दोन दशके इंग्रजी पत्रकारिता, दोन दशके मराठी पत्रकारिता आणि आता काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार अशा प्रकारे मागील पन्नास वर्षे सार्वजनिक जीवनात वावरणारे कुमार केतकर आज वयाची 75 वर्षे पूर्ण करीत आहेत. 13 वर्षांपूर्वीच्या जानेवारी महिन्यात तिसरे ब्राह्मण महाअधिवेशन परभणी येथे झाले होते. त्या अधिवेशनात केतकर यांनी केलेल्या तडाखेबंद भाषणामुळे त्यांच्यावर श्रोत्यांमधून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. ते संपूर्ण भाषण आणि त्या भाषणाचे जोरदार समर्थन करणारे संपादकीय त्या वेळच्या साधना सप्ताहिकात प्रसिद्ध झाले होते. केतकरांच्या वैचारिकतेची, निर्भयतेची आणि निस्पृह वृत्तीची झलक पाहायची असेल तर हे भाषण वाचायला हवे आणि या भाषणाचे अनन्यसाधारणत्व समजून घ्यायचे असेल तर तो संपादकीय लेखही वाचायला हवा.
- संपादक
मी भारतात जन्माला आलो म्हणून भारतीय झालो. आई-वडील ब्राह्मण होते म्हणून जन्माने ब्राह्मण झालो. कुणा मांग-मातंगांच्या, जाट-राजपुताच्या, मराठा-क्षत्रियाच्या कुटुंबात जन्माला आलो असतो तर त्या जातीचा म्हणून ओळखला गेलो असतो. कुठच्या तरी अरब-मुस्लिम देशात अवतरलो असतो तर अरबी मुसलमान झालो असतो.
कोणत्या देशात, कोणत्या धर्मात, कोणत्या जातीत मी जन्म घ्यावा, तो जन्म मुलीचा असावा की मुलाचा, माझा रंग गोरा असावा की काळा, मी श्रीमंतांच्या घरात जन्माला यावे की गरिबाच्या, जमीनदाराच्या की शेतमजुराच्या, सावकार-भांडवलदाराच्या की हातगाडी ओढणाऱ्याच्या असा कोणताही प्रश्न मला कुणी विचारला नव्हता. नव्हे, तो आपल्यापैकी कुणालाच विचारलेला नव्हता. इथेच नव्हे, जगात कुणालाही.
आज जगाची लोकसंख्या सुमारे साडेसहाशे कोटी आहे. त्यापैकी 110 कोटींच्या आसपास भारतात. जगात सर्वत्र, म्हणजे कोकणापासून कॅलिफोर्नियापर्यंत आणि अंदमानपासून ऑस्ट्रेलियापर्यंत पसरलेल्या हिंदूंची संख्या साधारणपणे 85 कोटी. म्हणजे जगातील लोकसंख्येच्या सुमारे 13 टक्के. जगातील या 13 टक्के लोकांमध्ये म्हणजे 85 कोटी हिंदूंमध्ये सुमारे 5 ते 10 कोटी ब्राह्मण.
यात कोणत्या ब्राह्मण समाजाला ‘ब्राह्मणा’चे स्थान द्यायचे, याबाबत समाजशास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. मांस-मच्छी खाणारे बंगाली भद्र लोक किंवा सारस्वत यांना तो ‘दर्जा’ द्यायचा की नाही? तमिळांच्या प्रांतात अय्यर आणि अय्यंगार यांच्यातील ब्राह्मणी तणाव किती तीव्र आहे, हे त्यांच्याकडून ऐकले तरच त्यातील दाह कळू शकेल. शैव आणि वैष्णव ब्राह्मणांमधून तर विस्तव जात नसे. तीच गोष्ट केरळमधील नंबुद्री आणि इतर ब्राह्मणांची. उत्तर भारतात, म्हणजे आर्यावर्तातही ब्राह्मणांच्या अंतर्गत उतरंड आणि तणाव आहेत. अगदी चार-दोन दशकांपूर्वीपर्यंत महाराष्ट्रातील चित्पावन व इतर सर्व मिळून एक जात. साहजिकच चित्पावनांबद्दल इतर ब्राह्मणांमध्ये असूया, द्वेष वा शत्रुत्वही असे.
