बॅटलशिप पोटेमकिन : आयझेन्स्टाईनचा 100 वर्षानंतरही लक्षात राहणारा मूकपट

युद्धपटांवरील लेखमाला : 6

1925 साली सोव्हिएट युनियनमध्ये तयार झालेला ‘बॅटलशिप पोटेमकिन’ हा मूकपट त्या काळीही खूप गाजला आणि आज या मूकपटाला 100 वर्षांचा काळ होत आला असला तरी आजही हा मूकपट पाहिला जातो, अभ्यासला जातो आणि महत्त्वाचा मानला जातो; इतका, की आयझेन्स्टाईनच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं रशियानं आयझेन्स्टाईन आणि बॅटलशिप पोटेमकिन यांच्या स्मरणार्थ दोन नाणी काढली होती! एखाद्या देशानं आपल्या देशातल्या सिनेदिग्दर्शकाचा इतका मोठा सन्मान करण्याची ही खूप दुर्मीळ घटना असावी. 2012 च्या ‘साईट अँड साऊंड’ या प्रसिद्ध मासिकानं घेतलेल्या सर्वेक्षणामध्ये हा चित्रपट आतापर्यंत झालेल्या सगळ्या चित्रपटांच्या यादीत 11 व्या क्रमांकावर होता.

आयझेन्स्टाईन हा मूकपटांचा दिग्दर्शक आपल्या दृश्यजोडणीचं (मोंटाज) कौशल्य, गर्दीला किंवा जमावाला दृश्यांकित करण्याची खुबी आणि कलाकारांच्या चेहेऱ्यावरचे सूक्ष्म भाव दाखवण्याची हातोटी यामुळे जवळपास सगळ्यात महान दिग्दर्शक म्हटला जातो. आयझेन्स्टाईन हा फक्त सिनेमाचा दिग्दर्शकच नव्हता तर सिनेमा या माध्यमाबद्दल आणि त्यातून दाखवण्यात येणाऱ्या अभिव्यक्तीबद्दल गंभीरपणे विचार करणारा चिंतनशील कलाकार होता. त्यामुळेच त्याला थिअरिस्ट असं म्हटलं जातं. त्यानं रशियाचा इतिहास आणि सामान्यजनजीवन तरलपणे पडद्यावर साकारलं आणि तेही आवाजाशिवाय! तो म्हणतो, ‘‘नाटक किंवा इतर कोणत्याही जुन्या माध्यमाचा आधार न घेता कोणतीही भावना, कोणतीही संकल्पना आणि कोणतीही परिस्थिती सिनेमातून दाखवता येते.’’ त्यानं ही अभिव्यक्ती (एक्सप्रेशन) आपल्या ‘सायलेंट’, ‘स्ट्राईक’, ‘बॅटलशिप पोटेमकिन’ आणि ‘ऑक्टोबर’ अशा अनेक फिल्म्समधून प्रभावीपणे मांडली आहे.

त्यावेळी डिजिटल एडिटिंग नसल्यामुळे आयझेन्स्टाईन सिनेमाचं रीळ चक्क हातात घेऊन एक एक सीन तपासून तो कुठून कापायचा आणि कुठे जोडायचा हे पाहत असे. आणि कात्रीनं चक्क ते रीळ आपल्याला हवं तिथे कापून हवं तिथे जोडत असे. त्यामुळे त्याच्या सिनेमांमध्ये विशेष परिणामकारकता यायची. यालाच ‘मोंटाज’ म्हणतात. त्यानंच या कौशल्याचा पाया घातला. त्याला ‘फादर ऑफ मोंटाज’ म्हणतात. हे तंत्र त्यानं ‘बॅटलफिल्ड पोटेमकिन’ फिल्ममध्ये इतकं प्रभावीपणे वापरलं होतं की या फिल्मला ‘बायबल ऑफ मोंटाज’ असं म्हणतात. ही फिल्म मूकपटांमधली जवळपास सगळ्यात श्रेष्ठ फिल्म मानली जाते आणि आयझेन्स्टाईनचीही सगळ्यात उत्कृष्ट कलाकृती मानली जाते. आजही ही फिल्म जगभरातल्या बहुतेक फिल्म इन्स्टिट्युट्समधल्या विद्यार्थ्यांना शिकवली जाते. या फिल्ममध्ये ‘प्रिन्स पोटेमकिन’ नावाच्या लढाऊ जहाजावरच्या कामगारांनी 1905 साली केलेल्या बंडाची गोष्ट चित्रित केली आहे.

