करोना - काल, आज आणि उद्या : उत्तरार्ध

पुढील वर्षभरामध्ये हा आजार आपल्या समाजामध्ये स्वाईन फ्लूसारखाच एंडेमिक होऊन जाईल असा एक कयास आहे

वर्षभरापेक्षा अधिक काळापासून संपूर्ण जग करोनाशी लढत आहे. या विषाणूमुळे कोट्यवधी लोक बाधित झाले तर लाखो मृत्युमुखी पडले. या संसर्गाचा वेग ओसरला आहे असे वाटत असतानाच एप्रिलमध्ये भारतात करोनाची दुसरी लाट आली जी पहिल्या लाटेपेक्षा अधिक जीवघेणी ठरते आहे. आता दररोज चार लाखांहून अधिक भारतीयांना करोनाचा संसर्ग होतो आहे तर चार हजारांहून अधिक जण मृत्युमुखी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम या उपक्रमामध्ये राज्य सर्वेक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. प्रदीप आवटे यांच्या विस्तृत मुलाखतीचा पूर्वार्ध काल प्रसिद्ध झाला. या मुलाखतीचा हा उत्तरार्ध.

प्रश्न - लसीकरण, औषधे, इंजेक्शन्स, रुग्ण तपासणी-भरती या सर्वांबाबत सर्वसामान्य माणसे घाबरलेली आहेत, गोंधळलेली आहेत. अशा एकूण परिस्थितीत राज्य सरकारचा पवित्रा काय आहे? केंद्र सरकार याबाबत काय पाउले उचलत आहे?
- सर्वसामान्य माणसे घाबरलेली आहेत हे खरेच आहे. यासाठी आपण विविध माध्यमांतून लोकांशी सतत बोलतो आहोत. लोकांच्या मनांतील शंकांचे निरसन व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न करतो आहोत. प्रत्येक जिल्ह्यात आणि शहरात हेल्पलाईन, कंट्रोल रूम यांद्वारे काम चालू आहेत. लसीकरण, रुग्णभरती, रेमडिसीव्हिरसारखे इंजेक्शन यांसाठी सर्वसामान्य माणसाला या हेल्पलाईन मदत करत आहेत. केंद्रीय पातळीवर 1075 हा टोल फ्री क्रमांक तर राज्य पातळीवर 104 हा टोल फ्री क्रमांक हेल्पलाईन म्हणून आहे. लोक आणि यंत्रणा यांतील अंतर जितके कमी होईल तितकी ही भीती आणि गोंधळ कमी होईल. साऱ्या शासकीय यंत्रणा त्यासाठी कार्यरत आहेत. 

प्रश्न - महासाथीच्या या काळातही श्रेय लाटण्यासाठी राजकारण होत आहे मात्र याऐवजी त्यांनी आरोग्य यंत्रणेला आणि शासनाला कशा तऱ्हेने मदत करायला हवी असे वाटते? अगदी स्थानिक स्तरावरच्या राजकीय नेत्यांची कोणती मदत आत्ता या घडीला उपकारक ठरेल?
- राजकारणाबद्दल मी काय बोलणार? आरोग्य आणि शिक्षण यांबाबत आपले सर्वपक्षीय एकमत हवे असे मला वाटते. यासंदर्भात सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.

साधी गोष्ट लक्षात घ्या... पुण्यासारख्या शहरात एकशे साठपेक्षा अधिक नगरसेवक आहेत. त्यांच्या प्रत्येकाच्या क्षेत्रात जर या स्थानिक राजकीय नेत्यांच्या पुढाकाराने करोना क्लिनिक, करोना केअर सेंटर, ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर अशा सुविधा उपलब्ध झाल्या तर करोनासाठीचे कम्युनिटी मॉडेल तयार व्हायला मदत होणार आहे. जे पुण्यात तेच सर्व मोठ्या शहरांमध्ये होऊ शकते. लोकांना पुढे आणून उपयोगी संस्था उभ्या करणे, लोकांच्या मनातील भीती कमी करणे यासाठी सर्व क्षेत्रांतील नेतृत्वे महत्त्वपूर्ण काम करू शकतात. 

