निदान चर्चा सुरू झाली पाहिजे!

दिवाळी 2024 निमित्त मुलाखत 1/5

दिवाळीनिमित्त कर्तव्य साधना वरून पाच विशेष मुलाखती घेऊन येत आहोत. 

1. टीव्ही या माध्यमाचा सखोल अभ्यास असलेली अभिनेत्री-लेखिका मुग्धा गोडबोले
2. भाषांवर आणि अभिनयावर प्रेम करणारा अभिनेता-अभिवाचक नचिकेत देवस्थळी
3. 'जेन झी'साठी भूगोल, पर्यावरण, तत्त्वज्ञान असे जड विषय रंजक कथा-कादंबऱ्यांतून मांडणारी लेखिका मृणालिनी वनारसे
4. कथ्थकची परंपरा आणि आजच्या काळाला सुसंगत कथनं यांचा मेळ घालणारी नृत्यांगना मानसी गदो 
5. नवोदित लेखक-कवी-नाटककार-दिग्दर्शक-बालसाहित्यिक मुक्ता बाम

या पाच विचारशील, प्रयोगशील कलाकारांना आजपासून सलग पाच दिवस त्यांच्या मुलाखतींतून आपण भेटणार आहोत. 

त्यातील आजची ही पहिली मुलाखत.


प्रामुख्याने मराठी टीव्ही मालिकांच्या विश्वात रमलेली, नाटक-चित्रपटांतही सहजपणे वावरलेली, मोहक व्यक्तिमत्त्वाची, परिपक्व विचारांची आणि डोळसपणे काम करणारी अभिनेत्री आणि लेखिका म्हणून मुग्धा गोडबोले महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. नुकतंच त्यांचं ‘टीव्ही, मालिका आणि बरंच काही...’ हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. त्यात टीव्ही या करमणूक यंत्रणेचं अंतरंग त्यांनी उलगडून दाखवलं आहे. ‘वूमन की बात नावाच्या पॉडकास्टमधून त्या ‘विविध क्षेत्रातली आजची महिला काय प्रकारे काम करते, तिचं स्वातंत्र्य, तिच्या समस्या, तिने शोधलेले तोडगे, तिची वाटचाल, तिचं यश’ असे महत्त्वाचे विषय मांडतात. पुस्तक आणि पॉडकास्टच्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली ही बातचीत.

अभिनेत्री आणि लेखिका म्हणून प्रवास कसा सुरू झाला? आई (मंगला गोडबोले) लेखिका असल्यामुळे ते सहज घडलं का?
घरात सांस्कृतिक समृदधीचं वातावरण होतं, पण मला लहानपणी लेखनाची आवड नव्हती. अगदी 2013 पर्यंत मी पूर्णपणे अभिनेत्रीच होते, नंतर लेखन करायला लागले. माझं बालपण आणि कॉलेजचे दिवस पुण्यात गेले. शाळेपासून नाटकात काम करायला आवडायचं. आंतरशालेय स्पर्धा, पुढे फर्ग्युसन महाविद्यालायतर्फे पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक, कामगार कल्याण नाट्य स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा वगैरे ठरलेल्या टप्प्यांतूनच माझा अभिनयाचा प्रवास झाला. कॉलेजमध्ये असताना थरार या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. मी जी भूमिका केली, त्यासाठी दुसऱ्या एका मुलीची निवड आधी झालेली होती, पण काही कारणाने तिचं जमलं नाही आणि मग त्या भूमिकेसाठी मला विचारण्यात आलं.  पुण्यात शूटिंग असणार होतं, यतिन कार्येकर, शरद पोंक्षे यांच्यासारखे कलाकार होते, त्या टीममधली इतर काही मंडळी परिचयात होती त्यामुळे ‘करून बघूयात’ असा विचार करून मी ते केलं. थरार मालिकेचे नऊ एपिसोड मी केले. याच क्षेत्रात आयुष्यभर काम करत राहायचं, असं तेव्हा ठरवलं नव्हतं. पण मला काही कामं मिळत गेली. डॉ. जब्बार पटेल आणि स्मिताताई तळवलकर यांच्यासोबत डॉक्युमेंटरीज केल्या. आणि नंतर मला ‘आभाळमाया’ या तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या मालिकेसाठी विचारण्यात आलं. अशी संधी मिळवण्यासाठी लोक किती धडपड करतात, किती वाट बघतात, किती संघर्ष करतात; मला मात्र ही मोठी संधी समोरून चालत आली होती. पण त्यासाठी मुंबईत एकटीने राहावं लागणार होतं. घरात किंवा नात्यात अभिनयाच्या किंवा नाटक-सिनेमा-टीव्हीच्या क्षेत्रात कोणीच नव्हतं. शिवाय या क्षेत्राबद्दलचे समज-गैरसमज तेव्हा साध्या मध्यमवर्गीय घरात जरा जास्तच होते. त्यामुळे घरच्यांना माझा दृष्टिकोन पटवून देणं, त्यांना आश्वस्त करणं हाच माझा संघर्ष ठरला. आणि मला वाटतं, ते करतानाच माझ्या करियरची दिशाही ठरली.
आभाळमायानंतर ‘चार दिवस सासूचे’ मालिका मी सलग आठ वर्षं करत होते. शिवाय इतर काही मालिकांतून छोट्या भूमिका, नाटकं, जाहिराती, मोजकेच चित्रपट असं सातत्याने काम सुरू होतं आणि आहे. पण 2013 मध्ये मी पहिल्यांदा अभिनयाव्यतिरिक्त झी मराठीसाठी ‘होणार सून मी त्या घरची’ या मालिकेसाठी संवादलेखन केलं. मग 100 डेज, तुझं माझं ब्रेक-अप पासून आई कुठे काय करते, अजूनही बरसात आहे, अशा अनेक मालिकांसाठी मी लेखन केलं. अजूनही अभिनय आणि लेखन दोन्ही करते आहे.