गंमत म्हणजे आयझेन्स्टाईनला सिनेमा या माध्यमाची काहीही पार्श्वभूमी नव्हती आणि तो हे शिकलाही नव्हता. झालं असं की, आयझेन्स्टाईनचे वडील मिखाईल हे आर्किटेक्ट होते. त्यामुळे आयझेन्स्टाईनही आर्किटेक्चरच शिकला होता. आयझेन्स्टाईनचा जन्म 23 जानेवारी 1898 ला लॅटव्हियाला झाला. आयझेन्स्टाईनचे वडील जर्मन होते तर आई ज्युलिया ही रशियन होती. लहानपणी आयझेन्स्टाईन जर्मन, फ्रेंच आणि रशियन भाषा शिकला होता. लहानपणापासूनच त्याला नाटक, सर्कस आणि चित्रकला यांची आवड होती. त्याला व्यंगचित्र काढायला खूप आवडायचं. तो वाचनही खूप करत असे. आपले हे छंद त्यानं पुढे आयुष्यभर जोपासले. तो अकरा वर्षांचा असताना त्याच्या आईनं घर सोडलं आणि आयझेन्स्टाईनला आईबरोबर राहायला जावं लागलं. मधून मधून तो वडिलांना भेटायला जायचा; पण पुढच्या तीनच वर्षांत त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्याचे वडील जुलमीपणानं वागायचे, हे लहानपणी तो बघत होता. त्यामुळेच त्याच्यात समाजातल्या जुलमी राजवटींविरुद्ध बंड करायची आणि निषेध जाहीर करायची वृत्ती निर्माण झाली. त्यानं दिग्दर्शित केलेल्या अनेक सिनेमांमध्ये हा विषय डोकावतो.

1917 मध्ये तो सिव्हिल इंजिनिअरिंग शिकत असताना क्रांती झाली आणि रशियात बोल्शेव्हिकांनी सत्ता काबीज केली. त्यावेळी त्यानं आपलं शिक्षण सोडलं आणि तो सैन्यात भरती झाला. त्याच दरम्यान त्यानं अनेक नाटकांच्या निर्मितीमध्ये भाग घेतला होता. 1920 मध्ये त्यानं सैन्यातली नोकरी सोडली आणि तो मॉस्कोला आला. तिथे त्यानं ‘प्रोलेटकल्ट’ नावाच्या नाटकांच्या चळवळीमध्ये भाग घेतला. पारंपरिक विषयांव्यतिरिक्त आपण राजकीय मतं मांडण्यासाठीही आपल्या कलेचा आविष्कार केला पाहिजे असा या चळवळीचा हेतू होता. त्यातून सोव्हिएत युनियनमध्ये एक चांगला दिग्दर्शक म्हणून त्याचं नाव व्हायला लागलं.

या नंतरच्या काळात आयझेन्स्टाईननं मोंटाजची आपली थिअरी तयार केली. त्यात त्यानं संवादापेक्षाही सेटची रचना, प्रकाशयोजना, पोशाख, आवाज आणि कलाकारांच्या हालचाली या महत्त्वाच्या आहेत असं सांगितलं. एखादी फिल्म ही सलग एखाद्या गोष्टीसारखी न दाखवता लहान लहान तुकड्या-तुकड्यांतून प्रतिकात्मक रुपात दाखवण्यामुळे ती जास्त परिणामकारक होते असं त्याचं मत होतं. वेगवेगळ्या अर्थाचे लहान लहान सीन्स कापून आणि एकमेकांना जोडून त्यातून आपण आणखी व्यापक अर्थाचे सीन तयार करू शकतो असं त्याचं म्हणणं असे. याला तो ‘इंटेलेक्चुअल मोंटाज’ असं म्हणत असे. उदाहरणार्थ, बॅटलशिप पोटेमकिनमध्ये अळ्या पडलेलं आणि वातड झालेलं मांसही खाण्यायोग्य आहे असं म्हणणाऱ्या, चष्मा घातलेल्या अन्यायकारी डॉक्टरला तिथल्या सैनिकांनी चिडून समुद्रात फेकून दिलं. या सीनला जोडून आयझेन्स्टाईननं त्या डॉक्टरचा चष्मा एका लाकडी खांबाला लटकलेला दाखवला आहे. यातून त्याला व्यापक अर्थ दाखवायचा होता. पण त्याच्या या मतावर बरीच टीकाही झाली. काहींनी तर त्याच्या मोंटाजला उपहासानं ‘चॉप चॉप चॉप एडिटिंग’ असंही म्हटलं. आपल्या थिअरीवर त्यानं ‘द फिल्म फॉर्म’ आणि ‘द फिल्म सेन्स’ अशी पुस्तकंही लिहिली. या पुस्तकांनी पुढच्या अनेक दिग्दर्शकांवर प्रभाव पाडला आहे.

