करोना - काल, आज आणि उद्या : पूर्वार्ध

जनता आणि यंत्रणा दुसऱ्या लाटेबाबत काही प्रमाणात गाफील राहिले.

फोटो सौजन्य: AFP

वर्षभरापेक्षा अधिक काळापासून संपूर्ण जग करोनाशी लढत आहे. या विषाणूमुळे कोट्यवधी लोक बाधित झाले तर लाखो मृत्युमुखी पडले. या संसर्गाचा वेग ओसरला आहे असे वाटत असतानाच एप्रिलमध्ये भारतात करोनाची दुसरी लाट आली जी पहिल्या लाटेपेक्षा अधिक जीवघेणी ठरते आहे. आता दररोज चार लाखांहून अधिक भारतीयांना करोनाचा संसर्ग होतो आहे तर चार हजारांहून अधिक जण मृत्युमुखी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम या उपक्रमामध्ये राज्य सर्वेक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. प्रदीप आवटे यांच्या विस्तृत मुलाखतीचा हा पूर्वार्ध. या मुलाखतीचा उत्तरार्ध उद्या प्रसिद्ध होईल.

प्रश्न - ऑक्टोबरनंतर आपली सरकारे गाफील राहिली आणि जनतेनेही उतावीळपणा किंवा बेफिकिरी दाखवली आणि हॉटेल्स, देवस्थाने खुली झाली. त्याचा परिणाम म्हणून दुसरी लाट इतकी तीव्र आली का? 
- महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यापासून करोना आजाराचे रुग्ण कमी होताना दिसत होते त्यामुळे सर्वत्र एक मुक्ततेची भावना होती. आठनऊ महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे आणि विविध बंधनांमुळे लोक स्वाभाविकच वैतागलेले होते त्यामुळे ऑक्टोबरपासून अगदी जानेवारीच्या मध्यापर्यंत करोना रुग्णांचा आलेख दिवसागणिक कमी होताना पाहून हे संकट आता संपले आहे अशी भावना अनेकांच्या मनामध्ये होती. 

करोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होण्याची कारणे आपण जेव्हा शोधू लागतो तेव्हा साधारणपणे तीन ते चार ठळक कारणे आपल्या समोर येतात. यातील पहिले कारण हे वातावरणाशी संबंधित आहे. मागील तीनचार आठवड्यांच्या काळामध्ये उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आलेली आपण पाहिलेली आहे. या थंडीच्या लाटेचा अप्रत्यक्ष परिणाम राज्याच्याही हवामानावर झालेला दिसून येतो.

विदर्भासह अनेक जिल्ह्यांमधील किमान तापमान मागील काही दिवसांमध्ये पाच ते सात डिग्री सेल्सिअसने कमी झालेले आपण पाहिलेले आहे. हिवाळ्यातील वातावरण हे नेहमी हवेवाटे पसरणाऱ्या स्वाईन फ्लू किंवा करोना यांसारख्या विषाणूंच्या प्रसारासाठी पोषक असते त्यामुळे या वातावरणाचा हातभार या वाढीस निश्चितपणे लागला आहे असे दिसते. 

याबरोबरच ऑक्टोबरपासून करोना आजाराचा उतरता आलेख लक्षात घेऊन आपण आपले सामाजिक आणि आर्थिक जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी एकएक बाब टप्प्याटप्प्याने अनलॉक करतो आहोत आणि ते आवश्यकही आहे. जानेवारीच्या मध्यावर आपण राज्यातील चौदा हजारांहूनही अधिक गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका घेतल्या. या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये 80 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. स्वाभाविकपणे गावपातळीवरील या निवडणुकांत मतदान करण्यासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये काम करणारी; नोकरीधंद्यांच्या निमित्ताने परगावी राहणारी गावकरी मंडळी काही दिवसांकरता आपापल्या गावी गेली आणि परत आली. या सगळ्यामुळे मोठी सामाजिक सरमिसळ झाली यात काहीच शंका नाही. 