मालिकांमधून अभिनेत्री आणि नंतर लेखिका म्हणून काम करताना जे अनुभव आले त्यातून टीव्ही या माध्यमाविषयी काय लक्षात आलं?
प्रेक्षक म्हणून मालिका बघताना आपल्याला जे दिसतं, किंवा मालिका ही ‘फार कष्ट न घेता जुळवाजुळव करून कशीबशी जमवलेली’ असते असं जे वाटत असतं, त्याला पूर्णपणे छेद देणारी दुनिया पडद्यामागे असते. ती मी खूप जवळून पाहिली. त्यातही केवळ अभिनय करताना आलेल्या अनुभवांपेक्षा लेखन करताना आलेले अनुभव वेगळी दृष्टी देऊन गेले. टीव्ही नावाच्या प्रचंड व्यवस्थेचा डोलारा कसा सांभाळला जातो, मालिकेची, प्रॉडक्शन हाऊसची, चॅनलची आर्थिक गणितं काय असतात, टी आर पी नावाची गोष्ट काय असते, तिच्याभोवती मालिकेचा पैसा, मिळणाऱ्या जाहिराती, मालिकेची लांबी हेच नव्हे तर मालिकेतली कथानकं, प्रसंग, संवाद, कलाकारांची देहबोली हेदेखील सगळं कसं फिरतं, आठवड्याला एका मालिकेचा सहा एपिसोडसाठीचा ऐवज तयार करणं हे किती वेगवेगळ्या प्रक्रियांचं जाळं असतं, आणि ही सगळी वेगवेगळी कामं करणाऱ्या माणसांचे कष्ट आणि समस्या काय असतात, हे मी पाहिलं. आणि या माध्यमाविषयीचा माझ्या मनातला आदर वाढला.

‘टीव्ही, मालिका आणि बरंच काही...’ या पुस्तकाची कल्पना कशी सुचली?
ज्या माध्यमाने मला आणि माझ्यासारख्या अनेक कलाकारांना ओळख दिली; ज्या माध्यमाचं महत्त्व माहीत असल्यामुळे नाटक-चित्रपटात प्रचंड यशस्वी असलेले मोठमोठे कलाकारही त्याच्याशी सातत्याने जोडलेले राहतात; त्या माध्यमाच्या ताकदीची निदान थोडीशी तरी जाणीव लोकांना मी करून दिली पाहिजे, असं मला वाटायला लागलं. त्या भावनेतून ‘टीव्ही, मालिका आणि बरंच काही’ हे पुस्तक जन्माला आलं. नुसते माझे अनुभव सांगण्यापेक्षा जाणीवपूर्वक अभ्यास करून, या माध्यमाची बलस्थानं दाखवून देणं, इथे कुठलीही गोष्ट कोणाही एका माणसाच्या बुद्धीने, लहरीने किंवा इच्छेने होत नाही, तर त्यामगे सांगोपांग विचार असतो, हे ठामपणे सांगणं आणि मालिकांच्या आर्थिक उलढालीची, गुंतागुंतीच्या creative आणि तांत्रिक निर्मितीप्रक्रियेची जाणीव लोकांना करून देणं हा पुस्तकामागचा उद्देश होता.

टीव्ही मालिकांच्या अर्थकारणाविषयी थोडं सविस्तर सांगू शकाल?
टीव्ही ही अब्जावधी रुपयांची उलाढाल असलेली बाजारपेठ आहे. आपल्या राज्याच्या, देशाच्या आणि जगाच्याही अर्थकारणात टीव्हीमुळे निर्माण होणारा महसूल हा प्रचंड मोठा आहे आणि अर्थातच त्यामुळे या बाजारपेठेत काय विकलं जातं, कोण काय विकत घेतं याचा अभ्यास सतत सुरू असतो. टीव्ही चॅनल्सच्या सर्व प्रकारांचा स्वतंत्रपणे अभ्यास होतो. मालिका ‘जनरल एंटरटेनमेंट चॅनल’(GEC)च्या अंतर्गत येतात.

