देशातील गेल्या महिनाभरातील काही दंगली पाहता राज ठाकरेंचं मुस्लीमविरोधी भाषण असामाजिक तत्त्वांच्या शस्त्रांना बळ देणारं ठरेल. शिवाय त्यांचं हे भाषण देशभरात दाखवलं गेलं. त्याचा अर्थ काय असावा, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मनसे अध्यक्षांच्या भाषणाचं सार हिंसेला उत्तेजन देणारं आहे, हे उघड आहे. त्यामुळं मदरसा असो वा मस्जिद; मुस्लिमांबद्दल गैरसमज, शंका, कुशंका, संदेहाला जागा निर्माण होण्यापूर्वी आसपासच्या मुसलमानांशी संवाद साधा.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 12 एप्रिल 2022 रोजी ‘‘माझ्या, तमाम हिंदू बांधवांनो’’ म्हणत, ठाणे शहरात झालेल्या उत्तरसभेत मुस्लीम मोहल्ल्याबद्दल एक प्रक्षोभक विधान केलं. बेहरामपाडा व मुंब्र्यातील मुस्लीम मोहल्ल्यात शस्त्रं असतात, असं ते विधान होतं. शिवाय त्यांनी पुढं असंही म्हटलं की, मदरसे व मस्जिदीमधे शस्त्रास्त्रं ठेवलेली असतात. अर्थात राज ठाकरेच पहिल्यांदा हे बोलत आहेत, अशातला भाग नाही. यापूर्वी आरएसएस, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व त्याच्या समविचारी संघटना, लेखक, भाष्यकार व प्रवक्ते सातत्याने हेच सांगत होते व आहेत.
आता मनसेने भगवा झेंडा स्वीकारून मुस्लीमविरोधी राजकारण सुरू केल्याने ह्या पक्षाकडून दुसरी अपेक्षा करणं फोल ठरतं. प्रखर मुस्लीमविरोधाचं राजकारण केल्यावर सत्ता मिळू शकते, हे गणित भाजपनं गेल्या सात-आठ वर्षांत सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळं मुस्लीमविरोधी भूमिका व हिंदुत्ववादी राजकीय रेट्यात अडगळीत पडलेल्या पक्षानं ही भूमिका घेणं फारसं आश्चर्यकारक नाही.
मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ‘मदरसा व मस्जिदीमधे शस्त्रं नसतात, शिवाय अशा ठिकाणी दहशतवादी तयार केले जात नाहीत. ती केवळ एक कल्पना आहे’ अशा प्रकारचा अहवाल कर्मठ हिंदुत्वाचे धुरीण नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळातच जारी झालेला आहे.
2014मध्ये देशात भाजपचं सरकार आलं, त्यानंतर काहीच महिन्यांत भाजप सरकारच्या गृहमंत्रालयानं हा अहवाल जारी केला होता. हा रिपोर्ट म्हणतो, “मदरसा किंवा मस्जिदमध्ये, प्रचारित केलं जातं तसं काही आढळलं नाही, शिवाय मदरशांमधून दहशतवादी तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं, हा केवळ भ्रम आहे.” हा अहवाल देशभरातील मदरशांच्या सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांच्या गटानं वर्षभरात केलेल्या विवेकपूर्ण सर्वेक्षणावर आधारित होता, असं गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं इकॉनॉमिक टाइम्समध्ये म्हटलं होतं.
अहवालात पुढं म्हटलं आहे की, देशात प्रामुख्यानं चार प्रकारचे मदरसे वेगवेगळ्या विचारसरणींचे अनुसरण करतात. परंतु भारतीय शिक्षक असलेले हे सर्व मदरसे कट्टरपंथीय किंवा प्रक्षोभक शिकवण्यांवर लक्ष केंद्रित करत नाहीत. तत्कालीन केद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी याबद्दल बहुधा या विषयावर लोकसभेत मांडणीदेखील केली होती.
त्या वेळी या अहवालाची फारशी चर्चा झाली नव्हती. कारण तो भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, आरएसएसच्या तहहयात केलेल्या खोट्या आरोपांची, मिथकांची व दिशाभूल करणाऱ्या भाषणांची पोलखोल करणारा होता. विशेष म्हणजे हा अहवाल कर्मठ हिंदुत्वाचे धुरीण नरेंद्र मोदी सरकारनेच जारी केला होता. परिणामी, सोईस्कररीत्या त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं.
