वाढत्या आत्महत्या रोखायच्या असतील तर...!

10 सप्टेंबर : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त... 

फोटो सौजन्य: vantagefit.io

आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षिलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्महत्यांनंतर गेल्या काही वर्षांमध्ये समाजात याविषयी थोडी चर्चा होऊ लागली आहे. 

कोविड-19नंतरच्या कालखंडात लोकांचे ताणतणाव वाढले आणि त्यातून आत्महत्यांचे प्रमाणही वाढले. सध्या या कोविड काळात आत्महत्यांचे वाढते प्रमाण हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येत आहे. जशी एखाद्या संसर्गजन्य आजाराची साथ पसरावी त्याप्रमाणे आत्महत्यांची एक सुप्त साथ गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात पसरत चालली आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. 

भारतात दरवर्षी दोन लाखांपेक्षा अधिक लोक आत्महत्या करतात. त्यांमधील साधारण निम्म्या आत्महत्या या 15 ते 35 वयोगटातील म्हणजे तरुणाईतील असतात. आत्महत्या हा विषय थोडा काळ हळहळणे आणि नंतर विसरून जाणे यापेक्षा खूप गंभीर आहे. युवाल नोवा हरारी हा आजच्या जगाचा एक महत्त्वाचा भाष्यकार असे म्हणतो की, 'आजच्या जगासाठी युद्ध आणि दहशतवाद यांपेक्षा ‘आत्महत्या’ हा  अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे.'

करोनाकाळात जनमानसावर जे आर्थिक आणि सामाजिक परिणाम होत आहेत त्यांतून समाजातील मानसिक ताणतणाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. बेरोजगारीने कोणीतरी जीवन संपवत असल्याचे आपण बातम्यांमध्ये रोज वाचतो. समाज म्हणून आपण प्राधान्याने हाताळायला पाहिजे असा हा प्रश्न आहे. 

करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी ज्याप्रमाणे मास्क, शारीरिक अंतर राखणे आणि निर्जंतुकीकरण यांचा वापर आपण केला आणि आता लसीकरणाच्या माध्यमातून करोनाशी लढत आहोत तसेच या आत्महत्यांचे  प्रमाण कमी करण्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचे प्रतिबंधक लसीकरण होणे आवश्यक आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. लसीकरणाचा व्यापक अर्थ लक्षात घेतला तर एखाद्या विशिष्ट आजारासाठी प्रतिकारक्षमता निर्माण करणे असा होतो. त्या पार्श्वभूमीवर ‘मनाचे प्रतिबंधक लसीकरण’ या विचाराचे महत्त्व आपल्या लक्षात येऊ शकेल.

आत्महत्यांसारख्या प्रश्नांमध्ये सगळ्यात मोठी अडचण जर कोणती असेल तर ती म्हणजे मानसिक आरोग्य आणि आजार यांविषयी आपल्या समाजात असलेले प्रचंड अज्ञान आणि गैरसमज. शरीराचा आजार आपण जितक्या सहजपणे स्वीकारतो तसा मनाचा आजार अजिबात स्वीकारत नाही. मनाचे आजारपण हे अजूनही आपल्या समाजात लपवून ठेवण्याची गोष्ट समजली जाते. मानसिक आजार झाला म्हणजे आपल्या आयुष्याला कलंक लागला असे आपला समाज मानतो. स्वाभाविकपणे मानसिक आजाराचा उपचार घेण्यापेक्षा लोक तो लपवण्याचा प्रयत्न करतात. यांतून जर कोणी उपचारापर्यंत पोहोचला तरी मानसिक उपचारांविषयी असलेल्या प्रचंड गैरसमजांमुळे पूर्ण उपचार घेतला जात नाही. ‘मानसोपचारतज्ज्ञ फक्त झोपेच्या गोळ्या देतात’, ‘त्यांच्या औषधांची सवय लागते!’ अशा अनेक गैरसमजांना बळी पडून लोक उपचार पूर्ण करत नाहीत.

आपल्या समाजात आत्महत्येचे विचार बोलून दाखवणाऱ्या व्यक्तींबद्दलदेखील खोलवर गैरसमज रुजलेले आहेत. ‘आत्महत्येचा विचार बोलून दाखवणारे लोक हे नाटक करत असतात’ अथवा ‘जो गरजते है वो बरसते नही’ असा आपल्याकडे मोठा गैरसमज आहे. प्रत्यक्षात जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्येचे विचार बोलून दाखवते तेव्हा ती, 'माझे मन माझ्या ताब्यात राहत नाही आणि मला मदतीची गरज आहे' असे सुचवत असते. त्याकडे आपण खूप संवेदनशीलतेने बघणे आवश्यक आहे.