निवडणुकीचा प्रचार, सभा, मिटिंग या सगळ्यांमध्ये लोक करोना प्रतिबंधासाठी आणि नियंत्रणासाठी आवश्यक असणारी सूत्रे बिलकूलच विसरून गेले होते त्यामुळे अशा भागांमध्ये रुग्णसंख्या वाढताना सध्या आपण पाहतो आहोत. रुग्णवाढीचे तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे लग्न किंवा इतर कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रम पुन्हा करोनापूर्व उत्साहाने पार पडू लागले आहेत. चारपाचशे तर सोडा, हजार लोकांपेक्षाही अधिक गर्दीची लग्ने होताना आपण अनेक ठिकाणी पाहिली आहेत. करोना प्रसार टाळण्यासाठी आवश्यक ती कोणतीही काळजी न घेता; अशा समारंभांत सहभागी होणारे तुम्ही, आम्ही, सगळे एक प्रकारे आपापल्या भागात या आजाराच्या वाढत्या संख्येस कारणीभूत आहोत हे नाकारता येणार नाही.

याबरोबरच विषाणूचे बदलते रूपदेखील या वाढीस जबाबदार आहे मात्र आपण करोना अनुरूप वर्तन टाळून या विषाणूला रूप बदलण्यास सहकार्य करत असतो हेही आपण ध्यानात घेतले पाहिजे.

प्रश्न – अच्छा, म्हणजे डिसेंबर-जानेवारीपासून दुसरी लाट येणार अशी एक शक्यता वर्तवली जात होती मात्र भारतात दुसरी लाट येईपर्यंत मार्च उगवला. हाताशी अधिकचे तीनेक महिने मिळूनही आरोग्य यंत्रणा गाफील राहिली का? आपण दुसरी लाट थोपवण्यासाठी काय केले आणि काय करायला हवे होते?
- आपल्याकडे पहिली लाट ओसरल्यानंतर आपण करोना संपला या भ्रमात राहिलो. पहिल्या लाटेनंतर दोन ते अडीच महिन्यांत दुसरी लाट येऊ शकते याबद्दल आपल्याला कल्पना होती. आपल्या डोळ्यांसमोर युरोपचे उदाहरण होते परंतु याबाबत आपण सगळ्यांनीच पुरेशी खबरदारी घेतली नाही हे मान्य करायला हवे. जनता आणि यंत्रणा दुसऱ्या लाटेबाबत काही प्रमाणात गाफील राहिले. 

आपल्या हातात काही गोष्टी होत्या...

  • करोना संसर्ग टाळण्यासाठी लोकांना नियम पाळण्यासाठी बाध्य करणे. 
  • पहिली लाट ओसरली तरी गर्दी होणारे सर्व कार्यक्रम टाळणे. सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने घालणे. 
  • ज्या व्यक्तींचा जनसंपर्क अधिक आहे अशा सुपर स्प्रेडर व्यक्तींचे विशेष सर्वेक्षण करणे. 
  • दुसऱ्या लाटेची शक्यता मनात ठेवून रुग्णालय व्यवस्था सिद्ध ठेवणे. 

प्रश्न - पुणे, मुंबई, नाशीक, ठाणे या ठिकाणी करोना संसर्गाचे प्रमाण खूप जास्त का आहे? देशाचा विचार करता महाराष्ट्रातच हे प्रमाण का आहे?
- महाराष्ट्रात रुग्ण जास्त असण्याचे पहिले कारण आहे लोकसंख्येचे! लोकसंख्येनुसार महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. उत्तर प्रदेश राज्याच्या खालोखाल सर्वाधिक लोकसंख्या ही महाराष्ट्राची आहे त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळणे स्वाभाविक आहे.

...पण मग देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये करोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रापेक्षा कमी कशी काय याचे उत्तर अर्थातच वेगळे आहे. आपण पाहतो आहोत की, मुळात करोना रुग्णांची संख्या ही शहरी भागात अधिक दिसून येते आहे. महाराष्ट्रातील एकूण रुग्णसंख्येपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण हे केवळ मुंबई-ठाणे, पुणे आणि नागपूर या चार महानगरांमध्ये एकवटलेले आहेत.

