संवादाचा अतिरेक आणि अभाव

स्त्री चळवळीची सामाजिक परिणामकारकता आणि युवा भान प्रकल्पावरील लेखमाला : 4 /12

factly.in

स्त्रिया स्वत:च्या मनातील खंत पटकन बोलून दाखवतात, तशा दुसऱ्या स्त्रियांच्याही समस्या रस घेऊन ऐकतात. पुरुष या दोन्ही बाबतीत मागे असतात. स्वत:चे प्रॉब्लेम शेअर करत नाहीत, आणि दुसऱ्यांचे ऐकून घेण्याची फारशी तयारी दाखवत नाहीत. त्याने पती-पत्नी, मुलगा-आईवडील या नात्यांत ताण येतोय याचेही त्यांना भान नसते. सर्वेक्षणाच्या निमित्ताने इतक्या तरूण-तरुणींशी बोलल्यावर मी या निष्कर्षाला आले आहे की, पुरुषांना मनातले व्यक्त करण्याची कला शिकवली, तर कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण खाली येईल हे नक्की!

‘पुरुष संवाद साधत नाहीत, मनातले बोलत नाहीत, ही स्त्री-पुरुष नात्यामधील मोठीच समस्या असते’ असे 4 स्त्रियांनी सांगतिले. याला जोडून आपण आणखी काही स्त्रियांच्या तक्रारी उद्धृत करू शकतो. 2 तरुणी म्हणाल्या की, आपण काही सांगायला गेलो, तर पुरुषांची ऐकून घ्यायचीपण तयारी नसते. एक म्हणाली की, प्रत्येक वेळी पुरुषाने आपली समस्या सोडवावी, अशी अपेक्षा नसते. पण मी तुझा प्रश्न ऐकायला तयार आहे, एवढी जरी संवेदनशीलता दाखवली, तरी आधार वाटतो. पण तेवढीही तयारी पुरुष दाखवत नाहीत. आणखी एक उत्तरदाती म्हणाली की, ‘दोन पुरुषांमधील संवाद हा विचित्रच प्रकार असतो. एखाद्या गोष्टीचं वाईट वाटत असेल, तर त्याविषयी ते एकमेकांशी बोलतील, असं घडत नाही.’

या उलट 4 पुरुषांनी तक्रार केली की, ‘स्त्रिया कामाच्या जागी चर्चा जास्त करतात, गॉसिप करतात, अती घरगुती विषयांवर बोलतात, फालतू विषयांवर गप्पा मारण्यात खूप उर्जा घालवतात आणि स्वत:च्या अडचणी सांगत बसतात, त्याचा कंटाळा येतो.’ एक तरुण असेही म्हणाला की, ‘स्त्रियांना एखादी खासगी गोष्ट, गुपित सांगितले तर ते त्या आणखी 10 लोकांना सांगत सुटतात, त्यांना गुपित राखता येत नाही.’

पुरुषांमधील संवादाचा तथाकथित अभाव आणि स्त्रियांमधील संवादाचा अतिरेक करण्याची वृत्ती या दोन्ही स्वभावविशेषांकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. कारण व्यक्तिगत पातळीवर ते स्त्री—पुरुष दोघांसाठीही मानसिक क्लेशांचे कारण ठरतात.

दोन पूर्णपणे अपरिचित स्त्रिया प्रवासात एकमेकींशेजारी बसल्या, की अर्ध्या तासात एकमेकींच्या कुटुंबाविषयी किमान माहिती विचारून घेतात. या उलट दोन पुरुष एकमेकांना चांगले ओळखत असले, तरी प्रवासात घरचा विषय अपवादानेच काढतात. हे असे का होते? आणि असे होणे निसर्गसुलभ आहे, की संस्कारजन्य?

