लंडन येथून प्रकाशित होणाऱ्या ‘द फायनान्शियल टाइम्स’ या वृत्तपत्राला सव्वाशे वर्षे पूर्ण झाली तेव्हा त्या निमित्ताने, त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांमधील एक आहे : Lunch with the FT. त्या आधीच्या 18 वर्षांत FT मधून प्रसिद्ध झालेल्या 800 मुलाखतींमधील उत्कृष्ट 52 मुलाखतींचे संकलन म्हणजे हे पुस्तक. या मुलाखतीच्या सदराची कल्पना अशी होती की, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला, क्रीडा, संस्कृती या क्षेत्रांतील दिग्गजांना त्यांच्या आवडत्या हॉटेलमध्ये बोलवायचे आणि त्यांच्या आवडीचे जेवण FTच्या प्रतिनिधीने त्यांच्यासोबत घ्यायचे. (अर्थातच त्याचे बिल FT ने द्यायचे.) आणि जेवणाच्या टेबलावर जे बोलणे होईल, त्यावर आधारित लेख नंतरच्या आठवड्यात प्रसिद्ध करायचा. 9/11 घडले त्यानंतर दोन आठवड्यांनी म्हणजे 29 सप्टेंबर 2001 रोजी इम्रान खान बरोबर FTचे पश्चिम आशियाचे त्या वेळचे प्रतिनिधी एडवर्ड ल्युक यांनी संवाद साधला...
21 वर्षे होऊन गेली या मुलाखतीला... नुकताच पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात तेथील नॅशनल असेम्ब्लीतील विरोधी पक्षांनी सोमवारी (28 मार्च) अविश्वास प्रस्ताव दाखल केला. विशेष म्हणजे इम्रान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ (पीटीआय) या पक्षातीलच काही खासदारांनी त्यांच्याविरोधात मतदान करण्याचे ठरवले. मात्र आज (3 मार्च) असेम्ब्लीमध्ये उपसभापतींनी अविश्वास ठराव मतदान न घेताच फेटाळून लावला. आणि इम्रान यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी संसद व प्रांतीय विधानसभा बरखास्त केली. पाकिस्तानमध्ये सध्या सुरु असलेल्या या सर्व राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, 15 जून 2013 रोजी साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झालेला हा मुलाखतवजा लेख पुन्हा भेटीला आणतो आहोत.
ही मुलाखत इम्रान यांनी दिली तेव्हा ते 49 वर्षांचे होते आणि पाकिस्तानच्या राजकारणात त्यांचा पक्ष अगदीच नवखा होता.. त्यांच्या पक्षाला सत्ता मिळण्याची शक्यता तेव्हा किंचितही नव्हती. मात्र त्यानंतरच्या 21 वर्षांत पाकिस्तानच्या राजकारणात अनेक मोठ्या उलथापालथी झाल्या , नंतर इम्रान यांचा पक्ष सत्तेवर आला आणि तब्बल चार वर्षे राहिला. या दोन दशकांतील इम्रान यांचे वर्तन व त्यांच्या भूमिका प्रचंड वादग्रस्त राहिल्या आहेत. हा बदल इतका टोकाचा आहे की, कुठून निघालास आणि कुठे पोहचलास असा प्रश्न तो प्रवास पाहून विचारावासा वाटतो..या पार्श्वभूमीवर इम्रान कुठून निघाले याची झलक दाखवणारी ही मुलाखत.
आपल्या बालपणातील ‘हीरो’ला भेटण्याची संधी प्रत्येकालाच मिळते असे नाही. मला ती संधी मिळाली होती; पण पाकिस्तानचा आतापर्यंतचा सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि अद्यापही लाखो किशोरवयीन मुलींसाठी ‘दिल की धडकन’ असलेला इम्रान खान नॉस्टेल्जियात रमण्याच्या मूडमध्ये नव्हता. कारण अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध पुकारलेल्या युद्धात, अमेरिकेची पाठराखण करण्याचा निर्णय पाकिस्तानच्या मुशर्रफ राजवटीने घेतला होता आणि त्यामुळे आधुनिकतेच्या झगमगाटाने उजळून निघालेल्या इस्लामाबाद या पाकिस्तानच्या राजधानीत भयभीत वातावरण निर्माण झाले होते. इम्रान म्हणाला, आपण वृद्ध होत चाललो आहोत, अशी भावना माझ्या मनात पहिल्यांदाच येऊ लागली आहे. मी मूलत: आशावादी आहे; पण न्यूयॉर्कवर झालेले दहशतवादी हल्ले आणि अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध पुकारलेले युद्ध, यामुळे ‘आपण मोठ्या संकटात सापडलो आहोत,’ असे मला वाटू लागले आहे. पांढऱ्या रंगाचे सलवार-कमीज असलेला (अत्यंत उच्च अभिरुचीचा) पोषाख इम्रानने केला होता. इंग्लंडमध्ये शिक्षण घेतलेला आणि आता पाकिस्तानातील तेहेरिक-ए-इन्साफ या छोट्या पक्षाचा संस्थापक नेता असलेला इम्रान 49 वर्षांचा आहे; पण तो त्यापेक्षा बऱ्याच कमी वयाचा वाटत होता. पाकिस्तानच्या या माजी क्रिकेट कर्णधाराकडून जनतेच्या बऱ्याच अपेक्षा आहेत, अशी हवा पाकिस्तानात आहे; पण अमेरिका आणि अमेरिकेने अफगाणिस्तानविरुद्ध सुरू केलेले युद्ध याबाबत पाकिस्तानी जनतेला काय वाटते याविषयी इम्रानला बोलते करण्यासाठी मला बरेच कष्ट पडले.