याचा अर्थ कोणत्याही भूप्रदेशाचे शहरीकरणाचे प्रमाण या आजाराच्या प्रसाराकरता अधिक महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र हा देशातील सर्वाधिक शहरीकरण झालेला प्रांत आहे. केरळ, तामीळनाडू वगळता इतर कोणत्याही राज्यात महाराष्ट्राएवढे (सुमारे 50 टक्के) शहरीकरण झालेले नाही. देशातील सर्वाधिक लोकसंख्येची जी पाच राज्ये आहेत त्यांमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, प.बंगाल आणि मध्य प्रदेश यांचा समावेश होतो. उत्तर प्रदेशातील आणि बिहारमधील शहरीकरणाचे प्रमाण अवघे 22 टक्के आणि 11 टक्के असे आहे. प. बंगाल आणि मध्य प्रदेशातही जवळपास 70 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते आहे. 

अधिक विकसित आणि शहरीकरण अधिक असलेल्या देशांमध्ये करोना अधिक प्रमाणात वाढताना आपण जगभरातही पाहतो आहोत. सुमारे वीस कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशएवढेच करोना रुग्ण दोन अडीच कोटींच्या दिल्लीमध्येदेखील आढळले आहेत ही गोष्ट पुरेशी बोलकी आहे. शहरीकरणाबरोबर वाढणारी लोकसंख्येची घनता हे याचे मूळ कारण आहे. 

आपण पुण्याचे उदाहरण घेऊ. देशात सर्वाधिक करोना रुग्ण महाराष्ट्रात तर महाराष्ट्रात सर्वाधिक करोना रुग्ण हे पुण्यात आहेत. पुणे तिथे काय उणे? ही म्हण करोनाच्या महामारीनेदेखील विचित्ररीत्या सिद्ध केली आहे. वास्तविक पाहता मुंबई हे शहर पुण्यापेक्षा मोठे आहे शिवाय मुंबई ही देशाची आर्थिक राजधानीदेखील असल्याने या शहाराचा आंतरराष्ट्रीय संपर्क मोठा आहे आणि तरीही पुण्यात मुंबईपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. याची कारणे शोधण्यासाठी आपल्याला विविध घटकांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. 

स्वाईन फ्ल्यू पॅंडेमिकच्या काळातही आपण हे पुण्याबाबत पाहिले आहे. या शहराने आणि जिल्ह्याने सातत्याने सर्वाधिक स्वाईन फ्ल्यू रुग्ण रिपोर्ट केले आहेत. याचे पहिले कारण अर्थात हवामानाचे आहे. पुण्याचे अंशतः कोरडे वातावरण आणि 20 ते 28 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असणारे सरासरी तापमान स्वाईन फ्ल्यूसारख्या विषाणूच्या प्रसारासाठी उपयुक्त ठरते. डॉ. मनदीप चड्डा यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ‘Dynamics of Influenza Seasonality at Sub-Regional Levels in India and Implications for Vaccination Timing’ (‘डायनामिक्स ऑफ इन्फ्लुएंझा सिझनॅलिटी ॲट सबरिजनल लेव्हल्स इन इंडिया ॲन्ड इम्प्लिकेशन्स फॉर व्हॅक्सिनेशन टायमिंग’) या संशोधनपर लेखातूनही हीच बाब प्रकर्षाने समोर आली आहे पण हवामान आणि करोना यांचा सहसंबंध अजून नीट सुस्पष्ट व्हावयाचा आहे. 

पुण्याचा गेल्या दशकाचा लोकसंख्यावाढीचा दर आपण पाहिला तर तो 36 एवढा आहे. या तुलनेत संपूर्ण महाराष्ट्राचा दशकाचा वाढीचा दर 16 एवढा आहे. मुंबईचा गेल्या दशकाचा हाच दर ऋणात्मक म्हणजे वजा 5.75 एवढा आहे. यावरून गेल्या दशकात पुणे किती वेगाने वाढले आहे याची तुलनात्मक कल्पना आपल्याला येते. 

