देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा तारुण्यात पदार्पण केलेल्या पिढीचे प्रतिनिधी असलेले पन्नालाल भाऊ आज 88 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. स्वातंत्र्यलढ्यातून आकाराला आलेल्या मूल्यांच्या आधारावर नवा भारत घडवावा, असे ध्येय त्यांनी उराशी बाळगले. त्या ध्येयपूर्तीचा आशय समाजवादी विचार, समाजवादी राज्यव्यवस्था व समाजवादी समाज रचना यात आहे, अशी त्यांची पक्की धारणा बनली. त्यासाठी प्रबोधन, रचना, संघर्ष या तिन्ही आघाड्यांवर गेली सात दशके ते कार्यरत राहिले. 'पायपीट समजवादासाठी' हे त्यांचे आत्मकथन, मनोविकास प्रकाशनाकडून ऑगस्ट महिन्यात येत आहेत. त्यातील एक प्रकरण इथे प्रसिद्ध करीत आहोत. या प्रकरणातून भाऊंच्या राजकीय, सामाजिक विचारांचा पाया कशावर आधारलेला आहे, हे चांगले कळते.
- संपादक
‘या गरिबांनो या, झेंडा हाती घ्या
काँग्रेसची हाक तुम्हा हाय हो
सावकारशाही ठेवायची नाही
ठेचायची आता हाय हो’
सेवादलाच्या शाखेत आम्ही मुले साने गुरुजींची असली गाणी म्हणायचो. दि. मा. क्षीरसागर हे त्यावेळी मॅट्रिकच्या वर्गातले सैनिक शाखेवर आम्हाला नवनवी गाणी शिकवायचे. ‘घ्या रे हरिजन घरात घ्या रे घरात घ्या’ हे तालासुरावर गाऊन झाले की त्याचा अर्थ सांगायचे...
“आपल्या गावात बाळेश्वर नाक्याच्या पलीकडे जी वस्ती आहे, काही जण त्यात राहणार्यांना अस्पृश्य म्हणतात. ते देवाचे अधिक लाडके आहेत. आईला आपले दुबळे लेकरू अधिक जवळचे वाटते. ती त्याची विशेष काळजी घेते. तसेच देव या अस्पृश्यांची काळजी जास्त घेतो. म्हणून गांधीजीनी त्यांना ‘हरिजन’ म्हटले आहे. आपण शिवाशिव न मानता त्यांना घरात घेतले पाहिजे. बरोबरीने वागवले पाहिजे.’’
चार दिवसांनंतर क्षीरसागरनी नवेच गाणे शिकवले,
‘किसानांच्या बाया आम्ही शेतकरी बाया,
नाही आम्ही राहणार आता दीनवाणी गाया.
कष्टाने शेतात मेलो, भुकेने घरात मेलो
नाही आम्ही राहणार आता दीनवाणी गाया-’
1942 मध्ये दिवाळीच्या सुट्टीनंतर आम्ही रोज पाच वाजता काँग्रेस हाऊसच्या मैदानावर सेवादल शाखेत जाऊ लागलो. आमचे शाखानायक केशवराव सहस्त्रबुद्धे “होशियार, कदमखोल’’ करून घ्यायचे. मग तालसे कदम- एक दो एक दो. जागेवरच प्रथम डावा, मग उजवा पाय उचलून आपटायचा. जोरसे कदम -हुकूम सुटला की पोलिसासारखे हात पुढे करून व पाय गुडघ्यापर्यंत वर उचलून परेडला सुरुवात करायची. ते झाले मार्चिंग.
गवळे गल्लीच्या आतल्या कुंकुकरी बोळीत राहणारा रूद्राप्पा पोटे एके दिवशी पहाटे पाच वाजता बोलवायला आला. मी तोंडावर पाणी फिरवून निघालो. वाटेत रसिक वखारिया, जगन्नाथ दगडे भेटले. खुंटावरून प्रभात फेरी निघाली. ‘वंदे मातरम्’, ‘महात्मा गांधी की जय’, ‘चरखा चला चला के, लेंगे स्वराज्य लेंगे’ अशा घोषणा देत बाजारपेठ, चाटी गल्ली, भगवंत देऊळ, कसबा अशी फिरून (आमची प्रभात फेरी) सोमवार पेठेत आली. मग आम्ही आपापल्या घरी गेलो. शाळेत कुणी कुणी विचारले, ‘कशासाठी फेरी काढली होती?’ ‘आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी.’ स्वातंत्र्य म्हणजे काय हे त्याने विचारले नाही. नाही तर माझी पंचाईत झाली असती! मी काय सांगितले असते कोण जाणे.
