‘गुलाबो सिताबो’ हा सिनेमा ओटीटी (ऑनलाईन) प्लॅटफॉर्मवर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या सिनेमाची कथा-पटकथा लिहिली आहे जुही चतुर्वेदी यांनी. या सिनेमावर बऱ्याच उलटसुलट चर्चा झडत आहेत. या निमित्ताने जुही चतुर्वेदी यांच्या लेखनातून साकार झालेल्या स्त्री व्यक्तिरेखा या आजवर सिनेमांमध्ये दिसणाऱ्या स्त्री व्यक्तिरेखांपेक्षा वेगळ्या कशा असतात हे पाहणं रोचक ठरेल.
भारतात सिनेमा येवून आता 100 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासूनच सिनेमातील वेगवेगळ्या विभागांमध्ये स्त्रिया कार्यरत राहिल्या आहे. त्यामध्ये सिनेमासाठी लेखन करणाऱ्या स्त्रियांचीही मोठी परंपरा राहिलेली आहे. स्त्रीने लिहिलेला किंवा दिग्दर्शित केलेला सिनेमा हा स्त्रियांच्या गंभीर प्रश्नांबद्दलच असेल, असा एक कयास मात्र आजही बांधला जातो.
अलीकडच्या काळातही स्त्रियांनी उत्तम सिनेमे लिहिले आहेत. त्यांपैकी, कणिका धिल्लो (मनमर्झिया, जजमेंटल है क्या?), अलंकिता श्रीवास्तव (लिपस्टिक अंडर माय बुरखा), झीनत लखानी (हिंदी मिडीयम), अन्विता दत्ता गुप्तन (फुल्लोरी, बुलबुल), कामना चंद्रा (1942- अ लव्ह स्टोरी, करीब करीब सिंगल), झोया अख्तर- रीमा कागती (गली बॉय, दिल धडकने दो) यांसारखी कितीतरी नावे घेता येतील.
स्त्रियांचा लेखनाचा, कथेचा प्रकार कोणताही असला तरी त्यात स्त्री व्यक्तिरेखा कशा साकार केल्या जातात, त्यांच्यासाठी काय प्रसंग लिहिले जातात, कथेत त्यांना काय कामगिरी किंवा जबाबदारी दिली जाते, त्यांच्या तोंडी कोणते संवाद दिले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.
बरेचदा स्त्री व्यक्तिरेखा लिहिताना केवळ सामाजिक व्यवस्थेला दोष द्यायचा म्हणून चुकीचा किंवा वरवरचा स्त्रीवाद मांडणाऱ्या स्त्रियादेखील असतात. त्यामुळे त्या काय लिहित आहेत, आणि त्यातून स्त्री व्यक्तिरेखा कशा आकाराला येत आहेत, हे नीरक्षीरविवेकानं बघणं आवश्यक असतं. मात्र त्याचवेळी, पुरुषाने स्त्री व्यक्तीरेखा लिहिणं आणि स्त्रीने स्त्री व्यक्तीरेखा लिहिणं यातही फरक करता आला पाहिजे. कारण, त्यातून एक सोशल नरेटीव्ह तयार होत असतं.
काहीवेळा संधी मिळूनही स्त्रियांकडून नकळतपणे पुरुषाच्या नजरेतून दिसणारीच स्त्री व्यक्तिरेखा लिहिली जाते. अशावेळी ‘बाईला बाई कशी दिसते, कशी वाटते आणि तिनं कसं असावं असं तिला वाटतं’, हे तपासण्यासाठी साहित्य, नाटक आणि अन्य कलाप्रकारांमध्ये स्त्री व्यक्तिरेखा कशा प्रकारे लिहिल्या गेल्या आहेत, हे तपासलं जातं. खरं तर ‘पॉप्युलर आर्ट’मध्ये मोडणाऱ्या हिंदी सिनेमातील स्त्री व्यक्तिरेखांचादेखील तसाच दस्तऐवज तयार व्हायला हवा. भविष्यात तो झाला तर त्यामध्ये जुही चतुर्वेदी यांच्या स्त्री व्यक्तिरेखांची नोंदही नक्कीच घ्यावी लागेल.
