उसवण : फाटलेल्या आयुष्याला मेहनतीच्या धाग्यांनी शिवू पाहणाऱ्या विठोबा शिंप्याची कहाणी

देविदास सौदागर यांच्या कादंबरीचा परिचय

देविदास सौदागर

विठोबाची कथा तर संपली पण रोजमर्राच्या जगण्यातल्या अशा अनेक विठोबांचे काय? रसिक वाचकांसाठी ही कादंबरी केवळ एक मनोरंजन ठरेल. फार तर डोळ्यात पाणी, हृदयात वेदना निर्माण करणारी ठरेल. पण तिने बंडाच्या, विद्रोहाच्या व अन्याय, शोषण अन् अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी वाचकांच्या मुठी आवळण्याचे काम करावे हीच आमच्यासारख्या चळवळ्यांची अपेक्षा असणार. 'उसवण'मधील विठोबाने असंख्य मनात विद्रोहाच्या ठिणग्या पेटवाव्यात अन् त्याने फाटलेले आभाळ शिवणाऱ्या आमच्यासारख्यांच्या हाताला सोबती म्हणून अनेक इतर हात जोडून द्यावेत हीच या कादंबरीनिमित्त एक अपेक्षा.

'ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून तमाम कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे' असे सांगत कष्टकऱ्यांचे जग, व्यथा, वेदना यासह उद्याचा काळ याच कष्टकऱ्यांचा असणार आहे हा आशावाद आपल्या साहित्यातून मांडणाऱ्या साहित्यरत्न, लोकशाहीर कॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्टला साजरी केली जाते. याच महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात शिवणकाम करीत करीत शब्दांचे धागे जुळवू पाहणाऱ्या कविवर्य देविदास सौदागर यांची 'उसवण' ही कादंबरी 'देशमुख आणि कंपनी प्रा. लि.' या पुण्यातील प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे.

'उसवण' ही देविदास सौदागर यांची पहिलीच कादंबरी आहे. याआधी 'कर्णाच्या मनातलं' आणि 'काळजात लेण्या कोरताना' हे त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.

शिंपी असलेला विठोबा, त्याची बायको गंगा, मुलगी नंदा अन् मुलगा सुभाष ही 'उसवण'च्या कथानकातील मुख्य पात्रे आहेत. आपला पिढीजात शिंपी व्यवसाय सांभाळणाऱ्या विठोबाने परिस्थितीमुळे दहावीनंतर आयटीआयपर्यंतचेच शिक्षण घेऊन नोकरीसाठी पुणे गाठलेले असते. पण अनेक दिवसांच्या संघर्षानंतरही नोकरी मिळत नसल्याने व शेवटी एका अपघाताने आहे तेही सर्व गेल्याने विठोबाला पुन्हा गाव अन् आपला परंपरागत व्यवसाय सांभाळणे भाग पडते. 

दीड-दोन हजार वस्ती असलेल्या छोटाशा गावातील विठोबाचा शिंपी व्यवसाय, या व्यवसायाव्यतिरिक्त इतर कसलाही कमाईचा स्त्रोत नसल्याने विठोबाला व त्यांच्या कुटुंबाला तुटपुंज्या मिळकतीवर करावा लागणारा उदरनिर्वाह, त्यातले अनेक संघर्ष, गावातील राजकारण, देवा-धर्माच्या नावाखाली छोट्या व्यापाऱ्यांवर होणारी दांडगाई, चोर सोडून संन्याशाला फासावर चढवू पाहणारी न्यायव्यवस्था, बदलत्या औद्योगिकीकरणाने रेडिमेड कपड्यांचे 'फॅड' वाढणे अन् त्याचा शिंपी व्यवसाय करणाऱ्यांवर विपरीत परिणाम होणे, या सगळ्यात एका गरीब कुटुंबातील साध्या, सरळ माणसांच्या जाणिवा बहरत राहणे, अशा बिकट परिस्थितीतही गरीब विठोबाला कधी धीराच्या चार शब्दांची तर कधी पैशांची मदत करणारी समजूतदार माणसं असणे अशा सगळ्या घटनांभोवती 'उसवण'चे कथानक फिरत राहते.