मेंदूविज्ञानाने दाखवून दिले आहे की, अगदी अर्भकावस्थेत मुलीच्या मेंदूतील भाषाग्रहण आणि भाषानिर्मिती यांची केंद्रे ही त्याच वयाच्या मुलाच्या मेंदूतील केंद्रांपेक्षा अधिक विकसित असतात. अर्थात त्यानंतरच्या वाढीच्या टप्प्यांमध्ये त्यांच्या मेंदूंना जसजशा विविध उत्तेजना मिळतील, त्यानुसार पुढील प्रगती होते. शिवाय मेंदूच्या वाढीवर संस्कार आणि परिस्थितीचा रेटा हे घटकपण प्रभाव टाकत असतात. त्यांतील काही निश्चितच स्त्री आणि पुरुषांच्या मनातील भावना व्यक्त करण्याच्या प्रवृत्तीवर परिणाम करत असतात. स्त्रीच्या संस्कृतिविशिष्ट जीवनपद्धतीमुळेसुध्दा तिचा कल भावना बोलून दाखवण्याकडे अधिक असतो.

बहुसंख्य मुलींना अगदी बालपणापासून सुरक्षिततेच्या कारणास्तव एकटं-दुकटं न ठेवता कुणाच्या तरी सोबतीत ठेवले जाते. आजही ग्रामीण भागांत शाळकरी मुलीला घराबाहेर पडताना शक्य तोवर सोबत घ्यावी लागते. प्रवासात बहुतांश वेळा स्त्रीला कुणी तरी घ्यायला आणि सोडायला येते. सोबत कुणी असेल, तर आपसात बोलणे अपरिहार्य असते. सक्तीची सोबत पुरुषांच्या बातीत संभवत नाही. अगदी 14-15व्या वर्षांपासून मुलग्यांना एकट्याने प्रवास करण्याची मुभा मिळते आणि तसा ते करतातही. काही कारणाने मुलगा दु:खी, नाराज, अस्वस्थ, उद्विग्न असेल, तर एकटाच दूर कुठे तरी निघून जाऊ शकतो; वाहन काढून, लांब फेरफटका मारून शांत झाल्यावर घरी परतू शकतो. पण तसे मुलगी करू शकत नाही. त्यामुळे आपली उद्विग्नता तिला रडून नाही तर कुणाशी तरी बोलूनच बाहेर काढावी लागते. गर्भारपण आणि बाळंतपण हे तरुण स्त्रीचे जीवशास्त्रीय भागधेय असते. गर्भारपणाच्या शेवटच्या काही दिवसांत आणि बाळंतपणानंतरचे काही दिवस ती शारीरिकदृष्टया दुसऱ्या कुणावर तरी अवलंबून असते. या दिवसांत तिच्यापुढे अनपेक्षित संकट किंवा अडचण उभी ठाकण्याची खूप शक्यता असते. अशा अवस्थेतील व्यक्तीस स्वत:च्या अडचणी बोलून दाखवण्याशिवाय पर्याय नसतो. स्त्रीच्या शरीरातील संप्रेरकेसुध्दा तिच्या वर्तणुकीवर प्रभाव टाकत असतात. गर्भारपण, बाळंतपण आणि रजोनिवृत्ती या काळात तिच्या शरीरात संप्रेरकांचा डोंब उसळत असतो. त्याच्या परिणामी तिच्या भावावस्था दोलायमान होतात. सतत उदास वाटणे, अचानक रडू येणे, एकटे असताना भीती वाटणे असे त्रास तिला होत असतात. अशा वेळी मनातले बोलायला कुणी बरोबर असेल तर ती स्वत:ला योग्य प्रकारे सावरू शकते.


