23 जुलै 1856 ते 1 ऑगस्ट 1920 असे 64 वर्षांचे आयुष्य लोकमान्य टिळक यांना लाभले. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आले तेव्हा, म्हणजे 1956 मध्ये त्यांचे चरित्र लिहिण्याची स्पर्धा अखिल भारतीय काँग्रेस समितीने घोषित केली. त्या स्पर्धेत पहिला क्रमांक तीन पुस्तकांना विभागून दिला. त्यातील एक पुस्तक होते अ. के. भागवत व ग. प्र. प्रधान यांनी लिहिलेले इंग्रजी चरित्र. ते दोघेही त्यावेळी इंग्रजीचे प्राध्यापक होते आणि त्यांनी वयाची पस्तिशी ओलांडली नव्हती. ते पुस्तक जयको पब्लिशिंग हाऊस, दिल्ली यांनी प्रकाशित केले. त्याला त्यावेळचे उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी प्रस्तावना लिहिली. नंतर त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या आल्या. मात्र त्याचा मराठी अनुवाद प्रकाशित झाला नव्हता. म्हणून लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षाचा समारोप आणि ग. प्र. प्रधान यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ, ही दोन निमित्तं साधून अवधूत डोंगरे यांनी केलेला प्रस्तुत अनुवाद साधना प्रकाशनाकडून आला आहे. त्यातील 'आगमन आणि निर्गमन' या प्रकरणातील हा एक भाग.
टिळकांचा चौसष्टावा वाढदिवस 23 जुलै 1920 रोजी साजरा करण्यात आला. देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनपर संदेशांचा पाऊस पडला. चाळीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनातील यशाकडे अभिमानाने पाहता येईल, असं स्थान टिळकांना लाभलं होतं. महाराष्ट्रातील त्यांच्या पिढीला सार्वजनिक सेवेची नवी वाट टिळकांनी दाखवून दिली आणि आता या पिढीतील हयात असलेले ते सर्वांत थोर प्रतिनिधी होते. एखाद्या शैक्षणिक अथवा राजकीय ध्येयाला वाहून घेणं, या विचाराचे ते आद्यप्रवर्तक होते. विद्वानांच्या अभ्यासिका, सरकारी वर्तुळं आणि व्हिक्टोरियन शैलीतली कृतक मंचीय भाषणं- या अवकाशातून त्यांनी राजकारणाला बाहेर काढलं आणि लोकांच्या मनांपर्यंत व घरांपर्यंत नेलं. काँग्रेसमध्ये त्यांच्या मताकडे आदराने व आज्ञाधारकपणे पाहिलं जात होतं. सांप्रदायिक व धार्मिक भावनांच्या संकुचित भिंतींपल्याड जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समुदायांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलं होतं. इंग्लंड-दौऱ्यामुळे त्यांना भारताचा स्वातंत्र्यसंघर्ष व्यापक परिप्रेक्ष्यात पाहणं शक्य झालं आणि त्यांनी या संदर्भातली मांडणी जगासमोर केली.
वैयक्तिक पातळीवरही त्यांनी अनेक बाबतींत कीर्ती प्राप्त केली. त्यांनी पत्रकारितेमध्ये स्पष्ट, थेट व जोरकस लेखनशैलीचं युग आणलं. भारतविद्या व पुरातत्त्वीय संशोधन या क्षेत्रात त्यांनी केलेलं काम जागतिक ख्यातीचं ठरलं. कर्मयोग मांडणारा ‘गीतारहस्य’ हा त्यांचा ग्रंथ केवळ त्यांच्या पिढीला नव्हे, तर भविष्यातील पिढ्यांनाही पथदर्शक ठरला. त्यांचं कौटुंबिक जीवन सुखकारक झालं होतं आणि आता आर्थिक ओझं ओसरल्यामुळे काहीएक शांतताही आली होती. मुलं-मुली, नातवंडं-पतवंडं असलेल्या कुटुंबाचे ते प्रमुख होते. दोन मुलगे आता मोठे होऊन पुढील शिक्षण घेत होते, तीनही मुलींची लग्न झाली होती आणि पत्नीचा वियोग टिळकांना खोलवर दुःखदायक ठरणारा असला, तरी एकंदरीत आयुष्याच्या संधिकाळात त्यांच्यावर कोणतंही सावट नव्हतं.
