स्त्री मुक्तीच्या विपर्यस्त कल्पना 

स्त्री चळवळीची सामाजिक परिणामकारकता आणि युवा भान प्रकल्पावरील लेखमाला : 5/12

indianexpress.com

स्त्रीला भेडसावणारी असुरक्षितता, तिच्यावर होणारे शारीरिक/लैंगिक अत्याचार हा प्रश्न अजूनही स्त्री चळवळ नीटशी सोडवू शकलेली नाही. याचे कारण मुळात हा प्रश्न स्त्रीचा नसून पुरुषश्रेष्ठत्वामधून उगम पावणारा आहे. तरीसुध्दा तो स्त्रीचा आहे असे भासवून सतत तिच्याकडे टोलवण्यात येतो. जोपर्यंत समाज स्त्रीवरील अत्याचारांची नैतिक जबाबदारी अत्याचार करणाऱ्यावर टाकत नाही, तोपर्यंत ही समस्या राहणारच. विशाखा समित्या, POSH सारखे कायदे, मी टू सारखी चळवळ या मलमपट्ट्या आहेत, त्याने अजूनतरी रोगनिर्मूलन साध्य झालेले नाही, हे दुर्दैवी सत्य आहे. 

तुमच्या बरोबर वावरणाऱ्या कुटुंबातील, ऑफिसमधील किंवा मित्रपरिवारातील स्त्रियांच्या वर्तणुकीतील काय खटकते असा एक प्रश्न सर्वेक्षणादरम्यान विचारण्यात आला होता. त्यावर दोन युवकांनी आणि दोन तरुणींनी सांगितले की, स्त्रिया स्त्रीमुक्तीच्या नावाखाली दारू पितात, ड्रग्ज घेतात, त्याविषयी अभिनिवेशाने बोलतात, त्यांच्या मुक्तीच्या कल्पना पटत नाहीत.

पूर्वी व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये मुख्यत्वे पुरुषांची बहुसंख्या असे, आता स्त्रियापण दिसतात. यावरून स्त्रियांमध्ये व्यसनाधीनता सुरु झाली आहे, हे स्पष्टच दिसते आहे. आपल्या उत्तरदत्यांमधील एक तरुण असेही म्हणाला की, “मुली व्यसनं करतात, ती काही स्त्रीमुक्ती नाही. त्याला विरोध म्हणून पुरुषांच्या बाजूनी सेक्शुअल हरॅसमेंट, डोमेस्टिक व्हॉयलन्स होतो.” या वाक्यामध्ये पुरुष स्त्रीवर अत्याचार करतात त्याचे कुठेतरी समर्थन आहे असे वाटते. म्हणून आधी वरील तरुणाच्या युक्तिवादाचा परामर्श घेऊ. त्यानंतर स्त्रियांमधील मुक्तीच्या चुकीच्या कल्पनांवर उहापोह करूच.

स्त्रियांची स्त्रीमुक्तीची कल्पना पटण्या, न पटण्याचा पूर्ण अधिकार पुरुषांना आहे. न पटलेला विचार खोडून काढण्याचाही अधिकार त्यांना आहे. पण स्त्रीचे वागणे पटत नाही, म्हणून तिला शिक्षा करण्याचा, तिचा लैंगिक छळ करण्याचा किंवा तिच्यावर कौटुंबिक अत्याचार करण्याचा अधिकार पुरुषाला नाही. स्त्रीचे वागणे आवडत नसेल, तर तिच्यापासून दूर राहण्याचा पर्याय असतो आणि तोच योग्य आहे. तिला बदडून काढण्याचा, तिच्यावर बलात्कार करण्याचा किंवा तिला मारून टाकण्याचा अधिकार कुठल्याच पुरुषाला, कुठल्याच कारणास्तव नाही. मुलींनी जीन्स घातलेले आवडत नाही म्हणून कॉलेजच्या प्रवेशद्वारावर उभे राहून त्यांच्या पायावर ब्लेड मार, मुली पबमध्ये गेलेल्या पटत नाही म्हणून तेथून बाहेर पडणाऱ्या तरुणींना लाथाबुक्क्यांनी झोडपून काढ अशा प्रकारांना अधून-मधून ऊत येत असतो. मारझोड करणाऱ्या मुलग्यांनी त्या मुलींना पूर्वी कधी बघितलेलेपण नसते. तरीसुध्दा समस्त स्त्रीवर्गाने मला पटेल तसेच वागावे आणि न वागल्यास त्यांना धडा शिकवण्याचा निसर्गदत्त अधिकार आपल्याला आहेच, हा समज काही पुरुषांमध्ये असतो. अशा वृत्तीचे पुरुष स्वत:च्या कुटुंबातील स्त्रियांना तर दहशतीखाली ठेवतातच, पण त्रयस्थ स्त्रीवरसुध्दा मुजोरी करतात.

दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर शहरातील एका तरुणाने स्वत:च्या धाकटया बहिणीला तिने टी शर्ट-पँट्स घातलेले त्याला आवडत नाही म्हणून जीवे मारले. त्यानंतर लगेच राजस्थानमधून बातमी आली की, बायकांनी नोकरी करणे पटत नाही म्हणून एका खेड्यात एका पुरुषाने कामावर निघालेल्या एका अपरिचित स्त्रीला ठार केले. आपल्या सर्वेक्षणात सहभागी झालेली एक तरुणी म्हणालीच की, ‘पूर्वी स्त्रीवर अत्याचार फक्त तिच्या निकटच्या कुटुंबियांकडून व्हायचे. आता ती रस्त्यावरच्या कुठल्याही अपरिचित पुरुषाच्या रोषाला बळी पडू शकते.’  

स्त्रीसाठी काय योग्य-अयोग्य हे आम्ही ठरवणार हा दंभ अजूनही टिकून आहे आणि आमच्या कल्पना धुडकावणाऱ्या स्त्रीला आम्ही शासन करणार हा अधिक भयंकर उन्मत्तपणाही टिकून आहे. स्त्री शिक्षण पटत नाही, म्हणून शाळकरी मुलींवर गोळीबार करण्याच्या घटना याच उन्मत्तपणातून घडतात. त्या दूरवरच्या देशांत घडतात, पण त्याच्या सौम्य आवृत्ती आपल्याही आजूबाजूला बघायला मिळतात. अविवाहित किंवा विनाविवाह सहजीवन स्वीकारलेल्या स्त्रीला घर भाड्याने द्यायचे नाही, दिलेच तर रात्री-अपरात्री तिच्या दारावरची बेल वाजवायची, लग्नानंतरही स्त्रीने पूर्वीचेच आडनाव ठेवले, तर तिचा पगार अधूनमधून मुद्दाम तिच्या सासरच्या आडनावाने काढून तिला मनस्ताप द्यायचा, बाळंतपणाच्या रजेच्या वेळी किंवा इस्पितळाच्या खर्चाचा परतावा देताना कागदपत्रांवरून शक्य तेवढी अडवणूक करायची असे प्रकार अधूनमधून घडत असतात. दोनशे वर्षांपूर्वी, ज्या पुणे शहरात फुले दाम्पत्याने मुलींसाठी पहिली शाळा काढली, त्याच शहरात स्त्री शिक्षणाचा विचार अमान्य म्हणून काही सनातन्यांनी छकुली घोले या 6 वर्षांच्या बालिकेला काचा कुटून खायला घातल्या आणि त्यात तिने जीव गमावला हा इतिहास आहे. 21व्या शतकातही काही मुठभर लोक त्याच हुकुमशाही वृत्तीने वागताना आढळून येतात. फरक फक्त तपशिलात पडला आहे. पूर्वी स्त्रीने शिकणे अमान्य होते. आता तिने अर्थार्जन करणे, पाश्चात्य पद्धतीचे कपडे घालणे किंवा बारमध्ये जाणे अमान्य म्हणून तिला ठार केले जाते.

एकदा एक पेशाने इंजिनिअर मुलगी माझ्या गावी असलेल्या घरात एकटीच भाड्याने राहत होती. तेथे तिचे एक वर्ष ठीक गेले. नंतर तिचे लग्न ठरले. लग्नाला दोन महिने राहिलेले असताना तिच्या होणाऱ्या नवऱ्याची बदली नेमकी त्याच गावात झाली. या मुलीचे घर होतेच म्हणून तो तिच्या बरोबर राहू लागला. त्या आधी तिने ही घडामोड माझ्या कानावर घालून माझी परवानगी घेतली होती. परंतु लग्नाआधी ते एकत्र राहतात यावरून इमारतीतील इतर अस्वस्थ झाले. मला फोनवर फोन सुरु झाले. अशा मुलीमुळे आमच्या मुलांवर वाईट संस्कार होतील, तिला घरातून काढून टाकावे यासाठी माझ्यावर दबाव आणणे सुरु झाले. त्याच गावात राहणाऱ्या माझ्या भाच्याकडे जाऊन त्यालाही तशी गळ घालून झाली. आम्ही दोघांनी त्यास नकार दिल्यावर इमारतीतील काही रहिवाशांनी आपल्या मुलांना या मुलीविरुद्ध भडकवण्यास सुरुवात केली. तिच्या स्कूटरची हवा सोड, टायरमध्ये खिळे ठोक, तिच्या सदनिकेच्या नळाची जोडणी तोड, ती ऑफिसमधून आली की तिच्या नावाने काहीतरी अचकट विचकट बोल असे उद्योग अगदी 10-12 वर्षांच्या मुलांनी सुरु केले. त्यास त्यांच्या पालकांची फूस होतीच. अखेरीस त्या मुलीने वैतागून ऐन लग्नाच्या गडबडीत घर सोडण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा : स्त्रियांचा वर्ग आणि चार्वाक - सुरेश द्वादशीवार