मुस्लीमद्वेषी अजेंडा सातत्यानं राबविणाऱ्या प्रसिद्धीमाध्यमांनीदेखील हा अहवाल प्रसिद्ध होऊ नये, याची पूरेपूर काळजी घेतली. एका मराठी दैनिकात आतल्या पानात कुठंतरी दोन कॉलमी बातमी आलेली होती. त्याची चर्चा न झाल्यानं सामान्य लोकांना याबद्दल कसं कळणार?
मदरश्यासंदर्भात अजून एक महत्त्वाची गोष्ट भाजप सरकारनं केली होती. 2014च्या निवडणूक जाहीरनाम्यात भाजपनं मदरशांच्या आधुनिकीकरणाचं आश्वासन दिलं होतं. त्यासाठी 375 कोटींची तरतूद केली जाईल, असंही म्हटलं होतं. वास्तविक, त्यासाठी केलेल्या संशोधन अहवालातून उपरोक्त बाबी उघड झाल्या होत्या.
मोदी सरकारनं आपलं पहिलं बजेट सादर केलं, त्या वेळी मदरसा आधुनिकीकरणासाठी सुमारे 100 कोटी रुपये देऊ केले. होय, हेही खरं आहे. जो भाजप मदरश्यांबद्दल काही-बाही खोटं पसरवत असतो, त्याच भाजपच्या सरकारनं हे केलं होतं. त्या वेळी सगळे भक्तसंप्रदाय, समर्थक व प्रचारक गप्प होते. पुढे हे बजेट कमी-कमी होत गेलं हा भाग अलाहिदा...
मुद्दा असा की, एकच खोटं वारंवार सांगितलं की ते खरं वाटतं, हा ‘हिटलरी सिद्धान्त’ भाजपनं गेली अनेक दशकं तंतोतंत स्वीकारला आहे. त्यातून ते केवळ मुस्लीमच नाही तर दलित, ख्रिश्चन, आदिवासी, कम्युनिस्ट व आता सर्वच विरोधकांना नामोहरम करण्यासाठी अशा प्रकारची निव्वळ खोटी माहिती पसरवीत असतात.
त्यासाठी कानगोष्टी, मिथकं तयार केली जातात. त्यावर आधारित दिशाभूल करणारी, एकांगी माहिती वारंवार प्रकाशित होते. वैयक्तिक चर्चा, जाहीर सभा-संमलने, व्याख्याने, पत्रकार परिषदा, प्राइमटाइम चर्चेमधून ह्या दिशाभूल करणाऱ्या असत्य कानगोष्टी सांगत सुटतात. त्यामुळं सामान्य जणांनासुद्धा ही मिथकं पचनी पडत नाहीयेत.
हिंदुत्ववादी संघटना, भाजप व आरएसएसच्या सततच्या हल्ल्यामुळं भारतीय मुसलमान आता सुज्ञ झालेले आहेत. उशिरा का असेना त्यांनी संघीय मिथकांना उघडं पाडण्याची भूमिका घेतली आहे. देशात विविध ठिकाणी मुस्लीम समुदाय आपल्या मस्जिदी सर्व धर्मीय समुदायांसाठी खुल्या करीत आहेत. महाराष्ट्रात वेगेवगळ्या शहरांत अशा प्रकारचे कार्यक्रम राबविले जात आहेत.
हेही वाचा : कौसरबाग मस्जिद येथील समाज संवाद कार्यक्रम - कलीम अजीम
काही ठिकाणी विशेष कार्यक्रम घडवून गैरमुस्लीम बांधवांना मस्जिद परिचय व आतल्या परिसराचा फेरफटका घडवून आणला जातो. वास्तविक मस्जिदमध्ये कुरआनच्या प्रती व काही हदीस संकलनं सोडली तर बाकी काहीही नसतं. सगळं गर्भगृह रिकामं व मोकळं असतं. अगदी इमाम जिथं नमाज अदा करतो, त्या मिंबरपर्यंतही कोणालाही सहज जाता येतं.