एकीकडे पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून पुणे आंतरराष्ट्रीय नकाशावर ठळकपणे येत असताना पिंपरी-चिंचवड नवे डेट्रॉईट म्हणून उदयाला येत आहे. या सगळ्या घडामोडींमुळे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 2017च्या अहवालानुसार नोकरीच्या आणि शिक्षणाच्या निमित्ताने होणाऱ्या स्थलांतरामध्ये पुण्याने मुंबईला मागे टाकले आहे. या साऱ्याचा परिणाम पुण्यासारखी शहरे बेलगाम वाढत जातात, लोकसंख्येची घनता आभाळाला भिडते आणि अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या दिवसागणिक वाढत जाते.  

आज राज्याची लोकसंख्येची घनता 603 एवढी असताना पुण्याची घनता मात्र 9400च्या घरात आहे. या सगळ्या घटकांचा परिणाम स्वाईन फ्ल्यू, करोना, टीबी यांसारख्या आजाराच्या प्रसाराच्या गतिशास्त्रावर स्वाभाविकपणे होत असतो. पुणे ही केवळ एक केस-स्टडी आहे. जे पुण्यात घडले आहे तेच थोड्याफार फरकाने ठाणे, औरंगाबाद, नाशीक, नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये घडते आहे.

कोणत्याही राज्याची रोग सर्वेक्षण व्यवस्था जेवढी प्रभावी तेवढी त्या राज्याची रुग्ण शोधण्याची क्षमता अधिक असते. गेल्या दहा वर्षांचा स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू यांसारख्या आजाराचा इतिहास जरी आपण पाहिला तरी महाराष्ट्राने नेहमी सर्वाधिक किंवा जास्तीत जास्त रुग्ण नोंदवल्याचे आपल्या लक्षात येईल. 

प्रभावी आणि पारदर्शक सर्वेक्षणामुळे केरळसारख्या लोकसंख्येच्या तुलनेत देशात तेराव्या क्रमांकावर असलेल्या राज्यानेदेखील देशात महाराष्ट्रापाठोपाठ सर्वाधिक म्हणजे सव्वातेरा लाख रुग्ण नोंदवले आहेत. बालमृत्यू, मातामृत्यू यांसारख्या आरोग्यविषयक निर्देशांकात केरळची आकडेवारी युरोपिअन देशांची बरोबरी करणारी आहे. सक्षम सर्वेक्षण व्यवस्थेमुळे या राज्यानेही महाराष्ट्राप्रमाणेच सर्वाधिक रुग्ण नोंदवले आहेत. शास्त्रीय भाषेत याला ‘रिपोर्टिंग बायस’ म्हणतात. 

महाराष्ट्रात 23 एप्रिलपर्यंत सुमारे अडीच कोटी जणांची करोना तपासणी झाली आहे. राज्याची लोकसंख्या लक्षात घेतली तर राज्यातील प्रत्येक सहावा माणूस करोनासाठी टेस्ट झाला आहे असा याचा अर्थ होतो. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या महानगरांमध्ये हे प्रमाण अजून जास्त आहे. महाराष्ट्र, केरळ यांसारख्या राज्यांतील पारदर्शक सर्वेक्षण व्यवस्थेमुळे या राज्यांतून रुग्ण अधिक प्रमाणात रिपोर्ट होतात हे तथ्य नाकारण्यात अर्थ नाही. महाराष्ट्रात अलीकडील काळात विषाणूमध्ये झालेले बदल हेही एक कारण या वाढीमागे आहेच. 

प्रश्न - पहिल्या लाटेच्या वेळी आणि आता दुसऱ्या वेळेसही लॉकडाऊन केले ते योग्य होते का? हाच एकमेव पर्याय आपल्याकडे होता की अन्य काही उपाययोजना शक्य होत्या का? 
- लॉकडाऊन हा काही करोना महामारी रोखण्याचा एकमेव उपाय नाही. खरे म्हणजे लॉकडाऊन हे एक पॉज बटन आहे. अनेकदा करोना किंवा स्वाइन फ्लू यांसारखे नवे आजार पॅंडेमिक़ स्वरूपामध्ये आपल्याकडे येतात तेव्हा कोणत्याही देशाची सार्वजनिक आरोग्यव्यवस्था, तेथील रुग्णालये, प्रयोगशाळा या नव्या आजाराच्या उद्रेकाला तोंड देण्यासाठी पुरेशा सिद्ध नसतात. तेव्हा ही सारी सिद्धता पूर्ण करता यावी आणि त्या काळामध्ये संसर्गाचा वेग वाढू नये याकरता महामारीच्या सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन महत्त्वाचे असते. इंग्रजीमध्ये ज्याला आपण ‘बाइंग दी टाईम’ असे म्हणतो म्हणजे वेळ खरेदी करणे. तसे लॉकडाऊनचे स्वरूप असते. 

