सामान्यांतील असामान्यत्व शोधणाऱ्या : गावमातीच्या गोष्टी

मराठवाडा साहित्य परिषद ग्रंथ पुरस्कारांच्या निमित्ताने, सुरेंद्र पाटील यांच्या व्यक्तिचित्रसंग्रहाचा परिचय

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या एकूण पाच ग्रंथ पुरस्कारांपैकी नरहर कुरुंदकर वाङमय पुरस्कार सुरेंद्र पाटील यांच्या 'गावमातीच्या गोष्टी' या व्यक्तिचित्रसंग्रहाला देण्यात आला आहे. या पुरस्कारांचे वितरण डॉ. नागोराव कुंभार यांच्या हस्ते रविवार, दिनांक 30 जून 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता डॉ. ना.गो.नांदापूरकर सभागृह, मराठवाडा साहित्य परिषद, सन्मित्र कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. यावेळी डॉ.शेषराव मोहिते आणि जयद्रथ जाधव हे एकूण पाच पुरस्कार विजेत्या ग्रंथांवर बोलणार आहेत. त्या निमित्ताने 'गावमातीच्या गोष्टी' या पुस्तकावरील लेख येथे प्रसिद्ध करत आहोत. 

सुरेंद्र पाटील हे मोजकेच पण कसदार लेखन करणारे मराठवाड्यातील महत्त्वाचे कथाकार आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. ‘आंतरभेगा’, ‘झुलीच्या खाली’ आणि ‘चिखलवाटा’ या पुस्तकानंतर अलीकडेच त्यांचे हरिती प्रकाशनाने प्रकाशित केलेले ‘गावमातीच्या गोष्टी’ हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक सध्या साहित्य वर्तुळात कौतुकाचा विषय ठरले आहे. 21 दिवसांतच या पुस्तकाच्या 500 प्रती विकल्या जाव्यात यावरून या पुस्तकाची वाचकप्रियता आणि त्याचे वाङ्मयीन मूल्य अधोरेखित होते. 

सुरेंद्र पाटलांचा जन्म खेड्यातील आणि त्यातून भूकंपग्रस्त भागातील. त्यामुळे त्यांच्या व्यक्तीचित्रांत त्यांनी अनुभवलेला परिसर व त्यातील माणसे वास्तवदर्शीपणे साकार होतात. या मातीशी त्यांचे घट्ट नाते आहे. सर्वसामान्य माणूस हा त्यांच्या लेखणीचा केंद्रबिंदू आहे. या माणसांचे दैन्य, दुःख, दारिद्र्य, त्यांची जगण्यासाठी चाललेली धडपड आणि त्यांची घुसमट ही त्यांच्या संवेदनशील मनाला अस्वस्थ करते.

‘गावमातीच्या गोष्टी’ या पुस्तकात आलेल्या सर्वच व्यक्तिरेखांना त्यांनी जवळून अनुभवलं आहे. त्यामुळेच या व्यक्तिरेखा लेखकाच्या लेखणीतून अस्सलपणे साकारलेल्या आहेत. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच “आयुष्याची चिखलवाट तुडवताना प्रत्येकाला अनेक माणसं भेटतात. मलाही भेटली. त्यांच्या प्रभावानं आपलं आयुष्य कधी थरारून उठावं, काळीज थरकापावं आणि पापण्या ओल्या व्हाव्यात” असं जे लेखक लिहितात त्यावरून ही माणसं खरीखुरी आणि वास्तवातील असल्याचा प्रत्यय वाचकाला येतो. अंतःकरणात काहीतरी बोचल्याशिवाय कलाकृती जन्म घेत नाही. ही बोच जेवढी तीव्र आणि खोल असते तेवढीच तीव्रता आणि खोली साहित्याला प्राप्त होत असते. ‘गावमातीच्या गोष्टी’ला प्राप्त झालेली वाङ्मयीन खोली अनुभवल्यानंतर लेखकाच्या मनाची ही बोच वाचकांच्या दृष्टीस पडते. या पुस्तकात एकूण 21 व्यक्तीचित्रणं आली आहेत. या सर्वच व्यक्तींचा सारांशरूपाने आढावा या लेखात घेतला आहे.

पहिल्याच कथेत निसर्गानं आणि परिस्थितीनं ज्याचा जोकर बनवला गेला आहे, असा जेमतेम साडेतीन फूट उंचीचा ‘इज्या’ भेटतो. आपल्या बुटकेपणामुळे तो गावातील लोकांच्या टिंगलीचा आणि हेटाळणीचा विषय ठरतो. परिस्थितीनं गांजून गेलेला बाप इज्याला सर्कशीत जोकर म्हणून विकणार असल्याचं कळतं आणि त्याच्या जीवनात वादळ निर्माण होतं. आपल्या सहनशील व कामसू वृत्तीमुळे लोकांची सहानुभूती कमावलेला इज्या या वादळातून सहीसलामत बाहेर पडतो. भुईला भार होऊन जगण्यापेक्षा स्वतःला कामात गाडून घेणं त्याला महत्त्वाचं वाटतं. निसर्गानं अन्याय करूनसुद्धा कुणाकडे तक्रार न करता जीवनाचा गाडा निमूटपणे हाकणाऱ्या इज्याबद्दल वाचकांच्या मनात कणव निर्माण होते. अशा माणसांना निसर्ग का जन्माला घालतो असाही प्रश्न वाचकांच्या मनात निर्माण होतो.