टिळक मध्यम उंचीचे होते, त्यांचं डोकं आकाराने मोठं होतं आणि त्यांची मुद्रा काहीशी रागीट होती- त्यावर निर्धार व यातना यांचा पसारा उमटलेला असायचा. त्यांच्या पिंगट डोळ्यांमधली चमक आकर्षणाचा विषय ठरायची. ते वार्धक्यामुळे चैतन्यहीन किंवा निराशावादी झाले नव्हते. मुळात समाजशील व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्यांची थोरवी आणि लोकप्रियता त्यात सहजपणे मिसळून गेली. लहान-थोर सर्व माणसं त्यांच्याकडे मार्गदर्शक, मित्र व तत्त्वज्ञ म्हणून पाहत असत. आजारपणामुळे ते दुबळे झाले असले- किमान अखेरचं दशकभर मधुमेहाने त्यांचा पिच्छा पुरवला होता- तरी त्यांनी काटेकोर आहार व संयमी सवयींद्वारे आजार नियंत्रणात ठेवले होते. सर्व प्रकारच्या व्यसनांपासून ते दूर होते, अगदी तंबाखूसारखी गोष्टही त्यांना फारशी भुरळ घालू शकली नाही. त्यांना सुपारी आणि चहाची घरेलू सवय तेवढी होती.
या वयातही ते सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेऊन उरलेला काळ सिंहगडावरील घरी शांतपणे घालवायला जातील, अशी काही शक्यता नव्हती. अंकित राष्ट्र किंवा मागास राष्ट्र कायमच संकटकाळातून जात असतं. तिथले मोजके सुखी जन त्यांच्या इतर देशवासीयांची सेवा करण्याचं ओझं खांद्यावर घेतात आणि हे जू खाली ठेवणं त्यांना शक्य नसतं. भारताच्या सुदैवाने लोकमान्यांनी पेटवलेली मशाल पुढे नेण्यासाठी, बदलत्या व बदललेल्या काळाशी सुसंगत नवी अस्त्रं व नवं तत्त्वज्ञान घेऊन गांधींच्या रूपातील सक्षम व्यक्तिमत्त्व आधीच पुढे आलं होतं.
गांधींशी भेट
टिळक मुंबईत सरदारगृहात थांबले होते. तिथे गांधी, शौकत अली व इतरांनी त्यांची भेट घेतली. पुण्यात असताना टिळकांना हिवतापाचा झटका येऊन गेला, त्यामुळे पुन्हा ते आजारी अवस्थेत होते. असहकाराचं आंदोलन परिणामकारक व्हायचं असेल, तर मतदारांऐवजी लोकनियुक्त सदस्यांनी त्याचं आचरण करायला हवं, असं मत टिळकांनी मांडलं. असहकाराचं तत्त्व सांविधानिक आहे, असं गांधींचं म्हणणं होतं. त्यावर टिळक म्हणाले, ‘‘मी तर अगदी सशस्त्र क्रांतीलाही सांविधानिक मानतो. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने पन्नास टक्के यशाची जरी खात्री असेल, तरी मी ईश्वरावर विसंबून तो मार्गदेखील पत्करायला तयार आहे. परंतु आज अशा मार्गासाठी एक-दशांशही तयारी झालेली नाही किंवा कोणी त्याबाबतीत निःशंक असल्याचेही दिसत नाही.’’ गांधी व टिळक यांच्या मधे बसलेले शौकत अली दोघांचेही हात हातात घेऊन म्हणाले, ‘‘मला तुम्ही दोघेही हवे आहात. मी तुम्हा दोघांमधील दुवा होईन.’’