हेही वाचा : स्त्रीवादी विचारसरणी मानवकल्याणाची जबाबदारी पेलेल! - शिल्पा कांबळे 


इतरांशी मिळून मिसळून राहण्याची स्त्रीची गरज मूल झाल्यावर तर आणखीनच वाढते. याला कारणे तीन. एक म्हणजे लहान मुले अपघातप्रवण असतात. कधी धडपडतील, आजारी पडतील, अवखळपणापायी काही तरी जीवघेणा उद्योग करून बसतील, याचा नेम नसतो. त्यामुळे ज्यांच्यावर बालसंगोपनाची जबाबदारी असते, त्यांना बोलके असणे, आपल्या अडचणी दुसऱ्यांना सांगणे, मदतीसाठी अगदी परक्या व्यक्तीकडेसुध्दा मन उघड करणे हे करावेच लागते. दुसरे कारण म्हणजे मुले मनुष्यवेल्हाळ असतात. त्यांना बरोबरीच्या मुलांबरोबर खेळायचे असते, इतर प्रौढांकडून लाड करून घ्यायचे असतात. नवीन जागा, माणसे, खेळणी, प्राणी यांविषयी त्यांना उत्सुकता असते. शेजार-पाजारच्या घरांतील वस्तू, खाद्यपदार्थ, यांविषयी कुतूहल असते. त्यांची ही नैसर्गिक गरज पूर्ण करायची, तर आईला बोलके असणे भागच असते. तिसरे कारण म्हणजे स्त्रीला सतत मुलांबरोबर संवाद साधावा लागतो. मूल बोलो अथवा न बोलो, तिला त्याला रमवण्यासाठी बोलावेच लागते. मुलाला सुरक्षित वाटायचे असेल, तर त्याच्या अवतीभवती वावरणाऱ्या व्यक्तींना अबोल असून भागत नाही. या आणि अशा अनेक कारणांमुळे स्त्रियांना बोलावे लागते. अबोल राहण्यात, कुणाबरोबर मन मोकळे न करण्यात, कुणाची मदत न घेण्यात आपलाच तोटा आहे, हे स्त्रीला फार लवकर लक्षात येते.

स्त्रिया आपल्या भावनांचा बोलून किंवा रडून निचरा करतात याला सांस्कृतिक कारणेपण आहेत. पुरुषापेक्षा स्त्रीवर जास्त निर्बंध असतात हे जगजाहीर आहे. हे निर्बंध कौटुंबिक, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, मानसिक, नैतिक आणि शारीरिकसुध्दा (उदा., हौसेने एखादा कार्यक्रम ठरवणे आणि अचानक पाळी सुरु झाल्याने कार्यक्रमातून वगळले जाणे) असे सर्व प्रकारचे असतात. विवाहित स्त्री स्वत:चे मातृकुल सोडून आयुष्याचा मोठा भाग नवऱ्याच्या कुटुंबाबरोबर व्यतीत करते. या कुटुंबातील अनेक जणांना तिच्याविषयी खरा जिव्हाळा नसतो, तिलाही ही नाती अनेकदा कर्तव्य म्हणून जपावी लागतात. या घरातील काही जण तर सरळ सरळ तिच्याविषयी आकस बाळगून असतात व तीपण त्यांच्याविषयीची अनेक गाऱ्हाणी हृदयात दडवून जगत असते. अशा नकारात्मक भावविश्वात राहिल्याने तिला त्यांचा निचरा करणे अत्यावश्यक होते. त्यासाठी पुरुषाप्रमाणे तिला घरात आरडाओरडा करणे किंवा घराबाहेर निघून जाणे, दारू पिणे, सगळी कामे बाजूला सारून आवडीच्या छंदांमध्ये मन गुंतवणे हे मार्ग सहसा उपलब्ध नसतात. त्यामुळे पुनश्च त्यातल्या त्यात विश्वासातील किंवा अपरिचित व्यक्तीशी बोलून किंवा रडूनच तिला काळजावरचे ओझे कमी करता येते. तिचे रडणे आणि सतत कटकटी सांगणे ही कधी कधी पर्यायशून्यतेतून आलेली हतबलता असते. पण त्याच वेळी ती आपल्या अडचणी दुसऱ्याला सांगून, इतर स्त्रियांना त्यांच्या सुखदु:खाविषयी विचारून तात्पुरती का होईना, आधारयंत्रणा तयार करत असते आणि स्वत:चे संपर्क जाळे विणत असते. अडीअडचणीला तेच तिला उपयोगी येते.