आम्ही अगदी ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी भेटलो. इस्लामाबादच्या मध्यवर्ती भागातील अफगाणांच्या वस्तीमधील ‘काबुल’ रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलो होतो. मात्र, इम्रानच्या उपस्थितीमुळे सभोवताली असलेल्या कोणाच्याही भुवया उंचावल्या गेल्या नाहीत. इम्रान म्हणाला, ‘‘मला अफगाणी खाद्यपदार्थ आवडतात. इथे मिळणारे (अत्यंत मऊ शिजवलेले) मटण जगातील सर्वोत्कृष्ट दर्जाचे असते.’’
इम्रानने आम्हा दोघांसाठी साध्याच जेवणाची ऑर्डर दिली. कबाब, उकडलेली पालेभाजी आणि न आंबवलेला अफगाण ब्रेड... बस्स एवढेच. इम्रान जरी पंजाब प्रांतात जन्माला आला असला, तरी त्याचे वाडवडील मूळचे पठाण, अफगाणिस्तानजवळच्या सरहद्द प्रांतातून आलेले आहेत. अफगाणिस्तानातील ‘तालिबान’ या कट्टरवादी संघटनेत पठाणांचे वर्चस्व आहे.
ब्रिटिश राजवटीत अत्यंत कमी दबावाखाली राहिलेले लोक म्हणजे पठाण, असे कौतुकाचे वर्णन रुडयार्ड किपलिंग व अन्य अनेकांनी केले आहे. आणि दक्षिण-पूर्व पाकिस्तानातील पठाणांमधून अनेक जलदगती गोलंदाज निपजले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर इतके यश मिळाले. अर्थातच, त्यांच्यामध्ये सर्वाधिक बहुमान इम्रानला मिळाला.
आमचे संभाषण, जनरल मुशर्रफ यांनी अफगाणिस्तान विरुद्धच्या युद्धात अमेरिकेला साथ देण्याचा निर्णय घेतला, त्याकडे आले... तेव्हा इम्रान म्हणाला, ‘‘अफगाण हे आमचे चुलत भावंडं आहेत. आमच्यात एकच रक्त वाहतंय. त्यामुळे निष्पाप अफगाण नागरिकांचे जीव घेणारा कोणताही हल्ला पाकिस्तानी जनतेत प्रचंड असंतोष निर्माण करणारा ठरेल. ते मोठे अनैतिक कृत्य असेल.’’
हेही वाचा : राजनीती उलगडून दाखवणारे पुस्तक! - विनोद शिरसाठ
ऑक्सफर्ड विद्यापीठातील केबल कॉलेजमधून राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्र या विषयांत पदवी मिळवलेल्या इम्रानने इस्लामी देश आणि पाश्चिमात्य देश यांच्यातील विसंवादाचे निरीक्षण केले आहे. त्यांच्यामधील ताण-तणाव त्याला चांगले माहीत आहेत आणि त्यामुळे तो अस्वस्थ आहे. अमेरिकेवर झालेला दहशतवादी हल्ला इस्लाम धर्म आणि पश्चिमेकडील देश यांच्यात मोठीच दुफळी निर्माण करील असे त्याला वाटते, म्हणून तो चिंतेत आहे. त्याचबरोबर, आक्रमक धर्मांध शक्तींच्या कारवायांमुळेही तो काळजीत आहे. ते लोक रस्त्यावर उतरून ‘अमेरिकेचा मुडदा पाडा’ आणि ‘ओसामा चिरायु होवो’ अशा घोषणा देताहेत- जो ओसामा या हल्ल्याचा संशयीत सूत्रधार आहे. इम्रान म्हणाला, ‘‘हे लोक बहुसंख्य पाकिस्तानी जनतेचे प्रतिनिधी नाहीत; पण पश्चिमेकडील माध्यमे (विशेषत: टी.व्ही. चॅनेल्स) या कट्टर इस्लामवाद्यांवरच प्रकाशझोत टाकताहेत. त्यामुळे ‘मुस्लीम लोक धर्मवेडे असतात’ अशा प्रकारचे ठोकळेबाज चित्र निर्माण होते.’’