उन्हाळ्याच्या सुटीत वैरागजवळ इर्ले या गावी सेवादलाचे सात दिवसांचे शिबिर झाले. तेथे वस्ताद बरिदेंनी लाठीचे पवित्रा, आगे चाल वगैरे शिकवले. थळपतींनी लेजीम घटवून घेतली. दुपारी बौद्धिक व्हायचे. जातपात मानायची नाही-आपण सगळे देशवासी एक आहोत. हळूहळू आर्थिक विषमताही कमी करायची आहे-असे सांगितले जायचे.
15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. 30 जाने 1948 रोजी म. गांधींचा खून झाला. त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वंयसेवक होता असे बाहेर आले. ती निमलष्करी संघटना आहे. तिच्यावर बंदी घालण्यात आली. मग तसे शिक्षण देणार्या राष्ट्र सेवादलावर का नको-असे कुणा ज्येष्ठ अधिकार्याने गृहमंत्री मोरारजीभाईंना विचारले म्हणे. “कुठली तशी संघटना आहे?’’ “राष्ट्र सेवा दल’’ त्या अधिकार्याने म्हटले. “मग त्याच्यावरही बंदी घाला.’’ मंत्रिमहाशय म्हणाले. झाले. संध्याकाळी शाखेवर चरख्यासह असलेला तिरंगा झेंडा लावायचा नाही. ताल से कदम, जोरसे कदम -अशी परेड करायची नाही. लाठी शिकवायची नाही. “शाखाच भरवू नका”, असे अधिकार्यांनी सांगितले होते म्हणे.
एसेम जोशी काँग्रेसच्या चळवळीत होते. प्रांतिक पातळीवरील एकदोन पुढार्यांच्या मदतीने त्यांनी मोरारजीभाईंची भेट घेतली. “आम्ही सेवादल सैनिकांना सुतकताई, ग्रामसफाई करायला लावतो. गांधीजींच्या विचारांची ओळख करून देतो. असे कार्यक्रम करणार्या संघटनेवर कशासाठी बंदी घातली?” मोरारजींनी विचारले - “पण तुम्ही लष्करासारखी परेड करायला शिकवता ना? लाठी, फरीगदगाही शिकवता ना?’’
“अहो, ते सगळे मुलांच्या अंगी शिस्त बाणवण्यासाठी असते. पण हिंसाचार करायचा नाही, अहिंसेचे पालन करायचे-अशीच आमची शिकवण असते.’’ - एसेम.
“बघू, काय करायचे ते,’’ - मोरारजी.
“आम्ही सुटीत सात दिवसांचे शिबिर घ्यायचे ठरवले आहे. मैदानी कार्यक्रम घेणार नाही. हॉलमध्ये गाणी शिकवू आणि बौद्धिके घेऊ. त्याला काय हरकत आहे?’’ - एसेम.
“बरं बरं. तुम्ही पुण्याच्या कलेक्टरमार्फत तसा अर्ज पाठवा. त्यावर (काँग्रेस नेते) मामा देवगिरीकरांची शिफारस घ्या आणि मला परत भेटा.” - मोरारजी.
त्याप्रमाणे अर्ज घेऊन अण्णा मोरारजींभाईंना भेटले. मधल्या काळात त्यांनी शंकरराव देवांनाही विचारून घेतले. अण्णांचा अर्ज घेऊन अभ्यासवर्गाला परवानगी द्यावी असा शेरा मारून पुण्याच्या कलेक्टरकडे पाठवले. शिबिराला परवानगी मिळाली.
तो 1948 सालातला मे महिना होता. पुण्यात एस. पी. कॉलेजच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये सकाळी 9 ते 12 व दुपारी 3 ते 6 कार्यक्रम व्हायचे. आम्ही बाहेरगावाहून गेलेली मुले (काही मुलीही) आपापल्या नातेवाइकांकडे राहिलो. ज्यांचे नातेवाईक नव्हते अशांची सोय हितचिंतकांच्या घरी करण्यात आली होती. त्या शिबिरात इंदूताई केळकर यांनी ‘येथून तेथून सारा पेटू दे देश’ हे गुरुजींचे गीत, ‘कदम कदम बढाये जा, खुशी के गीत गाते जा’, ‘ये जिंदगी है कौमकी, कौम पे लुटाये जा’ (नेताजी सुभाष बोसांच्या आझाद हिंद सेनेचे गीत) तालासुरावर म्हणायला शिकवली. गाणी चांगली घटवून घेतली.