आपल्या मुलांवरील संस्कारांची काळजी वाहणाऱ्या एकाही पालकाला वाटले नाही की, आपण आपल्या मुलांना एका स्त्रीची नाचक्की करायला आणि तिचा छळ करायला शिकवत आहोत, हेपण वाईटच संस्कार आहेत. विशेष म्हणजे तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या केसालाही त्यांनी धक्का लावला नाही. त्याच्या मोटरबाईकचे नुकसान केले नाही की कधी त्याला टोमणे मारले नाहीत. तोपण लग्नाआधीच भावी पत्नीबरोबर राहत होता. पण सगळी बंधने स्त्रीसाठी असतात, पुरुषासाठी नाही. या मुलीला जणू तिचे शेजारी दाखवून देत होते की, स्त्रीला तिच्या स्वत:च्या नाही, तर ‘त्यांच्या’ चूक-बरोबरच्या कल्पनेनुसारच जगावे लागेल, अन्यथा तिला सळो की पळो करण्याचा अधिकार त्यांना आहे.

स्त्रीची जगण्याची पध्दत आवडत नाही, हे समजू शकते परंतु त्याला विरोध म्हणून पुरुषांच्या बाजूनी सेक्शुअल हरॅसमेंट, डोमेस्टिक व्हॉयलन्स होतो, हे स्पष्टीकरण समर्थनीय होऊ शकत नाही. शिवाय स्त्रीचा मानसिक/लैंगिक/शारीरिक छळ करण्यासाठी तिच्या वर्तणुकीची सबब लागतेच असे नाही. दप्तर पाठीवर टाकून शाळेला निघालेल्या मुलीवर बलात्कार होतो, दारू पिऊन आलेला नवरा झोपलेल्या बायकोला मारहाण सुरु करतो, तेव्हा तिची वर्तणुक हा मुद्दाच नसतो. हिंसेचा उगम हिंसा करणाऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेत असतो, समोरच्या व्यक्तीच्या वर्तणुकीत नाही. ते तसे असते, तर प्रत्येक घरात प्रत्येक जण एकमेकांना मारत सुटला असता. कारण प्रत्येकाचे कधी ना कधी, काही तरी चुकतेच.

राहिला प्रश्न स्त्रियांनी मुक्तीच्या नावाखाली व्यसने करण्याचा आणि बेबंद वागण्याचा. त्यामागे काही कारणे सांस्कृतिक आहेत, तर काही वैयक्तिक.

चार भिंतींच्या आड कोंडलेल्या आई-आजी-पणजीचे जीवन आधुनिक स्त्री नाकारू लागल्यावर पुरुषासारखे जगणे, हाच पर्याय तिला उपलब्ध होता आणि ती काही प्रमाणात पुरुषाचे अनुकरण करू लागली. याचे कारण उंबरठ्याबाहेरच्या जगात शिक्षण, कला, रोजगार या सर्व क्षेत्रांना पुरुषाने त्याच्या सोयीनुसार आधीच आकार देऊन झालेला होता. त्यामुळे तेथील नियम पाळूनच तिला घराबाहेरील क्षेत्रांत स्वत:चे स्थान निर्माण करावे लागले. अगदी आजही कॉर्पोरेट जगतात कार्यक्षमता, यश-अपयश, सुप्रशासन, सुव्यवस्थापन यांच्या व्याख्या पुरुषाच्या दृष्टिकोनातून ठरतात आणि स्त्रियांना त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागते. घराबाहेरील जगात जेव्हा यशाचे आणि कार्यक्षमतेचे निकष पुरुषकेंद्री असतात, तेव्हा मौजमजा करण्याचे, सुट्टी घेण्याचे, स्वातंत्र्य उपभोगण्याचे निकषसुध्दा पुरुषाच्या दृष्टिकोनातूनच ठरतात. एखादा प्रकल्प यशस्वी झाला, की दारूची बाटली उघडणे, बीअर मागवणे, किंवा सुट्टीच्या दिवशी मित्रांनी मिळून कुठेतरी बाहेर जाऊन दारूची बैठक जमवणे, कंपनीमध्ये एखाद्या बिझिनेस डीलसाठी रात्रीचे जेवण ठेवणे इत्यादी.

