे आताचे लेखक आहेत- ज्यांची पुस्तकं मी नियमित घेत राहतो. पण माझा मराठीचा बॅकलॉगही मोठा आहे. 1990 च्या सुमारास मराठी माध्यमातून इंग्रजीत गेल्यावर माझं इंग्रजी वाचन जे मोठ्या प्रमाणात सुरू झालं, त्याने माझी मराठीतलीही अनेक महत्त्वाची पुस्तकं वाचायची राहिली. तीही मी जमवून यथाशक्ती वाचत असतो. 

काही वेळा एखादा लेखक आपल्याला त्याच्या करिअरच्या मध्यावर माहित होतो. वा कधी कधी त्याचं लेखन संपल्यावरही. एच. पी. लवक्राफ्ट, रे ब्रॅडबरी, फिलिप के डिक, निक हॉर्नबी, पु.ल., विजय तेंडुलकर, नारायण धारप अशी किती तरी नावं असतील. मग त्यांची आपल्या नजरेतून आधी सुटलेली पुस्तकं घेत राहावी लागतात. त्यांना वाचनात कुठे तरी बसवावं लागतं. हे वाचनही मग वाढत जातं.  

या विशिष्ट लेखकांना गोळा करण्याबरोबर इतर जागा असतात. लेखांमध्ये ( किंवा फिक्शनमध्येही ) काही पुस्तकांचा उल्लेख असतो, ती घ्यावीशी वाटतात. आवडत्या लेखकांनी केलेली रेकमेन्डेशन्स असतात, घेऊन ठेवण्यासारखे संदर्भग्रंथ असतात, पुरस्कारप्राप्त पुस्तकं असतात. काही  वेळा रिव्ह्यू वाचनात येतात किंवा कधी कधी पुस्तकांच्या दुकानात वा ऑनलाईनही काही घेण्याचा मोह सुटत नाही. काही आपल्या खास आवडीचे प्रकार असतात. उदाहरणार्थ- ग्राफिक नॉव्हेल्स गोळा करण्याची मला बरीच हौस आहे आणि ती मी यथाशक्ती पुरी करतो. पण त्याचबरोबर जेव्हा ई-रीडर्समुळे पुस्तकांना धोका आहे असं बोललं जायला लागलं, तेव्हा प्रिन्ट फॉर्ममध्येच वाचण्याचा परिपूर्ण अनुभव येईल अशी पुस्तकं मी शोधायला लागलो. हाऊस ऑफ लीव्ह्ज, कोडेक्स सेराफिनीएनस, एस- अशी अनेक पुस्तकं यात मिळाली. हे सगळं अचानक सापडणारं. त्यामुळे ते वाचायच्या यादीत आधीपासून असणंच कठीण. 

ही सगळी पुस्तकं जेव्हा समोर येतात, तेव्हा ती सगळीच एका वेळी वाचायची इच्छा होते (याला अपवाद संदर्भग्रंथांचा. जे असणं आवश्यक असतं, पण ते वाचण्याची विशिष्ट वेळ असते. ते रुटीन वाचनात बहुतेक वेळा शिरत नाहीत), पण नक्की काय हातात घ्यावं- कळत नाही. यावर उपाय म्हणून मी बऱ्याचदा एकावेळी अनेक पुस्तकं वाचतो. पुस्तकं वाचायची तर प्रिन्टमध्येच, असं काही मला वाटत नाही. डीजिटल माध्यम, ऑडिओ बुक्स हे मार्गही आज उपलब्ध आहेत आणि ते वापरले, तर फायद्याचेच आहेत. मी तरी ते सगळे वापरतो. त्यामुळे एक-दोन पुस्तकं प्रिन्टमध्ये, एखादं किंडलवर, एखादं ऑडिओ बुक वॉकला जाण्याचा वा ड्रायव्हिंगचा वेळ सत्कारणी लावण्यासाठी- अशी माझी पद्धत आहे. आय पॅडचा स्क्रीन मी सहसा नॉर्मल ई-बुक्ससाठी वापरत नाही. कारण त्याच्या बॅटरीला मर्यादा असते आणि माझं बरंचसं लेखन मी आय पॅडवर करत असल्याने, ती बॅटरी तिथे सत्कारणी लावायची असते. तरीही काही वेळा कॉमिक्स मात्र मी आय पॅडवर वाचतो. ती किंडलवर काळी-पांढरी वाचण्यात मुद्दाच नसतो. आणि त्यांची चित्रं ही अनेकदा कागदापेक्षा टॅब्लेट्सच्या स्क्रीनवर अधिक उठून दिसतात. तरीही, प्रत्येक माध्यमात हातातलं संपल्यावर पुढलं कोणतं  घ्यायचं, हा प्रश्न उरतोच;  जो बहुधा हाताशी आलेल्या पुस्तकांना चाळूनच सोडवावा लागतो. 