रोजच्या रटाळ आयुष्यातही नाट्य दडलेलं असतं. कथा दडलेली असते. असं साधं सहज नाट्य सिनेमाच्या माध्यमातून मांडणं कौशल्याचं काम असतं आणि हे कौशल्य जुही चतुर्वेदी यांच्या लेखनात सातत्याने दिसून येतं. त्या उत्तम कथाकार, पटकथा आणि संवादलेखक आहेत. त्याची चुणूक त्यांनी लिहलेल्या ‘विकी डोनर’, ‘पिकू’, ‘ऑक्टोबर’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘गुलाबो सिताबो’ या सिनेमांच्या पटकथांमधून दिसून येते. म्हणूनच त्या आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाच्या पटकथाकार आहेत.
‘पिकू’ ही 30 वर्षांची बुद्धिमान, संवेदनशील, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र, स्वत:चे निर्णय स्वत: घेणारी, रिलेशनशिप स्टेट्सनुसार ‘सिंगल’ असणारी मुलगी जुही चतुर्वेदी यांनी पिकू या सिनेमात चितारली आहे. सिनेमातील काही प्रसंगांमध्ये तिच्या लैंगिकतेबद्दल अत्यंत सहजपणे संवाद येतात. हे संवाद इतके सहज आहेत की ‘बाईच्या सेक्स लाईफ बद्दल इतका बाऊ करण्याची काहीच गरज नाही’, हेच अप्रत्यक्षपणे तिथे सुचवले जाते. पिकूचे वडील ती व्हर्जिन नसल्याचे पार्टीत सांगू शकतात, तिची मावशी “तुझी सेक्स लाईफ तर ठीक सुरु आहे ना?” हे आस्थेने विचारू शकते, पिकू देखील “आहेत माझे फिजिकल रिलेशनशिप म्हणून हे काय आता सगळ्याना सांगत बसणार का?” असे म्हणते. हे संवाद त्या-त्या व्यक्तिरेखांच्या तोंडी इतके सहजपणे आले आहेत की ‘लग्न झालेलं नसतांना मुलीने लैंगिक संबंध ठेवणे यात काहीही गैर नाही उलट कोणताही हेतू लग्नाला नसतांना लग्न करणे म्हणजे ‘लो आय.क्यु.’ आहे’, असं पिकूचे वडीलच ठणकावून सांगतात.
‘प्रत्येकाची शारीरिक गरज असते. जशी ती पुरुषाची आहे तशी ती स्त्रीचीदेखील असते.’ हे आपल्याकडे आजही खुलेआम सांगणे आणि भल्या भल्यांच्या ते पचनी पडणं किती अवघड आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अशा वेळी लेखिका म्हणून जुही चतुर्वेदी ही अवघड गोष्ट मुख्य प्रवाहाच्या हिंदी सिनेमामधून ठामपणे सांगतात, तेही त्याचं मानवी मूल्य टिकवून आणि अगदी कुठलाही सामाजिक प्रबोधनाचा आव न आणता.
‘गुलाबो सिताबो’ हा त्यांनी लिहिलेला असाच महत्त्वाचा सिनेमा. उत्तर प्रदेशातील लखनऊ या शहराच्या पार्श्वभूमीवर घडत जाणारा हा सिनेमा. या सिनेमाच्या नावाची एक गंमत आहे. मुळात ‘गुलाबो सिताबो’ हा या भागातील लोककलांमध्ये येणारा बाहुल्यांचा खेळ आहे. या खेळातील दोन स्त्री पात्र म्हणजे गुलाबो व सिताबो. एकाच पुरुषाची एक बायको, तर दुसरी त्याचीच रखेल. आणि त्या दोघी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून एकमेकींशी कडाडून भांडत राहतात, असा हा खेळ.