1924 साली प्रोलेटकल्टनं 1717 च्या आधी झालेल्या रशियन क्रांतीकारी चळवळी चित्रित करणाऱ्या सिनेमांच्या मालिका कराव्यात असं ठरवलं. त्यात एडवर्ड टिश हा कॅमेरामन असेल आणि आयझेन्स्टाईन हा या फिल्म्स दिग्दर्शित करेल असं ठरलं. स्ट्राईक ही त्यातली पाचवी फिल्म होती. त्यात झारच्या राजवटीमध्ये एका कारखान्यामधले कर्मचारी कसे संपाचं नियोजन करतात हे दाखवलं आहे. या कारखान्याचं व्यवस्थापन अन्यायकारी असतं, ते कामगारांवर गुप्तपणे देखरेख ठेवत असतं आणि यात बाहेरचे गुप्तहेरही आणतं. त्यातच एका कामगारावर चोरीचा खोटा आळ घेतला जातो. हा अपमान सहन न झाल्यामुळे तो गळफास लावून घेतो. या घटनेमुळे कारखान्यातले कामगार आणखी अस्वस्थ होतात आणि संप करण्याचा निर्णय घेतात. संप सुरु होताना कामगारांमध्ये जोश आणि उत्साह असतो. पण नंतर अनेक दिवस संप सुरु राहूनही कारखान्याचं व्यवस्थापन या संपाला दाद देत नाही आणि कामगारांच्या मागण्याही मान्य करत नाही. त्यामुळे हळूहळू कामगारांवर उपासमारीची आणि बेकारीची वेळ येते. शेवटी हा संप मोडून काढायला सैन्याची मदत घ्यावी लागते असं सगळं या फिल्ममध्ये दाखवलं आहे.

या चित्रपटातलं प्रत्येक दृश्य कारखान्यातल्या कामगारांची मानसिक ओढाताण, त्यांचा संताप आणि आपल्या मागण्या अमान्य झाल्यानंतरची त्यांची अगतिकता खूपच परिणामकाराकपणे दाखवतं. यातला प्रत्येक सामान्य कामगार हा या चित्रपटाचा हीरोच होतो.

1925 मध्ये आयझेन्स्टाईनं बॅटलशिप पोटेमकिन फिल्म केली. ही संपूर्ण फिल्म तर गाजलीच पण त्यातले काही सीन्सही स्वतंत्रपणे अभ्यासाचा विषय होण्याइतके गाजले.

पोटेमकिन या युद्धनौकेवरच्या सैनिकांनी झारच्या अधिकाऱ्यांविरुद्ध पुकारलेल्या बंडाचं चित्रीकरण या चित्रपटात केलं आहे. या चित्रपटाच्या सुरुवातीलाच रौद्र समुद्र दाखवलेला आहे. हे पुढे येणाऱ्या अस्थिरतेचं प्रतिक असावं. या युद्धनौकेवरच्या खलाशी-सैनिकांचा कसा छळ केला जातो ते यात दाखवलं आहे. त्यांना दिवसभर राबवून घेतलं जातं; रात्रीही शांतपणे झोपू दिलं जात नाही; आणि त्यांना कुजलेलं, अळ्या पडलेलं मांस खाण्यासाठी आणलं जातं. हे मांस आम्ही खाणार नाही असा पावित्रा सैनिकांनी घेतल्यानंतर त्या जहाजावरचा एक डॉक्टर या मांसाची तपासणी करण्यासाठी येतो. आपल्या डोळ्यावरच्या चष्म्याच्या दोन्ही काचा एकापुढे एक लावून तो त्या मांसाचं निरीक्षण केल्याचा आव आणतो. आणि उघड्या डोळ्यांना धडधडीत दिसत असलेल्या वळवळणाऱ्या अळ्या बघूनही तो ‘यात अळ्या नाहीत. हे तर मेलेले लारव्हे आहेत. हे मांस मिठाच्या पाण्यानं धुतलं तर हे लारव्हे निघून जातील. हे मांस निश्चितपणे खाण्यासारखं आहे.’ असा शेरा मारून तो निघून जातो.