पुरुषाच्या जगात शिरकाव करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवलेल्या स्त्रीने त्याच जगाचे मौजमजेचे मार्गपण स्वीकारले. म्हणूनच आज काही स्त्रिया दारू पितात, ड्रग्ज घेतात आणि त्याचा संबंध मुक्तीशी जोडतात. तसा तो जोडतात, म्हणून त्याविषयी अभिनिवेशाने बोलतात. त्यांनी जर दारू आणि ड्रग्जचे सेवन वैयक्तिक आवड म्हणून केले असते, तर त्याची सांगड मुक्तीशी घातली नसती आणि त्याविषयी त्या उन्मेखून बोलल्यापण नसत्या.

नव्याने मिळवलेली गोष्ट मिरवण्यात मोठेपणा वाटणे हा मनुष्यस्वभाव आहे. तरूण मुली बारमध्ये जाऊन दारू पिण्याविषयी, लैंगिक स्वातंत्र्य घेऊन स्त्री-पुरुष संबंधांविषयी अभिनिवेशाने बोलताना आढळतात याचे कारण त्याचे त्यांना अप्रूप वाटते. अगदी तटस्थपणे विचार केला तर अशा गोष्टी आपण करू शकतो याचा त्यांना सुप्त अभिमान वाटणे स्वाभाविकही आहे. कारण हे करण्याआधी त्यांना उच्च शिक्षण, अपारंपरिक क्षेत्रांत शिरकाव, हे प्रयत्नपूर्वक साध्य करावे लागलेले असते व त्यासाठी रूढी-परंपरा तोडाव्या लागलेल्या असतात, जुन्या विचारांच्या कुटुंबीयाशी झगडावे लागलेले असते. एका परीने त्यांच्यासाठी तो कमी-अधिक तीव्रतेचा स्वातंत्र्यलढाच असतो. तो जिंकून त्या आर्थिक स्वातंत्र्याचा सोपान चढून आलेल्या असल्याने त्याविषयी त्यांच्या मनात कृतकृत्यतेची भावना मनात असणे अस्वाभाविक नाही.

येथे मला सुप्रसिध्द फ्रेंच विदुषी सिमोन द बोव्हुआने स्वत:विषयी काढलेले उद्गार आठवतात. ती आपल्या आत्मचरित्रात म्हणाली आहे की, सर्बोन विद्यापीठात तत्त्वज्ञान या विषयातील पदवीपरीक्षेत ती पहिल्या तिनांत आली, त्यानंतर स्वबळावर दूरच्या एका गावातील महाविद्यालयात तत्त्वज्ञानाची अध्यापिका म्हणून नोकरी मिळवली. त्याविषयीचे पत्र हातात घेऊन ती विद्यालयाच्या पायऱ्यांवर उभी असताना तिचा उर अभिमानाने फुलून आला व मनातल्या मनात ती म्हणाली, “एखाद्या तरुण पुरुषाला या कामगिरीचे काहीच वाटणार नाही. पण एका तरूण स्त्रीसाठी तत्त्वज्ञान या विषयात विशेष प्राविण्य मिळवणे, लग्न करण्यासाठीच्या दबावाला बळी न पडता नोकरी करणे, त्यासाठी आप्तस्वकीयांचा रोष पत्करणे, परक्या गावात येऊन स्वत: स्वत:ची आर्थिक घडी बसवणे ही मोठीच कामगिरी असते.” अशीच काहीशी भावना आज कॉर्पोरेट जगतात काम करणाऱ्या तरुण मुलींचीसुध्दा असू शकते. त्यांना ठाऊक असते की, लोकप्रवादाची भीती झुगारून देऊन स्वत:ला आवडेल ते करण्याचा अधिकार तिने स्वकष्टाने मिळवला आहे. त्याचे काही तरुणींना अप्रूप वाटणार यात अस्वाभाविक असे काही नाही. त्यात त्या किती वाहवत जाणार आणि कधी त्यातून सावरणार, हे व्यक्तिगणिक बदलणार. गर्भश्रीमंत ज्याचा उल्लेखही करत नाहीत, तेच नवश्रीमंत अभिमानाने मिरवताना दिसतात तसेच काहीसे हे आहे. स्त्रीमुक्तीची फळे चाखणारी आताशी कुठे पहिली, काही ठिकाणी फार तर दुसरी पिढी आपल्या देशात दिसू लागली आहे. आपण समजतो आहोत तो मुक्तीचा मार्ग शाश्वत विकासाचा आहे, की भ्रामक प्रगतीचा आहे, यावर मंथन होण्याइतका अवकाश या चळवळीला आणि तिच्या लाभार्थींना मिळालेला नाही. जसजशी ही चळवळ प्रगल्भ होत जाईल, तसतशी मुक्तीची अनेक खरी आणि लटकी रूपं ती समोर आणेल. हे काम मुख्यत्वे चळवळीच्या अभ्यासकांना, वैचारिक नेतृत्वालाच करावे लागेल. कारण मुक्तीच्या मार्गातील काटे आणि धोकादायक वळणे अनुभवाला जरी आली, तरी त्यावर सर्व बाजूंनी विचार करून काही एक सैद्धांतिक माडणी करण्याची क्षमता स्त्री चळवळीच्या प्रत्येक लाभार्थीमध्ये असेलच असे नाही.