लोक कोणत्या वेळेत जास्तीत जास्त टीव्ही बघतात, कोणत्या प्रकारचे कार्यक्रम कोणत्या वेळेत जास्त बघितले जातात, त्यानुसार प्राईम टाईम ठरतो. पुरुष, महिला, मुले, वयस्कर मंडळी हे स्वतंत्रपणे आणि संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे, केव्हा आणि काय पाहतात याची पाहणी केली जाते, त्यानुसार टीव्हीवर केव्हा काय दाखवल्यास त्याला जास्तीत जास्त प्रेक्षक मिळतील हे ठरते. दर गुरुवारी मालिकेच्या क्रिएटिव्ह टीमच्या हातात टीआरपी (टेलिव्हिजन / टार्गेट रेटिंग पॉइंट) चार्ट येतो. टीआरपी म्हणजे जनमत चाचणी असते. आपण जे दाखवतो ते प्रेक्षक बघतात का? किती प्रमाणात बघतात? ते त्यांना आवडतं का? हे कळण्याचा तो प्रमुख मार्ग असतो. मालिकेचा टीआरपी वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतो. एखादा चॅनल किती पाहिला जातो, त्यातले कलाकार किती लोकप्रिय असतात, मालिकेतले चालू कथानक, वगैरे. सणासुदीच्या दिवसांत टीव्हीच कमी पाहिला जातो. आयपीएलच्या काळात मालिका कमी बघितल्या जातात, या सगळया गोष्टींचा परिणाम टीआरपीवर आणि मिळणाऱ्या जाहिरातींवर होतो. 

जाहिरातींबाबत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे – आपण मालिकांच्या दरम्यान जाहिराती बघत नाही, तर चॅनलने जाहिरातींतून मिळणाऱ्या पैशासाठी बनवलेल्या मालिका बघतो. चॅनेलचा उद्देश जाहिराती दाखवून व्यवसाय वाढवणे हाच असतो. जितका टीआरपी जास्त तितक्या जाहिराती जास्त किंमतीच्या, मोठ्या ब्रॅंड्सच्या मिळतात. टीआरपीमधला ‘कुठली मालिका किती वेळ बघितली गेली’ हा मुद्दा जाहिराती मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. रोजचा एपिसोड 30 मिनिटांचा असतो. त्यातली 21-22 मिनिटं मालिकेचा भाग आणि आठ ते नऊ मिनिटांच्या जाहिराती असतात. जी मालिका सर्वाधिक वेळ बघितली जाते, उदाहरणार्थ 30 पैकी 21 ते 22 मिनिटांची मालिका बघितली जाते, याचा अर्थ तेव्हा ज्या जाहिराती चालू असतात त्याही पहिल्या जाण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे त्या मालिकेच्या वेळेत दाखवण्यासाठी जाहिराती अधिक मिळतात. 

मालिकेच्या प्रत्येक मिनिटात काय आणि किती प्रमाणात बघितलं गेलं इथपर्यंतचं विश्लेषण टीआरपीमध्ये केलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षक कोणती, कोणत्या अभिनेत्यांची दृश्यं आवर्जून बघतात, कुठल्या कलाकारांना / कथानकांना तितकीशी पसंती मिळत नाही, त्या त्या संदर्भातला प्रेक्षकांचा वयोगट, स्त्री-पुरुषविभागणी, याशिवाय प्रत्येक वाहिनीच्या ओटीटी चॅनल्सवर मालिका बघितल्या जातात त्याचंही असंच संपूर्ण विश्लेषण टीआरपीमध्ये असतं. मालिका लोकांना आवडते की नाही, यापेक्षा सुद्धा ती किती बघितली जाते आहे यावर सगळी गणितं ठरतात. टीव्हीची संपूर्ण आकाशगंगा टीआरपी नावाच्या सूर्याभोवती अशी सतत फिरत असते.

एक गंमत सांगते, आजकाल सोशल मीडियावर मालिकालेखक, दिग्दर्शक, अभिनेते सर्वांची यथेच्छ टिंगल होते. अनेक लोक असेही आहेत, की जे निव्वळ ही मजा घेण्यासाठी छिद्रान्वेषी नजरेने मालिका बघतात. पण जेव्हा शिव्या घालण्याच्या हेतूने का होईना, प्रेक्षक एखादी मालिका बघत राहतात, तेव्हा खरंतर ते टीआरपी वाढवण्यात, ती मालिका लांबवण्यात भागीदार होत असतात.

मालिकांचा अतिसंथ वेग, एकाच साच्यातले प्रसंग-संवाद, हे प्रेक्षकांना खटकतं, पण तरी यात वर्षानुवर्षं बदल होत नाहीत, असं का?
मगाशी मी म्हटलं तसं आयपीएलचा काळ किंवा सणासुदीचे दिवस यामध्ये मालिका कमी पहिल्या जातात. अगदी रोजसुद्धा आपली इतर कामं करत लोक टीव्ही पाहतात. सगळा वेळ एकाच चॅनलवर टिकून राहत नाहीत. किंवा अगदी दररोज किंवा ठराविक वेळेला टीव्ही बघणं शक्य होतं असं नाही. पण वेळ असला की ते नक्की बघतात. ब्रेक झाल्यानंतर पुन्हा बघताना जर त्यांना मालिका ओळखीची वाटली नाही, ते कथानक, ती पात्रं याविषयीच्या त्यांच्या आठवणीतल्या गोष्टींशी जर तार जुळली नाही, तर ते ती मालिका बघणं सोडून देतात. मग टीआरपी कमी होतो. आकडे पहिले तर लक्षात येतं की हे सर्वच मालिकांच्या बाबतीत केव्हा ना केव्हा घडतं. रुद्रा नावाची एक सुंदर लोकप्रिय  मालिका होती पण तिचा वेग खूप होता आणि एक-दोन एपिसोड पाहिले नाही तर प्रेक्षकांना नंतर कथानकाशी रिलेट करता येत नव्हतं. त्यामुळे ती खूप लवकर गुंडाळली गेली. अशा कारणांमुळे मालिकेचा वेग संथ ठेवणं हे आवडत नसलं तरी भाग पडतं.