याचा अर्थ स्त्रीने सतत रडगाणी गावीत, गॉसिप करावे असे नाही. आपण कुठे कोणते विषय काढतो याविषयी काळ-वेळ-प्रसंग यांचे तारतम्य ठेवायलाच हवे. ते काही जणी ठेवतात, काही नाही ठेवत. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया खूपच जास्त प्रमाणात वैयक्तिक बोलतात हे खरे आहे. पण तो सह-अनुभूतीचे संपर्क जाळे विणण्यातील महत्त्वाचा भाग असतो. पुरुष त्याची कुचेष्टा करतात, कारण त्यांना स्त्रीच्या भावविश्वात किती परस्परविरोधी भावनांची उलथापालथ होत असते, याची कल्पनाच येत नाही. दहा वाजता ऑफिसला पोचणारी बाई घरी वेगवेगळ्या लोकांच्या किंवा मुलांच्या वेगवेगळ्या अपेक्षा पूर्ण करून, कधी वडीलधाऱ्या कुटुंबीयांची बोलणी खाऊन, कधी ऑफिस सुटल्यावर करायच्या कामांची यादी डोक्यात घोळवत, कधी रस्त्यात छेडछाडीचा कटू अनुभव झेलून ऑफिसला पोचलेली असते. आल्याआल्या किंवा संधी मिळताच हा ताण सहकाऱ्यांपुढे ओकून ती कामाला लागते. ती तिची मानसिक गरज असते. एकाच ऑफिसमध्ये साधारणपणे एकाच पातळीवर काम करणाऱ्या स्त्री आणि पुरुष कर्मचाऱ्यांना जर विचारले की, ऑफिसला पोचण्याआधी तुम्ही कुटुंबातील कोणकोणती कामे करून ऑफिस गाठले आहे, तर स्त्रीने उरकलेल्या कामांचे प्रमाण पुरुषांनी केलेल्या कामांच्या सरासरी चौपट भरते. याशिवाय तिला जी व्यवधाने मनात ठेवावी लागतात (त्याला स्त्रीवादात ‘मेंटल लोड’ असा शब्द आहे.) ती पुरुषाच्या मेंटल लोडपेक्षा किती तरी जास्त असतात.

आणखी एक लक्षात घेण्याची बाब म्हणजे आपले उत्तरदाते तरुण-तरुणी 28 ते 38 या वयोगटातील होते. त्यांचे सरासरी वय 33 वर्षे होते. तरुणींसाठी हा फार कसरतीचा काळ असतो. लग्न होऊन 3-4 वर्षे झालेली असतात. माहेरच्या सवयी सोडून सासरी रूळण्याची झटापट करता करता मनाला शिणवटा आलेला असतो. त्यात मूल लहान असते. बायकोपण, आईपण, सूनपण आणि ऑफिसमधील जबाबदाऱ्या यांमध्ये तोल सांभाळता सांभाळता जीव मेटाकुटीला येत असतो. या वयोगटातील स्त्रिया खूप अनपेक्षित बदलांना, अडचणींना किंवा अपेक्षाभंगांना सामोऱ्या जात असतात. ते शांतपणे रिचवण्याइतकी प्रगल्भता आलेली नसते. म्हणूनसुध्दा त्या सतत अडचणींविषयी बोलताना आढळतात. लग्न न झालेली, गद्धेपंचविशीतील तरुणी किंवा लग्न पचवून निर्ढावलेल्या पन्नाशीतील प्रौढा प्रापंचिक अडचणींविषयी एवढ्या बोलत नाहीत. पन्नाशीला पोचलेल्या स्त्रिया तर स्वत:विषयी बोलण्याऐवजी दुसऱ्यांच्या अडचणी अधिक प्रमाणात विचारतात, तरूण आयांना सल्ले देतात. अर्थात यातसुध्दा पुरुषांना रस नसतोच.

पुरुषाच्या तुलनेत स्त्रियांवर मेंटल लोड खूप जास्त असतो, याचे भान आताशा कुठे समाजाला येऊ लागले आहे. एक तरूण म्हणाला की, ‘बायका बोलायला लागल्या की पुरुष त्याची संभावना ‘गॉसिप’ या शब्दांत करतात, पण पुरुष-पुरुष बोलायला लागले की मात्र त्याला ‘शेअरिंग’ म्हणतात.’ दुसरा एक तरुण म्हणाला की, ‘बायका घरच्या कटकटी सांगतात, हे चांगलंच आहे, म्हणून तर शेतकरी आत्महत्या करतात, पण त्यांच्या बायका मरत नाहीत.’