कुठलीही कलाकृती सामाजिक व्यवस्थेतून अन् समाज बदलाच्या प्रक्रियेत होणाऱ्या संघर्षातून जन्माला येत असते. 'उसवण' ही कादंबरीही त्याला अपवाद नाही. 

ग्रामीण भागातील समाजव्यवस्था 'उसवण' मधून हुबेहूब चित्रित झाली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा समजल्या जातात. या तिन्ही मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी काही घटक आपल्या जीवाचा आटापिटा करीत असतात. शेतकरी घाम गाळून व रक्त आटवून शेतीत धान्यरुपी मोती पिकवत असतो. शेतकऱ्याने मेहनतीने पिकवलेल्या कापसावर प्रक्रिया करुन कामगार कारखान्यांतून कापड बनवत असतो. या कापडाला मशीनवर सुई, धाग्याने जोडून विणकर वस्त्र बनवत असतो. तर दगड फोडून, माती-वीट-सिमेंटात राबून वडार व गवंडी घर बनवत असतात. जगण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करणाऱ्या ह्या कष्टकऱ्यांना मात्र स्वत:च्या परिवाराला जगवण्याचे फार मोठे आव्हान पेलत जीवन कंठावे लागते. जगाचा पोशिंदा बळीराजा अन्नाला मोताद होवून आत्महत्येचा मार्ग पत्करतो. कापडाचे तुकडे जोडून वस्त्रांची निर्मिती करणाऱ्या विणकराला आपल्या फाटक्या संसाराला जोडता जोडताच आयुष्य कंठावे लागते. भव्यदिव्य इमारती बांधणारे वडार, गवंडी स्वत: मात्र राबताराबता झोपड्यांमध्ये आयुष्य संपवतात. समाजव्यवस्थेतील ही विपरीत पद्धत, चाल 'उसवण'मधून शिंप्याच्या जीवनातील संघर्ष उलगडून दाखवते. 


हेही वाचा : जयंत पवार - समकालीन मराठी कथेतला अनन्य कथाकार - गणेश विसपुते


विज्ञान, तंत्रज्ञानाचा विकास झाला. त्यामुळे समाजातील एकंदर उत्पादन झटक्यात वाढले. मोठमोठे कारखाने, कंपन्या उभ्या राहिल्या. माणसाची जागा यंत्राने घेतली. याचे फार मोठे कौतुक आपल्याला वाटत असते. पण स्थित्यंतराच्या या प्रक्रियेत किती माणसं, किती कुटुंबं उध्वस्त होतात, याची काहीच मोजदाद नसते. शेतीवर आधारीत सरंजामी व्यवस्था गेली अन् विज्ञान, तंत्रज्ञानावर आधारित भांडवली व्यवस्था आली, याला आपण विकास म्हणत असतो. पण या विकासाच्या प्रक्रियेत स्वतंत्रपणे काम करणारे कित्येक कारागीर व त्यांची कारागीरी नामशेष झाली. रेडिमेड कापडांची निर्मिती होऊ लागल्याने, रेडिमेड कापडांच्या वापराची संस्कृती निर्माण झाल्याने विठोबासारखे स्वतंत्रपणे काम करुन जगणारे शिंपी संपले. विठोबाची कहाणी ही नुसत्याच त्याच्या एकट्याच्या संघर्षाची, दु:खाची अन् वेदनांची कहाणी नाही तर आर्थिक स्थित्यंतराने विस्थापित झालेल्या विठोबासारख्या अनेकांची ही कहाणी आहे. भांडवलशाहीचा राक्षस सगळ्यांची स्वायत्तता हिरावून घेत त्या सगळ्यांना फक्त श्रम विकणारा 'कामगार' कसा बनवत सुटतो, एका स्वतंत्रपणे काम करणाऱ्या आपल्या छोटाशा दुकानाच्या मालकाला रेडिमेड कापडाच्या दुकानाबाहेर आधीच शिवलेल्या कपड्यांची दुरुस्ती करणारा नोकर कसा बनवतो याची ही कहाणी आहे.