मानसशास्त्रातील अनेक अभ्यास असे सांगतात की, 'आत्महत्या करण्याआधीच्या आठवड्यात बहुतांश लोक  आपल्या जवळच्या व्यक्तीकडे थेट किंवा अप्रत्यक्षपणे हा विचार बोलून दाखवत असतात. अत्यंत तणावाच्या प्रसंगी स्वतःला इजा करून घेण्याचा विचार पन्नास टक्क्यांहून अधिक लोकांच्या मनात येतो. अशा वेळी आपल्या जवळच्या व्यक्तीची भावनिक अस्वस्थता ऐकण्यासाठी आपण आहोत ही गोष्ट मोठी असते. 

एखाद्या व्यक्तीचे आत्महत्येचे विचार शांतपणे ऐकून घेणे आणि तिला योग्य प्रकारे मार्गदर्शन करणे ही आव्हानात्मक गोष्ट आहे. अशा वेळी आपण जर भावनिक प्रथमोपचार कसे द्यावेत याचे जर छोटे प्रशिक्षण घेतलेले असेल तर आपण अधिक प्रभावीपणे हे काम करू शकतो.

परिवर्तन संस्था आणि अंनिस यांच्यामार्फत  दोनशेपेक्षा अधिक मानसमित्र आणि मैत्रिणी घडवले गेले आहेत, तयार केले गेले आहेत. भावनिक प्रथमोपचार कसे देता येतील याचे मोफत प्रशिक्षण त्यांना दिलेले आहे. या गोष्टीचा त्यांना स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबातील जवळच्या लोकांना मोठा फायदा झाला. 

अशा उपक्रमांच्या माध्यमातून आपण समाजात चांगले ऐकणारे मानसमित्र-मैत्रिणी तयार करू शकतो मात्र  केवळ भावनिक प्रथमोपचाराने समोरच्या व्यक्तीचा भावनिक गुंता निवळेल आणि सारे काही ठीक होऊ शकेल असे नाही... आत्महत्या रोखण्याच्या प्रयत्नांतील ती केवळ पहिली पण अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. त्याच्या पुढच्या टप्प्यावर अशा प्रत्येक मानसमित्र-मैत्रिणीनं मानसोपचारतज्ज्ञाच्या संपर्कात असणे आवश्यक आहे. त्यांनी मानसोपचारतज्ज्ञाच्या देखरेखीखाली आत्महत्येच्या विचारांचे गांभीर्य आणि तीव्रता ओळखायला शिकणे आणि त्यानुसार प्रतिसाद देणे अत्यंत आवश्यक आहे. 

जगभरात आत्महत्या रोखण्यासाठी जे प्रयत्न झाले त्यांत अशा गेटकीपरचे (भावनिक मदत देणाऱ्या द्वाररक्षकाचे) महत्त्व दिसून आले आहे. काही वेळा मनात आत्महत्येचे विचार येणे हे तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजाराचेदेखील लक्षण असते. यामध्ये व्यक्तीला भास आणि भ्रम होत असतात. अशा वेळी उपचार हे तज्ज्ञाच्या थेट निगराणीखालीच होणे आवश्यक असते हेदेखील आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. 

‘आत्महत्या करणे’ हे कमकुवतपणाचे लक्षण आहे असा आपल्याकडे आणखी एक खोलवर रुजलेला गैरसमज आहे. सोशल मिडियावर तर लोक सररास असे विचार व्यक्त करताना दिसतात मात्र आत्महत्येचे विचार मनात येणे हे टोकाच्या भावनिक अस्वस्थतेचे लक्षण आहे हे समजून घेतले पाहिजे. ही अस्वस्थता कोणालाही अनुभवायला येऊ शकते. त्याच्यामागे जैविक, मानसिक, सामाजिक अशी तीन प्रकारची कारणे असू शकतात. 

जैविक पातळीवरील कारण हे मेंदूतील सिरोटोनीन द्रव्य आणि काही जनुके यांच्याशी निगडित असल्याचा निष्कर्ष अनेक अभ्यासांमधून समोर आला आहे. मानसिक पातळीवर स्वभावदोष, टोकाचा उतावीळपणा ही कारणे आहेत तर सामाजिक पातळीवर आर्थिक विषमता, व्यसनाधीनता अशा स्वरूपाची कारणे दिसून येतात. या तिन्ही गोष्टींच्या मिश्रणातून हे विचार जन्म घेतात हे आपण समजून घेतले पाहिजे.