टीआरपीमधून लोकांना नेमकं काय आणि कोणाचे प्रसंग बघायला आवडतात ते कळलं की त्याप्रमाणे मालिकांचे पुढचे प्रसंग ठरतात. एका मालिकेमध्ये जे आवडतं आहे, ज्याला अधिक टीआरपी मिळतो आहे, ते कॉपी करण्याचा इतर मालिकांमधून प्रयत्न होतो. त्यामुळे बऱ्याच मालिकांमध्ये एकाच प्रकारचे प्रसंग आणि संवाद दिसतात, आणि अर्थातच लोकांना ते आवडेनासे होतात. 

आठवड्याला एका मालिकेचा सहा एपिसोडसाठीचा ऐवज तयार करण्यासाठी सतत वेळेशी लढाई सुरू असते, त्या तणावाखाली काही त्रुटी राहतात. सर्व प्रकारचं कलात्मक किंवा तांत्रिक काम करणारीही माणसेच असतात, त्यांच्याकडूनही कधीतरी चुका होतात. त्यामुळे प्रेक्षकांना न पटणारं काही ना काही घडत राहतं.

‘डिसफंक्शनल फॅमिली’ हे आजचं वास्तव आहे. ते अत्यंत संवेदनशीलतेने तुम्ही ‘आई कुठे काय करते?!’ या मालिकेत मांडलंत. एकीकडे मालिका आणि तुमचे संवाद लोकप्रिय झाले पण तुमच्यावर टीकाही झाली. तो अनुभव कसा होता?
खरंतर अशा प्रकारची ही पहिली मालिका नव्हती. चाळिशीतली, नोकरी करणारी, मोठी मुलं असलेली नायिका, आणि नवरा दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात असणं वगैरे पार्श्वभूमी असलेल्या आभाळमाया, अवंतिका, यासारख्या मालिका येऊन गेल्या होत्या. त्या आल्या तेव्हा त्या ‘बोल्ड’ वाटल्या होत्या. लोकप्रियता आणि टीका त्यांनीही अनुभवली.

‘आई कुठे काय करते’ आली तोपर्यंत घरात किंवा आजूबाजूला विस्कळीत कुटुंबं लोकांनी अधिक प्रमाणात अनुभवलेली असल्यामुळे खूप लोकांना ती आपलीशी वाटली. टीआरपीच्या चौकटीत राहूनसुद्धा, सहजपणे प्रेक्षकांना पटेल अशा पद्धतीने घटनाक्रम आणि संवाद यांची मी मांडणी केली. कोणाच्याही बाबतीत जजमेंटल न होता त्यांचे प्रश्न संवेदनशीलपणे आणि सर्व बाजूंनी मांडले.

यातल्या नायिकेचा - अरुंधतीचा नवरा बुरसट आहे. मी कधीच तसं वागणं अनुभवलेलं नाही. ‘असं खऱ्या आयुष्यात कुठे घडत नाही’ असं बऱ्याच प्रेक्षकांनाही वाटतं. पण ‘फॅक्ट इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन!’ अनेक स्त्रियांना स्वतःचीच घुसमट त्या मालिकेतून दिसते, किंवा याहीपेक्षा अधिक कोंडमारा आपण सहन करतो याची त्यांना जाणीव होते. ‘अरुंधतीच्या बोलण्यातून आमच्या वेदनेला वाट मिळते’, असं खूप बायकांनी कळवलं. तर दुसरीकडे ‘ही मालिका पाहून आमच्या बायका बिघडल्या, त्यांच्यावर सतत अन्याय होतो आहे, त्यांना स्वातंत्र्यच नाही अशी भावना त्यांच्या मनात विनाकारण बळावली’ असा सूर अनेक पुरुषांनी लावला. मी संवाद लिहिले म्हणजे मीच यांच्या घरातल्या बायकांना बिघडवते आहे अशा पद्धतीने माझ्यावर वैयक्तिक टीका झाली. अगदी टोकाची विखारी, असभ्य, अश्लील टीका झाली. त्याचं त्रास तर झालाच आणि शिवाय ‘एखादा मालिकेतला प्रसंग बघून एखाद्या बाईला स्वतःच्या परिस्थितीचं भान आलं, आणि तिने स्वाभिमानी विचार केला तर त्याचा त्रास पुरुषी व्यवस्थेला होतो आहे’ हेही दिसलं.

टीव्ही मालिका मागास, बुरसट विचारांच्या आहेत किंवा त्या काहीतरी सामाजिक क्रांती घडवणार आहेत, असे दोन्ही टोकाचे विचार बरेच प्रेक्षक एकाच वेळी करत असतात. आणि त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियाही टोकाच्या असतात, हा अनुभव अनेकदा येतो.

या पार्श्वभूमीवर अरुंधतीचं दुसरं लग्न दाखवायचं की नाही, मराठी प्रेक्षकांना ते पटेल का? नायिकेचं दुसरं लग्न बघायला प्रेक्षक तयार आहे; पण आईचं दुसरं लग्न बघायला तयार आहे का? ह्याचा अंदाज घेण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. आता गेली दोन वर्षं मी ती मालिका लिहीतही नाही, पण अजूनही ‘तुम्ही छान लिहायचात’ किंवा ‘तुमच्यामुळेच बायको बिघडली’ असं दोन्ही मी ऐकतेच आहे.