पुरुषालापण अडचणी असतात, त्याचापण अपेक्षाभंग होऊ शकतो, तोपण उदास, नाराज, उद्विग्न होऊ शकतो. पण दोन बाबतींत त्याच्या आणि स्त्रीच्या परिस्थितीमध्ये मोठा फरक असतो. एक म्हणजे घरातल्या दैनंदिन जबाबदाऱ्या, बाल संगोपन यांची घडी विस्कटली, तर जेवढे स्त्रीला धारेवर धरले जाते आणि तिला तडजोडी कराव्या लागतात, तेवढे त्याला जबाबदारही धरले जात नाही आणि त्याला स्वत:ची नियोजित कामे बाजूलापण सारावी लागत नाहीत. दुसरा फरक म्हणजे त्याच्यावर स्त्रीच्या तुलनेत सामाजिक निर्बंध कमी असतात. राग आला तर तो घरात सर्वांवर ओरडू शकतो, एवढेच काय, हातसुध्दा उचलतो. तेवढी मुभा पुरुषप्रधान संस्कृती त्याला देत असते. तो दारू पिऊ शकतो आणि घर सोडून निघूनपण जाऊ शकतो. नकारात्मक भावनांचा निचरा करण्यासाठी त्याला एकट्याला चोखाळता येतील असे अनेक पर्याय उपलब्ध असतात. भरीला पुरुषाने भावविवश व्हायचे नाही, रडगाणे गायचे नाही, अशा मर्दानगीच्या कल्पनांची भरभक्कम तटबंदी असते. आपण आपले दु:ख कुणाला सांगितले तर आपण कमकुवत ठरू ही धास्ती त्याला असते. पुरुष मर्दानगीच्या कल्पनांचा बळी ठरतो. आपलाच एक उत्तरदाता म्हणाला, “मी स्वावलंबी आहे, मला गोष्टी शेअर करायला आवडत नाही.” मनातले काही दुसऱ्यापुढे बोलणे म्हणजे परावलंबन अशी अजब कल्पना त्याने करून घेतलेली दिसते. पुरुष आपल्या मनात काय चालले आहे, हे सहसा उघड करत नाहीत त्याला आणखी एक कारण असते. ते म्हणजे पुरुष समाजकारण, अर्थकारण, सत्ताकारण यांत गुंतलेले असतात. अगदी कुठलाही नोकरी-व्यवसाय न करणारा पुरुषसुध्दा त्याच्या कुटुंबात स्वत:ची सत्ता अबाधित ठेवण्याच्या उद्योगात गुंतलेला असतोच. असे असताना कुणाशी काय बोलायचे, मनातल्या किंवा धंदा-पाण्याविषयीच्या कळीच्या गोष्टी किती उघड करायच्या, याचे भान त्याला ठेवावे लागते, अन्यथा त्याच्या सत्ताकारणातील, आर्थिक व्यवहारांमधील समीकरणे बिघडू शकतात. शिवाय पुरुषांचा खूपसा वेळ घराबाहेरील व्यवहारांमध्ये जात असल्याने ते घरातील घडामोडींमध्ये, नातेसंबंधांमध्ये मानसिकदृष्ट्या स्त्रियांएवढे आकंठ बुडलेले नसतात. आजकाल स्त्रियासुध्दा नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असतात. पण तरी घरातल्या घडामोडींसाठी त्यांना जेवढे जबाबदार धरले जाते, तेवढे पुरुषाला धरले जात नाही. म्हणूनच पुरुष घरगुती बाबींविषयी कमी बोलतात.

अनेक पुरुषांची आपल्या कुटुंबीयांमधील गुंतवणूक किती माफक असते, याविषयीचा एक खरा किस्सा सांगायला पाहिजे. महाराष्ट्रातील एका नामवंत त्वचारोगतज्ञांनी तो त्यांचा आत्मचरित्रात उद्धृत केला आहे. या डॉक्टरांच्या हॉस्पिटलमधील दुसऱ्या एका बुजुर्ग, ऋषितुल्य शल्यविशारदाच्या मुलीची एक अवघड प्लास्टिक सर्जरी करायची होती. ती आत्मचरित्र लिहिणाऱ्या वरील डॉक्टरकडूनच करायची असा तिचा आग्रह होता. त्यानुसार या त्वचारोगतज्ञांनी ती केली व ती निर्धोक पार पडली हे सांगण्यासाठी ते मुलीच्या वडिलांकडे गेले आणि म्हणाले, “तुम्ही अजिबात काळजी करू नका, ऑपरेशन अगदी व्यवस्थित झालं”. त्यावर ते बुजुर्ग शल्यविशारद प्रतिप्रश्न करते झाले, “कसली काळजी? कुणाचं ऑपरेशन?” स्वत:च्या कामाच्या गडबडीत आज आपलीपण मुलगी याच हॉस्पिटलमध्ये दाखल आहे, याचा त्यांना साफ विसर पडला होता.