स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या पातळीवर याविषयी आपण अनेक गोष्टी करू शकतो. सतत निराश वाटणे, झोप न येणे अथवा जास्त झोप येणे, भूक कमी होणे, सारखी चिडचिड होणे, अस्वस्थता राहणे, टोकाचे विचार येणे अशी लक्षणे आपल्याला स्वतःला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला दिसून आल्यास आपण तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. 

तरुणाईच्या आयुष्यात सध्याच्या कालखंडात करिअर आणि प्रेम / आकर्षण यांतील गोंधळातून निर्माण होणारे प्रश्न हे मानसिक अस्वास्थ्याशी आणि आत्महत्येशी खूप जवळून संबंधित असल्याचे आपल्याला दिसून येते. याविषयी कुटुंबात मोकळेपणाने बोलता येईल असे वातावरण निर्माण केल्यास अनेक प्रश्नांची तीव्रता कमी होऊ शकते. ‘आयुष्यात अपयश आले म्हणजे आता आपण जगण्यास लायक राहिलो नाही’ हा विचार अनेक लोकांना आत्महत्येच्या कृतीकडे नेतो. अपयशाला सहजपणे सामोरे जाणारी मानसिकता घडवण्याचे महत्त्वही या निमित्ताने अधोरेखित होते. 

शासनाच्या आरोग्य यंत्रणेमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांमध्ये मानसिक आरोग्याच्या सुविधांचा आणि आत्महत्या प्रतिबंधक सुविधांचा मोठ्या प्रमाणावर समावेश करणे आवश्यक आहे. आत्महत्येविषयी वार्तांकन करताना अनेक वृत्त वाहिन्यांकडून पुरेशी संवेदनशीलता दाखवली जात नाही. यामधून अनेक वेळा अनुकरणातून होणाऱ्या आत्महत्या वाढू शकतात. माध्यमांनीदेखील आत्महत्या रिपोर्टिंगविषयीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे.

आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईन हीदेखील आत्महत्या टाळण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट ठरू शकते. परिवर्तन संस्थेमार्फत चोवीस तास चालणारी आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईन (7412040300) चालवली जाते. नुकत्याच राज्य आणि केंद्र शासनानेदेखील अशा प्रकारच्या हेल्पलाइन्स सुरू केल्या आहेत. त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार करणे आवश्यक आहे. या मोफत हेल्पलाइन्स असून यांच्यावरची माहिती गोपनीय ठेवली जाते. 

आत्महत्यांची ही साथ रोखण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. या लेखांत नमूद केलेल्या उपायांच्या अनुषंगाने आपण सगळे, शासन आणि माध्यमे यांनी एकत्र प्रयत्न केले तर समाजमनाचे आत्महत्याविरोधी लसीकरण आपण नक्कीच करू शकू आणि त्यातून अनेक आत्महत्या टाळू शकू असा विश्वास वाटतो. 

- डॉ. हमीद दाभोलकर, सातारा.
hamid.dabholkar@gmail.com 

(लेखक मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ते परिवर्तन आणि महाराष्ट्र अंनिस या संस्थांसोबत काम करतात.)

Tags: मानसिक आरोग्य डॉ. हमीद दाभोलकर मानसोपचार तज्ज्ञ मानसिक आजार आत्महत्या Health Mental Health Dr Hamid Dabholkar Suicide World Suicide Prevention Day जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन Load More Tags

Comments:

बर्गे संगीता गुलाबराव

अत्यंत महत्त्वाचा व तितकाच दुर्लक्षिला जाणाऱा असा हा विषय . यामागील कारणं जी आहेत त्यामध्ये जवळच्या व्यक्तींचे वैचारिक मागासलेपण हेही एक कारण असू शकते असे वाटते. तसेच आत्महत्या न करता अत्यंत निराशाजनक जीवन नाईलाजाने जगणारेही खूप असतात त्यावरही लिहावं ही अपेक्षा.

bhausaheb.bhalerao

चांगली माहिती

Annasaheb Shrimant Bhagaje

अत्यंत छान विवेचन वाटले परंतु मुद्याद्वारे विवेचन दिले असते तर ठीक झाले असते जसे कारणे आर्थिक , नैतिक , सामाजिक , कौटुंबिक , राजकीय , अन्य उपाय

दत्ताराम जाधव.

अत्यंत उपयुक्त माहिती आणि मार्गदर्शक सूचना.

Solanki Subhash Shobhachand

Mast

Add Comment