मुद्दा हा की जन्मावरून ओळखल्या जाणाऱ्या जगातील ब्राह्मणांची एकूण संख्या ठरविताना ‘उदार’ दृष्टिकोन ठेवला तर ती संख्या 10 कोटींच्या आसपास म्हणजे साधारणपणे दीड टक्का होईल.
आज येथे या विशाल संमेलनासाठी जमलेले आणि जन्माने ब्राह्मण असलेले लोक या सर्व दीड टक्के म्हणजे 10 कोटी लोकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रतिनिधी आहेत असे मानले तरी ती संख्या लक्षणीय आहे. परंतु लक्षात ठेवायची बाब ही की, लक्षणीय काय असायला हवे? संख्या की उद्दिष्ट? जन्म‘जात’ की वैश्विकत्व? दृष्टिकोन की समाजस्थान?
गेली काही वर्षे ब्राह्मण समाजात प्रचंड अस्वस्थता आणि असंतोष पसरला आहे. आपण बाजूला फेकले जात आहोत किंवा कोंडीत पकडले गेले आहोत, सामाजिक न्यायाच्या नावाखाली आपल्यावर अन्याय केला जात आहे, आपल्या गुणांचे व पारंपरिक बौद्धिकतेचे चीज होत नाही, देश सोडून जाण्याखेरीज आपल्याला पर्याय नाही अशी प्रक्षोभाची भावना एका बाजूला... आणि खरोखरीच परिस्थितीने, गरिबीने वा सांस्कृतिकतेने कुचंबले गेल्यामुळे आलेले केविलवाणेपण दुसऱ्या बाजूला- असे ब्राह्मणी मानसिकतेचे चित्र देशभर आहे.
एके काळी ‘चांदोबा’ व अन्य कुठल्याही मासिकात गोष्टीची सुरुवात ‘‘सुंदरनगर गावात एक दरिद्री ब्राह्मण कुटुंब राहत असे’ अशा वाक्याने होत असे. आता तसे दरिद्री ब्राह्मण एकूण ब्राह्मणांच्या संख्येत कमी आहेत. गेल्या साठ वर्षांत देशाची जी प्रगती झाली, त्या प्रक्रियेत ब्राह्मणी दारिद्य्र गेले. अर्थातच, एक-दोन टक्क्यांचा अपवाद वगळता, पूर्वी अस्पृश्य मानल्या गेलेल्या वा ज्यांना वेशीपलीकडचे जीवन जगावे लागते त्यांची वेदना आणि दरिद्री ब्राह्मणांची गरिबीची वेदना यात बराच फरक आहे. उपासमारीच्या काठावर जगणाऱ्या ब्राह्मण कुटुंबाला अपमान सहन करावा लागत नाही आणि सहसा धनदांडग्या जमीनदारांकडून होणारा अत्याचारही सोसावा लागत नाही.
एक काळ असा होता की स्वातंत्र्यवीर सावरकर आणि साने गुरुजी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि विनोबा हे सर्वजण त्यांच्या त्यांच्या मार्गाने जात-विषमता निर्मूलन चळवळीच्या आघाडीवर असत. लाखो ब्राह्मण तरुण विविध सामाजिक-राजकीय विचारांचे ध्वज फडकावीत, पण त्या सर्वांचे ध्येय ‘भारतीय समाज पारंपरिक शृंखलांमधून मुक्त करणे’, हे होते. त्याग आणि सेवा, ज्ञान आणि प्रबोधन, संघर्ष आणि संवाद या सर्व आघाड्यांवर त्या वेळचा गरीब ब्राह्मणच असे. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तो ब्राह्मण तरुण भारतातील वैचारिकतेचे नेतृत्व करीत असे. संपत्तीपेक्षा विचाराला, प्रचारापेक्षा आचाराला, प्रसिद्धीपेक्षा कर्तव्याला आणि यशापेक्षा कर्मवादी वृत्तीला प्राधान्य देणारे नेतृत्व या ब्राह्मणाने दिले होते.