जुही चतुर्वेदी ही पारंपरिक पार्श्वभूमी लक्षात घेतात, मात्र ती कागदावर उतरवताना एक गंमत करतात. या सिनेमात ‘लालसा’ या दुर्गुणाला ‘फातिमा हवेलीच्या’ रूपाने मध्यवर्ती ठेवून, त्या हवेलीसाठी मिर्झा (अमिताभ बच्चन) आणि बांके (आयुषमान खुराणा) या दोन पुरुषांना त्या कडाडून भांडताना दाखवतात.
गुलाबो सिताबोमध्ये ‘फातिमा महल’ची मालकीण असलेली ‘बेगम’ ही एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. तिच्या हवेलीवर टपून बसलेला आणि तिच्यापेक्षा 17 वर्षांनी लहान असलेला तिचा शोहर (नवरा) म्हणजे मिर्झा. मुळात तिच्या संपत्तीकडे बघूनच तो तिच्याशी लग्न करतो. मात्र या गोष्टीची जाणीव तिला हळूहळू होत जाते. या जोडप्याला मुलंही नसतात. (कदाचित संपत्तीत वाटा म्हणून नको मिर्झानं ती होऊ दिली नसावीत.)
बेगम वयाच्या नव्वदीतदेखील एखाद्या राजकन्येसारखी राहते. केसांना मेंदी लावून घेते, वेळेवर जेवण, औषधं घेते. कंटाळा आल्यावर फिरायलादेखील जाते. परिसरात तिला प्रचंड मान आहे, जो तिला वारसाहक्काने मिळालेला आहे. ही बेगम जुन्या काळातल्या करारी बायकांची प्रतिक आहे. ती केवळ स्वत:च्या मर्जीची मालकीण आहे.
हवेली स्वत:च्या नावावर करून घेता यावी म्हणून मिर्झा बेगमच्या मरणाची वाट पाहत राहतो. पण बेगम मात्र सगळा डाव त्याच्यावर उलटवून वयाच्या 90 व्या वर्षी तिच्यावर प्रेम करणाऱ्या पुरुषाकडे निघून जाते. जाताना मिर्झाच्या नावावर एक पडकी खोली मात्र दान करते. तिचा नवरा-मिर्झा, तिच्या पुरातन हवेलीवर टपून बसलेला सरकारी खात्यातला पुरातत्व विभागाचा अधिकारी आणि हवेली पाडून टॉवर बांधू इच्छिणारा बिल्डर या पुरुषी व्यवस्थेला झुगारून देत, बेगम आपला 90 वा वाढदिवस हवेलीमध्ये थाटात साजरा करते.
या बेगमची व्यक्तिरेखा अप्रतिमरित्या साकार केली आहे 88 वर्षांच्या फारुख जफर यांनी. 1981 मध्ये आलेल्या ‘उमराव जान’ या सिनेमात त्यांनी उमरावच्या आईची भूमिका केली होती. त्यानंतर जवळपास 23 वर्षांनंतर सिनेसृष्टीत पुनरागमन करत त्यांनी ‘स्वदेस’, ‘पीपली लाईव्ह’, ‘पार्च्ड’, ‘सुलतान’, ‘सिक्रेट सुपरस्टार’ अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता ‘गुलाबो सिताबो’ नंतर त्यांचा चाहता वर्ग नक्कीच वाढला आहे.
गुलाबो सिताबोतली आणखी एक महत्त्वाची सहाय्यक व्यक्तिरेखा म्हणजे गुड्डो. ‘टी व्ही एफ’ (द व्हायरल फिव्हर) या युट्यूब चॅनलच्या अनेक स्केचेसमध्ये दिसलेली आणि ‘गर्लीआपा’ या स्केचमधून प्रसिद्ध झालेली सृष्टी श्रीवास्तव हिने गुड्डोची भूमिका केली आहे. गुड्डो मुळात हिंदी रंगभूमीवरील अतिशय कसदार अभिनेत्री आहे. अतिशय बुद्धिमान, ‘जशास तसे’वागणारी, रियालिटी चेक ठेवणारी, ‘नॉनसेन्स’ अजिबातच खपवून न घेणारी. तिच्यातला आत्मविश्वास आणि निर्भीडपणा तिच्या अवतीभवती असेलेल्या पुरुषांना घाबरून सोडतो.