हेही वाचा : महिलांच्या हक्कांसाठी लढणारे मौलाना... - प्रियांका तुपे


जशा स्त्रिया शिकून मोठ्या, जबाबदारीच्या पदांवर काम करू लागल्या आहेत, तसे त्यांच्यापण वर्तणुकीत बदल होताना दिसू लागले आहेत. उच्चपदस्थ स्त्रियापण कामाच्या जागी इतर स्त्रियांशी कामाविषयी आणि व्यक्तिगतसुध्दा काहीही शेअर करत नाहीत. जीवघेणी स्पर्धा असणाऱ्या व्यवसायांमध्ये, उदाहरणार्थ, सिने, फॅशन, करमणूक व्यवसाय, संगीत, क्रीडा, इत्यादी क्षेत्रांत कार्यरत स्त्रियांना त्यांच्या क्षेत्रात सहसा एकही मैत्रीण नसते कारण त्या कुणाशीही मनमोकळे बोलू शकत नाहीत. कुटुंबाचा भरभक्कम आधार नसेल, तर या क्षेत्रातील स्त्रियांना नैराश्य, संशयगंड, हिस्टेरिया, व्यसनाधीनता इत्यादी व्याधींची लागण होण्याची शक्यता जास्त असते. अशा स्त्रियांना जिवलग मैत्रिणी कमी असतात, आणि असल्या तरी त्या त्यांच्या व्यवसायातील नसतात. आपल्या सर्वेक्षणात सहभागी झालेला सिनेसृष्टीतील एक तरूण म्हणालाच, “आजकल तो लडकियां भी शेअर नहीं करती. आज के युथ बहोत स्ट्रेस में रहते है”. आजच्या विशी-तिशीतील तरुणी प्रवासात शेजारी बसलेल्या व्यक्तीची दखल घेईनाशा झाल्या आहेत. त्या पुढ्यातल्या लॅपटॉपमध्ये डोळे घालून बसलेल्या असतात, नाहीतर कानात इयरफोन्स घालून काहीतरी ऐकत असतात. तंत्रज्ञानाने वैयक्तिक करमणुकीची साधने उपलब्ध करून दिल्यामुळे प्रत्येक व्यक्ती समूहात राहून स्वतंत्र बेटासारखी अलिप्त राहू लागली आहे. त्याचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेण्याची क्षमता खूप कमी झाली आहे. कुटुंबात हे प्रकर्षाने जाणवू लागले आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक स्त्रियांनी बोलून दाखवले की, वर्क फ्रॉम होम आणि त्याच वेळी प्रचंड घरकाम याने खूप थकायला व्हायचे. पण जरा जरी त्याविषयी बोलले, तरी घरातल्यांना ते आवडायचे नाही. एकीच्या नवऱ्याने तर ‘सगळ्यांनाच घरी खूप काम पडतंय, तू उगीच त्याचा इश्यू करू नकोस’ असे म्हणून तिला एका वाक्यातच गप्प केले. एकीच्या नवऱ्याच्या सतत बदल्या होतात. दर वेळी तिला स्वत:चे अर्थार्जन बाजूला सारून त्याच्याबरोर नव्या गावात जुळवून घ्यावे लागते. काम आवडो, न आवडो, पगार पटो, न पटो; मिळेल ती नोकरी करावी लागते. वयाची चाळीशी जवळ आली, तरी तुटपुंज्या पैशावर समाधान मानावे लागते. याविषयी कितीही खंत वाटली, तरी नवऱ्यासमोर ती बोलून दाखवलेली त्याला आवडत नाही. घरकाम करा, नोकरी सोडा, त्याग करा, पण त्याविषयी तोंडातून ब्र काढू नका अशीच एकूण कुटुंबाची धारणा असते. स्त्रिया ऑफिसमध्ये येऊन घरच्या कटकटी सांगतात त्याचे एक कारण म्हणजे त्यांच्या मनातील सल ऐकून घेण्यात त्यांच्या घरातील कुणालाही रस नसतो. या बाबतीत एका तरुणीचे वक्तव्य मला फार मोलाचे वाटते. आंतरधर्मीय विवाह केलेली ही तरुणी वैवाहिक जीवनाबाबत बोलताना म्हणाली, “तक्रार करायला संधी असेल, तर भांडणाचे प्रसंग कमी होतात.”