मंडालेसारख्या भीषण एकलकोंड्या स्थितीत, अंधारलेल्या खोलीत आणि निकृष्ट अन्न घशाखाली उतरवून लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्य’ लिहिले. त्यातील कर्मवादी विचारच पुढे गांधीजी, आईनस्टाईन आणि नेल्सन मंडेलांनी मांडला. लोकमान्यांच्यानंतर त्यांच्या उंचीचा, तोलाचा आणि दृष्टीचा एकही नेता ब्राह्मण समाजातून निर्माण झाला नाही.
ब्राह्मण समाजाला स्वातंत्र्यानंतर तर अनेक ‘करियर ट्रॅक्स’ उपलब्ध झाले. ते ‘करियर ट्रॅक्स’ मुख्यत: शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण झाले होते. शिक्षण हे यशाचे, संपत्तीचे, प्रसिद्धीचे ‘इन्स्ट्रुमेन्ट’ किंवा माध्यम झाले. साधारणपणे तेव्हाच शिक्षण आणि ज्ञान यांच्यातील नाळ तुटली. ‘ज्ञान’ नसले तरी चालेल, शिक्षण असले की पुरे; या ब्राह्मणी कौटुंबिक-धोरणातून इंजिनियर, डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट, प्राध्यापक, बँकर, मॅनेजर अशा उच्चपदस्थ जागा ब्राह्मणांना प्राप्त होऊ लागल्या. त्यामागे कष्ट जरूर होते. काहीजण तर नादारीतून वा माधुकरी मागून शिकले होते. पण तरीही ‘शिक्षण’ आणि ‘ज्ञान’ यात ब्राह्मण समाजाने फारकत केल्यापासून तो एका सांस्कृतिक-सामाजिक सापळ्यात सापडला. आजची त्याची अस्वस्थता आणि असंतुष्टता त्यामुळे आहे.
आपल्या देशात बाराहून अधिक ‘लहान-मोठे’ धर्म आहेत. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, पारशी, ज्यू इत्यादी. मुस्लिमांमध्ये शिया-सुन्नी, ख्रिश्चनांमध्ये कॅथलिक आणि प्रॉटॅस्टंट, शीख समाजात उच्चवर्णीय आणि नीचवर्णीय, जैनांमध्ये श्वेतांबर आणि दिंगबर, ज्यूंमध्ये इस्रायली आणि बेने इस्रायली वगैरे विभागणी आहेच. काही ख्रिश्चन तर जाहिरातींमध्येही ‘मुलगी ब्राह्मण ख्रिश्चन असावी’ असे लिहितात, मुस्लिमांमध्ये ‘ओबीसी’ संघटना आहेत आणि जातीनिहाय उतरंड आहे. बौद्ध आणि नवबौद्ध, शिवाय बौद्ध धर्म न स्वीकारलेले दलित अशीही विभागणी आहेच.
एकदा एका हिंदू धर्मगुरूने 1001 ख्रिश्चनांना ‘पुन्हा’ हिंदू करून घेतले. मोठा सोहळा झाला. यज्ञ, पूजा, प्रसाद वगैरे. काही दिवसांनी ते ‘नवबौद्ध’ त्या धर्मगुरूंकडे गेले आणि म्हणाले, आम्ही धर्मांतर केले, आता आमची जात कोणती? हिंदू धर्मगुरू म्हणाला, त्यांनी तुम्हाला हिंदू करून घेतले, पण मी जात देऊ शकत नाही, कारण ती जन्माने ठरते. धर्म बदलता येतो, जात नाही! तुम्ही पाच-सहाशे वर्षांपूर्वी किंवा जेव्हा केव्हा धर्मांतर केले, तेव्हा तुमची जी जात असेल तीच तुमची जात! ते नवहिंदू हिरमुसले. कारण त्यांच्यापैकी बहुतेकांना वाटले होते की त्यांना ‘ब्राह्मण’ होता येईल. मुळात जे बहुसंख्य ख्रिश्चन झाले होते, तेच जातिव्यवस्थेच्या जाचाला कंटाळून. त्यामुळे तुलनेने दलित ख्रिश्चन जास्त होते. जे ब्राह्मण ‘स्वेच्छेने’ ख्रिश्चन झाले होते, ते मुख्यत: पोर्तुगीज सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधण्यासाठी त्या धर्मात सामील झाले होते. परंतु ब्राह्मण ख्रिश्चनांना नवहिंदू होण्याची गरज भासलीच नव्हती. ते धर्म बदलल्यानंतरही आपले ‘ब्राह्मण्य’ जपत होतेच. प्रश्न होता दलित ख्रिश्चनांचा.