जुही चतुर्वेदी यांच्या लेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या कोणत्याही व्यक्तिरेखेविषयी त्या जजमेंटल होत नाहीत. एखादा माणूस चांगला आहे हे ठसवण्यासाठी त्याच्या भोवती असलेल्या माणसांना नावे ठेवावी लागतात. हिंदी सिनेमात तर हे सर्रास पाहायला मिळते. हिरो असेल तर व्हिलन हवाच. तर बाईला बदला घेण्यासाठी एखादा गुंड पुरुषाची गरज भासते. त्यात भरीस भर ‘दुश्मन जमाना’ तोंडी लावायला असतोच.
जुही चतुर्वेदी मात्र इतकं साचेबद्ध लिखाण करत नाहीत. ‘ऑक्टोबर’ या सिनेमातला ‘डॅन’ असो किंवा ‘गुलाबो सिताबो’ मधील मिर्झा, त्या या व्यक्तिरेखा इतक्या संवेदनशीलपणे रंगवतात की त्यांच्याभोवती असणाऱ्या ओळखीच्या, अनोळखी माणसांबद्दलही आपल्या मनात करुणा दाटून येते. या पात्रांच्या बदलत्या मनस्थितीविषयी आपण सहानुभूतीने विचार करू लागतो.
‘थेट न सांगता जे म्हणायचे आहे ते सुचवा’ हा पटकथा लिखाणातील एक महत्त्वाचा नियम. प्रत्यक्ष आयुष्य जगतानाही अनेकवेळा मनातल्या भावना समोरच्या व्यक्तीला थेट सांगण्याऐवजी आपण प्रतिक्रिया आणि देहबोली यांद्वारे व्यक्त होणं पसंत करतो. या प्रकारच्या संवादाचा परिणाम अधिक गडद असतो. हाच परिणाम जुही चतुर्वेदी यांच्या सिनेमांमधून आपल्याला जाणवतो.
जाहिरात क्षेत्रासाठी दीर्घकाळ लेखन केले असल्यामुळे त्यांच्या लिखाणात फाफटपसारा अजिबात जाणवत नाही. जाहिरातीत आपलं म्हणणं नेमक्या शब्दांत आणि कमीत कमी वेळेत सांगावं लागतं. तसाच आटोपशीरपणा त्यांच्या लेखनात जाणवतो. मात्र हा संवाद कृत्रिम होणार नाही याची पुरेपूर काळजी त्या घेतात. (‘पिकू’मधील अनेक प्रसंग तुम्ही उदाहरणादाखल पाहू शकता.)
मुळात असं लिखाण करण्यासाठी-मग ते कुठल्याही माध्यमासाठी असो- तुमच्यामध्ये माणसांविषयी, परिसराविषयी, झाडांविषयी, पशु-पक्षींविषयी, इतकंच काय तर अगदी सगळ्याच चेतन- अचेतन घटकांविषयी आस्था आणि उत्सुकता असली पाहिजे, तेव्हाच असं लिहिणं आकाराला येतं, आणि मग त्याचं प्रतिबिंब सिनेमामध्ये पडत राहतं.
‘ऑक्टोबर’ मधला निस्वार्थी प्रेम करणारा ‘डॅन’ शेवटी स्वतःबरोबर पारिजातकाचे झाड घेऊन जातो जेणेकरून त्याची जग सोडून गेलेली शिवली आणि तो प्रत्येक ऋतूत एकत्र राहतील. जुही चतुर्वेदी यांचे सिनेमे आपल्या मनात अशीच रुजवात करून जातात.
- माधवी वागेश्वरी
madhavi.wageshwari@gmail.com
Tags:Load More Tags
Add Comment