इम्रान हा ढोबळ अर्थाने सेक्युलरच आहे; पण पाश्चात्त्य देशांच्या ठोकळेबाज विचारपद्धतीची झळ त्यालाही सहन करावी लागली आहे. विशेषत: 1995 मध्ये त्याने अँग्लो- फ्रेंच उद्योजक जेम्स गोल्डस्मिथ यांची मुलगी जेमिमा हिच्याबरोबर विवाह ठरवला तेव्हा!
इम्रान जुन्या आठवणीत गेला आणि म्हणाला, ‘‘जेमिमाशी माझा विवाह ठरला तेव्हा ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी ज्या प्रकारचे वृत्तांत दिले त्याची मी कल्पनाही केली नव्हती. त्यांनी असे सांगायला सुरुवात केली होती की, इम्रान जेमिमाला पाकिस्तानातील कुठल्यातरी ठिकाणी कोंडून ठेवणार आहे आणि तिला कधीही बाहेर पडू दिले जाणार नाही.’’
पाकिस्तानातील उर्दू वृत्तपत्रांवरही इम्रान नाराज आहे. इम्रानच्या होणाऱ्या बायकोवर ‘ती ज्यू आहे म्हणून’ त्या वृत्तपत्रांनी ज्या पद्धतीने लिहिले ते त्याला निराश करणारे होते. इम्रान म्हणाला, ‘‘मी ज्यूंचा हस्तक आहे आणि इस्त्रायलसाठी काम करतो, असा अपप्रचार त्यांनी केला होता. एकूण तो संपूर्ण कालखंड खूपच त्रासदायक होता.’’
इम्रान त्याच्या हाताच्या बोटांनी अतिशय सफाईदारपणे मांस तोडून खात होता आणि माझ्या हातात काटे चमचे असतानाही ते मटण खाताना माझी त्रेधा उडाली होती. कोका-कोलाच्या बाटलीतून इम्रान हळूवार घोट घेत होता... मी त्याला विचारले, ‘‘इस्लाम आणि पश्चिमेकडील देश शांतता व सहकार्य ठेवून नांदू शकतात, या शक्यतेबाबत तू निराशावादी दिसतो आहेस. याचे कारण माध्यमांबाबतचा तुझा अनुभव हे आहे का?’’
इम्रान थोडा अडचणीत सापडल्यासारखा वाटला. क्षणभर थांबून तो म्हणाला, ‘‘न्यूयॉर्क व वॉशिंग्टन येथे दहशतवाद्यांनी जे काही केले त्याचा इस्लामशी काहीही संबंध नाही.’’ पुढे तो म्हणाला, ‘‘जेव्हा तमिळी वाघ श्रीलंकेत आत्मघातकी हल्ले करतात, तेव्हा पश्चिमेकडील लोक हिंदू धर्माला दोष देत नाहीत. मग अशा घटना घडतात, तेव्हा ते इस्लाम धर्माला लगेचच दोष देऊन मोकळे का होतात?’
इम्रान त्याही पुढे जाऊन, अगदी ठामपणे असे सांगतो की, बिन लादेनसाठी पार्श्वभूमी तयार करण्याचे आणि त्याला मैदान मोकळे सोडण्याचे काम पश्चिमेने विशेषत: अमेरिकेनेच केले आहे! इस्त्रायलने बळकावलेल्या भूभागातील लोकांकडे अमेरिका दुर्लक्ष करतेय आणि इराकवर निर्बंध घालून हजारो निष्पाप मुलांचा बळी घेतला जातोय, ही अमेरिकेची दुटप्पी रणनीती आहे, असे मुस्लीम जनतेचे मत बनले आहे... हे सांगताना इम्रान म्हणाला, ‘‘अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे, ते अत्यंत महत्त्वाचे आहे; पण मुस्लिमांच्या मनात राग व संताप खदखदतोय त्याची कारणेही दूर होणे आवश्यक आहे.’’
‘‘म्हणजे दहशतवादाच्या विरोधात ठाम भूमिका आणि दहशतवादाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांबाबतही ठोस भूमिका असे तुला म्हणायचेय का.’’ असे मी विचारले, तेव्हा इम्रानने ताबडतोब ‘होकार’ दिला.