‘परंपरांचं पालन करणारी आणि काही नोकरी-व्यवसाय असला तरी मुख्यतः हसतमुखपणे, प्रेमाने कुटुंब बांधून ठेवणारी गृहकृत्यदक्ष सुगरण’ या प्रतिमेच्या बाहेर अजून टीव्ही मालिकेची नायिका पडलेली नाही त्याचं कारण काय? 
एकंदरीतच, टीव्हीवर जे दिसतं त्यामागे आकडेवारी, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, याचा अभ्यास आहे, खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या संदर्भातली निरीक्षणं आहेत, आणि व्यवसायाची गणितंही आहेत. आकडे असं सांगतात की सध्या टीव्हीवर मालिका बघणाऱ्या प्रेक्षकांत ‘Tier 2 Cities’मधल्या मध्यमवर्गातल्या गृहिणींचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यांच्या आजूबाजूला ज्या प्रकारचं कौटुंबिक आणि समाजिक जीवन असतं, ते मालिकांमध्ये बघणं त्यांना आवडतं. म्हणून त्या बहुसंख्य प्रेक्षकवर्गाच्या पसंतीचं प्रतिनिधित्व मालिकेत दिसतं.

व्यक्ती म्हणून आधुनिक स्वतंत्र विचारांच्या अभिनेत्रींना हे सगळं कसं चालतं?
खूप खोलवर रुजलेली सामाजिक गृहीतकं मालिकांच्या नायिकेच्या प्रतिमेच्या मुळाशी आहेत. त्या प्रतिमेसाठी त्या तशा वागतात. फारच काहीतरी विचित्र, मनाविरुद्ध व्हायला लागलं, त्याचे त्यांच्या प्रतिमेवर वाईट परिणाम झाले आणि सातत्याने होत राहिले तर काही अभिनेत्री ते विशिष्ट काम सोडतात. पण तडजोडी तात्पुरत्या असतील, किंवा त्या करून मिळणारा फायदा मोठा असेल तर अभिनेत्री ती वैचारिक तडजोड करतात.

सर्व स्त्रिया, किंबहुना सर्वच माणसं त्यांच्या कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या तडजोडी करत अर्थार्जन करतात. अभिनेत्रींकडेसुद्धा ह्याच नजरेने बघायला पाहिजे. त्यांच्यासाठी हा अर्थार्जनाचा  व्यवसाय आहे. काही गोष्टी पटत नसल्या तरी कराव्या लागतात. 

मालिकेची नायिका अति साधी राहणारी, आणि खलनायिका मात्र स्टायलिश दिसते असं का? 
असं बघा, पारंपरिक सामाजिक चौकटीमध्ये चांगल्या स्त्रीचा सगळ्यात महत्त्वाचा गुण काय? तर ती स्वतःच्या पलीकडे दुसऱ्यांचा, घरातल्यांचा विचार करते; इतका की तिला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. त्यामुळे कुठलीही नायिका ही साधी, स्वतःच्या दिसण्याकडे फार लक्ष न देणारी अशीच दाखवलेली असते.

खलनायिका मात्र व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार करणारी, इतरांना बाजूला सारून स्वतः मोठं होण्याची महत्त्वाकांक्षा असलेली, स्वकेंद्रित दाखवलेली असते. ती स्वतःच्या दिसण्याचा जास्त विचार करते, कदाचित पुरुषांना आकर्षक वाटेल असं राहण्याचा प्रयत्न करते. थोडक्यात तिला स्वतःबद्दलचं, स्वतःच्या बाह्यरूपाचं भान आहे, कदाचित ते गरजेपेक्षा जास्त आहे, त्यामुळे ती घरातल्या माणसांना वेठीला धरून स्वतःला जास्त महत्त्व देते.

मालिकेतल्या स्त्रियांच्या राहणीमानाबाबत असा एक समज / गैरसमज रूढ झालेला आहे. खरंतर हे मराठी मालिकांपुरतं मर्यादित नाही. जगभरातल्या बऱ्याचशा मालिका, नाटकं, चित्रपट यांतून हाच प्रोटोटाइप दिसतो. भारतात सुरुवातीच्या काळातल्या ‘किटी पार्टी’सारख्या हिंदी मालिकांमधून तो दिसला आणि वर्षानुवर्षं तोच दिसत राहिला आणि हिंदीच्या प्रभावामुळे मराठीतही. 

मगाशी बोललो त्याप्रमाणे, बहुसंख्य प्रेक्षकवर्गाचं प्रतिनिधित्व मालिकेच्या पात्रांच्या राहणीमानात दिसतं. मग विचार करा की, सर्व मालिकांत रोज उठून तंग कपडे घालून फिरणाऱ्या, स्वतंत्र विचारांच्या नायिका प्रेक्षक स्वीकारतील का? शक्यता कमीच आहे. मालिका घडवणारे आणि बघणारे दोघांच्याही अघोषित एकमतानेच हे प्रोटोटाइप किंवा ‘cliché’ यशस्वी होत राहतात.