प्रश्न - करोना काळात अनेक श्रद्धा-अंधश्रद्धांचे पीक आले. त्यातच एक अफवा पसरली की, मासिक पाळीच्या काळात महिलांनी करोनाप्रतिबंधक लस घेऊ नये... सत्य काय आहे?
- या करोना काळात सोशल मिडिया अधिक जबाबदारीने वापरणे हे नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपण अनेकदा वेगवेगळ्या औषधांबद्दलची माहिती, चुकीचे मेसेज कोणतीही खातरजमा न करता परस्परांना पाठवत राहतो. हे आपण टाळले पाहिजे. मुख्यत्वे आपल्याला जी माहिती मिळते त्या माहितीचा स्रोत काय आहे आणि तो अधिकृत आहे का हे समजून घेणे प्रत्येक पोस्टच्या बाबतीत महत्त्वाचे आहे. स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात करोनाप्रतिबंधक लस घेऊ नये ही अशीच एक चुकीची माहिती सोशल मिडियावर खूप व्हायरल झाली. वास्तविक पाहता याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. स्त्रियांच्या मासिक पाळीचा काळ ही एक निगेटिव्ह फेज असते, त्या काळात तिची इम्युनिटी कमी होते अशा अनेक गैरसमजुती शिकल्या-सवरलेल्या लोकांच्याही मनात आहेत. त्या संपूर्णपणे चूक आहेत. महिला त्यांच्या मासिक पाळीच्या काळातही लस घेऊ शकतात. आपण एकूणच स्त्रीच्या जीवनचक्रातील मासिक पाळीचे नैसर्गिक स्थान समजून घेतले पाहिजे आणि त्याबद्दलच्या आपल्या सगळ्या समजुतीही शास्त्राच्या आधारावर घासून पाहिल्या पाहिजेत.

प्रश्न - स्त्रिया प्लाझ्मा डोनेट करू शकतात का? 
- का नाही? नक्कीच करू शकतात. 

प्रश्न - करोना संसर्गाचे निदान झाल्यानंतर फारशी लक्षणे आणि गुंतागुंत नसतानाही काही जण रुग्णालयात दाखल होतात आणि काही जण फारच कॅज्युअल घेतात. त्यांना काय सांगाल? रुग्णालयात कोणत्या रुग्णांनी भरती होणे आवश्यक आहे?
- ताप, सर्दी, अंगदुखी, घशात खवखव, वास न येणे, थकवा, धाप लागणे ही या आजाराची सर्वसामान्य लक्षणे आहेत. काही वेळा उलटी, जुलाब अशी वेगळी लक्षणेही आढळतात. ही लक्षणे आढळली तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. रात्री झोप झाली नाही, काल काहीतरी तेलकट खाण्यात आले म्हणून असे होत असेल असे म्हणून लक्षणे अंगावर काढू नका.

कोणतेही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य स्वरूपाच्या प्रत्येक करोना रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज नाही. ज्या रुग्णाच्या घरी पुरेशी जागा आहे, रुग्णासाठी वेगळी खोली-टॉयलेट आहे अशा ठिकाणी लक्षणे विरहित किंवा सौम्य स्वरूपाच्या रुग्णांची देखभाल घरच्या घरी करणे शक्य आहे.

अर्थात याबाबत एकच एक नियम नाही. प्रत्येक रुग्णानुसार हा निर्णय घ्यावा लागतो. ज्यांचे घर छोटे आहे, रुग्णासाठी वेगळी खोली नाही तिथे हे शक्य नाही. तसेच लक्षणे जरी सौम्य असतील पण रुग्णास इतर जोखमीचे आजार असतील आणि वय जास्त असेल तर अशा रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती केलेले अधिक चांगले. हा निर्णय त्या-त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी घेणे अधिक योग्य! 

  • ज्याचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक आहे आणि ज्याला काही जोखमीचे आजार आहेत.
  • ज्याचा आजार सौम्य स्वरूपाचा आहे पण घरात पुरेशी जागा नाही. 
  • ज्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण त्र्याण्णवपेक्षा कमी आहे. 
  • सहा मिनिट्स वॉक टेस्टनंतर ज्यांना धाप लागते किंवा ऑक्सिजन त्र्याण्णवपेक्षा कमी होतो. 
  • ज्यांना मध्यम ते गंभीर स्वरूपाचा न्युमोनिया आहे.
  • ज्यांना सतत तीव्र ताप आहे. 
  • रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत बिघाडाच्या खुणा आहेत. 