दि. 20 जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता दिवाण चमनलाल यांचा फोन खणाणला. सरदारगृहात जाऊन टिळकांच्या प्रकृतीची चौकशी करावी, असं त्यांना फोनवरून सांगण्यात आलं. चमनलाल त्या अतिथी-भवनापाशी पोचले तोवर पावसाची भुरभुर सुरू झाली होती. त्यांना टिळक पायऱ्यांवर भेटले आणि अशा वातावरणात बाहेर पडू नये, असा इशाराही दिला. पण टिळकांनी गाडीतून लांबवर फेरफटका मारण्याचा आग्रह धरला. या दोन तासांच्या कालावधीत चमननाल यांच्याशी असहकाराच्या प्रश्नावर टिळक बोलत होते. चर्चेदरम्यान ते म्हणाले, ‘‘असहकारावर कोण विश्वास ठेवणार नाही? असहकाराची पद्धत कोणती असावी, हा मुद्दा आहे. आपण लोकांपेक्षा एक पाऊल पुढे असावे, पण खूप जास्त अंतर राखू नये, अशी माझी धारणा आहे. नेता अनुयायांपेक्षा थोडासाच पुढे असेल, तर तो त्यांना सोबत घेऊन जाऊ शकतो. लोकांना मनातून एखादा विशिष्ट कार्यक्रम पटला असेल, तर आपण असहकार किंवा अगदी ‘सिन फीन’सारखे प्रकारही अनुसरू शकतो. नेमस्त आपल्यासोबत नसतील. आपण सर्वांनी कायदे मंडळांमध्ये जाण्यास नकार दिला, तर ते राष्ट्राचे खरे प्रतिनिधी असल्याचा दावा करतील. ऐक्य नसताना उदात्त आदर्शांच्या गप्पा मारून काही उपयोग नाही. पंजाबमधील चूक दुरुस्त करेपर्यंत आपण पूर्ण असहकार करू, असे आपण इंग्लंडमध्ये बोललो तर चालून जाईल; पण लोकशाहीचे सर्व सैनिक एकत्र लढायला तयार आहेत का, हे आपण पाहायला हवे.’’
अखेरचं आजारपण
फेरफटका मारायला गेले असताना वातावरण बाधल्यामुळे टिळकांना ताप आला. त्यातून लगेचच न्यूमोनिया उद्भवला. त्यांची शुद्ध 28 जुलैनंतर हरपली. शुद्ध हरपायच्या थोडंसंच आधी त्यांच्या मुली त्यांना भेटायला आल्या, तेव्हा नेहमीच्या विनोदबुद्धीने टिळक म्हणाले, ‘‘म्हणजे तुम्ही सर्व जणी पुन्हा इथे गोळा झालात तर! तुम्हाला सारखे माहेरी यायची सवय जडलेली दिसते.’’ 28 जुलैला त्यांनी औषधं घेण्यास नकार दिला आणि म्हणाले, ‘‘हे आता डॉ. साठ्यांना द्या. ते माझे सचिव आहेत.’’ त्या दिवशी रात्री अकरा वाजता त्यांना दुसरं इंजेक्शन देण्यात आलं. डॉ. देशमुखांना ते म्हणाले, ‘‘इंजेक्शनं देऊन तुम्ही मला उद्याऐवजी आज माराल.’’
ते भ्रांतावस्थेत बोलू लागले. ते 28 जुलैला म्हणाले, ‘‘हे 1818 मध्ये घडले आणि दुसऱ्या दिवशी 1918 होते.... अ हंड्रेड इयर्स हिस्ट्री5... आता आपले स्थान इतके खालावले आहे. पंजाबच्या प्रश्नामध्ये तुम्ही काय करणार आहात? पटेलांना तुम्ही तार केलीत का? आपण काँग्रेसचे एक विशेष अधिवेशन घेणार आहोत.’’
ते एखाद्या सभेला संबोधित करत असल्याप्रमाणे 29 जुलैला म्हणाले, ‘‘स्वराज्य मिळाल्याशिवाय भारताचा उत्कर्ष होमार नाही, याची मला खात्री आहे आणि तुम्हालाही बहुधा माझे म्हणणे पटेल.’’