या कथेत लेखकाने इज्याचे हुबेहूब व्यक्तीचित्र रेखाटले आहे. त्याचं दिसणं, त्याचं हसणं आणि बदकासारखं त्याचं चालणं यातून त्याच्या व्यक्तिमत्त्वातले व्यंग अधिकच गहिरे होत जाते. त्याच्या जगण्याला दुःखाची किनार आहे, तरीही तो हसत हसत जीवन जगतो. तत्कालीन परिस्थितीचे लेखकाचे सूक्ष्म निरीक्षण, गावात आलेल्या सर्कशीचे वर्णन करताना केलेली वातावरणनिर्मिती आणि पात्राच्या तोंडी आलेली ओघवती बोलीभाषा यामुळे ही कथा वाचनीय झाली आहे.

‘जानका काकू’ ही कथा आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीतील वर्णन करतानाच भारतीय स्त्रीचे महात्म्य, कुटुंबासाठी तिचे झिजणे, तिचा त्याग, तिची सोशिकता, कुटुंबवत्सलता आणि तिचा समंजसपणा याचे चित्रण करते. थोरल्या सवतीला बहिणीसारखी जपणारी, रंगाने गोरीपान, देखणी, कमरेला चांदीचा कमरपट्टा, पायात जोडवी, हातात पाटल्या घातलेली जानका काकू लेखकाने अत्यंत लोभसपणे दाखवली आहे. नवऱ्यावर एकतर्फी प्रेम करणारी काकू खरंतर नवऱ्याने तिसऱ्याच बाईशी घरोबा केल्यावर कोलमडून पडली असती. पण ती वडाच्या झाडासारखी स्वतःला सावरते. नवऱ्याने धोका देऊनही त्याच्यावरील निष्ठा थोडीही ढळू न देणाऱ्या काकूचे लेखकाला आश्चर्य वाटते. ती परिस्थितीशी टक्कर देत खंबीरपणे उभी राहते. या काकूबद्दल लेखकाच्या मनात सहानुभूती आहे. अत्यंत हळुवारपणे आणि भावनोत्कटतेने जानका काकूचे घडवलेले दर्शन वाचनीय झाले आहे. जानका काकू ही भारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्तिरेखा वाटते.

सत्ता आणि संपत्तीचा हव्यास यांतून निर्माण झालेली व्यवस्था एखाद्या नीतिमान माणसाचा बळी कशी घेते, याचे ज्वलंत चित्रण ‘पोस्टमास्टर शेषराव गुरुजी’ या व्यक्तीचित्रात येते. गरिबांचा कैवारी, निराधारांचा आधार, माणुसकीचा निर्मळ झरा ही विशेषणे ज्यांना सार्थ लागू पडावीत असं व्यक्तिमत्त्व म्हणजे शेषराव गुरुजी होत. शेषराव गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वातील सोज्वळपणा, प्रामाणिकपणा आणि त्यांची बाणेदार वृत्ती लेखकाने अतिशय ठसठशीत शब्दांत चित्रित केली आहे.

शेषराव गुरुजींच्या वाट्याला काही विपरीत अनुभव येतात. जवळचीच माणसं जेव्हा विश्वासघात करतात तेव्हा दोष कोणाला द्यावा असा प्रश्न त्यांना पडतो. स्वतःच्या वडिलांनी आणि बहिणीने केलेली फसवणूक रक्ताच्या नात्याला ठेच पोहोचवणारी वाटते. शेषराव गुरुजींना सर्वसामान्य माणसाबद्दल असलेली कळकळ, त्यांच्या अंतःकरणात वसत असलेली सामाजिक बांधिलकी, गावाला आदर्शत्वाकडे नेण्याची त्यांची धडपड पाहून ‘पांव धो के पानी पिना शेषराव गुर्जी के’ अशी त्यांची प्रतिमा गावात निर्माण होते. पण गावातील गलिच्छ राजकारणामुळे कथेच्या शेवटी शेषराव गुरुजींना पोस्टमास्तर आणि सरपंच अशी दोन्ही पदे गमवावी लागतात, तेव्हा वाचकांचे मन विषण्ण होते. 

भूकंपापूर्वीचे आणि भूकंपानंतरच्या जीवनाचे चित्रण यात येते. या परिसराला भूकंपाने जेवढे हादरे दिले त्याहीपेक्षा कैकपटीने हादरे भूकंपानंतरच्या पुनर्वसनाने दिले. या पुनर्वसनाने लोकांच्या नैतिकतेचा ऱ्हास झाला. सगळं काही आपणालाच मिळावं ही स्वार्थी वृत्ती बोकाळली. या वृत्तीला ठेच पोहोचवणाऱ्या लोकांचा या व्यवस्थेने बळी घेतला. या पुनर्वसन प्रक्रियेचा बळी म्हणजे पोस्टमास्तर शेषराव गुरुजी होत. या पोस्टमास्तर शेषराव गुरुजींच्या निमित्ताने तत्कालीन परिस्थिती, भूकंपानंतर लोकांमधील नैतिक मूल्यांचा झालेला ऱ्हास, गावात शिरलेले गढूळ राजकारण याचे जे वास्तवदर्शी चित्रण लेखकाने केले आहे, ते वाचून वाचक अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर सत्ता आणि संपत्तीच्या मोहाला बळी न पडता स्वतःची तत्त्वं प्राणपणाने जपणाऱ्या शेषराव गुरुजींबद्दल वाचकांच्या मनात सहानुभूती निर्माण होते. हे व्यक्तिचित्र नैतिकता आणि अनैतिकता यांच्यातील सीमारेषा स्पष्ट करते.