अशा रुग्णांनी हॉस्पिटलमध्ये भरती होणे आवश्यक आहे. 

प्रश्न - या लाटेत मुलांनाही संसर्ग होत आहे... मुलांची काळजी कशी घ्यावी? 
- या लाटेत मुलांना अधिक बाधा होते आहे असे नाही. पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेतील करोनाबाधा झालेल्या 10 वर्षांखालील मुलांच्या शेकडा प्रमाणात काही बदल झालेला नाही. तथापि या दुसऱ्या लाटेत एकूण रुग्णसंख्या वाढल्याने प्रत्येक वयोगटातील रुग्णांची निवळ संख्या वाढल्याचे आपल्याला दिसून येते. मुलांमध्ये गुंतागुंतीचे प्रमाण कमी असले तरी त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार वेळेत सुरू करणे आवश्यक आहे. यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आई किंवा बाळ करोना पॉझिटिव्ह असले तरी बाळ अंगावर पीत असेल तर आईने योग्य ती काळजी घेऊन बाळाला स्तनपान करणे आवश्यक आहे. 

प्रश्न - करोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तींनी लस घ्यावी का?
- केंद्र सरकारने लसीकरणासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना काढलेल्या आहेत. त्यांनुसार ज्यांना करोनाचा संसर्ग होऊन गेला आहे त्या व्यक्तींनी बऱ्या झाल्यानंतर चार आठवड्यांनी लस घेण्यास हरकत नाही. 

प्रश्न – करोनाच्या या दोन्ही लाटांच्या काळात प्रसारमाध्यमांची मदत झाली की त्यांच्यामुळे घबराटीच्या वातावरणात भर पडली?
- करोना महामारीने आपल्याला दोन गोष्टींबाबत खूप महत्त्वाचे संदेश दिले आहेत. यांतली पहिली गोष्ट म्हणजे सार्वजनिक आरोग्य हा आपल्या जगण्याचा कळीचा मुद्दा असून आपण आपले सारे राजकारण-समाजकारण हे आरोग्यकेंद्रित ठेवायला हवे. हा या महामारीचा अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे.

दुसरा संदेश हा मुख्यत्वे माध्यमांबाबतचा आहे. सोशल मिडियाचा जबाबदार वापर हा या करोना काळाचा महत्त्वाचा मेसेज आहे आणि त्याचबरोबर टेलिव्हिजन, प्रिंट मिडिया यांनी आपल्या आरोग्यविषयक पत्रकारितेमध्ये मूलभूत बदल करण्याची गरज आहे. विशेषतः इलेक्ट्रॉनिक मिडियाबाबत हे अधिक जाणवते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य पत्रकारिता हे एक स्पेशलायझेशन असून या क्षेत्रातील मनुष्यबळ प्रत्येक माध्यमसमूहाने विकसित करण्याची गरज आहे.

मुळात आपल्या इलेक्ट्रॉनिक मिडियावरील बातम्यांचे सादरीकरण आपण इतक्या नाटकी पद्धतीने का करतो हे अनाकलनीय आहे. करोनाचा हाहाकार, त्याची दहशत, त्याचे थैमान यांसारख्या भीती वाढवणाऱ्या हेडलाईन्स आपण का वापरतो? ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांचे वस्तुनिष्ठ रिपोर्टिंग करताना, माहिती सांगताना त्या घटनेतील, प्रसंगातील सुखदुःखाच्या भावनेशी मेळ न राखता त्या साऱ्याचा मेलोड्रामा करण्याकडे एकूणच माध्यमांचा कल दिसतो त्यामुळे आपण भयाची निर्मिती करतो आणि संपूर्ण समाजाला भीतीच घालतो. मुळात आपणदेखील या भीतीचे ग्राहक आहोत हे माध्यमातील लोक विसरतात. यातून आपली सामूहिक प्रतिकार शक्ती कमी होण्याचा धोका संभवतो.