आचार्य शं. द. जावडेकर यांचे लोकशाहीवर बौद्धिक झाले. जयप्रकाश नारायण यांच्या ‘समाजवादच का?’ या पुस्तकाची माहिती नानासाहेब गोर्यांनी सांगितली. लोकशाही समाजवादावर आचार्य श्रीपाद केळकरांचेही भाषण झाले. ती भाषणे आम्हाला आवडली. त्या वेळी वादविवेचन मालेतर्फे तशा विषयांवर सत्तर-ऐंशी पानांची पुस्तके निघाली होती. आठ आणे, दहा आणे-अशी किंमत असायची. मला काकाजींकडून पाच रुपये मिळाले होते. त्यांतून मी दोन पुस्तके घेतली- ‘सुलभ समाजवाद’ हे पां. वा. गाडगीळांचे आणि ‘राज्यशास्त्र प्रवेश’ हे आचार्य जावडेकरांचे.
त्या अभ्यासवर्गात एके दिवशी दुपारी मृणाल मोहिले आणि केशव गोरे यांच्या विवाहाचा समारंभ झाला. भाऊ रानडेंनी त्यांची थोडक्यात माहिती सांगितली व आंतरजातीय विवाहाचे महत्त्व पटवून दिले.
एस.एस.सी. होईपर्यंत ती दोन-तीन पुस्तके वाचून झाली होती. शिवाय वि.स.खांडेकरांच्या एकदोन कांदबर्या वाचल्या. साने गुरुजींच्या ‘गोड गोष्टी’ची चारपाच पुस्तके वाचली. बार्शीत आम्ही सेवादलाचे छोटेसे वाचनालय दगडोबा बरीदे यांच्या घरी चालवले होते. पुरंदर्यांच्या माडीवर सलग चार संध्याकाळी आम्हा सातआठ मुलामुलींनी सुलभ समाजवादाचे सामुदायिक वाचनसुद्धा केले. त्यातल्या काही शब्दांवर मधूनमधून चर्चा करायचो.
बाईंच्या सूचनेनुसार मी श्वेतांबर जैन संप्रदायाचे सामायिक प्रतिक्रमण वगैरे करायचो. नवकार मंत्र तोंडपाठ झाले होते. मधूनमधून ब्यासना व एकासना (दिवसातून फक्त दोन किंवा एकवेळ जेवायचे) करायचो. एका रविवारी दया पाळली. म्हणजे सकाळपासून स्थानकात राहिलो. एकासना केला. दोनदा सामायिक व संध्याकाळी प्रतिक्रमण केले. अर्धमागधीतील धर्मवचने म्हटली. तसे दोन-तीनदा केले. बाईंबरोबर इतर श्राविकांनी कौतुक केले.
हळूहळू मनात येऊ लागले-या सर्व वचनांचा अर्थ काय? कधी कधी बाई समजावून सांगायची. मनसा वनसा कायसा- म्हणजे मनाने, बोलण्याने वा कृतीने हिंसा करू नये. एकेंद्री, बेंद्री (म्हणजे एक वा दोन इंद्रिय असलेल्या) जीवांची हत्या करू नये. कर्माची बंधने तुटून पडावीत यासाठी एकासना, वास, तेला, (सलग तीन दिवसांचा उपास) आदी तपस्या करावी. आत्मा बंधनातून मुक्त झाला पाहिजे. त्यासाठी संयम पाळायचा. धार्मिक विधी करायचे. बाई सांगत होती म्हणून मानत होतो, पाळत होतो. हळूहळू ते सगळे योग्य आहे का, खरे आहे का-असे प्रश्न मनात येऊ लागले.
शाळेच्या पुस्तकात स्नानसंध्या, षोडषोपचारे पूजा, यज्ञ आदी शब्द असायचे. आम्ही जैन असल्याने त्यांतले काही करत नव्हतो. आगरकर, लोकहितवादी आदींचे धडे वाचले. ‘अर्थाशिवाय पाठ म्हणणे’ चुकीचे आहे हे लोकहितवादींचे वाक्य लक्षात राहिले. ‘मनुष्यतेचे ऐहिक सुखसंवर्धन’ हे आगरकरांचे सूत्र समजायला वेळ लागला. पारलौकिक विरुद्ध ऐहिक- हा खुलासा कुठेतरी वाचला. शब्दप्रामाण्य किंवा ग्रंथप्रामाण्य नको, बुद्धिप्रामाण्य हेच योग्य - असे थोडे थोडे मनात रुजू लागले.