‘जंगमाचा राजा’ ही एका मतिमंद असहाय मुलाच्या जगण्याची कथा आहे. ‘राजा झाडासारखा वाढला पण त्याच्या बुद्धीचा विकास झाला नाही.’ या वाक्यातून एकाच वेळी लेखकाने त्याच्या जगण्यातील विसंगती आणि त्याच्याबद्दल वाटणारी सहानुभूती सूचित केली आहे. मतिमंद राजाचे भावनाशील चित्रण यात येते. अशी मुलं जन्माला येणं हा कुटुंबासाठी शाप समजला जातो. अशा मुलांना सांभाळणं ही त्या कुटुंबासाठी तारेवरची कसरत असते. घरातून बाहेर पडलेली ही मुलं कुठे जातील हे सांगता येत नाही. जंगमाचा राजाही असाच बेपत्ता होतो. त्याचा शोध घेताना राजाच्या वडिलांचा त्याच्यावर असलेला जीव आणि त्यांचा होणारा भावनिक कोंडमारा याचे प्रत्ययकारी दर्शन इथे घडते. राजाचं चालणं, बोलणं, त्याचं वागणं हे केवळ त्याच्यापुरतं मर्यादित राहत नाही तर ती वैश्विक जाणीव बनते. सामान्य माणसांबद्दल असलेली कळकळ हीच सुरेंद्र पाटलांच्या लेखणीमागील प्रेरणा वाटते.

‘इनामातले दादा’ या कथेत लेखकाने आपल्या आजोबांचे बहारदार व्यक्तिचित्र रेखाटले आहे. त्यांचा रुबाबदारपणा, पांढराशुभ्र ऐटदार फेटा, चेहऱ्यावरील हसू, आवाजातील गोडवा आणि वाड्यावर असलेली त्यांची दहशत ही आजोबांच्या व्यक्तिमत्त्वाची काही ठळक वैशिष्ट्ये म्हणता येतील. पुस्तकांच्या आणि कीर्तनाच्या सहवासात रमणाऱ्या आजोबांचे कलासक्त जीवन यात लेखकाने चितारले आहे. गावाची पाटीलकी, घोड्यावरून त्यांचे ऐटदार फिरणे आणि गावावर असलेला त्यांचा प्रभाव पाहून पिढ्यानपिढ्या पाटीलकी अनुभवलेल्या एका प्रभावशाली पाटलाचे दर्शन यात घडते.

लेखकाची आजी वारल्यानंतर दादांचे एका बाईला शेतात ठेवून घेणे आणि तिच्यासोबत संसार थाटणे ही गोष्ट लेखकाचे वडील आणि आजोबा यांच्यातील संवाद हरवण्याला जबाबदार ठरते. असे असले तरी आजोबांच्या आजारपणात लेखकाच्या वडिलांनी आणि आईने दादाची केलेली सेवा ही आपल्या संस्कृतीचे आणि एकत्र कुटुंबपद्धतीचे महात्म्य दर्शवते. लेखकाला आणि त्यांच्या भावंडांना आजोबाचा लळा असण्याचे कारण म्हणजे, आजोबांची पुस्तकांनी भरलेली लाकडी संदूक. ही संदूक म्हणजे लेखकाला अलीबाबाची गुहा वाटते. इनामात राहणाऱ्या दादांनी अवांतर वाचनाचा प्रचंड छंद जोपासला होता. या पुस्तकांनीच लेखकाच्या भावजीवनाला आकार दिला होता. ‘पोरा, डोळे जायचे रे, उजेडात वाचत बसावं’ आजोबांचं हे वाक्य लेखकाच्या मनात घर करतं.

कथेच्या शेवटी लेखकाने दादांच्या आजारपणाचे आणि त्यांच्या अंत्ययात्रेचे अत्यंत करूण चित्रण केले आहे. वरकरणी ओबडधोबड वाटणारी ही कथा शेवटच्या क्षणी मात्र मनाला चटका लावून जाते. कथा वाचल्यानंतर बराच काळपर्यंत इनामातले दादा वाचकांच्या डोळ्यापुढे तरळत राहतात, हे या व्यक्तिचित्रणाचे यशच म्हणावे लागेल.