मिळालेले स्वातंत्र्य कशासाठी आणि किती प्रमाणात वापरायचे हा वैयक्तिक निर्णय असतो. आणि तो निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला असते. पुरुष स्वातंत्र्य गृहीत धरतात. त्यांतील काही जण विनासायास मिळालेले स्वातंत्र्य वाया घालवतात किंवा त्याचा दुरुपयोग करतात. त्याची त्यांना व्यक्तिगत जीवनात किंमतही मोजावी लागते. स्त्रीपण माणूस आहे. जसा पुरुष स्खलनशील असतो, तशी स्त्रीपण स्खलनशील असते. फरक इतकाच की, स्त्रीला स्वातंत्र्य गृहीत धरता येत नाही, मिळवावे लागते. पण महत्प्रयासाने मिळवलेले स्वातंत्र्य पेलायलासुध्दा प्रयासच करावे लागतात. ते सर्वांना जमतात असे नाही. ज्यांना नाही जमत, ते भरकटतात. त्यात जसे पुरुष असतात, तसेच स्त्रियापण असतात.

चळवळीने मांडलेल्या भूमिकांचे व्यवहारात पडणारे प्रतिबिंब अभ्यासून भूमिकेत काय बदल करणे गरजेचे आहे, हे सांगण्याचे काम सतत सुरु असते. उदाहरणार्थ, पश्चिमी राष्ट्रांत स्त्रीमुक्ती चळवळीचा तिसरा टप्पा सुरु आहे. तिच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे साधारण 1960-70 या दशकांत लैंगिक क्रांतीचा टप्पा सुरु होता. विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या स्त्रीमुक्तिवादी स्त्रिया लैंगिक स्वातंत्र्याचा मुद्दा केंद्रस्थानी मांडत होत्या, आचरणातही आणत होत्या. पण 30-40 वर्षांनी त्यातील अनेक जणी त्यांच्या लैंगिक स्वातंत्र्याच्या भूमिकेचा फेरविचार करू लागल्या. ती भूमिका स्त्रियांच्या हिताची किती होती आणि त्रासदायक किती ठरली, याचा लेखाजोखा त्या मांडू लागल्या. ग्लोरिया स्टायनम या त्या काळापासून लेखन करणाऱ्या अत्यंत प्रसिध्द स्त्रीवादी लेखिकेने विषादाने म्हटले की, ‘लैंगिक क्रांतीने स्त्रियांना फार काही मिळवून दिले नाही, पण अधिक पुरुषांना, अधिक वेळा, अधिक संख्येने स्त्रिया उपलब्ध करून दिल्या.’ तिचे हे वाक्य कमालीचे कडवट आहे. कारण 80 आणि 90च्या दशकांमध्ये अल्पवयीन कुमारी मातांच्या प्रश्नाने पाश्चात्य देशांत उग्र रूप धारण केले. अनेक राष्ट्रांत गर्भपात बेकायदेशीर असल्याने जेमतेम विशीत पदार्पण करणाऱ्या लाखो स्त्रियांवर नको असलेले मूल जन्माला घालण्याची आणि त्याला वाढवण्याची सक्ती झाली. त्यात त्यांचे शिक्षण, अर्थार्जन आणि आरोग्य यांना जबरदस्त हानी पोचली. स्त्री चळवळीच्या अभ्यासक या वास्तवाकडे दुर्लक्ष करणे शक्यच नव्हते.