1951 साली पुण्याच्या एस.पी. कॉलेजात इंटर-आर्ट्सला प्रवेश घेतला. लॉजिक हा विषय अनिवार्य होता. प्रो. हुल्याळकर शिकवायचे. डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह-मला ते आवडू लागले. वि. ना. गांगल, राजा ऐनापुरे असे आम्ही वर्गबंधू मधल्या सुटीत त्यावर चर्चा करायचो.
मराठीला डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे होते. ‘निबंध’ यावर त्यांचे व्याख्यान झाले. प्रत्यक्ष लिहिण्याआधी महत्त्वाचे मुद्दे सूत्ररूपाने मनातल्या मनात घोळवावेत. परिच्छेद म्हणजे काय याची फोड करून सांगितली. बुद्धीला शिस्त लागली पाहिजे हे त्यांचे वाक्य चांगले लक्षात राहिले.
आठवड्यातून एक दिवस संध्याकाळी ते त्यांच्या घरी अभ्यासवर्ग घ्यायचे. गांगल, ऐनापुरे, गो. मा. पवार, सरोजिनी कुलकर्णी (पुढे वैद्य) असे आम्ही सातआठ जण असायचो. ‘रिडर्स डायजेस्ट’ मासिक वाचायला लावायचे.
त्या वेळी मुंबईहून ‘फ्री प्रेस जर्नल’ हे इंग्रजी दैनिक निघायचे. त्याची रविवार आवृत्ती ‘भारत ज्योती’ या नावाने प्रसिद्ध व्हायची. आर्थिक विकास घडवण्यासाठी पंचचवार्षिक योजना बनवण्यात आली आहे. शेती, उद्योग-वगैरेंबाबतचे काय कार्यक्रम योजले व अमलात आणले जात आहेत याची माहिती असायची. अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘फॉरिन अफेअर्स’ या द्वैमासिकाचे अंक ते चाळायला द्यायचे.
‘भारतीय लोकसत्ता’आणि ‘चीनची लोकसत्ता’ अशा दोन व्याख्यानमाला पु.गं.नी दिल्या. लेडी रमाबाई हॉलमध्ये संध्याकाळी बरोबर सहा वाजता ते स्टेजवरील खुर्चीत बसून बोलायला सुरुवात करायचे आणि सातला संपवायचे. ज्यांना शंका विचारायच्या असतील त्यांनी व्याख्यानानंतर भेटावे असा दंडक होता. हॉल गच्च भरलेला असायचा.
एस.एस.सी.च्या वर्गात असताना मी म.सा.प.ची साहित्य विशारद ही परीक्षा पास झालो होतो. बी.ए.ला मराठी ऑनर्स घ्यावे असे मनात होते. पण पु.ग. म्हणाले की तू सेवादलात म्हणजे समाजवादी चळवळीत आहेस, तर अर्थशास्त्र घे. देशाला त्याची गरज आहे. बी.ए. ज्युनिअरला ‘इंडियन रुरल प्रॉब्लेम’ हा पेपर होता. त्यासाठी नानावटी व अंजारिया यांचे त्याच नावाचे पुस्तक होते. आपले शेतकरी व विशेषत: शेतमजूर यांची स्थिती किती हलाखीची आहे हे मला त्यामुळे कळले. पुढे राजकारणात मला त्याचा फार उपयोग झाला.
सेवादलाचे भाऊ रानडे, डॉ. रं. नि. अंबिके (त्यावेळी सेवादलाचे प्रांतशिक्षक होते.) यांनी एकदोनदा हटकले की डॉ. पु.ग. हे तर रा. स्व. संघाचे बौद्धिक प्रमुख आहेत. मग तू त्यांच्याकडे कसा काय जातो? मी सरळ पु.गं.नाच त्याबददल विचारले. तेव्हा ते म्हणाले, “मी बुद्धिप्रामाण्यवाद सांगू लागलो. हिंदू धर्मातील कर्मकांडावर टीका करू लागलो, तेव्हा त्यांनी मला त्या पदावरून काढून टाकले.’’
