समुद्री कारस्थान : एक वास्तवपट

नेटफ्लिक्सवरील 'Seaspiracy' या माहितीपटाविषयी...

जाळ्यात अडकलेले ब्लूफीन ट्युना (फोटो सौजन्य: नेटफ्लिक्स )

मार्च 2021मध्ये नेटफ्लिक्सवर Seaspiracy म्हणजे ‘समुद्री कारस्थान’ नावाचा दीड तासाचा माहितीपट प्रदर्शित झाला आहे. या माहितीपटाच्या माध्यमातून जपान, थायलंड, हॉंगकॉंग, फ्रान्स, लायबेरिया आणि अशा वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यांवर आपण भ्रमंती करून येतो मात्र ही भ्रमंती आल्हाददायक नाही. उलट, या समुद्रकिनाऱ्यांवर चालणाऱ्या मासेमारीचा समुद्रावर, पर्यावरणावर आणि एकूणच आपल्या अस्तित्वावर काय परिणाम होतो आहे हे पाहणे, हा हादरवून टाकणारा अनुभव आहे. तरीही हे खरं आहे की बऱ्याचदा मन घट्ट करून बघावा लागणारा पण बघितलाच पाहिजे असा हा वास्तवपट आहे.        

या माहितीपटाचे दिग्दर्शन आणि चित्रीकरण अवघ्या 28 वर्षांचे ब्रिटिश फिल्ममेकर अली तबरिझी यांनी केले आहे. तर किप अँडरसन यांनी या माहितीपटाची निर्मिती केली आहे.

अली यांना लहानपणापासूनच समुद्राचे वेड होते आणि पृथ्वीवरचे 80 टक्के जीव ज्यात राहतात त्या भव्य समुद्राचे त्यांना सुंदर चित्रीकरण करायचे होते, मात्र पोटात प्लास्टीक गेल्यामुळे मृत देवमासे जेव्हा समुद्रकिनारी दिसू लागले तेव्हा अलींच्या कामाची दिशाच बदलली. डॉल्फिन्स (गादामासे) आणि व्हेल्स (देवमासे) हे फक्त हुशारच नसतात तर फायटोप्लॅंक्टन नावाच्या समुद्री वनस्पतीला ते खतही पुरवतात. विशेष म्हणजे या वनस्पती प्रचंड कार्बनडायॉक्साइड शोषून घेतात आणि आपल्याला लागणारा 85 टक्के ऑक्सिजन पुरवतात त्यामुळे डॉल्फिन्स आणि व्हेल्स वाचले नाहीत तर आपणही वाचणार नाही अशी स्थिती आहे.  

सध्या पंधरा कोटी टन प्लास्टीक समुद्रात तरंगत आहे आणि दरमिनिटाला एक ट्रक भरेल एवढे प्लास्टीक समुद्रात पडत आहे. त्याचे छोटे-छोटे तुकडे होऊन मायक्रोप्लास्टीक तयार होते. आपल्या आकाशगंगेत जेवढे तारे आहेत त्याच्या पाचशे पट मायक्रोप्लास्टीकचे तुकडे समुद्रात तरंगत आहेत. अशी सर्व माहिती लक्षात आल्यावर अली 'प्लास्टीक पोलीस' झाले. ते स्वतः नियमितपणे समुद्रकिनारे स्वच्छ करू लागले, प्लास्टीकचा वापर टाळू लागले, प्लास्टीकविरोधी संस्थांना देणगी देऊ लागले.   