धर्म, देश, प्रांत बदलल्यानंतरही जात जन्मापासून चिकटते आणि कधी जाचक तर कधी फायदेशीर होते, असा सार्वत्रिक अनुभव आल्यामुळेच ‘जात नाही ती जात’ हा वाक्प्रचार प्रचलित झाला असावा.
जातींची उतरंड सांभाळण्यात आता विविध जातींना हितसंबंध जपण्याची सोय आढळू लागली आहे. ग्रामीण भागात जात ही एक मुख्य ‘आयडेंटिटी’ ऊर्फ ओळख असते. कोणत्या जातीने कोणत्या ‘पायरी’वर रहायचे, याचे अलिखित पण अतिशय कठोरपणे पाळले जाणारे नियम असतात.
प्रसिद्ध क्रिकेटपटू रवी शास्त्री याच्यावर न्यायालयात एक खटला भरला गेला आहे. खटला कशासंबंधातला आहे? तर एका टीव्ही मुलाखतीत त्याने सांगितले की, त्याला ‘बीफ’ आवडते. बीफ म्हणजे गोमांस. शास्त्री हा उच्चस्तरीय ब्राह्मण. क्रिकेटपटू झाल्यामुळे जगभर भ्रमंती करणारा. अनेक प्रकारच्या संस्कृती-परंपरांशी आणि जेवणपद्धतींशी संबंध आलेला.
एका ब्राह्मणाने रवी शास्त्रीवर खटला गुदरला की शास्त्रींच्या या विधानामुळे ‘धर्म’ बुडाला; परंतु ‘धर्म’ कसा बुडेल? कारण भारतीय जातिव्यवस्थेतील, हिंदू समाजातीलच काही जातींमध्ये बीफ खाण्याची हजारो वर्षांची पद्धत आहे. इतकेच नव्हे, तर प्राचीन काळी खुद्द ब्राह्मण समाजातही गोमांस खाण्याची प्रथा होती, हे ब्राह्मण इतिहासकारांनीच नोंदवून ठेवले आहे. म्हणजेच ‘जात’ आपण काय खातो (वा पितो) यावरून ओळखता येणार नाही. शास्त्री जर ‘बीफ’ खाणाऱ्या जातीत जन्मला असता तर त्याच्यावर कुणी खटला भरला नसता. खटला भरणाराने ‘ब्राह्मण्य’ भ्रष्ट झाले असे म्हटले आहे; परंतु ‘ब्राह्मण्य’ जर जन्माने प्राप्त होत असेल तर ते, काय जेवण केले, कुणाशी लग्न केले, कोणता वेश परिधान केला, यामुळे भ्रष्ट होण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.