त्याच रात्री दोन वाजता ते म्हणाले, ‘‘तुम्ही आणि लोकांनी जे काही केले, त्याबद्दल मी आभारी आहे.’’
त्यांची वाचा 30 तारखेपासून अनाकलनीय होत गेली. रविवार, 1 ऑगस्ट 1920 रोजी मध्यरात्री 12 वाजून 40 मिनिटांनी टिळकांनी अखेरचा श्वास घेतला.
हजारो लोकांच्या उपस्थितीत निघालेल्या शवयात्रेसाठी गांधी व नेहरू उपस्थित होते. महात्मा गांधी, शौकत अली, डॉ. किचलू यांच्यासह इतर नेत्यांनी आळीपाळीने खांदा दिला. विशेष परवानगीद्वारे चौपाटीवर दहनविधी करण्यात आला. आपल्या प्रिय नेत्याला अखेरचा निरोप देताना तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांच्या मनातली भावना शेलीच्या शब्दांत व्यक्त करायची तर :
चिता अदृश्य झाली आहे, हाच का मृत्यू?
विध्वंसक, जुलूमी आणि गर्दी जमवणारा;
ज्वाळा मंदावतात. संथपणे कानांवर पडतात,
श्वास थांबवणाऱ्या गाण्याचे सूर.
हे गाणं अर्थात स्वराज्याचं होतं- ज्यासाठीच टिळक जगले आणि मरण पावले. तिथल्या शोकाकुल लोकांमध्ये उपस्थित असणाऱ्या महात्मा गांधींनी ‘यंग इंडिया’मध्ये लिहिलं :
‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आता आपल्यात नाहीत. ते मरण पावले आहेत, यावर विश्वास ठेवणे जड जाते; इतका ते लोकांचा घनिष्ठ भाग झाले होते. आपल्या काळातील इतर कोणाचाही टिळकांइतका लोकांवर प्रभाव नव्हता. हजारो देशवासीयांची त्यांच्यावरील भक्ती असाधारण होती. ते निःसंशयपणे लोकांचे आदर्श होते. ते जे काही बोलतील, तो हजारो लोकांसाठी कायद्याचा शब्द असायचा. एक महान मानव गेला आहे. सिंहगर्जना शमली आहे.
‘देशवासीयांवरील त्यांच्या प्रभावाचे कारण काय होते? माझ्या मते, या प्रश्नाचे उत्तर साधे आहे. टिळक देशभक्तीने भारावलेले होते. देशप्रेमाव्यतिरिक्त इतर धर्म ते जाणत नव्हते. ते जन्मतःच लोकशाहीवादी होते. बहुमताच्या राज्यावर त्यांचा इतका उत्कट विश्वास होता की, त्याने मी काहीसा भयचकितही झालो होतो. पण यातूनच त्यांचा प्रभाव निर्माण झाला होता. त्यांनी स्वतःच्या पोलादी इच्छाशक्तीचा वापर देशासाठी केला. त्यांचे आयुष्य म्हणजे खुले पुस्तक होते. त्यांच्या आवडी-निवडी साध्या होत्या. त्यांचे खासगी जीवन निष्कलंक होते. स्वतःचे विलक्षण गुण त्यांनी देशासाठी समर्पित केले. लोकमान्यांइतक्या सातत्याने व आग्रहाने इतर कोणीच स्वराज्याचा मंत्र शिकवला नाही. त्यामुळे देशवासीय निःशंकपणे त्यांच्या विश्वास ठेवत असत. टिळकांचे धैर्यही कायम शाबूत होते. त्यांच्यात दुर्दम्य आशावाद होता. आपल्या जीवनकाळातच स्वराज्य पूर्णपणे प्रस्थापित झालेले पाहायला मिळावे, अशी लोकमान्यांची आशा होती. यात त्यांना अपयश आले असेल, तरी तो त्यांचा दोष नाही. त्यांच्यामुळे स्वराज्यप्राप्ती अनेक वर्षे लवकर शक्य होणार आहे. आता मागे उरलेल्या आपण शक्य तितक्या कमी वेळात स्वराज्य वास्तवात उतरवण्यासाठी दुप्पट जोमाने प्रयत्न करायला हवेत.