ज्यांना आपल्या परिसरातील मस्जिद पाहायची आहे, त्यांनी कुठलीही शंका-कुशंका न बाळगता स्थानिक लोकांशी संपर्क केला तर ते कोणालाही मुक्तपणे मस्जिदींचा विहार घडवून आणतात. जे आहे ते सर्व दाखवतात. त्यामुळं काही-बाही ऐकण्यापेक्षा सुज्ञ नागरिकांनी स्वत:च तिथं जाऊन खात्री करून घ्यावी. पुणे, मुंबई, ठाणे येथे असे उपक्रम करणाऱ्या मस्जिद कमिट्या, अनेक संस्था, संघटना आहेत, त्यांच्याशी सहज संपर्क होऊ शकतो.
मदरसा व मस्जिदमध्ये काही-बाही (शस्त्रं) असतं, हे आरएसएस व हिंदुवादी लोकांनी पसरवलेलं लोकप्रिय मिथक आहे. तपास यंत्रणांनी तिथं असं काही नसतं, हे अनेकदा सांगूनही हाच मुद्दा परत-परत चर्चेला आणला जातो. अर्थातच त्यामागे, मुस्लिमांबद्दल जनमानसात संशयाचं वातावरण तयार करणं व बहुसंख्याकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी दहशत तयार करणं, असा स्पष्ट हेतू असतो. वेळ आली तेव्हा अशा भेदरलेल्या लोकांना शेजारी-पाजारी, मित्र, संपर्कातील लोकांविरोधात उभं केलं जाऊ शकतं. कारण भीती, संशय आणि अनिश्चितता कुठलीही कृती करण्यास सहज उद्युक्त करू शकते.
सामान्य लोकांना आपल्या निकटवर्तीय व संपर्कातील मुसलमानांविरोधात हिंसेला प्रवृत्त करून त्यास उत्तेजन देण्याची मानसिकता तयार करण्याचं हे कारस्थान असतं. अर्थात भडकवणारी ही डोकी अदृश्य स्वरूपात असतात. परंतु त्याचा वाहक कळत-नकळत सामान्यजन होतो. दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्याचं तो माध्यम होतो. त्यामुळं दंगलीत सामान्य जनच होरपळले जातात. ही अदृश्य डोकी प्रत्यक्ष दंगलीत मात्र नजरेच्या टप्प्यात कुठेच दिसत नाहीत. पण त्यांच्या दृष्कृत्यांचा परिणाम दीर्घ काळ राहतो. त्यामुळे अशा मिथकांना बळी पडण्यापूर्वी आपला विवेक जागृत ठेवून किमान पातळीवर खोटं काय आणि खरं काय, याचा विचार भद्र जनांनी करावा.
औरंगाबाद विद्यापीठात प्रस्तुत लेखकाचं पत्रकारितेच्या पदवीचं शिक्षण झालं. त्या वेळी लेखक विद्यापीठालगतच्या विद्युत कॉलनीतील आलमगीर मस्जिदीमध्ये राहत होता. ती सर्व गैरमुस्लीम वस्ती आहे. ही मंडळी मगरिबच्या नमाजनंतर पाण्याचे ग्लास, मग (mug) घेऊन बाहेर उभी राहतात. इमामसाहेब बाहेर येऊन त्या पाण्यात दुआ करून फुंकर मारतात. तिथल्या लोकांची श्रद्धा आहे की, हे पाणी पिल्यानं त्यांचे सर्व आजार नाहीसे होतात.
तत्पूर्वी ह्या लोकांपैकी अनेकांना वाटे की, मस्जिदमध्ये बाहेरून लोक येतात, दोन-दोन दिवस राहतात. तिथे आपल्याविरोधात काहीतरी कट शिजत असावा अशी भीती साहजिकच त्यांना होती. पुढं मस्जिदींच्या इमामसाहेबांचा गल्लीतील लोकांशी संपर्क वाढला तसा हा भ्रम त्यांनी त्यांना कळवला. इमामसाहेबांनी सर्वांना मस्जिदमधे बोलावलं आणि फिरवून मस्जिद दाखवली. ज्या वेळी बाहेरून काही लोक (जमात) मस्जिदीत आले, त्याही वेळी वस्तीतील काही गैरमुस्लिमांना त्यांच्यात आणून बसवलं. त्यानंतर त्यांचा सगळाच भ्रम दूर झाला, असं त्यांनी प्रस्तुत लेखकाला सांगितलं.