वास्तविक पाहता या आजारांमध्ये लोकांसाठी महत्त्वाचे संदेश, आरोग्य शिक्षण, लोकांना उपयोगी पडतील अशा टिप्स या क्षेत्रातील जाणत्या व्यक्तींकडून वारंवार दिल्याने त्याचा फायदा जनसमूहाला होऊ शकतो. ज्या व्यक्ती या आजारातून बऱ्या झाल्या आहेत त्यांचे अनुभव व्यापक प्रमाणावर प्रसारित केल्यामुळे एक सकारात्मक भावना वाढीला लागू शकते. हे झाले नाही अशातला भाग नाही पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. इलेक्ट्रॉनिक मिडिया हा दृश्य स्वरूपात असल्याने कोणती दृश्ये दाखवावीत, कोणती दाखवू नयेत याचेही भान या माध्यमाने राखणे गरजेचे आहे.

प्रश्न - आता इथून पुढच्या काळात करोनामुक्त होण्यासाठी आणखी किती काळ लागेल असे वाटते? स्थानिक, राज्य आणि केंद्र स्तरावर आपण कुठली पावले उचलायला हवीत?
- आपण किती काळामध्ये करोनामुक्त होऊ याचे भाकित करणे कठीण आहे. तथापि येणाऱ्या सातआठ महिन्यांच्या काळामध्ये काही छोट्यामोठ्या लाटा येणे, असे घडत जाऊन पुढील वर्षभरामध्ये हा आजार आपल्या समाजामध्ये स्वाईन फ्लूसारखाच एंडेमिक होऊन जाईल असा एक कयास आहे. 

केवळ करोनामुक्तच नव्हे तर साथरोगांना तोंड देण्यासाठी आपली सार्वजनिक आरोग्यव्यवस्था अधिकाधिक बळकट करावी लागेल. यासाठी येणाऱ्या काही काळात आपल्याला आरोग्यव्यवस्थेकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. यामध्ये सार्वजनिक आरोग्यावरील आपला खर्च वाढवणे, शहरी भागांमध्ये सार्वजनिक आरोग्याचे चांगले जाळे निर्माण करणे, शहरी भागातील आरोग्यव्यवस्था सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेमध्ये विलीन करणे या गोष्टी तर कराव्या लागतीलच पण त्याबरोबरच वैद्यकीय शिक्षण सर्वांसाठी सहजतेने कसे उपलब्ध होऊ शकेल यासाठी आधी त्याचे बेसुमार आणि अनियंत्रित खासगीकरण टाळावे लागेल. 

आरोग्यावर परिणाम करणारे अनेक घटक हे वरवर पाहता आरोग्यबाह्य वाटतात. त्यांतीलच दोन घटक म्हणजे आपल्याला शहरांसाठी परवडणारी घरे कशी सर्वांना उपलब्ध करून देता येतील याकरता धोरण आखावे लागेल. सगळ्या शहरांमध्ये घरांच्या किमती आभाळाला भिडल्या आहेत. आपण शहरांमधील गृह धोरण बिल्डर लॉबीच्या दावणीला बांधले आहे त्यामुळे आजही प्रत्येक शहरात निम्म्याहून अधिक लोक अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत. 

आपण ज्या घरात राहतो त्याचा आणि आपल्या आरोग्याचा अन्योन्य संबंध आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग यांमुळे सार्वजनिक आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होत आहेत. दूरदृष्टीचा भाग म्हणून आपल्याला प्रत्येक शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुदृढ आणि सक्षम करायला हवी. अधिकाधिक लोकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे आणि व्यक्तिगत वाहने कमी होणे हासुद्धा आपल्या पर्यावरणशुद्धीचा आणि पर्यायाने निरामय आरोग्याचा मार्ग असू शकतो. याकरता स्थानिक पातळीपासून केंद्र पातळीपर्यंत सर्वांनीच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