स्त्रिया स्वत:च्या मनातील खंत पटकन बोलून दाखवतात, तशा दुसऱ्या स्त्रियांच्याही समस्या रस घेऊन ऐकतात. पुरुष या दोन्ही बाबतीत मागे असतात. स्वत:चे प्रॉब्लेम शेअर करत नाहीत, आणि दुसऱ्यांचे ऐकून घेण्याची फारशी तयारी दाखवत नाहीत. त्याने पती-पत्नी, मुलगा-आईवडील या नात्यांत ताण येतोय याचेही त्यांना भान नसते. कितीही खोदून विचारले तरी नक्की काय खुपते आहे याविषयी नवरा (किंवा मुलगा) खुलेपणाने बोलत नाही, फक्त चिडचिड करतो असे अनेक स्त्रिया वारंवार बोलून दाखवतात. समस्या निर्माण झाल्यास व्यावसायिक समुपदेशन घेण्यास स्त्रिया जेवढ्या चटकन तयार होतात, तेवढे पुरुष होत नाहीत. समुपदेशकाकडे जाणे म्हणजे वैयक्तिक गोष्टी चव्हाट्यावर आणणे असे तरी त्यांना वाटते किंवा समुपदेशकाला काय कळते? माझे प्रश्न सोडवायला मी समर्थ आहे असे त्यांचे म्हणणे असते. आपल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 5 स्त्रियांनी खंत व्यक्त केली की, वारंवार विनंती करूनही नवरा समुपदेशकाकडे येण्यास तयार नाही. त्यातील दोघींनी कबूल केले की, अखेरीस त्या एकट्याच जाऊन समुपदेशकाचा सल्ला घेऊन आल्या. काही तरुणांना मात्र वाटू लागले आहे की, समुपदेशनाविषयीचा मानसिक अडसर दूर व्हायला हवा. कुणी स्वत:च्या समस्यांविषयी बोलायला लागलेच, तर पुरुषांचा कल त्या व्यक्तीचे बोलणे थांबवून समस्येवर उपाय सुचवण्याकडे असतो. (हे चांगलेच आहे.) पण प्रत्येक वेळी त्यांनी सुचवलेला उपाय व्यवहार्य असतोच असे नाही, अनेकदा तो परिस्थितीच्या अपुऱ्या माहितीवर आधारित असतो. त्यामुळे अंतिमत: बोलणाऱ्या व्यक्तीला गप्प बसवले एवढीच फलनिष्पत्ती होते. सर्वेक्षणाच्या निमित्ताने इतक्या तरूण-तरुणींशी बोलल्यावर मी या निष्कर्षाला आले आहे की, पुरुषांना मनातले व्यक्त करण्याची कला शिकवली, तर कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण खाली येईल हे नक्की!

भावनिक विलगीकरण ही आजच्या काळातील मोठी सामाजिक समस्या आहे. त्यावर उपाय एकच : शालेय शिक्षणाच्या बरोबरीने मुलांची भावनिक साक्षरता वाढवणे. मनात उमटणाऱ्या भावनांचे विश्लेषण करता येणे, त्या योग्य प्रकारे व्यक्त करता येणे, दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याची तयारी ठेवणे हे भावनिक साक्षरतेचे टप्पे आहेत. ते पार करायचे तर मनातले बोलणे आणि दुसऱ्याचे ऐकून घेणे या दोन्हीची तयारी हवी. 

- करुणा गोखले
karunagokhale@gmail.com  


हेही वाचा : 
भाग 1 स्त्रीमुक्ती चळवळ - संशोधनावर आधारित लेखाजोखा
भाग 2 या घरकामाचे करायचे काय? (पूर्वार्ध)
          या घरकामाचे करायचे काय? (उत्तरार्ध)
भाग 3 आक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर

Tags: पुरुष करुणा गोखले मेंटल लोड Load More Tags

Comments:

Prem

सुंदर लिखाण आहे पण दोघांनीही योग्य वेळी बोलायला हवे आणि प्रश्न सोडवायला हवे

Add Comment