त्या वस्तीत मस्जिदमध्ये राहणारे सात-आठ विद्यार्थी तेवढेच मुस्लीम, बाकी सर्व गैरमुस्लीम होते! मनुष्य हा समाजशील प्राणी असतो, तो एकटा राहू शकत नाही, त्यामुळं प्रस्तुत लेखकाची तिथल्या लोकांशी चांगली मैत्री जमली. मैत्रीपूर्ण संवादातून, त्यांच्या मनात काय होतं हे त्यांनी लेखकाला सांगितलं. त्यामुळं मदरसा-मस्जिदीबद्दल कोणताही भ्रम मजबूत करण्यापूर्वी प्रत्यक्ष जाऊन तिथं भेट देणं कितीही चांगलं!
राज ठाकरेंचं संबंधित भाषण ‘द कश्मीर फाइल्स’नंतरच्या एका मोठ्या योजनेचा भाग असू शकतो. कारण हा सिनेमा बहुसंख्याक समुदायाला मुस्लीमविरोधी हिंसा करण्यास प्रवृत्त करतो. सिनेमा पाहून देशात अनेक ठिकाणी मुस्लीमविरोधी हिंसा झालेल्या आहेत. वेगवेगळी कारणं पुढं करून चार-पाच राज्यांमध्ये मुस्लीमविरोधी हिंसा व दंगलीच्या घटना घडल्या.
राजस्थानमध्ये अनेक दिवस मुस्लीमविरोधात लक्षणीय प्रमाणात हल्ले झाले, जाळपोळ, संपत्तीच्या नासधुशीच्या घटना झाल्या. ‘भारतीय मुस्लिमांमुळे इथला ‘हिंदू खतरे में’ आला आहे’ असा कुप्रचार हा सिनेमा करतो. ही अनामिक भीती यशस्वीपणे जनमानसात रुजवण्यात भाजप व त्यांच्या समविचारी सहयोगी संघटना यशस्वी ठरल्या आहेत. प्रचारकांच्या भाषणानंतर हा कुप्रचार आणखी बळकट झालेला दिसतो.
वास्तविक, इथल्या सर्वसामान्य हिंदूंना राजकीय हिंदुत्वाच्या धार्मिक झेंड्याखाली आणून ‘हिंदू खतरे में है’, अशी आरोळी ठोकली की, त्यांचं राजकीय संघटन करणं सोपं जातं. शिवाय त्यांच्यामध्ये मुसलमानांचं भय निर्माण करून त्यांना हिंसेला प्रवृत्त केलं जाऊ शकतं. मुळात भारतात हिंदू कधीच ‘खतरे में’ नव्हता, असा अहवाल 21 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय गृहमंत्रालयानं जारी केलेला आहे. नागपूरचे माहिती हक्क कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी हा प्रश्न मंत्रालयाला विचारला होता. त्या वेळी उत्तर देताना “अशा प्रकाराचे काहीही पुरावे नाहीत”, असं अमित शहा यांच्या मंत्रालयानं म्हटलं होतं. पुढे मंत्रालयानं असंही स्पष्ट केलं की, अशा प्रकारच्या काल्पनिक प्रश्नांचं उत्तर दिलं जाऊ शकत नाही. ('द टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये प्रसिद्ध झालेली यासंबंधित बातमी)
परंतु देशात हिंदू ‘खतरे में’ असल्याची बतावणी करत सामाजिक अशांतता पसरवली जात आहे. किंबहुना महाराष्ट्रात काही छुप्या शक्ती दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्याच्या हालचाली करत आहेत. खरेदी केलेल्या तलवारींचा मोठा साठा पुणे व औरंगाबादमध्ये जप्त झाला. रामनवमीला राज्याच्या शांततेला काळिमा फासणारी घटना मुंबईत घडली.
रामनवमीदिनी गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल व झारखंडमध्ये मुस्लीमविरोधी हल्ल्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी मस्जिदीत घुसून धुडगूस घालण्यात आला, उपद्रव माजवण्यात आला. कर्नाटकमध्ये एका मस्जिदीसमोर उभं राहून स्थानिक मुसलमानांनी शोभायात्रेतील हिंदू बांधवांना शरबत, पाण्याचं वाटप केलं. परंतु परतीच्या वेळी त्याच मस्जिदीसमोर भगवे झेंडे हाती घेतलेल्यांनी प्रचंड नासधूस केली. मध्यप्रदेशच्या खरगोनमध्ये शोभायात्रेत दगडफेकीचा आरोप करीत तिथल्या सरकारने मुसलमानांची घरं बुलडोझर लावून नष्ट केली.