‘धोंडराम तात्या’ या कथेत वेडसरपणाचा शाप घेऊन जगणाऱ्या एका भोळ्याभाबड्या व्यक्तीचे चित्र रेखाटले आहे. लौकिकार्थाने वेडसर ठरलेल्या पण जाणिवांच्या कक्षांना सिमीत ठेवलेल्या धोंडराम तात्याचे वागणे अनाकलनीय वाटते. तात्यांना बायको आहे, एक मुलगी आहे. शेतात काम करताना ते एकदा उंचावरून पडले आणि त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला. तेव्हापासून त्यांचे वागणे बदलले. घरातील कर्त्या माणसाच्या वाट्याला असे दुःखदायक जीवन आल्यावर घरातील माणसांच्या काळजाला किती चिरा पडतात याची जाणीव ही कथा वाचताना होते.

तात्याचे असंबद्ध बोलणे, तासनतास एकच काम करत राहणे, स्वतःशीच हसणे, वाड्यातील प्रत्येकाच्या घरी जाणे; पण कुणाशी न बोलताच परत येणे या वरवर पाहता वेडसरपणाच्या कृती ठरतीलही पण त्यांचे मूक राहणे, निरूपद्रवी वागणे आणि भग्न वाड्यात एकाकी जाऊन बसणे या कृतींना काही गूढ अर्थ आहे का असाही प्रश्न वाचकांच्या मनात निर्माण होतो.

धोंडराम तात्याच्या मूक संवेदना वाचकांच्या मनात घर करतात. या निमित्ताने लेखकाने ग्रामीण भागाचे वास्तववादी चित्र रेखाटले आहे. ग्रामीण बोलीभाषा आणि परिसर यांचे जिवंत रेखाटन यात येते. ‘भूकंपग्रस्त भकास परिसर आणि धोंडराम तात्याची उजाड मनोवस्था’ यात एकरूपता साधून लेखकाने या व्यक्तिचित्राला अधिकच अमूर्त बनवले आहे. 

सुरेंद्र पाटील 

‘लक्ष्मण मामाची मळगी’ या कथेत लेखकाने निःस्पृह वृत्तीने जीवन जगणाऱ्या लक्ष्मण मामाचे व्यक्तिचित्र शब्दबद्ध केले आहे. दुसऱ्यांसाठी जगण्यात आनंद मानणारी माणसं दुर्मीळ असतात. लक्ष्मण मामाही याच श्रेणीतील आहेत. लक्ष्मण मामा वाचकांच्या लक्षात राहतात ते त्यांच्यातील दातृत्व वृत्तीमुळे! लोकांनी आपल्या शेतातील गुऱ्हाळावर रस प्यायला यावं म्हणून गावात दवंडी द्यायला लावणारे लक्ष्मण मामा आणि त्यांची मळगी साऱ्या पंचक्रोशीतील लोकांच्या औत्सुक्याचा विषय ठरते. ही माणसे एवढ्या उमद्या मनाने कशी जगतात? यांच्या जगण्याच्या प्रेरणा कोणत्या असाव्यात? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या दानशूर वृत्तीतच दडलेले असावे. लेखक आणि त्यांच्या मित्रांनी मामाच्या मळगीचा आणि त्यांच्या पाहुणचाराचा मनमुराद आनंद लुटला आहे. मुळात अशी मळगी उभी करणं हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचं आणि जिकीरीचं काम. साखर कारखान्याचा अभाव असणाऱ्या काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या मळगीचा मोठा आधार वाटायचा.

या कथेचा शेवट वाचकाला अण्णाभाऊंच्या ‘स्मशानातील सोनं’ या कथेतील भीमाची आठवण करून देतो. आपली बोटे तुटली म्हणून भीमा आक्रोश करीत नाही तर उद्या मी कसा जगणार या प्रश्नाने त्याचे मन आक्रोशू लागते. लक्ष्मण मामालाही आपली दोन बोटं चरख्यात गमवावी लागली याबद्दल त्यांच्या मनाला खंत वाटत नाही; तर दातृत्वासाठी पंजा शाबूत असल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर विलसते. अर्थात या दोन कथांची तुलना होऊ शकत नाही. कारण दोघांच्याही जगण्याच्या प्रेरणा वेगवेगळ्या आहेत. पण एवढे मात्र नक्की की, लक्ष्मण मामा आणि त्यांची मळगी काळाच्या ओघात लुप्त झाल्याची खंत वाचकांच्या मनाला बोचत राहते.

लेखकाच्या घरी सलग 16 वर्षं सालगडी म्हणून इमाने इतबारे सेवा केलेल्या एका प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्तीचे चित्र ‘राम धनगर’ या कथेत रेखाटले आहे. पिठाच्या गिरणीत आणि रानात रमताना त्याचा कुठेच तोल ढळत नाही हे विशेष! यासाठी पराकोटीची नैतिकता आणि जीवन जगण्याचं भान असावं लागतं. सुरेंद्र पाटलांना भेटलेल्या माणसांचा हाही एक विशेषच म्हणावा लागेल की, त्यांनी हे भान पुरेपूर जपलं आहे. राम सालगडी असला तरी तो लेखकाच्या कुटुंबाचा सदस्य म्हणूनच भेटतो. अर्थात नात जुळण्याची प्रक्रिया दोहो बाजूंनी घडते. माया, प्रेम, जिव्हाळा आणि विश्वास या नैतिक मूल्यांवर नात्यांचे बंध गुंफले जातात. असेच एक निखळ नाते राम धनगर आणि लेखकाचे कुटुंब यांच्यात पाहायला मिळते. ‘प्रेम घ्यावे, प्रेम द्यावे’ हे जीवनाचे सर्वोत्तम तत्त्वज्ञान इथे दृष्टीस पडते. लेखकाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर राम मामाचा दिसणारा भकास चेहरा आणि राम मामाच्या जाण्याने लेखकाचे होणारे उदास मन ही निर्व्याज प्रेमाची परतफेड ठरते.