इकडे सेवादलाच्या आम्हा सातआठ जणांचे अभ्यासमंडळ विनायकराव कुलकर्णी चालवायचे. मध्यम उंची, डोक्याला टक्कल, तरतरीत नाक, खादीचे पांढरे शुभ्र धोतर व नेहरूशर्ट-असे त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभाव टाकायचे. समाजवादी विचारांचा विकास यावर त्यांची व्याख्याने व्हायची. प्रभा परुळेकर, सुमतीलाल शहा असे आम्ही सात-आठ जण असायचो. युटोपियन सोशलिझम-म्हणजे स्वप्नाळू समाजवाद ते कार्ल मार्क्सचा शास्त्रीय समाजवाद -अशी वीस-पंचवीस व्याख्याने त्यांनी दिली. कार्ल मार्क्सचे दासकॅपीटल हे पुस्तक त्यांनी दाखवले. त्या वेळी पीपल्स बुक हाऊस या दुकानात मार्क्सचे ग्रंथ खूप स्वस्तात मिळायचे. मी सातआठ घेतले.
एकदा विनायकरावांनी सांगितले- ‘तू त्यात फार गुंतून पडू नकोस. ऐतिहासिक भौतिकवाद, विरोध विकासवाद, वर्गसंघर्ष, समाजवादी क्रांती या पाचसहा संकल्पना नीट समजून घे. आपल्या भारतीय परिस्थितीत समाजवादी धोरणे काय असावीत यावर जास्त वाच आणि विचार कर.’
डॉ. लोहियांनी पंचमढी अधिवेशनात मांडलेला अल्पप्रमाण यंत्राचा विचार त्यांनी समजावून सांगितला. भांडवलशाही व कम्युनिझम हे मोठ्या यंत्रावर आधारलेली व्यवस्था उभारायला सांगतात. आपल्यासारख्या देशाला ते उपयोगाचे नाही वगैरे. शेतीबद्दल ते फारसे बोलायचे नाहीत. मी मात्र स्वतंत्रपणे त्यावर वाचन करत राहिलो.
इंटरला एच.जी.वेल्स यांचे ‘अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड ’ वाचून झाले होते. बी.ए.ला राज्यशास्त्र हा पूरक विषय होता. मात्र इंटरलाच इंग्रजीसाठी जॉन स्टुअर्ट मिलचे ‘ऑन लिबर्टी’ लावलेले होते. मी त्याचा फार बारकाईने अभ्यास केला.
व्यक्तिस्वातंत्र्य हा केवळ राजकीय हक्क नाही, सगळे जीवन मुक्तपणे जगण्याचा माणसाला जन्मसिद्ध हक्क आहे हे चांगले लक्षात आले. लिबर्टी व इक्वालिटी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असेही मी मानू लागलो.
हॅरोल्ड लास्कीच्या ‘ग्रामर ऑफ पॉलिटिक्स’ या ग्रंथामुळे समाजात कायद्याच्या आधाराशिवाय व चौकटीशिवाय व्यक्तिस्वांतत्र्य उपभोगता येत नाही हा मुद्दाही स्पष्ट झाला. बरट्रँड रसेलचे ‘इम्पॅक्ट ऑफ सायन्स ऑन सोसायटी’, तसेच लिन युटांग संपादित ‘आय बिलिव्ह’ हेही वाचून झाले.
मार्क्सची सगळी मांडणी युरोपकेंद्रित आहे असे वाटत होतेच. काँग्रेस समाजवादी पार्टीने सुरुवातीला "आम्ही मार्क्सवाद प्रमाण मानतो" असे म्हटले होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जे. पी., अशोक मेहता, डॉ. लोहिया आदींनी समाजवादी धोरणांची भारतीय संदर्भात स्वतंत्रपणे मांडणी केली पाहिजे असे मांडले.
फक्त कामगारवर्गच क्रांतीचा अग्रदूत आहे हे म्हणणे शेतीप्रधान देशात चुकीचे होय. क्रांतीसाठी सशस्त्र मार्गाचा अवलंब करावा लागेल, तसेच क्रांतीनंतर कामगारवर्गाची हुकूमशाही चालवावी लागेल, आणि उत्पादनसाधनांचे सरसकट राष्ट्रीयीकरण करणे म्हणजेच समाजवाद आणणे होय असे मानणे हेही अयोग्य वाटू लागले. शेतमजूर, छोटे शेतकरी हे वर्ग तसेच दलित, आदिवासी, अन्य मागास जाती यांनी परिवर्तनप्रक्रियेत सहभागी होणे विशेष महत्त्वाचे आहे, असे विचार स्थिरावत गेले.