सध्या मी ‘द इन्स्टिट्यूट’ आणि ‘तुंबाडचे खोत’ या दोघांचं सायमल्टेनीअस वाचन करत होतो. इन्स्टिट्यूट संपलं तरी खोत बरेच उरले आहेत. ते संपवायचे आहेत. ऑडिओ बुक्समध्ये ॲलेक्स मायकेलिडीसचं ‘द सायलेन्ट पेशन्ट’ अर्ध्यावर येऊन पोचलेलं आहे. सायलेन्ट पेशन्ट संपल्यावर मी बहुधा एड्रीअन मॅककिन्टीच्या डिटेक्टीव शॉन डफी सिरीजकडे परत जाईन. परत अशासाठी की, मालिकेतलं दुसरं पुस्तक ‘आय हिअर द सायरन्स इन द स्ट्रीट’ मी सहजच ऐकलं आणि मला ते आवडलं. वाचलं तेव्हा आयरिश पार्श्वभूमी असलेली ही पोलीस प्रोसिजरल कादंबरी एका मालिकेचा भाग असल्याची मला कल्पना नव्हती; पण आवडल्यावर बाकी पुस्तकं ऐकणं/ वाचणं क्रमप्राप्तच आहे. सायलेन्ट पेशन्टबद्दल खूप ऐकलं असल्याने ते मध्ये घुसलं, पण आता ते संपल्यावर बहुधा पुन्हा डफीकडे वळेन.

प्रिन्टमध्ये सेथचं ‘क्लाईड फॅन्स’ हे पाचेकशे पानांचं ग्राफिक नॉव्हेल वाचायला घेण्याचा इरादा आहे. आता हेच का, याला निश्चित उत्तर नाही. क्रिस वेअरचं ‘रस्टी ब्राऊन’ आणि सेथचं ‘क्लाईड फॅन्स’ ही दोन्ही माझ्या त्वरित वाचण्याच्या यादीत आहेत. दोन्ही गंभीर प्रकृतीची जाडजूड ग्राफिक नॉव्हेल्स आहेत पण तरीही मी क्लाईड फॅन्स आधी वाचणार आहे. वेअरची पुस्तकं थकवतात, कारण त्याच्या कामावरचा पगडा हा आधुनिक जाहिरातयुग, वेब डिझाईन, टेक्निकल ड्रॉइंग्ज आणि मॅन्युअल रायटिंग यासारख्या गोष्टींचा आहे. त्यामुळे त्याचं एकेक पान हे माहितीचा मारा घेऊन समोर येऊ शकतं. आयडिअली, त्याचं काम पाहता वाचताना दुसरं काही हातात नसेल तर बरं. सेथ हा त्या मानाने क्लासिकल आहे आणि आशयगर्भ असली तरी त्याची पुस्तकं अधिक सहजपणे आपल्यापर्यंत पोचणारी असतात. त्यामुळे त्याचा नंबर आधी. 