जन्माने प्राप्त झालेल्या नात्यातील एक सुंदर आणि मुलायम धागा म्हणजे आत्या. आपल्या वंशावळीच्या भूतकाळाची ती साक्षीदार असते. मानवी जीवनाला समृद्ध करणाऱ्या नात्यातील आत्या हे एक असंच रमणीय नातं. ‘हत्तरग्याची आत्या’ या व्यक्तिचित्रात लेखकाने आपल्या प्रेमळ, कर्तबगार आणि कुटुंबवत्सल आत्याचे भावनाशील दर्शन घडवले आहे. आत्याचा सहवास प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. लेखकावर तिचा असलेला जीव, तिच्या स्वतःच्या कुटुंबाची तिला असलेली काळजी आणि माहेरच्या प्रेमळ माणसांची तिला असलेली ओढ यातून आपल्या ग्रामसंस्कृतीतील सुंदर अशा कुटुंबपद्धतीचे लोभसवाणे दर्शन येथे घडते. पण याच आत्यावर जेव्हा दुर्धर प्रसंग ओढवतो, तेव्हा नात्याच्या सुंदर आठवणीने मन कधी फुलून येते; तर त्यांच्यावर झालेल्या आघाताने ते कधी जखमेसारखे भळभळते. या दोन्ही भावनांचे हळुवार वर्णन या व्यक्तिचित्रातून घडते. त्याबरोबरच मानवी जीवनातील नकोशा वास्तवाचीही ती जाणीव करून देते.

गोंधळी हा गाव-मातीचा स्पर्श झालेला समाज. गावाचा तो अविभाज्य घटक आहे. असे मानले जाते की, लग्नासारख्या शुभकार्यात घरात गोंधळ वाजवल्याने आपले कार्य निर्विघ्नपणे पार पडते आणि घरात सुख लाभते. ‘गोरख गोंधळी’ या व्यक्तिचित्रात लेखकाने आपल्या गावातील गोरख नावाच्या गोंधळ्याचे सश्रद्ध व्यक्तिचित्र रेखाटले आहे. ही कथा गावमातीचे प्रतिनिधित्व करणारी वाटते. गोंधळ्याचे ग्रामसंस्कृतीतील स्थान ती अधोरेखित करते.

पाच फूट उंची, गुटगुटीत गोल शरीर, डोक्यावर स्वच्छ टोपी, गळ्यात देवीची प्रतिमा आणि कवड्याची माळ घातलेल्या गोरख गोंधळ्याचे आणि त्याच्या बारीकसारीक हालचालीचे प्रभावी दर्शनी इथे घडते. लोककला जिवंत ठेवणाऱ्या या गोरखबद्दल लेखकाच्या मनात अपार करुणा आहे. या व्यक्तिचित्राचा विशेष म्हणजे, गोरखची या लोककलेवर असलेली अपार निष्ठा होय. गोंधळ हे गोरखच्या उपजीविकेचे साधन तर आहेच; पण तो खरा जातिवंत कलावंत आहे. ‘धा किल्लो वज्जं आसतंय संबळाचं, पर भक्तीत बुजलं की सारं हालकं व्हतंय’ या त्याच्या वाक्यातून या लोककलेवर त्याची असलेली निष्ठा आणि संबळीबद्दलची अपार भक्ती प्रकट होते. आपल्या मुलानेही ही परंपरा पुढे चालवावी असे त्याला तीव्रतेने वाटते. गोंधळ्याचे व त्याचे जीवनाचे चित्रमय दर्शन लेखकाने या गोरखच्या माध्यमातून घडवले आहे. 

‘भाऊलोक’ या व्यक्तिचित्रातून लेखकाने आपल्या दोन्ही वडील भावांचे हृदयस्पर्शी चित्रण केले आहे. थोरल्या भावाचा संमंजसपणा आणि मधल्याचा खोडकरपणा चितारतानाच या कुटुंबातील चढउताराचे दर्शन यातून घडते. या व्यक्तिचित्रातून लेखकाचे चरित्रही साकार होत जाते. ‘भाऊलोक’ म्हणजे लेखकाच्या कुटुंबाचेच व्यक्तिचित्र आहे. या कुटुंबातील प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा चितारतानाच त्यातील ताणतणावांचे अत्यंत संवेदनशील चित्रण यात आले आहे. ओघवती भाषाशैली, नात्यातील भावनिक गुंफण, या नात्याला झालेला गोडतेचा स्पर्श आणि कथानकाला प्राप्त झालेली गतिमानता यामुळे हे व्यक्तिचित्र वाचकांच्या मनाची पकड घेते. वाचकाला त्यात गुंतवून ठेवते. 