कालांतराने अलींना समजले की, फक्त प्लास्टीकमुळेच देवमासे मरतात असे नाही तर त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकारही केली जाते. खरेतर देवमाशांच्या शिकारीला 1986पासून जागतिक पातळीवर बंदी आहे तरीही काही देशांत देवमाशांची शिकार होते. त्यात जपान आघाडीवर आहे. लहान मासे खाणारे हे प्राणी मारले म्हणजे मासेमारी उद्योगांना जास्त प्रमाणात मासे उपलब्ध होतात… हे त्यामागचे कारण असल्याचे आपल्याला या माहितीपटात समजते. याखेरीज ट्युना मासेमारीही खूप मोठ्या प्रमाणावर चालते. समुद्रातला चित्ता म्हणून ओळखला जाणारा वेगवान ब्लूफीन ट्युना सगळ्यांत महागडा मासा म्हणून प्रसिद्ध आहे. टोकियोत एक ब्लूफीन ट्युना तीस लाख डॉलर एवढ्या प्रचंड किमतीला विकला जातो. आजघडीला ब्लूफीन ट्युनाची संख्या 3 टक्क्यांहूनही कमी उरली आहे. तर जगात सर्व प्रकारच्या ट्यनांची मिळून सुमारे बेचाळीस अब्ज डॉलर्सची उलाढाल चालते आणि या व्यवसायात जपानमधली मित्सुबिशी ही सर्वांत अग्रेसर अशी कंपनी आहे. अर्थातच मित्सुबिशीच्या लोकांनी अलींशी बोलायला नकार दिला.

शार्क माशांचीही मोठ्या प्रमाणावर कत्तल होते. शार्क मारून त्यांचे पर कापतात आणि ते आशिया खंडात, मुख्यतः चीनमध्ये विकले जातात. तिथे या शार्कच्या परांचे महागडे सूप पिणे प्रतिष्ठेचे मानले जाते. खरेतर या सूपमध्ये ना काही पोषणमूल्य असते ना विशेष चव पण केवळ प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे शार्क कत्तलींचा अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय जोरात सुरु आहे. विरोधाभास असा कि वर्षाला सरासरी 10 माणसे शार्कमुळे मरतात पण माणूस ‘दरतासाला’ सुमारे 11 हजार ते 30 हजार शार्क माशांची शिकार करतो. समुद्रात शार्क असण्यापेक्षा शार्क नसणे हे कसे जास्त धोकादायक आहे आणि शार्कमुळे प्रवाळ कसे जगतात हे या माहितीपटात पाहायला मिळते.

व्हेल, डॉल्फिन, समुद्रपक्षी आणि शार्क इत्यादी माशांची संख्या कमी होण्याचे आणखी एक कारण असल्याचे अलीच्या लक्षात आले. यांतले बरेचसे मासे सह-मासेमारीत मरतात. सह-मासेमारी म्हणजे इतर मासे पकडताना जाळ्यात हे व्हेल, शार्क इत्यादी मासे अडकतात आणि समुद्रात पुन्हा फेकेपर्यंत मरून जातात. शार्क माशाच्या शिकारीचा जो आकडा दिला आहे त्यातले निम्मे शार्क सह-मासेमारीत मरतात आणि कचरा म्हणून लगेचच उलटे समुद्रात फेकले जातात. एकूणच मासेमारीच्या उद्योगात मासे पकडल्यानंतर 40 टक्के मासे निरुपयोगी म्हणून उलटे पाण्यात फेकून देतात. पाण्यात जाईपर्यंत ते मरून गेलेले असतात. ही सह-मासेमारी म्हणजे आपल्या दृष्टीआडचे बळी आहेत. हे अपघात नसतात. 

सह-मासेमारी  रोखायला कायदे अस्तित्वात आहेत पण जगभर तब्बल 46 लाख शक्तिशाली बोटींद्वारे औद्योगिक मासेमारी केली जाते. त्यांच्यावर लक्ष ठेवणे इतके कठीण आहे की, देशोदेशींच्या सरकारांनी हा प्रश्न वाऱ्यावरच सोडून दिला आहे… सी शेफर्डसारख्या सामाजिक संस्था यथाशक्ति प्रयत्न करतात पण त्यांची शक्ती मर्यादित आहे. लोकांना माहीत नसते की, ते जेव्हा मासे खातात तेव्हा त्यासाठी डॉल्फिन्स मारले जातात. ‘डॉल्फिन सुरक्षित ट्युना‘ असे लेबल लावून जगभरात बऱ्याच ठिकाणी मासेविक्री होते पण प्रत्यक्षात ती कशी मोठी फसवणूक आहे आणि नुसते असे लेबल विकून लोक कसे पैसे कमवतात ते या माहितीपटात विस्ताराने दाखवले आहे. थोडक्यात म्हणजे आपण मासे खाणे हेसुद्धा शार्क, व्हेल यांची शिकार करण्यासारखेच आहे. याखेरीज कोळंबी पकडण्याच्या या उद्योगात थायलंडमध्ये कशा तऱ्हेने माणसांची गुलामी अबाधित आहे आणि सध्या मिळते तेवढी स्वस्त कोळंबी या गुलामीखेरीज मिळाली नसती हे विदारक सत्यही यांतून दाखवले  आहे.