माझ्या परिचयातील पुणे शहरातल्या, अगदी सदाशिव पेठेत राहणाऱ्या एका ‘अस्सल’ चित्पावन ब्राह्मणाने दाढी वाढवायला सुरुवात केली. त्याच्या दाढीची स्टाईल मुल्ला-मौलवींच्या दाढीसारखी होती. खरे म्हणजे आता फॅशन म्हणून विविध शैलीतील दाढी ठेवणारे सर्व जातीतील लोक मला माहीत आहेत, आणि तुम्हीही पाहिले आहेत. विविध प्रकारच्या दाढी-मिशा ठेवलेले काही लोक येथेही हजर आहेत; परंतु पुण्याच्या त्या तरुणाला एकाने विचारले- खडसावलेच म्हणू या- की तू अशी मुसलमानी दाढी का वाढवतो आहेस? तर तो पुण्याचा चित्पावन तरुण म्हणाला, ‘कारण मी इस्लाम धर्म स्वीकारला आहे.’ त्याला दाढीबद्दल विचारणाऱ्याची वाचाच बंद झाली. पण मुद्दा असा की त्या ब्राह्मण तरुणालाही वाटले की, धर्म बदलल्यावर ‘दाढी’ची शैलीही बदलायला हवी. खरे तर तशी गरज नाही.
सध्या हा ‘मूळचा’ ब्राह्मण तरुण इस्लामवरती प्रवचने देतो. ती प्रवचने ऐकणारे सांगतात की मुल्ला-मौलवींनाही थक्क व्हायला हवे इतकी अस्खलित प्रवचने तो देतो. विशेष म्हणजे प्रवचने ऐकायला येणारे मुस्लिम श्रोते म्हणतात, ‘‘वो कोई ऐसा-वैसा नहीं है- बम्मन है बम्मन!’’ म्हणजे त्याला व त्याच्या प्रवचनांनाही प्रतिष्ठा आहे. कारण तो जन्माने ब्राह्मण आहे. इस्लाममध्ये स्वेच्छेने धर्मांतर करून त्याचा ‘धर्म’ बदलला, पण जात सुटली नाही.
पाकिस्तानचे लष्करशहा झिया-उल-हक एकदा भारतात क्रिकेट सामने पाहण्यासाठी आले होते. कुलदीप नय्यर आणि काही जानेमाने ज्येष्ठ पत्रकार झियांना भेटायला गेले. गप्पा फाळणीपूर्ण हिंदुस्थानबद्दलच्या होत्या. झिया म्हणाले, ‘‘मैं तो कानपूर का हूं!’ कुलदीप नय्यर यांनी विचारले, ‘‘कोणत्या गावचे.’’ ते उत्तर झियांनी दिलेच, पण त्यावर सांगितले की, ‘‘मैं तो उस इलाके का जाट हूं!’’
पाकिस्तानच्या मुस्लिम राष्ट्राध्यक्षालाही आपली ओळख ‘जाट’ म्हणून करून द्यावीशी वाटली. मराठीतील एक प्रसिद्ध लेखक एकदा पाकिस्तानात गेले होते. एका रेस्तराँमध्ये त्यांना दोन स्त्रिया येताना दिसल्या. त्यांच्याबरोबर आलेले दोन पुरुष अर्थातच त्यांचे पती होते. त्या दोन्ही स्त्रियांनी ठसठशीत लाल कुंकू लावलेले होते. तितके ठसठशीत कुंकू लावण्याची प्रथा हल्ली ग्रामीण भागातही मागे पडते आहे. पाकिस्तानात पाचवारी साड्या नेसून आलेल्या आणि कुंकू लावलेल्या त्या स्त्रिया पाहून आपल्या लेखकाला वाटले की, त्या भारतातील ‘टुरिस्ट’ असाव्यात. त्यांच्या ‘गोऱ्या-घाऱ्या’ रंगरूपावरून त्यांची जात ओळखू येत होती. म्हणून लेखकांनी ओळख नसूनही त्यांची भेट घेतली आणि त्यांना विचारले की, त्या भारतातून मुंबई-पुण्यातून पर्यटक म्हणून आल्या आहेत का? त्या म्हणाल्या की, त्या गेली बरीच वर्षे पाकिस्तानातच आहेत. त्यांच्या पतीमहाशयांची ओळख करून देत त्या म्हणाल्या की, त्यांचा प्रेमविवाह झाला. पण ‘हे’ मुस्लिम होते. त्या विवाहाला त्यांच्या पुण्यातील नातेवाईकांनी विरोध केला, म्हणून फाळणीनंतर लगेचच ते पाकिस्तानात आले. ‘‘सुरुवातीला पाकिस्तानातील शेजारी-पाजारी आणि ‘यांचे’ नातेवाईकही काहीशा कुतूहलाने व तक्रारीनेही आमच्याकडे पाहात. आता सगळे सरावले आहेत. आम्ही आमची ‘पुणेरी’ वेशभूषा आणि पुणेरी चित्पावनी स्वयंपाकपद्धती सोडलेली नाही. अजून आम्ही घडीच्या पोळ्या, गूळ घालून आमची-भाजी करतो आणि शाकाहारीच राहिलो आहोत! आमची जीवनशैली आजही ब्राह्मणीच आहे.’’ हे त्यांनी आवर्जून सांगितले.