लेखिका म्हणून या संदर्भात काही वेगळे प्रयोग तुम्ही करता का? 
आजकालच्या शहरी पार्श्वभूमीवरच्या मालिकांत नायिका ह्या वर्किंग वूमन असतात, त्यांचे कपडे अगदीच बावळट नसतात. ती फार मॉडर्न नसली तरी स्मार्ट असते. किंवा निमशहरी / ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या मालिकांतही रोज साधी राहणारी मुलगी एखाद्या विशेष निमित्ताने तात्पुरती वेगळ्या लुकमध्ये आणली जाते. नायिका बिचाऱ्या नसतात, उलट सगळं मलाच जमेल असा आत्मविश्वास असणाऱ्या असतात.

मीच लिहिलेल्या ‘अजूनही बरसात आहे’ मालिकेत आजच्या पुण्यातली एखादी खरी यशस्वी डॉक्टर जशी राहील तशी स्मार्ट राहणारी नायिका होती. तिची मतं आजच्या आधुनिक शहरी स्त्रीशी मिळतीजुळती होती. आई कुठे काय करतेच्या अरुंधतीचं राहणीमान साधं असलं तरी ती विचारांनी आजच्या जगाची, परिस्थितीतून शिकत गेलेली, बुद्धिमान आणि स्वाभिमानी नायिका आहे. 

असे प्रयोग होतात पण ते सगळेच यशस्वी होत नाहीत कारण, पुन्हा एकदा, लोक ते किती बघतात यावर सगळं अवलंबून आहे. 

टीव्ही मालिकांत स्त्रियांच्या भूमिका केंद्रस्थानी असतात तरी त्यांनाही इतर क्षेत्रांतल्याप्रमाणे पुरुष सहकाऱ्यांपेक्षा कमी मानधन मिळतं का? 
स्त्रियांच्या दुय्यम स्थानाची, घरात कमावता पुरुष असेल तर बाईचे कमावणे हे ‘घर चालण्यासाठी गरजेचे नसल्याची’, त्यांचे काम किंवा करियर त्या अर्थाने हौशीच ठरत राहण्याची लोकांना सवय आहे. तेच त्यांना बरोबर वाटतं.

मी ‘वूमन की बात’ पॉडकास्टमध्ये वंदना गुप्तेंची मुलाखत घेतली तेव्हा त्या म्हणाल्या ‘तुमचं घर चालवायला नवरा कमावता आहे, काय गरज आहे तुम्ही अधिक कमावण्याची,’ या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दृष्टिकोनातून आजही त्यांच्याकडे पहिलं जातं. ‘वूमन की बात’चे एक लाख प्रेक्षक झाल्यानंतर माझी मुलाखत झाली त्यातही मी हेच बोलले की, ‘आमच्या कमाईवर घर चालत नाही, त्यामुळे अजूनही आम्ही हौशीच आहोत, आम्ही व्यावसायिक नाही मग एवढं करण्याची गरज काय आहे?’ हा लोकांचा दृष्टिकोन आहे. आणि मग मला असं होतं की, ‘मी कष्ट कमी करतेय का? नाही ना? मग मला पैसे का कमी?’ इथे वंदना गुप्तेंनी 50 वर्षं आणि मी 25 वर्ष काम केलेलं असलं तरी आम्हाला मिळणाऱ्या पैशांच्या बाबतीतही तो प्रश्न येतो. ही मानसिकता त्रासदायक आहे आणि ती बदलायलाही खूप वेळ लागेल.

‘वूमन की बात’ कशी सुरू झाली? स्त्रियांचे कोणते प्रश्न आणि आवाज समोर आणण्याचा विचार होता?
अश्विनी तेरणीकरने एक दिवस मला फोन केला, ‘तू एकाच वेळेला नाटकाचे प्रयोग, अभिनय, लिखाण, आणखीही अनेक लहान-मोठी कामं करतेस, तर तुझी एनर्जी तू कशी वापरतेस? थकायला होत नाही का? स्ट्रेस कसा मॅनेज करतेस?’ असं तिने मला विचारलं. त्या संदर्भात बोलता बोलता आम्हाला वाटलं की, हा प्रश्न अनेकींना विचारता येईल. ‘आरपार’ हा त्यांचा यूट्यूब चॅनल होताच. त्यावर ‘वूमन की बात’ नावाने मुलाखती घ्यायचं ठरवलं. माझा आग्रह होता की कुठल्याही क्षेत्रात आत्ता काम करणाऱ्या बायकांशी बोलावं म्हणजे आजचे प्रश्न, संदर्भ आणि मुद्दे मांडता येतील. आजची टाईम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, स्त्रियांविषयीचे पूर्वग्रह, पुरुषी वृत्ती, शारीरिक-मानसिक ओढाताण याविषयी बोलता येईल. त्यातून उत्तर सापडलं नाही तरी ‘माझ्यासारखंच या सगळ्याला आणखीही कोणी तोंड देते आहे’ ही जाणीवही पुरेशी होते. त्याने दुःख हलकं वाटतं.

कादंबरी कदम जेव्हा म्हणाली की, “मी कामावरून घरी आल्या आल्या दारातच ‘आज जेवायला काय करायचं?’ हा प्रश्न मलाच का विचारला जातो? नवरा दिवसभर घरी असला तरी त्याला का नाही विचारला जात?” तेव्हा अनेक बायकांना तो स्वतःचाच अनुभव वाटला. पुरुषांना वाटलं ‘तुम्हाला काय प्रॉब्लेम काय आहे असं विचारलं तर?’ त्यावर बायकांचं म्हणणं होतं की, ‘तुम्ही बाहेर पडून काम करता तसं आम्हीही करतो, पण घरात जेवण मॅनेज करण्याचं काम आमच्यावर एकट्यावर का?’