...परंतु प्रत्येक लाटेच्या वेळी किंवा जेव्हा-जेव्हा प्रसाराचा आणि संसर्गाचा वेग वाढतो तेव्हा-तेव्हा प्रत्येक वेळी लॉकडाऊन लावणे हा योग्य उपाय ठरत नाही. लॉकडाऊनचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम हे अनेकदा मूळ आजारापेक्षा भीषण असू शकतात, असतात. स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवरून आपल्याही ते नीट लक्षात आले आहेत त्यामुळे आपली रोग सर्वेक्षण व्यवस्था सक्षम करणे, नवीन आजारासाठी प्रयोगशाळा आणि रुग्णालये सिद्ध करणे याला पर्याय म्हणून लॉकडाऊनकडे पाहिले जाऊ नये.

प्रश्न - पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील विषाणूमध्ये काय फरक आहे? 
- विषाणू हा मुळात सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवर रेंगाळणारा सूक्ष्मजीव आहे. एखाद्या जिवंत पेशीत प्रवेश केल्याशिवाय विषाणू तगून राहू शकत नाही किंवा वाढू शकत नाही. विषाणू एखाद्या सजीव पेशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याची वाढ होते म्हणजे तो स्वतःच्याच अनेक कॉपी तयार करतो. एका अर्थाने एखाद्या झेरॉक्स मशीनवर आपण मूळ कागदपत्राच्या अनेक प्रती कराव्यात अशा पद्धतीने एका विषाणूकणाचे अनेक विषाणूकण पेशीमध्ये तयार होतात मात्र या कॉपी तयार करताना आपल्याकडून जसे टायपो होतात, स्पेलिंग मिस्टेक्स होतात त्या पद्धतीने विषाणूंच्या कॉपी करतानाही घडते आणि त्यातून विषाणूच्या रचनेमध्ये बदल होऊन विषाणू म्युटेट होतो. 

विषाणूमध्ये होणारे हे बदल अनेकदा नजरचुकीने होणारे बदल असतात तर काही वेळा यजमानाच्या (बाधिताच्या) प्रतिकारशक्तीला फसवण्यासाठी, तिच्यावर मात करण्यासाठी, विषाणूविरोधी औषधांचा मारा चुकवण्यासाठी केलेले जाणीवपूर्वक बदलही असतात. दुसऱ्या लाटेमध्ये आपण विषाणूंची जनुकीय रचना तपासण्याचे काम करतो आहोत. त्यामध्ये या विषाणूमध्ये काही महत्त्वपूर्ण जनुकीय बदल झालेले दिसून येत आहेत ज्याला आपण डबल म्युटेशन म्हणतो किंवा इंडिअन व्हेरिअंट म्हणतो. तो बदल विषाणूमध्ये झालेला काही भागांत दिसतो आहे. E484Q  आणि L425R हे बदल झाल्याने या विषाणूच्या प्रसाराचा वेग वाढला आहे आणि तो रुग्णाच्या प्रतिकारशक्ती संस्थेस गुंगारा देतो आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. तथापि त्याच्या तीव्रतेमध्ये वाढ झालेली नाही ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. 

प्रश्न - लसीकरणासाठी आज जी विकेंद्रीकरण पद्धत वापरली जात आहे तीच सुरुवातीपासून तपासणीसाठी / रुग्णाचा शोध घेण्यासाठी वापरता आली असती का?
- लसीकरण असो किंवा उद्रेक प्रतिबंध आणि नियंत्रण असो त्याचे नियोजन करताना आपल्याला आपल्या दुबळ्या बाजू काय आहेत याची जशी माहिती हवी तशीच एकूणच आपली बलस्थाने काय आहेत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. करोना आजाराचे स्वरूप लक्षात घेता बहुसंख्य रुग्ण हे सौम्य स्वरूपाचे किंवा लक्षणे विरहित आहेत. या रुग्णांवर घरगुती पातळीवर उपचार करणे शक्य आहे आणि म्हणूनच लोकसहभागातून करोना नियंत्रणाचे कम्युनिटी मॉडेल उभे करणे शक्य आहे. 