काही संघटना समुद्रातल्या प्लास्टीकबद्दल कार्यरत आहेत पण त्याही समुद्रातल्या मासेमारीच्या जाळ्यांवर मौन बाळगून आहेत. वास्तविक समुद्रातल्या प्लास्टीकमध्ये 46 टक्के प्लास्टीक हे मासेमारीचे जुने साहित्य आणि वापरून झालेली जाळी हेच आहे… शिवाय माशांना मारण्यासाठीच हे साहित्य आणि जाळ्या तयार केलेल्या असल्याने प्लास्टीक बाटल्या-पिशव्यांपेक्षा ते जास्त घातक आहे. अलींनी समुद्रातल्या प्लास्टीकवर काम करणाऱ्या संस्थांची भेट घेऊन याबाबत विचारणा केली पण या प्लास्टीक जाळ्यांविरोधी भूमिका घ्यायला ते लोक तयार झाले नाहीत. नंतर अलींनी शोधून काढले की, हे लोक मोठमोठ्या मत्स्यउद्योगांबरोबर कशा तऱ्हेने काम करतात. त्यांचे हितसंबंध कसे गुंतलेले आहेत हे सारे या माहितीपटात दाखवलेले आहे.  

प्लास्टीकइतकीच महत्त्वाची समस्या औद्योगिक मासेमारी आहे. पूर्वी छोटे-छोटे नावाडी जशी मासेमारी करत तशी ती आता उरली नाही. त्याचा भयानक, अकराळविकराळ उद्योग झाला आहे आणि त्याने छोट्या, स्थानिक कोळ्यांच्या पोटावर पाय दिला आहे. आधुनिक उद्योग मोठे ट्रॉलर्स वापरतात. ट्रॉलर म्हणजे समुद्राच्या तळापर्यंत जाळे ओढत नेणारी बोट असते. ट्रॉलरचे सगळ्यात मोठे जाळे एवढे मोठे असते की, त्यात तेरा मोठी विमाने मावतील. हे जाळे समुद्राचा तळ घासत जाते आणि त्यातून काही म्हणजे काही वाचत नाही. हे म्हणजे जंगलातून बुलडोझर फिरवल्यासारखे भयंकर आहे आणि मासे खाणाऱ्या माणसाला याचा पत्ताच नसतो.

जगभरात साधरण सत्तावीसशे अब्ज मासे दरवर्षी पकडले जातात म्हणजेच पन्नास लाख मासे दरमिनिटाला मारले जातात हे असेच सुरू राहिले तर 2048पर्यंत जवळजवळ सगळे मासे संपतील आणि समुद्र मृत होऊन जाईल आणि मग आपले अस्तित्वही धोक्यात येईल. खरंतर समुद्री वनस्पतींमुळे जगातला 93 टक्के कार्बनडायॉक्साइड समुद्रात खेचला जातो, त्या वनस्पतींचाही आता वेगाने नाश होतो आहे. पर्यावरण कार्यकर्त्यांनी आणि संस्थांनी हा विषय प्राधान्याने घ्यायला हवा. समुद्र जगवायचा असेल तर त्याच्या वाटेला जाऊ नका, मासे खाऊ नका असे अली आणि इतर तज्ज्ञ या माहितीपटात वारंवार सांगतात.     

काही लोक शाश्वत मासेमारीबद्दल सुचवतात पण ‘शाश्वत मासेमारी’ असे काही नसतेच आणि कुठला मासा वैध मार्गाने मारला आहे आणि कुठला नाही हे कळायला काहीच मार्ग नाही हे अली दाखवून देतात. शाश्वत मासेमारी करून मासे खावेत इतके मासेच समुद्रात नाहीत म्हणून मासे न खाणे, मागणी कमी करणे हाच उत्तम उपाय असल्याचेही ते सांगतात. काही जण मत्स्यशेतीचा उपाय सुचवतात. हा प्रकार अवैध नाही, यात सह-मासेमारी नाही, समुद्राच्या तळाची हानी नाही म्हणून हा उपाय वरकरणी चांगला आणि शाश्वत वाटतो पण मत्स्यशेतीतल्या माशांना खाद्य म्हणून वाळवलेले मासेच देतात. एक किलो साल्मन मासा वाढवायला एक किलो दोनशे ग्रॅम सुके मासे लागतात. ते मासे औद्योगिक मासेमारीतूनच येतात… म्हणजेच मत्स्यशेती ही छुपी मासेमारी आणि छुपा विनाश आहे.