प्रश्न - सर्वसामान्य माणसांनी कशा तऱ्हेने सहकार्य करायला हवे? त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत?
- कोणतीही गोष्ट लोकसहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. करोनावर मात करायची असेल तर आपण सर्वांनी करोनासोबत जगायला शिकणे आवश्यक आहे. यासाठी करोना टाळण्याकरता आपल्या वागणुकीमध्ये जे बदल आपण करायचे आहेत ते सर्वांनी करणे आणि ते काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे करोनाबाधित रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना वाळीत न टाकता, त्यांना अस्पृश्य न मानता या सगळ्यांना मानसिक, भावनिक मदत करणे, बळ देणे हे आपले कर्तव्य आहे. ते आपण सगळ्यांनी पार पाडले पाहिजे. भीती वाढवणाऱ्या चुकीच्या पोस्ट्‌स, चुकीची माहिती प्रसारित होऊन भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठीदेखील आपण सगळ्यांनी व्यक्तिगत पातळीवरही प्रयत्न करण्याची गरज आहे. 

प्रश्न - गेल्या शतकात म्हणजे 1918दरम्यान आलेली स्पॅनिश फ्लू ही साथ अशीच जगभर होती आणि तीन वर्षे तिचा प्रभाव राहिला. करोनाबाबत तसेच म्हणता येईल का? तसेच होईल का ?
- पॅंडेमिक साधारणपणे लाटा-लाटांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये पसरतात हे 1918च्या स्पॅनिश फ्लूच्या साथीमध्ये आपण पाहिले आहे. तथापि 1918च्या तुलनेमध्ये आज विज्ञान खूप पुढे गेले आहे. लसीसंदर्भातील संशोधन, नवनवीन औषधे, संसर्ग टाळण्यासाठी आपण घेतलेली खबरदारी या सगळ्यामुळे स्पॅनिश फ्लूच्या तुलनेत करोनाची साथ लवकर आटोक्यात येईल असे वाटते.

प्रश्न - खासगी क्षेत्रातील डॉक्टर्स, हॉस्पिटल्स व आरोग्य कर्मचारी यांचा अधिक चांगला उपयोग करून घेता आला असता का?
- खासगी क्षेत्रातील रुग्णालये डॉक्टर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी हे करोनाविरोधी लढ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहकार्य करत आहेत, सहभागी आहेत. तथापि जे खासगी डॉक्टर्स आपापले छोटे दवाखाने, क्लिनिक्स चालवत ग्रामीण आणि शहरी भागांत विखुरलेले आहेत त्यांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणे आवश्यक आहे.

प्रश्न - आपली सरकारी हॉस्पिटल्स मुळात कमी, तिथली व्यवस्था तितकीशी चांगली नाही ही स्थिती एका बाजूला आणि खासगी आरोग्यव्यवस्था प्रचंड महागडी हे चित्र दुसऱ्या बाजूला दिसते आहे... या कोंडीतून कसा मार्ग काढता येईल?
- ही बाब लक्षात घेऊनच, करोना महामारीमध्ये सर्वसामान्य माणसाचे आर्थिक शोषण होऊ नये याकरता शासनाने वेगवेगळे निर्णय घेतले. यामधील पहिला निर्णय म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व नागरिकांना लागू करण्यात आली त्यामुळे जी रुग्णालये महात्मा फुले योजनेअंतर्गत नोंदणीकृत आहेत त्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचारांची सोय झाली. 

जी रुग्णालये धर्मादाय आयुक्तांकडे धर्मादाय रुग्णालये म्हणून नोंदणीकृत आहेत त्यांच्याकडील दहा टक्के खाटा गरीब रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत तर आणखी दहा टक्के खाटा आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटाकरता सवलतीच्या दरात उपलब्ध करून घेण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात आली.

...याशिवाय खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून अवाजवी बिल आकारू नये याकरता बिलांचे ऑडीट शासकीय लेखापरीक्षकांकडून करून घेण्याची पद्धतही सुरू करण्यात आली. या अनुषंगाने राज्य व जिल्हा पातळ्यांवर तक्रार निवारण कक्षदेखील स्थापन करण्यात आले आहेत. करोनासाठी लागणारी वेगवेगळी औषधे, चाचण्या, इतर साधनसामग्री यांच्या दरांवरही शासनाने वेळोवेळी नियंत्रण ठेवले.