मुळात आरोप, दोष सिद्ध न होता, असं कृत्य करणं कायदाबाह्य होतं. ‘मुस्लीम हिंदूंच्या मिरवणुकीत दगडफेक करतात,’ हा फॉर्म्युला आता जुना झाला आहे. शिवाय मुस्लीमही अशी कृती करून आपल्या संकटांना कदापि वाढवणार नाहीत. अंतिमत: याचा फटका आपल्यालाच बसतो, हे मुस्लिमांना चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे मुस्लिमांचं राजकीय व सामाजिक अलगीकरण करणाऱ्या भाजपशासित काळात ही चूक त्यांच्याकडून हेतूत:देखील घडू शकत नाही. असो.
भाजपच्या सहयोगी संघटनांनी भारतीय मुसलमानांबद्दल अनेक कुप्रचार आणि मिथकं पसरवली आहेत. त्यांपैकी एक असं की, मुसलमान मांसाहार करतो, त्यामुळं तो अधिक हिंसक होतो अर्थात आजघडीला कर्मठ हिंदुवादी संघटना व भाजपसमर्थक घटकांनी चालवलेल्या मुस्लीमविरोधी हिंसेला पाहून वाटतं की, हिंदूच अधिक आक्रमक व हिंसक आहेत. नृशंस मॉब लिचिंग, मुस्लीमविरोधी हिंसा व महिलांना बलात्काराच्या धमक्या देणं, हे अहिंसेचं तर लक्षण नाही!
हेही वाचा : मंटो आणि अब्बास यांच्या उर्दू कथांमध्ये वृद्धांचे चित्रण - कलीम अजीम
थोडक्यात असं म्हणता येईल की, राज ठाकरेंची संबंधित विधानं हे आगामी महापालिका निवडणुकांतील मतं डोळ्यांसमोर ठेवून केलं गेलेलं ‘राज’कारण आहे. तसंच, राज्यातील सामाजिक शांतता बिघडवण्याचं हे एक कारस्थान असू शकतं. त्याच दृष्टीने राज ठाकरे कार्यरत दिसून येतात, अशी टीकादेखील त्यांच्यावर झाली आहे. नेमकी योग्य वेळ साधून, त्यांनी ‘अजान’ला केंद्रस्थानी ठेवून कार्यकर्त्यांना मराठी मुस्लीमांविरोधात उभं राहण्याचा आदेश जारी केलेला दिसतो.
देशातील गेल्या महिनाभरातील काही दंगली पाहता राज ठाकरेंचं मुस्लीमविरोधी भाषण असामाजिक तत्त्वांच्या शस्त्रांना बळ देणारं ठरेल. शिवाय त्यांचं हे भाषण देशभरात दाखवलं गेलं. त्याचा अर्थ काय असावा, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मनसे अध्यक्षांच्या भाषणाचं सार हिंसेला उत्तेजन देणारं आहे, हे उघड आहे. त्यामुळं मदरसा असो वा मस्जिद; मुस्लिमांबद्दल गैरसमज, शंका, कुशंका, संदेहाला जागा निर्माण होण्यापूर्वी आसपासच्या मुसलमानांशी संवाद साधा.
इतकंच नाही तर कॉलनी, मोहल्ला, गल्ली, ऑफिस, शाळा-कॉलेजमधील आपल्या मुस्लीम सहकाऱ्यांशी बोला. त्यानंतर हा कुप्रचार दिशाभूल करणारा, द्वेष निर्माण करणारा आणि सफेद झूठ आहे, याची खात्री पटेल. राजकीय भाषणाच्या आहारी जाऊन तंटे-बखेडे उभे करून, स्वत:वर पोलिस खटले नोंदवून घेऊन कुटुंबाचं आणि समाजाचं उध्वस्त होणंही त्यातून थांबवता येऊ शकेल.
- कलीम अजीम, पुणे
kalimazim2@gmail.com
(लेखक, सामाजिक प्रश्नांचे चिंतक आहेत.)
Tags: राज ठाकरे हिंदू मुस्लीम हनुमान चालीसा मस्जिद धर्म रामनवमी कलीम अजीम मशीद Load More Tags
Add Comment