या घटनेमुळे खरंतर सगळ्याच सैनिकांच्या मनात अधिकाऱ्यांविरुद्ध द्वेष भरलेला असतो. त्यामुळे वाकुलिनचुक नावाचा त्यातलाच एक खलाशी-सैनिक जहाजाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध बंड पुकारतो. पण अधिकारी त्याला गोळ्या घालून ठार मारतात आणि त्याला एका दोरीला लटकावून ठेवतात. यातून, बंड केल्यानं काय होतं हे त्या अधिकाऱ्यांना सैनिकांना दाखवायचं होतं. नंतर सगळे सैनिक डेकवर जमतात. त्यावेळी, अजूनही ते मांस खायला कुणाचा विरोध आहे असं अधिकारी त्यांना विचारतात. तेव्हा जे सैनिक पुढे आले त्यांच्या अंगावर एक मोठी ताडपत्री घालून त्यांना मारून टाकायचे आदेश हे अधिकारी इतर सैनिकांना देतात. पण तेवढ्यात आपण सगळे एकच आहोत आणि आपण मिळून या अधिकाऱ्यांचाच बिमोड करायला हवा असं त्यांच्या लक्षात येतं. आणि हे सैनिक ताडपत्रीखाली झाकलेल्या सैनिकांवर गोळीबार करायला नकार देतात. आणि इथून हे बंड आणखी पेटत जातं. फिल्मच्या मध्यावर पोटेमकिन युद्धनौका ओडेसा नावाच्या बंदराजवळ पोहोचते. तिथल्या पायऱ्यांवर झारच्या दडपशाही अधिकाऱ्यांनी सैनिक आणि सामान्य नागरीक यांची कत्तल केली. हा सीन या चित्रपटातला सगळ्यात गाजलेला आणि महत्वाचा सीन मानला जातो. या वेळी अनेक नागरीक आणि सैनिक रुंद पायऱ्यांवरून सैरावैरा पळताहेत, काही पडताहेत, लोक पडलेल्यांच्या अंगावरून पाय देऊन जाताहेत असं दृश्य दाखवलं आहे.


हेही वाचा : व्हेन पॉमेग्रॅनेट्स हाऊल : वर्तमानावरचं भाष्य - मीना कर्णिक


या कत्तलीमध्ये मेलेल्या मुलाला घेऊन एक आई दिशाहीन पळायचा प्रयत्न करतेय. तिच्या चेहेऱ्यावर दुःख, संताप, अगतिकता आणि भीषणता स्पष्ट दिसतेय. तर दुसरी आई आपल्या तान्ह्या बाळाला बाबागाडीत झोपवून या पायऱ्यांवरून घेऊन जात असताना तिला गोळी लागते. पण जोपर्यंत जीवात जीव आहे; तोपर्यंत ही आई आपल्या मुलाची बाबागाडी धरून ठेवते; पण जेव्हा ती स्वतःच कोसळून पडते तेव्हा मात्र बाबागाडीवरची तिची पकड ढिली होते आणि ती बाबागाडी उतारावरून बेलगाम घरंगळत जाते. या दृश्यांतून आयझेन्स्टाईन आईविना मुलाचं आय़ुष्य आता कसं भरकटणार आहे आणि मुलाविना आईचं आयुष्य कसं अगतिक होणार आहे हेच सुचवतो. या सीनमध्ये तो गर्दी आणि चेहरे या दोन्ही परस्परविरोधी गोष्टी ज्या बेमालूमपणे एकमेकांत मिसळतो त्याला तोड नाही. हा आयझेन्स्टाईनच्या कल्पकतेचा उच्चतम बिंदू असावा. अशा प्रकारचा सीन यापूर्वीच्या फिल्म्समध्ये दिसला नव्हता. यातल्या मोंटाजमुळे हा सीन खूपच गाजला आणि या सीनचा अजूनही अभ्यास केला जातो.  विशेष म्हणजे या सीनची नक्कल पुढे जगभरातल्या अनेक सिनेमांमधून झाली आहे.