क्षिती जोगने लग्नानंतर आडनाव नाही बदललं तर तिला संस्कृतीचा अनादर करते म्हणून अक्षरशः सोलून काढलं लोकांनी. आणि त्यात 95% पुरुष होते. त्यानंतर मी फेसबुकवर लिहिलं होतं की तुम्ही तुमच्याशी ओळखही नसलेल्या बाईला इतक्या घाणेरड्या पद्धतीने बोलता, ही कुठली तुमची संस्कृती? पण म्हणजे, ‘बाईने स्वतःचं नाव न बदलण्याचा निर्णय घेणे’ हा आपल्या समाजात अजूनही एवढा गंभीर प्रश्न आहे या जाणिवेने त्रास होतो. तिने आणखी एक अनुभव सांगितला. एखादी महत्त्वाची राजकीय / सामाजिक घटना घडली, तर तिच्या अभिनेता असलेल्या नवऱ्याला (हेमंत ढोमे) पत्रकार प्रतिक्रियेसाठी फोन करतात, तिला कोणी विचारतच नाही. स्त्रीला काहीतरी स्वतंत्र राजकीय / सामाजिक मत असेल हा विचारच शिवत नाही त्यांच्या मनाला.

नीना कुलकर्णीला दिलीप कुलकर्णी गेल्यानंतर अभिनयासारख्या अस्थिर क्षेत्रात काम करणारी एक स्त्री म्हणून कशा प्रकारचे अनुभव आले होते हे ऐकून आश्चर्य वाटतं. तसं बघायला गेलं तर नीना ही तर सगळ्या अर्थाने प्रिव्हिलेज असलेली बाई पण तिलाही असले अनुभव चुकले नाहीत.

स्पृहा जोशीने एकदा बॅकलेस ब्लाउजमधला फोटो काढला होता. त्याच्यावर केवढा आक्षेप! तिचं म्हणणं होतं, ‘रमाबाई रानडेंची जशी मी भूमिका करते, तशीच ही पण एक भूमिका आहे. रमाबाई म्हणून मी अशी वावरत नाही, ही मी वेगळी आहे.’ पण तरी लोकांनी असभ्य टीका केलीच.

तथाकथित संस्कृतिरक्षक चष्म्यातून बाईकडे बघणाऱ्या असल्या विषारी लोकांकडे साधी माणुसकीही सापडत नाही. सेलिब्रिटी असो वा नसो, सगळ्या बायकांना बाई म्हणून बाहेरचं जग सारख्याच अनादराने वागवतं.

वूमन की बातमधून सेलिब्रिटी नसलेल्या बायकांचेही अनुभव पुढे येत आहेत... 
आपल्याकडे सेलिब्रिटी दिसल्याशिवाय लोक एखादा कार्यक्रम बघायला सुरुवात करत नाहीत. ते व्यवसायाचं गणित आहे, त्यामुळे ग्लॅमरस क्षेत्रातल्या बायकांना आम्ही बोलावतोच. पण दर दोन सेलिब्रिटींनंतर एक कोणीतरी अनवट, अप्रसिद्ध बाईही आमच्यासोबत असते. आणि सर्वच जणींशी त्यांचं काम, त्यांनी उचलेली धाडसी पावलं, आव्हानांशी केलेला सामना, सोडवलेले प्रश्न, वेगवेगळ्या टप्प्यांवर बाई म्हणून येणारे अनुभव, यश / अपयश पचवणं, याच आशयावर आम्ही बोलतो. अनेक बायका ‘वूमन की बात’मध्ये बोलायची इच्छा व्यक्त करतात, त्यांना सामावून घेत पुढे जायचा विचार आहे.

सेलिब्रेटी नसलेल्या बायकांचे काही विशेष अनुभव सांगता येतील?
अमृता लैंग(आंबेडकर)ची मुलाखत मी घेतली. तिचे वडील आईला कायम मारायचे, वाटेल तसं बोलायचे अशा वातावरणात ती वाढली. पण त्यातून वर येऊन ती मुलगी मिस इंडिया स्पर्धेत गेली, अनेक वेगवेगळ्या संदर्भात काम केलं, तिच्या मुलाचं उत्तम होम स्कूलिंग तिने केलं.

मृण्मयी लागू म्हणजे रीमा लागूंची मुलगी. तिने जितक्या शांतपणे तिच्या आईवडिलांच्या घटस्फोटाविषयी सांगितलं, त्यात कुठेही ‘ड्रामा’ नव्हता. आज घरस्फोट त्या मानाने सहज घडतात, पण 25 वर्षांपूर्वी जेव्हा रीमाताईंचा घटस्फोट झाला तेव्हा ही गोष्ट तितकी प्रचलित नव्हती. पण मृण्मयीच्या माणूस म्हणून जडणघडणीमध्ये त्याचा काही वाईट परिणाम झालेला आपल्याला दिसत नाही. ही विभक्त कुटुंबातली, होस्टेलवर राहिलेली मुलगी ही आज स्कूपसारखी मोठी वेब सिरीज आणि थप्पड सारखी फिल्म लिहिते. तिचा तो प्रवास थक्क करणारा असतो.