‘भाऊसाब मामा’ या व्यक्तिचित्रात लेखकाने शेतकरी संघटनेला वाहून घेतलेल्या एका निष्ठावान कार्यकर्त्याच्या जीवनाची शोकांतिका चित्रित केली आहे. शेतीबाडी, आडत, संसार हे सगळं काही सुरळीत चालू असताना मामाला शेतकऱ्यांच्या शोषणाची जाणीव होते आणि ते शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध पेटून उठतात. मामाचं घर म्हणजे चळवळीचं केंद्र बनतं. सहा फूट उंची, धिप्पाड शरीरयष्टी लाभलेल्या मामाचा लोकसंग्रह दांडगा होता. कार्यकर्त्यांवर पुत्रवत प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या मोठेपणातच समाधान मानणाऱ्या मामासारखी माणसं महाराष्ट्राच्या राजकारणात अपवादानेच आढळतील. त्यांच्या विचारांना नैतिकतेचे अधिष्ठान होते. त्यामुळे स्वहिताचा विचार त्यांच्या मनाला कधी स्पर्शून गेला नाही.

निष्ठावंत कार्यकर्ता स्वतःच्या विचारांशी कधीच तडजोड करीत नाही. भाऊसाब मामाही याच वृत्तीने जगले. त्यामुळे त्यांच्या वाट्याला विसंगत अनुभव आले. स्वकीयांचा रोष, शेती, आडत, संसार याकडे झालेले दुर्लक्ष, घरातील वाटण्या आणि कार्यकर्त्यांची झालेली पांगापांग यामुळे एकाकी पडलेल्या मामांना अर्धांगवायू होतो आणि त्यांची वाचा बंद पडते. याबरोबरच शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे त्यांनी पाहिलेले स्वप्नही उद्ध्वस्त होते. मामाची ही व्यथा एका बाजूला वाचकाला अस्वस्थ करते तर दुसऱ्या बाजूला ती कार्यकर्त्यांना जागरूकतेचा संदेश देऊ पाहते. भाऊसाब मामांच्या व्यक्तिचित्रातून तत्कालीन शेतकरी संघटना, राजकीय चळवळी, समाजमनावर असलेला काँग्रेस पक्षाचा प्रभाव, निवडणुका, प्रचारांची रणधुमाळी याचे प्रभावी दर्शन घडते.

या व्यक्तिचित्रांबरोबरच या पुस्तकातील जातीची ना गोताची परंतु लेखकाच्या कुटुंबात ‘माय’चं स्थान मिळवलेली पार्बतमावशी, लेखकाच्या कुटुंबाला पडत्या काळात धीर देणारा तिरमुक जावळे, एखाद्या चरित्रात्मक कादंबरीचा नायक ठरावा असे डिगूदादा, समाजाला शिकण्यासाठी प्रेरणा देणारा घनश्याम सरवदे या सर्वच व्यक्तिरेखा वाचकांच्या मनावर विलक्षण ठसा उमटवून जातात.

‘गावमातीच्या गोष्टी’ या व्यक्तिचित्रातील माणसांचा विचार केला तर, या माणसांबद्दल लेखकाच्या मनात प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी असल्याचे पदोपदी जाणवते. या माणसांशी लेखकाचे भावनिक नातं आहे. ही माणसं सामान्य आहेत. ती फार मोठी किंवा लोकोत्तर नाहीत. आपल्या अवतीभवतीच्या परिसरात वावरणारी ही माणसं आहेत. विशेषतः लेखकाच्या लामजना या गावातील आणि परिसरातील ही माणसं आहेत. काही माणसं लेखकाच्या नात्यातील तर काही त्यांच्या अवतीभोवती वावरणारी आहेत. पण या माणसांचं वर्णन लेखकांनी एवढ्या ताकदीने घडवलं आहे की, ती स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून वैश्विक रूप धारण करतात. कुठल्याही गावात आणि कुठल्याही मातीत ती दिसून येतात. म्हणून या पुस्तकाला दिलेले ‘गावमातीच्या गोष्टी’ हे शीर्षक सार्थ वाटते.


हेही वाचा : उसवण : फाटलेल्या आयुष्याला मेहनतीच्या धाग्यांनी शिवू पाहणाऱ्या विठोबा शिंप्याची कहाणी - शीतल शामराव चव्हाण


इज्या, जानका काकू, जंगमाचा राजा, राम धनगर, पोपट्या, गोरख गोंधळी, पार्बत मावशी ही माणसं सामान्यच आहेत; पण त्यांच्या जीवन जगण्याच्या शैलीमुळे ती इतरांपेक्षा उठून दिसतात. जगण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे. त्यांच्यासमोरही काही मूलभूत प्रश्न आहेत. पण या प्रश्नामुळे ती गांगरून गेली नाहीत. अत्यंत शांतपणे ती जीवनाला सामोरी जातात. ही माणसं निराशावादी नाहीत तर ती आशावादी आहेत.