1927 मध्ये आयझेन्स्टाईननं ग्रामीण जीवन आणि सोव्हिएत शेतीच्या एकत्रिकरणाविषयी ‘द जनरल लाईन’ किंवा ‘ओल्ड अँड न्यू’ नावाची एक फिल्म केली होती. ती पूर्ण होऊन प्रकाशित व्हायला 1929 साल उजाडलं. 1927 च्या सुरुवातीलाच आयझेन्स्टाईननं 1917 च्या क्रांतीवर आधारित ‘ऑक्टोबर’ हा सिनेमा केला होता. हे करताना त्याला घाई झाली होती आणि त्यानं खूप गुंतागुंतीची प्रतिकं वापरली. त्यामुळे खूपच औपचारिक आणि समजायला कठीण म्हणून प्रेक्षकांनी या सिनेमाकडे पाठ फिरवली.

हीच पुनरावृत्ती आयझेन्स्टाईनच्या पुढच्या अनेक चित्रपटांची झाली. कलाकाराला वेळ आणि बजेट यांच्या बंधनातून मुक्त केलं तर त्याच्याकडून उत्कृष्ट कलाकृती निर्माण होईल असं त्याचं म्हणणं होतं. पण अर्थातच काही मर्यादेपलीकडे हे शक्य होत नाही. शेवटी जोसेफ स्टालिनच्या राजवटीतल्या अनेक अधिकाऱ्यांशी आयझेन्स्टाईनचा सतत संघर्ष होत राहिला. स्टालिनच्या अधिकाऱ्यांनीही त्याच्यावर अनेकदा हल्ले केले. त्यामुळे त्याला अनेकदा आपली रहाती ठिकाणं बदलावी लागली. त्यातून त्यानं रशिया सोडायचा निर्णय घेतला आणि 1928 ते 1930 मध्ये त्यानं बर्लिन, झुरिच, लंडन आणि पॅरिस असा युरोपचा दौरा केला.

मे 1930 मध्ये हॉलीवूडच्या पॅरामाऊंट पिक्चर्स या कंपनीनं आयझेन्स्टाईनशी अमेरिकेत फिल्म तयार करण्यासाठी करार केला. आणि 1930 मध्ये आयझेन्स्टाईन हॉलीवूडमध्ये आला. पण आयझेन्स्टाईनला फिल्म्स तयार करायला करारापेक्षा जास्त वेळ लागायला लागला आणि त्यांचा खर्च बजेटच्या बाहेरही जायला लागला. शिवाय आयझेन्स्टाईनचा सिनेमा तयार करायचा दृष्टीकोन अमेरिकेमधल्या लोकांना रुचलाच नाही. या करारात योजना आखल्याप्रमाणे एकही चांगली अशी फिल्म तयार झालीच नाही. त्यात जॉर्ज बर्नार्ड शॉवरही एक फिल्म होणार होती. तीही झाली नाही. शिवाय एच. जी. वेल्सच्या ‘द वॉर ऑफ द वर्ल्ड’ या कादंबरीवर होणारी फिल्मही पॅरामाऊंटला पसंत पडली नाही. शेवटी पॅरामाऊंट आणि आयझेन्स्टाईन यांनी आपला करार मोडला आणि पॅरामाऊंटच्याच खर्चानं आयझेन्स्टाईन रशियाला परत जाण्यासाठी निघाला.

पण तेवढ्यात त्याची गाठ चार्ली चॅप्लिनशी पडली. आणि चार्ली चॅप्लिननं आयझेन्स्टाईननं मेक्सिकोमध्ये फिल्म तयार करावी असं सुचवलं आणि त्याची गाठ अमेरिकन समाजवादी विचारवंत आणि लेखक अप्टन सिन्क्लेअरशी घालून दिली. मग सिन्क्लेअरनं पुन्हा आयझेन्स्टाईनला थांबवून घेतलं. आणि मेक्सिकोवर फिल्म करण्याची गळ घातली. याहीवेळी हेच झालं. मेक्सिकोवर चित्रित करण्याच्या फिल्मला मुळातच काही विषय नव्हता आणि काही पटकथाही नव्हती. तरीही आयझेन्स्टाईन वेगवेगळ्या कोनांतून वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरण करत पूर्ण मेक्सिकोभर फिरला. याहीवेळी बजेट हाताबाहेर गेलं आणि खूप वेळ जाऊनही शेवटी हाती काहीही लागलं नाही.