'उसवण'मधील गंगा हे विठोबाच्या पत्नीचे पात्र ग्रामीण भागातील सर्वसाधारण स्त्रीला व्यक्त करणारे आहे. आपल्या मेहनती, निर्व्यसनी अन् प्रामाणिक पतीचा तिला अभिमान आहे. आपल्या पतीवर तिचे जीवापाड प्रेम आहे. त्याच्यासाठी खंबीरपणे उभी राहणारी तीच एक व्यक्ती आहे. विठोबाही आपल्या पत्नीबद्दल, तिच्या खंबीरपणे साथ देण्याबद्दल कृतज्ञ आहे. 

नंदा आणि सुभाष ही विठोबाची लेकरं गुणी आहेत, हुशार आहेत. बापाच्या गरिबीमुळे शाळेच्या सहलीला जाऊ न शकलेली नंदा आपले दु:ख समजदारीने गिळते. नंदाने अन् सुभाषने केलेले निबंधलेखन, पत्रलेखन व काव्यलेखन वाचण्याजोगे आहे. खऱ्या गुणांची, हुशारीची, कलेची अन् साहित्याची निर्मिती ही जगण्यातील संघर्षातून होत असते याची प्रचिती विठोबाच्या दोन लेकरांची जी पात्रं कादंबरीत उभी केली आहेत त्यावरुन येते. 

विठोबासारख्या हातावर पोट असणाऱ्याला गंडवणारा भीमा पवार नावाचा पैलवान सावकार गावात आहे. गावच्या जत्रेची अन् झेंड्याची वर्गणी मागायला येऊन विठोबासोबत हाणामारी करणारी, राजकारण्यांच्या मागे बोंबलत हिंडणारी टवाळ पोरं गावात आहेत. अतिशय हुशार असलेला, विविध भाषा जाणणारा पण कसल्यातरी धक्क्याने वेड लागलेला एक गृहस्थ कादंबरीत आहे. हा माणूस व्यवस्थेबद्दल, जीवनाबद्दल, न्यायाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करतो. ती प्रश्न अनुत्तरितच आहेत. या पात्राच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जगण्यातील असुरक्षितता, अनिश्चितता, जीवनातील अनेक कोडी सोडवण्यात आलेले अपयश अधोरेखित झाले आहे. 

अशा संघर्षमय जगण्यातही माणुसकीचा ओलावा कादंबरीत जागोजागी दिसून आला आहे. विठोबाच्या कुटुंबाची उपासमार झाली तेव्हा ज्वारी, तूरडाळ देणारा विठोबाचा कुणबी मित्र जगू चव्हाण, वेड्या माणसाला कापड देणारे साळुंखे सर अन् ते कापड पैसे न घेता शिवून देणारा विठोबा, या प्रसंगातून माणुसकी शिल्लक असल्याचे दर्शन होते. कसल्याशा अपघाताने तो वेडा माणूस मरतो अन् त्याला कपडे घेऊन देणाऱ्या साळुंखे सर व विठोबाच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागतो. विठोबाला पोलिसांना व सरपंचाला फुकट कपडे शिवून द्यावे लागतात. पैशांची मागणी कर असा सल्ला त्याचे मित्र देतात, त्यावर 'पाण्यात राहून माशाशी वैर कशाला घ्यायचे' हे उद्गार विठोबा काढतो. व्यवस्थेतल्या बड्या धेंडांच्या अन्यायाबद्दलची सामान्य माणसाची हतबलता यातून प्रकट होते. 

महादेव महाराज हे कादंबरीतील पात्र ग्रामीण भागातील आध्यात्मिक जीवनाचा, संघर्ष करणाऱ्या माणसांना आध्यात्मातून मिळणाऱ्या आधाराचा व बळाचा उलगडा करणारे आहे. संतांचे अभंग, रामायण-महाभारतील कथा याचा ग्रामीण भागातील लोकांवर असलेला पगडा अन् याआधारेच ग्रामीण भागातील कष्टकरी वर्ग आपल्या जीवनातील सोडवू पाहत असलेला गुंता यांचे दर्शन या पात्राद्वारे झाले आहे. 