प्रश्न - मेडिकल इन्शुरन्स हा एक पर्याय होऊ शकतो का? त्याबाबतीत जनजागृती एका बाजूला, सरकारी नियंत्रण दुसऱ्या बाजूला असे केले तर आरोग्यव्यवस्था सर्वांना परवडणारी होऊ शकेल का?
- आजच्या घडीला आपल्याकडे मेडिकल इन्शुरन्स असणाऱ्या व्यक्तींची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये खूप कमी आहे त्यामुळे वैद्यकीय विम्याच्या वाटेने जाऊन सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न सोडवणे कठीण वाटते. 

मेडिकल विमा अखेरीस वैद्यकीय सेवा अधिकाधिक महागडी होण्यास कारणीभूत ठरतो असा आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. युनिव्हर्सल हेल्थकेअरची तत्त्वे वापरून सार्वजनिक व्यवस्था अधिक बळकट करणे हाच एकमेव उपाय आहे. तो दूरचा वाटला तरी त्याच वाटेने आपल्याला जावे लागेल. शासनाने आरोग्यासंदर्भातील आपली जबाबदारी झटकता कामा नये कारण अमेरिकेसारख्या देशामध्ये मेडिकल इन्शुरन्सच्या वाटेने जाऊन झालेला गोंधळ आपण पाहतोच आहोत

प्रश्न - प्रत्येक जिल्ह्यात शासकीय रुग्णालय, बहुतांश तालुक्यांमध्ये उपजिल्हा रुग्णालये आणि प्रत्येक दहावीस गावांमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र अशी सर्वसाधारण सरकारी व्यवस्था आहे असे दिसते. ही व्यवस्था कितपत क्षमतेने चालवली जात आहे असे तुम्हाला वाटते? ती अधिक बळकट कशी करता येईल?
- ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्यसेवेचे जाळे चांगले विणलेले आहे परंतु प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय अकार्यक्षमता, मनुष्यबळाची कमतरता, चुकीचे मनुष्यबळ व्यवस्थापन या सगळ्या कारणांमुळे या व्यवस्थेसमोर काही यक्षप्रश्न निर्माण झाले आहेत. येणाऱ्या काळामध्ये ही यंत्रणा अधिकाधिक कार्यक्षम कशी होईल याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल आणि ग्रामीण भागाच्या धर्तीवर अशीच यंत्रणा शहरांमध्ये विकसित करण्यासाठीदेखील प्रयत्न करावे लागतील. 

...कारण 1990नंतर आपले शहरीकरण वेगात होते आहे आणि राज्यातील निम्म्याहून अधिक लोक हे शहरांमध्ये राहत आहेत आणि दुर्दैवाने शहरांमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अत्यंत कमकुवत स्वरूपाची आहे. मुंबईसारखे जुने शहर हा थोडासा अपवाद मानावा लागेल परंतु आपल्याला शहरी आरोग्याचे हे शिवधनुष्य लवकरात लवकर उचलणे आवश्यक आहे.

प्रश्न - करोनाचा धडा म्हणून आपल्या वैद्यकीय शिक्षणामध्ये काही बदल तातडीने करायला हवेत असे तुम्हाला वाटते का ? कोणते?
- खरे म्हणजे आपल्या वैद्यकीय शिक्षणाकडे आपण पूर्णपणे नव्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. आजच्या आपल्या वैद्यकीय शिक्षणामध्ये शिक्षणाच्या आशयामध्ये काही बदल होणे हे आवश्यक आहेच पण त्याहूनही आपल्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि त्याचे बेसुमार खासगीकरण हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. अनियंत्रित आणि बेसुमार खासगीकरणामुळे वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता धोक्यात आली आहे. मूठभर शिक्षणसम्राटांनी वैद्यकीय महाविद्यालये ही मुक्त चरण्यासाठीची कुरणे म्हणून उभी केली आहेत.  