सेथचं खरं नाव ग्रेगरी गॅलन्ट, पण इंडी कॉमिक्सच्या जगात तो सेथ या नावानेच ओळखला जातो. ‘ड्रॉन ॲन्ड क्वार्टरली’ ही कॅनडास्थित प्रकाशनसंस्था त्याचं ‘पलुकाव्हील’ हे कॉमिकबुक प्रकाशित करते आणि त्यात त्याने क्रमशः लिहिलेल्या कथानकांना त्यांच्या मार्फतच पुढे प्रकाशित केलं जातं. मी त्याचं पहिलं पुस्तक पाहिलं ते ‘इट्स अ गुड लाईफ, इफ यू डोन्ट वीकन’. हे पाहिलं ते मला वाटतं, २००५/६ च्या सुमाराला. या दिवसांत गंभीर सुपरहीरोविरहित ग्राफिक नॉव्हेल्सशी आपला फार परिचय नव्हता. ऑनलाईन मार्केट ओपन झालं नव्हतं आणि क्रॉसवर्डमधल्या त्याच त्या पुस्तकांपलीकडे काही फार वेगळं मिळतच नसे. मुंबईत जेव्हा लॅन्डमार्क बुकस्टोअर उघडलं, तेव्हा त्यांच्याकडे या माध्यमातल्या पुस्तकांचं फार उत्तम कलेक्शन होतं. आपल्या माहितीच्या कॉमिक्सपलीकडेही काही वेगळ्या चित्रकथा असू शकतात, हा साक्षात्कार अनेक वाचकांना लॅन्डमार्कने घडवला. सेथचं ते पुस्तक मी घेतलं ते इथेच. 

समांतर कॉमिक्सच्या जगात आत्मचरित्रात्मक कथांची लाट १९९० च्या सुमाराला आली होती आणि हे पुस्तकही त्यातलंच होतं. सेथला न्यूयॉर्करमध्ये कार्टून्स छापून आलेल्या एका कार्टूनिस्टची माहिती काढताना कळतं की, दोघांचं मूळ गाव एकच आहे आणि सेथ त्याचा माग काढण्याचा प्रयत्न करतो- अशी त्याची कथा होती. कथेचा तपशील आत्मचरित्रात्मक होता, पण गोष्ट काल्पनिक होती. सेथची शैली आपल्या ओळखीच्या कॉमिक्सहून अगदीच वेगळी. मोनोक्रोमॅटिक, काही रंगाचा टिन्टसाठी वापर करत ब्लॅक ॲन्ड व्हाईटचाच आभास ठेवणारी. तो ठळक तपशील मांडतो, पण फार गिचमिड चित्र काढत नाही. लोक, इमारती काढायला त्याला आवडतं. त्याचं सगळं गाव हे नवं कोरं, आत्ता कागदावर अवतरल्यासारखं वाटत नाही, लिव्ह्ड इन वाटतं. या कथेत फार घटना नव्हत्या, ॲक्शन नव्हती, ट्विस्ट नव्हता. एखादी दीर्घ कथा शांतपणे सांगितल्याचा जवळजवळ साहित्यिक परिणाम करणारं हे पुस्तक. मी फारच खूश झालो. 

सेथबरोबरच ड्रॉन ॲन्ड क्वार्टरली हे प्रकाशन-स्वत: ग्राफिक नॉव्हेलिस्ट असणारे जो मॅट आणि चेस्टर ब्राऊन हे सेथचे दोन मित्र-यांचाही शोध मला या निमित्ताने लागला. त्यांचंही मी वाचायला लागलो. कादंबरीचा आवाका चित्रांमध्ये आणत आशयाला कुठे नेणं शक्य आहे, हे या पुस्तकांमधून समोर यायला लागलं. ही या माध्यमाची नवी ओळख होती. यानंतर मी सेथचं आणखी एक पुस्तक घेतलं, कॉमिक बुक कलेक्टर्सबद्दलचं विनोदी ‘विम्बल्डन ग्रीन’ आणि आता हे. क्लाईड फॅन्स लिहायला आणि इलस्ट्रेट करायला सेथने फारच वर्षांपूर्वी सुरुवात केली हे मला माहित होतं, आणि त्यातला काही भाग क्लाईड फॅन्स १ आणि २ या पुस्तकांमधून आल्याचंही माहित होतं, पण कथानक अपुरं होतं. ते पुरं कधी होणार याची प्रतीक्षा होती आणि मग अचानक मला मुंबईतल्या ‘वेवर्ड ॲन्ड वाईज’, या अनपेक्षित पुस्तकं मिळणाऱ्या दुकानात क्लाईड फॅन्सची पूर्ण जाडजूड एडिशन दिसली. 

