मास्तर कृष्णराव यांच्या जन्मशताब्दिवर्षाच्या निमित्ताने साधना साप्ताहिकाने 20 एप्रिल 1997 रोजी विशेषांक काढलेला होता. त्यावेळी साधनाचे संपादक होते वसंत बापट आणि ग. प्र. प्रधान. या विशेषांकासाठी संगीता बापट आणि शैला दातार यांनी विशेष सहाय्य केले होते. त्या विशेषांकामध्ये मास्तर कृष्णराव यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या गायनकलेवर लोभ असणाऱ्या व्यक्तींचे आणि मास्तरांच्या शिष्यांचे लेख प्रसिद्ध करण्यात आले होते. 20 जानेवारी 2022 रोजी मास्तरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्षाला सुरुवात होते आहे. त्यानिमित्ताने या विशेषांकातील मधुकर बाक्रे यांचा लेख ऑडिओ स्वरूपात पुन्हा भेटीला आणत आहोत. या लेखाचे अभिवाचन केले आहे सुहास पाटील यांनी.
या लेखाची थोडक्यात पार्श्वभूमी अशी - मास्तरांच्या जन्मशताब्दिवर्षाच्या निमित्ताने (1997मध्ये) त्यांना श्रद्धांजली आणि स्वरांजली वाहण्यासाठी सहृदय रसिकांची सभा दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रामध्ये भरली होती. 1953च्या सुमारास ही संस्था डॉ. एस. एम. जोशी आणि संगीतप्रेमी बापूसाहेब बाक्रे यांनी स्थापन केली. संस्थेने पहिले दोन जलसे केले ते केसरबाई केरकर आणि मास्तर कृष्णराव यांचे होते. या दोघाही कलावंतांना गायनाचार्य भास्करबुवा बखले यांची चार महिने एकत्र तालीम मिळाली होती. निकोप चुरस लागावी तसे हे जलसे झाले. केसरबाईंनी बडा ख्याल एक तास गायला तर मास्तरांनी दीड तास. जन्मशताब्दिच्या वर्षी योग असा आला होता की, बापूसाहेबांचे चिरंजीव मधुकर बाक्रे याच संस्थेच्या मंचावर मास्तरांच्या पुण्यप्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित झाले होते. त्यांच्या भाषणावरून हा लेख तयार केलेला आहे.
Tags: शास्त्रीय संगीत कुमार गंधर्व मधुकर बाक्रे जयपूर घराणे बालगंधर्व वसंत बापट संगीतकलानिधी Load More Tags
Add Comment