वूमन की बातमध्ये अगदी नवोदित तारकाही दिसत नाहीत आणि नव्याने इतर क्षेत्रात काम करायला लागलेल्या तरुणीही दिसत नाहीत. असं का? 
आम्ही तसं जाणीवपूर्वक ठरवलं आहे. काही एक विशिष्ट काळ काम करून अनेक बरे वाईट अनुभव येतात, स्वतःचे आणि दुसऱ्यांचेही प्रश्न सोडवण्याची क्षमता येते, आपलं मत मांडण्याचा निडरपणा आणि आत्मविश्वास येतो. म्हणून ज्यांचा एका विशिष्ट पातळीपर्यंतचा विचार झालेला आहे अशांनाच आम्ही मुद्दामून बोलवतो. त्याने जास्त अर्थपूर्ण चर्चा होऊ शकते. उदाहरणार्थ, माझ्या डोक्यात एक विषय आहे की मालिकांमध्ये खलनायिका साकरणाऱ्या अभिनेत्रींना बोलवावं, ‘सतत दुष्टपणा, कारस्थानं असे विषय डोक्यात राहणं, लोकांकडून शिव्याशाप मिळणं यांना त्या कसं सामोरं जातात, स्वतःचं मानसिक आरोग्य, माणुसकी हे कसं सांभाळतात’ असं त्यांना विचारावं. खलनायिकांनाच नव्हे तर अनेक स्त्रियांना सातत्याने कामाविषयी टीका आणि नकारात्मकतेशी सामना करावा लागतो. त्यांना अशा संवादातून काहीतरी उपाय सापडेल.

प्रयत्न, धाडस आणि संघर्ष करून आलेली परिपक्वता आणि प्रगल्भ अनुभव यांना महत्त्व देण्याचा आमचा विचार आहे. नवोदित असलेल्या मुलींना त्यातून काही मार्ग सापडू शकतील, दुसऱ्यांच्या अनुभवाचा फायदा होऊ शकेल. स्त्रियांनी एकमेकींशी मनमोकळा संवाद साधून, एकमेकींच्या सहवेदनेतून हलकं व्हावं, स्वतःचा मार्ग शोधावा, भली-बुरी कशीही का असेना, निदान चर्चा सुरू व्हावी यातही समाधान आहे.

धन्यवाद मुग्धाताई. घरोघरी प्रेक्षक आणि टीव्ही मालिका यांचं नातं ‘तुझं माझं जमेना, न् तुझ्यावाचून करमेना’ असं दिसतं. माध्यम आणि प्रेक्षक या दोन्ही बाजूंनी त्या नात्याची फोड तुम्ही आज आमच्यासाठी केलीत. आणि स्त्रियांचे प्रश्न, स्वातंत्र्य, संघर्ष, धाडस, बुद्धिमत्ता आणि त्यांच्या success stories मांडण्यामागचा तुमचा दृष्टिकोनही स्पष्ट केलात. तुमची यापुढची वाटचाल अशीच यशस्वी आणि प्रेरक होत राहो, ही मनापासून शुभेच्छा.

संवाद आणि शब्दांकन - ऋचा मुळे
kartavyasadhana@gmail.com

Tags: कर्तव्य साधनाकर्तव्य sadhana kartavya sadhana-kartavya साधना कर्तव्य साधनाकर्तव्य sadhana kartavya sadhana-kartavya साधना कर्तव्य साधनाकर्तव्य sadhana kartavya sadhana-kartavya साधना कर्तव्य साधनाकर्तव्य sadhana kartavya sadhana-kartavya साधना कर्तव्य साधनाकर्तव्य sadhana kartavya sadhana-kartavya साधना कर्तव्य साधनाकर्तव्य sadhana kartavya sadhana-kartavya साधना कर्तव्य साधनाकर्तव्य sadhana kartavya sadhana-kartavya साधना कर्तव्य साधनाकर्तव्य sadhana kartavya sadhana-kartavya साधना कर्तव्य साधनाकर्तव्य sadhana kartavya sadhana-kartavya साधना कर्तव्य साधनाकर्तव्य sadhana kartavya sadhana-kartavya साधना कर्तव्य साधनाकर्तव्य sadhana kartavya sadhana-kartavya साधना कर्तव्य साधनाकर्तव्य sadhana kartavya sadhana-kartavya साधना कर्तव्य साधनाकर्तव्य sadhana kartavya sadhana-kartavya sadhana digital diwali 2024\ mugdha godbole actor writer Load More Tags

Comments:

Dr.Chintaman Dhindale

खुप छान मुलाखत तसेच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा घडवून आणल्याबद्दल साधना अंकाचे विशेष आभार.

Prof. K G Pathan

कर्तव्य साधना या तुमच्या अलौकिक माध्यमाचे हार्दिक अभिनंदन! Tv मध्ये बरेच काही भन्नाट व भरभराटीचे असते, त्या मागे प्रत्येक सहभागाची तपश्चर्या व कसोटी असते हे या मुलाखतीत उमजले

Prakash Mulay

मुगधा गोडबोले यांची सर्व समावेशक मुलाखत खूप छान

Add Comment