माणूस जे मासे खातो त्यातले 50 टक्के मासे अशा मत्स्यशेतीतून म्हणजेच समुद्रातल्या ठिकठिकाणच्या पिंजऱ्यांमध्ये कोंबलेल्या हजारो माशांमधून येतात. या मत्स्यशेतीत मासे गर्दीत, स्वतःच्या विष्ठेत फिरत राहतात; त्यांना वेगवेगळ्या रोगांची लागण होते; अंगावर समुद्री उवा होतात. माशांच्या शरीरात मज्जासंस्था असते. त्यांना भीती वाटते, वेदना होतात, त्यांचेही सामाजिक जीवन असते. या कशाचीही तमा न बाळगता त्यांना क्रौर्याने कसे हाताळतात ते यात उत्तमरीत्या दाखवले आहे.

…पण आपण तर नेहमी ऐकतो की, पोषक आहारासाठी मासे खायला हवेत मग मासे नाही खाल्ले तर कशाकशाची उणीव भासेल? माहितीपटातल्या डॉक्टरांचे उत्तर थक्क करणारे आहे. ते सांगतात की, विषारी पारा, प्लास्टीकचे अगदी बारीक तुकडे आणि इतर प्रदूषक गोष्टींची नक्की उणीव भासेल. सध्याच्या काळात माशांमधून मिळणाऱ्या पोषक घटकांपेक्षा प्रदूषित गोष्टींमुळे होणारा तोटाच जास्त आहे. खरे म्हणजे ओमेगा-3 फॅटी ॲसिड पोटात जावे म्हणून मासे खाणे चांगले असे मानले जाते पण हे ॲसिड मासे तयार करत नाहीत. पाण्यातल्या एका प्रकारच्या शेवाळ्यात ते तयार होते आणि मासे ते शेवाळ खातात; म्हणून ते माशांमध्ये असते. मग सरळ समुद्री वनस्पतींपासून तयार होणारे प्रतिमांसाचे पदार्थच का खाऊ नयेत? चवीला माशासारखेच लागणारे, आरोग्यासाठी जास्त चांगले आणि पर्यावरण-स्नेही असे हे पदार्थ उपलब्धही आहेत. त्यामुळे समुद्र वाचवायला आपल्याला स्वतःपासून सुरुवात करायची असेल तर मासे खाणे बंद केले पाहिजे, हेच खरे.

हा वास्तवपट पाहताना काही दृश्ये अंगावर येतात. व्हेल माशांच्या मोठ्या प्रमाणात शिकारी करून रक्ताळलेले लाल-लाल पाणी, शार्कच्या प्रेतांचा खच, त्यांचे सपासप कापले जाणारे पर आणि हा उद्योग चालवणाऱ्यांची दहशत बघून पृथ्वीवरचा सर्वांत भयंकर व संहारक प्राणी कोण आहे ते स्वच्छ दिसू लागते. अली तबरिझी यांनी बऱ्याचदा जीव धोक्यात घालून चित्रीकरण केले आहे. आपल्या सगळ्यांचे डोळे उघडण्याचे अमूल्य काम त्यांनी अत्यंत कळकळीने केले आहे. किनारे स्वच्छ करणे, प्लास्टीक न वापरणे आणि मुख्य म्हणजे मासे न खाणे यांतूनच आपण त्यांचे खरे आभार मानू शकतो.

- प्राजक्ता महाजन
mahajan.prajakta@gmail.com

Tags: माहितीपट नेटफ्लिक्स प्राजक्ता महाजन मासेमारी समुद्री जनजीव seaspiracy documentary netflix prajakta mahajan Load More Tags

Add Comment

संबंधित लेख