आज आपल्याकडे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये डॉक्टर्स, नर्सेस यांची आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आपल्याला ठळकपणे जाणवते. यासाठी मुळात वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या विविध प्रकारच्या संस्थांची संख्या वाढवणे आवश्यक आहे आणि त्याच वेळी त्याचे अनियंत्रित खासगीकरण थांबवणे गरजेचे आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या आशयाच्या दृष्टीने आपण त्यामध्ये स्थानिक लोकसमूहाची निकड लक्षात घेऊन काही बदल करण्याची आवश्यकता आहे. वैद्यकीय नीतिमत्ता, रुग्णाशी आणि रुग्णाच्या नातेवाइकांशी सुसंवाद साधण्यासंदर्भातील धडे, साथरोगांचे उद्रेक आणि त्या अनुषंगाने करायच्या उपाययोजना यांसंदर्भात आपल्याला स्थानिक अनुभव लक्षात घेऊन अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश करण्याची गरज आहे. स्थानिक वैद्यकीय ज्ञानालादेखील या अभ्यासक्रमात महत्त्व असायला हवे. जे पारंपरिक वैद्यकीय शहाणपण विज्ञानाच्या कसोटीवर टिकते आहे ते वैद्यकीय अभ्यासक्रमात आले पाहिजे. 

प्रश्न - रुग्णाचा मृत्यू ही गोष्ट डॉक्टरांसाठी नवीन नाही मात्र आत्ता ज्या गतीने मृत्यू होत आहेत ते पाहता डॉक्टरांच्या मानसिकतेवरही परिणाम होत असणार... या मनोवस्थेशी सध्या डॉक्टर कसे डील करत आहेत आणि या सर्व परिस्थितीत त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी यंत्रणा म्हणून काय केले पाहिजे?
- करोनाच्या महामारीसोबत भीतीची, मानसिक अनारोग्याची एक भली मोठी साथ सावलीसारखी पाठोपाठ येते आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ही मानसिक आरोग्याची समस्या केवळ सर्वसामान्य लोकांपुरती किंवा ज्यांना करोना झाला त्या रुग्णांपुरती मर्यादित नाही. जे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी या साथीमध्ये रुग्णांना उपचार देत आहेत तेही वेगवेगळ्या मानसिक ताणतणावाखाली काम करत आहेत. रोजचे मृत्यू न पाहवल्याने दिल्लीतील एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची बातमी नुकतीच आपल्यासमोर आली आहे. ही धोक्याची घंटा आहे. 

याचा अर्थ एवढाच की, करोना टाळण्यासाठी जरी आपण शारीरिक अंतर पाळत असू, तरी मानसिकदृष्ट्या आपण सगळ्यांनी परस्परांच्या अधिकाधिक जवळ येण्याची गरज आहे. मानसिक अर्थाने आपण एकमेकांचे हात हातामध्ये घेण्याची गरज आहे. एकमेकांशी बोलणे, एकमेकांना वेळ देणे, आपल्या चिंता-काळज्या व्यक्त करणे, बोलून दाखवणे आणि आधार देणे आवश्यक आहे. परस्परांच्या डोळ्यांतील प्रेम, जिव्हाळा, आणि सध्या दुर्मीळ असलेल्या स्पर्शातील आधार हेच या मानसिक अनारोग्यावरील मोठे उत्तर आहे. 

एका अनिश्चित काळातून जात असताना जगण्याचे प्रयोजन, जगण्याचा हेतू यांबद्दल पडलेले प्रश्न आपल्याला अधिकाधिक सकारात्मक पद्धतीने सोडवावे लागतील हेच या काळाचे सांगणे आहे. गौतम बुद्धाला दिसणारे दुःख आज महाविकराळ रूप घेऊन आपल्यासमोर उभे आहे. अशा काळात आपणच एकमेकांचा बोधी वृक्ष होण्याची गरज आहे. 

(मुलाखत - हिनाकौसर खान)


या मुलाखतीचा पूर्वार्ध इथे वाचा 

Tags: मुलाखत कोरोना प्रदीप आवटे आरोग्य हिनाकौसर खान-पिंजार Interview Corona Pradip Awate Health Pendemic Health Infrastructure हिनाकौसर खान पिंजार Load More Tags

Comments:

विवेक घोटाळे

मुलाखत चांगली सविस्तर झाली आहे.सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी उपयुक्त मांडणी सर.

Add Comment