प्रत्येक करोना रुग्णास वेळेत उपचार मिळावेत याकरता गावपातळीपासून नियोजनाची गरज आहे. आपल्याकडे ग्रामीण भागात साधारणपणे प्रत्येकी पाच हजार लोकसंख्येला एक उपकेंद्र आहे. राज्यात एकूण साडेदहा हजारापेक्षा अधिक उपकेंद्रे आहेत. आजच्या घडीला राज्यात सात लाखाच्या आसपास करोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यांतील सुमारे सत्तर टक्के रुग्ण हे शहरी भागात आहेत. याचा अर्थ ग्रामीण भागात प्रत्येक उपकेंद्र स्तरावर वीस-पंचवीसपेक्षा अधिक रुग्ण नाहीत. अर्थात काही भागात हे प्रमाण कमीजास्त असू शकते. हे रुग्ण ग्रामीण भागामध्ये चांगले सूक्ष्म नियोजन करून हाताळणे सहजशक्य आहे. राज्यातील अनेक गावांनी गावकऱ्यांनी एकत्र येऊन अशी करोना केअर सेंटर्स सुरू केली आहेत. 

जे ग्रामीण भागात तेच आपल्याला शहरी भागातही करणे शक्य आहे. आपल्याकडे सर्वाधिक करोना रुग्ण हे शहरी भागात आहेत. शहरी भागातही आपल्याला फिल्ड पातळीवर काही तयारी करावी लागेल तरच खूप मोठ्या प्रमाणावर असणारे सौम्य रुग्ण आपल्याला फिल्ड पातळीवर, घरगुती पातळीवर बरे करता येतील आणि रुग्णालयाकडे वळणारा अनावश्यक लोंढा थोपवता येईल. ज्यांना खरोखरच बेडची आवश्यकता आहे त्यांना बेड मिळण्याची शक्यता वाढून गुंतागुंत आणि मृत्यूचे प्रमाण अजून कमी करता येईल. 

प्रत्येक शहरी भागात प्रत्येक पंचवीस हजार लोकसंख्येला एक याप्रमाणे आपल्याला एक करोना क्लिनिक उभे करावे लागेल. सध्या राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पाहता दर दशलक्ष लोकसंख्येमध्ये साडेपाचशे रुग्ण आहेत. याचा अर्थ आपण जेव्हा दर लाख लोकसंख्येमध्ये चार करोना क्लिनिक्स उभी करू तेव्हा या प्रत्येक क्लिनिकला घरगुती विलगीकरणात असलेले सुमारे शंभर रुग्ण पाहण्याची जबाबदारी असेल. याबाबत मी सविस्तर मांडणी केली आहे. यातूनच आम्ही सी2सी2 मॉडेलही विकसित केले आहे. झिशान अयुब हा सुप्रसिद्ध अभिनेता हे मॉडेल सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहचवतो आहे. 

प्रश्न - गृहविलगीकरण म्हणजे नेमके काय करणे अपेक्षित आहे?
- करोनाबाधित रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. अशा रुग्णांना फार मोठ्या वैद्यकीय उपचारांची गरज नसते मात्र त्यांच्यापासून आजाराचा संसर्ग इतरांना होऊ शकतो हे लक्षात घेऊन ज्या रुग्णांच्या घरांमध्ये पुरेशी जागा आहे, रुग्णाकरता वेगळी खोली आहे अशा रुग्णांना घरच्या घरी विलग करून ठेवणे शक्य आहे. यालाच आपण गृहविलगीकरण असे म्हणतो. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णाने विलगीकरण अत्यंत कडकपणे पाळणे आवश्यक असते. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे आणि कोणतीही गंभीर लक्षणे दिसू लागताच रुग्णालयात भरती होणे गरजेचे आहे.