ग्राफिक नॉव्हेल न वाचणाऱ्यांनी क्लाईड फॅन्समागची कल्पना ऐकली, तर ते लांब पल्ल्याचं कॉमिक बुक आहे यावर विश्वास बसणार नाही. ही १९३० च्या दशकापासून विसावं शतक संपेपर्यंतच्या काळात घडणारी, एका डबघाईला येत चाललेल्या व्यवसायाची आणि तो व्यवसाय चालवणाऱ्या दोन भावांची, एब आणि सायमनची गोष्ट आहे. व्यवसाय त्यांच्या वडिलांनी सुरू केलेला, एअर कंडिशनिंग कॉमन होण्याआधीचा, पंखेच तेजीत असतानाचा. पण काळाबरोबर पंख्यांची गरज पडेनाशी होते. दोघा भावांची प्रवृत्ती, बदलता काळ, बदलता समाज आणि कालबाह्य होत चाललेला व्यवसाय यांची ही शोकांतिका आहे. एका काळाची प्रातिनिधिक, पण उद्योगातल्या मानवी घटकाला न विसरणारी. 

मी पुस्तक वाचायला अजून सुरुवात केलेली नाही, पण अगदी शेवटी सेथने लिहिलेली एक पानी नोंद वाचलीय. त्याने या पुस्तकाची कल्पना आपल्याला कशी सुचली याबद्दल सांगताना म्हंटलंय की, पंचवीसेक वर्षांपूर्वी टोरॉन्टोमध्ये त्याला एक बंद ऑफिस दिसलं. व्यवसाय बंद झालेला होता, पण ऑफिस जागेवर होतं. नाव हेच, क्लाईड फॅन्स. काचेला नाक लावून त्याने आत पाहायचा प्रयत्न केला, तर काही टेबलं, फोन्स वगैरे सामान होतं. आणि भिंतीवर मध्यमवयीन दोन माणसांची पोर्ट्रेट्स. जे दिसलं, त्यापासून त्याने स्फूर्ती घेतली आणि नॉव्हेल आकार घ्यायला लागलं. त्याने सुरुवात केली तेव्हा त्याचा समज होता, हे आपलं दुसरं, ‘इट्स अ गुड लाईफ’ नंतरचं पुस्तक होईल. पण तो काम करत राहिला. मधे इतर पुस्तकं आली, याचा काही भाग प्रकाशित झाला, पण हातातलं काम संपेना. दहा वर्षं होऊन गेल्यानंतर त्यालाच कोणाशी यावर बोलायची लाज वाटायला लागली. कोणी विषय काढलाच, तर तोच टाळायला लागला. पण अखेर पुस्तक पुरं झालं- काम सुरू केल्यावर सुमारे वीस वर्षांनी. 

अशी पुस्तकं वाचण्यात गंमत असते- लेखन कालावधी मोठा असलेली. त्यात लेखकातला, चित्रकारातला बदल आपल्याला जाणवतो. स्टीव्हन किंगने महाविद्यालयीन काळापासून आता आतापर्यंत लिहिलेली डार्क टॉवर मालिका वाचताना हा लेखकात पडत गेलेला फरक दिसतो. सेथमधला बदलही तसा दिसेल, यात शंका नाही. नुसतं पुस्तक हातात घेतलं तरीही हे जाणवतं, आता नुसती सुरुवात करायची खोटी आहे. 

गणेश मतकरी
ganesh.matkari@gmail.com

(गणेश मतकरी हे कथाकार व चित्रपट समीक्षक आहेत.)

हेही वाचा : वाचन प्रेरणा दिवस विशेष 

रिकाम्या मुठीतली भुईकमळं – कल्पना दुधाळ

द अल्केमिस्ट: स्वप्नांवर विश्वास ठेवायला लावणारं पुस्तक – सानिया भालेराव

माझा पिंड पोसला गेला तो पुस्तकांवरच... – विभावरी देशपांडे

Tags: Apj Abdul Kalam birth annivarsary गणेश मतकरी वाचन प्रेरणा दिवस एपीजे अब्दुल कलाम जयंती Load More Tags

Comments:

Macchindra Rajguru

9987255280

देवेंद्र पचंगे

सुंदर लेख !

Add Comment