स्वातंत्र्य या संकल्पनेचा व्यवहारातील अविष्कार भोवतालातील स्वातंत्र्यविषयक संकल्पनांवर अवलंबून असते. पाश्चात्य देशांतील लैंगिक स्वातंत्र्याची चळवळ स्त्रियांनाच घातक ठरू लागली, याचे कारण त्या स्त्रियांच्या आजूबाजूला जे पुरुष वावरत होते, त्यांना स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्यात स्वत:चा फायदा दिसला. तो फायदा पदरात पाडून घेणाऱ्या, पण पारंपरिक विचारांनी स्त्रीकडे बघणाऱ्या पुरुषांनी नव्या विचारांनी लैंगिक व्यवहारात उतरलेल्या आधुनिक स्त्रीच्या नव्या जाणिवा जाणूनही घेतल्या नाहीत, मग त्यांचा आदर करणे तर दूरच. लैंगिक स्वातंत्र्याचा विचार स्त्रीस नुकसानकारक ठरण्याचे दुसरे कारण म्हणजे लैंगिक स्वातंत्र्याबरोबर स्वत:च्या शरीराचे रक्षण करण्याची जबाबदारी येते, तिच्याकडे स्त्रियांनी पुरेसे लक्ष दिले नाही. परिणामी कुमारी मातांच्या प्रश्नांनी गंभीर स्वरूप धारण केले. भरीला अनेक कॅथलिक राज्यांमध्ये गर्भपात बेकायदेशीर होता (अजूनही आहे) त्यामुळे तरुण मुलींना अवैध मार्गाने गर्भपात करून घ्यावे लागले. त्यात त्यांच्या प्रजनन आरोग्याचे अतोनात नुकसान झाले; पैसा गेला आणि मनस्ताप झाला ते वेगळेच. महाराष्ट्रातील स्त्रीवादाच्या एक अभ्यासक आणि लेखिका मंगला सामंत एकदा बोलताना म्हणाल्या होत्या, “विषमता आणि समतासुध्दा अनेकदा स्त्रीच्या विरोधात जाते.” त्यांच्या विधानातील सत्यतेचा पडताळा लैंगिक स्वातंत्र्याच्या संदर्भात स्त्रियांना पुरेपूर आला आणि अजूनही येत आहे. 


हेही वाचा महिला शेतकरी : शेतीची जबाबदारी, संसाधनांवर अधिकार मात्र नाही - स्वाती सातपुते, स्नेहा भट


दारू पिणे, ड्रग्ज घेणे यात मुक्ती नाही, हे खरेच आहे. मेंदू या अत्यंत महत्त्वाच्या अवयवाला दारू किंवा ड्रग्ज घेऊन बधीर करून टाकणे यात कुठलेही सबलीकरण नाही. पण जेव्हा लोक मुलींनी दारू पिणे ही मुक्तीची कल्पना पटत नाही, असे म्हणतात, तेव्हा दारू पिणे पुरुषांसाठी चांगले नसले तरी चालून जाईल पण मुलींबाबत नाही चालणार असे त्यांना म्हणायचे असते का? येथे दोघांसाठी नीती-अनीतीच्या, ग्राह्य-अग्राह्यच्या कल्पनाच निराळ्या हव्यात हा आग्रह कार्यरत असतो का? हे तर उघडच आहे की, अधून-मधून आवड म्हणून, ग्रुपबरोबर सोबत म्हणून थोडी दारू पिणारे अनेक पुरुष असतात आणि ते काही अट्टल दारुडे नसतात. तेवढी दारू प्यायल्याने त्यांचे भानही कमी होत नाही आणि त्यांच्या वर्तणुकीवरही काही अनिष्ट परिणाम दिसत नाही. मग एवढ्याच माफक प्रमाणात कधी तरी दारू पिणारी स्त्रीमात्र डोळ्यावर येते, चर्चेचा विषय होते आणि आणि कधी कधी समाजाच्या रोषालापण बळी पडते. इथे स्त्रीच्या काळजीपेक्षा नैतिकतेच्या कल्पनांमधील दांभिकताच जास्त कार्यरत असते की काय, अशी शंका येते. याचे कारण अन्यथा स्त्रीमुक्ती या शब्दांत नक्की काय अभिप्रेत आहे, असे सहसा मुलगे आणि मुलीसुध्दा विचारायला येत नाहीत.