अमेरिकेच्या सिलीकॉन व्हॅलीत आणि अन्यत्रही नागरिकत्व घेतलेले वा ग्रीन कार्ड असलेले हजारो-खरे म्हणजे लाखो ब्राह्मण सर्व प्रकारचे अभक्ष्य भक्षण करतात, सर्व प्रकारच्या पाटर्यांना पाश्चिमात्त्य वेशभूषा करून जातात, कित्येकांच्या घरातून मातृभाषाही लुप्त झाली आहे, पण अजूनही त्यांची ओळख ‘ब्राह्मण’ हीच आहे. तीही काहीशा अभिमानाने!
भारतीयांनी चालविलेल्या बहुतेक अमेरिकन वृत्तपत्र-नियतकालिकांमधील लग्नाच्या जाहिरातींवर धावती नजर टाकली तरी ‘जन्मजात ब्राह्मण्य’ अजून कसे टिकले-टिकविले गेले आहे, याचा प्रत्यय येईल.
"Wanted a deshastha Rigvedi girl, preferably from Pune or Mumbai, Strictly Vegetarian, but US citizen or a Green Card holder." किंवा "Looking for a very fair girl, Chitpavan and of Vasishtha gotra. The girl should be either a Software Engineer or an MBA. She must be ready to settle in US."
मी उदाहरणे महाराष्ट्रातील दिली. पण अशा जाहिराती तामिळनाडूचे आणि आंध्र प्रदेशचे, उत्तर प्रदेशातील आणि बंगालचे लोकही आपापल्या जातीनुसार देतात. हे सर्व लोक स्वत:बरोबर फक्त पासपोर्ट-व्हिसा-इमिग्रेशन पेपर्स वगैरेच घेऊन जात नाहीत तर जातही बरोबर नेतात. विशेष म्हणजे पासपोर्ट-व्हिसा मात्र जातीची ओळख मागत नाहीत.
एखाद्या भारतीय मंडळात कोणत्या जातीचे प्राबल्य वा प्रभाव आहे, याची चर्चा इंग्लंड-अमेरिकेतील हिंदू समाजात असतेच असते. अनेक वेळा त्या जातीच्या आधारेच ‘सोशल-नेटवर्किंग’ ठरते. जात लोकांना फक्त ओळख देत नाही, तर एकत्र आणते, विभक्त करते आणि उदार दृष्टिकोन घेतला तर सहकार, सामंजस्य आणि संवादामुळे काहीतरी चांगलेही घडवू शकते- केवळ देशासाठी नव्हे तर जगासाठी.
आपले राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम धर्माने मुस्लिम आहेत, पण कट्टर शाकाहारी, संस्कृतचे व्यासंगी आणि ब्राह्मणी जीवनशैली कटाक्षाने जपणारे आहेत. पण ते ब्राह्मण नाहीत, जन्माने वा वृत्तीनेही नाहीत. म्हणजेच ते ‘वेगळ्या’च प्रकारचे ब्राह्मण झाले आहेत. त्यांना ‘ब्राह्मण’ केले आहे ते ज्ञानाने, व्यासंगाने, उदार वृत्तीने, विशाल मनाने आणि साधी जीवनशैली व उच्च विचारसरणी बाळगल्याने.