कर्जबाजारीपणामुळे आधीच हातातून शेतजमीन गेलेल्या, रेडिमेड कापडांच्या फॅडमुळे आपले टेलरिंगचे दुकान बंद करायची वेळ आलेल्या विठोबाला शेवटी त्याची शिलाई मशीन बोलत असल्याचा भास होतो. काळजावर दगड ठेवून विठोबाला त्याचे दुकान बंद करावे लागते. दोन पिढ्या ज्या दुकानावर संसार चालवला त्या दुकानावर, मशिनवर, सुईवर, धाग्यावर एवढेच नाहीतर चिंध्यांवरही असलेले विठोबाचे जीवापाड प्रेम कादंबरीतून प्रकट झाले आहे. सोबतच माणसाला त्याच्या आवडत्या कामापासून तोडणाऱ्या व्यवस्थेचा विदारक चेहरा दिसला आहे.

मशिनवर अनेक वर्षे काम केल्याने गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी असे अनेक विकार जडलेला विठोबा आता दुकान बंद झाल्यावर काय करेल? नंदा अन् सुभाष या त्यांच्या चिमुकल्यांचे पुढे काय होईल? आधीच पडझड झालेले डोक्यावरील छप्पर विठोबा कसे टिकवेल? अन् शेवटी आयुष्यभर कापडाचे तुकडे सुई-धाग्याने जोडणारा विठोबा आपला फाटलेला संसार कसा जोडेल? असे अनंत प्रश्न उभे करुन कादंबरीचा शेवट होतो.

विठोबाची कथा तर संपली पण रोजमर्राच्या जगण्यातल्या अशा अनेक विठोबांचे काय? रसिक वाचकांसाठी ही कादंबरी केवळ एक मनोरंजन ठरेल. फार तर डोळ्यात पाणी, हृदयात वेदना निर्माण करणारी ठरेल. पण तिने बंडाच्या, विद्रोहाच्या व अन्याय, शोषण अन् अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी वाचकांच्या मुठी आवळण्याचे काम करावे हीच आमच्यासारख्या चळवळ्यांची अपेक्षा असणार. 'उसवण'मधील विठोबाने असंख्य मनात विद्रोहाच्या ठिणग्या पेटवाव्यात अन् त्याने फाटलेले आभाळ शिवणाऱ्या आमच्यासारख्यांच्या हाताला सोबती म्हणून अनेक इतर हात जोडून द्यावेत हीच या कादंबरीनिमित्त एक अपेक्षा. आणि देविदास सौदागर यांची लेखणी अशीच तळपत रहावी यासाठी सदिच्छा!

- ॲड. शीतल शामराव चव्हाण 

Tags: उसवण देविदास सौदागर कादंबरी शिवणकाम विठोबा शिंपी मराठी साहित्य देशमुख आणि कंपनी पुस्तक परिचय Load More Tags

Comments:

विष्णू दाते

ह्रदयाला भिडणारी ही कादंबरी वाचलीच पाहिजे!

दत्तात्रय प. जोशी

अत्यंत दाहक वास्तव या लेखात व कादंबरीत पहायला मिळत आहे. वरील लेख वाचल्यानंतर ही कादंबरी वाचलीच पाहिजे. यात शिंप्यांच्या व्यवसायाबद्दल चित्रण आहे, ते खरेच आहे. तसचे आपल्याकडच्या अनेक कारागीरांचे व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. उदा. चपला बनविणारे, सुतारकाम करणारे, कापड निर्मितील अनेक अनेक टप्प्यांवर काम करणारे, रंगारी, दागिने तयार करणारे आणि याचबरोबर अनेक हस्तकौशल्य असणारे कारागीर यांची कामे बंद झालेली आहेत किंवा काही काळातच बंद होऊ शकतात आशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक उद्योगांचे मोठ्याप्रमाणात यांत्रिकीकरण आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढविण्याचे तंत्र यामुळेच ही वेळ आही आहे.

Add Comment

संबंधित लेख