इकडे रशियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये आयझेन्स्टाईनची गैरहजेरी प्रकर्षानं जाणवायला लागली होती. त्यामुळे रशियन फिल्म इंडस्ट्री आयझेन्स्टाईनला फरारी म्हणून घोषित करावं या मागणीसाठी स्टालिनवर दबाव आणत होती. त्यामुळे आयझेन्स्टाईनला सगळं सामान, पूर्वी शूट केलेल्या फिल्म्सची रिळं आणि सगळंच सोडून ताबडतोब रशियाला परतावं लागलं. रशियाला जाण्यासाठी म्हणून निघालेला असताना कस्टम्सच्या अधिकाऱ्यांना आयझेन्स्टाईनच्या सामानामध्ये शूटिंग केलेल्या फिल्म्सची अनेक रीळं आणि काही समलैंगिक इरॉटिक फिल्म्स सापडल्या. त्यामुळे त्याला तिथेच अटक झाली.

नंतर आयझेन्स्टाईननं शूट केलेल्या मॅक्सिकन फिल्मची मैलोनमैल लांब रिळं एका नवख्या एडिटरकडून एडिट केली गेली आणि त्यातून ‘थंडर ओव्हर मेक्सिको’, ‘आयझेन्स्टाईन इन मेक्सिको’ आणि ‘डेथ डे’ या तीन फिल्म्स तयार केल्या. पण त्या काही फारशा चालल्याच नाहीत.

आयझेन्स्टाईन रशियामध्ये आल्यानंतर त्यानं तिथे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणं सुरु केलं. त्यानं अनेक फिल्म्सचे प्रोजेक्टस हाती घेतले पण त्यातले बहुसंख्य अयशस्वी झाले तर इतर प्रोजेक्टस चालले नाहीत. शेवटी स्टालिनच्याच कृपेनं आयझेन्स्टाईनला ‘वन मोअर चान्स’ हा बोलपट मिळाला. मागच्या दहा वर्षांच्या अपयशानंतर येणारा हा त्याचा पहिलाच चांगला सिनेमा होता. यानंतरही आयझेन्स्टाईन सिनेमे करत राहिला. काही पूर्ण झाले, काही अपूर्ण राहिले; पण आयझेन्स्टाईनबद्दल साहित्य मात्र विपुल प्रमाणात तयार झालं. त्यानं लिहिलेली पुस्तकं, त्याच्या थिअरीजवर आलेली पुस्तकं, त्याच्या अनेक पूर्ण आणि अपूर्ण फिल्म्सची रिळं, त्याची प्रवासवर्णनं, आत्मचरित्रात्मक साहित्य आणि त्याचा विपुल पत्रव्यवहार.. या सगळ्यातून आयझेन्स्टाईन आपल्याला भेटत राहतो. आणि आपल्या आयुष्याची फिल्म वेगवेगळ्या कोनांनी दाखवत राहतो ! पण तो शंभर वर्षांनंतरही अजूनही लोकांच्या लक्षात राहण्याचं एकमेव कारण म्हणजे ‘बॅटलशिप पोटेमकिन’!

- अच्युत गोडबोले
achyut.godbole@gmail.com
(विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय यांसह अनेक विषयांवर विपुल लेखन करणारे अच्युत गोडबोले हे उत्तम वक्ता म्हणूनही परिचित आहेत.)


युद्धपट लेखमालेतील सर्व लेख वाचा या लिंकवर..


बॅटलशिप पोटेमकिन या सिनेमाची लिंक :

 

Tags: अच्युत गोडबोले चित्रपट रशिया-युक्रेन युद्ध पुतीन रशियन चित्रपट मूकपट समीक्षा चित्रपट परीक्षण सिनेमा Load More Tags

Add Comment