प्रश्न - पहिल्या लाटेत 14 दिवस विलगीकरण करणे पुरेसे मानले जात होते मात्र आता अगदी सतरा ते वीस दिवस विलगीकरणात राहण्यास सांगितले जात आहे. याचे नेमके कारण काय? या दुसऱ्या लाटेत विषाणूचा प्रभाव 28 दिवस राहतो असेही करोना सेंटरमध्ये सांगितले जात आहे. हे खरे आहे का आणि अशा स्थितीत रुग्णाने काय काळजी घेतली पाहिजे?
- विलगीकरणाचे नियम काहीही बदलले नाहीत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही रुग्णाने 14 दिवसांकरता कडक विलगीकरण पाळणे आवश्यक आहे. घरच्या घरी करोना रुग्णांची काळजी घेताना कोणते नियम पाळले पाहिजेत हे समजून घेऊ या. 

  • रुग्णाने 24X7 वेगळ्या खोलीत राहायला हवे आणि हॉल/किचन मध्ये येणे पूर्णपणे टाळायला हवे. घरात वृद्ध, लहान मुले, गरोदर महिला, जोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्ती असतील तर त्यांच्याशी संपर्क टाळणे अधिक महत्त्वाचे!
  • रुग्णाने आणि रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने ट्रिपल लेअर सर्जिकल मास्क वापरावा. 
  • घरातील निश्चित अशा एकाच व्यक्तीने रुग्णाची नियमित काळजी घ्यावी.
  • काळजीवाहू व्यक्तीने आपल्या हातांची स्वच्छता राखली पाहिजे. तिने घरातील वस्तू, पृष्ठभाग नियमित स्वच्छ करावेत.  
  • रुग्णाचे कपडे, प्लेट्स आणि इतर गोष्टी शेअर करू नयेत. 
  • आठ तास वापरून झाल्यानंतर किंवा ओले/खराब झाल्यानंतर मास्क बदलावेत. मास्क प्रथम एक टक्का सोडिअम क्लोराईड द्रावणात टाकावेत आणि नंतर जाळून अथवा जमिनीत खोल पुरून टाकावेत. 
  • रुग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार चालू ठेवावेत. 
  • रुग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे उपचार घ्यावेत. तापमानाची नियमित नोंद ठेवावी. पल्सऑक्सीमीटरद्वारे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण दिवसातून तीन वेळा मोजावे. ऑक्सिजनचे प्रमाण त्र्याण्णवपेक्षा कमी होणे हे गंभीर आजाराचे लक्षण आहे. दिवसातून एक वेळा सहा मिनिटे वॉक टेस्ट करा. 
  • रुग्णाने आपल्या प्रकृतीची माहिती दैनंदिन स्वरूपात स्थानिक डॉक्टरांना द्यावी. लक्षणे वाढत असल्यास डॉक्टर योग्य निर्णय घेऊ शकतात. 
  • आपण घरगुती विलगीकरणात आहोत आणि आपल्याला फारशी लक्षणे नाहीत म्हणून या रुग्णांनी छोटयामोठया कारणांसाठी घराबाहेर पडणे, इतर लोकांसोबत मिसळणे टाळले पाहिजे. वैद्यकीय सल्ल्यानुसार आपले विलगीकरण शिस्तीने पाळणे आवश्यक आहे. 

करोना रुग्णाची काळजी घरगुती पातळीवर नीटपणे घेता यावी यासाठी स्थानिक डॉक्टर आणि रुग्ण यांचा उत्तम समन्वय असायला हवा. 

प्रश्न - फॅबिफ्ल्यू ही गोळी करोना सेंटरमध्ये दिली जात नाही मात्र खासगी रुग्णालयात अत्यंत महत्त्वाचे औषध म्हणून दिले जाते. महत्त्वाचे औषध असल्यास असा फरक का?
- फॅविपिरावीर हे औषध फॅबिफ्ल्यू या नावाने प्रसिद्ध आहे. याचा समावेश रुग्ण उपचार प्रोटोकॉलमध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे ते खासगी रुग्णालये देतात आणि सरकारी रुग्णालये देत नाहीत असे नाही. रुग्णाच्या लक्षणानुसार ते दिले जाते. 