सोव्हिएट रशियातील स्टॅलिनची राजवट ही सर्वंकष एकाधिकारवादी आहे, याविषयी बरेच साहित्य उपलब्ध होऊ लागले. ‘डार्कनेस अॅट नून’ ही आर्थर कोसलर याची कांदबरी डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी वाटली. मात्र कम्युनिस्टविरोध अशी सरधोपट भूमिका घेणे बरोबर नाही, मार्क्सच्या मांडणीतला काही भाग ग्राह्य मानून पुढे गेले पाहिजे-बियाँड मार्क्स-असे काही जण मांडत होते, ते मला योग्य वाटत होते.
व्यवस्थापरिवर्तनाइतकेच व्यक्तिपरिवर्तन महत्त्वाचे आहे हा गांधीविचार सर्वोपरी महत्त्वाचा आहे. शारीरिक श्रमाला प्रतिष्ठा दिली पाहिजे. साधी राहणी हे नाइलाजाने नव्हे, तर मनावर नको त्या गोष्टींचे ओझे पडू देणे योग्य नाही, या भावनेने स्वीकारली पाहिजे. गरजा कमी ठेवल्या म्हणजे वैचारिक व सांस्कृतिक बाबींना न्याय देणे सोपे जाते असेही लक्षात आले.
हिंदू-मुस्लीम ऐक्य, अस्पृश्यतानिवारण, खादी-ग्रामोद्योगांना प्राधान्य, संपूर्ण साक्षरता, सार्वजनिक स्वच्छता, नशाबंदी, राष्ट्रभाषा-आदी गांधीप्रणीत विधायक कार्यक्रमांतील बाबी समता आधारित समाजरचनेला उपयुक्त नव्हे आवश्यक आहेत असे मत बनले. स्त्रियांना बरोबरीने वागवले पाहिजे हे सेवादलामुळे अंगवळणी पडले होते. समाजवादी व्यवस्थेत कुटुंबसंस्थेला महत्त्वाचे स्थान दिले पाहिजे हा मुद्दा वीणेने ठासून सांगितला व माझ्या मांडणीत ते घालायला लावले.
1949 च्या दिवाळीच्या सुटीत पुण्याच्या बुधवार चौकात ‘भारतीय राज्यघटना’ हे त्र्यं. र. देवगिरीकर यांचे पुस्तक मी विकत घेतले होते. पण ते फारसे समजले नव्हते. 1960 मध्ये लॉ केले, त्या वेळी राज्यघटनेवर एक स्वतंत्र पेपर होता. पण देशाचा मूलगामी कायदा या दृष्टीनेच त्या वेळी अभ्यास झाला. 1963-64 मध्ये पंढरपूरला दत्ता सावळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काही खंड वाचायला दिले. खैरमोडेलिखित डॉ. आंबेडकरांचे चरित्र 1953-54 मध्ये वाचले होते. सावळेंनी ‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ हे पुस्तक वाचायला सांगितले. बाबुराव बागूल यांची ‘जेव्हा मी जात चोरली’ ही कथाही त्यांच्यामुळेच वाचली. त्यासंदर्भात म. जोतीबा फुले यांचे विशेषत: ‘शेतकर्याचा आसूड’ आणि हंटर आयोगाला शिक्षणविषयक दिलेले निवेदन हे वाचून झाले. यामुळे सामाजिक समतेचे अनेक पदर उलगडत गेले.
- पन्नालाल सुराणा
(मनोविकास प्रकाशन, पुणे यांच्याकडून ऑगस्ट 2020 मध्ये प्रकाशित होणाऱ्या 'पायपीट समाजवादासाठी' या पुस्तकातून हे प्रकरण घेतले आहे.)
Tags: पन्नालाल सुराणा आत्मचरित्र वाढदिवस व्यक्तिवेध समाजवाद राष्ट्र सेवा दल एसेम जोशी मोरारजी देसाई स्वातंत्र्ययुद्ध महात्मा गांधी Pannalal Surana Autobiography Rashtra Seva Dal S M Joshi Moraraji Desai Mahatma Gandhi Freedom Stuggle Socialism Socialist Load More Tags
Add Comment