माझ्या मते ब्राह्मण्याची तीच व्याख्या योग्य ठरावी. जात जन्माने ठरू नये. जो जात पाळत नाही, भेदाभेद करीत नाही, कुणी उच्च वा कुणी नीच असे मानत नाही, कुणाला ‘कमी’ लेखत नाही, कुणाला ‘वरचे’ मानत नाही, जो ज्ञानमार्गाला स्वीकारतो, ज्ञानप्रसार करतो, ‘जो जे वांच्छिल तो ते लाहो’ असे मनापासून म्हणतो, अवघ्या विश्वाची चिंता वाहतो आणि ते विश्व ‘दुरितांचे तिमिर जावो’ बदलण्याचा प्रयत्न करतो- तो ‘ब्राह्मण’ अशी व्याख्या आपण करू या. मूळ ब्राह्मण संज्ञेची व्याख्या तीच होती. ती व्याख्याच भ्रष्ट झाल्यामुळे जात जन्मावर ठरू लागली, आणि ब्राह्मण कुळात जन्म घेणारा तो ब्राह्मण अशी संकुचित मांडणी रूढ झाली.
ब्रह्माचा, विश्वाचा, विश्वजन्माचा, विश्वांताचा, मनाचा, समाजाचा अखंड शोध घेणारा ज्ञानयोगी म्हणजे ब्राह्मण, असे आपण मनापासून स्वीकारले की आपल्याला सॉक्रेटिस आणि बट्राँड रसेल, येशू आणि बुद्ध, हे ज्ञानयोगी व सेवायोगी भासू लागतील. असा दृष्टिकोन घेतला तर लक्षात येईल की ज्ञानेश्वर या ब्राह्मणाला वाळीत टाकणारे ब्राह्मण की निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे ब्राह्मण? तुकारामाला जात चिकटवून त्या ‘तुक्याच्या अभंगातले’ वैश्विक ज्ञान कमी लेखणारे ब्राह्मण की तुकाराम ब्राह्मण?
ब्राह्मण ही ‘जात’ आहे असे म्हणणे हेच अब्राह्मणी आहे. ती जन्माने ठरते असे म्हणणे म्हणजे ज्ञानमार्गी वृत्तीचा अपमान करणे आहे.
हाच विचार मी अखिल भारतीय (जागतिक) देवरुखे ब्राह्मणांच्या संमेलनात मांडला होता आणि भंडारी ज्ञातीच्या परिषदेतेही! हीच भूमिका मी दलित साहित्य संमेलनात, चर्मकार परिषदेत, चित्पावन संघातही घेतली आहे. त्यामुळेच मी हे निमंत्रण स्वीकारले, कारण माझ्या मते या वैश्विक वृत्तीचा, ज्ञानवृत्तीचा, सेवाभावनेचा प्रसार करणे म्हणजेच ब्राह्मण्य. माझे हे ‘पाखंडी’ विचार आपण शांतपणे ऐकून घेतले याबद्दल मी आपला आभारी आहे आणि माझ्यासारख्या ‘पाखंडी ब्राह्मणा’ला बीजभाषण करायची विनंती केली म्हणून संयोजकांचाही विशेष आभारी आहे.
- कुमार केतकर
या भाषणानंतर केतकर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता आणि तेव्हा ते प्रकरण बरेच गाजले होते. त्या प्रकरणावर साधनातून लिहिलेले संपादकीय वाचा - ‘असे औचित्यभंग स्वागतार्ह आहेत!’
दहा वर्षांपूर्वी अरुण टिकेकर आणि कुमार केतकर यांना त्यांच्या पत्रकारितेतील योगदानासाठी दोन वेगवेगळे जीवनगौरव पुरस्कार दिले गेले. त्यावेळी लिहिलेले साधनेतील हे संपादकीयही वाचा - टिकेकर-केतकर पर्व
Tags: मराठी भाषण पुनर्भेट कुमार केतकर ब्राह्मण ब्राह्मण महासंघ Marathi Speech Punarbhet Kumar Ketkar Brahman Brahman Mahasangh Load More Tags
Add Comment