‘लोकमान्य हे नोकरशाहीचे कट्टर वैरी होते; पण ते इंग्रजांचा किंवा इंग्रजी राज्याचा तिरस्कार करायचे, असा याचा अर्थ होत नाही. लोकमान्य आपले शत्रू होते, असे मानण्याची चूक इंग्रजांनी करू नये, असे माझे आवाहन आहे.
‘गेल्या कलकत्ता काँग्रेसमध्ये हिंदी राष्ट्रभाषा असावी की नसावी, या विषयावरील टिळकांचे उस्फूर्त, विद्वत्तापूर्ण विचार ऐकण्याचे भाग्य मला लाभले होते. ते नुकतेच काँग्रेसच्या मंडपातून परतले होते. हिंदीसंबंधी त्यांनी शांतपणे व्यक्त केलेले विचार ऐकणे हा संपन्न करणारा अनुभव होता. या संभाषणादरम्यान त्यांनी इंग्रजीलाही मानवंदना वाहिली; इंग्रजी भाषा तिच्या बोलींची काळजी घेते, याबद्दल त्यांनी प्रशंसा केली होती. इंग्लंडला गेले असताना त्यांना तिथल्या न्यायव्यवस्थेचा दुःखद अनुभव आला असला, तरी ब्रिटिश लोकशाहीवरचा त्यांचा विश्वास दृढ झाला. भारताने चित्रपटांद्वारे पंजाबमध्ये या लोकशाही तत्त्वांची शिकवण द्यावी, अशी विस्मयकारक सूचना त्यांनी गांभीर्याने केली होती. मला त्यांची ही समजूत पटल्यामुळे मी तो प्रसंग इथे नोंदवलेला नाही (मला ते पटलेले नव्हते), तर त्यांच्या मनात इंग्रजांविषयी तिरस्कार नव्हता, याकडे लक्ष वेधण्यासाठी हे नोंदवले आहे. परंतु, ब्रिटिश साम्राज्यामध्ये भारताला दुय्यम स्थान मिळणे मात्र त्यांना सहन होण्यासारखे नव्हते आणि त्यांनी ते सहन केलेही नाही. समान स्थान हा आपल्या देशाचा जन्मसिद्ध हक्क आहे, अशी त्यांची धारणा होती आणि हे स्थान तत्काळ मिळावे, अशी त्यांची इच्छा होती. भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षात त्यांनी सरकारला सोडले नाही. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्यांनी काही दया-माया दाखवली नाही आणि तशी स्वतःसाठी अपेक्षाही ठेवली नाही. भारताने अत्यंत प्रेम व आदर दिलेल्या या व्यक्तिमत्त्वाची किंमत इंग्रजांच्याही लक्षात येईल, अशी मी आशा करतो.
‘आपल्या दृष्टीने पाहता, लोकमान्य टिळक हे आधुनिक भारताचे एक निर्माते म्हणून येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या आठवणीत राहतील. आपल्यासाठी जगलेला व आपल्यासाठी मरण पावलेला एक माणूस म्हणून त्यांच्या स्मृतीला या पिढ्या आदरपूर्वक उजाळा देतील. असा माणूस मृत मानून बोलणे हेच ईश्वरनिंदा केल्यासारखे आहे. त्यांचे जीवनसार कायम आपल्यासोबत असेल. त्यांचे शौर्य, त्यांचा साधेपणा, त्यांची विलक्षण मेहनतीवृत्ती आणि त्यांचे देशप्रेम आपल्या जीवनातही रुजवून आपण भारतातील या एकमेव लोकमान्याचे चिरकाल टिकणारे स्मारक उभारू या. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.’
अ. के. भागवत , ग. प्र. प्रधान लिखित 'लोकमान्य टिळक' हे पुस्तक इथून खरेदी करता येईल.
Tags: नवे पुस्तक लोकमान्य टिळक ग. प्र. प्रधान अ.के. भागवत Book Lokmanya Tilak G. P. Pradhan A. K. Bhagawat Load More Tags
Add Comment