स्त्रीवादाच्या दृष्टिकोनातून बोलायचे तर स्त्रीच्या व्यसनांमधून उद्भवणारा तिच्या सुरक्षिततेचा मुद्दा मला अधिक महत्त्वाचा वाटतो. दारू, ड्रग्ज, धूम्रपान यांचे दुष्परिणाम स्त्रीच्या शरीरावर पुरुषापेक्षा थोडे तरी जास्त दिसून येतात. ज्याप्रमाणे रसायन उद्योगांमध्ये काम करणाऱ्या स्त्री-पुरुषांवर तेथील रसायनांचे परिणाम तपासले, तर स्त्रियांवर ते अधिक गंभीर असतात हे सर्वमान्य सत्य आहे. त्याचप्रमाणे अमली पदार्थांचे परिणाम स्त्रीच्या शरीरावर अधिक तीव्र असतात. म्हणून त्यांनी दारू असो वा धुम्रपान, फार माफक प्रमाणात करणेच आरोग्याच्या दृष्टीने योग्य असते. दुसरा मुद्दा असतो सांस्कृतिक पर्यावरणाचा. स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी व्यक्तीला तसे पूरक पर्यावरण लागते. या आधी म्हटल्याप्रमाणे, भोवतालच्या समाजाला जर व्यक्तीच्या स्वातंत्र्याची कल्पना मान्य नसेल, तर ती ते स्वातंत्र्य मनमोकळेपणे घेऊ शकत नाही. उलट अनेकदा तिला समाजाच्या नाराजीला सामोरे जावे लागते.

स्त्री जेव्हा बारमध्ये जाऊन दारू पिते, तेव्हा ती तेथील कर्मचाऱ्यांच्या, आजूबाजूच्या ग्राहकांच्या नजरेत भरते. ते तिच्याकडे फक्त एक स्त्री देह म्हणून बघत असतात, आणि तिच्याविषयी सोयीस्कर ग्रह करून घेत असतात. बारमधून बाहेर पडल्यावर त्यातील काही लोकांकडून तिची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. स्त्री कोणत्याही वयाची आणि कुठेही वावरत असो, समाज तिच्या चारित्र्याविषयी काही अटकळ बांधत असतो. तिचा पोशाख, वागणे-बोलणे यांवरून स्वत:च्या मतीनुसार अंदाज बांधत असतो. हे अंदाज तिच्या क्षमतांविषयी नाही, तर मुख्यत्वे तिच्या वर्तणुकीविषयी आणि चारित्र्याविषयी असतात. बारमध्ये दारू पिणारी स्त्री ही वाह्यात असणार आणि आपण तिच्याबरोबर मुभा घेऊ शकतो, असा समज करून घेऊन कुणी तरी तिच्यावर अतिप्रसंग करू शकतो. ही आशंका अजिबात अवास्तव नाही. आपल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 4 जणींनी नमूद केले की, पुरुषांबरोबर मोकळेपणाने बोलले की, ते त्यातून चुकीचा अर्थ काढतात, मुलगी चालू दिसतेय असे कुजबुजतात. जे मुलगे आपल्याबरोबर रोज आठ तास काम करतात, तेच सहलीला गेले की आपले फोटो काढून, वेडेवाकडे मॉर्फ करून व्हायरल करतात ही मुलींची तक्रार तर खूप सार्वत्रिक आहे.

आज तरूण स्त्रियांनी कामानिमित्त परगावी जाऊन 1-2 दिवस एकटीने हॉटेलमध्ये राहण्याचे प्रमाण लक्षणीय झाले आहे. अशा वास्तव्यात आपल्या कुठल्याही वागण्यातून कुठलाही नको तो संदेश हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्यामध्ये पसरू नये यासाठी त्यांना विशेष काळजी घ्यावी लागते. (ती घेऊनसुध्दा कधी कधी कटू प्रसंग घडतातच) म्हणूनच जे स्वातंत्र्य आपल्या अस्तित्वालाच धोका पोचवू शकेल, ते घ्यायचे का, हा विचार तरुणींनी करणे त्यांच्या हिताचे आहे. एक ग्लास बिअर पिणे म्हणजे काही गुन्हा नाही, पण तसे करणे हे नको त्या प्रसंगाला आमंत्रण ठरत असेल, तर ते टाळण्यातच शहाणपणा आहे. समोर वाघ जबडा वासून आला, तर त्याला मी अहिंसावादी आहे, हे भाषण देऊन आपण जीव वाचवू शकत नाही. त्यासाठी वाघ समोर येणार नाही, हीच काळजी घ्यावी लागते, तसेच हे आहे.