मुळात व्यक्तिचित्रण लिहिणे ही तारेवरची कसरत असते. व्यक्तिचित्र रेखाटताना लेखकाला ती व्यक्ती तिच्या गुणदोषासकट वाचकांसमोर उभी करावी लागते. सुरेंद्र पाटलांनी लिहिलेल्या व्यक्तींमध्ये काही दोषही आहेत; परंतु त्या दोषांचे डाग त्यांनी व्यक्तिचित्रावर कुठेही उमटू दिले नाहीत, हे त्यांच्या लेखनशैलीचे कौशल्य म्हणावं लागेल. या माणसांच्या जगण्याचा शोध घेताना त्यांचा कुठेही तोल गेल्याचे जाणवत नाही. अत्यंत संयमाने आणि खुबीने त्यांनी या माणसांचे स्वभावविशेष टिपले आहेत. 

लामजना आणि परिसराचे यथार्थ जीवनदर्शन या व्यक्तिचित्रांतून घडते. या परिसरातील ग्रामसंस्कृती, तेथील गावगाडा, समूहजीवन, लोकजीवन, त्यात शेतीला असलेले महत्त्व, रूढी, चालीरीती, परंपरा, कुटुंबसंस्था, त्यातील नातेसंबंध, नात्यांतील भावनिक गुंतागुंत या बाबींचे प्रत्ययकारी दर्शन घडते. त्याचबरोबर भूकंपापूर्वीचे आणि भूकंपानंतरचे त्यांचे जीवन, भूकंपाने या लोकांची बदललेली मानसिकता, त्यांच्या जीवनशैलीत घडून आलेला अमुलाग्र बदल, ढासळलेली नीतिमत्ता या सगळ्या बाबींचे त्यांच्या वृत्तीप्रवृत्तींसह झालेले दर्शन यथार्थ वाटते. 

या व्यक्तिचित्रांचा आणखी एक विशेष म्हणजे, या माणसांच्या तोंडी आलेली बोलीभाषा होय. मराठवाडा आणि कर्नाटक यांच्या सीमारेषेवरील वैशिष्ट्यपूर्ण बोलीभाषेचा वापर येथे आढळतो. निजामाच्या 900 वर्षांच्या गुलामगिरीचे चटके सहन केलेला हा भाग असल्याने निजामकालीन उर्दू भाषेचाही प्रभाव या भाषेवर जाणवतो. या भाषेचे काही विशेष आहेत. क्रियापदांची संक्षिप्त रूपे या बोलीभाषेत वापरली जातात. उदा., जमलनी (जमले नाही) , आलनी (आले नाही), करलालाव (करीत आहे) , राव्ह ए (राहा रे) अशा संक्षिप्त क्रियापदांमुळेच लातुरी बोलीचे वेगळेपण नजरेत भरते. पात्राच्या तोंडी बोलीभाषा आणि निवेदनासाठी प्रमाण भाषा या दोन्हींचा वापर लेखकाने अत्यंत समर्थपणे केला आहे. ‘अनेक रस्ते उगवलेत या भग्न गावात.’ किंवा ‘पूर्वीच्या वाटा हरवल्यात’ या निवेदनात्मक भाषेला जशी आलंकारिकता लाभली आहे, तद्वतच भयाण वास्तवाची सूचकताही प्राप्त झाली आहे. या भाषेमुळेच ‘गावमातीच्या गोष्टी’चे वेगळेपण अधोरेखित होते.

लेखक सिद्धहस्त चित्रकार आहेत. ज्या व्यक्तीचे चित्र त्यांनी शब्दबद्ध केले आहे, त्या व्यक्तीच्या अंतरंगात शिरताना ते प्रथमतः लेखकाच्या रेखाटनातून अवतरते. या वैशिष्ट्यपूर्ण रेखाटनामुळे ही व्यक्तिचित्रे वाचकांना पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन जातात. हेही या पुस्तकाचे एक वेगळेपण म्हणता येईल.

लेखकाच्या गतकालीन जीवनाचे, त्यांच्या अनुभवांचे, त्यांना भेटलेल्या माणसांच्या अंतरंगाचे, त्यांच्या वृत्तीप्रवृत्तीसह शब्दांच्या आणि चित्रांच्या माध्यमातून केलेले हे रेखाटन अत्यंत वाचनीय झाले असून मराठी ललित गद्याचे दालन निश्चितच समृद्ध करणारे आहे. या पुस्तकाचे अनिल डी सोनावणे यांनी केलेले मुखपृष्ठ आकर्षक झाले असून ते बघताक्षणी वाचकांच्या नजरेत भरते. पुस्तकाची बांधणी, त्याचा आकार आणि त्यासाठी केलेला वैशिष्ट्यपूर्ण कागदाचा वापर हे रूढ पद्धतीला बगल देऊन केल्याने या पुस्तकाला नाविन्य प्राप्त झाले आहे. 
लेखकाच्या पुढील साहित्यकृतीस खूप खूप शुभेच्छा!

गावमातीच्या गोष्टी
लेखक: सुरेंद्र पाटील
हरिती पब्लिकेशन्स, पुणे
मूल्य : 250 रु. पाने :

- डॉ. नरसिंग वाघमोडे, लातूर    

Tags: साहित्य पुस्तक परीक्षण समीक्षा सुरेंद्र पाटील व्यक्तिचित्र नरसिंग वाघमोडे गावमातीच्या गोष्टी साधना डिजिटल Load More Tags

Comments: Show All Comments

SUDHIR SHERE

सखोल पुस्तक परिचय...