प्रश्न - रेमिडेसीवर व अन्य काही अशा आवश्यक इंजेक्शन्सचा, औषधांचा तुटवडा कशामुळे निर्माण झाला? ही परिस्थिती पाहता अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव होता असं म्हणायला पूर्ण जागा आहे...
- रेमिडेसीवर किंवा टोसिलोझुमॅब, अन्य औषधे ही एका अर्थाने करोना रुग्णांसाठी प्रायोगिक स्वरूपात वापरली जात आहेत. ही औषधे काही या आजारावरील रामबाण उपाय नाहीत. एका विशिष्ट वेळी ती वापरली तर रुग्णाला बरे होण्यास किंवा बरे होण्याचा कालावधी कमी करण्यास ती हातभार लावतात त्यामुळे ही औषधे कोणत्या रुग्णाला आणि कोणत्या स्टेजमध्ये द्यावीत हा डॉक्टरांचा क्लिनिकल निर्णय आहे. 

तथापि आपल्याकडे अशा महामारीच्या काळात अशा औषधांचा साठा करून ठेवणे, त्यांचा काळा बाजार करणे, बोगस औषधे विकणे यांसारखे प्रकार समाजविघातक तत्त्वे करताना दिसतात. त्याचा विपरीत परिणाम या औषधाच्या उपलब्धतेवर झाला हे खरे आहे पण आता राज्य सरकारने या औषधांची उपलब्धता आणि वितरण ही जबाबदारी जिल्हाधिकारी स्तरावर दिल्याने त्यामध्ये सुरळीतपणा येण्यास मदत होते आहे. 

प्रश्न - ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला, काहींना प्राण गमवावे लागले. एकूणच या सगळ्या यंत्रणेत दोष किंवा लूपहोल्स कुठे दिसत आहेत? उपाय काय आणि त्यावर...?
 - यापूर्वी आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज कधीही लागलेली नव्हती. पहिल्या लाटेच्या वेळी आपण आपली ऑक्सिजन निर्मिती क्षमता विकसित केलेली होती. तथापि दुसऱ्या लाटेच्या वेळी वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रत्येक रुग्णालयाची ऑक्सिजनची गरज वाढली. जो ऑक्सिजन एखाद्या रुग्णालयास दोन आठवडे पुरेसा व्हायचा तो एका दिवसासाठी लागू लागला त्यामुळे अचानक वाढलेल्या या गरजेमुळे व्यवस्थेची तारांबळ उडाली, सर्वसामान्य रुग्णाला त्याचा प्रचंड त्रास झाला. आपण अगदी उपजिल्हा रुग़्णालयापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ऑक्सिजनचे कायमस्वरूपी टॅंक उभे करतो आहोत. मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर वितरीत करतो आहोत. याशिवाय ऑक्सिजन वाया जाऊ नये यासाठी ऑक्सिजन ऑडीट नियमितपणे सुरू करण्यात आलेले आहे. यामुळे ऑक्सिजन पुरवठा आणि मागणी यांतील तफावत कमी होण्यास मदत होणार आहे. 

(मुलाखत - हिनाकौसर खान)


या मुलाखतीचा उत्तरार्ध इथे वाचा 

Tags: मुलाखत कोरोना प्रदीप आवटे आरोग्य Interview हिनाकौसर खान-पिंजार Corona Awate Health Pendemic Health Infrastructure हिनाकौसर खान पिंजार Load More Tags

Comments:

Anand Gosavi

नेमकी आणि नि: संदिग्ध उत्तरे दिली आहेत. तज्ञ असून ही तज्ञ आहे, असा आविर्भाव नाही. त्यामुळे मिळालेली माहिती ही केवळ माहिती नसून ज्ञान वर्धन करणारी पुरवणी मला झाली आहे. Doc, खूप खूप धन्यवाद !

Suresh Pund

अतिशय उत्तम माहिती.

डॉ. रजनीश बांबोळे

आपण दिलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून दिलेली माहिती अत्यंत महत्वाची आहे

Prabhakar kshirsagar

खूप छान माहिती आहे,व अभ्यासपूर्ण लेख

डॉ अमोल पाटील

अतिशय अभ्यासपूर्ण लेख आणि उपयुक्त माहिती

Add Comment