डिशमध्ये उरलेले मटण आम्ही संपवून टाकले आणि मग साखर घातलेला अफगाण चहा मागवला. मी त्याला विचारले, ‘‘पाकिस्तानच्या राजकारणात सक्रिय होण्यामागील तुझ्या प्रेरणा कोणत्या होत्या? पाकिस्तानबाहेर जिथे कुठे तू जाशील तिथे तुला प्रचंड ग्लॅमर होते आणि त्यात तू सुखेनैव राहू शकत होतास. मग तरीही क्रिकेट जगतापासून तू कसा तुटलास?’’
तो म्हणाला, ‘‘1980च्या दशकाच्या मध्यावर पाकिस्तानातील सत्ताधारी वर्तुळात अनेक माफिया कुटुंबे होती. ती भ्रष्टाचारात आकंठ बुडालेली होती, तेव्हा माझे डोळे उघडले आणि मी राजकारणाकडे खेचला गेलो. त्याच दरम्यान (1985 मध्ये) माझ्या आईचा कॅन्सरच्या आजारात मृत्यू झाला. तिचा मृत्यू ही माझ्या आयुष्याला पूर्णत: कलाटणी देणारी घटना होती. मला जीवनाचा अर्थ शोधायला लावणारी ती घटना होती.’’ इम्रानने त्यानंतरचे दशक आईच्या स्मरणार्थ लाहोरमध्ये अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यासाठी निधी जमवण्यात खर्च केले. इम्रान म्हणाला, ‘‘जेव्हा तुम्ही रस्त्यावर उतरता आणि लोकांना पैसे मागायला लागता तेव्हा तुमच्या चारित्र्यावर फार मोठा परिणाम होत असतो. तो अनुभव आम्हाला ‘स्व’च्या बाहेर काढतो. त्या अनुभवानेही माझे डोळे उघडले. पाकिस्तानच्या राजकारणात पैसा कोणती भूमिका पार पाडतो हे मला कळले.’’
त्या कॅन्सर हॉस्पिटलसाठी इम्रानने स्वत:ची फार मोठी देणगी (त्या वेळी दीड अब्ज) दिली. तरीही जमवलेल्या पैशांत अफरातफर झाली, असा आरोप इम्रानवर केला गेला. मात्र, तरीही 1997च्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रानचा पक्ष ‘भ्रष्टाचाराला विरोध’ या प्रमुख मुद्यावर लढला. इम्रान म्हणतो, ‘पैशांचा अभाव असेल, तर राजकारणात काहीही करता येत नाही. तुमच्याकडे भरपूर पैसे नसतील, तर पाकिस्तानी माध्यमांत तुम्हाला स्थान मिळत नाही.
पण इम्रानचा आशावाद दुर्दम्य आहे (काही लोक त्याला भाबडेपणा म्हणतील.) घटना व पुरावे कितीही विरोधात जात असतील, तरी इम्रान असे भाकित करतो की, पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्याचा पक्ष सत्तेवर येईल.
मोठ्याने हसून तो म्हणाला, ‘‘आशावाद काम करतो... मी माझ्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात असा विचार करीत होतो की, मी 100 रन्स करीन आणि 10 विकेटस् घेईन. पण मी आता जर असा विचार केला की, राजकारणात मला काहीच स्थान मिळणार नाही, तरी मला त्याची फिकिर नाही.’’
आता आमची निघायची वेळ झाली होती. आमच्या जेवणाचे बिल फक्त पाच डॉलर्स झाले होते, जेवणाचा दर्जा पाहता ते खूपच कमी होते.
इम्रान म्हणाला, ‘‘टीप जरा जास्त ठेव.’’ आम्ही टेबलावरून उठलो, तेव्हा मी त्याला विचारले,
‘‘आपण क्रिकेट जगत आणि आंतरराष्ट्रीय स्टारडम मिस केलंय असं तुला वाटतं?’’
क्षणभर विचार करून तो म्हणाला, ‘‘मला क्रिकेट जगत खूपच लहान आणि फारच दूरचे वाटत आहे... आता मी राजकारण आणि कॅन्सर हॉस्पिटल यांद्वारे जे काही करीत आहे, त्यातून मिळणारे कर्तव्यपूर्तीचे समाधान खूप, खूपच मोठे आहे.’’
(अनुवाद : विनोद शिरसाठ)
Tags: राजकीय मुलाखत पाकिस्तान संसद निवडणूक पंतप्रधान अविश्वासाचा ठराव इम्रान खान द फायनान्शियल टाइम्स Load More Tags
Add Comment