सोमेश्वर पाटील

खूप छान लेखन, ग्रामीण भागातील माणुसकीचे दर्शन . खूप दिवसांनी असे पुस्तक वाचावयास मिळाले.

Vivekanand Eknath Chinchole

Hearty Congrats Dr. NSW.

ज्ञानदेव राऊत

अतिशय तपशीलवार व अभ्यासपूर्ण लेख. पुस्तक वाचनाची ओढ लावण्यास भाग पाडणारा लेख. आवडला.

Devidas saudagar

गावमातीच्या गोष्टीची सविस्तर दखल घेतली आहे. यामध्ये भेटणारी माणसं लक्षात राहतात. भूकंपग्रस्त माणसांच्या जगण्याचा हा एक प्रकारे संदर्भग्रंथ आहे

डॉ. किरण सगरे पाटील

आज सुरेंद्र पाटलांच "गावमातीच्या गोष्टी" हे पुस्तक हातात पडले खूप दिवसापासून या पुस्तकाबद्दल कुतुहल होते. वेगवेगळ्या माध्यमांमधून या पुस्तका बद्दल खूप कौतुक ऐकलं होतं आणि त्यातल्या त्यात सुरेंद्र पाटील हे आमच्या आत्यांचे चिरंजीव ,म्हणजे आमचे ' आत्तेभाऊ' आमच्या गावचे भाच्चे असल्यामुळे शिवनी बद्दल काही ना काही यामध्ये असणार याची उत्सुकता होती. एकूण 21 व्यक्तिरेखा असलेले हे पुस्तक अत्यंत दर्जेदार लेखन कौशल्याने, रांगड्या माणसाचे रांगड्या भाषेत केलेले वर्णन उत्सुकतापूर्ण आहे. इतर सर्व व्यक्तिरेखा तर खूप मौलिक दस्तावेज बनल्या आहेतच त्यातल्या त्यात भाऊसाहेब तात्या व लक्ष्मण तात्या या दोघांच्या व्यक्तिरेखा अगदी हूबेहूबच साकारल्या आहेत. पुस्तक वाचताना प्रत्येक प्रसंग हा डोळ्यासमोर प्रत्यक्षात दिसतच होता आणि हा शिवनी गावचा दस्तावेज सुद्धा तितकाच चांगला रेखाटला गेला आहे जो येणाऱ्या पिढ्यांना एक मार्गदर्शक ठरेल. पुस्तक वाचताना सुरेंद्र पाटलांचा मातीशी असलेला घट्ट संबंध व त्यांनी अनुभवलेल अवलोकन माणसाला त्याच्या गाव मातीशी घट्ट करते. असा दर्जेदार लेखक आपल्या परिसरात लेखन करतोय हे आपल्या परिसराचे सौभाग्य मानतो. सोशल मीडियाच्या काळात वाचन संस्कृती दृढ करून ती घराघरात पोहोचवण्यासाठी आज असं दर्जेदार साहित्य उपयोगी होत आहे. प्रत्येकानं त्यांच्या लेखनाचा आस्वाद एकदा घेतलाच पाहिजे, त्यांच्या पुस्तकाच्या यशस्वीतेसाठी मी त्यांना शुभेच्छा प्रेषित करतो..! स्वास्थ्य किरण*

प्रा.डाॅ.दुष्यंत आनंदराव शिंदे-पाटील, जाजनूरकर

'माणदेशी माणसं' या मराठी कथाविष्वातील अजरामर कथासंग्रहानंतर गावमातीच्या गोष्टी -'लामजणदेशी माणसं' हा कथासंग्रह सर्वच अंगानी दर्जेदार व सकस आहे. खरोखरच सामान्यातील असामान्यत्व शोधणारा कथासंग्रह हे शीर्षक सर्वार्थाने सुयोग्य आहे.

विकास दत्ता पांढरे

अस्सल ग्रामीण लेखक. अनुभव संपन्न लेखन. विस्तृत परिचयातून लेखकाचे 'साहित्य दर्शन' झाले.

डॉ.प्रदीप पाटील, औराद शहाजानी

प्रा.सुरेंद्र पाटील सर आमच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयाचे भूषण आहेत. त्याच्या 'गावमातीच्या गोष्टी' या पुस्तकाची आपण केलेली समीक्षा अत्यंत चांगली असून त्यातून साररूपात पुस्तक समजते आणि पूर्ण पुस्तक वाचण्याची ओढ निर्माण होते. अतिशय उत्तम लेखन. आपले व पाटील सरांचे अभिनंदन व शुभेच्छा....

डॉ.प्रदीप पाटील, औराद शहाजानी

प्रा.सुरेंद्र पाटील सर आमच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयाचे भूषण आहेत. त्याच्या 'गावमातीच्या गोष्टी' या पुस्तकाची आपण केलेली समीक्षा अत्यंत चांगली असून त्यातून साररूपात पुस्तक समजते आणि पूर्ण पुस्तक वाचण्याची ओढ निर्माण होते. अतिशय उत्तम लेखन. आपले व पाटील सरांचे अभिनंदन व शुभेच्छा....

Add Comment

संबंधित लेख