यातली विचार करण्याजोगी बाब म्हणजे आज 21व्या शतकात जर बिअर पिणारी स्त्री लक्ष वेधून घेत असेल, तर मी तरूण असताना म्हणजे 80च्या दशकात एकटीने लांबवर प्रवास करणारी, गाडीला वेळ आहे म्हणून जवळच्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन एकटीने जेवणारी, किंवा दोन वेळा चहा मागवून, पुस्तक वाचत तिथेच दीड-दोन तास वेळ काढणारी माझ्यासारखी स्त्री लक्ष वेधून घ्यायची. मग त्या हॉटेलमध्ये आलेला एखादा ग्राहक उगीच कारण काढून माझ्याशी बोलायला यायचा, तिथला एखादा वेटर अस्वस्थ वाटेल, एवढं टक लावून बघायचा किंवा गल्ल्यावर बसलेला मालकच मी किती दिवस त्या शहरात आहे, कुठे उतरणार आहे, माझ्या घरी कोण आहे, वगैरे चौकशा करायचा. मुद्दा हा आहे की, समोरची स्त्री पीडाप्रवण आहे का, तिच्याबरोबर आपण मुभा घेऊ शकतो का, याची चाचपणी करणारा एखादा तरी पुरुष सार्वजनिक ठिकाणी उपस्थित असतोच. त्यामुळे स्त्रीला स्वत:च्या सुरक्षिततेच्या बाबतीत फार जागरूक राहावे लागते. दारू पिऊन भान सुटले, झोप आली, ड्रग्ज घेऊन डोके चक्करले हे तिला परवडणारे नसते. याचे भान प्रत्येक तरुण स्त्रीने ठेवायलाच हवे.

स्त्रीला भेडसावणारी असुरक्षितता, तिच्यावर होणारे शारीरिक/लैंगिक अत्याचार हा प्रश्न अजूनही स्त्री चळवळ नीटशी सोडवू शकलेली नाही. याचे कारण मुळात हा प्रश्न स्त्रीचा नसून पुरुषश्रेष्ठत्वामधून उगम पावणारा आहे. तरीसुध्दा तो स्त्रीचा आहे असे भासवून सतत तिच्याकडे टोलवण्यात येतो. जोपर्यंत समाज स्त्रीवरील अत्याचारांची नैतिक जबाबदारी अत्याचार करणाऱ्यावर टाकत नाही, तोपर्यंत ही समस्या राहणारच. विशाखा समित्या, POSH सारखे कायदे, मी टू सारखी चळवळ या मलमपट्ट्या आहेत, त्याने अजूनतरी रोगनिर्मूलन साध्य झालेले नाही, हे दुर्दैवी सत्य आहे. 

- करुणा गोखले
karunagokhale@gmail.com 

(मराठी लेखिका, अनुवादक, संपादक व स्त्रीमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या / विश्वस्त)


हेही वाचा : 
भाग 1 स्त्रीमुक्ती चळवळ - संशोधनावर आधारित लेखाजोखा
भाग 2 या घरकामाचे करायचे काय? (पूर्वार्ध)
          या घरकामाचे करायचे काय? (उत्तरार्ध)
भाग 3 आक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर
भाग 4 संवादाचा अतिरेक आणि अभाव

Tags: स्त्री मुक्ती डोमेस्टिक व्हॉयलन्स Load More Tags

Comments:

sharmishtha Kher

हो, लेख नेमका आहे, विवेचन उत्कृष्ट आहे. मात्र हे अजून खूप ठिकाणी, खूप वेळा म्हणत राहायला हवे. मुली आणि तरुण स्त्रियांनी मुद्दे नीट लक्षात घेऊन सर्वत्र न चुकता वापरायला हवेत. स्त्री चळवलीतल्या ज्येष्ठ स्त्रियाही मुलींच्या प्रक्षोभक कपड्यांबद्दल आणि व्यसने करण्याबद्दल काहीशा आक्रमकपणे डिफेन्स वर जाऊन बोलताना मी पाहिलेल्या आहेत. व्यसन स्त्री आणि पुरुष दोघांनीही करू नये, कपड्यांची सभ्यता दोघांनीही पाळायला हवी सतत बोलले पाहिजे. पुरुषांच्या नजरेला आव्हान नको म्हणून नव्हे, तर स्वतःच्या सुसंस्कृततेचा भाग म्हणून प्रक्षोभकपण टाळायला हवा अशी भूमिका असायला हवी.

माधवी वागेश्वरी

किती नेमका आणि परिपक्व लेख आहे हा. करुणा जींचे आणि साधनेचे मनापासून आभार !

Add Comment